पाणी! पाणी!!/दौरा

विकिस्रोत कडून



१०. दौरा


 ‘रोटेगाव....'
 बराच वेळ झाला तरी रेल्वे एका आडगावी उभी होती, म्हणून प्रदीपनं खिडकी उघडून प्लॅटफॉर्मवर रेंगाळणा-या एका खेडुताला गावाचे नाव विचारलं होतं.

 त्यानं गावाचे नावे तर सांगितलं होतंच; पण गाडी एका मालगाडीच्या क्रॉसिंगसाठी थांबून आहे ही माहितीही दिली. तेव्हा प्रदीपला आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. मुंबई - औरंगाबाद एक्स्प्रेस मालगाड़ीसाठी एका छोट्या स्टेशनवर तब्बल अर्धा घंटा खोळंबून राहाते, हे त्याच्या कल्पनेपलीकडचं होतं. हा त्याचा पत्रकार म्हणून मराठवाड्याचा पहिलाच दौरा होता.

 ‘पावनं म्हमईचे दिसत्यात...' त्या मळक्या पैरणीतल्या व विटका फेटा बांधलेल्या शेतक्यानं तंबाखू चोळीत विचारले, तेव्हा प्रदीपनं उत्तर दिलं,

 "होय, मुंबईचे. आम्ही काही पत्रकार औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळ पाहण्यासाठी चाललो आहोत.

 तो छोटासा, फरशी नसलेला प्लॅटफॉर्म माणसाअभावी सुनासुना व तिथं कसलीही दुकानं, स्टॉल नसल्यामुळे ओकाबोका वाटत होता. प्रदीपला मुंबईतला गर्दीने गच्च भरलेला प्लॅटफॉर्म पाहायची सवय. हा विस्तीर्ण पसरलेला व संथ सुस्तावलेला प्लॅटफॉर्म ज्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मुंबईच्या पत्रकारांचा पालकमंत्र्यांनी दौरा आयोजित केला होता, त्याची झलक दाखवीत होता. रुळांपलीकडे पसरलेलं विस्तीर्ण मैदान काळपट करडे व निष्पर्ण होतं.

 'दुष्काळ तर हाय बगा लई नामी यंदा तर पाणी बरसलंच नाही...' तो शेतकरी सांगत होता, ‘पन मला येक कळत न्हाई, तुमी दुष्काळ बघून काय करणार?'

 ‘आमच्या पेपरात लिहिणार काय काय पाहिलं ते.'

 ‘त्येनं काय व्हणार?'

 या प्रश्नाची चपराक प्रदीपला चांगलीच जाणवली. त्याच्याजवळ खरंच या प्रश्नाचं काही उत्तर नव्हतं.

 ‘मिरगाला बखळ टाइम हाय, तोवर जंतेचे हाल हायत बघा.'

 'तुम्हाला दुष्काळाची झळ बसली आहे?' हा प्रश्न त्यानं चाचरतच विचारला, आणि त्याला स्वतःलाच जाणवलं, किती निरर्थक प्रश्न आहे हा. तो अनाम शेतकरी तर मूर्तिमंत दुष्काळ वाटत होता.

 ‘मंग? या गावातल्या परत्येक शेतकरी व मजुराला त्याची झळ बसलीय की. आवो, पाणीच बरसलं नाही तर शेती पिकेल कशी? हा सारा मुलूक कोरडवाहू. निस्ती बाजरी पिकते. आवंदा ह्ये पीकबी चार आणेसुद्धा पदरी पडलं नाय बघा...'

 आता तो शेतकरी चांगलाच मोकळा झाला होता. प्रदीपमधील पत्रकारही खुलून आला होता. जो दुष्काळ त्याला पालकमंत्री व सरकारी अधिका-याच्या नजरेनं पाहून रिपोर्टिंग करायचं होतं, त्यापलीकडे जाऊन पत्रकारी भाषेत ज्याला 'फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन' म्हणता येईल अशी माहिती अगदी सहजपणे रोटेगावच्या प्लॅटफॉर्मवर त्या अनाम शेतकंन्याशी गप्पा मारताना त्याला मिळत होती. त्याचा गंधही इतर पत्रकारांना नव्हता.

 त्यानं काहीसं सुखावून व अभिमानानं आत डब्याकडे नजर टाकली. सारे पत्रकार मस्तपैकी घोरत होते. 'फ्री प्रेस' ची स्त्री पत्रकार ज्योत्सनाही इतर पुरुष पत्रकाराच्या सुरात सूर मिसळून घोरत होती. प्रदीपला त्याची गंमत वाटली. स्त्रीपण घोरते, हे पत्रकारितेचा व्यवसाय स्वीकारलेल्या पण अजूनही मूळची ललितलेखनाची प्रवृत्ती असलेल्या प्रदीपला धक्कादायकच होतं.

 या पत्रकार दौ-यासाठी त्याची निवड अनपेक्षित होती. त्याच्या पेपरचे चीफ रिपोर्टर मुख्यमंत्र्यांबरोबर विदर्भात गेले होते, तेव्हा त्याला औरंगाबादला जाण्यास फर्मावण्यात आलं. त्याच्या तीन वर्षांच्या पत्रकारितेमधला हा पहिलाच दौरा होता. ची ख्याती ‘सहकारसम्राट' अशी होती, अशा एका मंत्र्यानं आपल्या जिल्ह्यात या

वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळात किती व कसं काम केलं आहे हे दाखवणं व केंद्रीय निरीक्षण तुकडी जी पुढील आठवड्यात दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी राज्यात येत होती, त्यांच्यापुढे त्याची समग्रता दाखवून अधिकाधिक केंद्रीय मदत मागण्यासाठी पार्श्वभूमी करण्यासाठी हा मुंबईच्या पत्रकारांचा दौरा होता. मराठी, इंग्रजी व गुजराथी पत्रकार त्यात होते. या सा-या ज्येष्ठ पत्रकारांबरोबर दौरा करण्याचं 'थ्रिल' प्रदीपला जाणवत होतं.

