पाणी! पाणी!!/अमिना

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search१२. अमिना
 राणंद बुद्रुक गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्याच्या कडेला झालेल्या शासकीय घरकुलाच्या वसाहतीतील - ज्याचं राजीवनगर असं नामकरणही झालेलं आहे - कादरचं घर त्याच्यासमोर फडफडणांच्या कोंबड्यांच्या खुराड्यानं आणि तीन - चार बक-यांच्या इतस्ततः वावरणाऱ्या वास्तव्यानं सहज ओळखू येत असे.

 कादरच्या घराची दुसरी खूण म्हणजे त्या घराभोवती सदैव खेळणारी व मातीच्या रंगाशी एकरूप झालेली पाच-सहा कच्चीबच्ची. झिपरे केस, गळणारं नाक, चड्डी असेल तर शर्ट नाही, मूली चिटाच्या पोलक्यात. जरा मोठीच्या कडेवर रांगतं मुल - ज्यात प्रतिवर्षी भर पडणार हे साऱ्या राजीवनगराला ज्ञात असलेलं.

 पाच-सहा वर्षांपूर्वी बांधलेल्या घराचा उडालेला चुना, घरासमोरच्या मोरीमुळे ओलसर व घाणेरडी झालेली जमीन, पत्रा उडून गेल्यामुळे तिथं केलेली शाकारणी, सतत पायात घोटाळणानऱ्या कोंबड्या व पिले आणि बक-यांचं इतस्ततः चरणं... यांच्या एकरूपतेतून कादरचा संसार साकार व्हायचा.

 दाराशी मात्र जीर्ण झालेला व विटलेल्या रंगाचा एक पडदा असायचा, जी अमिनासाठी सीमारेषा होती. त्याच्या आत ती बेपर्दा वावरायची, मात्र बाहेर पडताना असाच केव्हातरी घेतलेला, असंख्य ठिगळे जोडलेला व रफू केलेला बुरखा ती घ्यायची. अगदी रोजगार हमीच्या कामावर जातानाही. तिथं मात्र बुरखा काढूनच काम करणं भाग असायचं. खरं तर खेडेगावात पडद्याचा फारसा वापर नसतो; पण तालुक्याच्या

गावी मजहबी कामासाठी अधूनमधून जाणा-या कादरचा मात्र अमिनासाठी सक्त हुकूम होता 'पर्दाच हमारी औरतों की शान है, उसे पहेननाच मंगता है...'

 त्याच्या फाटक्या किरकोळ देहात मात्र जबरदस्त हुकमी आवाज होता. तो तिला त्याची आज्ञा बिनचूक पाळण्यास मजबूर करायची.

 आज सकाळीच त्यानं तिला जवळ ओढून यथेच्छ भोगलं होतं. त्यांच्यामध्ये त्यांची चार महिन्यांपूर्वी जन्मलेली पोर होती. तिचं रडणे चालूच होतं, तरीही त्याचा कादरवर सुतरामही परिणाम झाला नव्हता. वेळी - अवेळी त्याला तिचं शरीर लागायचं. तिच्या इच्छेचा प्रश्नच येत नसे. खरं तर सकाळी उठून घरची कामं करून नऊ वाजता बंडिंगच्या कामावर जायच्या वेळी असं शरीर कुस्करून, दमवून घेणं तिला परवडणारं नव्हतं. तिचं मन तर केव्हाचं विझून गेलं होतं. निकाहनंतर पहिल्या वर्षा-दोन वर्षातली रक्ताची उसळ निवत गेली. त्याचं कारण म्हणजे कादरसाठी असलेलं फक्त तिच्या शरीराचं अस्तित्व. तिला मन, भावना व शृंगार असतो, हे त्याला कुठे माहीत होतं?

 सततच्या बाळंतपणानं शरीराचा चोथा झाला होता. मन तर देहभोगाला किळसलं होतं. पुन्हा त्याचे टोमणे ‘साली चिप्पड हो गयी है. कुछ मजा नहीं आता.' अशा वेळी ती विझून जायची. स्वतःला अलिप्ततेच्या कोशात दडवून घ्यायची आणि आपलं मन शून्य करून त्याला देह द्यायची.

