Jump to content

पाणी! पाणी!!/नारुवाडी

विकिस्रोत कडून



९. नारूवाडी
 नाव- पोलिस पाटील (माजी) इराची वाडी
 काम- गावातली पिण्याच्या पाण्याची टंचाई
 कोणाला भेटायचे आहे-: जिल्हाधिकारी.

 जगदीशपुढे शिपायानं चिट्ठी आणून ठेवली होती. ती वाचताच त्याच्या स्मृतीनं पंधरा वर्षे त्याला भूतकाळात क्षणार्धात खेचलं आणि त्याचं मन इराच्या वाडीभोवती रुंजी घालू लागलं.

 इथं कलेक्टर म्हणून आल्यापासून मागील आठ दिवसांत जिल्ह्यातील विविध माणसं भेटली होती. विशेषतः जिथे त्यानं पंधरा वर्षांपूर्वी उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत ऑफिसर म्हणून काम केलं, त्या भागातली माणसं आवर्जून भेटत होती. जगदीशच्या स्मृतीमध्ये काही माणसं व गावं घर करून होती, तर काहींचं कालमानाप्रमाणे विस्मरण झालं होतं; पण त्यांनी ओळख देताच स्मृतीला ताण बसत होता व जुने दिवस पुन्हा जिवंत होत होते.

 हा गमतीदार खेळ जगदीश मनापासून 'एंजॉय' करीत होता. नव्या प्रमोशनची- तीही महत्त्वपूर्ण अशा 'आय. ए. एस.' ची नवलाई आणि त्यात पुन्हा जिथे त्यानं आपल्या नोकरीची सुरुवात प्रांत ऑफिसर म्हणून केली व अक्षरशः प्रत्येक गाव पालथं घातलं होतं, तेथेच झालेली नियुक्ती. सारं हवंहवंस वाटणारं, पण त्याचबरोबर नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं काहीसं ताण जाणवणारं.

 हातात ती भेटचिट्ठी घेऊन जगदीश काही क्षण आठवणीत रमला होता. इराची वाडी त्याला चांगली आठवत होती. तिचं त्यानं त्यावेळी विषादानं नाव ठेवलं होतं - नारूवाडी !

 हा जर तोच पोलिस पाटील असेल तर... तोच असावा असं वाटतंय. कारण नावापुढे ‘माजी' हे संबोधन आहे... तर तोही जगदीशच्या चांगल्या आठवणीत होता. उंच, धिप्पाड शरीरयष्टी, उग्र चेहरा व भरघोस गलमिशा, पांढरं धोतर, पांढरी बंडी व मुख्य म्हणजे पांढराफेक फेटा... त्यामुळे त्याचा विसर पडत नसे. साधारणपणे रंगीत फेटे बांधायची पद्धत असते; पण इराच्या वाडीचे पोलिस पाटील मात्र शुभ्र फेटा लफ्फेदारपणे बांधायचे.

 जगदीशनं बेल वाजवून शिपायाला पोलिस पाटलाला आत पाठवायची खूण केली आणि पेपरवेटशी चाळा करीत तो आपल्या खुर्चीवर रेलला.

 दार करकरलं आणि जगदीशसमोर तेच पोलिस पाटील उभे होते. तसाच पांढराशुभ्र पोशाख.. आता मात्र वयोमानाप्रमाणे संपूर्ण केस पांढरे झालेले; काया वार्धक्यानं वाळलेली...

 जगदीशनं त्यांना ओळखलं होतं. 'या पाटील... वयोमानाप्रमाणे होणारा बदल सोडला, तर तुमच्यात विशेष फरक नाही झाला या पंधरा वर्षात...!'

 ‘साहेब, तुम्ही मला वळखलं?' - आपल्या काहीशा थरथरत्या आवाजात पाटील म्हणाले, 'लई बेस वाटलं. तेव्हा जसे होता, आज कलेक्टर होऊनपण बदलला नाहीत.. म्या गरिबाची व माझ्या दुर्दैवी गावाची आठवण ठेवलीत. तुम्ही धन्य आहात, साहेब, तुम्ही धन्य आहात !'

 “अरे ! असं काय म्हणता पाटील?' जगदीश म्हणाला, 'तुमच्यापासून व तुमच्या गावापासून मी फार काही शिकलो आहे. विकास प्रशासन कसं राबवावं ते...

 ‘तुमचा ह्यो शब्द - इकास परशासन माझ्या आजबी ध्यानात हाय साहेब' पाटील म्हणाले, ‘पण आजही तो केवळ सबुद वाटतो... आमच्या गावाला काही फायदा झाला नाही साहेब त्याचा ? आमचं गावचं दुर्दैवी म्हणायला हवं !'

 'असं कसं म्हणता पाटील तुम्ही? तुमच्या गावाला मीच नाही का नवीन पाण्याची योजना सुरू करून दिली ?'

 'साहेब, तुमी आशा दावली. तशी सुरुवात पण झाली आणि तुमची तेवढ्यात बदली झाली... आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्याप्रमाणे गावाची गत झाली की हो...!'

