पाणी! पाणी!!/दास्ता - ए - अलनूर कंपनी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search|११. दास्ता - ए - अलनूर कंपनी
 अलनूर एक्स्पोर्ट कंपनी महानगरपालिकेची हद्द संपताच अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर हायवेवर पन्नास एकरांच्या विस्तीर्ण जागेत पसरलेली कंपनी.
 कंपनीवरून जाताना एक उग्न असह्य दर्प प्रवाशांच्या नाकपुड्यात घुसायचा आणि नवखा प्रवासी शेजाऱ्याला सहजच विचारायचा,

 'कसला हा वास हो? भयंकर!'

 'ही अलनूर कंपनी आहे. बीफ तयार करते य फ्रोझन फूड म्हणून अरबस्तानात एक्स्पोर्ट करते.!'

 'पण हा वास?'

 ‘त्याला इलाज नाही. अहो, बैल, म्हशी, रेई, गाई सारे कापले जातात येथे. वास येणारच.'

 प्रवाशांमधील एखादा शुद्ध जैन असलं काहीबाही ऐकून नखशिखांत शहारून डोळ्यावरून कातडी ओढून घ्यायचा. नॉनव्हेज प्रवाशालाही बैल, रेडे, म्हशींच्या उल्लेखानं मळमळून यायचं.

 अलनूर एक्स्पोर्ट कंपनी.

 प्रवेशद्वारी सुंदर कमान आणि अर्धवर्तुळाकार बोर्डावर इंग्रजी व उर्दूमध्ये कंपनीचं नाव वेलांटीदार अक्षरात कोरलेलं. त्यावर सुरेख रातराणीच्या वेली चढलेल्या. कंपाऊंडवालच्या आतून भिंतीवर चढलेल्या अनेक फुलझाडांनी तो परिसर रंगीबेरंगी दिसायचा.

 कंपनीच्या प्रांगणात अनेक खुशबूदार फुलझाडं आस्थेवाईकपणे जोपासलेली. हेतू हा, की उग्र दर्प कमी व्हावा....

 मुख्य प्रवेशद्वारातून आत आलं की मधला डांबरी रस्ता थेट कंपनीच्या ऑफिसकडे घेऊन जायचा. दोन्ही बाजूंना अशोक व निलगिरीसारखी उंच वाढणारी झाडं व जमिनीवर वाढलेलं हिरवं गवत.

 ऑफिससमोर एक कारंजं आणि विविधरंगी गुलाबांचा मालकाच्या सांगण्यावरून जोपासलेला ताटवा.

 सारा प्रयास एकाच दिशेनं होता... येणा-यांच्या रंध्रारंध्रात भिनलेला दर्प काही प्रमाणात कमी व्हावा व त्यांना प्रसन्न वाटावं.

 अन्यया तेथे काम करणा-या कामगारांना विचारा...

 त्यांचं वासाचं इंद्रिय जवळपास निकामी झालेलं. तरीही काम करताना किळस जात नाही.

 'तनखा बखळ हाय; पन नरकपुरीचं काम हाय बघा...' एका कामगाराची ही उत्स्फूर्त बोलकी प्रतिक्रिया. 'पन काय करणार? पापी पोटासाठी वंगाळ काम करावं लागतं...'

 पूर्ण कंपनीचा परिसर फिरून पाहायची आपली हिंमत असेल, तर तुम्हाला हे जाणवेल की, जनावरांच्या कत्तलीमुळे सतत घोंगावणारा किळसवाणा दर्प सोडला, तर कंपनीच्या मालकानं मोठ्या रसिकतेनं त्या पूर्ण परिसराचं एका सुरेख बागेत रूपांतर केलं आहे.

 कंपनीचे मालक अलनूर साहेब हे मुंबईत राहतात. एक्स्पोर्ट ऑर्डर्स मिळवण्यासाठी अरबस्तानाच्या दौ-यावर असतात. कधीतरी ते कंपनीच्या ऑफिसमध्ये येतात आणि चुकूनही एक घंट्याच्या वर थांबत नाहीत. त्यांचा हा एक तास सुखदायी

व्हावा म्हणून फॅक्टरी मॅनेजर अल्तमश यांचा हा सारा खटाटोप. अलनूरलाही हा दर्प सहन होत नाही.

 ब-याच कालावधीनंतर अलनूर कंपनीमध्ये आलेले आहेत.

 त्यांच्यासमोर अल्तमश, फ्रिजिंग युनिटचे हयातखान आणि कामगारांचे प्रतिनिधी शिंदे आहेत.

 टेबलावर ड्रायफुटसु ठेवलेले आणि मिनरल वॉटरच्या बाटल्या. अलनूरच्या जाडजूड बोटात उंची तंबाखूचा सिगार पेटलेला.

