Jump to content

परिचय/मुडलगीचे स्वामी

विकिस्रोत कडून



३. मुडलगीचे स्वामी


धारवाडचे प्रथितयश संशोधक पंडित आवळीकर ह्यांचा 'मुडलगीचे स्वामी' हा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. कर्नाटक विश्वविद्यालय व पुणे विद्यापीठ ह्यांचे संयुक्त प्रकाशन म्हणून ही उपलब्धी झालेली आहे. महाराष्ट्रा- बाहेर महाराष्ट्राच्या अनुसंधानाने मराठी साहित्याच्या अनेक परंपरा पसरलेल्या आहेत. त्यांपैकी मुकुंदराजी परंपरेची मुडलगी मठपरंपरा ही अनेक कारणांनी महत्त्वाची असलेली परंपरा आहे.
संशोधनाच्या क्षेत्रात काही योगायोग असतात. महत्त्वाचे साधनसाहित्य- भांडार उपलब्ध होणे हा प्रकार, असा असतो. त्याबाबत आवळीकर सुदैवी ठरले असेच म्हटले पाहिजे. पण जे दैवगत्या हाती आले त्याचे महत्त्व ओळखणे, साधनांचे संपादन व विवरण करणे, त्यांतून जी माहिती उजेडात

येते तिचे दुवे नीट जुळविणे हा भाग परिश्रमाचा व प्रज्ञेचा असतो. पंडित आवळीकरांचे खरे ऋण ह्याबाबत मानावे असे आहे. एक नवा धागा सर्वांच्या समोर ठेवून त्यांनी मराठीच्या अभ्यासकांना ऋणी केले आहे यात वाद नाही.
सध्या कर्नाटकात असलेल्या बेळगाव जिल्ह्यात मुडलगी हे एक छोटेसे गाव आहे. मराठीचे आद्य कवी मानले जाणारे मुकुंदराज हे, एका महत्त्वाच्या शैव परंपरेचे संत होते. त्यांच्या शिष्य परंपरेतील एक संत सहजबोध परभणी जिल्ह्यातील कुंभकर्ण टाकळी ह्या गावात राहात. ह्या सहजबोधांचे शिष्य रंगबोध ह्यांच्यापासून मुडलगी मठाची परंपरा सुरू होते. ह्या मठाचे स्वामी म्हणून अनेक जण परंपरेने, येथे राहून अध्यात्मचिंतन व धर्मप्रचार करीत आले. त्यांनी ग्रंथरचनाही केली. ह्या मराठी साहित्यरचनेचे महत्त्व काव्य म्हणून नसून, सांस्कृतिक इतिहासाचे साधन म्हणून आहे. ह्या मठातच 'देशिक चरित्र' हा, या स्वामींची चरित्रपर माहिती देणारा ग्रंथही उपलब्ध झाला. हे चरित्रपर साधन अठराव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडातील म्हणजे शके सतराशे सातचे आहे. येथील 'देशिक' शब्द चिंतनीय दिसतो. प्राचीन मराठीत ' राउळ ' सारखे लौकिक स्वामित्व दाखविणारे शब्द जसे 'सद्गुरू' ह्या अर्थाने वापरले जात तसा प्रकार 'देशिक ' ह्या शब्दाचा आहे.
 ती मठपरंपरा मुकुंदराजी परंपरेची असल्यामुळे अतिविवाद्य असणाऱ्या त्यांच्या स्थलकालनिश्चितीवर काही प्रकाश ह्या परंपरेमुळे पडणार हे उघडच आहे. आजतागायत भंडारा जिल्ह्यातील मुकुंदराज परंपरेचे मठच काय ते उपलब्ध होते. आता ही दुसरी परंपरा समोर येत आहे. आश्चर्याची गोष्ट ही आहे की, मुडलगी मठपरंपरा जितकी माहिती पुरविते त्या मानाने भंडारा जिल्ह्यातील परंपरेची माहिती फार त्रोटक आहे.
