Jump to content

पाणी! पाणी!!/उदक

विकिस्रोत कडून
template error: please do not remove empty parameters (see the style guide and template documentation).



१४. उदक




 ‘किती वेळा सांगितलं सिद्धार्थ - करुणा की, उन्हात खेळू नका म्हणून. जा त्या झाडाखाली बसून खेळा. घरात पाणी नाही प्यायला, सांगून ठेवते. उन्हात खेळून तहान - तहान कराल!'
 प्रज्ञानं पुन्हा एकदा आपल्या उन्हात खेळणा-या भाच्यांना हटकलं व सावलीकडे पिटाळलं. काटेरी बाभळीच्या झाडांची सावली ती, तरीही रणरणत्या दुपारी उन्हात खेळण्यापेक्षा तिथं झाडाखाली बसून खेळलेलं त्यातल्या त्यात बरं, असा तिचा हिशोब होता.

 मघाशी त्यांना घागरीतून पाण्याचा शेवटचा पेला प्यायला दिला होता; कालपासून तांड्यावर टँकरचा पत्ता नव्हता. परवाही टँकरच्या चारऐवजी फक्त दोनच खेपा झाल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक घराला नेहमीपेक्षा अर्धच पाणी मिळालं होतं व ते मघाशी संपलं होतं. भाच्यांना पुन्हा तहान लागण्यापूर्वी पाणी यायला हवं आणि हे आपल्यालाच पाहायला हवं. दादा रोजगार हमीच्या कामावर भल्या पहाटे गेलेला आणि वहिनी केव्हाही बाळंत होऊ शकेल. कालपासून तिच्या वेणा सुरू आहेत. तिची पण कडक उन्हानं लाही होतेय. तिच्यासाठी वेगळं घोटभर पाणी राखून ठेवलंय.

 प्रज्ञा आपल्या झोपडीबाहेर आली. एका टेकडीवर वसलेला हा नवबौद्धांचा तांडा. पाच वर्षांपूर्वी इथं सवर्णांच्या बहिष्कारामुळे यावं लागलेलं. गावापासून दूर, उंच टेकडीवरील पठारावर. इथं चार - सहा जणांची नापीक व खडकाळ जमीन होती व

टेकडीची सरकारदरबारी गायरान म्हणून नोंद होती. इथं कसलीही सोय नव्हती, तरीही त्यांना इथं येऊन राहावं लागलं होतं - वेगळा तांडा करावा लागला होता.

 या टेकडीच्या दक्षिण टोकाला उभं राहिलं की अवघी पंचक्रोशी दिसते. खाली वसलेलं गाव एका दृष्टिक्षेपात नजरेत सामावतं. मात्र रस्ता नसल्यामुळे वळणावळणानं जावं लागतं. हाही रस्ता झाला तो टँकरच्या सतत येण्या - जाण्यामुळे पण खाचखळगे व दगडगोट्यांनी भरलेला हा रस्ता टँकरला पण सोसत नसे.

 टँकरचा लोचट ड्रायव्हर इब्राहिम एखदा हसत प्रज्ञाला म्हणाला होता, ‘मेरी जान, दूसरा कोई यहा टँकर नहीं ला सकता. ये बंदा ही सिर्फ ये काम कर सकता है, उसकी वजह भी सिर्फ तुम हो प्यारी - सिर्फ तुम!'

 त्याची ही सलगी प्रज्ञाला रुचत नसे, पण सहन करावी लागायची. कारण तो त्यांच्या तांड्याला जवळपास बारा महिने टँकरने पाणी पुरवायचा. या भागात पाणी लागत नाही, असं भूगर्भशास्त्रज्ञांनी पाहणी करून सांगितलं होतं. पर्याय म्हणून एक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित होती; पण अवघ्या सत्तर घरांसाठी एवढी मोठी योजना मंजूर होत नव्हती. तांड्याचे पुढारी किसन रणबावळे पंचायत समिती कार्यालयात खेटे मारून मारून थकले होते.

 तांड्याचं सारं अस्तित्वच मुळी टँकरच्या पाण्यावर अवलंबून होतं. तरी एक बरं होतं, गतवर्षी नव्यानं बदलून आलेल्या बी. डी. ओ. नं पाहणी केल्यानंतर टँकर बारमाही केला होता.

 बी. डी. ओ. च्या त्या भेटीत प्रज्ञानं त्यांना सांगितलं होतं ‘साहेब, हा तांड्यावर येणारा रस्ता तरी रोजगार हमीतून करून द्या... म्हणजे टँकर धडपणे वरपर्यंत येत जाईल. नाही तर आज अशी अवस्था आहे की, दोन-तीन दिवसाला एकदा टँकर कसाबसा येतो. वर येता येता बिघडतो - मग पुन्हा आमची पंचाईत. साहेब, पोटाला भूक दिवसातून दोनदाच लागते; पण या उघड्या माळावर व अशा प्रखर उन्हात पाणी पुन्हा पुन्हा लागतं. भाकरी कमवावी लागते. ती पुरेशी नसते, मग पाणी तरी घोटभर मिळावं साहेब!'

