पाणी! पाणी!!/कंडम

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search


७, कंडम
 ‘भौत देर हुई पाटलीनकाकू, मकान में एक थेंब बी पानी नहीं है। जरा ले लू?' अजिजीनं मुलाण्याच्या सईदानं विचारलं, तेव्हा रहाटानं पाणी शेंदता शेंदता पाटलीणकाकू थांबल्या व ठसक्यात म्हणाल्या,
 'जरा थांब गं. माझं होऊ दे. मला घाई आहे....' निःशब्द चुळबुळत व स्वतःशीच चरफडत सईदा सामुदायिक विहिरीपासून जरा दूर झाली व बाजूच्या काटेरी बाभळीखाली फतकल मारून बसली.

 केवळ सईदाच नव्हे, तर अनेक बायको पाटलीणकाकूचं पाणी भरून केव्हा होतं याची आतुरतेने वाट पाहात होत्या, पण त्यांचं पाणी भरणं काही संपत नव्हतं. त्यांच्या दोन्ही सुना पाण्याचे हंडे डोईवर वागवीत जात - येत होत्या व त्या शेंदत होत्या.

 खरं तर आता त्यांच्या घरची पाटीलकी संपली होती. सरकारदरबारी 'जुने मालीपाटील' अशीच त्यांची नोंद होती; पण पाटलीणकाकूचा सासरा देवमाणूस. साऱ्या गावात आजही त्याचा मान आहे. त्यापोटी त्यांना सारे पाटलीणकाकू म्हणत व नंबर न लावता पाणी घेऊ देत.

 काल रात्री टँकरच्या दोन खेपा झाल्या होत्या. सारं पाणी गाव च्या मारुती देवळाजवळील बहात्तरच्या दुष्काळात अर्धकच्ची खोदलेल्या विहिरीत ओतलं होतं व आज सकाळपासून पाणी नेण्यासाठी बायकापोरांची झिम्मड उडाली होती.

 पाणी क्षणाक्षणाला संपत होतं व सा-याच बायांना धास्ती वाटत होती की, आपली पाळी येईपर्यंत पाणी संपलं तर पुन्हा संध्याकाळपर्यंत वाट पाहणं आलं. पुन्हा टँकर वेळेवर येईलच याचा भरवसाही नव्हता. भर मे महिन्यातील चटके देणारे उष्ण दिवस व रात्री-तहान भागवायलाही पाणी पुरत नव्हतं.

 पण टँकरचं येणारं पाणी मर्यादित असल्यामुळे गावच्या सरपंचानं मागच्या आठवड्यात मीटिंग घेऊन फर्मान काढलं होतं, की घरटी चार कळशाच पाणी घ्यायचे; पण याला त्याचं, मालीपाटलाचं आणि तालुका संजय गांधी निराधार योजना कमिटीवर सदस्य असलेल्या सखोबा भुजबळ माळ्याचं घर अपवाद होतं. त्यांच्या घरच्या बाईमाणसानं व गड्यानं केव्हाही यावं, नंबर नसताना लागेल तेवढं पाणी भरावं हा शिरस्ता साऱ्यांनीच निमूटपणे मान्य केलेला.

 काल रात्री उशिरा आलेला टँकर प्रथम आपल्या वाड्यासमोर उभा करून पाईपनं घरी पाणी भरल्यामुळे सरपंच वहिनी आज विहिरीवर नव्हत्या हे नशीब! तसंच भुजबळ अक्कासाहेब भाचीच्या लग्नासाठी मार्डीला गेल्यामुळे येणार नव्हत्या. साऱ्या बायकांना त्यामुळे हायसं वाटत असतानाच पाटलीणकाकू आल्या व त्यांचे पाणी भर काही संपेना. आज त्या नेहमीपेक्षा जास्तच पाणी नेत होत्या, तेव्हा माहिती घेण्यास जोशांच्या सरलाबाईनं विचारलंसुद्धा' 'काय पाटलीणकाकू आज काही विशेष :

 'होय जोशीणबाई. रात्री आमदार व इतर मंडळी जेवायला येताहेत- ग्रामपंचायत इलेक्शन जवळ आलीय ना.... आणि त्यांनी वाक्य अर्धवटच सोडलं होतं. त्यातून त्यांना त्यांच्या घराचं राजकीय महत्त्व व्यक्त करायचं होतं.