 महाविद्यालयीन शिक्षण व नोकरीच्या निमित्तानं जरी गेल्या दहा-बारा वर्षांत प्रदीप मुंबईकर झाला असला, तरी मूळचा तो माणदेशाचा. दुष्काळी भागातच तो लहानाचा मोठा झाला, म्हणून त्याला दुष्काळ, नापीक शेती व पाण्याचा प्रश्न या समस्यांबाबत रस होता व त्याला त्यानं पद्धतशीर वाचनाची जोडही दिली होती. आज या दौ-याच्या निमित्तानं त्याचा जुना माणदेशी अनुभव व केलेला अभ्यास त्याला तपासून पाहायचा होता व वेगळा, अभ्यासू वृत्तांत वाचकांपुढे सादर करायचा होता.

 यानिमित्ताने दौ-याच्या वेळी इतर ज्येष्ठ पत्रकारांशी चर्चा करावी, असा त्याचा मानस होता; पण एक्स्प्रेसनं मुंबई सोडली, तसं साऱ्यांचं खाणं, पिणं, टवाळकी, अश्लील जोक्स सुरू झाले. मद्याच्या बाटल्या फुटल्या. सिग्रेटीच्या धुराने तो फर्स्ट क्लासचा पूर्ण रिझर्व्ह केलेला डबा भरून गेला. एक्स्प्रेसचा रामन व ‘टाइम्स'ची ज्युथिका पेपरची ‘रायव्हल्सी' विसरून एकमेकांच्या जोक्सना टाळ्या देत दाद देत होते, तर हिंदुत्वनिष्ठ दाते व उर्दू पत्रकार रहेमान एकमेकाना ‘शिवास रिगल' चा आग्रह करीत होते. ज्योत्स्ना खुमासदारपणे अफलातून चावट जोक्स पेश करीत होती. सारे वातावरण कसे सहलीला निघाल्यासारखे होते. त्यांच्या चर्चेचे विषय पण वैयक्तिक व मुंबई वर्तुळातले होते. ज्या भागात व ज्या कामासाठी आपण जात आहोत, तो विषय चुकूनही गप्पांमध्ये येत नव्हता.

 नवखा प्रदीप भांबावून गेला होता. तो ‘टीटोटलर' असल्यामुळे कंपनीतही अलग पडत होता. बाकीचे त्याची खिल्ली उडवीत होते. त्यामुळे तो अधिकाधिक बावरत होता, तसतसा त्यांना जास्तच जोर चढत होता.

 तशातच कुणीतरी पत्त्यांचा कॅट काढला आणि पाहता पाहता रमीचा डाव रंगत गेला. हातात स्कॉच वा ‘शिवास रिगल' आणि ओठात ‘कॅप्टन'ची सिगारेट अखंड जळत होती.

 मग पहाटे केव्हा तरी रमीचा डाव संपवून ते सारे निद्राधीन झाले. आणि इतका वेळ वरच्या बर्थवर डोळे मिटून झोपेची वाट पाहणा-या पण त्यांच्या गलक्यानं व चित्रविचित्र आवाजानं ती न येणाऱ्या प्रदीपनं सुटकेचा निःश्वास टाकला. मग त्यालाही झोप लागली.

 रात्री केव्हाही व कितीही उशिरा झोपले तरी प्रदीपला सकाळी सहा वाजता हुकमी जाग यायची. आजही त्यानं डोळे उघडून सभोवती पाहिलं, तेव्हा त्याचे सर्व पत्रकारबंधू अस्ताव्यस्त घोरत पडलेले होते.

 जाग आली खरी; पण करावं काय हा प्रश्न होता. हलत्या गाडीत बर्थवर पडून वाचणं त्याला जमत नसे. त्यामुळे गाडी थांबलेली पाहताच त्यानं संधी साधली. त्या अनाम शेतकऱ्याशी गप्पा मारताना वेळ बरा जात होता आणि दुष्काळाची बरीच माहिती मिळत होती.

 प्रदीप त्या शेतकऱ्यासमवेत रोटेगावचा कळकट चहा तुटक्या कपबशीतून प्याला. तो अखंड बोलत होता व त्यातून जाणवणारं दुष्काळाचं चित्र प्रदीपला भयावह वाटत होतं.

 न पिकलेली शेती, पिण्याच्या पाण्याची समस्या, हाताला काम नाही म्हणून रिकामी पोटं, रोजगार हमीची तुटपुंजी कामे, रेशन दुकानदाराची मनमानी म्हणून, धान्य वेळेचर नाही.. या साऱ्यातून एक कडवट, काळ्या - करड्या रंगांचं चित्र उभं राहात होतं.

 औरंगाबाद आलं तरी प्रदीप आपल्यातच दंग होता. त्याला त्याच्या बालपणातला पंधरा - सोळा वर्षापूर्वीचा माणदेश आठवत होता. म्हसवडजवळ आकाशवाडी त्याचं गाव, पण म्हसवडला घर होतं. बहात्तरच्या दुष्काळात म्हसवड व तो सारा माण तालुका होरपळून गेला होता. ती अभावाची दाहकता शाळकरी प्रदीपला त्या वेळीही जाणवत होती व त्याची छाप आजही मनावर अमीट होती.

