परिपूर्ती/नव-कलेवर

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search१४
नव-कलेवर

 “सुभा, तुला नाही वाटत की, देवळात
काही निराळेच वातावरण आहे म्हणून?"
 जगन्नाथाचे वाट्यांएवढे गोल गरगरीत
डोळे विचाराने जरा संकोचले होते, आवाजात
कातरता जाणवत होती; पण सुभद्रेचे मुळी लक्षच
नव्हते, भाऊ काय बोलतो तिकडे; ती आपल्या
साडीची किनार नीट चापूनचोपून बसविली आहे
का नाही ते पाहत होती आणि चारपदरी हारातील
मधले चार लोंबते खडे बरोबर एकाखाली एक
आले असल्याची खात्री करून घेत होती.
सकाळची पूजा झाली की, दुपारचा भोग
येईपर्यंतचा मधला वेळ ती रोज असा घालवी;
पण आजच्या निरीक्षणाने तिला काही रोजचे
समाधान लाभले नाही. आपल्या चंद्राकृती
तोंडाचा चंबू करण्याचा प्रयत्न करीत ती
पुटपुटली, “हा पुजारी म्हातारा झाला आहे फार;
काय वेंधळ्यासारखी साडी नेसवली आहे! आणि
धसमुसळेपणानं माझ्या हनुवटीच्या बाजूचा
कागदसुद्धा थोडा फाटला आहे. बरं झालं
लवकरच सर्वांगस्नानाचा दिवस आहे म्हणून.
माझा मुखवटा ठिकठिकाणी सैल झाल्यासारखा

झाला आहे; त्या दिवशी नवा मुखवटा मिळाला
१०६ / परिपूर्ती
 

म्हणजे तोंड कसं सुरेख दिसेल!'"तिचा क्षणिक रुसवा नाहीसा झाला. स्नान करून, नव्या मुखवट्याने आपण रथात बसलो आहोत व लाखो मानव भोवती जयघोष करीत आहेत ह्या स्वप्नात ती पुजाऱ्याचा अपराध विसरली.
 जगन्नाथाची खिन्नता आणखी वाढली. “पोरी, यंदा रथयात्रा आपल्या नशिबी आहे का नाही कोण जाणे!" तो भरल्या गळ्याने म्हणाला. सुभद्रेचे लक्ष नाही हे पाहून तो आणखी काही बोलणार एवढ्यात सुभद्रेच्या पलीकडून दटावणीचा गंभीर आवाज आला, “कृष्णा, तुझ्या शंका-कुशका मनातच ठेवीनास? तिच्या सुखी जीवनाला काळजीची कीड लावून तुला काय मिळणार? जे होणार ते चुकत नाही. त्याचा विचार करून काय उपयोग?” “बरं आहे, दादा.” जगन्नाथ पडल्या आवाजात म्हणाला. गाभाऱ्यात घुमणारा आवाज थांबला. परत सर्वत्र शांतता पसरली. पुरीच्या जगन्नाथाच्या मंदिरातील मूर्ती आपले निश्चळ डोळे समोर लावून उभ्या होत्या. पाच-पंचवीस दर्शनेच्छू भाविक अंधारातच चाचपडत पंड्यांचे हात धरून गर्भगृहात येत होते. पायांखालची जमीन ओलसर, बुळबुळीत लागत होती. यात्रेकरू एकमेकांचे हात धरून जपून चालले होते. ही वेळ व हा महिनाही विशेष गर्दीचा नव्हता, पण जगन्नाथाच्या देवळात दोन-चारशे लोकांची आवकजावक नाही असे क्वचितच होई. अंधारातून गाभाऱ्यात गेले म्हणजे तेथे लावलेल्या समयांच्या उजेडात देवाचे पहिले दर्शन होते ते आश्चर्यकारकच वाटते. समोर तीन प्रचंड उभ्या आकृती व त्यांची चमत्कारिक रंगवलेली तोंडे दिसतात. डाव्या हाताला सात फूट उंचीचा पांढऱ्या शुभ्र तोंडाचा, मोठाल्या शंखाकृती डोळ्यांचा बलभद्र, उजव्या बाजूला सहा फूट उंचीचा काळ्याभोर तोंडाचा व मोठाल्या गोल डोळ्यांचा जगन्नाथ ऊर्फ कृष्ण व दोघांच्यामध्ये ठेंगणीशी, चार फुटांची, पिवळ्या तोंडाची सुभद्रा असे हे देवतात्रय आहे. ह्या श्रद्धावस्तूंना मूर्ती हा शब्द योग्य होणार नाही; प्रथमदर्शनी त्यांच्यात मानवी असे काही वाटत नाही. मूर्तीची नके तेवढी मोहि, पुढे आलेली व्यंगचित्रासारखीच दिसतात. हात म्हणजे कमरेपासून पुढे आलेले दोन दोन दांडकी आहेत व त्यावर लहान मुले काढतात तसे डोळे, नाक व तोंड काढली आहेत. कपाळ व भुवया जवळजवळ नाहीतच. डोळे भक्तांकडे रागाने रोखल्यासारखे वाटतात. तर तोंडाच्या

