Jump to content

पाणी! पाणी!!/मृगजळ

विकिस्रोत कडून



८. मृगजळ
 चंपकशेठची हिरव्याकंच मळ्यातली ओतीव बांधलेली विहीर. त्यामध्ये मे महिन्यातही परसभर असलेलं निव्वळशंख पाणी. किती वेळ तरी परशू कठड्याशी वाकून पाण्यात भर दुपारी पडलेलं आपलंच प्रतिबिंब उदास व शून्य मनानं पाहात आहे. मनात कसले कसले विचार येताहेत हेही समजत नाही अशी गूढ-भरली अवस्था.

 शेठचा तो बहरलेला मळा दोन ओढ्यांच्या संगमाच्या त्रिकोणात पसरलेला. तरारलेली ऊसशेती, मस्त पोसलेला गहू व हरभरा.... आणि कोप-यात एकरभर प्लॉटवर पसरलेला द्राक्ष मळा.

 कुठल्याही जातिवंत शेतक-याची नजर भरून यावी अशी ही समृद्ध शेती, बहरलेलं व सर्वांगांनी फुलून आलेलं हिरवं स्वप्न!

 पण - पण या वैभवाचा धनी आहे चंपकशेठ. त्याचे हात कधी काळ्या मातीमध्ये रापले नाहीत की, त्याच्या शरीराला उसाचे तुराटे दंश करून गेले नाहीत.

 हे भागधेय आपलं व आपल्यासारख्या आठ-दहा शेतक-यांचं. पण स्वतःची जमीन सोडून मजुरीवर चंपकशेठसाठी घाम गाळावा लागतोय.

 घाम गळाला की जमीन प्रसन्न होतेच. तिला हिरवे धुमारे फुटतातच. पण ते कुरवाळायचा आपला अधिकार नाही; कारण आपण इथे गडीमाणूस...

 परशूचे डोळे पाहाता पाहाता भरून आले. तो बाहीनं ते कोरडे करायचा प्रयत्न करतो, पण विकल मनाला आवर घालता येत नाही, त्यामुळे डोळे पाझरायचे ते पाझरतच...

 त्याला आपला जमिनीचा भकास, विराण तुकडा आठवत असे. दोन वर्षे अपुल्या पावसानं शेती पिकली नाही... आणि मंजूर झालेली शासनाची जीवनधारा विहीर म्हणजे केवळ एक खोल खड्डाच झालाय. दिलेल्या बजेटमध्ये खडक मध्ये आल्यामुळे जेमतेम दहा मीटरच खाली जाता आलं. जिल्हा परिषदेचे अधिकारी म्हणतात की पंधरा मीटरवर पाणी आहे. गावातल्या एका पायाळू बामणानं इथं पाणी नाही असा छातीठोकपणे निर्वाळा दिला आहे. त्यामुळे उरलेलं खोदकाम करण्यासाठी बँकेचे कर्ज काढायला जीव धजावत नाही; कारण मागचंच पंधरा हजाराचं कर्ज... सरकारने दहा हजार माफ केलं असलं तरी उरलेलं फेडायचं आहेच की....।

 त्यामुळे त्याच्या आसुसलेल्या, तहानलेल्या जमिनीला पाण्याचा टिपूस नाही. अपु-या पावसामध्ये पेरलेली हायब्रीड नुसतीच उगवली, दाणा भरलाच नाही. फक्त दीड-दोन महिने दोन्ही बैलांच्या चा-याची तेवढी सोय झाली, पण परशू व त्याच्या कुटुंबाला फाके पडून मजुरीच्या कामासाठी बाहेर पडावं लागलं. बायको व वयात आलेली पोरं बंडिंगच्या मातीकामावर जाते, सातवीतून शाळा सोडलेला शिर्पा पाटलाची गुरं वळीत रानोमाळ हिंडतोय व आपण या चंपकशेठच्या मळ्यात सालगडी म्हणून राबतोय.