 आजही असंच घडलं. तो पुन्हा अलग होऊन घोरू लागला. अमिनाला मात्र एक किळसवाणी ठुसठूस डाचत होती. ठणकणाऱ्या, दमलेल्या शरीरात नेटानं बळ आणीत ती उठली. दाताला मिश्री लावत केस बांधले. स्टोव्ह पेटवून चहा करून घेतला. गुळाचा चहा तिला आवडत नसे; पण गेले तीन महिने रेशन दुकानात साखरच आली नव्हती. त्यामुळे गुळाचा चहा घेणं भाग होतं. मग भाकऱ्या थापणं, पोराना खाऊ घालणं, मधूनमधून मोठ्या पोरीला - सकिनाला धपाटे घालीत काम सांगणे, उठलेल्या कादरला चहा देणं, स्वतःची आंघोळ उघड्यावर कशीबशी उरकणं, त्यावेळी इतर हिरव्या पुरुषांच्या वाळलेल्या तरी स्त्रीत्वाच्या खुणा बाळगणाऱ्या देहावर नजरेनं सरपटणाऱ्या वासनांचे आघात सहन करणं, कादरचं पुन्हा हुकमी ओरडणं, ‘बेशम, नाचीज, बड़ा मजा आता है ना तुझे सरेआम नंगी होकर नहाने में?' खरं तर रोजगार हमीच्या कामावर जाऊन आल्यावर सारं अंग धुळीनं माखलेलं असायचं, सायंकाळी स्वच्छ स्नान करावंसं वाटायचं; पण कादरचा दराराच असा होता की, तिची हिंमत व्हायची नाही. असंच दोन - तीन दिवसांत केव्हातरी भल्या पहाटे स्नान करायची ती.

आजही ती चार दिवसांनंतर स्नान करत होती, तरीही त्याचे तेच टोमणे. पण तिनं आताशी आपलं मन मुर्दाड बनवून त्याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती.

 'आज मैं तालुक्याला जाता हैं अमिना. हो सकता है दो रोज नहीं आऊ वापस मैं...'

 तो गवंडीकाम करायचा. अलीकडे त्याने तालुक्याला जाऊन काम करायला सुरुवात केली होती. तसा त्याचा हात कसबी होता. काम मिळायचं, मिळकतही चांगली व्हायची; पण ती तो दारूत उडवायचा. अमिनाची शंका होती की, तालुक्याला एकीला ठेवलं असावं. एक - दोनदा तिला झोंबताना तो म्हणून गेला होता. 'चांद, चांद...!'

 त्याचंही अमिनाला फारसं काही वाटत नसे; पण आपला देहभोग टळत नाही हा विषाद होता.

 आणि मुख्य म्हणजे आपल्या व्यसनामुळे आपल्या पाऊण डझन पोरांना धड दोन वेळचं जेवणही देता येत नाही, याचं त्याला काही वाटत नसे. तो म्हणायचा, ‘हरेक ने खुद को देखना. अल्लातालाने जनम दिया है, तो वो जरूर दानापानी देंगा ही !'

 त्यामुळे मोठी सकिना व तिच्या पाठचा बब्बर गावात काही ना काही काम करत आणि ते मिळालं नाही तर चार काटक्या किंवा हिरवा पाला तरी आणत.

 हे मात्र अमिनाला फार खुपायचं. नकोशा वाटणा-या संगातून झाली असली तरी तिला आपली पोरं जीव की प्राण होती. त्यांचं करपलेलं व कसलंही भविष्य नसलेलं बालपण तिला दुखवून जायचं.

 त्यामुळेच गेल्या वर्षापासून तिनंच कंबर कसून रोजगार हमीच्या कामावर जायला सुरुवात केली होती.

 नवव्या बाळंतपणानंतर तिला कमालीची अशक्तता आली होती; पण दोन महिने होताच तिनं पुन्हा कामावर जायला सुरुवात केली.

 आज ती जेव्हा कामावर पोचली, तेव्हा अजून कामाला सुरुवात झाली नव्हती. कारण अजून मुकादम यायचा होता, अजून हजेरी व्हायची होती.

 मग ती आपल्या नेहमीच्या गॅगमध्ये सामील झाली. गजरा, लंका, सोजर या तिच्या राजीवनगरमधल्या मैत्रिणी. त्या झाडाखाली तंबाखू मळत बोलत बसल्या होत्या.

