परिपूर्ती/मराठ्यांचा मठ्ठपणा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search


११
मराठ्यांचा मठ्ठपणा

केवढे भांडण चालले होते दोघांचे! सगळी

माणसे त्यांच्याभोवती गोळा झाली होती.
प्रत्येकाच्या चेह-यावर आश्चर्य दिसत होते.
तुळशीराम आणि लाला ह्यांच्यातले भांडण होते
ते. तुळशीराम असेल जेमतेम पाच फूट उंच
अंगाने काटकुळा... वजन शंभर पौंडसुद्धा भरले
नसते; आणि लाला होता सहा फूट उंचीचा पठाण!
त्याचा लालबुंद उग्र चेहरा, बैलासारखी मान, जाड
मिलिटरी बूट व निमुळती टोपी ठेवून बांधलेला
फेटा ह्यांमुळे तर तो होता त्यापेक्षाही उंच
वाटायचा. तो नुसता खाकरला तरी आसपासची
पोरे घाबरून पळायची. त्याचे एकेक मनगट असेल
तुळशीरामाच्या मांडीएवढे जाड. “थांब, थांब,
तुझा जीवच घेतो, तुळशीराम लालाच्या अंगावर
धावला. भोवतालच्या माणसांनी तुळशीरामाला
धरून ठेवला. एवढ्यात इंजिनियर कामावर आले
व “काय गडबड आहे? म्हणून विचारू लागले.
“कुछ नहीं मालिक, ये आदमी खाली झगडा
करता है. लवून सलाम करीत लाला म्हणाला.
तिकडून तुळशीराम शिरा ताणीत ओरडला,
"ऐकतोस काय, सायबा? शाप खोटं बोलतोय

तो. मला शिव्या दिल्यान अन् आता गोंडा
७४ / परिपूर्ती
 

घोळतो." साहेब दोघांना घेऊन हाफिसच्या खोलीत गेले व तुळशीरामाला शांत करीत झाली हकीकत त्यांनी विचारली. लाला रोजच्याप्रमाणे तयार होऊन बांधकामाच्यापुढे उभा होता. कामकरी येतायेता गर्दीत एकाचा धक्का लागून तुळशीराम ढकलला गेला व तोल सावरता-सावरता त्याचा पाय लालाच्या शेजारीच ठेवलेल्या वळकुटीवर पडला. "क्यों साला, बेवकूफ! तुम क्या अंधे हो?' लालाने गुरकावले. ते सहन न होऊन तुळशीराम लालाचा जीव घ्यायला धावत होता. “अरे तुळशीराम, काय हमरीतुमरीवर येता? जा पाहू कामाला. लाला! माझ्या माणसांना शिव्या दिलेल्या मला खपणार नाहीत." असे दोघांनाही सांगून साहेबांनी दोघांना दोन दिशांना पाठविले. तरी जाता-जाता लाला 'बेवकूफ मरगळे!" असे पुटपुटला. ते ऐकून तुळशीराम दारापर्यंत गेलेला तावातावाने परत आला व साहेबांच्यापुढे हात नाचवीत म्हणाला, "बघ, सायबा, कसा माजला आहे बैल!- थांब, त्याला दाखवलंच पाहिजे. त्याची वळकटीच फेकून देतो समुद्रात." "माझे आई! जा आता कामावर..." साहेबांनी परत सांगितले व तुळशीराम निघून गेला. त्या दिवसापासून लाला प्रत्येक कामकऱ्याला सांगायचा की, तुळशीराम माझा बिछाना दर्यात टाकणार आहे आणि हसायचा, आणि सगळीजण हसायची. पण तुळशीरामाने लक्ष दिले नाही. तो फक्त जळजळीत दृष्टीने लालाकडे पाहायचा. तुळशीरामाचे काम सर्वात उंच जागी असायचे. तो होता खारवी. दुसऱ्यांचे डोळे फिरतील इतक्या उंचीवर अरुंद फळ्यावरून तो खुशाल बेफिकीर इकडून तिकडे जायचा व आपले काम करायचा. उंच वाशावर चढून परांच्या बांधायच्या, टोकावर कप्पी बसवायची, कप्पीची दोरी सरकली तर वर चढून ती परत बसवायची: ही कामे म्हणजे त्याच्या हातचा मळ. स्वारी तशी सरळ, पण लालाची मरी तो कधी ऐकून घ्यायला नाही; आणि सर्वांना धास्ती वाटायची की, एखादे दिवशी लालाने थपड मारली तर ह्या काटकुळ्या प्राण्याचा जीव जायचा म्हणून. ज्या इमारता बांधकाम चाललेले होते तेथे वरच्या मजल्यावर तळशीराम निजायचा आणि खालच्या दाराशी लालाचा पहारा असायचा, आणि रोज त्यांच्या कटकटी चालायच्या. ह्या दोघांचे भांडण म्हणजे सायबालासुद्धा कुतूहलाचा विषय होता. ही उंदीर-सिंहाची चुरस मोठी मजेची होती. त्यालाही तुळशीराम लालाची वळकटी समुद्रात टाकणार ह्या कल्पनेने हसू आले. हे भांडण