 सारं शिवार उजाड व वैराण बनलेलं... जिथवर नजर घालावी तेवढं रान काळपटलेलं, रखरखीत.

 अपवाद होता चंपकशेठच्या मळ्याचा. तो बारा एकरांचा मळा ठायी ठाम हिरवागार बहरलेला, आणि याचं कारण याच एच. पी.ची मोटार सतत बारा घंटे चालली तरी न उपसा होणारं पाणी.

 ही विहीर चंपकशेठनं चक्क ओढ्यामध्ये बांधून तेवढा भाग दगडी पीचिंगन आपल्या मळ्याला जोडून घेतला होता. ओढा व सरकारच्या मालकीचा. इथं फक्त तेच विहीर बांधू शकतं, तेही पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी पण शेठचा हात वरपर्यंत पोचलेला. त्यांन म्हणे प्रांतसाहेबाकडून अपिलास स्टे घेतला होता.

 जणू साऱ्या गावाचं पाणी याच एका विहिरीत झिरपून पाझरत आलंय--- सारा गाव, साऱ्या गावचं शिवार तहानेनं व्याकूळ झालंय... आणि इथे मात्र जमिनीला उमाटा फुटावा एवढं जादा पाणी खळाळलंय...

 ‘देवाघरचा न्याय इपरीत म्हानावा की काय.... परशूच्या मनाला पडलेलं कोडं सुटत नव्हतं. पण दाडून आलेला क्षोभ व एक प्रकारची सुन्न बधिरता मात्र जात नव्हती. ते हिरवं रान व बहरलेला मळा जीवाला त्रास देत होता, दंश करीत होता...

 अचानक काहीतरी सळसळत निघून गेल्याचा आवाज झाला, तेव्हा परशूनं दचकून पाहिलं आपलं गर्द हिरवं अंग दिमाखानं सळसळ करीत एक जातिवंत साप संथपणे येत होता !

 परशू त्याच्याकडे नजर बांधल्यासारखा पाहात राहिला.

 मानवी चाहूल लागल्यामुळेच की काय, त्या सापाने फणा काढला? व ‘हिस्स्...' असा फुत्कार टाकला...

 आपले मांजरासारखे असलेले व किंचित हिरवी झांक मारणारे घारे डोळे रोखून परशू त्या फणा काढलेल्या हिरव्यागर्द सापाकडे एकटक पाहात होता.

 ...आणि पाहाता पाहाता त्या दोन मानवी डोळ्यात सर्प उतरला...!


 समोरचं तारेचे काटेरी कुंपण पाहाताच आपल्याच नादात उघड्या पायांनी तापलेल्या जमिनीचे चटके सोसत चटाचटा चालणा-या भीमी व रखमा थबकल्या. आणि त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

 पूर्वेकडून वाहात येणा-या ओढ्याच्या दक्षिणेकडे गाव पसरलेला, तर उत्तरेकडे बौद्धवाडा व मातंग समाजाची वस्ती. त्याच्या टोकाशी भिडलेला व सुळक्यासारखा पात्रात शिरलेला चंपकशेठचा मळा. त्यातून गावामध्ये जायची पायवाट पूर्वापार होती. पण आवंदाच शेठनं तारेचे कुंपण घालून तो रस्ता बंद केला. त्यामुळे गावात जाण्यासाठी वाट वाकडी करून दोन फर्लागाचा फेरा घालून जावं लागायचं....

 बौद्धवाड्यातला प्रत्येक माणूस गावात जाताना शेठनं मळ्याला घातलेलं. तारेचं भरभक्कम कुंपण पाहून थबकायचा. मनोमन किंवा उघडपणे शेठच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार करणारी शिव्यांची लाखोली वाहायचा व दूरची वाट पकडायचा.

 आताही माहेरपणाला आलेली भीमी म्हणालीच, ‘रखमे, आक्रीतच की गं हे. बापूस म्हणालला, आता नदरेनं बघितलं. साऱ्या बुद्धवाड्याला तरासच की हा....'

