परिपूर्ती/दिक्काल

विकिस्रोत कडून



१३
दिक्काल

 गौरी विचारत होती, “आता परत ग कधी
खीर करणार?" मी म्हटले, "तुझ्या पुढच्या
वाढदिवसाला." खीर खाता-खाता ती थांबली.
तिने क्षणभर मोठ्या गंभीरपणे विचार केला व
परत विचारले, “म्हणजे पुढच्या मंगळवारी
ना?" सगळी भावंडे तिला हसली. ताई
म्हणाली, “अहा रे वेडाबाई! काल एवढं कोष्टक
शिकलीस तरी आपलं डोकं रिकामच. अगं
चोवीस तासांचा एक दिवस, तीस दिवसांचा एक
महिना व बारा महिन्यांचं एक वर्ष. बरोबर एक
वर्षानं तुला खीर मिळणार, समजलीस?" हे
कोष्टक गौरीला तोंडपाठ होते, पण ह्या
कोष्टकाचा तिच्या अनुभवाशी काडीमात्र संबंध
नव्हता. तिची कालगणना अगदी तिची स्वत:ची
अशी होती. “गौरे, आपण तासाभरानं गाडीत
बसून फिरावयास जाऊ' असे म्हटले म्हणजे ती
चटदिशी तयार होते व दर दोन मिनिटांनी येऊन
विचारते, “झाला का गं तास?" तेच फिरून
येताना "चला घरी, फार उशीर झाला" असे
म्हटले म्हणजे ती ताडतोब म्हणते, “आत्ता तर

फिरावयास निघालो, इतक्यातच काय ग घरी
९२ / परिपूर्ती
 

जायचं?" तिचे तासच काय, पण क्षण, दिवस वगैरे सगळीच कालपरिमाणे अगदी रबरासारखी लवचिक व सर्वस्वी तिची स्वत:ची अगदी खासगी अशी आहेत. आम्ही तिचे आचारविचार घड्याळाच्या वाटोळ्या तबकडीत बसविण्याचा प्रयत्न करीत आहोत व ती बिचारी लौकरच ह्या प्रयत्नाला बळी पडेल, पण अजून तरी तिचे कालमापन स्वतंत्रपणे चालू आहे.
 असेच स्वतंत्र कालमापन लहानपणी, मला वाटते, सगळ्यांचे चालू असते. मोठेपणी मात्र आपली काळाची जाणीव दिशेच्या जाणीवेशी इतकी जखडून टाकलेली असते की, आयुष्यातील काही असामान्य प्रसंगीच दिङनिरपेक्ष काळाची जाणीव आपणास होते. रात्री निजले म्हणजे सकाळी उठेपर्यंत काही काळ गेला हे कळावयास मुलांना किती उशीर लागतो! कधी कधी मुले बोलतात त्यावरून आपल्याला त्यांच्या मनात डोकावता येत, पण ती बरेचदा आपले अनुभव सांगत नाहीत- तशी त्यांना गरज वाटत नाही. एखादे वेळी आपल्या लक्षात येते की, त्यांचे आणि आपले विश्व अगदी निराळे आहे म्हणून! नंदू काकाकडे राहावयास जाऊन आला होता व मी त्याला विचारीत होते की, काकाकडे काय काय गंमत केलीत म्हणून खेळणे, हुंदडणे, खाणे, भांडणे, वगैरेचे वर्णन झाल्यावर नंदू आठवण झाल्यागत थांबला व म्हणाला, “काकाकडे सगळं चांगलं होतं, पण रात्री झोप मात्र मुळीच येत नसे.” “म्हणजे काय बाबा? काय डास ढेकूण फार होते?" मी आश्चर्याने विचारले. "छे! ग! डास ढेकूण काही नव्हत... पण झोप यायची नाही एवढं खरं. जरा कुठे अंथरुणावर पडतो न पडतो तो चहाच्या कपबशाच्या खडखडाटानं जाग यायची." रात्री नवापासून सकाळी आठापर्यंतचा गाढ झोपेत घालविलेला अकरा तासांचा वेळ नंदोबाच्या मते काही क्षणांचा होता!
 आणि खरोखरच तो काही क्षणांचाच होता. त्या क्षणांना अकरा तास म्हणणे ही एक फसवणूक आहे. काल ही एक संवेदना आहे, व तिचे मोजमाप करायचेच तर कालपरिमाणानेच व्हावयास पाहिजे; पण आपण कालाची दिशेशी सांगड घातली आहे व दिशेची लांबी, रुंदी, खोली व उंची ही परिमाणे मोजून काळ मोजल्याचा आभास निर्माण करीत असतो. घडयाळ घटियंत्र, छायायंत्र, सर्वच साधने एका अचल पार्श्वभूमीवर दुसऱ्या हलणाऱ्या