 'ते ठीक हो... पण आम्हालाही जरा पाणी मिळू द्या.' चव्हाणांची मॅट्रिकपर्यंत शिकलेली सून फटकळपणे म्हणाली, 'तुमचा मान मोठा; पण आम्हालाही पाणी द्या. आमच्याही घरी पाण्याचा ठणाणा आहे.'

 तिथं जमलेला साऱ्याच बायांना चव्हाणांच्या सूनबाईचं बोलणं मनोमन पसंत पडले होते. कारण पुन्हा पुन्हा त्यांच्या नजरा विहिरीतल्या कमी होणा-या पाण्याकडे धास्तावल्याप्रमाणे जात होत्या.

 ‘पुरे हो... एवढा अगोचरपणा तरुण वयात शोभत नाही...' आपल्या अंबाड्याला हिसडा देत पाटलीणकाकू म्हणाल्या व त्यांनी जरा जोर लावूनच रहाट ओढला आणि एकदम त्या मागे घसरल्या. त्यांच्या हातातून दोर निसटला आणि कळशी गडगडत विहिरीत जाऊन पडली. त्याचबरोबर कच्चा झालेला रहाटही निखळून विहिरीत गडप झाला.

 ‘आई 5 गंऽ' पाटलीणकाकूचा विव्हळण्याचा आवाज ऐकून चव्हाणांची सून पुढे सरसावली. तिनं हात देऊन त्यांना नीट उठवलं व बाजूच्या कड्यावर बसवलं. त्यांची कंबर धरली गेली होती. त्याचवेळी त्यांच्या दोन्ही सुना रिकाम्या घागरी घेऊन आल्या होत्या. त्यांच्या आधाराने पाटलीणकाकू घराकडे चालत्या झाल्या.

 आता साऱ्यांचं लक्ष रहाटाविना ओकाबोका वाटणा-या विहिरीकडे गेलं. ती विहीर अर्धी कच्ची बांधली गेली होती. रहाटाविना पाणी काढणं कठीण होतं.

 'आता गं बया काय करायचं?' बारडकरांची आवडाबाई म्हणाली, 'ही विहीर कच्ची हाय. त्याच्या बांधावर उभं राहून पाणी शेंदणं धोक्याचं वाटतं....'

 ते साऱ्यांना पटलं होतं, पण पाणी तर हवं होतं. पुन्हा ऊन वाढत होतं. पाणी आटायला किती वेळ लागणार? प्रत्येकीच्या मनात शंका, प्रश्न भिरभिरत होते. घरची कामंही खोळंबली होती. पाणी हा त्यांच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न होऊन राहिला होता.

 त्यांची सोडवणूक केली ती पुन्हा चव्हाणांच्या सुनेनं. ‘मावशीबाय, असं म्हणलं तर पाणी नाही मिळायचं. सावधपणे वाकून लहान कळशीनं पाणी शेंदता येईल....'

 आणि मग एकाच वेळी विहिरीच्या चहूबाजूंनी गोळा होत बायकांनी आपापले दोर कळशीला बांधून विहिरीत लोटायला सुरू केली.

 डोळ्यांवर हात धरून बायजानं आपल्या अधू नजरेत आभाळात चढत जाणारा सूर्य साठवायचा बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर दृष्टीला भान आलं आणि ती गुडघ्यावर हाताने जोर देत कष्टपूर्वक उठली आणि पालाच्या झोपडीत शिरली.

सकाळपासून उन्हात बसून घसा कोरडा पडला होता. गेले दोन - तीन दिवस चहाचा घोटही मिळाला नव्हता. कारण चहापत्ती व साखर दोन्ही संपलं होतं आणि पेन्शनची मनिऑईर यायला वेळ होता.

 "आज सखोबास्नी इच्यारायला हवं - बाबा रे तू यवडा मेंबर मानूस, जरा जल्दीनं धाड़ की पेन्शन....!' असं ती स्वतःशीच पुटपुटली आणि पाण्याचा एक घोट घेतला.

