Jump to content

पाणी! पाणी!!/जगण्याची हमी

विकिस्रोत कडून


१३. जगण्याची हमी


 खाटेवर तिचा नवरा मुडद्यासारखा बिनघोर घोरत पडला होता.
 सारजेला आयुष्यात प्रथमच आपल्या नवऱ्याची एवढी भयंकर चीड आली होती. काल सायंकाळी पैशावरून झालेली वादावादी व रात्री उशिरा दारू पिऊन आल्यावर त्यानं केलेली मारहाण...

 सारं अंग काळेनिळे पडलं होतं.

 आताही अंग चुरचरत होतं; पण उठणं भाग होतं. रोजगार हमीच्या कामावर वेळेवर जाणं भाग होतं. पूर्वी कसं आरामात अर्धा - एक घंटा उशिरा गेलं तरी मुकादम काही म्हणत नसे; पण मागच्या आठवड्यात कलेक्टरांनी सकाळी नऊ वाजता कामाची पाहणी केली होती, तेव्हा बरेच मजूर आलेले नव्हते. त्या सर्वांचा खाडा लावण्याचा याचा हुकूम होता. सुदैवानं त्या दिवशी सारजा वेळेवर पोचली होती कामावर. त्यामुळे तिची हजेरी बुडाली नव्हती. पण त्या दिवसापासून कामावर आरामात जायचं सुख संपलं. आता मुकादम वेळ पाहतो. पुन्हा कालच्या साप्ताहिक सुटीनंतर आजच या नव्यानं सुरू होणाऱ्या कामाच्या पंधरवड्याचा पहिला दिवस. कनिष्ठ अभियंता स्वतः येऊन कामाचं मोजमाप घेतात व नव्या कामाचं देतात. पुन्हा नवा मस्टर रोल सुरू होतो. त्यामुळे सारजेला वेळ करून भागणार नसतं.

 ती चुरचुरणाच्या अंगानिशी निग्रहाने मनाला बजावीत उठली. 'बये, तुला निस्त बसून नाय भागणार ! नवरा हा असा मुडदेफरास. कच्याबच्चांंची पोटं असं निस्तं बसून नाय

आपून काम केलं तरच भरतील... त्यासाठी तरी तुला उठाया हवं, कामाला जाया हवं.'

 परवा पंधरवड्याचा पगार झाला होता. त्यामुळे कालच्या बाजारात ती मीठ-मिरची, तेल व इतर सामान आणायला नवऱ्याला घेऊन गेली होती. रोजगार हमीचं काम केल्यावर दररोज अर्धा किलो ज्वारीचं कुपन मिळायचं. ती कुपनं मोडून रेशन दुकानातून ज्वारी घ्यायची होती; पण दुकान बंद होतं. तिनं कानशिलावर दुकानदाराचा उद्धार करीत कडाकडा बोटं मोडली होती. पुन्हा पुढल्या आठवड्यावर हे काम गेलं. नाही तर रोजगार बुडवून बाजाराच्या गावी धान्यासाठी जायला आलं. पुन्हा कुपनाची मुदत संपायची भीती होती. आज इंजिनिअर साहेबांना हे सांगायला हवं. म्हणजे ते तहसीलदारांना सांगून काहीतरी व्यवस्था करतील.'

 त्यांच्या गँगमध्ये चांगल्या वीस-बावीस बाप्यांची गर्दी असूनही त्या गँगची तीच लीडर होती. सारे तिला ‘पाटलीण' म्हणत. कारण धीटपणे ती साऱ्यांशी बोलायची. हे संबोधन तिला सुखवायचं. त्याला कारणही तसंच होतं.

 गावचा जुना पोलिस पाटील दारूच्या पाई लोळागोळा होऊन मेला, तेव्हा प्रांत ऑफिसरनं तिच्या नवऱ्याला पोलिस पाटील केलं होतं.

 त्यांना स्वप्नातही असं घडेल असं वाटलं नव्हतं. कारण ते कैकाडी - भूमिहीन, मजुरीवर पोट भरणारे. सारजा व किसन दोघेही मिळेल तिथं मोलमजुरी करत. जेव्हा गावात व पंचक्रोशीत रोजगार हमीचं काम निघायचं, त्यावर ते जात. इतर वेळी शेतामध्ये किंवा दोन मैलांवर असलेल्या तालुक्याच्या गावी जाऊन किसन बसस्टॅडवर हमाली करायचा, तर ती गावीच सरपंच किंवा सावकाराच्या घरी वरची कामं करायची.

 पण नवीन प्रांतानं ही पोलिस पाटलाची जागा राखीव म्हणून भटक्या जमातीसाठी घोषित केली होती. किसन आठवी नापास होऊन शाळा सोडलेला. सहज गंमत म्हणून अर्ज केला आणि मुलाखत दिली. मग तो हे सारं विसरून गेला.

