परिचय/शक्तिपीठाचा शोध

विकिस्रोत कडून

२. शक्तिपीठाचा शोध


माझे मित्र रा. चिं. ढेरे हे आता संशोधनाच्या क्षेत्रात नवखे राहिलेले नाहीत. प्राचीन मराठी वाङमयाचे व भारतीय संस्कृतीचे संशोधक, अभ्यासक आणि मीमांसक म्हणून आता त्यांना स्थिर प्रतिष्ठा मिळालेली आहे. त्यांच्या-माझ्या पिढीतील विद्वानांच्या मध्ये तर ढेरे सर्वांत मान्यवर आहेतच, पण हयात ज्येष्ठांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या- इतका चौरस व व्याप असणारा अजून दुसरा मराठीत कोण आहे, हे एकदा तपासूनच सांगावे लागेल. ढेरे यांचे लहान-मोठे कोणतेही पुस्तक असले तरी त्यात काही नवे संशोधन, अनाग्रही, चौरस आणि बारकाईची अशी पुराव्याची मांडणी व थोडी काव्यमयतेकडे झुकणारी भाषाशैली यांचा समन्वय असतोच. आता हेही इतके सरावाचे झालेआहे की, त्यात कौतुकाने सांगावे, अशी नवलाई उरलेली नाही.

ढेरे यांचे संशोधन निर्विवाद आणि बिनतोड असते, असे निदान मी तरी मान्य करणार नाही. वादरहित संशोधन करणाऱ्या अभ्यासकांचा बहुतेक काळ साधने छापण्यात व त्यावर टीपा देण्यात व्यतीत होत असतो. हेही काम मी महत्त्वाचे मानतो. पण जिथून मीमांसेचा आरंभ होतो, तिथेच विवाद्य-तेचा जन्म होतो, याला इलाज नाही. ढेरे माझ्यासारखे भौतिकवादी नास्तिक नाहीत. त्यांचा पिंड श्रद्धाधारकाचा आहे. पण जेव्हा पुरावा काही निराळेच सांगू लागतो, तेव्हा त्यांचा नाइलाज होतो. गेल्या एक तपात प्रस्थापित मतांना सर्वांत जास्त हादरे त्यांनी दिलेले आहेत. प्रज्ञावंत अभ्यासकाच्या जवळ जमणाऱ्या माहितीचे स्वरूप सुपीक जमिनीत पडणाऱ्या पाण्याप्रमाणे असते. तेथे प्रत्येक थेंब ओलाव्याची नुसती खोली आणि व्याप्तीच वाढवीत नसतो, तर नवसर्जनही करीत असतो. क्रमाने ढेरे आपल्या प्रज्ञेला प्रामाणिक राहून, मीमांसेच्या क्षेत्रात खोलवर गुरफटत जात आहेत. हे क्षेत्रच असे आहे की, जिथे निरुपद्रवी दिसणारा एखादा धागा स्वतःलाच हादरा देणाऱ्या गुहेपर्यंत तुम्हाला नकळत घेऊन जातो. 'शक्तिपीठाच्या शोधात ' ढेरे यांच्या बाबतीत असा काही प्रकार घडू पाहत आहे. या ठिकाणी उभे राहून ढेऱ्यांशी भांडण उकरून काढण्यात जी मौज आहे, ती नव्याने उजेडात आलेल्या अपरिचित पोथ्यांची नावे ऐकण्यात निश्चितच नाही.