 गावच्या सखोबा भुजबळामुळेच तिला शासनाची संजय गांधी निराधार योजनेची दरमहा शंभर रुपयाची पेन्शन सुरू झाली होती. तिचा एकुतला एक लेक व सून मागच्या दुष्काळात गाव सोडून औरंगाबादला गेले, ते परत आलेच नाहीत. सुरुवातीला कधीमधी गावाकडे येणा-यासोबत किंवा मनिऑर्डरने थोडे - फार पैसे यायचे. मग ते जास्तच अनियमित व दीर्घ अंतराचे होत येणे बंद झाले.

 सत्तरीच्या पुढे गेलेलं वय, कमरेत बाक आलेला आणि नजरेनं अधू असलेली बायजा स्वतःचं पोट भरायला असमर्थ होती. त्यामुळे कधी काळी लोकांनी स्वाभिमानपूर्वक बंद केलेल्या म्हारकी वतनाची आठवण देत बायजा सरपंच पाटलाकडे जुंधळे - पीठ तेल मागायची. नाही म्हटलं तरी पुन्हा पुन्हा यायची तेव्हा नाइलाजानं का होईना, तिच्या पदरात शिळापाका का होईना भाकरतुकडा पडायचा. असं भीक मागत अर्धपोटी का होईना, कशीबशी तिची कुड़ी तग धरून होती.

 त्या वर्षी नव्यानं बदलून आलेला तलाठी अप्पा तिच्या जातीकुळाचा निघाला. त्यानं सखोबांना विनवलं, तसं एका मीटिंगमध्ये तिच्या नावे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन मंजूर करण्यात आली. तेव्हापासून भीक न मागता कसंबसं तिचं पोट भरू लागलं. पण पेन्शनीचे पैसे वेळेवर म्हणून कधी यायचे नाहीत. कधी बजेट नाही, तर कधी मनिऑर्डर लिहिणं झालं नाही तहसीलला वेळेवर म्हणून उशीर व्हायचा. पुन्हा पोस्टमन व सखोबा दरवेळी त्यातले दहा-दहा हक्कानं कापून घ्यायचे. बायजाला त्यांना रागावून विचारताही येत नसे. कारण एक तर बोलायची भीती, पुन्हा दात पडल्यामुळे आवाज अस्पष्ट व कातर झालेला. मिंधेपणाची भावनाही होतीच त्यांनीच तर दया दाखवून पेन्शन मंजूर केली. तो तिचा हक्क आहे, हे कुठे तिला माहीत होतं?

 पाण्याच्या घोटानं घसा ओला झाला; पण पोट भड़कलेलंच होतं. त्याला गोडमिट्ट चहा किंवा भाकरतुकडा हवा होता. त्यासाठी पेन्शन येणं आवश्यक होतं. यावेळी जरा जास्तच उशीर झाला होता.

 पुन्हा तिनं पाणी घशाखाली रिचवलं आणि तिच्या लक्षात आलं की पाणी संपलंय. तिच्या पोटात भीतीचा गोळा उठला. या रणरणत्या उन्हात विहिरीपर्यंत कमरेतल्या बाकासह पाय ओढीत अनवाणी जायचं, तिथं कुणी असलं तर पाणी वाढण्याची भीक मागायची. कारण या विहिरीवर त्यांना पाणी भरावयास मनाई होती. टँकरचं पाणी चालू असलं तरी ते या सामुदायिक विहिरीत आणि नदीकाठच्या वाळूत असलेल्या महाराच्या वेगळ्या विहिरीत स्वतंत्रपणे टाकलं जायचं. ती विहीर खूप लांब होती. तिथवर जाणं बायजेला जमत नसे, म्हणून ती गावातल्या सामुदायिक विहिरीवरच यायची व तिथं पाणी भरणाऱ्या बायोमुलांना पाणी वाढायची विनवणी करायची. पण केवढा त्रास... किती यातायात... नुसत्या कल्पनेनंही तिच्या पोटात भीतीचा गोळा उठला होता.

 पण पाणी हवंच. कारण दिवसभर पोटात काही जाईल याची शाश्वती नव्हती. सरपंच वहिनी आणि पाटलीणकाकुंनी काल पुन्हा न येण्याचं खडसावून सांगितलं होतं. दुष्काळानं प्रत्येक घरटं होरपळले असताना इतरत्र तिच्यासाठी उरलासुरला भाकरतुकडा मिळणं अशक्य होतं. मुख्य म्हणजे भुकेनं माणसातली तेवढी आस्थाही संपुष्टात आणली होती. तेव्हा निदान पोटभर पाणी तरी हवंच हवं!