 ‘ये अमिना, तब्येत बरी हाय ना तुजी? सोजरनं आपुलकीनं विचारलं.' आणि पाहता पाहता तिचे डोळे भरून आले. ‘क्या धाड पडलीय मेरे तब्येत को सोजर? बच्चे पैदा करने की मशिन जो हूं मैं.... मशिन को थोडाच दिल होता है?'

 ‘ऐसा क्यों बोलती है पगली? हम हैं ना तेरे साथ.' लंका म्हणाला.

 ‘वो तो हैच. बस तुम से बोलती हूँ और दिल को तसल्ली कर लेती हूँ...'

 ‘पण ते जाऊ दे, अमिना - लंका, माहीत आहे, आज पगार होणार आहे दोन पंधरवड्याचा....' गजरानं माहिती दिली, ‘म्या निघत व्हते कामाला, तवा मुकादम जात होता बस-स्टॅडवर सायेबांना आणण्यासाठी.'

 या बातमीनं अमिनाच्या चेहऱ्यावर थोडी टवटवी आली. निदान दीडशे रुपये तरी सुटत होते. याशिवाय गेल्या वर्षात अमिनाने सतत दीडशे दिवस रोजगार हमीचे काम केल्यामुळे पंधरा दिवसांचा रोजचे बारा रुपये याप्रमाणे बाळंतपणाचा भत्ता नियमाप्रमाणे मिळणार होता.

 मुकादमनं तिचा फॉर्म भरून घेतला होता व त्यानं तिचा अर्ज साहेबाकडून मंजूर करून घेतला होता. यासाठी त्याला त्यातून पन्नास रुपये द्यायचे ठरले होते. कदाचित आज ते पैसेही मिळण्याची शक्यता होती.

 ते काम पाहणारा कनिष्ठ अभियंता - ‘विंजेनिअर सायेब' मुकादमासह आला. त्याच्या हातात भलीमोठी फुगलेली चामड्याची बॅग होती. त्यात रोजगार हमी वाटपाचे पैसे असणार हे साऱ्यांच्या लक्षात आलं होतं व त्यांच्या अंगात उत्साह संचारून आला होता.

 पैशाचे वाटप दुपारी चार वाजता होणार होते.

 सारेजण उत्साहाने कामाला लागले होते.

 मुकादमनं अमिनाला सांगितलं होतं, आज तुझे बाळंतपणाचे पैसे मंजूर झाले आहेत, ते पण साहेब देतील.'

 अशिक्षित अमिना बोटे मुडपीत पुन्हा पुन्हा दोन पंधरवाड्यांचा मिळणारा पगार व बाळंतपणाचा भत्ता मिळून किती पैसे मिळतील याचा हिशोब करीत होती, पण प्रत्येक वेळी वेगळाच आकडा येत होता. एक निश्चित होतं की, मिळणारा पैसा किमान एक महिना तरी पोराबाळांना दोन वेळचं जेवण नीट देण्याइतका जरूर होता...

 त्यामुळे कितीतरी दिवसांनी अमिना खुलून आली होती.

 जेवायच्या सुट्टीमध्ये त्या चौघी भाकरतुकडा खात असताना मुकादमानं येऊन सूचना दिली की, कामावरचे मुख्य साहेब डेप्युटी इंजिनिअर आले आहेत. ते सर्वांना काहीतरी सांगणार आहेत. तरी जेवण होताच सर्वांनी जीप उभी आहे तिथं जमावं.

 अमिनाच्या मनात शंका चमकून गेली. पुन्हा मोठे साहेब ‘कुटुंब कल्याण बद्दल तर सांगणार नाहीत? तीन महिन्यांपूर्वी असेच ते आले होते व कामाच्या साईटवरच त्यांनी कुटुंब नियोजन शिबीर घेतले होते. त्यासाठी मेडिकल कॉलेजची फिरती व्हॅन - ज्यामध्ये ऑपरेशन करता येतं मागवली होती.

 त्या शिबिरात ऑपरेशन करून घेण्यासाठी अमिनानंही नाव नोंदवलं होतं पण...