 जवळपास एका महिन्यानं त्याला नेमणुकीचं पत्र आलं आणि दोघांच्याही आनंदाला पारावार उरला नाही. त्या सबंध जिल्ह्यात कैकाड्याचा तो एकमेव पोलिस पाटील ठरला होता.

 आता मात्र त्याला मजुरीची, हमालीची कामं करायला नको वाटू लागलं होतं आणि प्रपंचाचा सारा भार तिच्यावर पडला. दोघांच्या श्रमानं कशीतरी तोंडमिळवणी

व्हायची, पण आता तिच्या एकटीच्या कमाईत कच्याबच्यांची पोटं भरता भरता जड जाऊ लागलं.

 किसनला मात्र पाटीलकीची मिजास चढली होती. आधीच्या पोलिस पाटलाचा दरारा व रुबाब तो पाहात होता. पण केवळ तो कैकाडी असल्यामुळे त्याला पोलिस पाटील करण्यात आलं होतं, हे गाव विसरायला तयार नव्हतं. परत आलेल्या पोलिस व महसूल खात्याच्या साहेबलोकांचा बंदोबस्त करणं त्याला पैशाअभावी जमत नसे. त्यामुळे गावचा तलाठी पण त्याला मान देत नसे.

 तरीही तो आपला नसलेला रुबाब सांभाळायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे त्याला आता पोटासाठी काम करणं कमीपणाचं वाटू लागलं होतं आणि त्या प्रमाणात सारजेवरचा प्रपंचाचा भार वाढत चालला होता.

 त्याला पोलिस पाटील म्हणून मानधन मिळायचं ते तुटपुंजे व तेही तीन महिन्यांतून एकदा. त्याच्यापेक्षा रोजगार हमी कामावरील सारजेची साप्ताहिक मजुरी जादा असायची.

 तरीही आपला नवरा पोलिस पाटील आहे, याचं तिलाही अप्रुप होतं. म्हणून तीही त्याचं काम न करणं सहन करायची.

 एकदा गावात चोरीची केस झाली होती. त्याच्या तपासाला फौजदार आले होते. त्यांना रात्री पहिल्या धारेची लागायची. तेव्हा त्यांनी किसनला बोलावून ती आणायचा हुकूम दिला. तो कचरला. खिशात तर दमडाही नव्हता. तेव्हा गावकोतवालानं त्याला बाजूला नेलं आणि सांगितलं,

 ‘आवं, असं वं कसं पाटील तुमी? जरा गस्त घालत जा. मंग कळेल गावात कोन कोन हातभट्टी लावीत असतो ते. चला माझ्यासंगट, म्या दावतो.'

 आणि कोतवालानं किसनला पोलिस पाटलाच्या परंपरागत अधिकाराची खऱ्या अर्थानं जाणीव करून दिली. त्या दिवशी फौजदार ढेर होऊन झोपल्यावर कोतवालाच्या हातानं त्यानंही पहिला प्याला घेतला.

 कोतवालाचा गुरुमंत्र किसनचं जगच पालटून टाकणारा ठरला. पाटीलकीच्या रुबाबावर त्याचं फुकट खाणं-पिणं निर्वेधरीत्या सुरू झालं.

 सारजाला दारू व मांस -मच्छीचा तिटकारा होता. कारण तिचं माहेर गेल्या कित्येक पिढ्या गळ्यात वारकऱ्याची माळ घालणारं व सचोटीनं जगणारं. तिच्यावर ती निरक्षर असली तरी हेच संस्कार झालेले.

 एकदा किसननं आलेल्या साहेबाच्या बंदोबस्तासाठी बकरे कापलं होतं. त्यातलं उरलेलं घरी आणलं अन् तो म्हणाला, “पोरास्नी दे, तेवढंच वशट खातील.'

 'हे इख हाय, इख ! मह्या घरात ते नगो...' तिनं स्पष्टपणे नकार देत ते टोपलं सरळ फेकून दिलं होतं.

 तेव्हाच आयुष्यात लग्नानंतर प्रथमच ते जिवाला जीव देऊन सुखानं जगणारं जोडपं कडकडून भांडलं होतं.

 गावात कामासाठी - मुक्कामासाठी पोलिस खात्याची वा महसूल खात्याची माणसं येणं म्हणजे किसनसाठी पर्वणी असायची. मस्तपैकी झणझणीत खाणं व भरपूर पिणं बाहेरच्या बाहेर व्हायचं. पण रोज कोण येणार? पुन्हा तालुका मोठा होता. इतर वेळी त्याला नशा अस्वस्थ - बेचैन करायची. जीभ वशट - झणझणीत कोंबडी - बिर्याणीला लसलसायची. त्याला मिळणारं मानधन मग वरच्या वर उडून जायचं.