झाल्यापासून दोन-तीन दिवसांनी साहेब जो कामावर येतो तो त्याला एक
परिपूर्ती / ७५
 

अदभुत दृश्य दिसले. कामकरी नुकतेच कामावर आले होते आणि मोठे रिंगण करून उभे होते. मध्यभागी लाला रागाने अक्षरश: नाचत होता. त्याच्या तोंडून शिव्यांचा भडिमार चालला होता. तो तुळशीरामाची गठडी वळायच्या गोष्टी बोलत होता. त्याचा आधीच लाल असलेला चेहरा रागाने आता फुटणार असे वाटत होते. तो मान उंचावून आकाशात हात नाचवीत “खाली तर ये म्हणजे तुला दाखवतो" असे वारंवार म्हणत होता. साहेबाने वर पाहिले तर सगळ्यात उंच नि अरुंद परांचीवर तुळशीराम एखाद्या माकडासारखा बसला होता व नि:शब्द हसत होता. साहेबाला पाहताच लाला जरा थबकला. पण पुढे होऊन सलाम करून त्याने आपले गाऱ्हाणे साहेबांना सांगितले की, ह्या तुळशीरामाने माझी वळकटी कुठे नाहीशी केली आहे, ती मला परत करवा. साहेब आलेला पाहताच तुळशीरामही माकडा- सारखा झरझर खाली आला. “काय रे, लालाची वळकटी तू चोरलीस काय? कुठे आहे ती?" "मी नाय चोरली बा-- मी ती दर्यात फेकून दिली." तुळशीराम म्हणाला. लाला म्हणाला, “चोरून वर खोटं बोलतो आहे. माझी दुलई होती व तीत शिवलेले पैसे होते.” तुळशीरामाने लांब हात केला व बोट दाखवून म्हटले, “ती बघ तिकडे मी फेकली- अजून सापडेल. जा जाऊन बघ." लाला व त्याच्याबरोबर दोघेतिघे धावतच किनाऱ्याशी गेले व साहेब तुळशीरामाला घेऊन आत गेले. सकाळी लाला उठून बाहेर गेला व ही संधी साधून तुळशीरामाने वळकटी पळवून फेकून दिली होती एवढी हकीकत जो साहेबाला कळते तेवढ्यात लाला आला. त्याचा राग कमी झाला होता- पैसे न वळकटी भिजलेली, पण काहीही चोरीस न जाता मिळाली होती. तो जरा हसतच म्हणाला, “मालिक, ये बिलकुल बेवकूफ है. रजाईमें सौ रुपिये थे वे सब वापस मिले। इसकु कुछ पैसे की बात मालूम नहीं हुई!" साहेबांनी तुळशीरामाकडे पाहिले. क्षणभर दाघाचे डोळे भिडले. दोघांच्याही चेहऱ्यावर हसू झळकले. साहेब आणि तुळशीराम दोघेही 'बेवक्फ मरगढे'- काय हसण्यासारखे झाले त्यांनाच माहीत. एवढे खरे की. त्या दिवसापासून लाला परत तुळशीरामाच्या वाटेस गला नाही. पण ह्या मठ्ठ मराठ्याने मोठ्या युक्तीने वळकटी हस्तगत करून ती हातोहात न लांबवता समद्रात कशी फेकली व आपले पैसे कसे परत मिळाले