 'चला चला... वेळ लावू नका... साहेबांना दुसऱ्या साईटवर जायचं आहे...' असा मुकादमानं कालवा केल्यामुळे अमिना आपल्या तिन्ही मैत्रिणींसह उठली.

 जीपमध्ये गॉगल लावून एक पोरसवदा वाटणारा अधिकारी बसला होता. त्या जीपसमोर काही मिनिटांतच दोन रांगा करून स्त्री व पुरुष अलग अलग उकिडवे बसले. मुकादमानं सर्वांना शांत केलं, तसं तो इंजिनिअर गॉगल काढून जीपच्या बाहेर आला. सर्वांकडे एक नजर टाकीत म्हणाला,

 ‘हे पहा, आपल्याला पुन्हा या महिन्यात कुटुंब कल्याणाचं शिबिर घ्यायचं आहे. तसा कलेक्टर व सी. ई. ओ साहेबांचा आदेश आहे. मागच्या मार्चमध्ये अनेकांनी नावे देऊनही ऑपरेशन करून घेतलं नाही, हे बरोबर नाही. आज पगार वाटप होताना सर्वानी आपल्याला किती मुलेबाळे आहेत, हे मुकादमाला सांगायचं आहे. ज्यांना तीनपेक्षा जास्त मुले असतील त्यांनी हे ऑपरेशन करून घ्यावं, अशी माझी विनंती आहे. त्यात तुमचाच फायदा आहे. लहान कुटुंब असेल तर मुलांना नीट वाढवता

येईल, त्यांना शिक्षण देता येईल, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तुमचं दारिद्रय व अज्ञान हे कशामुळे आहे याचा विचार करा आणि निर्णय घ्या.'

 इंजिनिअरच्या स्वरात कळकळ होती. ती अमिनाला आजही जाणवली. मागेही जाणवली होती. म्हणून तर तिनं त्यावेळी शिबिरात नाव नोंदवलं होतं.

 ‘पन सायेब, हे ऑप्रेशन बायाचं हुईल का बाप्याचं ?' एक तरुण मजूर उठला व त्यानं प्रश्न विचारला.

 ‘दोघांचंही करता येतं; पण पुरुषाचं सोपं असतं.'

 ‘छा छा ! माझ्या बाईचं करा सायेब...' त्यानं ठामपणे सांगितलं, तसा तो इंजिनिअर उसळला व म्हणाला, पुरुषाचं का नको? ते उलट सोपं व कमी वेळेत होतं!'

 ‘पन आमची मर्दानगी कमी व्हते तेचं काय?'

 इंजिनिअर हतबुद्ध 'तुम्हाला किती वेळा समजावून सांगायचं? केवळ पोरं पैदा करणं म्हणजे मर्दानगी नव्हे. यामुळे कसलाही विपरीत परिणाम होत नाही. मी स्वतः ऑपरेशन करून घेतलं आहे दोन मुलांवर. त्यावरून मी सांगतो.'

 'तुमी जीपमध्ये हिंडता सायब. आम्हास्नी मेहनत, मशागतीचं काम करावं लागतं. हे नाय जमणार बगा....!'

 आता मात्र इंजिनिअरची सहनशक्ती संपुष्टात आली होती. त्यांनी आवाज चढवीत मुकादमाला म्हटलं, 'या लोकांना तुम्ही त्यांच्या पद्धतीनं समजावून सांगा. हे चालणार नाही.'

 'साहेब, तुम्ही काळजी करू नका. मी पाहतो. मुकादमानं साहेबाला शांत करीत त्यांना बाजूला नेत म्हटलं, 'साहेब, तुम्ही आकडा सांगा. तेवढ्या केसेस मी देतो. पण या गावची ही पुरुषमंडळी लई बिनडोक, साहेब, तेव्हा या केसेस बायांच्या होतील.'

 पैसे वाटणारा कनिष्ठ अभियंता म्हणाला, 'साहेब, सर्वत्र स्त्रियांच्याच केसेस होतात. आपल्याला केसेसशी मतलब आहे. साहेब, आम्ही दोघे या ठिकाणी पंचवीस केसेस निश्चित देतो बघा.'  इंजिनिअर हळूहळू शांत झाले होते; पण त्यांच्या मनातला उद्वेग कमी झाला नव्हता. आजचा अनुभव काही वेगळा नव्हता. सर्वत्र हेच. पुरुषांना नसबंदी म्हणजे आपल्या पौरुषाचा अपमान वाटतो.