 गावकऱ्यांच्या मनात असो वा नसो, त्यांचं पोलिस पाटलाशी काम पडतंच. हळूहळू किसननं आपला जम बसवला होता.

 पण त्याच्या पाटीलकीचे चटके सारजेला बसू लागले होते. एकेकाळी तिला पाटलीण हे सुखविणारं संबोधन आता नकोसं वाटू लागलं होतं.

 त्याचा घरात पाय ठरत नव्हता व तिला कामातून घराकडे पाहायला फुर्सद नव्हती. आई-बाप असूनही तिची पोरं उघडी पडली होती; पण केवळ हळहळ करण्यापलीकडे तिला काही करता येत नव्हतं. परिस्थितीचा रेटा तिला मन कठोर करायला शिकवत होतं.

 तिनं लगबगीनं सारं आवरतं घेत आणलं होतं, तेव्हा किसन जागा झाला होता त्यानं बाजेवरूनच ऑर्डर सोडली ‘च्या...!'

 ‘आदी तोंड तरी खंगाळून या धनी !'

 ‘नाय, म्या असाच च्या पिणार हाय...,' तो म्हणाला, “ही बड्या सायेब लोकांची पद्धत हाय म्हनलं...'

 आपला संताप आवरीत तिनं त्याच्यापुढे चहाचा कप ठेवला.

 ‘धनी, काय टाइम हो जाला?'

 ‘आता बग, आठ वाजूनशान इस मिंट जाली....' त्यानं घड्याळ पाहात म्हटलं. हे आकड्याचं चाळीस रुपयाचं घड्याळ त्यानं पहिल्या मानधनातून घेतलं होतं. ‘म्या पोलिस पाटील हाय. मला मोट्या मोठ्या मान्सात उठावं - बसावं लागतं. टाइम कळाया नगं?' हे त्याचं घड्याळ घेण्यामागचं स्पष्टीकरण तेव्हा तिलाही पटत्नं होतं.'

 “अगं बया, मला आता निगाया हवं. कामावर नऊ वाजेपर्यंत पोचाया हवं.' तिची अधीरता शब्दांतून प्रगट झाली.

 ‘मार गोली कामाला, सारजे...?' किसनचा रात्रीचा हँगओव्हर अद्यापही उतरला नसावा. अजूनही त्याची जीभ जडच होती. काहीसं अस्पष्ट व तुटक तो बोलत होता.

 ‘हे... हे, सोभत नाय तुला सारजे. अगं, तू पाटलाची बाईल हायस. सोड ते रोजगार हमीचं काम !'

 'मग खावं काय ? बिब्बा? का तुमचं कपाळ धनी?' भडकून ती म्हणाली, ‘पोलिस पाटील काय जालात तुमी अन् कमाई बंद जाली. म्या एकटीं मरते, तवा कुटं पोरं चार घास खात्यात... तुमाला वो त्याचं काय? बापय मानूस तुमी. पन् मला कसं जमेल ? म्या बाईल, पोराचं म्या नाय पाहानार, तर ती जातील कुठं?'

 'तू नगं कालजी करू. म्या बघतोना... म्या नाय कमी पडू देणार पोरास्नी?'

 ‘बघते ना म्या, तुमी पाटील जाल्यापासून....' तीही फुटकळपणे म्हणाली, ‘आदी आदी मह्यास्नीप छान वाटलं तुमी पोलिस पाटील झालात म्हनूनशान; पन् आता वाटतं, नाय जाला असता तर बरं व्हतं. ही झूटी शान नाय परवडणार आपल्यास्नी धनी. तुमी पण कामावर चला. आता मोठा बबन्या शाळेला जायच्या उमरीचा जालाय. त्येचा पाटी - पेनसिलीचा खर्च कसा झेपेल आपल्यास्नी? जरा इचार करा....

 ‘च्या मायला... सकालच्या पारी ही कसली भुनभून लावलियास सारजे?' तोही भडकून बोलला, “रातीचं इसरलीस वाटतं....!'

 मघापासनं सकाळचे प्रातःविधी आटोपण्यात, भाकरतुकडा करण्यात आणि अंग धुण्यात सारजा रात्रीची मारहाण विसरली होती.

 “कशी इसरेन? लई मर्दपणा दावला ना... तुमा बाप्यांना एवढंच करता येतं मर्दपणाच्या नावाखाली....! तुमाला काय वाटलं, म्या तुमाला रोकू शकले नसते? पन् काय करणार? तुमच्या नावाचे कुकू लावलंय ना, ते रोकतं, बाई, ते रोकतं.... पन एक शाप सांगते धनी, पुना असं व्हता कामा नये... एकदा जालं ते जालं....'