लालचुटूक चन्द्रकोरीचे अक्षय हास्य मानवांना वेडावून दाखवते आहे अशी
परिपूर्ती / १०७
 

भावना होते. ह्या मूर्ती लाकडाच्या ओंडक्यांच्या बनवलेल्या आहेत. दरवर्षी ज्येष्ठी पुनवेला त्यांना सर्वांगस्नान घालतात. त्या मूर्तीच्या तोंडाचा रंग धुवून जातो. देवळाचे दरवाजे बारा दिवस बंद असतात. देवाचे दैता (दैत्य) नावाचे सेवक मूर्तीना मुखवटा चढवून तो रंगविण्यात गुंतलेले असतात. मुखवटे रंगवून झाले की, देवांना नवा साज चढवतात व मूर्ती मंदिराबाहेर आणून तीन निरनिराळ्या रथांत ठेवतात आणि जगन्नाथाच्या रथयात्रेला प्रारंभ होतो. रथयात्रेच्या आदल्या दिवशी नवा रंग दिलेल्या मूर्तीचे भक्तांना दर्शन होते. ह्या दर्शनाला 'नवयौवन' दर्शन म्हणतात. सुभद्रा गुंतली होती ती ह्याच स्वप्नात. वर्षभर पुजून पुजून जुने झालेले तोंड धुऊनपुसून स्वच्छ होईल; बारा दिवस चेहऱ्याची रंगरंगोटी चालेल; नंतर 'नेत्रोत्सवा'च्या दिवशी डोळे रंगवतील; मग महावस्त्रे अंगावर चढवतील आणि मंदिराचे दरवाजे उघडले म्हणजे हजारो लोक एकमेकांना ढकलीत, चिरडीत माझे 'नवयौवन' निरखतील असे ती मनात म्हणत होती-
 पण जगन्नाथाचे मन सुचिंत नव्हते. चैत्री पूर्णिमेला ‘दयिता' सेवक 'बसेली' देवीच्या मंदिरात गेले होते. त्यांना नवघटस्थापनेचा कौल मिळाला होता व त्यांनी ‘बसेली'च्या गळ्यातील माळ देवीच्या अनुमतीचे निदर्शक म्हणून 'भितरेछ' महापात्राच्या स्वाधीन केली होती, इतकी हकीकत पुजाऱ्यांच्या बोलण्यातून त्याने ऐकली होती. त्याच्याही आधी "यंदा अधिक आषाढ आहे' हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडी होते. 'अधिक आषाढ' ह्या शब्दांनी देवाच्या मनात हुरहूर उत्पन्न झाली होती; जणू जन्मांतरीच्या स्मृती जागृत होत होत्या.
 खरोखरच 'अधिक आषाढ' हे शब्द जन्मांतरींच्या स्मृती जागृत व्हाव्यात असेच होते. वीस वर्षांत जेव्हा अधिक आषाढ येतो तेव्हा जगन्नाथाच्या देवळातील मूर्ती नव्याने बनतात. आज वैशाख पूर्णिमा; सकाळी पाच वाजता भितरेछ महापात्र नेहमीप्रमाणे आले व त्यांनी देवळाचे दरवाजे उघडले. सिंहद्वारामागून एक एक दार उघडीत शेवटी गर्भगृहाचे दार उघडले. महापात्र किंवा नुसते पात्र असे नाव उडिशात पएकळ ब्राह्मणांचे असते. 'भितरेछ' म्हणजे 'अभ्यंतरेश' असावे असे दिसते ह्यांच्याकडे देवळाच्या आतील सर्व व्यवस्था असते. देवाचे नवे करावयाचा हुकूमही तेच देतात. आज गर्भगृहाचे दार