 ‘हां भीमे-' रखमा म्हणाली,' आपल्या समाजाची वाट शेठनं रोखली. दाद ना फिर्याद... तलाठ्याला दादांनी तक्रार लिहून दिली, पण कोण खबर घेतो? - आपण आधीच गावकुसाबाहेरचे. साऱ्यांनी झिडकारलेले. ही पायवाट तरी आपली का म्हणून राहील?'

 रखमा तालुक्याला हॉस्टेलात राहून मॅट्रिकपर्यंत शिकलेली व आता डी. एड. करून मास्तरीण व्हायचं स्वप्न पाहतेय. सध्या सुट्टी चालू आहे व मॅट्रिकच्या परीक्षेचा निकाल यायचाय. त्याची वाट पाहात गावात भाऊ-वहिनीसोबत राहातेय....

 ‘निस्ती बामणावानी सुद्ध बोलतेस रखमे...' भीमी म्हणाली, 'चांगली शाळा शिकलीस... आमी मातुर या वयापासून सौंसार करतुया...' एक दीर्घ सुस्कारा तिनं सोडला...

 'अगं, पण केरबा चांगला आहे की. तुला सुख नाही देत?'

 ‘धनी लई चांगलाय ग, - पन् सौंसाराचा व्याप का कमी हाय?- भीमी म्हणाली, 'आवंदा तर या दुष्काळानं पार कंबरडं मोडलं बघ. रोज कोसभराहून पानी आनायचं, पुना भाकऱ्या भाजायच्या, रोजगार हमीच्या, नाय तर शेतावर कामाला जायाचं... लई आब्दा व्हते बघ जिवाची....'

 आपल्याच वयाची, बिगारीत आपल्याच शेजारी बसणारी भीमी लहान वयात झालेल्या लग्नामुळे पिचून गेल्याचं रखमाला स्पष्ट जाणवत होतं. एके काळची रसरशीत काया व गव्हाळ रंग आता नाममात्रही शिल्लक नव्हता. पुन्हा अकाली झालेली जीवघेणी प्रसूती, अपुऱ्या दिवसांची झालेली मुलगी, तिची सततची किरकिर व मुलगी झाल्यामुळे सासूकडून होणारा छळ... या सा-यांना रखमाच्या संगतीला वाचा फुटायची.

 आता ती पुन्हा पोटुशी असल्याचं मघाशीच तिनं सांगितलं, तेव्हा जाणत्या रखमानं तिला चांगलंच फैलावर घेतलं होतं. तशी कसनुशी होतं भीमी म्हणाली होती,

 ‘मह्यास्नी खुळी - येडी समज रखमे... पन मी काय करू? धन्यास्नी रातच्याला एक बी खाडा चालत नाय... पुना सासूला पोरगा हवाय.... मंग मी काय करू?'

 तिचे हताश बोल ऐकताच रखमाचा पारा सर्रकन उतरला आणि भीमीच्या गळ्यात हात घालून ती म्हणाली, 'माझं चुकलंच भीमे... अगं, आधीच आपण दलित, पुन्हा आपण बायका म्हणजे दलिताहून दलित. आपली अवस्था पोते-यासारखी. मी तुला असं बोलायला नको होतं; पण काय करू? जिवाचा संताप होतो. मी... मी हे सहन नाही करू शकत!'

 माहेरवाशीण म्हणून बापाकडे भीमी आली होती खरी, पण इथेही खस्ता संपत नव्हत्या. तिची आई आजारी पडलेली आणि बापाचं दारूचं व्यसन मागच्या वर्षी ती आली होती तेव्हापेक्षा वाढलेलं. परवा तर तिनं सासरहून आणलेल्या वीस रुपयांच्या नोटेवर पण बापानं डल्ला मारला होता, ‘परत सासरी जाताना देतो' असं म्हणून लगबगीनं सुकलेला, तहानलेला घसा ओला करायला तो बाहेर पडला होता!