 भुकेनं खंगलेल्या शरीराला मनाचा जोर लावीत बायजा पुन्हा कष्टपूर्वक आपल्या पायावर उभी राहिली. बाक आलेल्या कमरेत छोटं मडकं घेतलं, खांद्यावरून फाटलेला पदर सावरून बरगड्या दाखवणारी छाती झाकली आणि पाय ओढीत व चालण्याचे श्रम न सोसत असल्यामुळे बोळक्या तोंडानं खोल, घशातच अडकणारे विकल स्वर काढीत ती विहिरीकडे निघाली.

 अधू नजरेत आता डोक्यावरचा भंगभगता, तप्त प्रकाश अस्फूटपणे शिरत पायाखालची वाट अंधुकशी दाखवीत होता; पण त्यातले खाचखळगे व काटेकुटे मात्र दिसत नव्हते. त्यामुळे मधून मधून ठेचाळत, काटे टोचून घेत कशीबशी ती विहिरीवर

पोचली तेव्हा थकून तिनं बसकणच मारली. अवघ्या दहा-पंधरा मिनिटांची ती वाटचाल तिला प्रदीर्घ व वेदनामय वाटली होती.

 चव्हाणांची सून अजूनही पाणी भरत होती. बायला ती तिचा हिरव्याकंच साडीमुळे - जी भर उन्हात जास्तच झळकत होती ओळखू आली. 'येसू पोरी जरा पानी वाढ व, लई मेहरबानी व्हईल... घसा कोरडा पडलाय बग...!"

 'आलीस का पाणी मागायला?' त्रासिक सुरात येसू करवदली. 'रोज तुला काय मीच भेटते बरी पाणी मागायला?'

 'तसं नाय पोरे... म्या तरी काय करू? अगं चालता येत नाही, नजरही धुरकटलीय... दया कर पोरी, जरा पानी वाढ.'

 'मला वेळ नाही बायजे!” येसू निक्षून म्हणाली, 'मला फार कामं आहेत!' त्याच वेळी दुसऱ्या खेपेसाठी जोशांच्या सरलाबाई येत होत्या. त्यांना बायजेची दया आली व त्यांनी तिचं मडकं पाण्यानं भरून दिलं. तिथंच हाताची ओंजळ करून तिनं पोट भर पाणीही पिऊन घेतलं.

 पुन्हा तीच घराकडची कष्टप्रद वाटचाल... आता भरीस बाक आलेल्या कमरेवर छोटासा खापराचा माठ होता. एक मात्र बरं होतं. सूर्य माथ्यावर होता. त्यामुळे अधू नजरेतला प्रकाश कमी झाला नव्हता. रस्ता बऱ्यापैकी दिसत होता. पण त्याचा ताप कुडीला भाजून काढीत होता. शरीरातला सारा ओलावा त्यानं शोधून घेतल्यामुळे मुळचीच शुष्क त्वचा अधिकच रखरखीत झाली होती.

 आणि पायाशी आलेला मोठा दगड़ न दिसल्यामुळे बायजेचा तोल गेला. ती अडखळून पडली आणि कमरेवरचा माठ बाजूला पडून फुटला व त्यातल सारं पाणी क्षणार्धातच तप्त जमिनीत शोषलं गेलं.

 तिच्या पायाला ठेच लागली होती व पडल्यामुळे अधू कुडीमध्ये वेदना उसळली होती; पण तिला माठ फुटल्याचं आणि पाणी सांडल्याचं जास्त दुःख होतं.

 कितीतरी वेळ ती रस्त्यावर ती तशीच खिन्न बसून होती. उन्हाचा ताप जेव्हा सहन होईना, तेव्हा ती पुन्हा उठली आणि कशीबशी आपल्या झोपडीत आली.

 आणि थकून जाऊन तिनं बसकण मारली. मग आपोआपच तिचा देह कलंडला. पोटात भूक व तहान डंख मारीत होती, तरी एक प्रकारच्या ग्लानीमध्ये ती तशीच चुपचाप पडून होती.