 बी. डी. ओ. अवाक् होऊन तिच्याकडे क्षणभर पाहात राहिले. मग म्हणाले, "बरोबर आहे, बाई तुमचं. मी कायमस्वरूपी पाणीपुरवठा स्कीमचा पाठपुरावा जरूर करतो. मग रोजगार हमीतून रस्ताही प्रस्तावित करतो तहसीलदाराकडे.' ब-याच

प्रयत्नांनी रस्ता मंजूर झाला होता; पण काम सुरू होऊन अवघ्या आठ दिवसांतच बंद पडलं होतं. कारण रस्त्याच्या जागी कठीण खडक होता व खडी फोडत रस्ता करणं जिकिरीचं काम होतं. जवळच बंडिगचं मेहनतीला कमी असलेलं काम सुरू होतं. तिथं सारे मजूर वळले व हे काम मजूर नसल्यामुळे बंद पडलं.

 प्रज्ञानं तांड्यावरील आपल्या भावाबहिणींना कितीदा तरी विनवलं होतं, 'हा रस्ता आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. हा तांडा इथं कायमस्वरूपी वसावा असं वाटत असेल, तर आपणच हे जिकिरीचं काम केलं पाहिजे. मला माहीत आहे, हे काम अवघड आहे. मजुरीही बंडिंगपेक्षा कमी मिळते. तरीही केलं पाहिजे. निदान पाण्याचा टॅकर वेळेवर नीटपणे यावा यासाठी हा रस्ता हवा!'

 तिच्या तांड्यावरील नवबौद्ध बांधवांना ते पटत नव्हतं थोडच? पण सतत मोलमजुरी करणाऱ्या व काळ्या हायब्रीडच्या भाकरीचं भोजन करणाऱ्या हाडात व पाठीशी गेलेल्या पोटानिशी जगणाऱ्या देहात मेहनतीचं काम करण्याची ताकद उरली नव्हती. पुन्हा आज रस्ता नसतानाही टँकर येत होताच; म्हणून त्याची तीव्रता जाणवत नव्हती.

 तांड्याचे नेते किसन रणबावळेनी तिची पाठ थोपटीत म्हटलं होतं, ‘बाबानू, ही पोर म्हंतेय ते समदं खरं हाय. ह्यो रस्ता व्हायलाच हवा. गावातले मजूर नाय येणार या कामाला... त्यांचा बहिष्कार हाय.. नाही!'

 ‘पण दादा, लय जिकरीचं काम हाय. अन् बंडिंगच्या कामावर मजुरीबी जादा मिळते....' एक म्हणाला.

 ‘आनी हे रस्त्याचं काम थोडंच पळून जातं? बंडिगचं काम झाल्यानंतर करूकी...' दुसऱ्यानं म्हटलं. आणि साऱ्यांनी मग 'हो हो, ह्ये बेस हाय.' असं म्हणत दुजोरा दिला व तो विषय तिथंच संपला. प्रज्ञा मात्र हताशपणे त्यांच्याकडे पाहत राहिली.

 किसन रणबावळे मग तिची समजूत काढीत म्हणाले होते. ‘ए जाऊ दे पोरी, तू नगं इतका इचार करू... इथं आल्यापासून मात्तर तू निस्ती रिकामी हायंस... या तांड्यावर मॅट्रिक शिकलेली एकमेव पोर तू... भीम्याच्या सौंसारात खस्ता खातीस... मह्या मनात हाय इथं एक बालवाडी सुरू करावी. तू इथल्या लहान पोरास्नी शिकवू शकशील....!'

 प्रज्ञाचे डोळे आशेनं लकाकले. ती म्हणाली, ‘दादा, खरंच असं होईल? गावात असताना माझी बालवाडी नीट चालायची. इथं मात्र जिल्हा परिषदेची ग्रँट हवी. कारण इथं फी कोण देणार?'

 'व्हय पोरी, म्या सभापतीशी बोललूया परवाच. ते म्हणाले, जरूर परयत्न करू!'

 तिच्या आई-बापाचा विरोध असतानाही भीमदादाच्या प्रोत्साहनानं ती मॅट्रिकपर्यंत शिकली. एवढेच नव्हे, तर चांगल्या दुसऱ्या श्रेणीत पास झाली होती. तिनं मग बालवाडीचा सर्टिफिकेट कोर्स करून गावातच समाजमंदिरात बालवाडी सुरू केली होती. ती चांगली चालत असतानाच बहिष्काराचं प्रकरण उद्भवलं.