 ‘शिंदे, अरे साला, तुम लोग सिर्फ तनखाह - बोनस की बात करता... कंपनी का प्रॉफिट कम होता जा रहा है...'

 'हाँ हुजूर, गेल्या तीन वर्षांत या विभागात भरपूर पाऊस झाला, अन्नधान्यं झालं..... अल्तमश कामगार नेते शिंद्यांना कळावं म्हणून मराठीत बोलत होते, त्यामुळे जनावरांचे भाव फार वाढले होते...'

 ‘इस एरिया में बड़े से बड़े इंडस्ट्रीज से भी ज्यादा तनखाह हमारे वर्कर्स की है...' हयातखान.

 ‘पण किती घाण काम करावं लागतं साहेब!' शिंदे म्हणाले, 'या उग्र वासात आठ घंटे काम करणं म्हणजे निव्वळ नरकयातना बघा. लोकांना एक मिनिट वास नको वाटतो. कंपनीसमोर तरळदचा बसस्टॉप आहे; पण प्रवासी बस पुढे शंभर फुटांवर थांबते. कारण वास सहन होत नाही.'

 'ठीक है, शिंदे...' अलनूर म्हणाले, 'इस साल बोनस बढ़ाने की मैं सोचता हूँ... लेकिन एक्स्पोर्ट बढना चाहिये.'

 आणि चर्चा सुरू होते.

 ‘हुजूर - ए - आला...' हयातखान म्हणाले, ‘गये दो साल से चढे दाम से मार्केट से जानवर खरीदने पडे. इस साल भयानक अकाल पडा है, इस मुल्क में शेतकरी लोग अपने जानवर - बैल - भैसे जो मिला उस दाम से बेच रहे हैं. उसका कंपनी को बड़ा फायदा होनेवाला हैं. हमे कुछ नये तरीके अपनाने पडेंगे...'

 अलनूरचा चेहरा उजळतो. ‘अच्छा तो ये बात है?'

 'आता अल्तमशलाही चेव आलेला. हुजूर हम इस एरिया के हर जिले और तालुके में एजंट भेजेंगे. वो सौदा तय करेंगे और हमे जादा से जादा जानवर मिलने चाहिये...'

 'हुजूर...' शिदेही नकळत अल्तमश व हयातखानच्या पद्धतीने म्हणतो, 'हम पूरा साथ देंगे... लेकिन इस साल बोनस की रक्कम बढा दो...'

 ‘गये साल पंधरा परसेंट बोनस दिया था; इस साल पच्चीस दूंगा... लेकिन मशिन की पूरी कपॅसिटी युज होनी चाहिये' अलनूर म्हणाले, 'अल्तमश, प्रॉडक्शन टार्गेट फिक्स करो. हररोज कितना काम होना चाहिये ये सबको बता दो और उतना काम दिखाओ. बोनस मिल जायेगा...'

 यंदा मराठवाड्यात भयानक दुष्काळ पडलेला. पूर्ण खरीप पिके बुडालेली. पावसाअभावी रबीची तुरळक पैर झालेली. मुख्य म्हणजे पाणीटंचाईने उग्ररूप धारण केलेले!

 माणसांनाही पिण्याचे पाणी कमी पडत होतं. गावोगावी शासनाने टँकर्सनी पाणीपुरवठा सुरू केलेला.

 शेतक-यांच्या जनावरांचे फार हाल होते. त्यांच्यासाठी चारा नव्हता आणि बाजारातून कडबा घ्यावा तर त्याचे भाव अस्मानाला भिडलेले. म्हणून न परवडणारे आणि रोख पैसा कुठे असतो शेतक-यांकडे?

 जनावरांना प्यायला पाणीही भरपूर लागतं. गावोगावी टँकरने पाणी पुरवले जायचं ते माणसांच्या संख्येप्रमाणे... जनावरांचा हिशोब जमेस नसायचा.

 शेतक-यापुढे जीवघेणा प्रश्न असायचा. जनावरं डोळ्यापुढे उपासानं व तहानेनं मरू द्यायची की विकायची?

 विकलं तर तेवढाच पैसा मीठ - मिर्चीला सुटायचा. दुष्काळाची धग त्या प्रमाणात कमी व्हायची.

 पुन्हा यंदा अलनूर कंपनीची माणसं गावोगावी येतात, सौदा करतात आणि मुख्य म्हणजे रोख पैसे देतात.

 शेतक-यांच्या डोळ्यापुढे हिरव्या कोऱ्या नोटा आणि जनावरांची करुण नजर फिरायची, पण सरशी व्हायची ती नोटांची.