 तिला भान आलं तेव्हा नजरेतला प्रकाश कमी झाला होता. अंदाजानं तिनं खूण बांधली की, तिन्ही सांजा झाल्या आहेत. तिनं हात चाचपून पाहिलं. अजूनही घरात दोन - तीन छोटी मोठी खापराची भांडी होती. त्यातलं एक हाताशी आलं. आणि तिची पाण्याची तहान उकळ्या मारू लागली.

 बराच वेळ तिनं विचार केला आणि पुन्हा एकदा सामुदायिक विहिरीकडे पाण्यासाठी जायचं तिनं ठरवलं.

 आता डोळयातला प्रकाश फारच फिकट झाला होता. त्यामुळे रस्त्याचा अंदाज घेत धडपणे न ठेचाळता चालणंही कष्टप्रद होतं; पण तहान जबर होती व भुकेला अन्न नाही तर निदान पाणी तरी हवं म्हणून तर तिची धडपड होती.

 कशीबशी ती विहिरीपाशी आली तेव्हा अंधार दाटला होता. तिला काहीच दिसत नव्हतं. कसलीही चाहूल तिला लागली नाही. कारण तिथं चिटपाखरूही नव्हतं.

 तिनं अंदाज बांधला की, आता साऱ्या जणी सकाळीच पाण्याला येणार. तोवर काय करावं? कुणी पाणी वाढेल का? या मनात उद्भवणा-या प्रश्नाला तिनं नकारार्थी मान हलवून उत्तर दिलं.

 काही वेळ ती तशीच काही न सुचून बसून राहिली. तिची शुष्क जीभ शुष्क वाळल्या ओठांना ओलावा देण्याऐवजी अधिकच शुष्क करीत होती. एकाच वेळी भूक व तहानेचा डोंब पोटात उसळला होता. अधिक काळ तिला राहावेना. ती उठली व विहिरीजवळ अंदाजानं आली.

 ही बहुजन समाजाची विहीर... इथं आपल्या जातीची माणसं पाणी भरत नाहीत. हीर बाटते म्हने... काय करावं? कसं करावं? नदीकाठची आपल्या जातीची विहीर तर लांब आहे. या अंधारात व ही जीवघेणी तहान घेऊन तिथं जाणं शक्य नव्हतं.

 सारा धीर एकवटून ती अजून विहिरीजवळ गेली. हात चाचपडून शोधू लागली काही क्षणांच्या धडपडीनंतर एक सोल हाती आली. तिला एक छोटी बादली पण लावलेली होती. बायजेची धाकधूक कमी झाली.

 सकाळी पाटलीणकाकू पाणी शेंदताना रहाट मोडून पङ्कलं होतं. त्या जागी बायजा अंदाजानं एक एक पाऊल सावकाशपणे टाकीत आली. तिथला काठ बांधलेला नव्हता. तिथं ती उभी राहिली आणि अंदाजानं तो पोहरा विहिरीत हलकेच लोटला.

 होतं... विहिरीत पाणी होतं. तिच्या कानांनी पाण्यावर पोहरा आपटल्याचं टिपलं होतं. तिनं तो दोर हलवला आणि तो थोडा भरताच शेंदण्यासाठी तिची वाकलेली कुडी थोडी अधिक वाकली, हातात जोर येण्यासाठी...

 आणि बायजेचा तोल गेला. भूक व तहानेनं जर्जर झालेल्या तिच्या कुडीला व खारकेसारख्या काटकुळ्या हातांना पोहऱ्यातल्या पाण्याचं वजन पेललं नाही. पायाखालची जमीन निसटल्याचा भास झाला. आणि तिच्या दंतविहीन बोळक्या मुखातून एक घुसमटला स्वर कसाबसा बाहेर आला आणि काही क्षणात तो शांत झाला.


 आजही पाण्याच्या टँकरला उशीर झाला होता. कारणंही नेहेमीचीच होती. डिपार्टमेंटचा हा सर्वात जुना ट्रक होता, काही किरकोळ दुरुस्ती निघाली. ती काढून घेण्यात व डिझेल घेण्यात बराच वेळ गेला. मग पांढरवाडीच्या लघुतलावावर जाऊन भरला व गावाकडे निघाला, तेव्हा रात्रीचे आठ वाजून गेले होते.

 ड्रायव्हरनं कितीतरी स्वतःशी चडफडाट केला होता; पण राग काढायला आज क्लीनरही सोबत नव्हता. तो ‘सिक' वर होता.