वस्तूंचा संचार किती झाला एवढेच दर्शवितात. घड्याळाच्या गोल
परिपूर्ती / ९३
 

तबकडीवर काटे हलत असतात, त्या काट्यांच्या हलण्याच्या गतीवरून आपण क्षण, तास व दिवस मोजतो. छायायंत्रामध्ये एका उभ्या दांड्याची छाया प्रवास करते, व तिचा जमिनीवरील प्रवास किती झाला हे बघून वेळ ठरविता येतो. घटिकापात्रात तर दिशेची- अवकाशाची- सर्वच परिमाणे कालमापनासाठी योजतात. वाटीची सर्व लांबी, रुंदी व उंची भरली म्हणजे कालाचा एक घटक झाला असे मानतात- ह्या सर्व युक्त्यांनी आपण मोजतो काय, तर पदार्थांची सापेक्ष गती व त्याला नाव देतो कालाचे! सर्व पदार्थ जर सारखेच गतिमान असते तर काळ कसा मोजता आला असता? मी आगगाडीच्या डब्यातून प्रवास करताना बाहेरचे सर्व पदार्थ विरुद्ध दिशेने धावताना दिसतात, पण मी स्वतः गतिमान आहे ह्याची जाणीव मला नसते. पृथ्वीबरोबर पृथ्वीवरील सर्वच सजीव-निर्जीव पदार्थ फिरत असतात, पण त्याची आपणाला जाणीव कोठे आहे? आपल्याला जाणीव आहे ती फक्त पृथ्वीच्याच गतीने न फिरणाऱ्या वस्तूंची, व आपण त्यांचा कालमापनासाठी उपयोग करतो. वस्तूंचे स्थित्यंतर म्हणजे काळ अशीच आपण काळाची व्याख्या करून टाकली आहे. सूक्ष्मात सूक्ष्म व मोठ्यात मोठा काळ गेला हे दाखवितानाही आपण ह्याच व्याख्येचा आधार घेतो. निमिषमात्र म्हणजे डाळ्यांच्या पापण्यांची अवकाशात जाणारी एक हालचाल. जैन वाङ्मयात काळाचे एक अचाट कोष्टक सापडते. एक महायोजन लांब, तितकीच रुंद व तितकीच खोल अशी विहीर खणावी. ती कोकराच्या अगदी अतिशय बाराक कापलेल्या केसांनी इतकी ठासून भरावी की, त्याच्यावरून पूर लाटला तरी फक्त वरचा थरच भिजावा. अशा ह्या विहिरीतून दर युगशतानतर एक-एक केस काढीत ती रिकामी होण्यास जो वेळ लागेल तो पल्योपमा काळ! जैनांच्या कल्पनाशक्तीचे कौतुक वाटते, पण त्यांनाही काळाची कल्पना आली असे म्हणवत नाही. सर्व परिमाणे मुळी दिशेचीच दिली जाहत. 'युग' हा शब्द तेवढा कालदर्शक आहे, पण युग हे संवत्सरावर, सवत्सर दिवसावर व दिवस सूर्याच्या आकाशातील स्थलातरावर आधारलेला आहे असे पाहिले म्हणजे आपण मोजतो ते स्थित्यंतर, काल नव्हे, हे कळते.
 पण लहान मुलांना- अगदी तान्ह्या मुलांना- घड्याळ वगैरे माहीत