 कॉलेजला असताना सहलीच्या निमित्तानं त्यानं उत्तर भारत पालथा घातला होता. पंजाब - हरियानाची हिरवी श्रीमंती आणि तुडुंब भरून बारमाही वाहणाऱ्या गंगा - यमुना या नद्या पाहिल्या, की त्याचं मन उदास व्हायचं. एक पावसाचा मोठा सडाका आला, की दोन दिवस लाल माती घेऊन खळाळणारी व इतर वेळी बहुतेक कोरडी असणारी माणगंगा आठवायची, जिचा उपयोग आता फक्त पहाटे परसाकडसाठीच व्हायचा. फक्त बाजरी पिकवणारी त्याच्या भागाची बंजर जमीन व पर्जनक्षेत्र असल्यामुळे, कमी पावसामुळे दुष्काळी तालुक्यात मुकुटमणी शोभेल असा

त्याचा तालुका... दुष्काळाची व दारिद्र्याची शान पिढ्यानपिढ्या कपाळावर मिरवणारी, ती मूक सोशिक माणसे...

 आणि जवळच समृध्दीचा व पाण्यानं ओसंडणारा कराड, फलटण तालुका व त्यांची ऊस-शेती पाहिली, की प्रदीपला ती विषमता अधिकच जाणवायची. प्रगत विज्ञानाच्या काळात या भागातलं जादा पाणी माण-खटावमध्ये का आणता येत नाही, या प्रश्नाचं उत्तर त्याला तेव्हाही सापडलं नव्हतं व आजही माहीत नव्हतं.

 हे सारं त्याला रोटेगाव स्टेशनवर त्या अनाम शेतक-याशी झालेल्या संभाषणातून जाणवणाच्या दाहक दुष्काळाच्या जाणिवेनं आठवत होतं मनात नानाविध प्रश्नांची भेंडोळी गरगरत होती आणि एक प्रकारचा सुन्नपणा त्याला आला होता.

 औरंगाबादला पालकमंत्र्यांच्या पी. ए. नं व जिल्हा माहिती अधिका-यानं मुंबईच्या पत्रकारांचे जंगी स्वागत केलं होतं. त्यांच्या वाहनांची चोख व्यवस्था होती व त्यांची निवासव्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली होती. सारं काही चोख होतं- तरीही प्रदीपचा मूड येत नव्हता.

 उलट त्या वातानुकूलित हॉटेलच्या श्रीमंती थाटामाटाचा, उत्तम भोजनाचा आणि सरबराईचा प्रदीपला सूक्ष्म पण खोल असा तिटकारा जाणवत होता. त्याच्या नजरेसमोर न पाहिलेली रोटेगाव-वैजापूर परिसरातली वाळलेली बाजरीची शेते येत होती आणी घास तोंडात फिरत होता.

 दुपारी पालकमंत्र्यांनी साऱ्या पत्रकारांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी व इतर अधिकारी होते. त्यांना सविस्तरपणे जिल्ह्यात पडलेला भीषण दुष्काळ व त्यावर मात करण्यासाठी केलेले नियोजनबध्द प्रयत्न विशद करण्यात आले. केंद्र शासनाकडून नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कमी मिळणाऱ्या मदतनिधीमुळे अनेक उपाययोजना करता येत नव्हत्या, हेही त्यांनी आकडेवारीसह सांगितलं. सारे पत्रकार भराभर टिपणं घेत होते. प्रदीपही यांत्रिकतेनं आकडेवारी आपल्या नोटबुकमध्ये टिपून घेत होता. त्याच्या मनात उठलेल्या प्रश्नांना उत्तरं मिळत नव्हती.

 पालकमंत्र्यांचं ‘ब्राफिंग' संपल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. सारेच जुजबी - वरवरचे प्रश्न, त्याला आकडेवारीतून दिलेलं तेवढंच निर्जीव उत्तर.. मूलभूत समस्येबद्दल कोणीच विचारत नव्हतं. प्रदीपला राहावलं नाही, त्यानं हात वर करीत प्रश्न फेकला,

 महोदय, हे सारे प्रयत्न केवळ मलमपट्टी या स्वरूपाचे नाहीत का? कारण गेल्या वीस वर्षांत किमान चार ते पाच वेळा असा भीषण दुष्काळ महाराष्ट्रात पडलेला आहे व पंचाहत्तर - सत्याहत्तरपासून रोजगार हमी योजना लागू आहे. तरीही प्रत्येक

वेळी तीच समस्या कायम आहे... पाण्याची टंचाई व कामाची मागणी. या भागातला दुष्काळ कायमचा कमी व्हावा म्हणून काही ‘लाँगटर्म प्लॅनिंग' केलं आहे का तुम्ही?'

 त्याचा हा रोखठोक प्रश्न आणि आक्रमक सूर पालकमंत्र्यांना अपेक्षित नसावा. त्यांनी प्रदीपचं नाव, गाव व पेपर कोणता हे विचारून घेतलं आणि मग घसा साफ करीत ते उत्तरले,

 'चांगला प्रश्न आहे. दुष्काळ जर कायमचा हटवायचा असेल तर जतसंवर्धनाला पर्याय नाही. शिवाय शेतक-यांनी शेतीबरोबर फळबागा आणि दूध-कुक्कुटपालनासारखे जोडधंदेही स्वीकारले पाहिजेत...'

 ‘ह्या सान्या योजना आजही अस्तित्वात आहेत; पण गावपातळीवर त्याचं एक्झिक्युशन कसं होणार? आणि ते कोण करणार?'

 त्यासाठी कार्यकर्ते हवेत, चांगले अधिकारी - कर्मचारी हवेत आणि आपल्यासारखे जागरूक पत्रकारही हवेत.'