 गावाच्या पाट्यावर भुजबळआण्णा भेटले. ते तालुक्याहून शेवटच्या बसन गावी परतले होते. मग त्यांना गाडीत घेतलं.

 प्रथम त्यांच्या घरासमोर गाडी उभी राहिली. तिन्ही सांजेलाच आक्काबाई लग्न आटोपून आल्या होत्या, त्यामुळे घरी पाणी नव्हतंच. त्यांनी भरपूर पाणी भरुन घेतलं.

 मग सबंध गावाला वळसा घालून ट्रक सामुदायिक विहिरीजवळ गेला आणि पाण्याचा पाईप अंधारातच विहिरीत सोडण्यात आला. काही वेळातच तो टँकर रिता झाला.

 रात्रीतून त्यानं तीन खेपा करून विहिरीत पाणी सोडलं. उद्या त्याचा ऑफ होता. गावातून बोंब होऊ नये म्हणून जादा पाणी सोडणं भाग होतं. तसं त्यानं आजच संरपंचाना सांगूनही ठेवलं होतं. झालंच तर मघाशी भुजबळअण्णांचीही परवानगी घेतली होती.

 हा टँकर ज्या ट्रकवर माऊंट केला होता, तो जुना असल्यामुळे व त्याचा सायलेन्सर काम देत नसल्यामुळे चालू स्थितीत प्रचंड आवाज करायचा.

 आज त्या ट्रकनं मोजून चार खेपा केल्या होत्या. प्रत्येक खेपेला गावाला प्रचंड आवाज करीत वळसा घालताना साऱ्या गावाला आपोआप कळून चुकायचं, की पाणी आलं आहे.

 उद्या गावात दोन लग्नं होती. एक धोंडे पाटलाकडे व दुसरं गावकुसाबाहेर कांबळ्याच्या घरी. झालंच तर गावातल्या एका फुटकळ पिराची स्थानिक यात्रा उद्या सुरू होणार होती. त्यासाठी अनाळ्याच्या मशिदीचा मौलवी आजच गावात आला होता. त्याचा मुक्काम शेख बद्रुद्दीनकडे होता. किरकोळ म्हटले तरी हजार - पांचशे लोक बकरी, कोंबडं कापायचे. साऱ्या मुसलमान आळीत यावेळी उत्साहाचं वातावरण असायचं.

 पुन्हा आज अनेक कुटुंबांना पाणी मिळालं नव्हतं. कारण वाढत्या उन्हामुळे बरंचसं पाणी विरून जायचं किंवा वाफ होऊन जायचं. पण आज साऱ्या गावातल्या गृहिणीमध्ये समाधानाचं वारं पसरलं होतं. कारण आज टँकरच्या चार खेपा झाल्या होत्या.

 सकाळी सकाळीच धोंडे पाटलाकडे गावकोतवालानं खबर धाडली की, सामुदायिक विहिरीत बायजा रात्री केव्हातरी पडून मरण पावली. रात्रीतून टँकरने पाणी ओतल्यामुळे तिचं प्रेत तट्ट फुगून पाण्यावर आलं होतं.

 या बातमीनं धोंडे पाटलांचं टकुरं चांगलंच गरम झालं. मळ्यातली विहीर आटल्यामुळे पाण्याचा वांधा होता. कालच पाहुणेरावळे आले होते. तालुक्याहुन पाण्याचा टँकर मागवणं जिकिरीचं, खर्चाचं काम होतं.

 'गाढवीचीला ह्योच टाइम मिळाला वाटतं तडफडायला...' त्यांचा त्रागा खदखदत होता, ‘सालीनं अपशकुन केला लग्नकार्याला...!'

 काही वेळानं त्यांनी हाक मारली, 'लेका नाम्या, काढ बुलेट आन् जा तालुक्याला समोर घालून टँकर घेऊन ये. सोता भेट विंजनिअरसायेबांना...