 तिचा तो कालीचा अवतार त्याला नवलाचा वाटला. चहा प्याल्यामुळे बुद्धी ताजीतवानी झाली होती आणि रात्री आपण अकारणच बायकोवर हात टाकला होता, हेही मनात येऊन गेलं त्याच्या.

 ‘म्या निगते आता. बाहेर कुटं उकिरडं फुकायला जानार नस्ताल तर पोरांकडे ध्यान द्या. भाकरतुकडा ठिवलाय तो खावा दुपारी.... आणि येळ असेल तर तालुक्याला जाऊनशानी तहसीलदारास्नी सांगा, रोजगार हमीची जवारीची कुपनं मोडण्यासाठी राशन दुकानदारास्नी सांगा म्हणावं. काल बाजार असूनशानी त्या मेल्यानं दुकान बंद ठिवल होतं.'

 हे काम त्याच्या आवडीचं होतं. साहेबलोकांना भेटण्यासाठी किसनला असं काही निमित्त लागायचं. ‘हां हां, म्या जाऊन भेटतो रावसाहेबास्नी. त्या दुकानदाराला झाडायला सांगतोच बग!'

 ती झपझप पावलं टाकीत कामाच्या दिशेनं जात होती. रोजगार हमीचं काम गावाच्या पूर्वेला दीड किलोमीटर अंतरावर होतं. वेळेवर जाण्यासाठी ती शिकस्त करीत होती.

 पण मघाचा उडालेला भडका अजून विझला नव्हता. तिचा स्वभावच होता संतापी. किसनलाही तिचा धाक वाटायचा. तिची जीभ फटकळ होती. म्हणूनच काल दारूच्या नशेत सदैव तिच्यापुढे पडत खाणाऱ्या किसनचा पुरुषीपणा उफाळून आला होता व त्याचा हात सैल सुटला होता.

 सारजा निरक्षर होती, पण विचार करायचा तिचा स्वभाव होता. काल नवऱ्यानं आपल्याला मारलं, हे तिला कुणाला सांगणं शक्य नव्हतं. कारण ते आम होतं. पण ते तिला पटत नव्हतं. ती म्हणायची,' आपून सारीजणं काम करतो, बाप्या गड्याइतकं कमावतो... कितीतरी घरं पायलेत, जिथं बाप्या गडी काम नाही करत बाईच करते. तिला गडीमानूस मारहाण करतो. कशाच्या जोरावर? कमावून आणतो तो खरा मरद गडी - इथं तर त्या बाईस्नी मर्द म्हनायला हवं.'

 तिचे हे अपरिचित विचार ऐकून तिच्याबरोबर कामाला येणारी मुलाण्याची अमिना खुसूखुसू हसत म्हणाली होती,

 'ये तो मैं वेगळंच सुनती हूँ. फिर तुझे भी तो मरदसिंग कहना चाहिए तेरा नवरा कहाँ काम करता है?'

 “वो क्यों करेगा ? तो पाटील हाय - पोलिस पाटील...!'

 सारजाला पड घेणं माहीत नव्हतं. तसंच आपल्या घरचं उघडे पाडणंही आवडत नसे. म्हणून तिनं नवऱ्याची पडती बाजू सावरून घेतली होती.

 तरीही तिच्या मनातून तो शब्द ‘मरदसिंग' जात नव्हता. अमिना काही खोटं बोलली नव्हती. आपला नवरा पोलिस पाटील झाल्यापासून काम करीत नाही, उगीच पोकळ शान मारत हिंडत असतो. झालंच तर दारू प्यायला व मांस - मच्छी खायला शिकला आहे. प्रपंचातलं लक्ष कमी झाले आहे, आयतोबा झाला आहे...!'

 तिची मात्र कामाच्या धबडग्यातून सुटका होत नव्हती. रोजगार हमीचं पाझर तलावाचं आठ घंट्यांचं उन्हातान्हात काम करायचं. पुन्हा घरी भाकरी थापायच्या, पोराचं करायचं. बाजारही आपणच करायचा. गेल्या महिन्यापासून गावातली पिठाची गिरणी बिघडली होती. त्यामुळे भरीस भर म्हणून घरी जातं सकाळी उठल्या उठल्या फिरवावं लागत होतं.