 पालकमंत्र्यांचा ‘ब्रीफिंग' नंतर हॉटेलमध्ये प्रदीपला काही सीनियर पत्रकारांनी सांगितलं, 'भाई, असे दौरा हे मौजमजेसाठी आहेत. 'ब्रीफिंग'च्या वेळी त्यांना अडचणीत आणायचं नसतं. बाबा, जे सांगितलं ते ऐकायचं.!'

 'मला हे नाही पटत, बाबा. आपण काही त्यांचे प्रसिध्दी अधिकारी नाहीत. खोलात जाऊन काही प्रश्न विचारणे व माहिती जमवणे हा आपला हक्क आहे. प्रदीपनं उत्तर दिलं.

 ‘जाने दो यार... अभी अभी आया है इस फिल्ड में... धीरे धीरे सीख जायेगा...' एकानं म्हटलं, 'शाम गांव में जाने का है। कुछ हिमरू शॉल लेने के है...!"

 'उद्याच्या दुष्काळाची पाहणी झाल्यावर परवा वेरुळ - अजिंठा - पैठणची ट्रीपही त्यांनी अरेंज केलीय...'

 आणि बघता बघता सारे पत्रकार ट्रिपच्या गप्पात रंगून गेले. प्रदीपही . त्यांच्यापासून अलग होत गेला.

 दुस-या दिवशी त्यांच्या दुष्काळ पाहणी दौ-यात माहिती अधिकारी आणि तालुक्याचे तहसीलदार होते. प्रदीपला त्यांच्याकडे पाहाताना चेहरा ओळखीचा वाटत होता; पण नेमकं स्मरत नव्हतं.

 मिनी बसमध्ये प्रदीपच्या जवळच तहसीलदार येऊन बसले. तेव्हा त्यांनीच विचारलं, 'मला ओळखलं नाही का? मी भुजंग पाटील. साता-याला आपण कॉलेजला

एकत्र होतो... पण बारावीनंतर मी कृषी महाविद्यालयात पुण्याला गेलो व आपला संपर्कच तुटला...!'

 प्रदीपला आता ओळख पटली. 'अरे पाटील ! मला कालपासून तुझा चेहरा ओळखीचा वाटत होता; पण रिकलेक्ट होत नव्हतं बध. एनी वे फार आनंद झाला बघ तुला भेटून. तू इथं या क्षेत्रात कसा?'

 ‘बी. एस्सी. (अॅग्रि.) केल्यानंतर दोन वर्षे घरी शेती केली; पण आधीच शेतीवर दोन मोठे भाऊ होते. त्यांनाच पुरेसं काम नव्हतं, पुन्हा कोरडवाहू शेतीत नवीन काही करायला वाव तरी कुठे होता? म्हणून मग नोकरीचा प्रयत्न सुरू केला. एम. पी. एस. सी. पास झालो व एक - दीड वर्षापासून तहसीलदार आहे.'

 'फारच छान. तुझ्यासारखा सुशिक्षित व शेतीची माहिती असणारा तहसीलदार इथल्या लोकांना लाभला हे त्यांचं भाग्यच म्हणायला हवं !"

 'ते मला माहीत नाही. पण यार प्रदीप, मी प्रोफेशनल इथिक्स मानतो व सर्वस्वानं मला जे करता येईल ते करतो. या दुष्काळाचं म्हणशील तर मी शासनाची प्रत्येक योजना लालफितीचा अडथळा न येता कशी राबवता येईल हे पाहात आहे. किंबहुना मी सतत दौरे करून प्रत्यक्ष गावात जाऊन प्रॉब्लेम्स समजून घेतो व ते सोडवायचा प्रयत्न करतो.'

 तहसीलदार आता मोकळे झाले होते.

 'माझ्या तालुक्यातील प्रत्येक गावाची माहिती व तेथे दुष्काळाचा कसा असर पडला आहे, हे मला मुखोद्गत आहे...'

 "पण तुला असं वाटत नाही, हे सारं वरवरचं आहे ?”

 'निश्चितच नाही. यंदापण तीव्र दुष्काळ आहे; पण तो विकासाचा परिपाक आहे, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही!

 ‘धिस साऊंड स्टेंज !'

 'मी एकच उदाहरण देऊन स्पष्ट करतो. अलीकडे दर वर्षी पाणीटंचाई जाणवते, हे आम चित्र आहे. याचं कारण आम्ही नळयोजना घेत नाही, धरणे बांधत नाही हे नसून पाण्याचा उपसा व वापर - तोही शेतीसाठी वाढला आहे हे आहे. अर्थात तो कॅश क्रॉपसाठी आहे, हे सत्य आहे व त्याचा फायदा मूठभर शेतक-यांनाच होतो, हेही तेवढंच सत्य आहे!"

 तहसीलदारांचा अभ्यास व अनुभव त्यांच्या बोलण्यातून प्रदीपला जाणवत होता. एक समधर्मी भेटल्याचं समाधान होतं. मग त्यांच्या गप्पा सबंध दौ-यात रंगत गेल्या.

 जे त्यांनी पाहिलं, जे त्यांना दाखवण्यात आलं, त्यातून दुष्काळ जाणवत होता; पण त्याहीपेक्षा कुठेतरी मालकमंत्र्यांची महती ठसविण्यासाठी हा दौरा आयोजित केला आहे असं जाणवत होतं. त्यांनी किती योजना खेचून आणल्या, किती पैसे खर्च झाले व किती फायदा झाला, हे अधिकारी व पालकमंत्र्याचे दौ-यात सामील झालेले कार्यकर्ते पुनःपुन्हा ठासून सांगत होते. हा सारा पूर्वनियोजित दौरा असल्यामुळे प्रदीपला असंही वाटलं की, प्रत्येक कामाच्या जागी व गावी आधी पढवलेली व माहिती दिलेली गावकरी मंडळी उपस्थित ठेवली गेली होती. व त्यांच्या उत्तरातून पालकमंत्र्यांची प्रतिमा उजळ करण्याचा एक प्रयत्न होता.