 ढेरे यांचे नवे पुस्तक (खरे म्हणजे तो एक विस्तृत लेखच आहे) काही शक्तिपीठांचा नव्याने शोध घेत आहे. सर्व भारतभर नानाविध नावांनी व रूपांनी चालणारी देवीची उपासना आहेच. या उपासनेची प्रमुख केंद्रे कोणती याच्या विविध याद्या आहेत. या याद्यांच्यापैकी एक महत्त्वाची यादी पुराणांच्यामधून आणि तंत्रग्रंथांच्या मधून येणारी १०८ शक्तिकेंद्रांची यादी आहे. मला स्वतःला ही यादी इ. स. १००० पेक्षा फारशी जुनी वाटत नाही. या यादीत असणाऱ्या स्थळांची निश्चिती करणे हे एक महत्त्वाचे काम आहे. ढेरे यांनी या यादीतील दोन स्थळांची नोंद केली आहे व एक तिसरे प्राचीन शक्तिपीठ नोंदविलेले आहे. १०८ च्या या यादीतील मकुटेश्वरीचे माकोट हे पीठ म्हणजे आजचे कर्नाटकातील नंदिकेश्वर (ता. बदामी, जि. विजापूर) व या यादीतील युगुलेचे आलापूर म्हणजे आजचे अलंपूर (आंध्रप्रदेशातील महबूबनगर जिल्ह्यातील गाव) असे त्यांनी पुराव्याने दाखवून दिलेले आहे. त्या खेरीज नागपूर जिल्ह्यातील माहूरझरी हेही प्राचीन प्रसिद्ध शक्तिपीठ असल्याची त्यांनी साधार नोंद केली आहे.
 या पुस्तिकेपुरता ढेरे यांचा दावा इतकाच आहे. अत्यंत निरुपद्रवी चेहरा करून ते सांगतील, 'माकोट म्हणजे नंदिकेश्वर, हे मी प्रथमच सिद्ध करीत आहे. जरी यापूर्वी ख्यातनाम संशोधक डॉ. पांडुरंग देसाई यांनी अलंपूर म्हणजे आलापूर हे दाखवून दिले असले तरी अमुक एक देवी म्हणजे युगुला, हे मी प्रथमच दाखवीत आहे. वाकाटकांच्या ताम्रपटात येणारे पृथ्वीपूर म्हणजे माहूरझरी, हेही मी प्रथमच सांगत आहे. ' ढेरे यांचे हे म्हणणे अगदी खरे आहे. संशोधनाच्या क्षेत्रात पुराव्याची संगती जुळवण्याला, चपखल मांडणीला व प्रथमच एखादा मुद्दा सिद्ध करण्याला खूपच महत्त्व असते. पण हे पूर्ण सत्य नव्हे. ही जर केवळ स्थळनिश्चितीची बाब असती तर मग या पुस्तिकेकडे फारसे लक्ष देण्याची गरज नव्हती. एक टिपण म्हणून त्याकडे पाहणे व नोंद घेणे पुरेसे ठरले असते. या पुस्तिकेचे खरे महत्त्व ढेरे यांचा पूरावा आणि त्याची संगती जुळवण्याची त्यांची पद्धत यांत आहे. ढेरे यांचे विवेचन क्रमाने एका अत्यंत वादग्रस्त सिद्धान्ताकडे सरकत आहे. ढेरेमहाशयांना सर्व समजुतींना जो एक जोराचा धक्का द्यायचा आहे, त्याची या पुस्तिकेत पूर्वतयारी आहे. मला जर त्यांचा प्रमुख सिद्धान्त मान्य नसता, तर मी किमान दुप्पट पाने लिहन त्यांचे खंडन करणे आवश्यक मानले असते.
 ढेरे यांना एका उपासना-परंपरेकडे व त्या परंपरेतील परिवर्तनांच्याकडेपरंपरेच्या उन्नयन-रूपांतर-ऱ्हासाकडे लक्ष वेधायचे आहे. सर्व भारतभर अतिप्राचीन काळापासून अलीकडच्या काळापर्यंत एका विशिष्ट प्रकारच्या देवीच्या मूर्ती उपलब्ध होतात. या मूर्ती आसामपासून अतिदक्षिणेपर्यंत पसरलेल्या आहेत. त्यांचे काळही निरनिराळे आहेत. या मूर्तीचे स्वरूप कसे आहे ? त्यांना डोके नसते. त्या नग्न आणि उताण्या असतात. कुठे पुष्ट स्तन असतात, कुठे नसतात. पण योनिदर्शनाला प्राधान्य असते. त्याला उपकारक अशी पायांची रचना असते. शिरोहीनता, नग्नता व उत्फुल्ल योनी ही या मूर्तीची कायम वैशिष्ट्ये आहेत. ही देवता योनिरूपिणी महानग्ना जगन्माता आहे. तिची उपासना जरी पुत्रदायी देवता म्हणून होत असली, तरी ती खरे म्हणजे सर्व सृजनाचीच देवता आहे. ही देवताच लंजिका ऊफे लज्जागौरी असून नंदिकेश्वर हे मूळचे लंजिकेश्वर आहे व माकोट हे याच देवीचे नाव असून, त्यातील कोट' शब्दाचा अर्थ लंजिकेप्रमाणेच 'नग्ना' असा आहे. ढेरे यांना असे म्हणावयाचे आहे की, ही योनिमातृका म्हणजे नंदिकेश्वरची लंजिका, अलंपूरची युगुला ऊर्फ जोगुळांबा असून, तीच यल्लमा आणि रेणुका आहे.