 त्यात पुन्हा पाण्याचा सुरू झालेला त्रास, बौद्धवाड्यातला हापसा आटलेला गावात एक सामुदायिक विहीर होती. तिथं रोज या उन्हाळ्यात टँकरनं चार-पाच खेपा करून पाणी टाकलं जायचं.

 मघाशीच टँकर येऊन पाणी ओतून गेल्याची खबर मिळताच सारेजण घागरी - बादल्या घेऊन पळत सुटले. बुद्धवाड्यात बांधलेल्या समाजमंदिरात रखमा-भीमी निवांतपणे सुखदुःखाच्या गोष्टी करीत बसल्या होत्या. त्यांना उशिरानं हे समजलं, तशा त्याही उठल्या व पाण्यासाठी घागरी कमरेवर घेऊन निघाल्या.

 रखमा आसुसून तो चंपकशेठचा हिरवागार मला पाहात होती. नजरेत ते वैभव सुख आणण्याऐवजी काट्यासारखं सलत राहिलं. मग ती हलकेच म्हणाली,

 'भीमी, आपल्या गावात दरवर्षीच उन्हाळ्यात पाणी कमी पडतं; पण टँकर प्रथमच लावला गेला हो ना?”

 'व्हय रखने गेल्या साली या शेठ्जीची हीर सरकारनं ताब्यात घेतली व्हती व पाण्यासाठी खुली केली होती. बुद्धवाड्यासाठी लई सोईचं व्हतं बघ.'

 'मग यावर्षी काय झाले त्यांची विहीर अधिग्रहण न करायला? सारा गाव तहानलाय, माणसाला पाणी नाही; पण यांच्या उसाला व कडेच्या गाजर गवतालाही पाणी पाजलं जातंय...' रखमा म्हणाली, 'बरं ते जाऊ दे. आपल्याला लगबग करायला हवी. चल चल बघू...'

 'उलीसं थांब रखमे नदर फिरतीय बग' भीमीला अशक्तपणामुळे व अर्धपोटी अवस्थेमुळे चक्कर आल्यासारखं होत होतं. तिचा चेहरा पांढराफेक पडला होता.

 रखमाला गहिवरून आलं. ती म्हणाली, 'भीमे, काय गं तुझी ही दशा? तू इथं त्या झाडाखाली बसं. मी आणते तुझं व माझं पाणी माझी सवय हॉस्टेलला राहिल्यामुळे काही मोडली नाही अजून.'

 'अगं पन रखमे...' भीमीचं बोलणं अर्धवटच राहिलं, कारण गावातून बौद्धवाड्यातल्या चार-पाच बाया येत होत्या. या दोघींना पाहून त्यापैकी एक म्हणाली, बया-बया- बया... किती लेट भीमे - रखमे पानी संपलं की... आता पुना टँकर उद्याच्याला येनार...'

 त्या निघून गेल्यावर भीमी म्हणाली, 'आता कसं व्हायचं रखमे... घरट्यात पान्याचा थेंब पन नाय...'

 क्षणभर विचार करीत रखमा म्हणाली, 'मी असं करते भीमे... हे तारेच्या कुंपणावरून मळ्यात जाते... तिथल्या विहिरीवरचं पाणी आणते. कदाचित तिथं  परशूदादा असेल कुणब्याचा. परवा मला बाजारात गरजावैनी भेटली होती. सध्या शेठजीच्या मळ्यात परशूदादा सालगडी आहे म्हणे-

 ‘आगं पन रखमे–' भीमीला पुढे न बोलू देता रखमा म्हणाली, “पणबिण काही नाही. मी आत्ता येते बघ.' तिनं आपला ओचा गच्च केला. काटे टोचणार नाहीत या बेतानं तारेवर पाय ठेवीत वर चढली आणि पलीकडे मळ्यात उडी मारली.

 हरभरा व गव्हाच्या ओंब्यांतून वाट काढीत रखमा सरळ विहिरीजवळ आली, पण परशू काही दिसला नाही. कदाचित घरी भाकरतुकडा खायला गेला असावा. त्याची म्हातारी तिच्या भावाकडे दहिफळला गेली आहे, घरी वहिनी एकटीच आहे... या विचारानं रखमाला नकळत खुदकन हसू आलं.

