Jump to content

परिपूर्ती/महार आणि महाराष्ट्र

विकिस्रोत कडून


१२
महार आणि महाराष्ट्र

महाराष्ट्रातील प्रत्येक गावी मराठे असलेच

पाहिजेत असा काही वर्षांपूर्वी माझा समज होता.
पण मराठे नाहीत, अशी कित्येक गावे मी पाहिली
आहेत. मराठ्यांपेक्षा कुणबी जास्त ठिकाणी
आढळतात. पण इतर कोणतीही जात घेतली तरी
सार्वत्रिक वास्तव्याबाबत महारांची सर दुसऱ्या
कोणत्याही जातीला नाही. महार बहुसंख्य
कोठेही नाहीत. पण महारांची वसती मुळी नाहीच
अशी गावे मला अजून आढळली नाहीत.
 हे महार आहेत तरी कोण? हे एक कोडेच
आहे. ते काय महाराष्ट्रातील अतिपूर्वीचे
आदिवासी आहेत? उत्तरेकडील संस्कृत भाषा
बोलणाऱ्यांनी महाराष्ट्राची वसाहत केल्यावर
काय ह्या आदिवासींना आपले गुलाम बनवले व
ते हे महार आहेत? का ते दक्षिणेकडून आलेल्या
कैकाडी, रामोशी, वडार, वगैरे जातींपैकी
आहेत? ह्या दोन्हीही गोष्टी मला संभाव्य दिसत
नाहीत. महाराष्ट्रातील अर्धवट रानटी जातींचा
संबंध जंगलाशी आहे. त्यांचे पोटही काही अंशी
जंगलाच्या देणगीवर व जंगलाच्या कामावर
अवलंबून आहे. तसे महारांचे मुळीच नाही. बरे

भटक्या जातीतही त्यांना घालता येत नाही.
८२ / परिपूर्ती
 

त्यांच्या पायाला चाक बांधलेले असते व त्यांच्याइतकी पायपीट खेड्यात दुसरे कोणी क्वचित करीत असेल, पण ही सर्व भ्रमंती गावकामगार म्हणून असते. भटक्या जाती आज येथे तर उद्या तेथे अशा असतात, फक्त पावसाळ्यात त्यांचा मुक्काम एके जागी असतो. पण महार आपापल्या गावचे पिढीजात रहिवासी असतात. इतके असूनही महारांना नांगरटी फारशी माहितीच नाही. गावात सगळ्या महारांचा मिळून सगळ्यांत वाईट जमिनीचा एखादा तुकडा असायचा. त्या तुकड्यात पिकणार काय आणि त्यातील प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला तरी काय येणार? कोणाचेच लक्ष तो तुकडा कसण्याकडे नसते. इतर गावकऱ्यांचे तसे नसते. त्यांचा प्रत्येकाचा स्वत:च्या जमिनीशी एकजीव झालेला असतो. शेताला अंकुर फुटला की, त्यांच्या आशेला अंकुर फुटतो. शेत करपले की, त्यांचे जीवन करपत. शेताला पाऊस चांगला मिळाला की, त्यांची तोंडे टवटवीत होतात. पीक तान्हेले राहिले तर त्यांच्या तोंडाला कोरड पडते. शेतातल्या झाडापेक्षाही खोलवर त्यांचे आयुष्य पिढ्यानपिढ्या जमिनीत रुजलेले असते. जमिनीच्या सहवासाने त्यांना जमिनीचे वाण आणि गुण दोन्हीही लागतात. जमिनीचा रंग, आणि जमिनीचा जडपणा दोन्हीही त्यांच्या अंगी येतात. त्यांचे चालणे धीरगंभीर, त्यांचे बोलणे अतिसावकाश आणि त्यांच्या मनाचे सर्व व्यवहार पण हळू चालतात; ह्याच्याबरोबर उलट महारांची स्थिती असते. त्यांना जड जमिनीतून पोटाला मिळवायचे नसते, तर माणसांकडून मोठ्या मिनतवारीने कोर-अर्धा कोर भाकर काढावयाची असते. घरात साठवण करण्याइतके कधी त्यांना मिळत नाही; इतके त्यांचे पोट हातावर असते. पडेल जनावर ओढायचे, गावचे निरोप घेऊन जायचे, पाटलाच्या मागे असायचे, गावात गस्त घालायची, सगळ्यांच्या जमिनीच्या भांडणात महाराची साक्ष असायची. यामुळेच चौकसपणा, हजरजबाबीपणा ही महारात दिसून येतात. बुद्धी चंचल आणि लवचिक असते. नव्या मनूत नवे चटकन् उचलण्याची त्यांची तयारी असते. पोटाच्या रोजच्याच काळजीमुळे म्हणा किंवा एकाच उद्योगाने पोट भरणे शक्य नसल्यामुळे म्हणा, ते हजार उद्योग करतात. त्यांना गावच्या सगळ्या घरातील खडानखडा माहिती असते. आणि तीसुद्धा फक्त चालू पिढीची नसून कित्येक पिढ्यांची! गावातली सगळी बिंगे, सगळ्या भानगडी, सर्व घरगुती कटकटी यांची महार म्हणजे एक चालतीबोलती