 आणि पाटील भाभड़ा सांगत सुटले. खरी तर आता जगदीशला एक मीटिंग अटेंड करायची होती व त्यानंतर केसवर्क होतं; पण त्या भाबड्या, दुर्दैवी जीवाला भरभरून तळमळीनं बोलत असताना थांबवावं असंही वाटेना... मुख्य म्हणजे जगदीशला त्याच्या विकास प्रशासन या आपल्या संकल्पनेतील फोलपणा प्रकर्षाने जाणवत होता आणि पंधरा वर्षांपूर्वीची त्यानं इराच्या वाडीला डेप्युटी कलेक्टर म्हणून दिलेली भेट आठवत होती....

 कडक उन्हाचे दिवस... नेहमीच अपुरा पडणारा पाऊस... त्यात या वर्षी फारच अल्प पाऊस झालेला, म्हणून गावोगावी मार्च - एप्रिलपासून उद्भवलेली पाणीटंचाई. त्यावर मात करण्यासाठी जगदीशन विभागाची सारी यंत्रणा कामी लावलेली. तो स्वतः गावोगावी हिंडत होता व पाण्याचा प्रश्न सोडवत होता.

 इतक्या वर्षांच्या नियोजनानंतरही अनेक गावांना उन्हाळ्यात पेयजलाची टंचाई भासावी ही वस्तुस्थिती नुकत्याच नोकरीत शिरलेल्या व संस्कारक्षम मनाच्या जगदीशला अस्वस्थ करीत होती. चुकीचे नियोजन, अयोग्य झालेले काम व त्यातला भ्रष्टाचार, सतत होणाऱ्या वृक्षतोडीमुळे बिघडलेलं पर्यावरणाचे संतुलन व होणारी धूप... अनेक कारणं होतीच; पण एका बाजूला परकोटीची उदासीनता, तर दुस-या बाजूला राजकारणी व अधिकारी-कर्मचा-यांची भ्रष्टाचारासाठी होत असलेली हातमिळवणी... त्यामुळे नळयोजनांचा उडालेला बोजवारा...

 जगदीशला गावोगावी हेच चित्र थोड्या-फार फरकानं दिसत होतं आणि सरकारी उपाययोजना मूळ समस्येला हात घालायला अपुरी होती, केवळ मलमपट्टी असेच तिचे स्वरूप होते.

 असाच एक रखरखीत दिवस... सकाळपासून तीन गावांचा दौरा करून उन्हानं जगदीश काहीसा कावला होता आणि थोडा वेळ विश्रांतीसाठी ईटला विश्रामगृहात थांबला होता. तेव्हा त्याला गिरदावरनं निरोप दिला की, ईटच्या आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देशपांडे त्याला भेटण्यासाठी आले आहेत.

 जगदीशनं डॉक्टरांना बोलावलं. त्यांच्याबद्दल तो बरंच ऐकून होता ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्यालयी सहसा डॉक्टर घर करून राहत नाहीत;  पण हा नवा डॉक्टर सहकुटुंब राहात होता आणि गावक-यांमध्ये बराच लोकप्रिय होता. त्याची सेवावृत्ती व ध्येयवाद अपवादसम होता. जगदीशलाही त्याला भेटायचं होतं. आज अनायासे स्वतः डॉक्टरच त्याला भेटायला आले होते.

 प्राथमिक चर्चेनंतर व्यवसायाचे विषय निघाले... ‘मला ठाऊक आहे, डॉक्टर, तुमचं कुटुंब कल्याणचं टार्गेट जानेवारीतच पूर्ण झालं आहे; पण तालुका अॅज सच मागे पडतोय. इतर पी. एच. सी.ज् आणि विशेषतः रूरल हॉस्पिटलचं काम फार कमी आहे. कॅन यू काँट्रिब्यूट ?'

 'व्हाय नॉट?- एका गावाबद्दल मला विशेषकरून बोलायचं आहे... इराची वाडी. तिथली पाणी समस्या फार भीषण आहे. तेथे लोकांना प्यायचं शुध्द पाणी मिळत नाही. एक जुनी सामुदायिक विहीर आहे; पण तेथे नारूचे जंतू आहेत... आणि भयंकर बाब अशी की, लोक नाइलाजानं चक्क तेच पाणी पितात....!'

 जगदीशच्या अंगावर नुसत्या कल्पनेनंही सरसरून काटा आला.

 ‘मी अतिशयोक्ती करत नाही देसाईसाहेब... मी नुकताच त्या गावी जाऊन आलो आहे आणि तिथं घरटी एक तरी नारूनं आज पिडलेला आहे आणि गावात असा एकही माणूस नसेल की त्याला कधी तरी - केव्हा तरी नारू झाला नसेल.'