 अल्तमश आणि हयातखान खुश होते. नुकताच मुंबईहून अलनूर साहेबांचा बधाईपर फोन आला होता. त्यांनी ठरवून दिलेलं उत्पादनाचं लक्ष्य पूर्ण व्हायच्या मार्गावर होतं आणि जवळपास दोन महिने होते जूनला. या काळात उत्पादन दुपटीएवढं व्हायची अपेक्षा होती. त्याबद्दल अल्तमश व हयातखानचं अलनूर साहेबांनी खास अभिनंदन केलं होतं आणि दोघांनाही बोनसव्यतिरिक्त दहा हजार रुपयांचा एक्स-ग्रेशिया मंजूर केला होता.

 अलनूरचं डोकंच मुळी अफलातून होतं. मुंबईत कन्स्ट्रक्शन कंपनीला काही 'डायव्हर्सिफिकेशन' असावं म्हणून आणि अरबस्तानातील बीफची वाढती मागणी व मार्केट पाहून त्यानं ही कंपनी मराठवाड्यासारख्या मागास भागात सुरू करण्याचं ठरवलं. त्यामागे अनेक हेतू होते. एक तर इथं जमीन स्वस्त होती. दुसरं मुबलक पाणी माफक दरात उपलब्ध होतं. याहीपेक्षा महत्त्वाचं कारण म्हणजे हा भाग कायम दुष्काळी म्हणून गणला जायचा. दोन-तीन मोसमात एखादा मोसम चांगला जायचा. बाकी दुष्काळ हा हमखास ठरलेला. अशा वेळी भरपूर जनावरे बेभाव मिळायची. त्यामुळे कंपनीला भरपूर नफा होणं सहज शक्य होतं.

 गेल्या दहा वर्षांत दोन वर्षांचा अपवाद वगळता अलनूरचा अंदाज कधी चुकला नाही.

 यंदाचा दुष्काळ हा दशकातला सर्वात उग्र दुष्काळ होता. म्हणूनच अलनूर कंपनी तिन्ही शिफ्टमध्ये पूर्ण क्षमतेने चालू होती.

 नेहमीपेक्षा यंदा तेथला दर्प जास्त उग्र व कडवट म्हणूनच असह्य होता.

 ‘सर, आपण जे आवाहन सर्व सेवाभावी संस्थांना केलं आहे, त्याला सारे जण आपापल्या परीनं प्रतिसाद देतील,' भिडे गुरुजी म्हणाले, 'पण आमच्या जनकल्याण समितीमार्फत आम्ही या जिल्ह्यात तीन ठिकाणी गुरांच्या छावण्या चालवूत. आमच्याकडे ध्येयवादी स्वयंसेवक तर आहेतच, पण प्रत्येक ठिकाणी दररोज तज्ज्ञ प्रशिक्षित पशुवैद्यकीय अधिकारी भेटी देऊन जनावरे तपासतील व योग्य तो औषधोपचार करतील. मी तुम्हाला खात्री देतो की, इथं जी जनावरं येतील ती शेतक-यांना शेती

हंगामात पाऊस सुरू झाल्यावर धडधाकट व सशक्त अवस्थेत परत केली जातील.

 जिल्हाधिकारी कार्यालयात कलेक्टर भावे यांनी दुष्काळात जनावरे मरु नयेत वा बेभावाने कत्तलखान्याकडे जाऊ नयेत म्हणून गुरांच्या छावण्या उघडण्यासाठी स्वयंसेवी सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींना बैठकीला बोलावलं होतं. अनेक संस्थांनी गुरांची छावणी उघडण्याची तयारी दर्शविली होती.

 जनकल्याण समितीचे भिडे गुरुजी हे लहानपणापासून संघाचे प्रचारक, या जिल्हयात गेली दोन तपे जनकल्याण समितीच्या माध्यमातून विविध सेवा प्रकल्प राबवत आहेत. एक निःस्वार्थी व सेवाभावी वृत्तीचे कार्यकर्ते म्हणून सारे त्यांना मानतात.

 मात्र ते बोलायला फटकळ आहेत. 'सर, तुम्ही आम्हाला गुरांची छावणी उघडण्याची परवानगी दिली याबद्दल धन्यवाद ! यामागे आमचा हेतू शेतक-यांचे पशुधन नष्ट होऊ नये हा आहे. त्याचबरोबर गौरक्षण हाही आहे, हे मी कबूल करतो. त्यात मला संकोच वाटत नाही. सरकारदरबारी आम्ही अस्पृश्य ! म्हणून आधीच विचारतों. पुन्हा गैरसमज नकोत...'

 'गुरुजी, गुरांच्या छावणीत कसलं आलं आहे राजकारण व धार्मिकता ? जो कोणी यासाठी पुढे येईल, त्याला शासनाच्या वतीने चारा दिला जाईल. बाकी आपण करायचं. माझी काही हरकत नाही. आपण गुरांच्या छावण्या चालवायला घ्या.' भावे म्हणाले.