 पगारवाटपाच्या वेळी रांगेत उभ्या असलेल्या अमिनाच्या मनात मात्र अनेक विचारांची वादळ उठत होती.

 तिच्या लग्नाला अवघी दहा वर्षी झालेली; पण दरवर्षी होणाऱ्या बाळंतपणामुळे तिची रया पार गेलेली. कादरच्या शब्दात ती ‘चिपाड' झालेली.

 लग्नानंतरच्या नव्हाळीच्या दिवसांत कादर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा. तिचं अपरं नाक पाहून तिला ‘मुमताज' म्हणायचा. मुमताज ही त्याची आवडती नटी. तिचे सारे सिनेमे पाहायचा ‘गच्च भरी हुई है लौंडी' हे त्याच्या आवडीचं कारण. लग्नाच्या वेळी अमिनाही रसरशीत उफाड्याची होती; पण त्याच्या राक्षसी उपभोगाच्या पद्धतीमुळे व सततच्या बाळंतपणामुळे तिची तब्येत दोन वर्षांतच खालावून गेली.

 पहिल्या तीन - चार मुलांपर्यंत तिलाही कधी मुलं बंद होण्यासाठी काही उपाय करावेत, असं वाटलं नव्हतं. कारण त्यांच्या मुस्लिम मोहल्ल्यात सर्वच घरी पाच-सात मुलेबाळे ही आम बाब होती. जास्तीत जास्त मुले असावीत, ही इतरांप्रमाणे कादरचीही ओढ होती. पण तिला रात्री त्याच्या कुशीत झोपणं, तो देहभोग व ते गर्भारपणाचं ओझं आणि बाळंतपणाचा शारीरिक दुर्बलतेमुळे होणारा त्रास नको नकोसा वाटायचा.

 तिचा विरोध कादर जुमानत नसे. तो तिला चक्क धमकी देत असे, ‘मुझे क्या, कितनी बी बीबियाँ मिल सकती, तुझे तलाक दिया तो पोतेरा होगा तेरा - कोई नहीं पूछेगा. ऐसे बछडे सहित गाय से कौन शादी करेगा ?'

 ही भीती सार्थ होती. त्यामुळेच ती नेटानं त्याचे अत्याचार व दरवर्षीची बाळंतपणं सहन करीत होती.

 राजीवनगर घरकुल वसाहतीमध्ये त्यांना शासकीय घर मोफत मिळून गेलं. त्यांचा मुस्लिम मोहल्ला सुटला व संमिश्र वस्तीत ते राहायला आले. तिथं दलित होते, कुणबी होते, मातंग - वंजारी होते; पण तेच एकमात्र मुस्लिम कुटुंब होतं.

 इथं मात्र कादरनं तिच्यासाठी बुरखा व दाराला पडदा सक्तीचा केला होता.

 तरीही दुपारी सर्व स्त्रिया एकत्र जमत. आधी आधी अमिना संकोचामुळे व कादरच्या धाकामुळे त्यांच्यात मिसळत नसे. मग त्यांनीच तिला ओढून आपल्यात नेलं. लंका, सोजीर व गजरा तिच्या मग जिवाभावाच्या मैत्रिणी झाल्या.

 त्यांच्या सहवासात मात्र तिला जाणीव झाली की, आपल्याला जादा पोरं आहेत. त्यांना आपण नीट पोसू शकत नाही. शिक्षण दूरच राहिलं... यापुढे मुलं बंद केली पाहिजेत.

 भीत भीत एकदा तिनं कादरला हे सांगितलं, तेव्हा त्यानं तिला काठीनं फोडून काढलं. “खबरदार, जो ऐसी बात फिर जबान तक लाई तो ! ये इस्लाम के खिलाफ है. वो मौलवी साब कहते हैं....'

 ‘उनका हाल देखो - पहनने को कपड़े नही है... खाने की बोंबाबोंब - कैसा चलेगा ?'