 मुडलगी मठाने उपलब्ध करून दिलेला महत्त्वाचा मुद्दा हा की, शंकराचार्यांच्या भारती परंपरेत मुकुंदराज येतात. मुकुंदराजांच्या ' श्री शंकरोक्ती वरी। मी बोललो मराठी वैखरी ' ह्या स्पष्टीकरणाला यामळे निराळे महत्त्व येते. भंडारा जिल्ह्यातील अंभोर परिसरातील परंपरांच्यामध्ये हा दुवा स्पष्ट नव्हता. ह्या माहितीमुळेच मराठवाड्यातील मुकुंदराज ते सहजवोध ही परंपरा उजेडात आलेली आहे. मुडलगी मठपरंपरा हरिनाथांनाही अंबानगरीचेच मानते. अंबेजोगाई येथे भारती परंपरेचा आश्रम रामदासांच्या काळापर्यंत होता असा उल्लेख असल्यामुळे, मुकुंदराज हे शंकराचार्यांच्या एखाद्या उपपीठाचे मठाधीश असावेत हे आवळीकरांचे अनुमान संभवनीय वाटू लागते. मात्र तूर्त तरी ते अनुमान आहे असेच म्हटले पाहिजे.
 मुकुंदराजांचा स्थलकालनिश्चय अजून तरी विवाद्य आहे. जिथपर्यंत कालनिश्चितीचा संबंध आहे तिथपर्यंत हे म्हणणे भाग आहे की, शके अकराशे दहा हा विवेकसिंधूचा ग्रंथकाळ मानण्यात अडचणी आहेत, त्या परिहार होण्याजोग्या नाहीत. मुडलगी परंपरेतील शके नऊशे ही जशी एक परंपरेची नोंद, त्याप्रमाणे 'शके अकराशे दाहोत्तरी । साधारण नाम संवत्सरी' हा प्रक्षिप्त पाठसुद्धा एक परंपरेची नोंद आहे. उपोबलक उपोदबलक व समाधानकारक पुरावा सापडल्याशिवाय ह्या नोंदींना निर्णायक महत्त्व देता येणार नाही. स्थलनिश्चितीच्या बाबत मात्र ह्यापुढे जाऊन आपण काही चर्चा करू शकतो. विद्वान मंडळींनी आजतागायत तपशिलाने दोन स्थळांची चर्चा केली आहे. एक पक्ष तर, भंडारा जिल्ह्यातील अंभोर ही मुकुंदराजाची अंबानगरी मानतो. दुसरा पक्ष बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई हीच अंबानगरी मानतो. एक तिसरा फारसा चचित नसणारा पक्ष आहे. महानुभाव संप्रदायही मुकंदराजांना आपल्या विद्यावंतांपैकी एक मानतो. तो धागा धरून आपण पुढे गेलो तर फलटण ही अंबानगरी आहे असा पक्ष निर्माण होतो. ह्या तिसऱ्या पक्षालाही आपल्या बाजूने खूपच सांगता येण्याजोगे आहे. आवळीकरांना मुकुंदराजांची स्थलनिश्चिती करताना ह्याही पक्षाचा विचार करावा लागणार आहे. तूर्त तरी उपलब्ध पुराव्यानुसार मुकुंदराज अंबेजोगाईचे असण्याचाच संभव जास्त असे म्हटले पाहिजे. ह्यांच्याप्रमाणेच आवळीकरही अंबेजोगाई पक्षाचेच समर्थक आहेत.
 मुकुंदराज हे स्वतः शैव आहेत ह्यात वाद नाही. पण त्यांच्या परंपरेत हा शैव असण्याचा आग्रह कुठवर टिकला असेल हे सांगणे कठीण आहे. मुकुंदराजांचा काळ कोणताही असला तरी त्यांची परंपरा पुढच्या काळात ज्या महाराष्ट्रात वावरली तो परिसर वारकरी संप्रदायाने प्रभावित झालेला प्रदेश आहे. ह्या संदर्भात मुकुंदराजी परंपरेत पुढे वारकरी संत आढळले तर ते स्वाभाविक आहे. रंगबोधच वारकरी असल्यामुळे पुढची मुडलगी मठाची सारी परंपरा वारकरीच आहे. वारकरी संप्रदाय हा देवतांच्या बद्दल अतिशय उदार असल्यामुळे ह्या स्वामीच्या पदरचनेत विठोबा, राम आणि देवी तर आहेतच पण दत्तही आहे. लिंगायत धर्माची परिभाषाही ठिकठिकाणी वापरलेली आहे. वारकऱ्यांच्या कडून अपेक्षित असणारी सर्वसमावेशक समन्वयाची छाप या सर्व साहित्यावर आहे. वि. अं. कानोले यांनी सहजबोधाचे गुरू निजानंद हे गंगाखेडचे होते व त्यांच्या पत्नीचे नाव इंदिराबाई होते अशी माहिती दिली आहे. ह्या माहितीचा आधार टाकळी येथे उपलब्ध झालेले सहजबोधांचे चरित्र आहे. सदर चरित्र कानोले ह्यांच्या जन्मानंतरचे असल्यामुळे अगदी अर्वाचीन आहे. जेव्हा इतर कोणताच पुरावा नव्हता, तेव्हा ही माहिती प्रमाण मानण्याशिवाय पर्याय नव्हता. आता अधिक जुनी व विश्वसनीय माहिती आवळीकरांनी पुढे आणली आहे. त्यामुळे सहजबोधांचे गुरू जगन्नाथ व त्यांच्या पत्नीचे नाव सजनाबाई असे समजणेच रास्त आहे. माझ्याशी चर्चा करताना अनाग्रही पद्धतीने कानोले ह्यांनी हेच मत व्यक्त केले आहे.