नसते तेव्हा काळ गेला हे कळतेच की नाही? ती कशी दर तीन साडेतीन
९४ / परिपूर्ती
 

तासांनी खायची आठवण ठेवतात-- रात्री निजली म्हणजे कशी अगदी नेमकी भल्या पहाटेस चार वाजता जागी होतात? आमचा नंदू म्हणे की, त्याच्या पोटात घड्याळ आहे. लहान मुलांचे सर्वच आयुष्य ह्या पोटातल्या घड्याळाबरहुकूम चालू असते- पण लहान मुलांना काळ गेला ही जाणीव असेलसे वाटत नाही. त्यांना जाणीव असते फक्त भुकेची. ती उठतात ती पोट रिकामी झाली म्हणजे... थकलेली इंद्रिये ताजीतवानी झाली म्हणजे ती टकटक बाह्यजगाकडे बघतात, उगीचंच हातापायांची हालचाल करतात, भूक लागल्यास पितात व थोड्याच वेळात परत झोपी जातात. आपण मोठी माणसे वेळ मोजतो आणि तो वेळ म्हणजे बाळाच्या भरल्या पोटातून अन्न आतड्यात प्रवास करते तो वेळ- ऊर्फ अन्नाचे पोटाच्या पिशवीतून आतड्यात होणारे स्थलांतर. म्हणजे परत चल वस्तूंचे एका विशिष्ट अवकाशातील भ्रमण! मुलांना काळाचे ज्ञान मोठी माणसे हळूहळू करून देतात पण त्यांना काळाची अनुभूती वा संवेदना कधी येते ते मात्र कळत नाही.
 थोडा वेळ माझे काळाचे ज्ञान बाजूला ठेवून माझी काळाची संवेदना वा अनुभूती काय आहे ह्याचा विचार केला तर ती गौरीपेक्षा निराळी नाही असेच दिसते. मलासुद्धा काही क्षण युगासारखे वाटतात व काही वर्ष क्षणासारखी वाटतात. आयुष्यातले कुठचेच दोन दिवस सारख्या लांबीरुदाचे वाटत नाहीत. कित्येक वेळा मुठीत घट्ट धरलेल्या वाळूच्या कणांप्रमाणे काळ झपाट्याने सरत असतो. तर कित्येकदा एखाद्या पर्वताप्रमाणे. स्थिर व अचल कालाची धोंड माझ्या हृदयावरून काही केल्या मला दूर करता येत नाही. ह्या अनुभूतीचा दिशेशी काही संबंध नसतो व ती सर्वस्वी आत्मगत असते. सर्वच संवेदना, मग ती कालाची असो, सुख-दुःखाची असो वा वस्तूची असो, अशी आत्मगत, स्वतंत्र असते. व्यवहाराच्या किंवा भाषेच्या द्वारे आपण तिला सार्वजनिक बनवतो. जेव्हा संवेदना भाषेच्याद्वारे सार्वजनिक बनते तेव्हाच निरनिराळ्या संवेदनाची तुलना करता येऊन ज्ञानलाभ होतो. कालाच्या संवेदनेला ज्ञानाच्या चौकटीत बसविण्यासाठी, सार्वजनिक बनविण्यासाठी, तिची दिशेशी सांगड घातली आहे व कालांतर म्हणजे स्थित्यंतर असे समीकरण आज सर्वांनी मानले आहे. आपण जसजसे म्हणजे

होतो.... जसाजसा इतरांशी आपला व्यवहार वाढतो, तसतसे काळाच्या
परिपूर्ती / ९५
 

मूळ संवेदनेचे स्वरूप आपण पार विसरून जातो व मूळ जाणिवेला माहीत नसलेले कित्येक गुणधर्म काळाला चिकटवतो. हेच आपले कालविषयक ज्ञान!
 काल सार्वजनिक केल्यामुळे तो सारखा एकजिनसी आहे व व्यक्तिनिरपेक्ष आहे असे मानणे अगदी चूक आहे. व्यावहारिक कालमापन सूर्याच्या आकाशातील स्थलांतरावर आधारलेले आहे. सूर्याचे स्थलांतर वास्तविक एक भास वा माया आहे व ही माया पृथ्वीच्या दैनंदिन गतीमुळे उत्पन्न होते. जेव्हा पृथ्वी तरुण पोर होती तेव्हा आतापेक्षा कितीतरी जास्त वेगाने आपल्याभोवती गिरक्या घेत होती. तिचा गिरक्या घेण्याचा वेग सारखा मंदावत आहे आणि जेव्हा ती आणखी वयस्कर होईल तेव्हा तिचा वेग हल्लीपेक्षा कितीतरी मंदावेल, आणि जेव्हा बिचारी मरणोन्मुख आणि जराजर्जर होईल तेव्हा तिच्या गाऱ्या-गाऱ्या भिंगोऱ्या पूर्णतया थांबतील. पृथ्वीवरील दिवस सारखा लांबतो आहे व एक वेळ अशी येईल की, काहींना अनंत दिवस मिळेल तर काहींना अनंत रात्रीच्या भयाण अंधारात कुजावे लागेल. तेव्हा सार्वजनिक काळ ही काही कधी न बदलणारी सर्वनिरपेक्ष अशी चीज मुळीच नाही, किंवा कोणत्या तरी शकाप्रमाणे कालगणना करू म्हटले तरी तीसुद्धा सर्वस्वी सांकेतिक व बरीचशी अनिश्चित अशी राहते. ज्या व्यक्तीच्या जन्मावरून शकगणना होते त्या व्यक्ती कधी जन्मल्या हेच नक्की माहीत नसते. शालिवाहन व विक्रम हे कधी झाले, ते खरोखरीच्या व्यक्ती होते की केवळ काल्पनिक पुरुष आहेत ह्याबद्दलच मुळात शंका आहे. ख्रिस्ती शकाची तीच कथा. बरे, ही शकगणना खरी म्हणून मानली, तरी ती जीवर आधारलेली आहे ती व्यक्ती कधी जन्मली? अशी विचारणा केली तर त्याचे उत्तर धड देता येत नाही. अर्थात ही कालगणना निरुपयोगी असे मी म्हणत नाही, पण ती असावी तितकी व्यक्तिनिरपेक्ष व दोषरहित नाही हे खास. जेथे अशा कालगणनेचा उपयोग असेल तेथे अवश्य करावा, पण सवच वैयक्तिक कालगणना त्यावरून करण्याचा आग्रह का? माझा शास्त्रज्ञ नवरा म्हणतो, “तुम्हा बायकांना कोणतीही घटना कधी झाली म्हणून विचारलं तर तुम्ही त्याचं कधी नीट शास्त्रशुद्ध उत्तर देणार नाही. अमक्या साली, अमक्या महिन्यात, अमक्या तारखेला, इतक्या वाजता असं कधी