 तहसीलदारानं त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं, 'तुम्हा मुंबईच्या सॉफिस्टिकेटेड पत्रकारांना मंत्री वगैरे मराठी सिनेमात दाखवल्या जाणा-या सरपंच - पाटील टाईप वाटतात; पण हा भ्रम आहे. माझा अनुभव तर असा आहे, की बरेच मंत्री हे अतिशय चाणाक्ष व जनमानसाची नाडी गवसलेले असतात. पण आपलं दुर्दैव असं की, साऱ्याच गोष्टी शासनानं करायच्या असा शिरस्ता रूढ झाल्यामुळे व भ्रष्टाचार - लालफितीच्या कारभारामुळे चांगल्या योजनांचा फज्जा उडतो. याबाबत तुम्ही शहरी लोक पुढारी - मंत्र्यांना दोष देता, ते चुकीचे आहे. ही कलेक्टिव्ह रिसपॉन्सिबिलिटी आहे, ती कोणीच पार पाडत नाही.'

 रात्री तहसीलदारांनी त्याला त्यांच्या घरी जेवायला बोलावलं होतं. प्रदीपला ब-याच दिवसांनी अस्सल कोल्हापुरी जेवणाचा योग लाभला होता.

 दौरा ठीक झाला; पण माझं समाधान नाही. पाटील, हा दौरा त्यांनी ठरविलेला सिलेक्टिव्ह गावांचा व कामाचा होता. मला यापलीकडे काहीतरी हवं आहे.'

 'तसं असेल तर उद्या माझ्याबरोबर चल. मी तुला खरा दुष्काळ व त्याची भीषणता - व्यापकता दाखवीन.' पाटील म्हणाले, 'पण उद्या तुमचा वेरुळ - पैठण व परवा अजिंठा असा दौरा आहे... जंगी बेत आहे.. तो कशाला सोडतोस?'

 'नाही यार, हे सारं पाहिल्यानंतर आपण पंचतारांकित हॉटेलमध्ये राहाणं व साईट सीइंग करणं प्रशस्त वाटत नाही.'

 'अजून तुझी ती कॉलेजच्या जमान्यातली स्वप्नाळू वृत्ती व संवेदनशीलता कायम आहे म्हणायची !' तहसीलदार म्हणाले, 'पण पेशंटचं दुःख पाहून डॉक्टर सीरियस झाला तर तो पेशंटला नीट करू शकणार नाही, हे विसरू नकोस. हां,

इतरांच्या दुःख - वेदनांबद्दल कौडगं च कोरडे राहू नये हे खरं; पण त्यात एका मर्यादेपलीकडे इनव्हॉल्व्ह होही योग्य नाही. नाहीतर कामं करता येणार नाहीत यार!'

 'ते ठीक आहे, पाटील, पण स्वभावाला औषध नसतं.' प्रदीप म्हणाला, 'मला प्रेक्षणीय स्थळाचं आकर्षण नाही, मी यापूर्वी सहलीत हे वेरुळ - अजिंठा पाहिलं आहे, फक्त पैठण राहून जाईल. पण यापेक्षा मला तुझ्याबरोबर दौरा करायला आवडेल...!'

 'ओ. के., आपण उद्या सकाळी लवकर निघू. मला दोन रोजगार हमी कामांचे इन्स्पेक्शान करायचं आहे, एक गावात पाण्याची टंचाई आहे, तिथली खाजगी विहीर अधिग्नहीत करायची आहे व एका गावात गुरांची छावणी उघडण्यासाठी गौरक्षण संस्थेबरोबर बोलणी करायची आहेत. हे सारं आपण चारपर्यंत आटपू. आपल्या दौयाच्या शेवटच्या ठिकाणाहून पैठण केवळ वीस किलोमीटर आहे. तिथे आपल्याला जाता येईल व तुला धरण व ज्ञानेश्वर उद्यानही पाहाता येईल.'

 दुस-या दिवशी सकाळी प्रदीप पाटीलसह दौ-यावर निघाला. पहिल्या गावी ते पोचले तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. तिथून एका पाझर तलावाच्या कामावर जायचं होतं.

 'प्रदीप - कामाची साईट आडवळणी आहे तिथे जीप जात नाही आपल्याला एक किलोमीटर पायी जायं लागेल सवय आहे ना?"

 "सवय नाही - पण मी निश्चीत घेईन...!"

 पाटील सोबत पायी जाताना भोवतालचा परिसर तो पाहात होता - सारी शेत उजाड - काळपट... कुठेही झाडे नाहीत आणि रस्ता असा नाहीच. जवळपास वीस मिनिटांनी ते कामाच्या जागी पोचले. तहसीलदारांना पाहाताच कामावरचा मुकादम पुढे आला व म्हणाला,

 ‘साहेब - अजून कामाला सुरुवात झाली नाही. लोक निवांतपणे दहापर्यंत येतात. कितीही सांगितलं तरी वेळेवर येत नाहीत.'

 'मला हे माहीत आहे. मस्टर काढ व लोकांना गोळा कर. मला हजेरी घ्यायची आहे व यापुढे जे मजूर येतील त्यांचा खाडा. त्यांना उद्या यायला सांगायचं.'