 त्यावर्षी गावात दुष्काळामुळे पाणीटंचाई होती. अजून टँकर सुरू व्हायचा होता. गावात एक खाजगी विहीर होती जुन्या मालीपाटलाच्या मालकीची. तिला भरपूर पाणी होतं. त्यावर सारं गाव पाणी प्यायचं; पण नवबौद्ध व इतर दलितांना पाणी स्वतःहून घ्यायला पाटलाची मनाई होती. त्यांचे दोन नोकर प्रत्येक घराला एक घागर पाणी शेंदून द्यायचे. हे सुशिक्षित प्रज्ञाला खटकलं होतं, पण ती चूप होती. मात्र काही दलित लोकांना त्यांची चीड आली होती. एका सभेसाठी पँथरचे काही नेते औरंगाबाद - नांदेडहून आले होते. जेव्हा हा प्रकार त्यांना समजला, तेव्हा त्यांनी जाहीर सभेत मालीपाटलाचा निषेध केला व दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात मोठी बातमी छापून आली.

 त्यामुळे चिडून जाऊन पाटलानं आपल्या विहिरीचं पाणीच साऱ्या दलितांसाठी बंद करून टाकलं! याचा जाब विचारायला किसनभाई मिलिंद कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आपल्या भाच्यासमवेत पाटलाकडे गेले असता त्यांना शिवीगाळ करून पाटलानं हाकलून लावलं, ‘जा, ही माझी विहीर आहे. मी माझ्या मर्जीनं पाणी देतोय. तुम्हाला काय करायचं ते करा.'

 तेव्हा किसनभाऊच्या भाच्यानं सरळ तालुक्यात जाऊन पोलिस स्टेशनमध्ये पी. सी. आर. ची केस केली आणि दुसऱ्या दिवशी पाटलाला अटक झाली. सारा गाव दलितांविरुद्ध खवळून उठला. त्यांनी त्यांचं काम व मजुरी बंद केली. पिठाच्या गिरणीत दळण मिळेना, की गावाच्या दुकानात किराणा मिळेना. त्या बहिष्कारानं त्यांची चांगलीच कोंडी झाली.

 काही दिवस हा बहिष्कारही सहन केला; पण त्यामुळे जीवनगाडा चालेना. तशी त्यांनी पुन्हा आपल्या दलित नेत्यांना कल्पना दिली. त्याला पुन्हा वृत्तपत्रात मोठी प्रसिद्धी मिळाली. समाजकल्याणमंत्र्यांचा दट्टया आला व तहसीलदार गावात आले. त्यांनी शांतता समितीची बैठक घेऊन बहिष्कार उठविण्याचे आवाहन केलं. त्याला सवर्णांनी तोंडदेखला होकार भरला. पूर्वीइतका नाही, पण काही प्रमाणात का होईना बहिष्कार राहिलाच. शेतीत मजुरीचं काम आधी इतरांना द्यायचं; फारच गरज पडली तर दलितांना बोलवायचं. एकाही दलिताला उधारीवर माल द्यायचा नाही... अशा पद्धतीनं कोंडी चालूच होती.

 ही कोंडी फुटावी कशी? हा प्रश्न किसनभाऊंना व प्रज्ञाला पडायचा. त्यांची खलबतं, चर्चा व्हायची. कारण मुळातच गावात भीषण पाणीटंचाई होती व पाटलानं आपली खाजगी विहीर शासनानं पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित करू नये म्हणून कोर्टाचा स्टे आणला होता. तिथं आता कुणाला हक्कानं पाणी भरता येत नव्हतं. पाटलाच्या मर्जीनं आजही सवर्णांना पाणी मिळायचं, पण दलितांना व विशेषतः नवबौद्धांना तो स्टे दाखवायचा व साळसूदपणे नकार द्यायचा. त्यामुळे काही करणं अवघड झालं होतं. त्यातूनच ही स्थलांतराची कल्पना पुढे आली. त्यांना निर्णय घेणे कठीण नव्हते. कारण कुणाचीच घरे पक्क्या स्वरूपाची नव्हती. साऱ्यांचीच काडाची पालं होती. एका दिवसात त्यांनी आपला कुटुंबकबिला व खटलं या उजाड पठारावरील माळरानावर हलवलं.

 प्रज्ञाला आताही हे सारं क्षणार्धात आठवलं आणि अंगावर काटा आला. केवढी जीवघेणी लाचारी! केवळ मागास जमातीचा कपाळी शिक्का म्हणून? का त्यातही आपले बांधव शिकत आहेत व मुख्य म्हणजे संघर्ष करीत आहेत- त्याची ही शिक्षा?'

 तिनं एक दीर्घ निःश्वास टाकला व पंचक्रोशी न्याहाळू लागली. दुपारच्या झगझगत्या उन्हात दूरवरही कोठे टँकर दिसत नव्हता. तिच्या पोटात भीतीचा गोळा सरकून गेला... कसे होणार रमावहिनीचं?