 या बैठकीला काही लोकप्रतिनिधीपण उपस्थित होते. काही आमदार व काही जिल्हा नियोजन व विकास मंडळ - डी. पी. डी. सी. चे सदस्य. आमदारांमधील शिवसेना - भाजप आमदारांनी भिडे गुरुजींच्या जनकल्याण समितीला तीन गुरांच्या छावण्या देण्याचे समर्थन केले. काँग्रेस आमदारांनी विरोध केला नाही. कारण भिडे गुरुजींच्या निःस्वार्थ कामाची त्यांना माहिती होती.

 सभेचा मूड पाहून डी. पी. सी. चे सदस्य असलेले व अल्पसंख्याक सेलचे सचिव असलेले चाऊसशेठ मात्र अस्वस्थ झाले, पण काही बोलू शकले नाहीत.

 'शेतकरी बंधूंनो, पशुधन हे बळीराजाचं - शेतक-याचे भूषण आहे, वैभव आहे. ते साऱ्यांनी जपलं पाहिजे. यंदाचा दुष्काळ मोठा आहे. पाणी व चाराटंचाई प्रचंड आहे. पण त्यावर मात करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, त्याला तुम्ही साथ दिली पाहिजे. आपली गुरेढोरे आपण आम्ही स्वयंसेवी संस्थांमार्फत उघडलेल्या गुरांच्या छावणीत पाठवा. तेथे त्यांची उत्तम देखभाल केली जाईल. हे पशुधन शेतीसाठी अत्यावश्यक आहे. ते आपण पडत्या भावानं किंवा जनावरांना चारा घालता घेत नाही म्हणून बेभाव विकू नका. शासनाच्या वतीनं मी तुम्हास आश्वासन देतो की, तुमचं पशुधन आमच्या छावणीत सुरक्षित राहील. शेती हंगाम सुरू होताच ते परत पाठवू.'

 भावे गेले दोन दिवस जिल्ह्यामध्ये सतत फिरून गुरांच्या छावण्यांना भेट देत होते, गावात शेतक-यांशी बोलत होते. त्यांच्या अपेक्षेपेक्षा स्वयंसेवी संस्थांनी चांगल्या पद्धतीने गुरांच्या छावण्या चालवल्या होत्या.

 तरळद हे त्यांच्या दौ-यातलं शेवटचं गाव व अखेरची गुरांची छावणी होती. तेथे त्यांचं स्वागत भिडे गुरुजींनी केले व त्यांना गुरांची छावणी फिरुन दाखवली. सारी व्यवस्था चोख होती. गुरांच्या माथी छप्पर उभारून सावलीची सोय केली होती, चार मोठे हौद गुरांना पाणी पिण्यासाठी बांधले होते आणि जनकल्याण समितीने स्वखर्चाने बोअर घेऊन त्यावर मोटार बसवून पाण्याची सोय केली होती. गुरांसाठी लागणारी औषधीही पुरेशी होती. तेथे दाखल झालेली जनावरे अंग धरत होती.

 ‘वा गुरुजी ! फारच छान ! एवढी चांगली व्यवस्था शासनही करू शकणार नाही.' भावे म्हणाले, 'याचं एकच कारण मला दिसतं आपली निःस्वार्थ सेवावृत्ती आणि समाजाबद्दलचा कळवळा."

 ‘सर, माझी जादा तारीफ करू नका. तुमच्यावर संघाचा शिक्का बसेल." भिड्यांना मनमोकळ्या स्तुतीचाही स्वीकार करता येत नसे. ते आपल्या फटकळपणाला अनुसरून बोलून गेले.

 ‘ते मी जाणतो; पण तुमचं काम पाहिलं की वाटतं, हीं लेबले अनबॉरंटेड आहेत. प्रत्येक ठिकाणी इझम आणायची गरज नाही.'

 'आणखी दोन बाबी मला स्पष्ट करायच्या आहेत.' भिडे गुरुजी म्हणाले, 'एक तर या परिसरात अलनूर नावाची कंपनी आहे. बीफ एक्स्पोर्ट करण्याचा त्यांचा  कारखाना आहे. यंदा त्यांनी केवळ आपल्या जिल्ह्यातच नव्हे, तर मराठवाड्यातील सातही जिल्ह्यांत व सर्व तालुक्यांत एजंटस् पाठवून बेभाव जनावरे खरेदी केली आहेत; पण आता आपण या जिल्ह्यात जवळपास चाळीस गुरांच्या छावण्या उघडल्यामुळे त्याला फार मोठी खीळ बसली आहे.'

 ‘मग त्यात वाईट काय आहे गुरुजी ? शासनाचा सारा प्रयास या दुष्काळात पशुधन वाचवावं यासाठीच आहे.' भावे सरळपणे म्हणाले.

 ‘सर, आपण शासनाचे आदेश ‘लेटर अँड स्पिरिट' प्रमाणे घेता - पाळता व तसे काम करता. पण शासनाचे काही लोकप्रतिनिधी... त्यांना हे रुचत नाही. ते तुम्हालाही बदनाम करायला मागे - पुढे पाहणार नाहीत.'