 प्रदीप शांतपणे पाहात होता, न्याहाळत होता. कळकट कपड्यातले रापलेले काळेसावळे स्त्री-पुरुष, स्त्रियांची संख्या जास्त, साऱ्यांच्याच नजरेत एक थंड निरुत्साह.. तहसीलदारांनी हजेरी घेतली व कामावर उशिरा येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मग त्यांचे प्रश्न विचारले - अडचणी विचारल्या. त्या नेहमीच्याच मजुरी कमी पडते, खूप दुरुन यावं लागतं म्हणून वेळ होतो, कामाचं मोजमाप होत नाही,

रेशनचं धान्य मिळत नाही... आणि आठ दिवसांनी हे काम संपणार, तेव्हा दुसरं काम लवकर उपलब्ध व्हावं...मस्टर असिस्टंट अरेरावी करतो इ. तहसीलदार त्यांचं समाधान करायचा प्रयत्न करतात व जीपकडे वळतात.

 ‘प्रदीप...' पाटील जीपमध्ये बोलू लागतात, 'रोजगार हमीच्या कामावर उशिरा येणं हे आम आहे, अनेकांना दुरून यावं लागतं हे खरं असलं तरी नियम तो नियम. म्हणून मी हजेरी घेऊन मस्टर क्लोज केलं. आता उशिरानं जे मजूर येणार, ते माझ्या नावानं बोंब मारणार... मजुरी कमी पडते... कारण इथं कठीण काम आहे व दुष्काळानं व निकृष्ट हायब्रीडच्या भाकरीच्या जेवणानं ताकद कुठे आहे माणसात ? पुन्हा श्रमाची वृत्तीही नाही. मजुरी कमी पडली की पुन्हा टीका, वृत्तपत्रात बातमी... आम्हाला पुन्हा चौकशी करावी लागते. किमान वेतन देणं भाग आहे, पण त्या प्रमाणात काम झालं नाही की, कामाचा खर्च वाढतो व मंजूर रक्कम संपली की काम बंद पडतं. मग उर्वरित कामासाठी पुन्हा रिव्हाईज एस्टिमेट करा.. ते मंजूर करा आलंच.. पण या अडचणी समजून न घेता टीका होतेच. आता हे काम संपत आलंय. - या परिसरात दुसरं काम मंजूर आहे; पण एका शेतक-यानं काम अडवलंय. त्याची संमती नसेल तर काम सुरू होऊ शकत नाही.'

 ‘मग ?-

 ‘आता गावात गेल्यावर त्याच्याशी चर्चा करायची. बघूया संमती मिळते का?'

 प्रदीपच्या शहरी मनःपटलावर तहसीलदार म्हणजे तालुक्याचा राजा असे बिंबलेलं होतं; पण या राजाला काय काय करावं लागतं हे तो प्रथमच जवळून अनुभवत होता.

 गावात गेल्यावर नेहमीप्रमाणे सरपंच - पोलिस पाटील आले. चहापाणी झालं. पाझर तलावासाठी संमती न दिलेल्या शेतक-याला बोलवून घेतलं. त्याला समजावून सांगितलं. प्रदीप पाहात होता. तहसीलदार पाटील त्याला तळमळीन समजावीत होते. मधेच हुकमी आवाजात धमकावीत होते, पण तो शेतकरीही तेवढाच ठाम होता.

  नाही साहेब - म्या जिमीन आडव्हान्स मिळाल्याबिगर देणार नाही. - मह्या पोरीचं लगीन रुकलंय पैशाअभावी.. म्या जिमीन दिली तर पैसा नाही मिळणार बगा बिगीनं....!”

 'ठीक आहे, मी ऐंशी टक्के मावेजा देण्याबद्दल कलेक्टर साहेबाशी बोलतो.!

 पुढल्या गावचा दौरा सुरू. जीपमध्ये पाटील सांगत होते, “या शेतक-यांचंही बरोबर आहे. भूसंपादन कायद्याच्या प्रणालीमुळे जमीन घेतल्यावरही दीड-दोन वर्षे किमान निवाडा जाहीर व्हायला लागतो व पैसा मिळत नाही. त्याला जमीन कामासाठी द्यायची आहे, पण नियमाप्रमाणे मिळणारा ८० टक्के अॅडव्हान्स त्याला त्वरित हवा आहे.!

 'मग त्यात अड्चण काय आहे?

 'म्हणाल तर फार क्षुल्लक, पण तेवढीच कायदेशीर आहे. नियमाप्रमाणे कलम चारची अधिसूचना गॅझेटमध्ये प्रसिध्द व्हावी लागते व जमिनीची मोजणी व्हावी लागते; पण या दोन्ही कामांना फार विलंब लागतो. कारण या सर्वांची प्रचंड संख्या व अपुरा कर्मचारी वर्ग, पुन्हा सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीही सर्वच स्तरावर कमी. त्यामुळे विलंब होतो.'

 'तरीही तू त्याला आश्वासन दिलंस?'

 “हो, आणि ते मी पुरं करणार आहेच कारण इथं काम दिलंच पाहिजे. मी यायर थोडासा प्रैक्टिकल तोडगा काढला आहे. कलम चारची सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द झाली आहे. पैसे देण्यापूर्वी ताबा घ्यायचा व रक्कम वाटायची. आमचे कलेक्टर फार चांगले आहेत. तेव्हा हे थोडंसं चुकीचं असलं तरी आक्षेपार्ह नाहीय व ते कायद्यात नंतर बसवता येतं, असं मी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. मला आशा आहे की, ते मान्य करतील. लेट अस होप फॉर बेस्ट !'