नोंदवही असते. महारांना गाणे, नाचणे व नक्कल छान करता येते, आणि
परिपूर्ती / ८३
 

त्यात त्यांना पिढीजाद मिळालेले मनुष्यस्वभावाचे ज्ञान फार उपयोगी पडते. हजारो वर्षे हीन स्थितीत काढून आता इतरांच्याबरोबर आम्ही आहोत ही भावना येऊ लागल्याने ह्या पिढीतील महारांची मनोवृत्ती मोठी नाजूक व भावनाप्रवण असते. वंशपरंपरा बळावलेले गुण व नवी परिस्थिती यांचे द्वंद्व त्यांच्यात उत्कटतेने पाहावयास सापडते. पैसे चांगले मिळोत किंवा थोडे मिळोत, महार चांगले कपडे घालतो, हे त्याच्या कलावान मनाचे दर्शक आहे असे मला वाटते. मी पाहन ठेवले आहे की, वर्गात साधारणपणे गबाळ पोशाक करणारे विद्यार्थी ब्राह्मण असतात. मराठ्यांचा पोशाक साधारणपणे बऱ्यापैकी असतो, व सर्वात झोकात असतो महार. ब्राह्मण आज चार पैसे मिळाले तर दोन मागे टाकील. पण महार आज सर्वच्या सर्व खर्च करील व उद्या परत पोटासाठी वणवण हिंडेल.
 मी पुण्यात निरनिराळ्या मराठा जातींची पाहणी करीत होते. एक दिवस महारांची व इतर काही जातींची मोजणी चालली होती. प्रत्येक माणसाचे नाव, गाव व पोटजात नोंदवहीत टिपून घ्यावयाची व नंतर त्याच्या डोक्याची मापे घेऊन रक्त घ्यावयाचे असा क्रम असे. माझ्या शेजारी माझा एक महार विद्यार्थी उभा राहून मला मदत करीत होता. येतील तसतशी नोंद होत होती- महार, भंगी, मांग, मांगगारुडी वगैरे. एवढ्यात एकजण आला व त्याने आपली जात 'हरिजन' म्हणून सांगितली. एक लहानसा विजेचा धक्का बसावा तसे सर्वांना झाले. मी माझ्या विद्यार्थ्यांकडे पाहिले तो त्याच्या चेहऱ्यावर राग, विषाद, तुच्छता हे विकार दिसत होते. त्याची-माझी दृष्टादृष्ट झाली तशी तो थोडा हसला. त्या हरिजनाला मला विचारावे लागलेच, “अहो, 'हरिजन' शब्दाने जात कळत नाही... माझ्या कामासाठी मला तुमच्या पोटजातीची नोंद करायची आहे." "अरे, 'हरिजन', 'हरिजन' काय चालवले आहेस? सांग की, तू महार आहेस म्हणून..." माझा विद्यार्थी हेटाळणीने म्हणाला, स्वाभिमानी महारांना 'हरिजन' शब्दाचा तिटकारा वाटतो. 'हरिजन' शब्दातील करुणा, खोटी दया त्यांना नको आहे. 'महार' शब्दामागे इतिहास आहे, परंपरा आहे. त्यांना 'महार' म्हणूनच मानाने जगायचे आहे. अशाच कितीतरी प्रसंगी महारांचे वैशिष्ट्य माझ्या नजरेस आले व अरबी समुद्रापासून तो वैनगंगेपलीकडे सर्व महार इथून-तिथून एकाच साच्यातले ही गोष्ट अनुभवास आली.