 ‘तुमचा इशारा माझ्या लक्षात आला गुरुजी; पण आपल्या जिल्ह्यात इतक्या खालच्या पातळीवर येऊन विचार करणारे लोकप्रतिनिधी असतील असं वाटत नाही... असले तरी माझ्या डोळ्यास डोळा भिडवून ते सामना करतील हे शक्य नाही.' भावे आत्मविश्वासानं म्हणाले.

 ‘बरं, दुसरी बाब कोणती'

 ‘या भयानक गर्मी - उन्हामुळे जनावरांचे काही रोग बळावतील. आमच्या तिन्ही छावण्यांत पुरेशी औषधी आहे; पण सर्वत्र ही परिस्थिती नाही. काही ठिकाणी प्रशिक्षित व्हेटरनरी डॉक्टर वा कंपाऊंडर नाहीत. तुम्ही पशुवैद्यकीय खात्यामार्फत दररोज डॉक्टर्सची व्हिजिट सर्व ठिकाणी लावली तर बरं होईल.'

 ‘तुमची ही सूचना रास्त आहे. मी लगेच त्यावर कार्यवाही करतो.'


 चाऊसशेठनी पुन्हा एकदा काजू-मनुकांचा बोकणा भरला आणि पलंगावरचे पाय लांब केले. बेचैन असले की घडीघडीला त्यांना ड्रायफूटस लागायचे मघाशीच अल्तमश व हयातखान त्यांचा निरोप घेऊन गेले होते व बजावूनही गेले होते,

 ‘चाऊसशेठ, आप हमारे कम्पनी के इस जिले के मेन एजंट, इस साल ये क्या हो गया ? पूरे जिले में गुरों की छावनी खुलने से इस दस-पंधरा दिन में हमे एक भी जानवर काटने को नहीं मिला.'

 चाऊसशेठला हे माहीत होतं. खरं तर दुष्काळाच्या वेळी नेहमीच गुरांच्या छावण्या उघडण्याचे शासनाचे आदेश असतात. कुठेतरी साखर कारखान्याच्या परिसरात दोन चार छावण्या उघडल्या जातात. पण भावे साहेबांनी यंदा कमालच केली. स्वतः प्रत्येक तालुक्यात व महसूल मंडळात जाऊन तेथे चांगलं काम करणा-या संस्थांना प्रोत्साहित करून जवळपास चाळीस गुरांच्या छावण्या उघडल्या. त्यामुळे शेतक-यांनी जनावरे बेभाव विकण्याऐवजी ती छावण्यांमध्ये दाखल केली. परिणामतः कंपनीला या पंधरा दिवसांत एकही जनावर मिळालं नाही. तीन शिफ्टमध्ये कंपनी गेले दीड महिना चालू असताना आता जेमतेच एक शिफ्टचंच काम उरलं होत होतं - तेही इतर जिल्ह्यांतील जनावरांमुळे; पण त्यात वाहतूक खर्च फार होता.

 ‘अलनूर साहब आपसे सखुत नाराज है चाऊसशेठ.' हयातखान म्हणाला, ‘कुछ कीजिए, कुछ कीजिए. वर्ना कम्पनी आपकी खातिरदारी बंद कर देगी.'

 चाऊसशेठ संतप्त नजरेनं पाहात आहेत हे जाणवताच हयातखान सावरीत म्हणाला, 'ये साहब ने गुस्से में कहा होगा. हम उनको समझायेंगे. लेकिन सवाल हल नहीं होता इतने से. जूनपर्यंत कंपनीच्या तिन्ही शिफ्ट चालल्या पाहिजेत. गेल्या दोन वर्षातला लॉस भरून काढायचा हाच मौका आहे. कुछ करो शेठ, कुछ करो.'

 ते अलनूर साहेबांना चांगले ओळखून आहेत. त्यामुळे जरी हयातखानने सौम्य शब्दांत त्यांची नाराजी पोचवली असली तरी त्यामागची धग चाऊसशेठनं ताडली होती.

 आज त्यांना पूर्ण जिल्हा चाऊसशेठ म्हणून जाणतो. सत्ताधारी पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे ते सचिव आहेत. एका परमिट रूमसह हॉटेल आणि दोन ट्रक व चार टेम्पोसह चालणारी ट्रान्स्पोर्ट कंपनी हे वैभव गेल्या चार-सहा वर्षातलं. त्याला कारणही अलनूर साहेब होते. त्यांनी चाऊसला कंपनीचा मुख्य एजंट बनवलं आणि कंपनीच्या कामात अडथळे न येण्यासाठी राजकीय - प्रशासनिक आघाडी सांभाळण्याचं काम दिलं. आजवर चाऊसशेठ अलनूरच्या कसोटीला सहजतेनं उतरले होते. त्यामुळे हातात पैसा खेळू लागला, समाजात पत वाढली आणि त्यांनी सत्ताधारी पक्षात ऊठबस सुरू करून स्वतःचं एक स्थान निर्माण केलं.