हे सांगताना बाकीचे मठु मराठे हसत का नाहीत हेही त्याला कधी कळले नाही.
७६ / परिपूर्ती
 

 बिचारा लालाच काय, पण इतर परप्रांतीयांनासुद्धा मराठ्यांच्या वागणुकीचे आश्चर्य वाटते. मराठ्यांना व्यवहारच नाही हा सिद्धांत तर मी आतापर्यंत पाच-पंचवीस वेळा तरी ऐकला असेल.
 पुष्कळ वर्षांमागची गोष्ट. मी शेटना आमचे नवीन घर दाखवीत होते. घर दाखवून झाल्यावर त्यांनी बारीक चौकशी केली- जमिनीला काय पडले? घराला काय पडले? वगैरे आणि शेवटी विचारले, “पण ताई, एवढे पैसे कुठून आणले?" मी बेफिकीर स्वरात सांगितले, “थोडे जवळ होते ते दिले व बाकीचे कर्ज काढले- फेडू हळूहळू." शेटनी गंभीरपणे मान हलवली- “छे, हेच पैसे तुम्ही एखाद्या धंद्यात गुंतवले असते तर तुम्हाला दरवर्षी इतके व्याज आले असते. त्या व्याजापैकी काही भाग देऊन भाड्याचे छान घर घेता आले असते. परत उरलेले व्याज रकमेत टाकून वीस वर्षांत चांगली पुंजी जमवता आली असती. पण तुम्हा मराठ्यांना (महाराष्ट्रीयांना) व्यवहारच कळत नाही. आपले असे घर आणि मागे-पुढे अंगण असले म्हणजे तुम्हाला वाटते स्वर्ग हाती आला." मी हसून म्हणाले, “शेटजी, तुम्ही हेटाळणीने म्हणून जे म्हणाला ते अगदी शंभर टक्के खरे आहे. बँकेतल्या पैशांचे व्याज खाण्यापेक्षा स्वत:ची झोपडी का होईना, असली म्हणजे आम्हाला जन्म सफळ झाल्यासारखा वाटतो." ह्या मराठ्यांना काही अक्कलच नाही असा अभिप्राय त्यांच्या तोंडावर दिसला, व त्यांनी आमचा निरोप घेतला.
 आमच्या ओळखीच्या परप्रांतीय संस्थानिकांना वर्षाकाठी घर घ्यावयाचे होते. घर बघून पसंत केले, वर्षाचा भाडेपट्टा झाला व उद्या राहायला यायचे एवढ्यात मंडळींच्या लक्षात आले की, घरात विजेचे दिवे नाहीत. आता काय करायचे? दिवस लढाईचे म्हणून वीज कंपन्या नव्या घरांना वीज देत नव्हती व तिथे वशिला चालेना. एवढ्यात राजेसाहेबांना असे आढळले की, त्यांच्या आळीत एका पाटीलबुवांचा वाडा व जमीन होती. तेथील विहिरीसाठी मोठा विजेचा पंप लावला होता- त्यातून पाटीलबुवांनी मेहेरबानीने दोघाचौघा शेतकऱ्यांना विजेच्या तारा जोडून दिल्या होत्या. आणि व्यवहार जरी चोरीचा होता तरी वीज कंपनी तिकडे कानाडोळा करीत होती- तसेच काही संधान राजेसाहेबांनी पाटीलबुवांकडे लावले तर वीज कंपनी त्यात ढवळाढवळ करणार नव्हती. राजेसाहेब लगेच आपल्या भारी किंमतीच्या प्रचंड मोटारीत बसले व पाटीलबुवांकडे आले.