तुम्ही सांगतच नाही-- काय तर म्हणे, 'जाई शाळेत जाऊ लागली तेव्हा नंदू
९६ / परिपूर्ती
 

तीन वर्षांचा होता- गौरी जिन्यावरून पडली तेव्हा नुकतीच आमची रात्रीची जेवणं आटपत होती.' ह्या बोलण्यावरून तुम्हा बायकांना काय अर्थबोध होत असेल देव जाणे! जाई १९३८ साली शाळेत जाऊ लागली- गौरी रात्री साडेआठच्या सुमारास जिन्यावरून पडली... म्हणजे कसं लख्ख सर्वांना कळतं." त्याच्या शास्त्रीय मनाला व्यक्तिगत कालगणना पसंत नाही हे उघडच आहे. पण खाजगी गोष्टींना सार्वजनिक कालगणना लावण्याचा अट्टाहास का हेच मला समजत नाही. सार्वजनिक कालगणना अगदी शास्त्रशुद्ध असती तर कदाचित हा अट्टाहास ठीक म्हटला असता, पण तीच जर तर्कशुद्ध नाही तर जेथे तिचा उपयोग खरा तेथे ती वापरावी, नाही तिथे इतर जास्त अन्वर्थक, सहेतुक कालगणना करण्यास प्रत्यवाय का? शिवाजीराजे १६३० मध्ये जन्मले व १६८० मध्ये वारले असे म्हटले तरी ठीक झाले. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषांच्या जन्मेतिहासाचे कालमापन सार्वजनिकरित्या व मानवेतिहासाला महत्त्वाच्या ठरलेल्या दुसऱ्या घटनेशी संबंध जोडून अवश्य करावे. पण माझ्या जाईच्या शाळेत जाण्याची ख्रिस्ताच्या जन्माचा संबंध जोडणे निरुपयोगी व म्हणून अशास्त्रीय नाही का? मी कधी मॅट्रिक झाले ते मला सांगता येत नाही. एवढे बारीक आठवते की, माझ्या धाकट्या भावाची मुंज त्या वर्षी झाली. त्या मुंजीच्या निमित्ताने मला आईने घेतलेल्या शालूची आठवण येते. आमच्या पुण्याच्या घरच पहिलेच मोठे कार्य म्हणून सर्व नातेवाईक मंडळी आली होती ते आठवत; माझ्या भावाला पुढ्यात घेऊन मातृभोजनाला बसलेली आई डोळ्यापुढे दिसते; कधी नव्हत ते सोवळ्याचा पीतांबर नेसलेली, अंगावर शाल पांघरलेली माझ्या वडिलांची भव्य मूर्ती आज पुढ्यात उभी आहे असे वाटते. पण मी अमक्या साली मॅट्रिक झाले असे म्हटले तर त्यापासूनच मला अर्थ बोध होत नाही. की माझ्या व माझ्या स्वकीयांच्या आयुष्यातील एक सुखमय घटना म्हणून संवेदना होत नाही. 'ख्रिस्ताच्या जन्मानंतर एकोणीसशे अमुक वर्षानंतर तुझं लग्न झालं' हे म्हणणे जास्त बरे की, 'लग्न झाल तेव्हा तुला नुकतीच नोकरी लागली होती- लग्न झाल्यावर तुझ्या बायकोच्या परीक्षेचा निकाल लागला' अशी इतर घरगुती घटनांना सापेक्ष अशी कालगणना बरी अशी विचारणा केली तर, मला वाटते, अगदी पक्का शास्त्रीय माणूससुद्धा