उघडबरोबर ते आत आले, देवाच्या पायांवर त्यांनी डोके ठेवले. मग
१०८ / परिपूर्ती
 

मागे सरून, हात जोडून, डोळे मिटून क्षणभर उभे राहिले. त्यांच्या डोळ्यांतून आसू ओघळलेले दिसले. त्यांनी उपरण्याने डोळे पुसले. “प्रभू! ठाकूरजी! मर्जी तुझी!' असे म्हणून ते बाहेर गेले. बाहेर ‘दयित' सेवक हात जोडून उभे होते. “जा, दारुशोधार्थ जा, यंदा नव्या घटाची स्थापना करायची!” अशी आज्ञा त्यांनी दिली व जड पावलांनी ते मंदिरातून परतले. इतर सेवायतांचे डोळे थोड्याशा उत्सुकतेने व करुणेने त्यांच्याकडे लागले होते. ज्या वर्षी नव्या मूर्ती बसतात त्या वर्षी भितरेछ महापात्र मरतात असा सर्वांचा समज आहे. (१९५० साली नव-कलेवर वर्ष होते व उत्सव आटपल्यावर भितरेछ महापात्र मेले अशी माहिती ओरिसा सरकारच्या माहितीखात्याने प्रसिद्ध केली आहे.) दारु म्हणजे लाकूड. देवतांच्या मूर्तीचे लाकूड काही विशिष्ट गुणधर्म व चिन्हे असलेल्या कडुलिंबाच्या झाडाचे असावे लागते. फार प्राचीन काळी जगन्नाथ हा शबर लोकांचा देव होता व तो त्यांनी गप्त ठिकाणी ठेवला होता. माळव्याच्या इंद्रद्युम्न राजाच्या विद्यापती नावाच्या पुरोहिताने शबरराजकन्येचे प्रेम संपादून देवाचे गुह्यस्थान हडकून काढले व मग इन्द्रद्युम्न राजाने देवाची जगन्नाथ ह्या नावाने पुरी येथे स्थापना केली अशी कथा आहे. विद्यापतीने शबरराजकन्येशी लग्न केले. त्याचे वंशज ते दयित (दैत्य?) सेवायत. हे दैत लोक जगन्नाथाला आपला वंशज मानतात. रथोत्सवाचे वेळी व स्नानपूर्णिमेनंतर देव त्यांच्या स्वाधीन असतात. देवाचे नवे विग्रह करण्याचे कामही त्यांचेच असते. भितरेछ महापात्राची आज्ञा मिळाल्यावर सर्वजण मिळून जवळच असलेल्या काकतपूर गावी मंगलादेवीच्या दर्शनाला गेले. तेथे एका सेवायताच्या अंगात देवीचा संचार होऊन झाडे कुठे आहेत ते कळले. मग तेथे जाऊन सोन्या- चांदीच्या कु-हाडीचे पहिले घाव घातल्यावर झाडे तोडून रथात ठेवली व वाजतगाजत पुरीला आणली. तीनही झाडांचे जाड बुंधे देवळाच्या आवारात नेऊन 'विश्वकर्मा' नावाच्या वंशपरंपरा मूर्ती घडविणाऱ्या सेवायतांच्या हवाली करण्यात आले. आता अवधी थोडा उरला होता. स्नानपूर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आषाढ सुरू होतो. (उत्तरेकडे महिना आपल्याकडच्यासारखा अमावास्यान्त नसून पौर्णिमान्त असता.) तो वेळी देवतांना रंगरंगोटी चालते. त्याच्या आत मूर्ती घडल्या पाहिजेत.