 ‘वा S-- काय माल आहे?' आवाजातून लाळेप्रमाणे वासना टपकत होती. रखमा दचकली, शहारली आणि पाहता पाहता संतप्त झाली.

 समोर एक मवालीटाईप तरुण उभा होता. अंगात शहरी कपडे - टी शर्ट, जीन पॅट होती. क्षणार्धात रखमाला ओळख पटली... हा तर चंपकशेठचा वाया गेलेला दलपत होता. कधीकाळी तिच्या वर्गात होता, पण नापास झाल्यामुळे मागे पडला होता.

 ‘दलपत तू? अरे, किती घाण बोलतोस? शरम नाही वाटत?'

 रखमानं त्याला चांगलंच सणकावलं, तसा तोही रागाने म्हणाला,

 ‘वा गं वा, आमच्या मळ्यात एक तर वायर फेन्सिंगवरून आलीस, तेही चोरट्याप्रमाणे परवानगी न घेता व माझीच शरम काढतेस?'

 ‘मी आलेय ते फक्त पाणी घेण्यासाठी; तुझ्या मळ्यातला माल चोरण्यासाठी नाही.' रखमा म्हणाली, 'दरवर्षी तर तहसीलदार तुमची विहीर जनतेला पाणी मिळावे म्हणून ताब्यात घेत होते... पण यंदा तर काय तुम्ही काटेरी तारेचे कुंपण घातलंय, आमची पायवाटही बंद केली.!'

 'ही जमीन आमची आहे व आम्ही यंदा पाण्याची विहीर अधिग्रहित करू नये म्हणून कोर्टातून स्टे घेतला आहे.'

 ‘बरं ते जाऊ दे... मला फक्त पाणी हवंय दोन घागरी.'

 रखमा म्हणाली, ‘मिळेल ना?'

 ‘जरूर! फक्त पाणीच काय मागतेस? दिल मांगो, वो भी देंगे...' दलपत रंगेलपणे म्हणाला.

 पुन्हा एकदा संतापाची तिडीक रखमाच्या मस्तकात उमटली; पण स्वतःला सावरीत एक शब्दही न बोलता ती विहिरीकडे वळली. मोटार चालू होती व पाईपातून पाणी धो - पो वाहात होतं. ती घागर घेऊन खाली वाकली.

 दलपतनं मागाहून तिच्यावर झडप घालून तिला कवटाळलं, 'रखमा, मेरी जान आ, मेरी प्यास बुझा दे... मैं तुझे मालामाल कर दूंगा...'

 आपल्या हाताचा कोपरा तिनं दलपतच्या पुढे आलेल्या ढेरीवर हाणला, तसा कळवळत तो मागे सरकला, रखमानं स्वतःला सावरत भरलेली घागर उचलली आणि पळत सुटली. पुन्हा काटेरी तारेवर पाय देऊन वर चढली व ओढ्याच्या कोरड्या पात्रात उडी मारली. तिच्या उघड्या पायाला तारेचे काटे बेभान झाल्यामुळे टोचले होते. पायातून रक्तही ओघळत होतं; पण आपली सुटका करून घेणं हेच तिचं लक्ष्य होतं. वाहाणाऱ्या रक्ताकडे तिचं लक्षच नव्हतं.

 जवळच झाडाखाली निवांतपणे भीमी बसून होती. तिनं अवाक् होऊन पाहिलं...

 धावत पळत रखमा येत होती. तिची अवघी कुडी थरथरत होती. ती भीमींच्या गळ्यात येऊन पडली व मिठी घालुन कसंबसं म्हणाली, 'भीमे... भीमे... आणि हमसून ती रडू लागली.

 रिकामी घागर बाजूला पडली होती, तारेवरून उडी मारताना सारं पाणी सांडून गेलं होतं.