राजेसाहेबांची मोटार सुरेख व खूपच मोठी होती. आमच्या भिकार गावात
परिपूर्ती / ७७
 

काही अशा मोटारी सहजी दिसत नाहीत. त्यांची मोटार गेली की, रस्त्याने जाणारी मुले उभी राहून कौतुकाने मोटार बघायची. हाकणारासुद्धा ऐटीत असे. राजेसाहेबांची मोटार पाटीलबुवांच्या वाड्याजवळ आली, मोटारहाक्या खाली उतरला व वाड्यात जाऊन ‘बाहेर अमके-अमके आले आहेत. तुमची गाठ घ्यायची आहे, क्षणभर बाहेर आलात तर बरे' असा निरोप त्याने बैठकीत जाऊन सांगितला. पाटील जरा अनिच्छेने उठले व फाटकाशी आले. राजेसाहेब खाली उतरले. रामराम वगैरे झाल्यावर त्यांनी सांगितले, "हे पलीकडचे घर आम्ही घेतले आहे. तेथे वीज पाहिजे आहे. किती पैशाला तुम्ही कनेक्शन द्याल म्हणून विचारायला आलो आहे." पाटीलबुवांनी विडा चावीत संथपणे उत्तर दिले, "वा! फार छान! आपण आमचे शेजारी होणार- आनंद आहे आम्हाला. पण वीज काही तुम्हाला नाही बुवा देता येणार.” राजेसाहेबांनी व त्यांच्या कारभाऱ्यांनी अतिशय गळ घातली, लोकांच्या चौपट पैसे देण्याचे कबूल केले. पण पाटीलबुवांचे आपले एकच उत्तर, “छे, हो! आधीच दोन- चार घरांना दिली आहे- आमच्याच पंपाला पुरे पडत नाही- तुम्हाला नाही देता येत.” राजेसाहेबांनी हा सारी हकीकत मला सांगितली, व मराठ्यांना व्यवहारच कळत नाही म्हणून ते आपल्या मुलुखात निघून गेले. घर अंगावर पडू नये म्हणून लगेच दुसरा एक भाडेकरी पाहन वर्षाच्या कराराने त्यांना देऊन टाकले. नवी भाडेकरू बाई होती, घरात तीन-चार मुले होती. बाई राह्यला आली व हळूहळू पाटलीणबाईशी मैत्री झाली. 'एकटी बाईमाणूस, शाळकरी मुलं, राकल मिळायची पंचाईत, मुलांचा अभ्यास तरी कसा होणार? बरं, बंगल्याचं भाडं तरी किती! आणखी मी गरजू; आत वीज नाही हे मला सागितलंसुद्धा नाही हो त्यांनी- मी आपली ह्या दिवसात घर मिळतं आहे म्हणून लगेच वर्षाचा भाडेपट्टा की हो केला!" अशी बाईने आपली हकीकत पान-चारदा सांगितल्यावर पाटलीणबाईंच्या सांगीवरून कुटुंबवत्सल बालबुवानी बाईंना आपली लगेच कामकरी माणसे लावून वीज जोडून दिली.
 पंधरा दिवसांनी राजेसाहेब परत ह्या गावी आल्यावर त्यांनी बंगल्यात वाज पाहून कसे आकांडतांडव केले, नव्या भाडेकरी बाईला घर मोकळे करण्याची नोटीस कशी दिली, बाई वर्षभर कोर्टात वकील न देता स्वतः