मर्तीचे शिल्प काही मोठे से कठीण नव्हते. मूर्ती लवकरच तयार झाल्या व
परिपूर्ती / १०९
 

तीन लहान-लहान रथांत बसवून त्यांना ‘अनवसरघरां'त आणले.
 स्नानपूर्णिमेच्या दिवशी स्नान झाले की संध्याकाळी जगन्नाथ आपल्या भावा-बहिणीबरोबर मुख्य गर्भगृहात न जाता अनवसर मंडपात जातो व देवालयाचे दरवाजे बंद होतात. स्नानामुळे धुवून गेलेला रंग व मुखवटा नवा चढवतात तोवर देव भक्तांना दर्शन देत नाही म्हणून 'अनवसर' असतो व त्या काळात राहण्याचे ठिकाण ते 'अनवरसघर' ऊर्फ 'मंडप.'
 इकडे मूर्ती घडत असता जुन्या विग्रहांचे उपचार व भोग रोजच्याप्रमाणे चालू होते. स्नानपूर्णिमेच्या दिवशी तिन्ही मूर्तीचे भक्तांचे देखत स्नान झाले व नेहमीप्रमाणे तिघेही अनवस घरात गेली. सुभद्रा वाट पाहात होती की, आता दैत सेवायत येऊन आपल्याला दरवर्षीप्रमाणे नवलावण्य देतील म्हणून; पण आज काही निराळाच प्रकार होता. रथांचा आवाज ऐकू आला व तीन नवीन मूर्तीना आणून जुन्या मूर्तीसमोर उभे केले. आता प्रश्न जन्मांतरीच्या आठवणीचा नव्हता, प्रत्यक्ष जन्मांतरीचे दृश्यच डोळ्यांसमोर होते. बारा वर्षे का अकरा वर्षे झाली बरे त्या गोष्टीला? ह्याच अनवसरघरात आपणही रथात बसून आलो होतो. नव्हे का? आपल्यासमोर धुपलेल्या मूर्ती फिकट तोंडाने उभ्या होत्या. पुढे काय होणार ह्याची तिला कल्पना नव्हती, पण तिचे हृदय मरणाऱ्या पतंगाप्रमाणे फडफड करीत होते. तिने कृष्णाकडे पाहिले, पण तिच्याकडे तो पाहत नव्हता. तिने बलरामाला 'दादा' म्हणून हाक मारायचा प्रयत्न केला, पण तोंडातून शब्दच उमटेना.
 ठाकूर जगन्नाथ निश्चळ शरीराने व निश्चळ डोळ्यांनी पाहात होता. पुढे ठेवलेल्या कलेवरांना रोज हळूहळू रूप येत होते. जगन्नाथाच्या समोरचे लाकूड जगन्नाथासारखे, सुभद्रेच्या समोरचे सुभद्रेसारखे व बलरामापुढचे बलरामासारखे दिसू लागले. त्यांना वस्त्रप्रावरणादि शृंगार होऊ लागला, पण ता अजून 'कलेवर' होती. त्यांना प्राण नव्हता. जगन्नाथाच्या नाशिवंत शरीरातील अक्षर आत्म्याचे नवे घर घडत होते. समाधिस्थ स्थितीतील जगन्नाथाला दिसत होते की कालचक्र फिरत आहे. दर फेऱ्याला आपला आत्मा 'नव-कलेवरा'त प्रवेश करीत आहे. आतापर्यंत अशी अनंत कलेवरे होऊन गेली. भविष्यात पाहिले तो दृष्टी पोहोचेपर्यंत नवनव्या कलेवरांची मालिका दिसत होती. ह्या चक्रातून, नवनव्या देहांतून सुटका नाही का? शेवटी महाप्रयाणाची रात्र उगवली. अवसेच्या रात्री विद्यापतीचे वंशज