 प्रत्येक दुष्काळात चाऊसशेठनं कंपनीला मागणीप्रमाणे मोठी जनावरं - गाय, म्हशी, बैल व रेडे कमी भावानं पुरवले होते. त्यांनी आपल्या हस्तकांचे जिल्हाभर पद्धतशीर जाळंच उभारलं होतं. पुन्हा प्रशासनाची शिथिलता त्यांच्या पथ्यावर पडायची. जनावरं वाचविण्यासाठी यापूर्वी कधी शर्थीचे प्रयत्न झालेच नाहीत, त्यामुळे चाऊसशेठना फारसं काही करावं लागलं नव्हतं.

 पण यंदाचा प्रसंग बाका होता. भावे कलेक्टरांनी चाळीस गुरांच्या छावण्या जिल्ह्यात उघडल्यामुळे व तेथे जनावरांची उत्तम देखभाल होत असल्यामुळे शेतकरी जनावरे न विकता गुरांच्या छावणीत दाखल करीत होते. आणि यापूर्वी ज्यांनी वाट न पाहता कमी भावात जनावरं विकली, ते हळहळत होते.

 चाऊसशेठची माणसं हात हलवीत परत येत होती.

 दररोज अल्तमश व हयातखानचा तगादा वाढत होता. भाषाही दिवसेंदिवस अधिकाराच्या दर्पानं कडवट होत होती.

 चाऊसशेठ स्वतःला प्रतिष्ठित समजत असल्यामुळे त्याच्या लेखी हे दोघे कंपनीचे नोकर म्हणून कमी दर्जाचे होते; पण त्यांचं बोलणं व इशारे जळफळत का होईना निमूटपणे ऐकून घ्यावे लागत होते. या पंधरा दिवसांत कंपनीकडून एक पैसाही मिळाला नव्हता.

 'कुछ तो करना ही पडेगा.' चाऊसशेठच्या मनात विचार पक्का होत होता. या गुरांच्या छावण्या बंद पडल्या पाहिजेत किंवा शेतक-यांचा विश्वास उडाला पाहिजे, तरच शेतकरी आपली जनावरे पाठवणार नाहीत किंवा काढून घेतील. असं काही घडलं तरच कंपनीचं नुकसान भरून निघेल.

 पण हे कसं करावं हे उमगत नव्हतं.

 सरकारविरोधी सतत लिहिण्यातच आपल्या वृत्तपत्राचा स्वदेशी व डावा बाणा सिद्ध होतो, अशी श्रद्धा असणारया वृत्तपत्राचा दिनेश सावंत हा वार्ताहर होता. गेली तीन वर्षं या पेपरमध्ये काम करीत असल्यामुळे त्याचाही दृष्टिकोन पक्का झाला होता.

 त्याला दुष्काळाच्या निमित्ताने वार्तापत्र लिहिण्याचे आदेश संपादकानं दिले होते. त्यासाठी तो झटत होता. शासकीय कार्यालयातून माहिती घेतली होती व रोजगार हमी - पाणीटंचाईच्या संदर्भात काही गावं पालथी घातली होती. यंदा प्रशासनाने प्रभावी पावलं उचलल्यामुळे जरी टंचाईची समस्या असली तरी उपाययोजना तातडीनं घेऊन त्या कार्यक्षमतेनं राबविल्या जात असल्याचं दिनेशला दिसून आलं. हे सारं वार्तापत्रात नमूद करणं म्हणजे सरकारची री ओढण्यासारखं झालं, असं दिनेशला वाटत होतं. कुठेतरी प्रशासनाचा गलथानपणा दिसावा, म्हणजे तो भाग ‘हायलाईट' करून वार्तापत्र खमंग, चुरचरीत बनवता येईल. यासाठी दिनेश धडपडत होता, माहिती जमा करीत होता.

 आणि चौकामध्ये एक चहा मारून बाहेर पडताना त्याला त्याचा एक मित्र भेटला. हा कालच गावाकडून आला होता. त्यानं बातमी दिली की, त्याच्या गावी म्हणजे तरळदला गुरांच्या छावणीत एक बैल रोगग्रस्त होऊन मेला होता.

 दिनेश खुश झाला. त्याला 'क्लू' सापडला होता. मित्राच्या पाठीवर थाप देत तो म्हणाला, 'हे सरकार नुसतं नाटक करतं गुरांच्या छावण्या उघडण्याचं; पण देखभाल करीत नाही, काळजी घेत नाही.'