 ‘अल्लातालाने जनम दिया है, तो वो दानापानी भी देगा !' कादरनं ठामपणे सांगितलं. ‘और सिर्फ दोही तो लडके हैं. बाकी पांच लडकियाँ, मुझे और दो बच्चे चाहीये. समझी? मैंने ही तुझसे शादी करके भूल की तेरे मैके में सबके यहाँ लडकियाँ ही जादा हैं. लड़के पैदा करने के गुणही तुझ में कम हैं.'

 त्याच्या या अजब तर्कशास्त्राला तिच्याजवळ उत्तर नव्हतं. निमूटपणे त्याला देह देणं, एवढंच तिला आता करायचं होतं.

 मुलांचं वेड असलं तरी प्रपंचाबद्दल कादर पूर्ण बेफिकीर होता. कामासाठी धडपड करणं त्याच्या वृत्तीतच नव्हतं. तसा हुनर होता त्याच्या हातात. गवंडी कामात तो तरबेज होता; पण आळस व मौजमस्तीचा स्वभाव असल्यामुळे महिन्याकाठी आठ-दहा दिवसही तो काम करीत नसे. बाकीचा वेळ विड्या फुकणे व लहर आली की अमिनाचा भोग घेणे, हाच त्याचा विरंगुळा होता.

 तालुक्याला गेला की तीन-चार दिवस तिची सुटका व्हायची; पण तिथं त्यानं एक बाई ठेवली होती. कमावलेला सारा पैसा तो दारूत व तिच्यावर उधळायचा. हेही तिला एक स्त्री म्हणून संतापजनक वाटायचं आणि आई म्हणून वाईट वाटायचं. कारण

मुलाबाळांच्या खाण्यापिण्याची तो फिकीर करीत नसे. त्यामुळे मुलं भूक - भूक करू लागली, की तिच्या डोळ्यांतून वाहणा-या पाण्याला अंत नसे.

 त्यावरचा उपाय तिला दाखवला लंकाने. ती रोजगार हमीच्या कामावर नित्यनेमाने जात असे व महिन्याकाठी दीडशे ते दोनशे रुपये कमावत असे.

 अमिनानं यावेळी कादरच्या विरोधाला जुमानलं नाही. कारण तिच्यातील आई... मुलांच्या पोटात दोन वेळा पोटभर अन्न जावं असं वाटणारी आई तिच्यातील दुबळ्या स्त्रीवर मात करून गेली होती व त्याचा काही प्रमाणात साक्षात्कार कादरलाही झाला असावा. त्यानं एवढंच सांगितलं.... 'मुसलमान हो, काम को जाते वक्त बुरखा पहेनना.'

 आणि कणाकणानं अमिना रोजगार हमीवरील कामामुळे व त्याद्वारे मिळणा-या पैशामुळे बदलत होती, कणखर होत होती. काही प्रमाणात हा होईना आपण स्वतंत्र होत आहोत, मोकळ्या होत आहोत, ही सुखद जाणीव तिला होत होती.

 तरीही कादरची हुकमत किंचितही कमी झाली नव्हती आणि रात्री तिचा राक्षसी उपभोग घेणेही.

 म्हणून मार्चमध्ये इंजिनिअरनी रोजगार हमीच्या कामावर कुटुंब नियोजन शिबिर घ्यायचा बेत केला, तेव्हा तिनं आनंदानं त्यात नाव नोंदवलं.

 तिनं आपणहून स्वातंत्र्य घेत कादरला त्याबद्दल काही सांगितलं नव्हतं. अग, कशाला नवऱ्याला सांगतेस?' हा लंकाचा रास्त सल्ला पटला होता, त्येस्नी य सुदिक कळणार नाय. अगं, दुर्बिर्णीचं आप्रेशन लई सोपं असतं. सकाळी यायचं, शामला घरी जायचं. बस्स !'

 त्या स्त्रियांच्या सोयीसाठी व वेळ-दिवस वाया जाऊ नये म्हणून इंजिनिअरनं 'लेप्रोस्कोपिक' ऑपरेशन ठेवलं होतं.

 पण कसं कोण जाणे, अमिना ऑपरेशन करून घेणार आहे हे कादरला मजलं. त्यानं तिला पुन्हा गुरासारखं झोडपून काढलं, 'तुझे मैंने बताया था... यह

हमारे मजहब के खिलाफ है... और दो लडके हम मंगता है... साली, हरामजादी ! फिर यह ऑपरेशन की बात निकाली तो जबान काट दूंगा !'