 प्रदीप पाटलांच्या कामाच्या पध्दतीनं बराच प्रभावित झाला होता. तोही मूळचा शेतकरी असल्यामुळे त्याला आस्था व तळमळ होती.

 पुढल्या गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता. गावक-यांची मागणी टँकरची मागणी होती. पण तहसीलदारांच्या माहितीप्रमाणे तेथे दोन खाजगी बारमाही पाण्याच्या विहिरी होत्या व दोन्ही गावात होत्या. हे त्यांना तपासून पाहायचं होतं व निर्णय घ्यायचा होता. गावात त्यांनी स्वतः माहिती घेऊन पाहणी केली. त्यांची माहिती खरी होती. गावात एक खाजगी विहीर सरपंचाची होती व एक ओट्या दुकानदाराची होती. त्यांनी तेथेच दुकानदाराची विहीर शासन अधिग्रहित करीत असल्याचा व दररोज दोन घंटे

ही विहीर लोकांना पाणी रहाटानं भरण्यासाठी खुली आहे, अशी दवंडी पोलिस पाटलाला देण्याचा हुकूम दिला. ते निघताना जीपजवळ येत सरपंच म्हणाले,

 ‘पण साहेब, हे पाणी फार काळ टिकणार नाही. यापेक्षा टँकर लावला तर बरं...!'

 ‘सरपंच, पाणी कमी वाटतं का ? तसं असेल तर तुमचीपण विहीर अधिग्रहित करू का?' तहसीलदारांच्या हुकमी आवाजातील प्रश्नानं सरपंच भांबावले व क्षणभरानं सावरासावर करीत म्हणाले,

 'तसं नाही साहेब, हा माझा अंदाज आहे. त्या गंगवालच्या विहिरीचे पाणी आटलं तर माझी विहीर आहेच की...

 'ठीक ठीक....' आणि जीप सुरू झाली. ‘पाहिलंस प्रदीप, लोक खासकरून राजकारणी लोक कसे स्वार्थी असतात ते....'

 'खरं तर सरपंचांचीच विहीर अधिग्रहित करायची. त्यांना चांगला धडा शिकवायचा...'

 ‘माझ्या मनात ते का आलं नसेल' पण काही ग्राऊंड रिअॅलिटिज् पाहिल्या पाहिजेत. हा सरपंच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा नातेवाईक आहे, त्याचं उपद्रवमूल्य बरंच आहे. मी त्यांची विहीर अधिग्रहित केली तरी लोकांना पाणी मिळालंच असतं, असं नाही. कारण तेही दडपणापोटी पाणी भरायला जाणार नाहीत. अशा परिस्थितीत दुसरी विहीर घेणंच योग्य वाटलं.. कारण पाणी मिळणं हे महत्त्वाचं नाही का?'

 ‘पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही राजकीय शक्तीपुढे झुकता?'

 ‘या कृतीमागे राजकारणाचा विचार जरूर आहे, पण महत्त्व आहे परिणामाला. लोकांना पाणी मिळायला हवं. इथं सरपंचाची विहीर मी अट्टहासान अधिग्रहित केली असती तर काय होईल? माझी शक्ती काही दिवस तरी या बाबीतच खर्ची पडेल? कारण हा पोलिटिकल प्रेशर आणेल. कदाचित मला मंत्र्यांचा फोन येईल... एवढं करूनही गावात त्याचं वजन लक्षात घेता लोक आपणहून त्या विहिरीवर जाणार नाहीत. प्रदीप, मोठं युध्द जिंकण्यासाठी लहानसहान चकमकी हराव्या लागतात कधी कधी.

 ‘ते या प्रकरणाला कसं लागू होतं?'

 ‘या सरपंचाचा ट्रॅक्टर आहे व त्याला काम हवंय म्हणून तो गावात पाणीटंचाईचा आरडाओरडा करून टॅकरची मागणी करतोय. शासनाकडे सरकारी टँकर वा ट्रॅक्टर नाहीत. खाजगी घ्यावे लागणार. म्हणजे याच्या ट्रॅक्टरला दररोज काम व भरपूर पैसे मिळणार.... ते मला टाळायचं होतं, म्हणून हा पर्याय व त्याला गर्भित धमकी की, गंगवालच्या विहिरीचे पाणी कमी पडलं तर तुमची घेऊ... टैंकर न लावणं हा युध्द जिंकण्याचा प्रकार, तर त्यांची विहीर अधिग्रहित न करणं चकमक हरण्याचा प्रकार.'

 प्रदीपला आपल्या जुन्या मित्राचा अभिमान वाटला. तो म्हणाला, 'यार पाटील, तुझ्याबरोबर आज दौरा करून मला खूप काही मिळालंय. प्रशासनावरील विश्वास - जिथं अनेक चांगले अधिकारी आहेत.....हा !'

 यापुढील गावात एका संस्थेमार्फत गुरांची छावणी उघडायची होती. त्यासंदर्भात पाहाणी व चर्चा होती. प्रदीप बारकाईनं तहसीलदारांच्या हालचाली व वर्तन पाहात होता. ही संस्था धार्मिक व राजकीय पक्षाशी संलग्न होती; पण शिस्त व चोखपणासाठी प्रसिध्द होती. तेथे पंचक्रोशीतील तीन तलाठी सज्जांमधील जनावरे ठेवण्याची योजना अंतिम केली, त्यांना दोन दिवसात पुरेसा चारा पाठवून देण्याचे तहसीलदारांनी आश्वासन दिले.