आमची बायकी कालगणनाच पत्करील.
परिपूर्ती / ९७
 

 अवकाशाचे अत्यल्प परिमाण बिंदू हे आहे. ह्या बिंदूला अवकाशात स्थान असते. पण लांबी-रुंदी-उंची नसते. त्याचप्रमाणे कालाचे अत्यल्प परिमाणही बिंदुमात्रच आहे. आपल्याला अवकाशाची वा कालाची जी सवेदना होते ती मात्र कधीही बिंदुमात्राची नसते. अवकाशाची संवेदना डोळ्यांनी व शरीराच्या हालचालींनी होते, व दर वेळी ती संवेदना ज्याला लांबी नाही, रुंदी नाही, अशा रोडक्या अवकाशाची नसून लांबी, रुंदी व खोली ह्या तीन परिमाणांबरोबरच रंग व प्रकाश ह्यांनी भरगच्च भरलेली व भावनांनी जिवंत अशी असते. हा संवेदित अवकाश बिंदू-बिंदू मिळून झाला असे मुळी आपल्याला कधीच प्रत्यक्षपणे कळत नाही. जशी अवकाशाची सवेदना साकार, सवर्ण असते तशी कालाची संवेदनासुद्धा नेहमीच घटनांनी भरलेली, भावनांनी प्राणलेली अशी होते. फार काय, आपल्याला काळाची हात नाही. आपण काळ जगत असतो व घटना अनुभवीत असतो. तकष्टया अवकाशाच्या प्रत्येक बिंदच्या मागे, पुढे, वर, खाली अवकाशाचे इतर बिदू असतात, संवेदनात्मक अवकाश नेहमीच एक मोठा तुकडा असतो पाच्या अवतीभोवती अंधुक जाणलेली पण पूर्ण संवेदित न झालेली अशी अवकाशाची सबंध अस्पष्ट मर्यादा असते. त्याचप्रमाणे, संवेदनात्मक काळ हा नहमीच एक मोठा छेद असतो व त्याच्या पुढचा-मागचा काळ अधुकरीत्या त्याला मर्यादा म्हणन जाणीवेत असतो. बिंदुमय अवकाश व त्याचे योगाने मोजलेला बिंदमय काळ ह्यांच्यातील प्रत्येक बिंदू इतरापासून विलग असतो- प्रत्येक बिंदू एकापुढे एक असतो. प्रत्येक क्षण गेलेल्या क्षणाच्या पुढे व येणाऱ्या क्षणाच्या मागे असतो. पण संवेदित दिक व संवेदित काल हा पुजरूप असल्यामुळे त्यात पुढचे व मागचे ह्या मर्यादा पुसट झालेल्या असतात. साकार. सवर्ण अवकाशात आकाराची व वर्णाची जाणीव एकदम होते. त्यात अमके मागे, अमके पुढे असे नसते. त्याचप्रमाणे घटनात्मक कालाचा प्रत्येक तकडा भूत, वर्तमान व भविष्य मिळून झालेला असतो. संवेदित कालाच्या प्रत्येक क्षणावर मावळत्या भूतकाळाची छाया व उगवत्या भविष्याचे अरुणकिरण दाट पसरलेले असतात. आपल्या संवेदनेतील काल हा भूत, वर्तमान व भविष्य ह्या तीन परिमाणांचा बनलेला असतो. वर्तमानाच्या जाणिवेत भूताचा वा भविष्याचा किती लांब तुकडा

येईल हे अर्थातच संवेदनेवर अवलंबून असणार. प्रत्येक क्षणाची लांबी-रुंदी
९८ / परिपूर्ती
 

जर बदलती असेल तर त्याची भूतभविष्याची परिमाणेही थोडीबहुत लवचिकच असणार. कधी चालू क्षणाचीच जाणीव इतकी तीव्र असेल की, इतर क्षण केवळ नाममात्र त्यात असणार, तरी कधी टेकडीवर उभे राहून अफाट अवकाशाचे क्षेत्र पाहता येते, त्याचप्रमाणे जाणीवेच्या एका क्षणात अनंत भूतकाळ व अनंत भविष्यकाळही दिसावयाला काहीच हरकत नाही.
 ज्याला आपण स्मरण वा आठवण म्हणतो ती वर्तमानकाळात जीवंत असलेली भूताची संवेदनाच नाही का? राम विश्वामित्राबरोबर जात असताना वामनाश्रमापाशी येऊन पोचल्यावर त्याच्या मनात खळबळ झाली असे कालिदास म्हणतो, आणि तेसुद्धा कसे तर पूर्वजन्मचेष्टाची आठवण न होतासुद्धा! प्रत्यक्ष घटना विसरल्या, पण त्या घटनांच्याबरोबर अनुभवलेल्या भावना मात्र राहिल्या. दुष्यंत एवढा विलासी, नाना स्त्रियांबरोबर प्रणय करून त्यांना विसरून जाणारा, पण त्याचेही सौंदर्यपिपासू मन एका क्षणाच्या सौंदर्यप्रचीतीने अनेकदा अनुभवलेल्या व अनेकदा विसरलेल्या, जुन्या काळच्या, जणू गतजन्माच्या झालेल्या सौंदर्योपभोगाच्या स्मृतीने विव्हळ झालेच ना? येथेही कालिदास 'अबोध' हेच विशेषण वापरतो, पण जन्मांतरीचे व्यापार कसे तर 'भावस्थिर सौहृद'रूपी प्रत्यक्ष प्रणयाची जिच्याशी प्रणय केला त्या व्यक्तीची स्पष्ट आठवण नाही, पण त्या वेळची भावना मात्र ह्या क्षणाला अंत:करण हलवते. वर्तमानकाळातील भूताच्या प्रचीतीचे कालिदासाचे वर्णन हे असे आहे. जैनवाङ्मयात जरी इतक्या काव्यमय पद्धतीने नाही तरी जन्मांतरीच्या स्थितीची जाणीव वर्तमानातील प्रसंगावरून झाल्याची उदाहरणे जागजागी विखुरलेली आढळतात. ही प्रचिती सौंदर्यप्रचीतीच्या द्वारे झाल्याचीच उदाहरणे दिसून येतात. पण मला वाटते इतरही संवेदना भूतकाळाचे वर्तमानकाळाशी साहचर्य घडवून आणावयास समर्थ आहेत. कलावंताच्या हृदयाला हा अनुभव सौंदर्याच्याद्वारे येतो इतकेच. उत्तर रामचरितात भूत, वर्तमान व भविष्य ह्यांची एकता, ह्यांचे एका अविभाज्य अनुभवात दर्शन, अती उत्कटतेने दाखविले आहे. राम, सीता व लक्ष्मण चित्ररूपाने रामाच्या पूर्वचरित्राचे अवलोकन करीत आहेत, त्या चित्रांच्या दर्शनाने गतानुभव इतके उसळून