 आत झोपडीतून सतत विव्हळण्याचा स्वर येत होता. प्रज्ञाची वहिनी रमा अडली होती. कालपासून वेणा सुरू होत्या; पण अजून मोकळी झाली नव्हती. खरं तर प्रज्ञानं भीमदादाला अनेक वार म्हटलं होतं, जवळच जवळा बाजार आहे. तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रमाला डिलिव्हरीसाठी दाखल करावं म्हणून पण तिथं

जाण्यासाठी सध्या एस. टी. नव्हती; कारण मधल्या पुलाचे काम चालू होतं म्हणून बंद पडलेली एस. टी. सुरू झाली नव्हती. त्यामुळे न्यायचं कसं हा प्रश्न होता.

 तांड्यावर कुणाकडेही बैलगाडी नव्हती व गावात मागूनही बैलगाडी मिळणं शक्य नव्हतं. हे माहीत असूनही प्रज्ञानं भीमदादाला गावात जाऊन पाहण्याचं सांगितलं. तसा तो अनिच्छेनंच गेला होता. अनेक शेतक-यांना भेटला होता. त्यांना एक दिवस बैलगाडी देण्यासाठी विनवलं होतं. पण छे! त्याला निराश होऊन परतावं लागलं होतं. गाव सोडलं तरी अढी व छुपा बहिष्कार कायम होताच.

 प्रज्ञाला काळजीत पडलेलं पाहून रमावहिनीनं स्वतःहून आपल्या कळा कशाबशा सहन करीत म्हटलं होतं, 'तुमी कायसुदिक इचार करू नका ननंदबाई... इतं आपल्या तांड्यावर सोजर मावशी हाय की सुईण. तिला तेवडं बोलवा म्हंजे झालं. म्या नीट बाळंत व्हते. काही गरज नाही दवाखान्यात जाण्याची!'

 प्रज्ञाला ते पटलं नव्हतं, पण काही इलाजही नव्हता. 'ठीक आहे. पण दादा, आज तू कामावर जाऊ नकोस.'

 "नाही प्रज्ञा, आज पगारवाटप आहे. एक महिन्यापासून जे. ई. साहेब नसल्यामुळे वाटप झालं नाही. मला गेलंच पाहिजे. कारण पैसा नाही तर घर कसं चालणार?' असे म्हणून तो कामाला निघून गेला होता.

 सोजरमावशी रमा वहिनीजवळच बसून होती. तिच्या ओटीपोटाला मालिश करीत होती, वेणा काढीत होती व प्रज्ञाला धीर देत होती.

 पण अठरा - वीस घंटे झाले तरी सुटका होत नव्हती. त्यामुळे प्रज्ञाचा जीव करवदला होता.

 त्यातच मघाशी सोजरमावशीनं सांगितलं होतं की दोन बादल्या पाणी पाहिजे म्हणून... कडक गर्मीचा रमाला त्रास होत होता. सारं अंग तापलं होतं. तिचं अंग थंड पाण्यानं सतत पुसणं भाग होतं. झालंच तर बाळंतपणानंतर स्वच्छतेसाठी व बाळाला आंघोळ घालून स्वच्छ करण्यासाठी पण पाणी हवं होतं.

 मोठ्या मुश्किलीनं साठवलेलं अर्थी बादली पाणी मघाशी संपून गेलं होत. प्रज्ञानं तांड्यावरील दोन - चार घरांतून तांब्या - तांब्या पाणी जमा करून कसंबस आणखी अर्धी बादली पाणी जमा केलं होतं. पण रमावहिनीचं अंग तापानं तप्त झालं होतं. तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवणं व अंग पुसून घेणं आवश्यक

होतं. त्यातच हेही पाणी संपणार हे उघड होतं. ते संपल्यावर मात्र थेंबभर पाणी मिळणंही मुश्किल होतं.

 पुन्हा एकदा बाहेर येऊन प्रज्ञानं पंचक्रोशी न्याहाळली. “आता टँकर आलाच पाहिजे, आलाच पाहिजे!' ती स्वतःशीच पुटपुटली. एका नव्या जीवासाठी बादलीभर पाणी हवं होतं. आणि ते मिळणं किती कठीण झालं होतं! यात जसा निसर्गाचा हातभार होता, तसाच जातीच्या शापाचा, लाल फितीचा व बेपर्वाई अनास्थेचाही वाटा होता.

 कितीही शिकस्त केली तरी विचार करू शकणारं प्रज्ञाचं मन एकाच वेळी क्षुब्ध व अगतिक व्हायचं. जातीमुळे गावकुसाबाहेरचं निकृष्ट जिणं. संघर्ष केला, आवाज उठवला म्हणून बहिष्कृत होणं, याच्या जोडीला पोटाची विवंचना. आणि या सर्वात भीषण बाब म्हणजे पाण्याची समस्या - जिनं आज जीवन मरणाचं स्वरूप धारण केलं होतं.