 जगदीश अस्वस्थ झाला होता. तो शासनाचा एक उच्चपदस्थ अधिकारी. घरी प्यायला शुद्ध फिल्टर्ड पाणी. स्नानाला थंड व गरम पाण्याचा शॉवर. प्रवासात मिल्टनच्या थर्मासमध्ये आइसकोल्ड पाणी. अशा प्रखर उन्हाळ्यात प्रवास करताना ते पिणं म्हणजे एक अवर्णनीय आनंद वाटायचा... आणि त्याच्या कार्यक्षेत्रातील एक अख्खं गाव नारूच्या जंतूंनी बटबटलेलं पाणी पितं आणि रोगग्रस्त होतं... किती भयंकर, किती विषादपूर्ण !

 गेले दोन महिने जगदीश इथे आहे; पण या काळात आपल्या कार्यक्षेत्रात इराची वाडी नामक गाव आहे हे त्याला आजच कळलं, तेही या स्वरूपात...

 तो उठला आणि म्हणाला, 'डॉक्टर... मी आताच त्या गावी जाऊ इच्छितो तुम्ही येऊ शकाल?'

 ‘जरूर, पण प्रांतसाहेब गावाला रस्ता नाही. किमान दोन ते अडीच किलोमीटर चालावं लागेल.'

 ‘माझी तयारी आहे. लेट अस् गो....!'  ‘बाहेर माझ्या दवाखान्यात इराच्या वाडीचे पोलिस पाटील आले आहेत, त्यांना सोबत घेऊ'

 त्यांची जीप दवाखान्यासमोर थांबली. डॉक्टर खाली उतरले. त्यांनी कंपाऊंडरला हाक दिली व पाटलांना बोलवायला सांगितलं.

 जगदीशसमोर पन्नाशी गाठलेला एक तगडा सशक्त माणूस उभा होता. त्याच्या अंगात पांढरी बंडी व पांढरंफेक दुटांगी काचा मारलेलं पांढरंशुभ्र धोतर होतं! आणि डोक्याला लफ्फेदारपणे बांधलेला तलम पांढराशुभ्र फेटा होता. त्याच्या सावळ्या रंगाला तो पोशाख शोभून दिसत होता.

 'रामराम साहेब !' पोलिस पाटलानं अभिवादन केलं जगदीशनं मूकपणे प्रतिसाद देत त्यांना जीपमध्ये बसायची खूण केली. त्याप्रमाणे पोलिस पाटील जीपमध्ये बसले.

 धूळ उडवीत जीप वेगानं धावू लागली. मुख्य राज्यमार्ग सोडून गाडी आता कच्च्या रस्त्याला लागली होती. हा रस्ता उखडलेला, खडी बाहेर आलेली. जीप सारखी उडत होती. क्षणोक्षणी गचके बसत होते. हा सारा खडकाळ माळरान होता. आजूबाजूला वृक्षांची नामोनिशाणीही नव्हती. जगदीश अस्वस्थ नजरेनं आजूबाजूचा परिसर पाहात होता. त्याच्या बाजूला बसलेले डॉक्टर त्याला काही सांगत होते. जगदीश ते शांतपणे कसलीही प्रतिक्रिया व्यक्त न करता ऐकत होता.

 ...आणि पोलिस पाटलाचा इशारा होताच जीप थांबली. समोर रस्ता संपला होता. त्यापुढे एक दरी होती व त्याच्यापुढे छोटा डोंगर होता. त्याला लगटून, त्याच्या पायथ्याशी एक छोटं गाव वसलेलं दिसत होतं, बहुधा हीच इराची वाडी असावी.

 जगदीश व डॉक्टर खाली उतरले. पोलिस पाटील पुढे होत म्हणाले, 'साहेब हीच आमची दुर्दैवी इराची वाडी... निजामाचं राज असताना योक मुनसफ घोड्यावरून आला व्हता, पन परतीच्या वाटेला घोड्यावरून तो पडला... तवापासून या गावाकडे कुणी फिरकलं नाही त्यानंतर चाळीस वरसानं भेटणारे तुमीच तालुकदार म्हनायचे. हां, मागचा हप्त्यात हे डॉक्टर मात्तुर आले व्हते.'

 अरुंद वाटेनं पायवाट तुडवीत ते तिघे दरी उतरू लागले, अशा रस्त्याने तोल सांभाळीत चालणं अवघड होतं. पोलिस पाटील मात्र सवयीनं भराभर चालत होते. जगदीश व डॉक्टरांना मात्र त्या वेगानं जाणं कठीण वाटत होतं.

 जवळपास पाऊण तासाच्या चालण्यानंतर ते तिघे इराच्या वाडीला पोचले. या कालावधीत तो उजाड माळरानाचा परिसर पाहून जगदीशच्या मनातील ‘ग्रामीण विकास' संकल्पनेचा पार फज्जा उडाला होता.

 स्वातंत्र्यानंतर चाळीस वर्षांनंतरही इराच्या वाडीला पक्का रस्ता नव्हता, पिण्याचं शुध्द पाणी नव्हतं आणि हे केवढं विदारक होतं. हे बड्या शहरातील पंचतारांकित हॉटेलात ग्रामीण विकासावरील परिसंवादामध्ये शासनाच्या विविध विकास योजनामुळे ग्रामीण स्तर किती सुधारत आहे, याची चर्चा होत असताना एक दुर्दैवी गाव नारूमिश्रित पाणी पितं आणि उघड्या डोळ्यांनी तो भयंकर, किळसवाणा रोग ओढवून घेतं !