कशी भांडली, व शेवटी वर्ष संपता संपता खऱ्या घरमालकाशी तिने नवा
७८ / परिपूर्ती
 

भाडेपट्टा करून संस्थानिकांना कसे हात चोळीत बसवले हे सांगायचे म्हणजे एक मोठा ग्रंथ होईल; पण पाटीलबुवांनी मुळातच वीज द्यायचे नाकारले का हे जाणण्याची मला उत्सुकता होती. काय परप्रांतीयांना आपल्या आळीत थारा द्यावयाचा नाही असा विचार होता की काय पाटीलबुवांचा? इतका लांब विचार शक्य दिसत नव्हता. पाटीलबुवा काही फारसे शिकलेले नव्हते, पण व्यवहाराला मोठे चतुर म्हणून त्यांचा लौकिक होता. मग त्यांनी पैसा नाकारला का? बऱ्याच दिवसांनी मला पाटलांच्या वागण्याचे रहस्य उलगडले. हे छोटे राजेसाहेब मोटारीतून उतरून पाटीलबुवांच्या बैठकीपर्यंत पायी गेले असते म्हणजे त्यांना ताबडतोब वीज मिळाली असती. पण पाटीलबुवांना बोलावून आणून मोटारशेजारी बोलणी झाली त्यामुळ पाटलांची मिजास बिघडली होती. त्यांनी चार जणांना बोलून दाखविल. "राजेसाहेबांचे बूड इतके जड झाले होते काय?... मला मोटारीची एट दाखवतो होय?-- त्याला म्हणावे, त् राजा आहेस तर मी पाटील आह- वाटेल ते पैसे दिलेस तरी वीज देणार नाही. पैसा मिळत असला म्हणज कसलाही कमीपणा किंवा लाचारी स्वीकारायला हरकत नाही हे व्यापार धोरण पाटीलबुवांना नव्हते हे स्पष्ट झाले.
 परवाचीच गोष्ट घ्या ना! आमची गाडी लोणावळ्याजवळ थांबली. डब्यातून घाईघाईने एक पारशी उतरला. त्याला ताजी जांभळे विकत घ्यायची होती. डब्याच्या खिडकीजवळ एक कातकरीण एका लहानशा चौकोनी कुरकुलीत करवंदांचे द्रोण भरून विकायला आली. तिला पाहिल्याबरोबर त्या पारश्याने घाई करून संबंध टोपली हिसकावून घेतली व हेचा दाम काय?" म्हणून विचारले. बाईने सांगितले, “आठ आणे." ते पैसे तिच्या हातावर ठेवून गृहस्थाने कुरकुली बायकोच्या हातात दिली. मी आपली जांभळे म्हणून होणारा हा करवंदांचा सौदा स्तिमित होऊन पाहत होते. दोन मिनिटे झाल्यावर बाहेरची कातकरीण म्हणाली, "बाबा, माझी टोपली दया," पारशी म्हणाला, “मग जांभळे न्यायची कशात? तुझ्या टोपलीची किंमत देतो, सांग नी." बाई म्हणाली, "छे! मला टोपली नाही इकायची." त्याने त्या एक आणा किंमतीच्या टोपलीला एक रुपया देऊ केला तरी तिचे म्हणणे एकच, “मला टोपली इकायची नाही." शेवटी त्याने रागाने संबंधच्या संबंध टोपली तिला परत दिली. तिने त्याचे आठ आणे परत दिले व वेळ

खाल्ल्याबद्दल चार शिव्या हासडून ती पुढे गेली. त्या पारशिणीला मी हळूच
परिपूर्ती / ७९
 