येतात की राम व सीता हे सर्व प्रसंग पूर्वी घडलेले आहेत हे विसरून शोकाने
परिपूर्ती / ९९
 

विव्हळ होतात. पूर्वी अनुभवलेले दु:ख हे सुखाच्या क्षणी सुखकारक व्हावे- दु:ख झालेच तर आजच्या क्षणाची सुखानुभूती वाढवण्यापुरते व्हावे- पण ह्या अंकात तसे न होता रामाचा शोक व मन:संताप वाढतच जातो- वाचणाराचेही मन जड होते. लवकरच होणाऱ्या अतिदुःखदायी व शोककारक घटनांची त्या प्रसंगावर छाया पडलेली आहे. खरे म्हटले म्हणजे सीतारामांनी आयुष्यातील आत्यंतिक सुखाचे शिखर ह्या अंकात गाठलेले आहे... पण अंकातील वातावरण आनंदाने फुलत नाही. ह्याचे कारण ह्या अकात सीता-रामाच्या वर्तमानाच्या संवेदना भूत व भविष्याशी निगडीत झालेल्या आहेत व त्यांच्या सावल्यांनी सुखाचे क्षण झाकळून टाकले आहेत.
 ही त्रिकालसंवेदना फक्त कलावंतांना होते, इतरांना नाही, असे मुळीच नाही. सर्वांना ती असते- मला वाटते काही परिस्थितीत पशूनासुद्धा ही सवदना होते. कालाची संवेदना त्रिपरिमाणात्मक असल्यामुळे एका क्षणात मागचा व पुढचा क्षणही सामावलेले असतात. वोल्फगांग कोलरने काही पानराच निरीक्षण केले. त्यात पुढील हकीकत सांगितली आहे. चिंपाझी वानरांच्या एका पिंजऱ्यातच हात पुरणार नाही व उडी मारूनही हाती गणार नाही इतक्या उंच एक केळ्यांचा घड टांगला होता. एकात एक असतील असे पोकळ वाशांचे तुकडेही पिंजऱ्यात होते. वानराने पहिल्याने हात लाब करून, नंतर निरनिराळ्या लांबीचे वाशांचे तुकडे हातात घेऊन, कळ्यापर्यंत पोहोचता येते का ते पाहिले. व शेवटी निराश होऊन ते खाली बसले. काहीतरी चाळा म्हणून ते त्या वाशाच्या तुकड्याशी खेळत होते. ळता खेळात सहज गमतीने एका वाशाचे टोक त्याने दुसऱ्यात बसवले. ही पा होताक्षणीच वानर तात्काळ उडी मारून उठले, व आता लांब सालल्या काठीने त्याने ताबडतोब केळ्यांचा घड हस्तगत केला. ज्या शाला काठ्या एकात एक सांधल्या गेल्या त्याच क्षणाला वानराच्या मनात व्याचा घडही हस्तगत झाला होता- भविष्यात होणाऱ्या क्रियेची जाणीव " पूर्णतया झाली होती. फक्त क्रिया घडण्यास वेळ लागला इतकेच. सर्व क्रयच्या बुडाशी त्रिकालपरिमाण असलेल्या कालाची संवेदना असतेच.

मा एक पाय भूतात रोविलेला असतो तर एक पाय पुढच्या क्षणातं टाकलेला असतो.
१०० / परिपूर्ती
 