 'काय सांगू तुम्हाला देसाईसाहेब, हा पाटीलही अशातच नारूग्रस्त झाला आहे. तो पाणी गाळून उकळून प्यायचा तरीही त्याच्या उजव्या पायाला नारू झालाय. आज जखम चिघळलीय म्हणून उपचाराला आला होता.'

 ‘आसपास पंचक्रोशीत डॉक्टर नाही?'

 ‘गावात कोणी डॉक्टर नाही. या पोलिस पाटलाचा मुलगा डॉक्टर आहे. त्याला मोठ्या जिद्दीनं पाटलांनी औरंगाबादला मेडिकलला घातलं. माझा तो बॅचमेटच आहे. त्यांची इच्छा होती की, मुलानं डॉक्टर होऊन गावच्या पंचक्रोशीत किंवा ईटला दवाखाना थाटावा आणि गावक-यांना इलाज करावा... पण तो मेडिकलला जॉईन झाला, तसा गावी आलाच नाही. आज औरंगाबादला तो प्रेक्टिस करतोय. ही हेट इराची वाडी... कारण त्याला भीती व किळस वाटतेय नारूची...

 जगदीशच्या मेंदूची पेशीनपेशी हादरत होती. हे सारं त्यानं कधी ऐकलं नव्हतं, कल्पिलंही नव्हतं.

 गावाच्या प्रवेशालाच एक जुनीपुराणी, बरीच मोडकळीस आलेली कमान होती, त्याकडे बोट दाखवीत पाटील म्हणाले,

 ‘साहेब, हे आमचं परवेश दार. ही कमान जागिरदारानं बांधलेली बघा, आता त्योबी कोलापुरास्नी राहतो, मन तो जवा तरणाबांड जवान गडी व्हता, तवा त्यानंबी ठरवलं व्हतं. जागिरीची समदी गावं पाहायची. असंची वर्दी देऊन त्यो आमच्या इराच्या वाडीला आला. तवा गावानं त्याच्या सन्मानासाठी ही कमान तयार केली. तवा मी साळेत जात व्हतो. पन मला ते समदं ध्यानी हाय. म्याबी तवा काम केलं व्हतं...

 पाटील क्षणभर जुन्या आठवणीत रंगले होते. मग उसासा टाकीत ते म्हणाले, ‘गावानं तेच्यापुढे पाण्याची आडचण मांडली, तवा जागिरदार म्हणाले, 'म्या तुमा गावक-यांवर खूस हाय... म्या गावात हीर बांधण्यासाठी दोनशे रुपये धाडून देतो... बांदून घ्यावी...' साहेब त्या येळेला दोनशे रुपये मोप होते... त्यातून हीर बांधली गेली... आदी आदी लई चवदार, निवळशंख पानी होतं... थंडगार... भर उन्हात ते पिलं की गार गार वाटायचं... पण नंतर ह्या पाण्यात नारूचे जंतू झाले... आनी गावात रोगराईचा शाप सुरू झाला...'

 चालता चालता बोट दाखवीत ते म्हणाले, 'ही पाहा विहीर सायेब...'

 जगदीश पुढे झाला... विहीर कच्ची बांधलेली होती. एका बाजूने ढासळलेली, तर दुस-या बाजूने कच्च्या पाय-या असलेली अशी होती. त्यामुळे कुणालाही विहिरीत उतरून खाली पाण्यापर्यंत जाता येत होतं... त्यानं वाकून पाहिलं... विहिरीत पाणी होतं, गढुळलेलं... तिथं एक स्त्री घागर बुडवून पाणी घेत होती. ती पाय-या चढून वर आली, तेव्हा पाटलानं तिला थांबवलं व तिच्या घागरीतलं पाणी आपल्या ओजळीत घेतलं. ती पाण्याने भरलेली ओंजळ जगदीशपुढे करीत ते म्हणाले,

 'नीट पहा सायेब, उघड्या डोळ्यानं नारूचे जंतू दिसतील या पाण्यात...

 जगदीश थरारला, त्यानं पाहिलं, त्या ओंजळीतल्या पाण्यातही चार-सहा नारूचे पांढ-या दोन्यासारखे जंतू वळवळत होते.

 मुळापासून अंतर्बाह्य हादरणं म्हणजे काय असतं, याची जाणीव जगदीशला क्षणार्धात झाली. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. तो काहीसा थरकापलाही. हे सारं केवळ अतर्क्य, कल्पनेच्या पलीकडलं होतं.

 ‘हे असंच पाणी गावकरी पितात देसाई साहेब...' डॉक्टर म्हणाले, ‘मागच्या आठवड्यात मी आलो होतो, तेव्हा माझीपण हीच अवस्था झाली होती. इथं प्रत्येक घरात जवळपास प्रतेकाला नारू केव्हा न केव्हा झाला आहे. इतके दिवस इम्युन असलेले पाटीलही आता नारूग्रस्त झाले आहेत.'