म्हटले, "बाई, ती करवंदे होती... जांभळे नव्हती. तुम्हाला पाहिजे असतील तर तो पहा पलीकडे माणूस उभा आहे, त्याच्याजवळ जांभळे आहेत.” 'बरे झाले टोपली गेली' असे म्हणून तिने नवऱ्याकडून जांभुळवाल्याला बोलावले. तो होता एक कुणबी आणि जी कातकरणीची कथा तीच त्याची पण कथा. तो म्हणे, “मी जांभळं विकायला आणली आहेत. टोपली नाय. हवी तर घ्या, नाहीतर मी पुढे जातो." शेवटी चरफडत त्या बाईने रूमालात जांभळे विकत घेतली, व तो माणूस आपली जीर्ण टोपली घेऊन निघून गेला. मला मात्र “मराठे लोकाला कसा बेपार कळत नाही' हे पुराण मुंबईपर्यंत ऐकावे लागले.
 आजही परत ते शब्द मी आणखी एका माणसाकडून ऐकत होते. हे गृहस्थ एक सुप्रसिद्ध म्हणा की कुप्रसिद्ध म्हणा एजंट होते. कोणाला काहीही पाहिजे असो, पुरेसे कमिशन मिळाले की आपण मिळवून देऊ अशी ह्यांची प्रतिज्ञा होती, व त्या प्रतिज्ञेला आतापर्यंत कधीही बाध आला नव्हता; पण आज मात्र त्यांनी हात टेकले होते. ते रस्त्यावरून अगदी मंदपणे जात होते. त्यांचा चेहरा पाहन मी विचारले, "काय, इकडे कोणीकडे? बरे नाही वाटत? हवा पालटायला का आलात?” “अहो, मी अगदी चांगला बरा आहे. पण किती खटपट केली तरी काम होत नाही म्हणून त्रासलो आहे." त्यांनी सांगायला सुरुवात केली. "ते पलीकडे...... चे रस्त्यावर एक लहानसे घर नाही का. ती जागा व घर मी पंधरा हजाराला मागत होतो....... नी सांगितले आहे माझ्यासाठी घ्या म्हणून." ते घर व त्या घराची मालकीण माझ्या चांगली माहितीची होती. ती एक पांढरपेशाची पन्नास वर्षे वयाची विधवा होती. तिच्या मुलाने आणि तिने पै-पै करून साठवून शंभर दीडशे रुपयांना जमीन घेतली होती व तीवर काही विटा, काही पत्रे, काही खोक्याच्या फळ्या अशी विविध सामुग्री जुन्या बाजारातून आणून एक लहानसे घर बांधले होते. घरात राह्यला येऊन दोन वर्षे होतात तो मुलगा वारला व सध्या घरात विधवा सासू, विधवा सून व तीन वर्षांचा एक नातू अशी राहात होती. घरी खायची भ्रांत होती. सासू चार ठिकाणी कामे करी. घरातल्या चार खोल्यांपैकी तीन भाड्याने दिल्या होत्या, व कुटुंबाची कशीबशी गुजराण होत होती. मुंबईला बाँबहल्ला होणार ह्या भीतीने मुंबईचे लोक वाटेल ते पैसे देऊन बाहेरगावी घरे व जमिनी घेत होते. आज तिची

दोन-तीन हजारांची मालमत्ता पंधरा हजारांना जात होती. ते एजंट पुढे सांगू
८० / परिपूर्ती
 

लागले, “अहो, घरापुढून मोठा रस्ता म्युनिसिपालिटीने काढला आहे म्हणून इतकी किंमत देतो आहे. म्हातारीला सांगितलेसुद्धा की, जरा मागच्या बाजूला जमीन आहे ती घ्या व घर बांधा. आठ-दहा हजारांत सर्व होईल. काही हजार बँकेत राहातील. पंधरा हजार पुरे नसले तर काय हवे तो आकडा सांगा. पण तिचे आपले एकच... 'मला घर नि जमीन विकायची नाही.'... आता सांगा ह्या मठ्ठपणापुढे काय करणार? आणि अशा माणसांशी व्यवहार तरी कसा करायचा?'.... ते तावातावाने निघून गेले. मी समोरच्या मारुतीच्या देवळाकडे तोंड केले व हात जोडन प्रार्थना केली, "देवा, मारुतिराया! मराठ्यांना आणखी थोडे मठ्ठ कर रे..."