 खानदेशातल्या एका गावी एका संध्याकाळी वंजाऱ्यांची मापे आटपून
८४ / परिपूर्ती
 

आम्ही घरी चाललो होतो. रस्त्याने फारच थोड्या माणसांची आवकजावक होती. एवढ्यात एका वळणावर खड्या सुरात म्हटलेले गाणे ऐकू आले. वळण संपल्यावर पाहिले तो तिघे-चौघेजण सावकाश रमतगमत चालले होते. एकजण गाणे म्हणत होता. बाकीचे मधूनमधून साथ करीत होते व मधूनमधून गप्पा मारीत होते. आम्ही झपाझप चाललो होतो. आम्ही जवळ आलो तो गाणे थांबले. मी विचारले, “कसलं गाणं चाललं होतं? सर्वांनीच चमत्कारिकपणे माझ्याकडे पाहिले, पण उत्तर दिले नाही. काय एवढेसुद्धा माहीत नाही? आम्हाला सांगायची जरूरी नाही, असाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. थोडे लांब गेल्यावर बरोबरच्या गृहस्थाने सांगितले की, “ते महार होते... आंबेडकरांचा पोवाडा चालला होता. ते पुढे म्हणाले, “उगीच बोललात तुम्ही त्यांच्याशी." पण मला तसे वाटले नाही. शब्दांनी न बोलता त्यांना काय सांगायचे होते ते त्यांनी अगदी स्पष्ट सांगून टाकले होते.
 दुसऱ्या दिवशी मी ज्या जहागीरदाराकडे उतरले होते. त्यांच्याकडे गावचा महार काही कामासाठी आला होता. त्याने प्रत्येकाला लवून जोहार केला. जहागीरदारांच्या सांगण्यावरून “माप देण्यासाठी माणसे ताबडतोब लावून देतो" असे त्याने मोठ्या अगत्याने सांगितले. इतक्यात मला त्याची काठी दिसली. काठी कळकाची, धुराने लालसर काळी झालेली अशी होती.. तीवर पितळेच्या तारेने हरत-हेने विणून नक्षीकाम केले होते. मी काठी मागितली तेव्हा त्याने वाकून लांबून माझ्या हातात ती टाकली. स्वतः जहागीरदार व त्यांचे चिरंजीव अस्पृश्यता मानणारे नव्हते. मी तर त्यांच्यादेखतच एका महाराचे माप घेतले होते, मग काठी लांबून माझ्या हातात टाकण्याचे प्रयोजन काय? मी म्हटले ना की, महार एक स्वभावसिद्ध नट असतो म्हणून, त्याचे हे उदाहरण. 'तुम्ही हल्लीच्या माणसांनी शिवाशीव केली म्हणून काय आम्ही रीत सोडायची? जहागीरदारांकडे कशी वागणूक पाहिजे ती काय आपल्यासारख्यांनी विसरायची होय?' असेच जणू तो मला विचारीत होता. पण हे करीत असताना त्याच्या तोंडावर किंचित हसू होते. त्याच्या डोळ्यात मिस्किलपणा भरलेला होता. “हे सगळे नाटक आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे अन मला पण ठाऊक आहे." हाच त्याचा भाव होता. नागपूरला बेझन बागेत मी मापे घेत होते व माझ्याभोवती महारांचा