 रमावहिनीसाठी ती व्याकूळ होती. तिच्यावर प्रज्ञाचा फार जीव होता. कारण रमावहिनीनं तिला भीमदादाच्या संसारात आल्यापासून मुलीप्रमाणे वागवलं होतं व नवयाच्या बरोबरीनं तिनंही प्रज्ञाला शिकण्यासाठी उत्तेजन दिलं होतं. एवढं शिकून - सवरून प्रज्ञानं रिकामं घरी बसावं व तिला काही काम मिळू नये, याची रमावहिनीला सर्वात जास्त खंत होती.

 आज तिची लाडकी रमावहिनी जीवन - मरणाच्या सीमारेषेवर तळमळत होती. तिचा ताप वाढत होता. हात लावला तरी चटका बसावा एवढे अंग तापलं होतं. सोजरमावशीजवळ ताप कमी करण्यासाठी गवती चहाखेरीज कसलाच उपाय नव्हता व तो चहा या तांड्यावर उपलब्ध नव्हता. सकाळी प्रज्ञा तंगडेमोड करून जवळाबाजार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गावात असलेल्या सबसेंटरला गेली होती; पण तिथं भलंमोठं कुलूप पाहून तशीच परत आली होती. नर्स भेटली असती तर निदान चार गोळ्या तापासाठी मिळाल्या असत्या व तिला घेऊन येता आलं असतं रमावहिनीची तब्येत दाखवायला; पण सबसेंटर कधीतरी उघडं असतं. कारण नर्स तालुक्याला राहते.

 सोजरमावशी निष्णात सुईण खरी; पण तीही गंभीर झाली होती. 'प्रज्ञा, पोरी, लई अवघड केस हाय तुझ्या वहिनीची. म्या शिकस्त करतेय पन् तिचा ताप

 कमी व्हत नाही. त्यासाठी औवशुद हवं. ते नाही तर पानी तरी हवं. अंग, पुना पुना पुसलं तर ताप कमी व्हईल. जा पोरी, पानी बघ पानी.'

 त्यामुळे आज - आता पाण्याचा टँकर यायला हवा होता. प्रज्ञा कितीतरी वेळ तशीच उभी होती.

 ...आणि तिच्या नजरेला दुरून येणारा पिवळा ट्रक उन्हामुळे झगमगताना दिसला. होय, हाच पाण्याचा टँकर आहे! ट्रकवर पाण्याची टाकी फिट करून त्याचा टँकर म्हणून उपयोग खातं करीत होतं.

 आता दहा मिनिटात टँकर तांड्यावर येईल आणि मग आपण रांजणभर पाणी भरून घेऊ... वहिनीचं सारं अंग थंड पाण्यानं पुसून काढू म्हणजे तिचा ताप झटकन उतरेल आणि ती सुखरूप बाळंत होईल व नव्हा बाळाला आंघोळ घालून स्वच्छ करता येईल.

 प्रज्ञा एकटक खालून वर तांड्यावर येणा-या ट्रककडे पाहत होती. एक एक क्षण तिला प्रदीर्घ वाटत होता.

 आणि तो ट्रक वर येईचना. प्रज्ञानं डोळे चोळून पुन्हा पाहिलं. तो वाटेतच रस्त्यावर थांबला होता.

 'तो ट्रक बिघडला की काय?' हा प्रश्न तिच्या मनात चमकला आणि तिच्या पोटात पुन्हा एकदा भीतीचा गोळा आला.

 आणि ती बेभान होऊन, पायात चपला नाहीत हे विसरून तशीच वेगानं धावत खाली जाऊ लागली. आणि दोन मिनिटात धापा टाकीत, ठेचा खात, अडखळत जेव्हा ती ट्रकजवळ आली, तेव्हा तिथं ट्रकला टेकून इब्राहिम शांतपणे विडी फुकीत धूर काढीत उभा होता.

 'मेरी जान, परेशान लगती हो! क्यात बात है?' लोचटपणे इब्राहिम तिचा उभार बांधा आसक्त नजरेनं न्याहाळीत म्हणाला.

 जेव्हा जेव्हा इब्राहिम विखारी नजरेनं प्रज्ञाला पाहायचा, तेव्हा तिला वाटायचं, तो नजरेनंच आपल्याला विवस्त्र करून उपभोग घेतोय. तिच्या मणक्यात एक थंड असह्य स्त्रीत्वाची भीती चमकून जायची, पण तिला फारसा विरोधही करता येत नसे. कारण त्यानं एनेकदा गर्भित धमकी दिली होती,

 ‘प्यारी, इस तांडे पे ट्रक-टैंकर लाना बडी जोखीम भरी बात है. दूसरा कोई ड्राइवर यहा नही आता. सिर्फ मैं आता हू तो तुम्हारे लिए. तुम पे दिल जो आ गया

 जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिच्याशी तो लगट करायचा. प्रज्ञाला त्याच्या विषयांध स्पर्शाची घृणा - किळस वाटायची तरीसुद्धा त्याला झिडकारता पण येत नसे. त्याची माफक लगट तिला कौशल्याने - तारेवरची कसरत करीत अंतर राखीत सहन करावी लागायची.