पति महापात्र' अनवसरघरात आले. शेजारच्या सेवायतांनी त्यांचे डोळे
११० / परिपूर्ती
 

बांधले व हाताला रेशमी फडके गुंडाळले. त्यांनी बलभद्राच्या, सुभद्रेच्या व जगन्नाथाच्या हृदयातले 'ब्रह्म' उर्फ प्राण काढून नव्या मूर्तीत घातले. नव- कलेवरांचे- देव कसले? 'कलेवरे'... रथात बसवले व देवालयाच्या प्रांगणातच 'कैवल्य वैकुंठ' म्हणून देवाचे स्मशानस्थान आहे तेथे दयित सेवकांनी नेले. त्या कूपात रथाचे लाकडी घोडे, लाकडी सारथी व देवांची जीर्ण कलेवरे ठेवून त्यांवर माती टाकली. देवाच्या पुजाऱ्यांनी नव्या विग्रहांची गर्भगृहात स्थापना केली. देवळाच्या बाहेरील प्रचंड पटांगणात लाखो यात्रेकरू 'नव-कलेवर' दर्शनाची वाट पाहात बसले होते. सकाळी दारे उघडताच लक्ष कंठांतून 'जय ठाकूरजी!', 'जय जगन्नाथजी!' असा जयजयकार झाला तो कैवल्य वैकुंठाच्या गर्तेतील शेकडो पिढ्यांच्या कलेवरांना ऐकू गेला असेल. जगन्नाथ गोल डोळ्यांनी भक्तांकडे बघत होता. सुभद्रा आपल्या हारातील मणी मोजीत होती. बलभद्र सरळसोट ताठ उभा होता. सोन्या-रुप्याच्या दक्षिणेचा वर्षाव होत होता. मेलेल्या देवाचे सुतक दयित व सेवकांनी पाळले. मुक्तिमंडपात त्यांनी क्षौर उरकले, जुना स्वयंपाकाची भांडी फोडून नवी आणली, घरचा अग्नी विझवून नवा अग्ना आणला. भितरेछ रोजच्याप्रमाणे दरवाजे उघडायला आले, पण त्याच्या तोंडावर मृत्यूची कळा होती. नव-कलेवरांच्या ओसंडून चाललेल्या उत्सवाला त्याची दादही नव्हती व पर्वाही नव्हती.
 जगात प्रत्यही हा 'नव-कलेवर' उत्सव चाललेला असतो. व्यक्ती मरतात, पण जीवजाती नव-कलेवर धारण करून अखंड असतात. शुद्ध जीवनातीत जुन्या व नव्या कलेवरांची भेटच होत नाही. कीटकांच्या बहुतेक जातींत 'नवयौवना'चा दिवस महाप्रयाणाचा ठरतो. कोशातून पतंग बाहेर पडतो व मादीच्या शोधार्थ उडू लागतो. मादीची गाठ पडली की, प्रेमाची मिठी मृत्यूचीच गाठ घालून देते. नर थोड्याच वेळाने मरतो व पक्ष्याच्या भक्ष्यस्थानी पडतो. नव्या पिढीच्या ओझ्याने भारावलेली मादी अंडी घालीपर्यंत जिवंत राहते व नंतर मरते. ही अंडी कधी पानावर, कधी झाडांच्या बुंध्यांत पोखरलेल्या भोकात, कधी चिखलाच्या घरात, तर कधी मेणाच्या बनलेल्या षटकोनी ‘अनवसर' घरात असतात. जुनी पिढा मरून नवी जन्माला येईपर्यंत 'अनवसरा'चा काळ फार मोठा, असतो. वरच्या पायरीवरल्या जीवजातीत मात्र जुन्या कलेवरांना नवीनांना जन्मदेऊन