 आपले व्यवहारही असेच चाललेले असतात व क्वचितप्रसंगी कालाचे दिङनिरपेक्षत्व आपणास अगदी तीव्रतेने जाणवते. गौरी उदाहरणे सोडवीत बसली होती. भागाकार-गुणाकाराचे प्रश्न होते. गौरीचे उदाहरण काही केल्या बरोबर येईना. म्हणून ती आपल्या बापाकडे आली. “बघ रे, काही केल्या उत्तर बरोबर येत नाही." येणार कसे उत्तर, गौरे? भागाकाराच्या तिथ गुणाकार केलास, आणि त्यातही आकडेमोडीच्या चुका!" आणि मग भागाकार कुठे व गुणाकार कुठे ह्याची समज तिला काही केल्या होईना. मी तिच्याकडे पाहात होते व बापलेकीचे संभाषण ऐकत होते. आधी मुळी गौरीचे लक्ष नव्हते. मग जेव्हा ती ऐकायला लागली तेव्हा ती बापाच्या तोंडाकडे बघून काहीतरी उत्तर द्यायची. होता होता तिचा जास्तजास्तव गोंधळ उडू लागला. “गौरे, तुला व चंदूला रोज एक एक लाडू दिला तर चार दिवसात तुम्ही किती लाडू खाल?" "गौरे, विचार कसला करतेस? रोज किती लाडू लागतात तुम्हाला?" गौरीने उत्तर दिले, “चार." "अग गऊ, असं काय करतेस? तू एक खातेस व चंदू एक खातो, मिळून किती?" पण गौरीचे तोंड लाल झाले होते. डोळे पाण्याने डबडबले होते- छे! ती गौरी नव्हतीच मुळी. मी थरथरत मास्तरांच्या पुढे उभी होते. माझीच भागकार- गुणाकाराची उदाहरणे चालली होती. मास्तर अर्धवट कीव येऊन अर्धवट रागाने माझ्याकडे बघत होते, माझे मन बधिर झाले होते. मास्तर काय बोलतात हे कानांना ऐकू येत होते, पण कळत नव्हते. पुढच्या क्षणात जागा झाला व बापलेकीची प्रश्नोत्तरे व्हायच्या आधीच मला समजली होती. इतक्यात त्याने विचारले, “गौरे, एक न एक किती?" गौरी बरोबर उत्तर देणे शक्यच नव्हते, पण तिने बापाच्या गळ्याला मिठी मारून रडायला सुरुवात केली व मी भानावर आले. क्षणापूर्वी मला मराठी दुसरीतल्या आठवणी विचारल्या असत्या तर अगदी प्रयत्न करूनही मला काही आठवले नसते, पण अर्धवट तद्रीत पसतीस वर्षांपूर्वीचा भूतकाल माझ्या आताच्या क्षणात जागा झाला व त्याच क्षणात पुढच्या चार-दोन पळांत काय होणार तेही मला कळले. आताचे भविष्यज्ञान म्हणजे केवळ भूतकाळाची पुनरावृत्ती नव्हती. मास्तरांनी मला पुढे काहीही न विचारता वर्गांच्या बाहेर उभे राहण्यास पाठवले होते, पण गौरीला काय प्रश्न येणार हे मला अगदी स्पष्ट कळले कारण

वर्तमानकाळाशी माझी संवेदना संपूर्ण होती व हे पूर्णत्व भावी क्षणाच्या
परिपूर्ती / १००
 

जाणीवेशिवाय येणे शक्य नव्हते. जो भूतकाळ आपण जगत असतो तो सध्याच्या क्षणाला लागून अर्धा होऊन गेलेला असतो असे मुळीच नाही. हा क्षणबिंदू त्याच्या अलीकडच्या क्षणबिंदूशीच संलग्न असला पाहिजे ही कल्पना अवकाशबिंदूंच्या तुलनेवरून उचलली असते. वर्तमानातील कालबिंदू भूतकालात कुठल्याही कालच्छेदाशी एकत्व पावेल. फक्त आताच्या व त्या वेळच्या संवेदनात एकात्मता असली पाहिजे. अगदी हेच तत्त्व क्रोचेने आपल्या इतिहासाच्या विवेचनात दिले आहे, तो म्हणतो, "मानवेतिहासाचे कित्येक कालखंड पार विसरून गेलेले असतात- इतिहासाच्या पुस्तकात सनावळ्यात व बखरीतून ते बिचारे मूक, निर्वासित जावन कठीत असतात. पण कुठच्या ना कुठच्या तरी नव्या पिढीच्या जावनात त्यांना सहसंवेदना मिळून पुनर्जन्म मिळतो व ते परत नवचैतन्याने स्फुरतात. प्रत्येक पिढी आपल्या जीवनाशी एकात्म असलेल्या गतकालाला- गतेतिहासाला- जिवंत ठेवीत असते, वर्तमानात आणीत असते. मनुष्ययुगाचा धार्मिक अंधश्रद्धेचा काल संपून युरोप शास्त्रीय प्रगतीच्या मार्गावर आले तेव्हा थडग्यात दीर्घ निद्रा घेणारा ग्रीक व रोमन इतिहास खडबडून जागा झाला; आणि रानटी, मागासलेल्या समजल्या लल्या मध्ययुगीन इतिहासाला बायरन, शेले, आदीकरून कवींनी उजळ दिला."
 आपली कालसंवेदना निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या प्रकारची असते- पण एक वैशिष्ट्य म्हणजे ती दुहेरी असते. एकाच वेळी निरनिराळ्या कालसवेदना आपण अनुभवीत असतो. वर्तमान क्षणाचा अनुभव घेणारा एक भाग व त्या अनुभवाची नोंद वा निरीक्षण करणारा दुसरा भाग अशी सवदनाची तहा असते. दुसरीचा गणिताचा तास आज पस्तीस वर्षांनी अनुभवणारी मी; एकीकडून गौरीचा गोंधळ दिसणारी मी आणि आज चाळीस वर्षांची मी ह्या सर्व तिन्ही 'मी'च्या अनुभवाची नोंद करणारे एक खा उदासीन पृथगात्म मीपण असते, आणि ह्या पृथगात्म मीची कालगणना काही निराळीच असते. ह्या मीला स्वत: कालातीत असल्याची जाणीव असते, व बाकीच्या सर्व मीचे जीवन निरनिराळ्या कालप्रवाहात झपाट्याने वाहत असल्याची जाणीव असते. म्हणजे निरनिराळ्या व्यक्तींचा