 पण डोळे मात्र गद्य, अविरत वाहात होते...


 “काय करू भय्या? पण आता माझ्या हातात काही कारभार उरला नाही बघ. मी असा लोळागोळा होऊन पडलोय. सारा कारभार दलपत पाहातोय. तू त्यालाच सांग ना!"

 म्हातारा चंपकशेठ खोकल्याची ढास असह्य झाल्यामुळे वेदना आवरीत अडखळत बोलत होता; पण त्याचा धूर्तपणा कायम होता. भय्याला ते समजत होतं, पण माजी सभापती असलेल्या त्याच्या वडिलांचे ते गेल्या पन्नास वर्षांचे मित्र होते, भय्यालाही मागच्या वर्षी पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी चंपकशेठने भरभक्कम आर्थिक मदत केली होती. त्यामुळे संतापाला मुरड घालणं भाग होतं.

 पण काल रात्री वाड्यावर गावक-यांनी भय्याची स्पष्टपणे केलेली हेटाळणी व मांडलेली तक्रार आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी तहसीलदारांनी दिलेला इशारा आठवला की भय्या प्रक्षुब्ध होत होता.

 काल ज्या गावक-यांनी मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जवळपास शंभर टक्के मतदान भय्याच्या बाजूने करून त्याला निवडून दिलं होतं, ते गावकरी व खासकरून तरुण मंडळी त्याच्यावर कमालीची रुष्ट होती. कारण होतं पाणीटंचाई, भय्यानं तातडी करून टँकर मंजूर करून घेतला होता; पण विहिरीतून पाणी शेंदायची सवय गेल्या चार-पाच वर्षापासून मोडली होती. कारण गावात भय्याच्या वडिलांनी सभापती असताना नळयोजना कार्यान्वित केली होती. गुत्तेदार त्यांचा मेहुणा व भय्याचा मामा होता. त्याने निकृष्ट पाईप खरेदी करून मोठा डत्ला मारला होता व ती पाईपलाईन आता फुटली होती आणि नळयोजणेची विहीर गाळाने भरुन गेली होती. गावात अनेकांना हे माहीत होतं, तेच काल रात्री प्रक्षुब्ध अवस्थेत बाहेर आलं होतं.

 'भय्या या पंचक्रोशीत राजकारणात तुमची घराणेशाही आम्ही विनातक्रार मान्य केली ती जनतेची कामे व्हावीत म्हणून; पण तुम्ही पहिल्याच वर्षी पाण्यासाठी तरसावत आहात.'

 ‘पण पाटील, मी नळयोजनेच्या दुरुस्तीची योजना मंजूर करून घेतली आहे. टेंडर फायनल झाले की काम सुरू होणार.'

 ‘पण तोवर जून येईल, पाऊस पडेल. त्याचा काय उपयोग? आणि तोवर पाण्याचं काय?"

 ‘त्यासाठी यंदाही चंपकशेठची विहीर ताब्यात घ्यायला हवी'

 ‘पण त्यानं कोर्टातून स्टे आणला आहे. मी काय करू?'

 'ते आज झालं हो; पण जेव्हा दलपतनं चक्क ओढ्यामध्ये विहीर बांधली व तेवढा भाग आपल्या शेतात वायर फेन्सिंग करून घेतला, तेव्हा प्रांतसाहेबाकडे पैरवी तुम्हीच केली ना दलपतची !'

 भय्याची अवस्था मोठी अवघडल्यासारखी झाली होती. राजकारणात कसल्या कसल्या तङजोडी कराव्या लागतात. त्यावेळी परिणामाची कल्पना येत नाही. कालांतराने मात्र ते जेव्हा प्रत्ययास येतं, त्याची भीषणता जाणवते.