लहानाचे मोठे करावे लागते. मनुष्याच्या बाबतीत तर नव्या-जुन्यांचे
परिपूर्ती / १११
 

साहचार्य लांबते. नव-कलेवरांचे शरीरच फक्त घडावयाचे नसून त्यात संस्कृतीचा आत्मा ओतायचा असतो. हे कार्य झाले म्हणजे जुन्यांना मरायची मोकळीक असते.
 पण मरायची मोकळीक असली म्हणून मरायची तयारी थोडीच होते? आणि मरायची तयारी झाली तरी मरण हाकेसरसे का धावून येणार आहे? पूर्वकालीन वन्य समाजात जीवनाचा झगडा इतका तीव्र असे की, वयाच्या पन्नासाव्या वर्षांपर्यंत जगणारी माणसे नव्हतीच म्हटली तरी चालेल. आजही रानटी व भटक्या टोळ्या एक वस्ती मोडून दुसरीकडे निघाल्या की, वाटचालीतच म्हातारी-कोतारी मरून जातात व फक्त जवान नव-कलेवरे तेवढीच शिल्लक राहतात. पण नागसंस्कृतीने शेतीच्या जागेवर अन्नोत्पादन वाढविले, शरीराची दगदग कमी केली व मानवाच्या आयुष्याची मर्यादा शंभरापर्यंत जरी नाही तरी साठ-पाऊणशेपर्यंत वाढविली. अशा परिस्थितीत जुन्या म्हाताऱ्या पिढीने काय करावे असा प्रश्न येतो. एका शक्तीचा उदय झाला की दुसरी अस्तास जाते व अशा त-हेने जगरहाटी नियमबद्ध चालू राहते हे सांगण्याचा कालिदासाला फार षौक आहे. सूर्य उगवतो व चंद्र अस्तास जातो हे त्याचे नेहमीचे, सर्वस्वी बरोबर नसलेले, उदाहरण आहे. मराठी कविता 'नेमिचि येतो मग पावसाळा' म्हणून सांगते; पण मनुष्याच्या दोन पिढ्यांच्या उदयास्ताचे चक्र असे नियमबद्ध नसते. ते नियमबद्ध करावे लागते व तो नियम काय हे कालिदासानेच वर्णन करून सांगितले आहे. रघुवंशाचे राजे बाळपणी शिकत असत, तारुण्यात विषयोपभोग घेत असत, म्हातारपणी संन्यासवृत्तीने राहात व शेवटी योगद्वारे शरीराचा त्याग करीत, असे तो रघुवंशाच्या पहिल्या सर्गात थोडक्यात सांगतो, व त्याच्या स्पष्टीकरणाकरिताच की काय, आठव्या सर्गाच्या आरंभी रघूचे वर्णन करतो ते फार महत्त्वाचे आहे. अजाने लग्नकंकण सोडायच्या आतच रघूने त्याला राज्याभिषेक केला, नंतर राज्यकारभार नीट होत आहे, शत्रूपासून भय नाही व प्रजा एकनिष्ठ आहे हे पाहून रघूने सर्व विषयांचा स्वर्गसुख-- लालसेचासुद्धा- त्याग केला. तो अरण्यात निघालेला पाहून अजाने रडतरडत त्याच्या पायांवर लोळण घेतली व ‘मला सोडू नका' म्हणून विनविले. रघूने पुत्राच्या बोलण्याला मान दिला पण परत लक्ष्मीचा अंगिकार केला नाही. त्याने नगराबाहेर एका आश्रमात वास केला व तेथे इतर योगी

आणि संन्यासी यांच्याबरोबर चर्चा करून, यमनियमप्राणायामादींचा अभ्यास
परिपूर्ती / ११२
 