 'अंहं, तसं नाही दिनेश.' तो मित्र म्हणाला, 'अरे, तिथली गुरांची छावणी भिडे गुरुजी चालवतात जनकल्याण समितीच्या वतीनं. फार चांगली काळजी घेतली जाते यार ! पण काय झालं, चार दिवसापूर्वी आपल्या गावच्या भीमराव नाईकाचं एक जनावर छावणीत दाखल झालं. ते बिमारच होतं. त्याला औषधपाणी दिलं, पण काही उपयोग झाला नाही बघ.'

 मित्र निघून गेला आणि दिनेश भानावर आला. त्याच्या डोक्यात भराभर विचारचक्र फिरत होते. गुरांच्या छावणीत बैल दगावला ! ही छावणी जनकल्याण समितीची म्हणजे संघवाल्यांची. आपला पेपर कड़ा समाजवादी - डाव्या विचारसरणीचा. संघावर सदैव तुटून पडणारा. वार्तापत्रात हे सारं आलं तर किती मजा येईल! मोठं खमंग, चुरचुरीत वार्तापत्र होईल. संपादक महाशय खुश होतील... आणि मुख्य म्हणजे वार्तापत्रात केवळ सरकारच्या चांगल्या कामांची माहिती देण्याची वेळ आली होती, ती टळली.  आपल्याला ताबडतोब तरळदला जायला हवं. प्रत्यक्ष गुरांची छावणी पाहता येईल च भीमराव नाईकांशी बोलता येईल. एखाद - दुसरी चौकटीची बातमीही मिळेल.


 दिनेश बसस्टैंडला आला आणि त्याला 'सलाम आलेकुम दिनेश साब!' असं अभिवादन आलं. त्यानं आवाजाच्या दिशेनं पाहिलं - समोर चाऊसशेठ उभे होते.

 ‘वालेकुम सलाम !' दिनेशनं प्रतिअभिवादन करीत विचारलं, 'क्या चल रहा है चाऊसशेठ?'

 ‘हमारा ठीक है.' चाऊसशेठ म्हणाले. 'आप कहाँ जा रहे हैं?"

 दिनेशनं आपण तरळदला जात असल्याचं सांगताच चाऊसशेठचे डोळे लकाकले. गेले आठ दिवस 'कुछ करना चाहिये' असं आपण स्वतःला बजावत होतो, तो क्षण आता आला आहे व खरंच काहीतरी करता येईल हे त्यांनी जाणलं !

 "ये बात है!' चाऊसशेठनं आपल्या स्वरात नसलेला कळवळा आणीत म्हटलं, 'गवर्नमेंट ने अकाल के लिए कितने डिसिजन लिए है, लेकिन प्रशासन नाकाम साबित हो गयी है. ये जानवर का मर जाना उसकी मिसाल है, चलो, मैं भी आता हूँ. मेरी गाड़ी से जायेंगे तरलद."

 दिनेश मारुती कारने जायला मिळणार यामुळे खुश झाला होता. कधीमधी असा योग यायचा.

 गाडीमध्ये चाऊसशेठनं दिनेशच्या वृत्तपत्राची जातकुळी व विचारसरणी माहीत असल्यामुळे त्याला व्यवस्थित ‘पंप' करायला सुरू केलं आणि प्रशासन कसं जातीयवादी बनलं आहे हे सांगायला सुरुवात केली आणि पुढे ते म्हणाले,

 'दिनेश, मैं मानता हूँ कि हमारे कलेक्टर भावे साब एक नेक अफसर है. लेकिन वे संघवालों की तरफ झुके नजर आते हैं. वर्ना उन्हें क्या जरूरत थी कि वे भिडे गुरुजी को तीन - तीन जानवरोंकी छावनियाँ दें....।

 दिनेशमधल्या वार्ताहराला चांगला मालमसाला मिळाला होता.
 “तुम्हाला सांगतो साने साहेब, काहीतरी अनिष्ट घडेल असं वाटतं. भीमराव नाईकचा बैल मेला. कारण इथं आला तेव्हाच तो रोगग्रस्त होता. त्याच्यावर औषधोपचार केला, पण तो वाचला नाही. भिडे गुरुजी नगरसेवक सानेंना सांगत होते.

 ‘पण गुरुजी, त्यात तुमचा काय दोष ? तुमचं रेकॉर्ड तर व्यवस्थित आहे. बाकीची जनावरे तर दृष्ट लागण्याइतपत सुदृढ दिसतात.'

 'नाही, साने साहेब. काही लोकांना उत्तम चाललेल्या गुरांच्या छावण्या नको आहेत, सलतात त्यांना. आजवर काही कुसळ मिळाले नाही. या निमित्ताने ते मिळणार व त्याला मुसळाएवढं रूप देऊन आपली - जनकल्याण समितीची आणि संघाची बदनामी काही जण करणार. हे सारं मला स्पष्ट दिसतंय.'