 वाटेत तिला अमिना भेटली. दोघी बोलत बोलत वेळेवर कामावर पोचल्या. सारजेला हायसं वाटलं. आज त्यांच्या गँगला इंजिनिअरनी नवीन साईट दिली होती. तिथली माती खोदून भरावावर टाकायची होती. हे काम मिळताच सारी गँग खुश झाली. कारण हे अंगावरचं काम होतं. जेवढं जोमानं काम होईल, तेवढी जादा मजुरी मिळणार होती. सारेजण कामावर तुटून पडले होते.

 दुपारच्या वेळी जेवणाची सुट्टी मुकादमानं जाहीर केली, तेव्हा जवळच्या झाडाखाली ती व अमिना भाकरीचं फडकं सोडून गप्पा मारीत जेवू लागल्या. मग त्यांच्यात म्हातारी बायजाबाईपण सामील झाली. ही तिथं कामावर सहा-सात स्त्रियांची तान्ही बाळं पाळणाघरात सांभाळीत राहायची.

 तितक्यात मुकादमाचा आवाज आला म्हणून त्यांनी भाकरतुकडा खायचं थांबवून विचारलं, 'काय वो मुकादम ? जरा दमानं खाऊ द्या की.'

 “अगं बायांनो बिगी बीगी आटापा. लाल दिव्याची मोटारगाडी आलीय. कुणीतरी साहेबलोक काम तपासायला आलेले दिसतात. चला - चला...'

 ‘आले तर येऊ द्यात !' सारजा पटकन म्हणाली, 'कुनीबी उटायचं नाय. ही आपली भाकरतुकडा खाण्याची वेळ हाय. थांबतील साबलोक.

 ‘और क्या देखते ये साबलोक ?' अमिना म्हणाली, 'गिनती करते, कितने मर्द हैं और कितनी औरते....'

 ‘आनी पगारपानी येळेवर मिळतं का? राशन दुकानावर कुपनाचं धान्य मिळतं का?' सारजानं पुस्ती जोडली होती, पण कदी हे नाय इचारत की, आमचं भागतं का? यवढ्या उनातानात राबावं लागतं, आमचं सुकदुक काय हाय?'

 आणि गाडीतून उतरत एक पोरसवदा तरुण मुलगी आपले माळरानावरील वायानं उडणारे केस सावरीत व डोळ्यावरचा गॉगल काढीत त्यांच्याकडेच येत होती.


 ‘बसा बसा... तुम्ही उटू नका. तुमचं जेवण होऊ द्या.' ती मराठीत पण कानडी ढंगानं बोलत होती, 'मी इथं तुमची विचारपूस करायला आले आहे.'

 तिच्यासोबत कामावरचे इंजिनिअर होते, ‘या शिकाऊ कलेक्टर आहेत. त्या काम कसं चालतं हे पाहायला व तुमच्याशी बोलायला आल्या आहेत.'

 'ठीक हाय, साहेब.' सारजा म्हणाली, 'आमी काय तमाशातले सोंगाडे. कुनी कुनी येतं पाहाया आमास्नी. पण आमालाबी दोन हात आन् दोन पायच दिलत देवास्नी म्हणावं.'

 'तसं नाही बाई. आज मी तहसीलदारांकडे बसले होते. तिथे इथल्या गावच पोलिस पाटील तक्रार घेऊन आले होते की, तुम्हाला कुपनावरचं धान्य मिळत नाही, मजुरी वेळेवर मिळत नाही. म्हणून विचारपूस करायला आले....'

 तिच्या आवाजातली कळकळ, मार्दव व तिचं स्त्रीत्व त्या साऱ्या कष्टकरी स्त्रियांना स्पर्शून गेलं. सारजा फटकन म्हणाली,

 'बया... बया, हे आक्रीतच म्हनायचं बया... आजच तकरार केली माह्या नवऱ्यानं आन् तुमी आला इचारपूस करायला?'

 तुमचे पतीराज पोलिस पाटील आहेत?'

 ‘व्हय बाईजी, म्याच त्यांना म्हनलं होतं, जाऊनशानी सांगा तालुक्याला. काल आम्हा साऱ्या बायांचा बाजार फुकट गेला. त्या भडव्यानं दुकान बंद ठिवले होतं.'

 " तुम्ही पाटलीण असून काम करता?'

 त्या प्रश्नानं सारजा अवाक् झाली. क्षणभर काय उत्तर द्यावं हेच तिला सुचेना. मग ती हलकेच म्हणाली,

 ‘बाईजी, काम तर आम्ही लगीन जाल्यापासून करतो - पोटासाठी. पन धनी पाटील जाले आन् काम करायची त्येंना सरम वाटू लागली. आता म्या एकटीच राबते...'

 ती बंगलोरहून या जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी आलेली आय. ए. एस. अधिकारी तरुणी अचंब्यात पडली होती.