 ही पुस्तिका म्हणजे यापुढे येणाऱ्या एका प्रदीर्घ आणि गुंतागुंतीच्या विवेचनाचा प्रारंभ आहे. यापुढचा टप्पा हे सांगण्याचा आहे की, आसाममधील प्रसिद्ध कामाख्या हीच केवळ योनिमातृका नसून माहूरची रेणुकाही मुळात योनिमातृकाच असल्याचा पुरावा आहे. कारण रेणुका म्हणजे वारुळ. हे योनीचेच एक प्रतीक आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी याही मुळातच योनिमातृका असल्याचा पुरावा त्या मूर्तीच्या शिरोभागी आहे. सर्व भारतभर जसा शंकराच्या लिंगपूजेचा सार्वत्रिक संप्रदाय आहे तसा जगन्मातेच्या योनिपूजेचाही सार्वत्रिक आणि प्राचीन संप्रदाय आहे. देवीउपासनेच्या निमित्ताने हा संप्रदाय क्रमाने विकसित आणि रूपांतरित होत आला. या रूपांतरात काही टप्पे उन्नयनाचे आहेत. या टप्प्यांच्यामध्ये या देवता कधी उमेचे तर कधी लक्ष्मीचे रूप घेऊन विष्णुपत्नी, शिवपत्नी होतात. कधी त्यांची मूळ रूपे क्षुद्रदेवता आणि बालग्रह अशी रूपांतरित होतात. कधी मधूनच समाजाचा -हासकाळ देवतेच्या मूळ रूपाला भ्रष्ट प्रतिष्ठा मिळवून देतो. हे रूप शाक्त संप्रदायात दिसते. यानंतर ढेरे असे म्हणणार की, परशुराम-रेणुका, रेणुका-जमदग्नी यांच्याशी निगडित असणारा सर्व भार्गवीय कथासमूह फारसा जुना नाही. तो उत्तरकालीन, बहुतेक चौथ्या-पाचव्या शतकानंतरचा पसारा आहे. जेव्हा आपण धड सोडून शिराची, फक्त मुखवटयांची म्हणजे तांदळयाची पूजा करतो, (उदाहरणार्थ, माहूरची रेणुका) त्या वेळी आपण देवीची पूजा करीत नसून, घटाची म्हणजे पुन्हा योनीची पूजा करीत असतो. तेर येथील मृत्तिकाचित्रात हा घट स्पष्ट आहे व तो योनिरूप आहे. अनेक पौराणिक कथा उलथ्यापालथ्या करणारा आणि आर्यपूर्व उपासनांच्याकडे घेऊन जाणारा असा हा प्रवास आहे. ढेरे कोणत्या दिशेने जात आहेत, याची येथे फक्त कल्पना दिली आहे. पण या दिशादर्शनावरून इतके समजायला हरकत नाही की, ही केवळ स्थलनिश्चिती नव्हे. या पुस्तिकेत गृहीत व अनुस्यूत मीमांसेचा व्याप फार मोठा आहे.
 या योनिमातृकांच्या मूर्तीविषयी याहीपूर्वी संशोधकांनी विवेचनं केलेली आहेत. श्रीमती स्टेला कामरिश यांना या मूर्ति वैदिकी अदितीच्या वाटतात, कारण अदिती महानग्ना व उत्तानपाद आहे. डॉ. सांकलिया यांच्या मते ही मूळची इजिप्तमधील बोबो नावाची देवता असून, रोमन संपर्काच्या काळात ख्रिस्तोत्तर पहिल्यादुसऱ्या शतकांत, तिचे भारतात आगमन झाले आणि नंतर झपाटयाने या देवतेचे भारतीयीकरण झाले. अजून कुणाला ही देवता अनार्यांची भूमिरूप मातृदेवता वाटते. या नानाविध स्पष्टीकरणांच्यापैकी निर्णायकरीत्या चुकीची असेल, तर ती डॉ. सांकलियांची भूमिका आहे. सांकलियांच्यासारख्या आदरणीय श्रेष्ठांच्या विषयी हे म्हणू नये, पण म्हणणे भाग आहे की, त्यांची विचार करण्याची पद्धतच चुकीची आहे.