 त्यानंतरच्या अर्ध्या तासात जगदीशनं पूर्ण गाव पालथं घातलं. इनमिन दीडशे घराचं ते छोटं गाव होतं, पण प्रत्येक माणसाच्या पायात नारूची जखम दिसत होती, त्या जखमेतून नारूचे जंतू पडत होते. त्याची त्यांना सवयच झाली होती...  तो परत कमानीपाशी आला, तेव्हा अख्खं गाव जमा झालं होतं. पाटील त्याला म्हणाले, 'साहेब, दोन सबुद बोला गावासाठी. त्येस्नी तेवढंच बरं वाटेल.'

 'काय बोलायचे पाटील? मला स्वतःला सरकारी अधिकारी म्हणून घ्यायची शरम वाटतेय. आम्ही लोकांनी व शासनानं काय केलं तुमच्यासाठी आजवर?आम्हाला काय अधिकार पोचतो तुम्हाला उपदेश करायचा?' जगदीशच्या आवाजात कंप, अपराधीपणा आणि विषाद होता.

 'आसं कसं सायेब? तुम्ही तालुकदार.. अव्वल सायेब.. त्या निजामाच्या मुनसफनंतर तुमी गावाला भेट देणारे दुसरे सायेब...' पाटलानं मधल्या काळात घरी जाऊन एक जुनी चोपडी आणली होती. 'सायेब, हे पहा व्हिजिट बुक... लई जुनं हाय, पन ते भरलंच नाही... यात बगा दोन - तीनच नोंदी हायत.'

 जगदीशनं ती जीर्ण चोपडीवजा वही कुतूहलानं अलगदपणे उघडली. त्यात निजामाच्या मुनसफची उर्दू भाषेतली नोंद होती. सर्वप्रथम...

 'या नोंदीत काय लिहिलंय ?"

 'मी वाचून दाखवू का?' पाटील म्हणाले, 'सायेब, म्या साळंत उर्दूच शिकलो... मला येतं वाचायला?”

 'वाचून दाखवू नका - मला उर्दू समजत नाही. तुम्ही फक्त अर्थ सांगा.'

 'सायेब, मुनसफसायबानं लिहिलंयः डोंगराच्या कुशीतलं हे गाव लई सुंदर हाय, इथली आंब्याची झाडे, दरीतून वाहणारा छोटा ओढा व गावामंदी टणाटणी उड्या मारीत पळणारी हरणं पाहून आनंद वाटला. गावचे लोकही चांगले च भले हायेत, हे पाहून समादान वाटलं....'

 जगदीश जे पाहात होता, अनुभवत होता, त्यापेक्षा हे काही वेगळंच लिहून ठेवलं होतं चाळीस वर्षापूर्वी भेट देणा-या निजामाच्या मुनसफनं. 'पाटील हे जे मुनसफनं तेव्हाच्या तहसीलदारानं लिहिलंय ते खरं होतं ?'

 'व्हय सायेब, म्या तवा न्हान होतो. तवा हे सारं व्हतं... पन वरच्या गावी जमीनदारानं बांध घातला आन् व्हता वढा आटला. तवापासून पान्याचे भोग सुरू झाले. मग आले जागिरदार,.. त्यांची ही नोंद मराठीत आहे, ती वाचा साहेब...'

 जुन्या मोडी वळणाचं, लफ्फेदार वळणाचं ते मराठी जगदीश वाचू लागला...

 'आज दहा जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस, शुक्रवार रोजी इराच्या वाडीला भेट दिली. आमच्या जहागिरीतलं हेच गावे आम्ही जातीनं आजवर पाहिलं नव्हतं. गाव तसं भलं व लोकही सुस्वभावी आहेत. शेती चांगली पिकते, तरीही मुळातच ती कमी आहे. त्यामुळे रयतेचं भागत नाही. म्हणून या वर्षापासून आम्ही एक आणा जमीन महसूल प्रतिएकरी कमी करत आहोत. तसेच यापुढे जेव्हा जेव्हा या गावची शेती पिकणार नाही, तेव्हा रयतेकडून महसूल घेतला जाणार नाही. आज आमच्या नजरेसमोर गावक-यांनी पाण्याची समस्या आणली. या गावासाठी आम्ही दोनशे रुपये मंजूर करीत आहोत. त्यातून विहीर बांधून घ्यावी. आम्ही उद्याच मुनीमजीला रकमेसह पाठवीत आहोत.'

 आणि जहागिरदारांची उर्दूमधून झोकदार सही होती.

 'अच्छा, म्हणजे एकोणीसशे त्रेचाळीस साली विहीर झाली म्हणायची....' जगदीश म्हणाला, “पण काय हो पाटील, त्यावेळच्या मानानं दोनशे रुपयेपण खूप होते. एवढ्या पैशात सहजपणे पक्की विहीर नाही का बांधता आली असती?'