 पळत आल्यामुळे प्रज्ञाला धाप लागली होती व तिची उभार छाती वर-खाली होत होती. त्याकडे एकटक इब्राहिम पाहत होता. हे तेव्हा तिच्या ध्यानी आलं, तेव्हा ती शहारली व छातीवर हात घेत तिनं विचारलं,

 “काय झालं ड्रायव्हर साहेब? टँकर बंद पडला का?'

 'वैसाच बोलना पडेगा... रेडिएटर में फॉल्ट है... पानी ठहरताच नहीं. इंजन इस वजह से गरम हो गया है. फटने का डर है.' इब्राहिम जे सांगत होता, त्याला तिला अर्थबोध होत नव्हता; पण एवढे कळत होतं, की टँकर बंद पडला होता.

 ‘पाण्याची लई जरुरी आहे, ड्रायव्हरसाहेब. माझी वहिनी बाळंत होतेय, तिला ताप चढलाय. प्लीज, काहीतरी करा व ट्रक वर आणा ना. माझ्यासाठी. कळवळून प्रज्ञा म्हणाली.

 “तेरे लिए जान भी हाजिर है.' इब्राहिम नाटकी ढंगात म्हणाला, “लेकिन थोडा ठहरना पडेगा. इंजन ठंडा होने दो... अभी मैंने रेडिएटर में पानी भरा है... कुछ समय रुकना पडेगा...'

 तिनं सुटकेचा एक निःश्वास टाकला. 'म्हणजे ट्रक फारसा बिघडलेला नाही. वर येऊ शकेल...!'

 ‘तब तक क्या ऐसे ही धूप में खड़ी रहोगी? नहीं प्यारी, तुम मुरझा जाओगी.' इब्राहिमचं हे लागट बोलणं तिला सहन होण्याच्या पलीकडे होतं, पण चूप बसणं ही या क्षणी तिची मजबुरी होती, असहायता होती.

 ‘मला... मला सवय आहे, ड्रायव्हरसाहेब त्याची.'

 ‘लेकिन मुझसे देखा नहीं जाता. चलो, ट्रक में बेठते है.' त्याच्या सूचक बोलण्यानं प्रज्ञाचं स्त्रीत्व नखशिखांत थरकापलं. त्याला नाही म्हणणं म्हणजे आपल्या

हातानं पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं होतं. न जाणो, तो ट्रक घेऊन वर येत नाही म्हणाला तर.. तिच्या नजरेसमोर तळमळणारी व प्रसूति वेदना सहन करणारी रमावहिनी आली, तिचं तप्त पोळणारं शरीर आठवलं आणि सोजरमावशीचे शब्द - ‘पोरी, दोन बादल्या पानी हवं. काय बी कर, लय गरज हाय तेची... ह्या रमेचा ताप वाढतुया. तो कमी करण्यासाठी पानी हवं... नाय तर मला इपरीत व्हण्याची भीती वाटते...'

 ड्रायव्हरनं तिला हात देऊन ट्रकच्या केबिनमध्ये खेचलं. त्यावेळी कौशल्यानं त्याने तिला एक झटका दिला व हात सोडला, तशी बेसावध प्रज्ञा त्याच्या अंगावर कोसळली. त्यानं संधी सोडली नाही व तिला गच्च मिठी मारली.

 इब्राहिमच्या कित्येक दिवस आंघोळ नसलेल्या, घामेजलेल्या, वास मारणाऱ्या शरीराचा दर्प प्रज्ञाच्या अंगांगावर किळस पेरून गेला. ती आक्रसली गेली व म्हणाली, ‘ड्रायव्हरसाहेब, हे... हे बरं नाही. प्लीज, मी फार परेशान आहे... माझी वहिनी तिकडं तडफडतेय, प्लीज. लवकर गाडी सुरू करून पहा.'

 'ठीक है मेरी जान. मैं कोशिश करता हूँ.

 त्यानं तिच्यापासून अलग होत म्हटलं आणि स्टिअरिंग हाती घेऊन चावी फिरवायला आरंभ केला. ट्रक नुसताच दोन-दीनदा गुरगुरला व थांबला. 'नहीं प्यारी, अभी इंजन गरम है. ठहरना पडेगा....।

 ते कितपत खरं होतं कोण जाणे; पण प्रज्ञानं कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. एक एक क्षण तिच्यासाठी जीवघेणा होता. वहिनीच्या काळजीनं जीव कसनुसा होत होता, तर ट्रकमध्ये इब्राहिमची शारीरिक लगट तिच्या स्त्रीत्वाचे लचके तोडीत होती. तरीही तिला ते निमूटपणे सहन करावं लागत होतं.