 ज्या वेळी एखादी बाब प्राचीन काळात दिसत नाही (उदाहरणार्थ, ज्योतिषशास्त्रातील राशींची कल्पना) आणि पुढच्या काळात मात्र ती बाब सार्वत्रिक होते, त्या वेळी असा प्रश्न विचारता येतो की, या बाबीचा मूळ उगम कोठे आहे ? पण जी घटना भारतभर अतिप्राचीन काळापासून सार्वत्रिक आहे, तिच्याबाबत 'ती आली कुठून ?' हा प्रश्न विचारणेच चुकीचे आहे. सिंधुसंस्कृतीपासून आजतागायत भारतभर आढळणारी लिंगपूजा कुठून आली, हे विचारण्यातच अर्थ नसतो. हेच मातृदेवतांना लागू आहे. मातृदेवतांचा उगम भारतात मानवसंस्कृतीच्या आरंभाइतका जुना आहे. तितका योनिपूजनाचा पुरावाही दाखवता येतो. ऋग्वेदाच्या काळीच 'भग' ही देवता पुरुषरूपाने स्वीकारण्यात आलेली आहे. ही घटना पुरेशी बोलकी आहे. मुळात शिरोहीन योनिमातृकांना बौबोप्रमाणे समजणेच चुकीचे आहे.
 मी या योनिदेवतेला वैदिक अदितीही मानू शकत नाही. असलेच तर शिष्टांनी मान्य केलेले अदिती हे योनिमातृकेचे एक रूप मानता येईल. जुडाइस्ट परंपरेच्या धर्माने अशी एक समजूत निर्माण केली आहे की, अडाणी लोक पशुपक्षी, वृक्ष व वनस्पती, दगडधोंडे यांना देवता समजतात. ही समजूतच मुळात चुकीची आहे. आदिम समाजात पशुपक्षी वृक्षादींचे पूजन असते हे खरे आहे, पण ती देवतेची प्रतीके असतात व प्रतीक म्हणून पूज्य असतात. विकसित धर्मपरंपरासुद्धा हीच कल्पना अनुसरतात. आद्य मानवसमाजात सर्व समृद्धी आणि वैभव उत्पत्तिरूप असते. या उत्पत्तीच्या उपास्यदेवता नर आणि मादी रूपांत दिसतात. नररूपाने महालिंगदेव असतो. वृषभ, अश्व, शंग, द्यौ ही त्याची रूपे आहेत. नारीरूपाने महायोनिदेवता असते. घट, कमल, पृथ्वी, वारूळ, गौ ही सारी या देवतेची प्रतीके आहेत. ब्रह्मा, विष्णु, आणि शिव हे तिघे मूळ रूपात लिंगदेवच आहेत. कदाचित ढेरे सर्व देवीरूपे मुळात योनिमातृका आहेत, हे सांगणारा पुरावा तपशिलाने गोळा करतील. शिवलिंग पाहताना हात-पाय व डोके नाही, हे विसरायचे असते. ती देवता लिंगस्वरूप आहे. कामाख्या अशी सर्वस्वी योनिस्वरूप आहे. घट पाहताना म्हणजे देवीचे तांदळे पाहताना उरलेले शरीर पाहायचे नसते. शिरोहीन योनिदेवता पाहताना शिर पाहायचे नसते. शिराच्या जागी कमळ व चक्र म्हणजे पुन्हा योनीच आहे. या मूर्ती शिरोहीन नसून योनिमयी आहेत, योनिस्वरूप आहेत, इतकेच काय ते.