 कामावर नव्वद टक्के स्त्रिया होत्या. त्याबद्दल तिनं विचारलं, तशी पुन्हा सारजा म्हणाली, 'बाईजी, तुमी कुटंबी जा, हेच दिसंल रोजगार हमीच्या कामावर बायाच जास्त असतात.'

 ‘पण का? पुरुषांना बाहेर काम मिळतं का?' ।

 ‘याची लई कारणं हायती...' जरा विचार करीत सारजा म्हणाली, 'तुमी म्हंता तसंबी हाय. तालुका जवळ हाय, तिथं गड्यास्नी जादा पैशावर कामं मिळतात. बरेच जण सालगडी म्हनूनशानी असतात... पन आणखी एक कारण हाय - ते आमा बायांसाठी भयंकर हाय बगा.'

 'ते कोणतं बाई?'

 ‘या रोजगार हमीमुळे गावातच काम मिळतं बायांना; मन् पुरुषाइतकी मजुरी पडते. कामबी हलकं असतं. नऊ ते पाच असं ठरलेलं असतं. म्हनूनशानी इथं बाया जास्ती येतात. त्यामुळे बगा, पुरुष गडी काम करीनात. आन् काम नसलं की दारू आली. गड्यांनी घरी बसून दारू प्यायची, बायकांना मारायचं आणि परपंचासाठी - लकीपोरांसाठी आमी बायांनी घरचं करून हे कामबी करायचं. परतेक मोट्या गांवामंदी दारूचे दुकान - हरेक वस्तीवर हातभट्टी लावलेली. म्या तर म्हंते बाईजी, दहामधले सात - आठ गडी दारू पितात आणि आमास्नी भाजतात बगा.'

 ती अधिकारी स्त्री अवाक् होऊन ऐकत होती. तिच्या प्रशिक्षणाच्या कालावधीत तिला काही ‘असाइनमेंटस' करायच्या होत्या. तिच्या मनाचा निश्चय झाला होता. 'रोजगार हमी कामाचा स्त्रीजीवनावरील परिणाम' हा एक विषय निश्चित झाला होता. त्यासाठी सारजा ही ‘टिपिकल केस स्टडी' होती!

 'बाईजी, म्या आंगठेबहाद्दर....' सारजा पुढे सांगत होती, ‘मह्यास्नी नीट बयजेपार सांगता येनार नाय, पन म्या इचार करते, लई इचार करते... हे असं का?

हे तसं का? असे सवाल म्या मलाच इचारते; पन् जवाब नाही सापडत. तुम्ही द्याल का याचा जबाब बाईजी?'

 इतका वेळ त्या दोघींचं संभाषण ऐकणारे इंजिनिअर पुढे होत म्हणाले, 'पुरे "बायांनो, किती बोलायचं?'

 ‘नाही, त्यांना बोलू द्या. मला कितीतरी नवीन कळतंय.' ती म्हणाली. तशी सारजा आपल्या मूळच्या फटकळ स्वभावाला अनुसरून म्हणाली,

 ‘पन काय उपेग त्येचा बाईजी? तुम्हास्नी कळलं की, आमा बायामानसांची अवस्था इपरीत हाय. पन आमाला काय? आमची परिस्थिती सुदरनार हाय थोडीच? तुमी काय थोड्या येळानं गाडीत बसून जाल, पुना आमी, आमचं काम, आमच्या पुरुषमानसाचं तेच दारू ढोसणं आणि बायांना मारणं...'

 ती नवीन अधिकारी वरमली होती. किती खरं म्हणाली होती सारजा! काय फरक पडणार आहे त्यांच्यात? आपण फार तर एक असाइनमेंट करू या प्रश्नावर. पुढे काय? ही सुद्धा यांची एक प्रकारे क्रूर थट्टा ठरणार आहे.

 'बरं ते जाऊ द्या, बाईजी; पन या सायबास्नी मजुरी येळच्या येळी द्याया सांगा ना. हातावरचं पोट आमचं. तसंच रासनपानी ठीक नाय... ते सुदिक सुदराना...'

 ती तरुणी आपल्या डायरीत नोटस् घेत होती व आपल्या कर्मचाऱ्याना सूचना देत होती. काही वेळानं ती गाडीत बसून निघून गेली.

 आणि इंजिनिअर शिर्केनी गाडी दिसेनाशी होताच रुद्रावतार धारण करीत सारजेला प्रश्न केला,

 'काय पाटलीणबाई? त्या कलेक्टरबाईपुढे जीभ फारच चुरचूर चालत होती. वाटलं, बाईमाणूस आहे, त्यांना तुमी सांगाल ते खरंच वाटेल...!'