 "होय सायेब, पण जागिरदारसायेबांचा मुनीमजी निस्ता भाडखाऊ व्हता...त्यानं निम्म्यापेक्षा जास्ती पैसे हाडपले आन् ही अशी कच्ची हीर बांधली.'

 बाकी काही असो - नसो; पण भ्रष्टाचार हा तेव्हाचा जहागिरदारांच्या राजवटीचा व आपल्या स्वतंत्र भारतातील राजवटीचा समान धागा आहे म्हणायचा...' अशी एक प्रतिक्रिया जगदीशच्या मनात टिपली गेली.

 आणि त्याखाली मागच्या आठवड्यात भेट देणा-या डॉक्टर देशपांडेचा अभिप्राय होता,

 'मी गावातल्या प्रत्येक व्यक्तीला झालेला नारू पाहून अस्वस्थ झालो आहे. दूषित पाणी व असुरक्षित विहीर हे याचं मूळ कारण आहे, ते दूर करणं डॉक्टर म्हणून मला शक्य नाही; पण ही बाब मी प्रशासनाच्या नजरेस आणून देईन. माझं काम आहे रोगप्रतिबंध करणं व झालेल्या रोगाची इलाज करणं ईटला प्राथमिक आरोग्य केंद्रात या गावच्या प्रत्येक व्यक्तीचा मी मनापासून इलाज करीन व दर पंधरा दिवसाला मी स्वतः इथं येईन पण विहिरीवर कट्टा बांधावा व पायऱ्या बुजवाव्यात व रहाट बसवून पाणी घ्यावं.. आणि ते उकळून प्यावं. म्हणजे बऱ्याच अंशी रोगाला आळा बसू शकेल.'

 जगदीशनं डॉक्टरांचा हात हाती घेऊन किंचित दाबला. काही न बोलता तो सोडला. पण त्या स्पर्शाद्वारे त्याला जे सांगायचं होतं, ते डॉक्टरांना खचितच समजलं होतं. जगदीशला एक समानधर्मी सापडला होता.

 ‘आता तुमचा अभिप्राय पायजे साहेब. पाटील म्हणाले, 'आनी लोकास्नी चार सबुद सांगावेत...'

 'ठीक आहे, कसलासा निश्चय करून जगदीश म्हणाला, “आधी मी बोलतो, मग अभिप्राय लिहितो.'

 समोरच्या लोकांसमोर जात तो बोलू लागला,

 'माझ्या बंधू-भगिनींनो... जुन्या काळी चाळीस वर्षांपूर्वी तेव्हाचे जहागिरदार या गावी आले होते. त्यानंतर मागच्या आठवड्यात डॉक्टर आले व आज मी येत आहे. म्हणजेच गेली चाळीस वर्ष हे गाव या जिल्ह्यात, या तालुक्यात असूनही नसल्यासारखंच होतं. एकही विकास योजना या गावापर्यंत पोचली नव्हती वा नाही... हे तुमचं दुर्दैव आहे व आमचा कमीपणा आहे. एक जबाबदार अधिकारी म्हणून मला याची शरम वाटते. आमच्या हाती एवढा अधिकार असूनही आजवर या गावाकडे कुणी अधिकारी, कुणी लोकप्रतिनिधी फिरकला नाही. मग विकास कसा येईल इकडे? मी तुमचा शतशः अपराधी आहे. पण एक सांगतो. आता मात्र मी माझ्या अधिकारांचा वापर करीन आणि तुमच्या गावाला रस्ता करून देईन आणि मुख्य म्हणजे नळयोजना देईन. एका वर्षात या गावातून नारूचे उच्चाटन झालं पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करीन. इथं वारंवार येईन हे जे बोलतोय, ते पोकळ आश्वासन समजू नका. मी ते कृतीमध्ये आणून दाखवीन...

 आणि जगदीशनं परतल्यापासून झपाटल्याप्रमाणे इराच्या वाडीसाठी योजना बनवल्या. रोजगार हमीमार्फत रस्त्याचे काम मंजूर करवून पंधरा दिवसात सुरू केलं, तसंच परिसर अभियांत्रिकी विभागाच्या उपअभियंत्यास घेऊन नळयोजनेसाठी स्थळपाहणी केली, पण गावात पाण्याचा स्त्रोत नव्हता. पलीकडच्या पठारावर ग्रामपंचायतीचं केरगाव होतं. त्याच्याअंतर्गत इराची वाडीला ग्रुप ग्रामपंचायत होती, तिथं पाण्याचा स्त्रोत भूजल सर्वेक्षण करण्यासाठी दिला. केरवाडीलाही पाण्याची टंचाई होती, म्हणून दोन गावासाठी संयुक्त पाणी योजना तयार करून तिचा सतत पाठपुरावा करून सहा महिन्यात मंजुरी आणली व कामाचा शुभारंभ केला. स्वतः वेळोवळी तो

देखरेख करायचा. त्याचे सारे सहकारी त्याच्या या झपाटलेपणाची टिंगल करायचे, तेव्हा तो आवेशानं म्हणायचा,

 'नाही दोस्त, ही बाब थट्टेवारी नेण्यासारखी नाही. विकास प्रशासनाची माझी जी कल्पना आहे, ती विकासापासून शेकडो मैल दूर असलेल्या या दुर्दैवी गावात मी राबविण्याचा पयत्न करीत आहे. डिटॅच होऊन हे होणार नाही, म्हणून हा अट्टहास आहे. किमान प्रत्येक पोस्टिंगच्या ठिकाणी एका गावाचा तरी माझ्या हातून कायापालट व्हावा ही मनीषा आहे. याची सुरुवात मी इराच्या वाडीपासून करीत आहे.'

 पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली व गावी शुध्द, स्वच्छ पाणी टाकीतून तोटीद्वारे आलं, तेव्हा सबंध इराची वाडी आनंदाने बेहोष होत थयथया नाचू लागली आणि उत्सफूर्तपणे त्यात जगदीशही सामील झाला.

 काही क्षणांतच हा इतिहास जगदीशच्या डोळ्यासमोर चित्रपटासारखा उलगडत गेला आणि मग भानावर येत त्यानं विचारलं,

 ‘पाटील, काय झालं मी गेल्यानंतर ?'

 ‘ती एक चित्तरकथाच हाय सायेब.... पाटील म्हणाले.

 ‘सांगा मला, पाटील, मी ऐकू इच्छितो.'

 आणि पाटलानं पुन्हा बांध फुटल्यागत बोलायला सुरुवात केली.


 तो डिसेंबरचा महिना होता, जेव्हा इराच्या वाडीमध्ये केरगाव - इराची वाडी संयुक्त नळ पाणीपुरवठा योजनेचं स्वच्छ व शुध्द पाणी नळावाटे आलं होतं. सारं गाव बेहोष होऊन नाचलं होतं. त्यात पाटलांचा हात धरून जगदीशही सामील झाला होता. आजही ती याद पाटलांच्या मनात ताजी, बकुळफुलासारखी सुगंधी आहे.

 दोन महिने पाणीपुरवठा नियमित होत होता. केरगाव व इराची वाडी या दोन्ही गावांतली पाण्याची समस्या सुटली होती, स्त्रियांची पाण्यासाठीची वणवण थांबली होती. इराच्या वाडीतील लोकांच्या नारूच्या ठसठसत्या वेदना लिंपल्या जात होत्या..... प्रत्येक वेळी गावकरी जगदीशला पाणी पिताना दुवा द्यायचे!

 आणि जगदीशची बदली झाली एप्रिल महिन्यात, तेव्हा चार्ज सोडण्यापूर्वी तो आवर्जून गावी गेला होता. तेव्हा त्यानं पाटलाला म्हटलं होतं,

 ‘पाटील, आता मी तुमचा भाग सोडत आहे. बदली झाली आहे. पण मला एक समाधान आहे, तुमच्या गावासाठी, इराच्या वाडीसाठी मी काहीतरी करू शकलो. आता मला व्हिजिट बुक द्या, आज पुन्हा मला अभिप्राय लिहायचा आहे.'

 पाटलानं व्हिजिट बुकाची जुनी चोपडी पुढे केली. त्यातील आपला प्रथम भेटीचा अभिप्राय जगदीशनं पुन्हा वाचला व काहीशा समाधानानं लिहिलं,

 ‘आपण नेहमी खेदानं आपल्या इराच्या वाडीला ‘नारूवाडी' म्हणता. दुर्दैवानं ते खरंही होतं. पण आज तुम्हाला शुध्द पाणी मिळत आहे व ईटच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर देशपांडे यांच्यामुळे उपचारही. तेव्हा आणखी वर्ष - सहा महिन्यात इथल्या नारूचं पूर्ण उच्चाटन होऊ शकेल, असा विश्वास वाटतो. पुन्हा म्हणून आपण कधी ‘नारूवाडी' म्हणू नका.... आता गावात पायाभूत सोयी होत आहेत व भविष्यात या गावाचा चांगल्या रीतीनं विकास होऊ शकेल. त्यासाठी माझ्या शुभेच्छा!

 जगदीशसमवेत, सेवेत प्रथमच या तालुक्यात रुजू झालेले तहसीलदार जाधव होते. त्यांना जगदीशनं या गावची सारी कहाणी येताना जीपमध्ये सांगितली होती. त्यांचा हात हाती घेऊन काहीसा भावनाविवश होत जगदीश म्हणाला,

 ‘जाधव, हे गाव, ही इराची वाडी माझ्यासाठी ‘स्पेशल' आहे. हे गाव मी आजपासून तुम्हाला दत्तक देत आहे. गावाकडे सतत लक्ष द्या.'

 तहसीलदार जाधवही संवेदनक्षम व कळकळीचे होते. त्यांनी ते वचन पाळल. किंबहुना त्यांची बदली या गावाच्या प्रेमापोटीच झाली काही महिन्यानंतर !