घोळका जमला होता. ही मापे मी का घेते? ह्यापासून काय अनुमाने
परिपूर्ती / ८५
 

काढणार? वगैरे प्रश्नांचा पाऊस पडत होता व शक्य तितक्या प्रश्नांची उत्तरे शक्य तितक्या सोप्या भाषेत द्यावयाचा माझा प्रयत्न चालला होता. इतक्यात एकजण म्हणाला, “बाई, ह्याबद्दल लिहिलेले एखादे पुस्तक दाखवा की आम्हाला." मला हेच हवे होते. मी जराशा ऐटीनेच स्वत: लिहिलेले एक इंग्रजी लिखाण त्याच्यापुढे टाकले व म्हणाले, “पाहा, यात सगळे काही आहे.” इतर जातींच्या बाबतीत माझी ही युक्ती हटकून यशस्वी झाली होती. माझे इंग्रजी पुस्तक पाहून व साधारण इंग्रजी जाणणाऱ्यांनासुद्धा न कळणारे ते जाडे-जाडे शब्द पाहन चौकस माणसे गप्पच बसायची; पण ह्या गृहस्थाने मला दाद दिली नाही. त्याने एकदा पुस्तकाची पाने चाळली, पुस्तक टेबलावर फेकले, आणि मान हलवून मला म्हणाला, “हे पुस्तक तर इंग्रजीत आहे. आमच्यासारख्यांना ह्यात काय लिहिलं आहे ते काय कळणार? आम्हाला कळायला तुमचं पुस्तकं मराठीत हवं होतं, नाही का?"
 ह्यानंतर काही दिवसांनी मी भंडाऱ्याहून साकोरीला चालले होते. गाडी भंडाऱ्याहून सकाळी निघाली. जवळजवळ गाडीची भरती झाली होती. अर्धा मैल जाऊन गाडी थांबली व गृहस्थ गाडीत शिरले, “आज सकाळीच काम सोडून बाहेरगावी कुठं निघाला?' गृहस्थ म्हणाले, “ह्या महारांची प्राथमिक निवडणूक आहे ना! त्याच्या प्रचारासाठी मला तीन दिवसांची सुटी मिळाली आहे." म्हणजे तुमचा ह्या निवडणुकीशी काय संबंध?' गृहस्थ सांगू लागले, “तो शिदू महार आहे ना आमच्या कारखान्यातला, तो काँग्रेसच्या तिकिटावर उभा राहिला आहे. आमचे शेट त्याला मदत करताहेत.” “मग शेटची दुसरी माणसे का नाही जात?" "हेच तर तुम्हाला कळत नाही. तो शेटचा माणूस म्हणून काही जाहिरात नाही लावायची, समजतात? इकडे लोकांना कुणकुण आहे, पण तिकडे गोंदियाचे बाजूस अजून लोकांना माहीत नाही तोवर त्याच्याबद्दल काँग्रेसच्या बाजूने प्रचार करण्यास जात आहे." थोडा वेळ कोणी काही बोलले नाही. परत एकाने प्रश्न केला, “कोठचा उमेदवार निवडून येईल ह्याचा काही अंदाज आहे का?" कार्यकर्त्याने तोंड जरा आंबटच करून उत्तर दिले, “आंबेडकरांचा माणूस पहिला हे ठरलेलेच आहे. बहुधा दुसराही त्यांचाच येईल. किती पैसा ओतला तरी पहिली जागा आम्हाला मिळणे शक्य नाही." मनातल्या मनात मी महारांना धन्यवाद दिले. माझे मन केवढे मोठे झाले होते! कार्यकर्त्यांचे