 ‘जरा सोचो मियाँ, मुझे कितनी तकलीफ होती है. तुम मुझे चिपाड कहते हो...' अमिना कळवळून म्हणाली, 'मै ऐसी क्यों हो गयी? हर साल पांव भारी होने से.... और क्या भरोसा फिर बच्चा हो !'

 'जब तक बच्चे नहीं होते, तब तक यह सिलसिला जारी रहेगा !' कादरनं स्पष्टपणे सुनावलं, तसा तिच्या पोटात भीतीने व भवितव्याच्या आशंकेनं गोळा उठला होता.

 'ठेर, बहोत जबान चलाती है !' कादरची लहर फिरली होती. 'आज ही मैं तुझे छोडता हूँ. साली जा, मर... मैं अभी तीन बार 'तलाक' कहके तुझे छोडता हूँ, फिर जाके कर आप्रेशन !'

 अमिना समूळ हादरून गेली. तिच्या जिवाचा तलाकच्या कल्पनेनं थरकाप उडाला. तिनं चक्क त्याच्या पायावर क्षणार्धात लोळण घेतली.

 ‘नहीं ! मुझे माफ करो. मैं फिर जुबान पे ऐसी बात कभी नहीं लाऊगी. सच्ची, तुम्हारी कसम. बस्स, माफ कर दो एक बार मुझे.... ।

 आणि ती मग कामावर पंधरा दिवस गेलीच नाही. एक तर शिबिरात नाव नोंदलं असल्यामुळे कसं जायचं व सांगायचं की, आता मी ऑपरेशन करणार नाही...आणि दुसरं म्हणजे पुन्हा तिला गर्भ राहिला होता आणि आत्तापासूनच तिला मळमळीन हैराण केलं होतं.

 याच बाळंतपणाचा तिनं त्यापूर्वी सलगपणे दीडशे दिवस रोजगार हमीच काम केलं असल्यामुळे भत्ता आज मिळणार होता. तिचं मन या विचारानं कडवटून आलं होतं. स्वतःशीच ती कडू जहर गिळल्याप्रमाणे विमनस्क हसली !

 तिचा नंबर लागला, तेव्हा पगार व बाळंतपणाचा भत्ता - त्यातले पन्नास रुपये काटून तिला मुकादमानं वाटप केला आणि विचारलं,

 'अमिनाबाई, यावेळी तरी ऑपरेशनला आलं पाहिजे. साहेबांनी पंचवीस केसेसचं टार्गेट दिलं आहे. सर्वात जास्त मुलं तुम्हाला आहेत. तुम्ही नाही केलत

ऑपरेशन तर आणखी चार - पाच केसेस फिस्कटतील. यावेळी साहेबांनी गुत्तेदारांना तयार करून प्रत्येक केसमागे साडी - चोळी द्यायचं निश्चित केलंय. तुमचं नाव मी नोंदवतोय.'

 तिनं कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. अंगठा करून पैसे घेतले,

 ‘लक्षात ठेवा, येत्या शुक्रवारी - जुम्मे को ऑपरेशन है....'

 तिनं केवळ मान हलवली व मैत्रिणींसह घरी परतली.

 उद्यापासून आठ दिवस ती कामाला जाणार नव्हती; कारण तिला ऑपरेशन करून घेणं परवडणारं नव्हतं. कारण कसाही झाला तरी तिचा हक्काचा संसार होता. तलाकशुदा जिंदगी तिला परवडणारी नव्हती. ते आयुष्य म्हणजे मुलींची उपासमार... कारण कादरनं फक्त मुलांना ठेवून घेऊन तिला व पाच मुलींना हाकलून दिलं असतं.

 तिचं मनच उतरलं होतं. कशातच रस वाटत नव्हता. त्याचा परिणाम तिच्या प्रकृत्तीवर झाला व तिला अधूनमधून बारीक बारीक ताप येऊ लागला होता.

 तिला त्या कामावर जावंसं वाटत नव्हतं. कारण दोन्ही वेळा शिबिरात तिनं ऑपरेशन करून घेतलं नव्हतं. मुकादम व त्या इंजिनिअरला तोंड कसं दाखवायचं, हा प्रश्न तिच्यापुढे होता.