 चव्हाणांची येसू शिकलेली असली तरी माहेरी' 'जातीसाठी खावी माती' असं वातावरण. पुन्हा तिचा थोरला भाऊ मराठा महासंघाचा तालुकाध्यक्ष, सासरी चव्हाणांकडे पण शहाण्णव कुळीचा अभिमान दर्पासारखा सदैव दरवळता. तिची कडवट प्रतिक्रिया होती, ‘विहीर बाटवली बयेनं. आता प्रेत काढा, विहीरसुद्ध करुन घ्या... नाना उपद्व्याप आले... घरच्या पुरुषमंडळींना तिच्या फटकळपणाचं कौतुक होतं. त्यांनी तिच्या सुरात सूर मिसळून तिला दुजोरा दिला.

 मुलाण्याच्या सईदाला बायजेकडे पाहिलं की आपल्या मरहुम नानीची याद यायची. त्यामुळे जेव्हा तिला ही बातमी समजली, तेव्हा ती कळवळली, धावतच विहिरीजवळ गेली, वाकून पाहिलं - ते तट्ट फुगलेलं बायजेचं प्रेत भारी विकृत दिसत होतं. तिला ते पाहावेना.

 काही वेळात सईदानं स्वतःला सावरलं आणि तिला प्रखर वास्तवतेची जाणीव झाली. कालही तिला पाणी मिळालं नव्हतं व आज या प्रकारानं शक्य नव्हतं. आज रात्री तिच्या नवऱ्यानं आनाळ्याच्या मौलवीसाहेबांना जेवायला बोलावलं होतं. ‘आता काय?' हा प्रश्न तिला घनघोर वाटू लागला.

 घरी आल्यावर नवऱ्याला तिनं हे सांगितलं व हळूच विचारलं, “तो फिर मैं नदीवाले बावड़ी से पाणी लाऊ क्या?'

 ‘क्या बोली? येडी हो गयी तू सईदा? वो, म्हार - मांगों की बावडी हैं. वहाँ कैसे पाणी भरेंगे?' त्यानं तिला चक्क वेड्यात काढलं होतं, ‘शाम तक कुछ तो होगाच. नहीं तो मैं मस्जिद के बावडी परसे पानी लाऊंगा...'

 विहिरीभोवती गर्दी वाढत होती, पुरुषमंडळी आपसात चर्चा करीत होती, तर जरा बाजूला बायका - मुली सचिंत मुद्रेनं पुढं काय करायचं?' याबाबत खलबत करीत होती.

 ‘भुजबळ अण्णा आता काय करायचं? म्हातारीनं लई घोटाळा केला बघा'

 ‘आणि त्यांची वेगळी विहीर असताना इथं का कडमडली कळत नाही...'

 ‘विहीर बाटली हो. कितीही नाही म्हणलं तरी वाटतचं ना..!'

 ‘आता पाण्यात उतरून सोल लावून काढलं पाहिजे ते प्रेत मग मोटार लावून पाणी उपसायचं, विहीर कोरडी करून घ्यायची... राम राम ! किती उपद्व्याप!'

 ‘हो ना, आज गावात दोन लग्न, एक बाराव्याचं जेवणं....!

 ‘और हम मुसलमानों की पीर की जत्रा....!'

 ‘पाण्यासाठी वांधा.. मंडळी नुसतं ओरडत आहेत....'

 ‘ते बरोबरच आहे. या उन्हात सारखं पाणी प्यावं लागतं. ही अशी भीषण पाणीटंचाई...!

 ‘मोठ्या मुश्किलीनं मी टैंकर मंजूर करून आणला - त्यात हा अपशकुन...!'

 ‘आता चर्चा नको मंडळी... कुणाला तरी म्हारवाड्यात पाठवा. तिथल्या नौजवान गब्रू गड्यांना सांगावा धाडा. पंचायतीमध्ये मोठी सोल पडली आहे ती आणा. चला... चला...'

 थोडं पलीकडे काटेरी बाभळीच्या असलेल्या - नसलेल्या सावलीत बायकांचा घोळकाही आपसात बोलत होता.

 ‘पाटलीणकाकू काल तुमच्यामुळे रहाट मोडला. तिथूनच ती म्हातारी तडफडली बरं...।

 “येशे पोरे, कालच मी म्हणाले होते, तरुण जातीला असं बोलणं शोभत नाही. तुझ्यापेक्षा जुनी असून मी बरी. बिचारीला भाकरतुकडा देत असे. तू साधं काल पाणीही वाढलं नाहीस तिला'

 ‘ते जाऊ द्या हो, आला काय करायचं पाण्याचं ते बोला ना...'