 भय्यानं दलपतला साथ दिली होती विहिरीच्या प्रकरणात, दलपतनं सरकारी ओढ्यामध्ये चक्क विनापरवाना विहीर खोदली होती व गिरदावरला पैसे चारून फेरफार मंजूर करून घेतला होता. म्हणजे कागदोपत्री तेवढी जमीन व विहीर ही दलपतच्या मालकीची होती. त्यावर गावातला पहिला दलित वकील भीमराव सपकाळनं प्रांतसाहेबांकडे अपील केलं होतं. पण त्यांनीही भय्या - दलपतच्या प्रभावाला पडून ते फेटाळलं आणि दलपतचं अतिक्रमण छानपैकी पचलं गेलं होतं.

 त्यानंतर दोन वर्षे पाणीटंचाई या विहिरीचे पाणी दलपतनं गावाला दिलं होतं. पण यंदा उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच शासनाने गतवर्षी विहीर टंचाईखाली अधिग्रहीत करूनही त्याचे पैसे न दिल्यामुळे व यंदा शेतीमध्ये उस व गहू पेरल्यामुळे त्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे व विहीर अधिग्रहित केली तर त्याचं फार मोठे नुकसान होईल, असा युक्तिवाद करून दलपतच्या वकिलानं कायमचा मनाई हुकूम घेतला होता.

 त्यामुळेच गावक-यांना यंदा भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावं लागत होतं. गावच्या जुन्या माली पाटलानं आपल्या शेवटच्या मुलीचं लग्न गावात न करता मुलाच्या गावी - शहरात मंगल कार्यालयात केलं होतं. गावजेवणाचा विषय निघाला, तेव्हा त्यांनी सरळ ती मागणी धुडकावीत म्हटलं होतं, 'गावजेवण नाही. बायांनों प्यायला पाणी कुठंय ?'

 हा टोला भय्याच्या वडिलांना होता. या दोन घराण्यांची परंपरागत दुष्मनी होती. व नळयोजनेच्या कामात भय्याच्या वडिलांनी पैसे खाऊन निष्कृष्ट काम केले, म्हणून आज पाईपलाईन फुटली व पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली त्यांचा वारस भय्या आता तेच करीत आहे, अशी माहितीही त्यांनीच पेरली असावी, असा भय्याचा कयास होता. यात सत्त्यांश जरी असला तरी राजकारणात तो अद्याप पूर्णपणे मुरलेला नव्हता व त्याची कातडी अजूनही संवेदनशील होती, म्हणून याचा त्याला थोडाबहुत मनस्तापही होत होता.

 म्हणूनच जेव्हा म्हाता-या चंपकशेठचा निरोप घेऊन भय्या बाहेर पडला आणि आपल्या बुलेटला किक मारीत धुराळा उडवीत वेगानं जाऊ लागला, तेव्हा त्याच्या मनात एकच विचार घोळत होता... दलपतला सरळ केलं पाहिजे. आता त्याची साथ राजकारणासाठी फायदेशीर उरलेली नाही.

 पण दलपतही वस्ताद निघाला. भय्यानं 'विहीर खुली करून दे' असं दोस्तान्यात विनवूनही त्यानं दाद दिली नाही. उलट चक्क नकार दिला. वर साळसूद उपदेशही केला,

 'भय्या, डोंट वरी, अजून एक टँकर मंजूर करून घे. पुढल्या महिन्यात उपसभापतीची निवडणूक आहे. तेव्हा मी आहे तुझ्या पाठीशी. पैशाची चिंता नको.'

 पण या क्षणी भय्याला उपसभापतीपद दिल्लीएवढं दूर वाटत होतं. आणि गावकरी चिडले होते व त्यांचा रोष भय्याला परवडणारा नव्हता. प्रथम आपलं गाव व मग मतदारसंघ सांभाळला पाहिजे. बाकी गोष्टीसाठी वेळ आहे...

 घरी आल्यावर भय्यानं वडिलापुढे आपलं मन खुलं केलं. त्याचे वडील बाप्पासाहेब हेही चंपकशेठप्रमाणे वयोवृध्द होऊन घरीच बसले असले, तरी उभी हयात राजकारणात गेल्यामुळे त्यांचा मेंदू आजही तल्लख होता.

