पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/११

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


ओळखला जाणारा आपला देश या ‘उद्योगपतींं'मुळे जगाच्या औद्योगिक नकाशावर आला. त्यांनी जगाला भारताची नव्याने ओळख करून दिली.

 उद्योग जगताच्या या अध्वर्यूंची नवी पिढी संस्थानिकांच्या नव्या पिढीच्याच मार्गाने निघाली आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर नव्या ‘महाराजा'चा उदय झाला आहे.

 काही दिवसांपूर्वी मी प्रसिध्द उद्योगपती जी.डी. बिर्ला यांच्या एका नातवासमवेत काम करीत होतो.कुबेरालाही लाजवेल इतक्या संपत्तीचा वारसाहक्काने मालक असणारा हा नातू अत्यंत कष्टाळू होता. इतकी राबणूक हा कशासाठी करतो याचे मला नवल वाटलं. एकदा न राहवून मी त्याला विचारलं, “आपण इतके काम का बरंं करता? धनवान माणसे कमी काम करतात, असं मी ऐकलं होतं. आपण तर सतत कार्यमग्न असता,” तो म्हणाला, ‘परिश्रमाचे प्रमाण संपत्तीवर नव्हे, तर आपल्याला काय साध्य करावयाचे आहे, यावर अवलंबून आहे. मी कॉलेजात असताना माझ्या आजोबांनी एकदा मला विचारलं, ‘तू कसला अभ्यास करतोस?' मी म्हणालो, ‘अर्थशास्त्राचा'. यावर ते म्हणाले, `ठीक आहे, मग मला सांग की भांडवलशाही म्हणजे काय?’ जो स्वतःच भांडवलशाहीचा मुकुटमणी आहे, त्याला भांडवलशाही कशी समजून द्यायची या संभ्रमात मी असतानाच ते म्हणाले, 'मुला, लक्षात ठेव, संपत्तीचा उपयोग करून अधिक संपत्ती निर्माण करणंं म्हणजेच भांडवलशाही!' मला क्षणभर काही उमगलं नाही. ते ओळखून ते पुढे म्हणाले, ‘याचा अर्थ असा की, तुझ्याकडंं एक कोटी रुपये असतील तर त्यातून १० कोटी निर्माण करणं, १० कोटी असतील तर त्याचे १०० कोटी करणं यालाच भांडवलशाही म्हणतात.

 ‘भांडवलवादाच्या बरोबर विरुध्द असतो तो ‘उपभोग'वाद. याचा परिणाम असा होतो की, कोटीचे दहा लाख होतात. दहा लाखांचे एक लाख होतात आणि तुझ्याकडंं एकच लाख असतील तर तुझ्या मुलाला टांगा हाकून पोट चालवावंं लागेल.” बिर्लाच्या नातवाच्या या खुलासेवार उत्तराने तो नव्या ‘महाराजां'पैकी नाही हे मी समजलो.

 पहिल्या पिढीतील उद्योगपती असे संपत्तीतून संपत्ती प्रसवणारे खरेखुरे उद्योजक होते. म्हणूनच धीरुभाई अंबानींनी अवघ्या १० हजार रुपयांमधून केवळ तीन दशकांत ४० हजार कोटींचे साम्राज्य उभे केले. मात्र, या औद्योगिक घराण्यांंची समस्या त्यांच्या दुसऱ्या पिढीपासून सुरू होते. ही पिढी तोंडात सोन्याचा चमचा धरून जन्माला आलेली असते. तिचा कल संपत्तीचा उपभोग घेण्याकडे असतो. मग उद्योगातून मिळालेल्या फायद्याचा उपयोग भव्य प्रासादांची उभारणी, भपकेबाज कार्यालये, महागडी पेंटिंग्ज खरीदणे, मोटारी उडवणे, दागिने, कपडेलत्ते यासाठी सुरू होता. नवे महाराज निर्माण होतात.

हे महाराज तयार होण्यासाठी पुढील तीन बाबी कारणीभूत असतात.

नव्या युगाचे महाराज/२