 'शक्तिपीठाच्या शोधा' च्या रूपाने ढेरे एका व्यापक व मूलगामी संशोधनाला हात घालीत आहेत. पुढे येणाऱ्या त्यांच्या ग्रंथाला मी सूयश चिंतितो. पण यापुढच्या वाटचालीत त्यांना थोडे धीटही व्हावे लागेल, सावधही व्हावे लागेल, असे वाटते. देवतांचा शोध घेताना उपासकांचा व उपासनांचा शोध घ्यावाच लागतो. नाहीतर सांकलियांच्याप्रमाणे जगन्मातेला इजिप्ती देवता मानण्याची चूक होते. पण या उपासकांची केवळ वर्तमान-परंपरा पाहता येणार नाही. वर्तमानपरंपरेत सोज्ज्वळ पुत्रदात्री असणारी देवता हजार-आठशे वर्षांपूर्वी भैरवींच्या तांत्रिक उपासनेचे केंद्र असते. माहूर आणि कोल्हापूर ही अशी केंद्रे असल्याची सूचना महानुभाव वाङमयात आहे. रेणुका मूळची महानग्ना आहे, हे सांगण्यासाठी अलीकडच्या काळातील 'केदारविजय' सारखा ग्रंथसुद्धा आधाराला घेणे धोक्याचे आहे. या देवी-उपासनेच्या परंपरेकडे तीन वेगळ्या दिशांनी पाहणे भाग आहे. एक तर पौराणिकांनी आणि स्थलमाहात्म्यग्रंथांनी उभा केलेला कथासमूह असतो. दुसरे म्हणजे सर्व शाक्त तांत्रिक आपल्या प्राचीन रूपांत शैव आहेत. त्यांनी देवीपीठांना शिवशक्तिसंगम स्वरूपात शिवाला प्राधान्य देऊन विकास घडविलेला असतो. या सर्व शैवांचा व शाक्तांचा बौद्ध तंत्रपरंपरांशी संबंध आहे. शाक्त भासुरानंद शैव अभिनवगुप्तांना पूर्वाचार्य मानतात आणि अभिनवगुप्ताचे पूर्वाचार्य वसुगप्त यांच्यावर बौद्धतंत्राचा प्रभाव आहे. शाक्तांनी या शक्तिपीठांना जे शिवसंबद्ध रूप दिले आहे, ते निराळे आहे. आद्य योनिमातृकांचा उपासनाप्रवाह निराळा आहे. हे तीन धागे परस्परांत मिसळलेले असतात. ते सावधपणे हाताळणे भाग आहे. ढेरे आद्य योनिमातृका आणि शाक्तांची योनिस्वरूप शिवानी यांना एकच समजतात की काय, अशी मला शंका येते. या दोन बाबी भिन्न आहेत.
 या मातृदेवतांच्या विषयीचे विवेचन एकीकडे पशुपालनाच्या अवस्थेतून क्रमाक्रमाने स्थिरावत जाणाऱ्या व शेतीकडे वळणाऱ्या समाजव्यवस्थेशी निगडित असते आणि दुसरीकडे धर्माच्या आवरणाखाली वावरणाऱ्या प्रबल भौतिकवादाशी निगडित असते. दैवतरूपांचा समाजरचनेशी असणारा सांधा आणि समाजाच्या उन्नती-ऱ्हासाचा उपासनेवर होणारा परिणाम सांगण्यासाठी ढेरे यांनी थोडे धीट झाले पाहिजे. त्याशिवाय भोगभिक्षा मागत हिंडणाऱ्या भैरवींच्याकडे वळता येणार नाही. ढेरे यांच्याजवळ परिश्रमशीलता आहे, अनाग्रह आहे, प्रज्ञा आहे. तिन्हींचा समन्वय आहे. तो त्यांच्या सश्रद्ध आस्तिक्यावर मात करणारा ठरो, इतकेच माझ्यासारख्या मित्राला म्हणता येणे शक्य आहे. कारण हा प्रवास आस्तिकांना झेपणारा नाही. ढेरे यांनी या क्षेत्रात जे पहिले पाऊल टाकले आहे, ते मोठे सावध, साक्षेपी आणि डौलदार आहे. त्यांच्या पुढच्या महायात्रेचा भरवसा देण्यासाठी ही खूण पुरेशी स्पष्ट आहे.



(शक्तिपीठाचा शोध- ले : डॉ. रा. चिं. ढेरे. मोघे प्रकाशन, कोल्हापूर.)