तोंड जरा खुलले. तो पुढे म्हणाला, “पण तिसरी व चौथी जागा आमचीच
८६ / परिपूर्ती
 

आहे. आणि मग सार्वत्रिक निवडणुकीत आंबेडकरांच्या माणसाचा धुव्वा ठरलेलाच आहे. पैसा मात्र खूप खर्च होणार आहे." हे ऐकून एक गृहस्थ म्हणाले, “काय भाव चढला आहे आज त्यांना!” “रोज अडीच रुपयालासुद्धा काम करायला तयार नाहीत ते.” शेवटचा माणूस म्हणाला.
 गोंदिया-भंडाऱ्याच्या बाजूला देशी बिड्या प्रचंड प्रमाणात करतात. त्यासाठी जी टेंभुर्णीची पाने लागतात ती गोळा करणाऱ्या हंगामाला अजून नीटशी सुरुवात झाली नव्हती. पण लवकरच काम सुरू व्हावयाचे होते. हिवाळा संपून नवी पात फुटली की, जास्तीत जास्त पाने गोळा करून आणण्याची धांदल सबंध जंगल प्रदेशात उडालेली असते. विडी कारखान्यातील कामे- पाने गोळा करणे, ती निवडणे, कातरून त्यांना आकार देणे, ती वाळवून पुडे बांधणे, विड्या वळणे वगैरे सर्व महारच करतात. घरातील पुरुष उजाडण्याच्या आतच कारखानदारांच्या रिंग्या घेऊन रानात जातात. तेथे सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत पाने ओरबाडण्याचे काम चालते. जसजशा गाड्या भरतात तसतशा त्या मालक सांगेल त्या त्या ठिकाणी रवाना होतात. तेथे म्हातारे-कोतारे, बायका-पोरे दिवसभर पाने कातरीत असतात. दिवसाचा वेळ फुकट जाऊ नये म्हणून बायका रात्रीचाच दळणे करून भाकरी भाजून ठेवतात. मी कार्यकर्त्यास- विडी कारखानदाराच्या आश्रितास- विचारले, “महारांना दिवसाचे किती तास काम पडते हो?" तो उत्तरला, “तास कसचे विचारता? हंगामात दिवसाचे बारा तासही कामाला पुरत नाहीत. पाने आणणे, कातरणे, पुडे बांधणे वैगेरे निरनिराळ्या कामाप्रमाणे दाम मिळतो त्यांना. आजकाल फारच शेफारले आहेत ते." दुसरा एकजण म्हणाला, “आणि एकेकाचा पोशाक तरी पाहा. कोशा, सिल्कचा शर्ट व सोन्याच्या रिस्टवॉच! दिसतात का तरी तुम्हाआम्हाला?" तिसरा बोलला, "अहो, त्यांचं सगळं कुटुंबच्या कुटुंब पैसे मिळवतं ह्या दिवसांत.' मत्सराचा एक सामुदायिक ध्वनी गाडीत उमटला.
 मला माझ्या प्रवासातली एक सकाळ आठवली. रानातून प्रवास करीत असता मी महारांच्या वस्तीला आले होते. घराच्या पुढेच एक अशक्त व फिक्कट दिसणारा मुलगा पानांची रास पुढे घालून बसला होता. त्याच्या आईने सांगितले, "बाई, तो अशक्त आहे, त्याचे पाय लुळे आहेत, चालता