 पुन्हा इब्राहिम तिच्याजवळ सरकला. त्याचा राकट हात तिच्या देहाचे वळसे व वळणं शोधू लागला, चाचपू लागला. तसा तिनं प्रतिकार केला, ‘नको, नको, हे बरं नाही ड्रायव्हरसाहेब..."

 ये प्यार - मोहब्बत है मेरी जान... हम दोनो जवान हैं और ऐसा तनहा मौका बार बार नहीं आता!' त्याच्या स्वरातून वासनेची प्रच्छन्न लाळ गळत होती.

 'पण तिकडं माझी वहिनी मरणाच्या दारात आहे. प्लीज, माझं मन नाही ड्रायव्हरसाहेब...'  इब्राहिम काही क्षण तिला आरपार न्याहाळीत राहिला व मग गुरकावीत म्हणाला, 'ठीक है, ये ट्रक फिर वापस जायेगा. ऊपर नहीं आयेगा. इसमें इतने फॉल्ट है कि, मैं ही सिर्फ उसे चला सकता हूँ। ये जोखीम मैं सिर्फ तुम्हारी मोहब्बत की खातिर उठाता हूँ, समझी! तुम नहीं चाहती हो तो...

 ‘नाही, नाही... माझ्या बोलण्याचा तो मतलब नाही ड्रायव्हरसाहेब...' प्रज्ञा म्हणाली, 'मी - मी, मला - मला....'

 ठीक है, कुछ बोलने की जरूरत नहीं है प्यारी....

 इब्राहिमनं तिची असहायता पुरेपूर ओळखली होती. एक कुंवार स्त्री त्याला विनासायास मिळत होतं - केवळ पाण्यासाठी. 'वाह रे मालिक, अजीब दस्तूर है तेरा!'

 पण या रस्त्यावर व यावेळी त्याची अभिलाषा पूर्णपणे पुरी होणं शक्य नव्हतं, तरीही तिच्या शरीराशी त्याला मनसोक्त खेळता आलं. दहा मिनिटे का होईना तिला मिठीत घेऊन तिचा कुंवारा गंध त्याला लुटता आला.

 या दहा मिनिटात एक स्त्री म्हणून ती पुरुषाच्या पशुरूपाच्या दर्शनाने अनेकवार जळून खाक झाली होती. तिच्या मनात एवढा संताप, एवढी अगतिकता दाटून आली होती, की तिला शक्य असतं तर तिनं इब्राहिमचा कोथळा फाडला असता, त्या ट्रकला आग लावली असती आणि मनसोक्त रडली असती. आता इब्राहिमनं तृप्त मनानं चावी फिरवताच ट्रक चालू झाला व दोन - तीन मिनिटात तो तांड्यावर आला.

 सारे जण ‘पाणी आलं - पाणी आलं' म्हणून धावू लागले; पण इब्राहिमनं प्रथम तिला पाणी भरून घ्यायला सांगितलं. तिनं क्षणापूर्वीचं सारं विसरून उत्साहानं दोन्ही रांजण पाण्यानं भरून घेतले. तो पाईपमधून पडणारा पांढराशुभ्र फेसयुक्त जलौघ पाहून तिचे डोळे व काही प्रमाणात मनही निवून निघालं.

 पाणी भरून होताच ती आपल्या झोपडीकडे धावली आणि दारातच सोजरमावशी गुडघ्यात तोंड खुपसून बसलेली पाहिली... आणि प्रज्ञा थरकापली.... मनात एकाच वेळी अनेक पापशंका चमकून गेल्या.

 'मावशे, मावशे, काय झालं?'

 ‘पोरी...' मान वर करीत थरथरत्या आवाजात सोजरमावशी म्हणाली, 'लई येळ झाला. रमाचा ताप तू गेल्यावर वाढतच गेला,... आनी तिला वाताचे झटके आले... आनी पोराला जनम देताच तिनं डोळे मिटले....' ।

 ‘नाही, नाही... माझी रमावहिनी मला सोडून जाणार नाही...' बेभानपणे प्रज्ञा म्हणाली.

 ‘पोरी, सुदीवर ये... सम्दं संपलंय गं... म्या लई कोशिश केली... पानी जर असतं तर रमाचा ताप कमी करता आला असता...' सोजरमावशी म्हणाली.

 “बरं, बाळ कसा आहे त्याला पाहायचंय!'

 ‘चल पोरी, त्योबी निपचित पडलाय. जन्मल्यापासून तेचं आंगबी तापलंय बघ.' सोजर म्हणाली.

 'एक बादली पानी घे. बाळास्नी आंगूळ घालू... म्हंजे तेची तलखी कमी व्हईल बघ...!'

 ती धावतच गेली. रांजणात बादली बुडवून ती घेऊन आली.

 ते नुकतंच जन्माला आलेलं मूल निपचित पडलं होतं. छातीचा भाता वेगानं वर-खाली होत होता. त्याला ते सहन होत नसावं. मधूनच वेदनायुक्त हुंकार तो देत होता.