 ‘म्या वो काय झूट बोल्ले? दोन हप्त्याची मजुरी परवा तुमी दिली. आनी कुपन पन उशिरानं वाटले. या दुस्काळात कंच्याबी घरी जा... दानापानी नाय हाय. कमावलं तरच पोट भरतं. म्हनूनशान मनाले...' सारजा किंचित नरम स्वरात म्हणाली. तिच्या अंतर्मनाला धोक्याचा इशारा मिळाला होता. हा इंजिनिअर भडकलेला दिसतोय. त्या बड्या सायेबिणीपुढे ह्याचा अपमान झाला. पुन्हा तिनं बोलणं म्हणजे अपमान वाटला असणार... त्यामुळे तिनं नमतं घेण्याच्या उद्देशानं हळू शब्दांत आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला. '

 ‘ते मला सांगता येत नव्हतं? तुम्हाला सवयच लागली कुणीही तपासणीला आलं की तक्रार करायची. इथं आम्हाला किती काम असतं हे तुम्हाला सांगून काय

उपयोग? बजेट मिळत नाही, तहसील ऑफिसमधून वेळेवर कुपन्स मिळत नाहीत.... पण नाही, तुम्हाला तक्रार करण्याखेरीज काय येतं? पुन्हा काम करायला नको तुम्हाला - मजुरी मात्र जास्त हवी.'

 मुकादमानं वेळप्रसंग ओळखून मध्यस्थीचा प्रयत्न केला.' 'जाऊ द्या साहेब, मी साऱ्यांना समजावतो. पुन्हा असं होणार नाही, हे नक्की.'

 ‘ते काही नाही. ही सारजा पाटलीण फार दिमाख दाखवते. तिचं नाव मस्टरवरून कमी करा. आपल्याला मजूर एवढे नकोत. क्वालिटी मेंटेन होत नाही.'

सारजा हादरली. आपलं नाव या मस्टरवरून पहिल्याच दिवशी कमी केलं तर पंधरा दिवस काम न करता राहावं लागेल. किमान शंभर - सव्वाशे रुपयांची मजुरी व आठ - दहा किलो धान्य बुडेल. काल जरा जादाच बाजारहाट केला. सारी शिल्लक संपली होती. काम न करता चालणार नव्हतं.

 'नाई सायेब, एक डाव माफी द्या. पुना आसं नाय कुनापुढे बोलणार... पण कामावरून कमी करू नगा.'

 ‘पण माझा किती अपमान झाला ठाऊक आहे?' शिर्केचा पारा अद्याप उतरला नव्हता. 'कोण कुठली शिकाऊ - प्रोबेशनर आय. ए. एस. बाई... मला चक्क सुनावते... आणि हे.... हे तुमच्यामुळे बरं का पाटलीणबाई? मुकादम, त्याचं नाव कमी करा व त्यांना जायला सांगा.'

 सारजानं कितीतरी विनवणी केली. आपल्या संतापी व लढाऊ स्वभावाला मुरड घालून शिर्केना विनवणी केली. कारण प्रश्न पोटाचा होता, पोरा-बाळांच्या भुकेचा होता. त्यासाठी स्वाभिमान कामाचा नव्हता.

 पण शिर्के ढिम्म हलले नाहीत. त्यांच्या झालेल्या अपमानाची धग त्यांना सारजेकडे कणवेनं पाहण्यापासून परावृत्त करीत होती.

 आपले जड झालेले पाय टाकीत, मणामणाचे जणू ओझे वागवीत सारजा घरी परतली. कसंतरी भाकरतुकडा खाल्ला आणि ढालजेतच ती विसावली.

 विचार करण्याची तिची वाईट खोड तिला परेशान करीत होती. तिचं अवसान गळालं होतं, ती निःस्त्राण झाली होती. एक काळी छाया तिचं मन व्यापून होती. त्या अवस्थेतच केव्हातरी तिचा डोळा लागला.

 ती जागी झाली ते किसनच्या आवाजानं. तिनं डोळे उघडून पाहिलं. तिन्ही सांज झाली होती. समोर रस्त्याच्या कडेला पोरं खेळत होती. किसनाच्या हातात बाटली होती.

 ‘सारजे, तो पारधी शेरू माजा यार हाय. तेनं आज ही बाटली फोकट दिली बग !'

 त्याला पाहताच तिचा संताप उफाळून आला आणि ती आपला सारा राग त्याच्यावर ओकू लागली. “तुमी सोताला पोलिस मनवून घेता ना? मंग जा सायबाकडे आन् सांगा, - सादं गाराणं मांडलं म्या त्या बाईसायबाकडे तर त्या शिर्क्यानं मह्यास्नी कामावरून कमी केलं. ही तर मुगलाई जाली. हा... हा अन्याव हाय. तो कमी करा. तुमी गावचे पाटील ना....'