 काम सुटलं, तसे पुन्हा फाके पडू लागले. कादरच्या कमाईचा मोठा वाटा दारूबाजीत व तालुक्याला ठेवलेल्या बाईत जात होता. त्यामुळे मुलांना धड दोन वेळा पोटभर जेवणही मिळत नव्हतं. मुलांच्या केविलवाणेपणाकडे अमिना दुर्लक्ष करीत होती.

 कादरनं तिला कामावर का जात नाहीस याबद्दल दोन - तीनदा विचारलंही तिच उत्तर ऐकून म्हणाला, 'वो पूछते हैं ऑपरेशन के बारे में तो पूछने दो. कोई जोर जबरदस्ती तो नहीं है इसके लिए... तू ना कह दे....!

 तिनं प्रत्युत्तर दिलं नाही; पण ती कामावरही गेली नाही.

 एके दिवशी दुपारी लंका तिला भेटायला आली. आज बाजार असल्यामुळे रोजगार हमीच्या कामाला सुट्टी होती.

 “काय चाललंय अमिना? बाजारला येतेस?'

 ‘नहीं लंका, पैसा कहाँ है बाजार के लिए? तू जा. मैं नहीं आ सकती उदासवाणी अमिना उद्गाली.

 ‘काल सकिना माझ्याकडे आली व्हती...' लंका सांगत होती, 'तुझी पोरं भुकेनं तळमळत होती. म्या त्येंना चार-पाच भाकऱ्या दिल्या... पण रोजचं काय? तुझे कादरमिया ध्येन देणार नायती हे का मला ठाव नाय? पण तुझं काय? तू अशी का वागतेस अमिना? अगं, मला सम्दं समजलंय, पण आपरेशनला जबरदस्ती हाय का? नाय केलं म्हणून का काम मिळणार नाय?'

 ‘मुझे सब समजता है.... ‘अमिना म्हणाली, 'लेकिन दिल नही करता...'

 ‘बच्चे पैदा केलेत, त्येस्नी खायला घालाया नगं?' लंका म्हणाली, 'असं काळीज भारी करून कसं भागेल? बये, तुला काम केलंच पाहिजे. चल, नवं काम सुरू झालंय - रस्त्याचं. निस्तं मातीकाम हाय. हलकं काम हाय... तवा उद्यापासून जाऊ....

 आणि अमिनाचा कंठ दाटून आला. स्वतःच्या भावना काबूत ठेवणं तिला शक्य नव्हतं. ती भरभरून बोलू लागली.

 ‘क्या बताऊ लंका, मेरा क्या हाल है... बच्चा बंद नहीं करना, मजहब नहीं परवानगी देता, ऐसा ये कहते हैं. मुझे नहीं मालूम सच क्या है... लेकिन लगता है, जिसे मैं खिला-पिला नहीं सकती, उसे पैदा क्यों करू ? और घर बैठे तो अल्लाताला दानापानी देनेवाला नहीच है. हातपैर तो हिलानेही पडेंगे... लेकिन जो इसका जिम्मेदार है, वो नहीं कुछ करता.... मैं क्यों करू ? क्यों?'

 'तू आय हायेस पोरांची - बाईल हायेस... सोसणं आपलं नशीब हाय. अमिना, त्येला तू आन् म्या तरी काय करणार?' लंका अनुभवाचे बोल सुनावीत तिची समजूत काढत होती.

 ‘सच्ची बोलती है तू लंका, माँ का दिल बच्चे की भूख देख नहीं सकता, हम औरते प्यार से मजबूर हैं.... मजबूर !' आपले डोळे पुसत ती म्हणाली, 'ठीक है. मैं

कल से काम पर आऊंगी. इन पर बेकाम गुस्सा करके मैं बच्चों को ही भूखा रख रही थी. अच्छा हुआ, तूने बताया. तू मेरी अच्छी सहेली है....'

दुसऱ्या दिवशी कादरच्या हुकमाप्रमाणे कामावर जाताना घरातून बाहेर पडताना बुरखा ओढून रात्री व पहाटे दोनदा कादरनं चोळामोळा केलेला व थकला - भागलेला देह जिवाच्या करारानं ओढीत अमिना कामाला जात होती.

☐☐☐