 क्षणभर त्यांनी विचारमग्न होतं डोळे मिटून घेतले, तेव्हा भय्यानं ओळखलं आता आपल्या समस्येवर गुरुकिल्ली सापडतेय. बाप्पासाहेब योग्य वेळी अचूक निर्णय घेतात व राजकारणात ते कधीही खेळी चुकत नाहीत, असा त्यांचा लौकिक होता.

 एका रात्रीतून होत्याचं नव्हतं झालं होतं. चंपकशेठचा तो हिरवाकंच मळा साफ उद्ध्वस्त झाला होता. सबंध बारा एकरांच्या तुकड्याला दलपतनं अमाप पैसा खचून बांधलेलं काटेरी तारेचे कुंपण पूर्णपणे मोडून काढलं गेलं होतं. त्या हिरव्यागार शेतामध्ये शेकडो बैल व गुरे रात्रभर मनमुराद चरल्यामुळे उभं पीक नष्ट झालं होतं. विहिरीवर बसवलेल्या मोटारीची दुरुस्तीपलीकडे मोडतोड झाली होती. त्या मळ्याचा हिरवा दिमाख व दलपत - चंपकशेठचा पैशाचा रुबाब रात्रीतून ओसरला होता.

 पोलिस पंचनामा चालू होता, तहसीलदारही येऊन गेले होते. दूर अंतरावर लोक घोळक्या-घोळक्यात उभे होते.

 स्त्रियांच्या घोळक्यात रखमा - भीमी याही होत्या. त्यांच्या व इतर स्त्रियांच्या किंवहुना पूर्ण बुद्धवाड्याच्या प्रतिक्रिया समान होत्या.

 ‘बेस झालं ! आमची वाट मोकळी झाली....'

 ‘लई दिमाख होता दलपतला पैशाचा व या जमिनीचा.. पण गाव उलटलं की काय व्हतं हे आता तेस्नी समजून ईल...!'

 ‘पाण्यासाठी समद्या गावास्नी तरास दिला. भोग म्हना आता त्येची फळं....

 ‘हा तर मोठा चोर हाय, पानी-चोर... समद्या गावाचं पानी ह्येच्या हिरीनं ओढून घेतलं... वंगाळ, लई वंगाळ... वर देव हाय- त्यो साऱ्यांचा हिसाब ठेवतो बाप्पा....' एक माळकरी वृध्द शेतकरी पुन्हा पुन्हा सांगत होता...

 त्यांचं बोलणं ऐकणाऱ्यांत परशूदादाही होता. त्याच्या डोळ्यातला हिरवा सर्प शांत झाला होता. आता त्याची एकच इच्छा होती - चंपकशेठच्या भरल्या विहिरीत एकदा मस्त उडी मारून मनसोक्त पोहण्याची व तप्त शरीर शांत करण्याची...

 रखमाला काळाठिक्कर पडलेल्या दलपतकडे पाहाताना एक अनामिक शांती लाभत होती. एक सूडाचं समाधान लाभत होतं. तिच्या पृष्ठभागाला त्या दिवशी त्याची पडलेली ओंगळ व वासनालब्ध मिठी व तिचा असह्य स्पर्श मिटून गेला होता. पुन्हा ती न्हातीधुती होऊन निर्मळ झाली होती.

 भय्या मात्र त्यावेळी तालुक्याला सभापतीसमवेत नळयोजनेच्या टेंडरची देवाणघेवाण व उपसभापतिपदासाठी खलबत करीत होता, तर घरी झोपाळ्यावर मंद झोके घेत तलख मेंदूचे बाप्पासाहेब स्वतःशीच मंदपणे हसत आपल्या टकलावरून हळुवारपणे हात फिरवत होते.

 गावामध्ये मृगजळाप्रमाणे लखलखणारं हिरवकंच रंगभरित स्वप्न मृगजळाप्रमाणेच पाहाता पाहाता विरून गेलं होतं.


☐☐☐