 गावातल्या दोन कोतवालांची सकाळ - संध्याकाळची ड्यूटी लावून दिली. जवळच एक कारखाना होता. तिथल्या कार्यकारी संचालकांशी पाटील आधीच बोलले होते. त्यांच्याशी भेटून त्यांच्या मार्फत पाण्याचे टैंकर जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी पाठविण्याचे आश्वासन मिळवले.

 एव्हाना पाच वाजत आले होते, ‘यार, फार वेळ झाला. तुला पैठणला जायचं आहे... चल, तिकडंच जाऊया. ही कामं संपणारी नाहीत.'

 ‘नको पाटील - आज जायचा मूड नाही. आपण परतूया. तुझं जेवण पण राहिलंय.'

 परतीच्या प्रवासात तीव्र दर्प आला, तशी प्रदीपनं प्रश्नार्थक मुद्रा केली. इथं बीफ फॅक्टरी आहे. यावर्षी त्यांची मजा आहे. कारण जनावरं त्यांना स्वस्तात मिळतात. मागच्या वर्षी उत्तम पीक-पाणी होतं, त्याच्या निम्यानंही आज मोठ्या जनावरांचे भाव राहिले नाहीत. या कंपनीचे दलाल गागोगावी जाऊन पडत्या भावात जनावरं खरेदी

करतात. यावर्षी कंपनीचा नफा भरपूर वाढेल. मी त्याचा बारकाईने अभ्यास केला आहे.'

 समोरून शंभर-सव्वाशे जनावरे येत होती. “बोलाफुलाला गाठ पडते ती अशी... ही सारी जनावरे कंपनीत चाललीत बघ.'

 प्रदीप आपल्या सूटमध्ये दोन्ही तळव्यांची उशी करून त्यावर डोकं ठेवून पडला होता. नजर छतावरील नक्षी विमनस्कपणे निरखीत होती. मनावरचं मळभ कमी होत नव्हतं.

 त्याची ही घनभारली अवस्था परतीच्या प्रवासात कायम होती. त्याच्या पत्रकार मित्रांनी त्याला छेडायचा बराच प्रयत्न केला; पण त्याचं लक्ष नाही हे पाहून आवरती घेतली व त्याच्याकडे मग प्रवासात पूर्णपणे दुर्लक्षच केलं.

 मुंबईला परतल्यावर त्यानं कोरे कागद पुढे ओढले. आणि आपला आवडता पेन घेऊन लिहायला सुरुवात केली आणि मन मोकळं करायला सुरुवात केली. किती वेळ तरी तो लिहीत होता.

 जेव्हा दुष्काळ दौ-याचं वार्तापत्र लिहून झालं, त्यानं ते आपल्या मैत्रिणीला - सुमाला दाखवलं. तिनं ते वाचून उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली, ‘सिंपली सुपर्ब! या पद्धतीने दुष्काळाचं रिपोर्टिग कुणी केलं नसेल. हे जेव्हा प्रसिध्द होईल, तेव्हा वाचकांच्या अंतःकरणाचा ठाव घेतल्याविना ते राहाणार नाही...'

 प्रदीपनं ते वार्तापत्र संपादकाला दिलं व चहाच्या कपावर तो आपल्या अनुभवाबद्दल बोलतच राहिला. संपादक कदाचित खूप बिझी असावेत. ते केवळ ‘हो- नाही' च करीत होते. ते लक्षात येताच प्रदीपनं आपला बोलणं आवरतं घेतलं.

 पण ते त्याचं सुमाला बेहद्द आवडलेलं वार्तापत्र त्याच्या वृत्तपत्रात प्रसिध्द झालंच नाही. त्याऐवजी जिल्हा माहिती अधिका-यानं दिलेला कोरडा वृत्तांत प्रदीपचं नाव टाकून छापला गेला होता. त्याची महत्त्वाची ‘स्टोरी' सरळसरळ मारली गेली होती.

 प्रदीप घुश्शातच संपादकांकडे गेला व विचारलं. तसं थंडपणे संपादक म्हणाले, 'हा मालकांचा हुकूम होता. ते पालकमंत्र्यांचे स्नेही आहेत व त्यांच्याकडे माहिती व जनसंपर्क खातंही असल्यामुळे तुझं रिपोर्टिग छापून येणं त्यांना परवडणार नव्हतं.'

 ‘मग मला दौ-यावर पाठवलंच कशाला साहेब ?-'

 'खरं सांगायचं तर असे दौरै हे निव्वळ मजेसाठी साईट - सीइंगसाठीच असतात. मीही रिपोर्टर असताना खूप दौरे केले आहेत. आणि हा दौरा तर पालकमंत्र्यांचा 'स्पॉन्सर्ड' दौरा होता. तिथं त्याच्या नजरेनं पाहायचं व आपल्या भाषेत मांडायचं, असाच हिशोब असतो प्रदीप.' संपादक आपली घसरणारा चष्मा पुन्हा डोळ्यावर चढवीत म्हणाले,

 'यू आर न्यू. हळूहळू अनुभवानं तू तयार होशील. आणि एक सांगतो आपण वृत्तपत्रातली माणसं - शब्दांचे सैनिक तेवढेच स्वतंत्र असतो, जेवढे स्वातंत्र्य मालक आपल्याला देतो. काय? कळलं ना?”

 आणि ते खो-खो हसू लागले, हसता हसता त्यांना ठसको लागला व डोळ्यात पाणीही आलं.

 प्रदीप त्यांच्याकडे विस्मयानं पाहातच राहिला. तो इथं हरला होता. सपशेल हरला होता. ही हार छोट्या लढाईची होती, की मोठ्या युद्धाची?

 त्याला काहीच समजत नव्हतं... काहीच समजत नव्हतं !

☐☐☐