काळ निरनिराळा असतो. एवढेच नव्हे तर एकाच व्यक्तीला एकाच वेळी
१०२ / परिपूर्ती
 

(घड्याळाप्रमाणे!) निरनिराळ्या कालसंवेदना एकसमयावच्छेदेकरून होत असतात.
 संवेद्य काळ हा इतक्या विविध त-हेने जाणवतो की, काळ ही काय चीज आहे ते सांगणेच कठीण होते. मग मनुष्याने ह्या काळाशी दिशेचे लग्न लावून साधले काय? ह्याचे उत्तर काठक संहितेत एका अतिलघू व अतिरम्य कथेत दिले आहे (ही कथा श्री.श्रोत्रियांच्या 'वेदातील गोष्टी' ह्या लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकात मी पहिल्याने वाचली.) ती कथा अशी; पहिल्याने फक्त दिवसच होता. रात्र नव्हती. यमीला भावाच्या मरणाचे दु:ख सहन होईना. देवांनी तिला विचारले, “यमे तुझा भाऊ कधी गेला?" म्हणजे तिने म्हणावे, “आजच. मग देवांनी विचार करून रात्र उत्पन्न केली. रात्रींमागून दिवस व दिवसांमागून रात्री गेल्या व यमी (काळ गेला हे जाणून) भावाचे दु:ख विसरली- यमीला भावाचे दु:ख विसरायला लावायची देवांची युक्ती सफळ झाली. पण देव झाले तरी मानवाचे पूर्वजच ना! मनुष्य काहितरी मनात योजून कृती करीत असतो. त्या कृतीपासून त्याला हवे ते कधीकधी मिळतेही; पण मनुष्याची प्रत्येक कृती इष्टफलाबरोबरच नेहमीच आयोजित अकल्पित फळही देत असते. असेच अगदी ह्या देवांच्या युक्तीचे झाले सर्व जगातील दुःख सह्य झाले खरे, पण त्याबरोबर सुखही क्षणभगुर झाले. वनवासात दु:खात काळ कंठणाऱ्याला “हेही दिवस जातील' हा मंत्र सुखाचा वाटला खास, पण हुमायूनाचे मन गादीवर बसल्यावर ह्या उक्तीचा आठवणीने विषण्ण झालेच असले पाहिजे. काळ जातो आहे, क्षण नष्ट होता आहेत- दिवस मावळतो. रात्र सरते, पण त्याबरोबर आयुष्य झरते, सुखाला ओहोटी लागते. काळ झपाट्याने जात आहे ह्या भावनेने फक्त यमी काय ती सुखी झाली. पण त्याच क्षणभंगुरत्वाच्या जाणीवेने मानवी सुखात कायम विष कालवले ना? सुखाच्या प्रत्येक क्षणाला, “देवा, हा क्षण माझ्या आयुष्यातला शेवटलाच ठरो' हे मागणे आपण उत्कटतेने मागतोच ना? सर्व वेदान्त, सर्व आरोग्यपर तत्त्वज्ञान म्हणजे जाणीवेचेच फळ ना? दुख विसरायला काळाला दिशेचे बंधन घातले आणि मग जेव्हा ह्या कालचक्रात सापडून मानव अगतिक झाला त्यावेळी, कधीही नष्ट होणाऱ्या चिरंतन तत्त्वाच्या शोधाला लागला. ह्या चिरंतन तत्त्वाचे उपनिषदात जागोजागी जे

वर्णन आढळते ते दिङनिरपेक्ष स्वसंवेद्य काळाचेच असावे असे मला वाटते.
परिपूर्ती / १०३
 

"तदेजति तन्नैजति, तददूरे तद्वदन्तिके। तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः।।' अशी काळाची संवेदना नाही का? तो कधी पळतो, कधी स्थिर असतो; तो आपल्या सगळ्यांच्या जाणीवेत असतो, तसाच आपल्या सर्वांच्या बाहेर आपल्याला व्यापून राहिलेला आहे! ह्या काळाचे आपण बाहुले आहो का काळाचे निर्माते आहो! खरे काय कोणास ठाऊक!