येत नाही. पण बसून पानं कातरली म्हणजे दिवसाचे आठ-बारा आणे
परिपूर्ती / ८७
 

मिळतात. तेवढंच त्याचं पोट बाहेर पडतं." त्या मुलाचे केविलवाणे डोळे, त्याच्या आईचे कित्येक दिवसांत वेणी न घातलेले डोके, कित्येक दिवसात न धुतलेले लुगडे व माझ्याशी बोलताना सुद्धा चाललेला पाने कातरण्याचा उद्योग ही सर्व माझ्या डोळ्यांपुढे उभी राहिली. खरेच, महाराच्या घरी तान्ह्या मुलाखेरीज सगळे कुटुंबच्या कुटुंब पैसे मिळवीत असते. चार पैसे मिळाले की, खर्च होण्यासही वेळ लागत नाही. शेजारच्या मोठ्या शहरी जायचे, बाजारात छानछोकीची जी वस्तू दिसेल ती दुप्पट पैसे देऊन विकत घ्यायची, चार दिवस निरनिराळ्या उपाहारगृहात जाऊन मन मानेल तसे चरायचे, यथेच्छ दारू प्यायची, तमाशाला जायचे आणि खिसे मोकळे झाले की घरी येऊन घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे कामाला लागायचे. गाडीतल्या पांढरपेशा माणसांना ह्या आयुष्यक्रमाचा का बरे एवढा हेवा वाटावा?
 भंडाऱ्याच्या पुढे हाळबी लोकांच्या प्रदेशात माझे ह्यापुढील काम होते. तेथे अर्जुनीला दोन-तीन दिवसांचा मुक्काम होता. शेजारच्या दोन-चार गावांतून महारांना बोलावले होते. तेथेही नागपूरचाच अनुभव मला आला. गोंड, हाळबी, कुणबी मापे देऊन रक्त देऊन जात होते. पण मी हे काय चालवले आहे हे काही कुणी विचारले नाही. महार आले ते सगळे मिळून चार-पाच मैल चालून आले. त्यांनी मापे घेताना मी डोके का मोजते हे विचारले, सरकारांतून त्याबद्दल मला काय मिळते ते विचारले, किती रिक्रूट पाठवले तर किती कमिशन मिळते ते विचारले. शेवटी माझे काम रिक्रूट भरतीसाठी नाही ह्याची खात्री पटल्यावर दोन क्षण मोजणीचे काम पूर्ण शांततेत झाले. मला वाटले, संपली ह्यांची प्रश्नावली. पण छे! रिक्रूट भरतीसाठी तर नाही, पण मग ही मोजणी कशासाठी चालवली आहे ते समजावून सांगण्याची भुणभुण सुरू झाली. शेवटी अगदी निरक्षर माणसांना मानवशास्त्राचे धडे देण्याइतपत माझी तयारी आहे का नाही ह्याची परीक्षा मला देण्याची वेळ आली. रक्त काढल्यावर मला जेवायचे होते. ते रक्त मीच तपासणार हे कळल्यावर तर मंडळी तेथून हलच ना. “तुम्ही काय करता ते आम्ही पाहू न मग जाऊ" असे त्यांनी निक्षून सांगितले, व मग माझ्याभोवती कोडाळे करून कोणाचे रक्त 'अ' आहे, कोणाचे 'ब' आहे, ते कसे ओळखायचे, ह्याची समजूत करून घेतली. “काय रे मग बामणाचं रक्त न आपलं रक्त सारखं आसलं तर काय होईल?" “मग म्हणून काय झालं?