 ‘लई आबाळ व्हतीया बया पाण्यावाचून कालबी पानी नव्हतं, आन् आज हे आसं झालं!'

 ‘माझ्या घरी नणंदबाई पोराबाळासह आलीया. काल पाण्याने भरलेलं रांजण त्येनी टकराटकरीत फोडून टाकलं बगा. निस्ता ठणाणा चाललाय घरी पाण्याच्या नावानं!'

 गावाकुसाबाहेर गावकोतवालाकडून कळलेली बातमी अन् पाठोपाठ माली पाटलांचा सांगावा येताच त्या झोपडपट्टीत कालवाकालव सुरू झाली. बायजा आपल्याच जातीजमातीची, पण जरा पल्याड राहाणारी म्हणून दुर्लक्षित झालेली. ती गावच्या विहिरीत - जिथं त्यांना पाणी भरू दिलं जात नव्हतं तिथं बुडून मेली, हे कळताच त्यांच्या प्रतिक्रियाही मोठ्या मासलेवाईक उमटल्या.  ‘छान जिरली पांडबा त्यांची. साले, आमास्नी हक्क असूनसुद्धा तिथं पानी भरू देत नाहीत. आता घ्या, आमची एक म्हातारी तिथं बुडून मेली!'

 ‘त्याचा काही उपेग नाही - पुन्यांदा, ते हीर सुद् करून घेतील बामनाच्या तंतर - मंतरनं-!'

 ‘ही चर्चा आता नको बाबा आधी म्हातारीला बाहेर काढून नीट पुरलं पाहिजे. त्याची व्यवस्था बघा!'

 ‘हो - आम्ही तिकडे जातो व प्रेत बाहेर काढतो, तोवर तुम्ही मर्तिकाची तयारी करा.'

 ‘आणि दफनभूमीत चांगला खड्डाही करून ठेवा...'

 ‘आजचा खाडा पडला मजुरीला नुकतंच काम सुरू झालं होतं नालाबंडिंगचं - मजुरी बुडाली.'

 ‘आसं म्हणून कसं चालेल बाबानू, जातीचे काम हाय. पुन्हा ती एकटीच. तिचं पोर - सून इथं हायत कुठं?'

 ‘त्येस्नी कळवाया हवं-'

 ‘पन त्येंचा पत्त्या कुनाकडं हाय? यवड्या मोठ्या औरंगाबादात कंच्या झोपडपट्टीत हायेत, ते एक बुद्धच जाने....

 ‘नाय नाय, मागच्या हप्त्यात आपल्या भीमरावाकडनं म्हातारीनं चिट्टी धाडली होती की... हा बगा भीमराव आला...'

 'होय तात्या, मीच चिट्ठी लिहिली होती. म्हातारीनं लेक - सुनेला गावाकडे बोलवल होतं. 'लवकर या' म्हणून मीच तिच्या आग्रहावरून लिहिलं होतं बघा...

 त्याचं बोलणं थांबलं ते एस. टी. च्या आवाजानं. त्यांच्या वस्तीजवळच बसचा स्टॉप होता. बस् फटफटत थांबली, धुराळा यांबला. बसमधून विहिरीत पडून मेलेल्या बायजेचे लेक - सून उतरत होते.

 'हे बेस झालं. आता ते पाहुन घेतील आपला रोजगार बुडाया नको.'

 ‘आणि खड्डा खणायचं पण नको... तिथं पार खडक आहे, बाप्पा खणायला लै त्रास होतो...'

 ‘चला कांबळयाकडं, लग्नाचा टाइम होतोय...'

 आणि दोन - तीन तरुण सोडता ते सारे पाहता पाहता पांगले गेले.   भीमराव त्यांना सामोरं गेला, जयभीम केला, म्हातारीच्या दुःखाची बातमी दिली आणि पुढे म्हणलं,

 ‘धर्मा, आपली जात एकदम कंडम आहे. त्यांना कोणी जगलं - मेलं याची काहीसुद्धा पर्वा नाही. साऱ्यांना आपलीच पडली आहे; पण दोस्ता, चल, मी येतो तुज्यासगं तिला मी मावशीबाय म्हणायचो... मलाही ती आईवाणीच होती बघ.'

☐☐☐