 पंडित आवळीकरांना प्रेमाने काही सूचना देणे मात्र भाग आहे. त्यांपैकी एक सूचना म्हणजे साधनसाहित्याच्या आपुलकीपोटी वाहवत जाणे आता त्यांनी कमी केले पाहिजे. असे प्रकार त्यांच्या लेखनात तुरळक असले तरी, आहेत हे बरे नव्हे. विवेकसिंधूत मुकुंदराजांनी हरिनाथ व आदिनाथ ह्यांच्या भेटीचे वर्णन करताना 'तैसे दोघे आनंदे फुजो लागले। हरिशंकर ते,' असा उल्लेख केला आहे. आवळीकर यांना असे वाटते की, येथील 'शंकर' ह्या शब्दाचा अर्थ शंकराचार्य असाही असू शकेल. खरे म्हणजे हे वर्णन पाशुपतव्रतानंतरच्या हरिनाथ आणि भगवान शंकर यांच्या भेटीचे वर्णन आहे. शंकराचार्यांचा येथे काही संबंध नाही. सगळ्याच संतचरित्रांत विद्वानांचे गर्व-हरण व चमत्कार कथा आढळतात. त्यातील कृष्ण पंडित हे वामन पंडित असावेत अगर शरण आलेला यवनराजा आदिलशहा असावा की मलिकंबर, अशी अनुमाने काढणे ह्यांत फार थोडा अर्थ असतो. संतचरित्राचे ठरलेले चमत्कार सार्वत्रिक आहेत. त्यांत इतिहास शोधणे धोक्याचे असते.
 रंगबोधिनी टीका भगवद्गीतेतील काही विवाद्य स्थळांवर प्रकाश टाकील ही आशा, वाहवत जाण्याचा परिणाम आहे. प्रथम म्हणजे रंगबोधिनी ही गीतेच्या पहिल्या अध्यायावरील टीका आहे. ती टीकाकाराच्या तत्त्वज्ञान क्षेत्रातील व गीता 'विवेचनातील अधिकारावर प्रकाश टाकण्यास असमर्थ आहे. दुसरे म्हणजे इसवीसनाच्या सतराव्या शतकातील, विवाद्य अधिकार असणाऱ्या व्यक्तीची ती रचना आहे. म्हणून संतक्षेत्रातील महान अधिकार या ठिकाणी उपयोगी पडणारा नव्हे.
 संशोधनाच्या क्षेत्रात विवाद्यता सार्वत्रिक असते. मतभेदाची स्थळेही असतात. पण अशा वादविवादांना आणि मतभेदांना फार वाव मिळू नये ह्याची दक्षता आवळीकरांनी घेतलेली आहे. शब्दार्थ सांगणाऱ्या शेवटच्या टीपा मात्र याहून व्यवस्थित असावयास पाहिजेत. कारण ह्या साहित्यात अनेक शब्दांची बोलभाषेतील विशिष्ट रूपे जतन झालेली आहेत व ती महत्त्वाची आहेत. अर्थाच्या बाबतसुद्धा मतभेदांना वाव शक्यतो नसावा. उदाहरणार्थ 'थिता', म्हणजे व्यर्थ नव्हे, ते ' स्थित ' चे रूप आहे. 'गुजरी' हा संध्याकाळचा बाजार नव्हे, गुजर स्त्रीला गुजरी म्हणतात. 'शतपत' हा शतपथ ब्राह्मणाचा उल्लेख नसून, ' शेकडो' इतकाच तेथे अर्थ आहे. रंगबोधिनीतील 'कुमरणी' हा 'कुमारांना' ह्याचे भ्रष्ट रूप असण्याचा संभव अधिक.
 थोडक्यात म्हणजे आवळीकरांनी ह्या ग्रंथाच्या रूपाने महत्त्वाचे साधन‘साहित्य उजेडात आणले आहे ही प्रशंसनीय कामगिरी म्हटली पाहिजे.



 (मुडलगीचे स्वामी : ले-डॉ.पंडित आवळीकर. कर्नाटक आणि पुणे विद्यापीठ संयुक्त प्रकाशन.)