आम्ही काय माणसं नाहीत?"' “अरे, पण निराळं असलं तर रे?" ह्याला
८८ / परिपूर्ती
 

उत्तर न सुचल्यामुळे सर्वांनी माझ्याकडे वळून "मग बाई..." अशी सुरुवात केली. पण माझ्या सुदैवाने गावचा पोलीसपाटील तेवढ्यात येऊन सर्वांना काही कामाला घेऊन गेला, व मी त्यांच्या प्रश्ना-राक्षसांच्या तावडीतून सुटले.
 ह्यापुढचा मुक्काम खजरी येथील हाळबी जमीनदाराकडे होता. तथला पटवारी एक हुशार, मध्यम वयाचा व अर्थातच लिहिता-वाचता येणारा महार होता. नेहमीप्रमाणे त्याने माझी सर्व व्यवस्था केली व आम्ही जेवावयास बसलो. मला अर्थातच स्पृश्यास्पृश्यतेचा प्रश्न नव्हता. पण बरोबर काही इतर गावकरी होते. पटवाऱ्याने कोळ्याकडून पाने अशा खुबीने मांडली की लहानशा ओसरीवर साधारणपणे वर्तुळात एकमेकांपासून दूर... दूर... सर्वजण तर एकत्र आणि कोणी कोणाच्या पंक्तीत तर नाही... अशी आम्ही बसलो व जेवणे झाली. हा गृहस्थ दोन दिवस माझ्याबरोबर हिंडवयास होता. त्याच्या गप्पा, त्याचा अनुभव, मोकळेपणाने वागूनही कधी चुकून मर्यादेचा अतिक्रम न करणे ह्या गुणांनी मला त्याच्याबद्दल आपुलकी वाटू लागली.
 माझ्या मनात सारखे येई... त्याच्या मलांना खाऊसाठी म्हणून काही द्यावे. पण ज्या माणसाबरोबर बरोबरीच्या नात्याने दोन दिवस काढले त्याला अशा प्रकारे उचलून पैसे द्यावे हेही मनाला प्रशस्त वाटेना. दुपारी रक्ततपासणीचे काम चालले होते. माझ्याजवळ दोन-चार काचेच्या नळया मागे रबराचा फुगा लावलेल्या अशा रक्त घेण्यासाठी होत्या. त्यांची पेटी उघडून माझे काम चालले होते. पटवारी म्हणाला, “बाई, तुमच अडणार नसेल तर एक नळी द्या. फाऊंटन पेन भरायची भारी पंचाईत पडते." त्यांच्याबरोबरच साकोरीपासून वाटाड्या म्हणून पाठवलेला एक ब्राह्मण होता, तोही आमच्यात गेले चार दिवस होता. तो म्हणाला, "अहो, असं मागता काय... मला पण फाऊंटनची अडचण पडते, पण मी मागितल का?" पटवारी म्हणाला, "त्यांत काय झालं? बऱ्याचशा नळ्या दिसल्या. एक मागितली; अडणार नसेल तर घेतली, नाही तर नाही." पटवाऱ्याने क्षुल्लक वस्तू आपण होऊन अगदी सहजगत्या मागण्यात कोणतेच दैन्य दाखवले नव्हते. उलट, दोन दिवसांच्या सहवासात उत्पन्न झालेल्या खेळीमेळीच्या, बरोबरीच्या भावनेचे ते द्योतक होते. मागणी ऐकून मला पण

आनंद झाला. देणगी इतकी क्षुल्लक की. देणाऱ्याला व घेणाऱ्याला
परिपूर्ती / ८९
 

आनंदाखेरीज कसलीच देवाणघेवाण करण्याची तसदी नव्हती. महारांना माणसा-माणसांच्या संबंधाचे ज्ञान उपजत असते असे मी म्हणते ते ह्यामुळेच. ज्या गोष्टी आम्हाला शिकाव्या लागतात त्या त्यांना आधीच माहीत असतात आणि त्या बोलून जाण्याची त्यांची पद्धत इतकी सहज, सरळ व बिनतोड असते की, त्याच्यापुढे उत्तरच नसते. माझ्या प्रवासात मी जवळजवळ मराठी मुलुखाची सीमा गाठली होती. पुढे जावे का नाही हे अजून ठरले नव्हते. रम्य वनप्रदेश, साधे-भोळे, निरक्षर, मला पूर्वी माहीत नसलेले मराठी बोलणाऱ्यांचे समाज ह्यात मन रमले होते. पण घर सोडून फार दिवस झाल्यामुळे घरची ओढ लागली होती. महाराष्ट्राची सीमा कोणती ह्याबद्दल आमचे बोलणे चालले होते. कोणी म्हणत होता, “ह्या नदीच्या पलीकडे हिंदी बोली सुरू झाली;" कोणी म्हणत, "त्या गावातले लोक निम्मे मराठी, निम्मे हिंदी आहेत." महार पटवारी म्हणाला, "जेथपर्यंत महार पोचले तिथपर्यंत महाराष्ट्र!"