 'असं होणार नाही. गुरुजी, तुम्हाला या जिल्ह्यात सारे जाणतात. तुमचा स्वार्थत्याग, तुम्ही उभारलेले सेवाप्रकल्प... त्यांची नोंद देशपातळीवर आहे...'

 "पण आज या छावणीला तो हरामखोर वार्ताहर दिनेश सावंत आणि डी.पी. सी. चे सदस्य चाऊसशेठ भेट देऊन गेले. तसंच भीमरावलाही भेटले. त्यांच्या पेपरमध्ये विपर्यस्त बातमी येण्याची मला भीती वाटते.'

 'गुरुजी, आपल्याला हे लोक आज का झोडपत आहेत? त्यांच्या टीकेची का म्हणून पर्वा करावी?

 "ते ठीक आहे साने, पण यात त्यांनी कलेक्टर भावे साहेबांना गोवू नये म्हणजे मिळवली; पण...'

 आपलं वाक्य अर्धवट तोडीत गुरुजींनी खांदे उडवले आणि मनातले विचार झटकून टाकीत चा-याची पेंढी जनावरांना देऊ लागले.

 ‘शासनप्रणीत गुरांच्या छावणीत जनावरांची दुर्दशा !'

 'तरळदच्या छावणीत एका बैलाचा हेळसांडीमुळे मृत्यू !'

 'शेतक-यांत तीव्र नाराजी. आपली जनावरे ते छावण्यांतून काढून घेणार !

 ‘कलेक्टर भावे की स्वयंसेवक भावे ?”

 वार्तापत्रात असे चटकदार व खमंग मथळे देत दिनेशनं शैलीदार भाषेत आपलं दुष्काळविषयक वार्तापत्र सजवलं होतं त्यावर वृत्तपत्राचे संपादक बेहद्द खुश झाले होते व ते त्यांनी प्रथम पृष्ठावर छापलं होतं.

 चाऊसशेठ पेपर वाचून खुश झाले होते काहीही प्रयत्न न करावे लागता त्यांना अपेक्षित असणारा परिणाम या वार्तापत्राने घडून यायची शक्यता निर्माण झाली होती.

 इतर वृत्तपत्रांत यासंदर्भात काही यायचे असेल तर आपण आपली जाहीर प्रतिक्रिया स्वतःच लिहून पाठवली पाहिजे, हे चाऊसशेठना माहीत होतं. त्यांनी लगेच प्रतिक्रिया लिहून काढली

 'योगायोगाने मी झुंजार पत्रकार दिनेश सावंत यांच्या सोबत तरळदला गेलो होतो. गुरांची छावणी पाहून वाईट वाटलं. एका गरीब शेतकऱ्याचा बैल देखभाल नीट न झाल्यामुळे मेला हे वाईट झाले; पण याला जबाबदार जिल्हा प्रशासन आहे. जिल्हाधिकारी भावे मनोवृत्तीने संघीय वाटतात. त्यांनी अकारणच जनकल्याण समितीला तीन - तीन गुरांच्या छावण्या दिल्या आहेत. त्यांचे कार्य व्यापारी मध्यमवर्गापुरते सीमित आहे. त्यांना शेतकऱ्यांची सुख - दुःखं, समस्या काय माहीत? हा त्यांचा प्रांत नव्हे. येणारी निवडणूक लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या जवळ जाण्याचा हा एक त्यांचा स्टंट होता, असंच माझं मत झालं आहे; पण त्यांना तो स्टंटही नीट करता आला नाही व त्यात एक बैल दगावला. एका गरीब शेतकऱ्याचं पशुधन नष्ट झालं !

 चाऊसशेठची ही प्रतिक्रिया सर्व वृत्तपत्रांत ठळकपणे प्रसिद्ध झाली आणि वाचकांच्या पत्रव्यवहारात अनेक पत्र - उलटसुलट मतांची येत राहिली.

 आठ दिवसांतच सर्व वृत्तपत्रांत एक छोटी बातमी प्रसिद्ध झालीः 'तरळद येथील गुरांची छावणी शेतक-यांनी आपली जनावरे काढून घेण्यास सुरुवात केल्यामुळे भिडे गुरुजींनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.'

  ‘वा चाऊसशेठ ! इस बार आपने जो कर्तब दिखाये हैं, उसका जवाब नहीं...' अलनूर साहेबांनी कडकडून मिठी मारीत चाऊसशेठना बधाई दिली. कारण

आता पुन्हा अलनूर कंपनी तिन्ही शिफ्टमध्ये पूर्णपणे चालू होती. जूनला अजून एक महिना होता.

 'शुक्रिया हुजूर !' नम्रपणे चाऊसशेठ म्हणाले आणि त्यांनी समोरच्या डिशमधल्या ड्रायफूटचा बोकणा भरला.


☐☐☐