करून, शेवटी समाधी घेतली. मुलाने आपल्या मरणाची वाट पाहात बसायचे किंवा बिंबिसाराने आपल्या दीर्घायुषी वृद्ध पित्याला मारले त्याप्रमाणे मुलाकडून मारून घ्यायचे ह्यापेक्षा आपल्या हाताने आपण सर्वस्वत्याग करायचा हा सर्वोत्तम मार्ग रघूने आचरणात आणला. सर्व त-हेच्या भोगांचा संन्यास करावयाचा- राज्य, द्रव्य, स्त्री, सत्ता ज्याच्या ज्याच्यासाठी म्हणून मानव पूर्ववयात प्रयत्न करतो ते सर्व सोडून द्यावयाचे म्हणजे लौकिकष्ट्या मरणेच होय. जगणे ते फक्त 'कौतुकापुरते'च. असे झाले म्हणजे नव्या-जुन्या पिढीचा एकत्र सहवास सुखाचा व लाभाचा होतो; संस्कृतीच्या आत्म्याला नव-कलेवराची प्राप्ती होते. नाहीतर अक्षय आत्मा जीर्ण कलेवरात तडफडत राहतो. कलेवराच्या जीर्णत्वाने संस्कृतीच्या आत्म्याची प्रभा व प्रतिभा नष्ट होते; क्रियाशीलता, साहस व नवनिर्मिती जाऊन, अर्थशून्य बडबड व विकृत भोगलालसा मात्र शिल्लक राहून, सबंध समाजच रसातळाला जातो. मानव समाजात रघूची उदाहरणे फार थोडी, त्याउलट जास्त. आपल्याकडीलच सर्वांना माहीत असलेली ययातीची कथा अशाच एका सुखलोलुप जीर्ण कलेवराची आहे. ययातीचे मुलगे मोठे झाले, पण ययातीची राज्य व भोगलालसा कमी होईना. “तुमचे तारुण्य मला देता का?" असे त्याने विचारले. वरच्या मुलांनी स्पष्ट नकार दिला, धाकट्याने मात्र ते दिले अशी कथा आहे. ययातीला अजून काही वर्षे राज्य करायचे होते. मोठ्या मुलांना हा बेत पसंत नव्हता, म्हणून त्याने सर्वांना हाकून दिले. धाकटा पुरू अजून बाळ होता. तो वयात येईपर्यंत राजाला राज्य करण्यास अवसर मिळाला. तो वयात आल्यावर, भोग भोगून तृप्त झालेल्या व शिणलेल्या ययातीने त्याला राज्यावर बसवले अशी ही विलक्षण कथा आहे. रघुवंश हे एक काव्य आहे. काव्याच्याद्वारे कालिदासाने आपल्या सामाजिक मूल्यांचा आविष्कार केला आहे. एकएका राजाचे द्वारे एकएका मूल्याचे स्पष्ट चित्रण केले आहे. त्याचे राजे वास्तवातले नसून कवीच्या कल्पनासृष्टीतील होते. ह्याउलट, महाभारत एक इतिहास आहे. त्यात आलेल्या गोष्टी व प्रसंग वास्तव आहेत. मानवी मनाचा आविष्कार ध्येयवादी कवीने केलेला नसून जगात आहे तसा दाखविलेला आहे. ययातीचे चित्र मानव समाजात नेहमी आढळणारे आहे. त्याच ययातीचा वंशच शंतनु देवव्रताला राज्य देऊन संन्यास घेण्याऐवजी सत्यवतीच्या तारुण्याला भुलला व त्यामुळेच भारतीय