 तिनं आपला पदर पाण्यात बुडवला आणि बाळाचे अंग पुसू लागली. तो थंड पदर अंगावरून फिरताना बाळ झटके देत होता... तिचं लक्षच नव्हतं. ती बेभानपणे थंड पाण्यानं त्याचं अंग पुसत होती.

 आणि सोजरमावशीनं गळा काढला, 'थांब पोरी, काईसुदिक उपयोग नाही जाला याचा... पहा पहा, याचे हात-पाय थंड पडत आहेत...

 “अगं मावशे, मग हे ठीकच आहे की, त्याचा ताप उतरतोय...'

 'नाही पोरी, हे इपरीत वाटतंया...' मावशी म्हणाली, तसं किंचित भानावर येत प्रज्ञानं बाळाकडे पाहिलं. त्याच्या छातीचा वर - खाली होणारा भाता बंद पडला होता... त्याचा हात तिनं हाती घेऊन पाहिला आणि तिच्या हातातून तो निर्जीव बनलेला हात गळून पडला.

 तिचा चेहरा आक्रसून दगडी बनला होता....

 ‘पोरी, नको तेच झालं बग. रमाबी गेली आनी बाळबी गेलं गं... सोजरमावशीचे हुंदकेही घुसमटले होते.

 प्रज्ञा मात्र तशीच निश्चल बसून होती. किती वेळ कुणास ठाऊक!

 भानावर येताच ती लगबगीनं उठली. प्राणपाखरू उडून गेलेल्या आपल्या प्रिय रमावहिनीच्या व नवजात अर्भकाच्या कलेवराकडे तिनं एकवार डोळाभरून पाहिलं व ती बाहेर आली.

 ट्रक निघून गेला होता. साऱ्यांचं पाणी भरून झालं होतं.

 ती आपल्या झोपडीजवळील पाण्याने भरलेल्या रांजणाजवळ आली आणि बादलीनं पाणी घेऊन ती आपल्या शरीरावर उपडी करू लागली व सचैल न्हाऊ लागली. एक रांजण पाणी संपून गेलं, तरी बेभानपणे ती न्हातच होती.

 सोजरमावशीनं तिला कळवळून विचारलं, 'पोरी, हे काय करतेस गं? भानावर ये...'

 ‘मी, मी... माझ्या देहाचं उदक दिलं पाण्यासाठी... माझी वहिनी बरी व्हावी व बाळाला जीवन लाभावं म्हणून. पण दोघंही मला सोडून गेले. आता हे उदक, हे पाणी डोईवर घेऊन सचैल न्हातेय त्यांच्यासाठी; आणि... आणि या देहाचा ओंगळपणा जाण्यासाठी...!'

 आणि बोलता बोलता तिचा स्वर कापरा झाला, मन व डोळे दोन्ही पाझरू लागले आणि तशीच ती सोजरमावशीच्या दुबळ्या मिठीत कोसळली...

 ‘मावशे... मावशे...!"

☐☐☐




लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या कथासंग्रहात शेती, शेतकरी, पाणी टंचाई, गावगाडा आणि शासकीय यंत्रणेसंबंधी परवडीच्या कथा आहेत.

आज उजाड होत चाललेली खेडी आणि तिथल्या माणसांचे जिकरीचे जगणं लेखकाने विविध कथांतून समर्थपणे मांडले आहे.

आज पाणी प्रश्नाने सर्वांची झोप उडविली आहे. अशा वेळी श्रीमंत धनलांडग्यांनी गरीबांचे पाणी तोडणे, फळबाग योजनांचा मलिदा फक्त काहींच्या पदरी पडणे, रोजगार हमी योजनेत घाम गाळणाच्या स्त्री जातीची होणारी घुसमट, भूकबळी झालेल्या ठकूबाईना कागदपत्रांच्या आधाराने आजारी ठरविणे, सर्व मार्गानी पैसा कमावण्याची सर्वच क्षेत्रातील माणसांना चढलेली नशा, दोन घोट पाण्यासाठी म्हातारीला जीव गमवावा लागणे, पाण्यापेक्षाही गावाच्या आरोग्याची परवड होणे आणि सर्वच क्षेत्रातील ध्येयवाद्याची आज होणारी गोची, हे एक समान कथासूत्र लेखक विविध कथांतून सांगत आहेत.

एका अर्थाने ही आजच्या ग्रामीण भागाच्या वर्तमानाची कथा आहे. सर्वत्र बिघडत चाललेल्या परिस्थितीमध्येही काही ध्येयांची हिरवळीची बेटंही आहेत आणि तेच समाज जीवनाला जिवंत ठेवण्याचे काम करत असतात. हे जीवनमूल्य लक्ष्मीकांत देशमुखांच्या कथासंग्रहाचे वेगळेपण आहे.

- ना. धों. महानोर