 जगदीश गेला आणि एप्रिल महिना उजाडला. यावर्षीपण गतवर्षीप्रमाणे पाऊस अल्प झाल्यामुळे नदी, नाले व विहिरी आटल्या. गावोगावी परत पाण्याची ओरड सुरू झाली.

 केरगावच्या पश्चिमेला दीड किलोमीटरवर संयुक्त नळयोजनेची बांधलेली विहीर होती. तिचं पाणी झपाट्यानं ओसरू लागलं. दोन्ही गावांना म्हणजे केरगाव व इराची वाडीला पाणी पुरेनासं झालं.

 केरगावचे सरपंच पहिल्यापासूनच या संयुक्त नळयोजनेवर नाराज होते कारण एक तर त्यांना बांधकामाचं टेंडर मिळालं नव्हतं. त्यामुळे सुटणारे पैसे बुडाले व दुसरं म्हणजे या गावानं त्यांना मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते सदस्य म्हणून ईटमधून उभे असताना साथ दिली नव्हती, ते चाळीस मतांनी पडले होते व

ईटचं पूर्ण सव्वाशे मतदान त्यांच्या विरोधात पडलं होतं. यामुळे इराच्या वाडीवर व खासकरून पोलिस पाटलावर त्यांची खुन्नस होती.

 नळयोजनेच्या विहिरीचं पाणी कमी झालं. पाण्याच्या निमित्तानं केरगावच्या सरपंचाला आपला जुना हिशोब चुकता करण्याची संधी मिळाली व ती त्यांनी पुरेपूर साधली.

 केरगावातही पाण्याची टंचाई जाणवत होतीच. गावक-यांनी सरपंच या नात्यानं त्यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी संयुक्त नळयोजना हे कारण सांगून म्हटलं,

 ‘लोकहो, खरं तर या पाण्यावर आपल्याच गावचा हक्क असायला पाहिजे. कारण नळयोजनेची विहीर आपल्या शिवारात आहे. आपल्याला पाणी पुरत नसताना का म्हणून इराच्या वाडीला पाणी द्यायचं?'

 हा इशारा लोकांना पुरेसा होता. एक रात्री गावक-यांनी विहीरीपासून इराच्या वाडीकडे जाणारी जाण्याची पाइपलाइन तोडून टाकली व सारेच्या सारे पाइप गायब केले.

 आणि पुन्हा इराच्या वाडीवर गावातल्या पडक्या विहिरीतलं नारूमिश्रित पाणी पिण्याची पाळी आली.

 हे वृत्त सजताच तहसीलदार जाधव घटनास्थळी आले. त्यांनी चौकशी केली व यामागे सरपंच (केरगाव) आहेत हे समजताच सरळ सरपंचाविरुध्द पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. पण आता सरपंच प्रबळ बनले होते. मधल्या काळात विधानसभेची निवडणूक झाली होती व निवडून आलेल्या आमदाराचं सरपंचाशी नातं होतं. या जोरावर तालुक्याच्या राजकारणात सरपंचाची ऊठ-बस आमदाराचे उजवे हात म्हणून होत होती.

 आमदारांनी हा आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न केला व वरपर्यंत जाऊन राजकीय दडपणानं हा न्यायप्रविष्ट खटला मागे घेण्याचे आदेश आणले व त्याप्रमाणे खटला मागे घेण्यात आला. पण तहसीलदार जाधवांची या प्रकरणी तडकाफडकी बदली झाली. आणि त्यानंतर या गावाकडे कुणी फिरकलंच नाही.

 फक्त आमदारांनी केरगाव मुक्कामी त्यांना इराच्या वाडीचे लोक भेटायला आले असता 'तुम्हाला आमदार फंडातून नवीन स्वतंत्र नळयोजना मंजूर करून देत आहे' अशी घोषणा केली.

 केवळ घोषणा... तिला कधी मूर्त रूप आलंच नाही.

 इराच्या वाडीकडे जगदीश व जाधवांनंतर कोणी फिरकूनही पाहिलं नाही, हे विदारक वास्तव होतं.

 '...तर मग सांगा सायेब, हेच म्हनायचं का तुमचं ‘झकास परशासन?' तुमी रोड करून दिला रोजगार हमीतून... दोन सालातच विस्कटून गेला. पुना पहिल्यापरमाणं खड़ी बाहेर आली. पक्की डांबरी सडक काय नाही झाली अजूनपत्तुर आन पाणीपुरवठ्याची ही अशी चित्तरकथा... मग गाव दुर्दैवी का म्हणू नये? नारूवाडी का म्हणू नये? तुमीच सांगा सायेब... माजी सम्दी जिंदगी सरली या प्रश्नाचा पाठपुरावा करत.... बाहेर माझा तरणाबांड नातू हाय बसलेला... जवान गडी, पण उबं राहू शकत नाही फार काळ... कारणं ? कारण तेलाबी नारू झाला हाय साहेब, तेलाबी नारू झाला हाय....'


☐☐☐