युद्ध उदभवून कुलक्षय झाला हीही कथा सर्वांना माहीत आहे.आपली
परिपूर्ती / ११३
 

सध्याची पिढी ययातीच्या प्रकृतीची आहे. गरीबगुरिबांना मरेपर्यंत पोटाची खळगी भरण्यासाठी संसारात राहावे लागते. त्यांना विषयनिवृत्त व्हावयाचे म्हणजे आत्महत्याच करावी लागेल; पण इतरही सर्व कितीही वय असले तरी मोठ्या आसक्तीने जगात वावरत असतात. “मा गृध्रः कस्यचित धनम।।" हा उपदेश फक्त धनाच्या चोरीपुरताच नाही, सर्व त-हेच्या चोरीबद्दल आहे. द्रव्याची चोरी क्षुल्लक आहे, पण दुसऱ्याच्या आयुष्याची चोरी भयंकर आहे व ती सर्व त-हेने, सर्व काळ आजच्या जगात चालली आहे. स्वत:च्या संसाराचा पसारा एवढा थोरला मांडून ठेवायचा की, वानप्रस्थाश्रमाची गोष्टच दूर, पण मरताना म्हातारपणाचे मूल दोन-चार वर्षांचे असावयाचे व थोरल्या मुला-मुलींचा जन्म बापाचा संसार आवरण्यात जायचा हे दृश्य कितीतरी कुटुंबात दिसते. वयाची ४०-४५ वर्षे बापाच्या संसारापायी घालविली म्हणजे वेळीच न मिळालेल्या सौख्याच्या आशेने अशी एखादी बाई वा पुरुष अवतीभोवती बघून दुसऱ्याच्या संसारावर दरोडा घालू पाहतात. जुन्या चोरीतून नव्या चोरीचा उगम होतो. जुन्या-नव्या पिढीत सत्तेचे, अधिकाराचे, सौख्याचे संक्रमण सुरळीत न होता दरोडेखोरीच्या वृत्तीने होऊ लागते.
 मुले व सुना मोठ्या झाल्या आहेत, त्यांना कुटुंब कसेही चालवू दे, आपण आता ह्या सर्वांतून मन काढून 'कौतुका'पुरते राहावे असे फार थोड्यांनाच वाटते. नव्या पिढीला जुनी पिढी कधी एकदा जाईल असे होते. जुनी पिढी आपले मानाचे व सत्तेचे स्थान सोडण्यास तयार नसते. मग निरनिराळे कायदे व नियम करून कोणाला वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी तर कोणाला साठाव्या वर्षी सक्तीने 'सेवा (!)निवृत्त' करून सत्तासंन्यास घ्यायला लावतात व तेढीच्या वातावरणात नव-कलेवर स्थापना होते. एकीकडून सेवानिवृत्त झाले की, आपल्या बुद्धीचा व अनुभवाचा लिलाव राजरोसपणे सुरू होतो. खाऊनपिऊन सुखी असूनही म्हातारपणी आपल्या परिपक्व ज्ञानाचा फायदा समाजाला निरपेक्षपणे देणारे महात्मे विरळाच. ही झाली सामान्य माणसांची गोष्ट; पण ह्याहीवरच्या वर्गाची दशा तर सर्वस्वी ययातीचीच आहे. कार्यक्षम झालेल्या खालच्या पिढीच्या कर्तबगारीला मुळी वावच मिळत नाही. अशा तरुणांना एकामागून एक हाकलून देण्यात येते व जीर्ण कलेवर व अतिजीर्ण कलेवरे आपल्या जगन्नायकपदाला चिकटून बसतात. अनुयायांनी केलेला जयजयकार ऐकल्याशिवाय त्यांचे कान तृप्त

होत नाहीत. हजारो भक्त समोर गोळा झालेले पाहिल्याशिवाय त्यांना चैन
११४ / परिपूर्ती
 

पडत नाही, अधिकार व सत्ता, मानपत्रे व पुष्पहार त्यांना सोडवत नाहीत. एका अधिकारपदाचा त्याग केला की दुसरे ठेवलेलेच असते. सत्तासंक्रमण शांततेने न होता भीषण यादवीनेच होणार काय? ह्या जगन्नाथमंदिरात अधिक, आषाढ मुळी उगवणारच नाही का?