 ‘बरं जालं तुजं काम सुटलं ते. नाई तरी म्या त्येच्या इरुद्धच व्हतो. अगं पाटलाच्या बाईलनं काम करणं मह्यास्नी सोभा देत नाय...'

 त्याच्या या प्रतिक्रियेमुळे जणू आगीत तेल पडल्याप्रमाणे तिच्या अंगाचा तिळपापड उडाला.

 ‘मंग खायाचं काय? तुमी कमावून आणणार?'

 क्षणभर तिच्या स्वरात व्याकुळता दाटून आली, ‘धनी, माजं आयका जरा... ही पाटीलकीची मिजास नाय परवडणार आपुनला. सोडून द्या आन् कामावर चला - जाऊ आपून जोडीनं - श्रम करू नि सुकानं दोन घास खाऊ... म्या.. म्या म्या. तुमची संगत हवी!'

 'जाली तुजी पिंगाणी पुन्हा सुरू?' किसनला तिच्या स्वरातली आर्तता जराही भिडली नव्हती. तो पोलिस पाटील बनल्यापासून बदलला होता हेच खरं. 'तुला काई सुदिक कवतिक नाय. पुन्या जिल्ह्यामध्ये म्या एकटाच कैकाड्याचा पोलिस पाटील हाय....! अगं, आब राखून वागावं लागतं. आसं मला कुठंशिक काम करून नाय चालणार...'

 ‘आवं पन घरच्या परपंचाला पैका लागतो, तो आनायचा कुठून?'

 ‘म्या पोलिस पाटील हाय. तसा चिक्कार पैका सुटतो रोब दावला की... ते सारं आता मला समजलंया...'

 ‘पण असा पैका वंगाळ हाय. म्या तेला इख मानते...!'

 ‘इथंच तर आपलं पटत नाय. आगं, सारे पाटील तेच करतात. म्या केल तर वंगाळ ठरतं? किसन म्हणाला, “कशापायी एवढं राबतेस सारजे? तू निवांत रहा घरी. म्या सारं दुरुस्त करतो. तू बगच...!'

 ‘पन धनी, हे हे वंगाळ वाटतं?' वारकरी संस्कार तिला किसनचं म्हणणं पटविण्यास असमर्थ होते.

 'तर मर तू. तुला सांगून काई उपेग नाही हे म्या वळखायला हवं होतं आदीच!' किसन म्हणाला, 'तू आणि तुंज काम. मला काई सुदिक सांगू नगंस...!'

 त्यानं बाटली तोंडाला लावली आणि खाटेवर आडवा झाला. त्याच्या घोरण्याकडे कितीतरी वेळ ती पाहातच राहिली - सुन्नपणे काय करावं हे न सुचल्यामुळे हतबुद्ध होऊन!

 थोड्या वेळानं तिच्या घरी मुकादम आला. तो म्हणाला, 'पाटलीणबाई, मी शिर्केसाहेबांची समजूत घातली. ते कबूल झालेत. तुम्ही उद्यापासून कामावर या. फक्त आज दुपारचा खाडा पडेल एवढंच.'

 'तू माजा धरमाचा भाऊ बनून आलास बाबा. बस, च्या टाकते, पिऊन जा. सारजेच्या मनावरचा मोठा भार उतरला होता. तिचा रोजगार बुडणार नव्हता. तिला नाइलाजानं नवऱ्याच्या विष वाटणा-या पैशावर पोटाची खळगी भरायची पाळी येणार नव्हती.

 दुस-या दिवशी ती कामावर, वेळेवर पोचली, सपाटून काम केलं आणि भाकरतुकडा खायला दुपारच्या सुट्टीत बसल्यावर अमिनाला म्हणाली.

 'अमिना काल ती सायबीण आली व्हती. तिनं इचारलं व्हतं - रोजगार हमी कामामुळे बायामाणसावर काय परिणाम जाला. तवा म्या मनलं व्हतं, पुरुष मानस आळशी बनलेत नि दारू ढोसायला लागलेत... आमा बायावरचं कामाचं वझं त्येच्यामुळे लई वाढलंय... ते तर खरं हायच, पण आजून एक मह्या लक्षात आलंय - ही रोजगार हमी नाय हाय. आम्हा बायास्नी - गरिबास्नी सायेबलोग कवाबी कामावरून काढू शकतात. इथं कामाची हमी नाय हाय... त्येच्या दयेवरच काम मिळणार, त्येंची मर्जी असंल तोवरच काम मिळणार. ही... ही रोजगार हमी नाय अमिना रोजगार हमी नाय... म्हणून जगण्याची, पोटापाण्याची पण हमी नाय हाय!'


☐☐☐