परिचय/वैदिक यज्ञ, मध्ययुगीन तंत्र साधना आणि ज्ञानेश्वरप्रणीत भक्तियोग

विकिस्रोत कडून


१. वैदिक यज्ञ, मध्ययुगीन तंत्रसाधना आणि

ज्ञानेश्वरप्रणीत भक्तियोग



माझे मित्र डॉ. सदाशिव रामचंद्र गाडगीळ यांचा 'वैदिक यज्ञ, मध्ययुगीन तंत्रसाधना आणि ज्ञानेश्वरप्रणीत. भक्तियोग' या लांबलचक नावाचा प्रबंध प्रकाशित झालेला आहे. प्रबंध मार्च १९७९ मध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथप्रकाशन समारंभाच्या वेळी अध्यक्ष म्हणून व त्याआधी प्रस्तावनाकार म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वैदिक यज्ञाच्या संदर्भात गाडगीळांच्या विरोधी भूमिका अतिशय रेखीवपणे मांडली. मी स्वतःही एक वक्ता होतो. गाडगीळांच्या प्रतिपादनाची कठोर व चौरस चिकित्सा होणे फार आवश्यक आहे, असा माझा सूर होता; पण या प्रबंधावर ज्या प्रकारची चर्चा व्हावी अशी अपेक्षा होती तशी चर्चा झालेली नाही.
सामान्यपणे एक तरुण एम. ए., तीन-चार वर्षे अभ्यास करून डॉक्टरेटचा

प्रबंध सादर करतो व तोही चांगला असू शकतो; पण त्या प्रकारचा हा प्रबंध नाही. दहा-पंधरा वर्षे वाचन-चिंतन झाल्यावर लेखक या निर्णयास येतो की, अमुक विषयात अधिक खोल या शिरले पाहिजे. कारण सांगण्याजोगे महत्त्वाचे असे इथे आहे व त्यानंतर पुन्हा दहा-पंधरा वर्षे अभ्यास, चिंतनात घालवून मग प्रबंध लिहिला जातो. अशा प्रबंधाचे स्वरूपच निराळे असते. तरुणांनी आपल्या पहिल्या अभ्यासाचे फळ समोर ठेवणे आणि परिणत- प्रज्ञाने जन्मभरच्या अभ्यास व्यासंगाचे फळ समोर ठेवणे यांत फरकच असणार. गाडगीळांचा प्रबंध हा असा दीर्घ चिंतनाचा परिपाक आहे.
खरे म्हणजे हा एक प्रबंध नसून तो चार प्रबंधांचा समूह आहे. डॉ. शं. दा. पेंडसे यांनी, वैदिक भागवतधर्म, पौराणिक भागवतधर्म आणि ज्ञाने- शवरांचे तत्त्वज्ञान या तीन ग्रंथांतून मिळून जो विषय मांडला आहे, तो विषय त्याहीपेक्षा व्यापक व अनेकपदरी पुरावा विचारात धेऊन डॉ. गाडगीळ मांडीत आहेत.
 जे सर्व तपशीलानीशी मांडले तर हजार पानेही पुरणार नाहीत ते सारे विवेचन साडेचारशे पानांत आटोपावयाचे ठरल्यावर ज्या समस्या उभ्या राहतात त्या सवे गाडगीळांच्या समोर आहेत. वैदिक यज्ञाचे स्वरूप काय हा स्वतंत्र प्रबंधाचा विषय आहे. मध्ययुगीन तंत्रसाधना आणि भारतभर पसरलेला मध्य- युगीन भक्तिमार्ग हे अजून दोन स्वतंत्र प्रबंध आहेत. ज्ञानेश्वरांचा भक्तिमार्ग हा पुन्हा वेगळा विषय आहे. यांतील प्रत्येक विभागावर पाचशे पाने लिहिता येतील व त्यातून उपपन्न होणार्‍या उपविभागांवर पुन्हा चार-दोन पुस्तके लिहिता येतील. एवढी अवाढव्य तयारी करून मग गाडगीळ ' हे सारे एका ग्रंथात आणावयाचे कसे ?' यामुळे हैराण झालेले पाहण्यास एक साक्षीदार म्हणून मी होतोच. एवढा प्रचंड व्याप व खोली असणारा हा प्रबंध काळजीपूर्वक विचारात घेणे भाग आहे असे मी मानतो.
 थोडक्यात गाडगीळांचे म्हणणे असे आहे की, वैदिक आर्यांचे जीवन यज्ञ- प्रधान आहे. आणि यज्ञ ही अशी बाब आहे की, तिच्या पोटातून एकेश्‍वरवाद व भक्तिमार्ग दोन्ही उदयाला येऊ शकत नाहीत. हे प्रतिपादन म्हणजे डॉ. पेंडसे आणि त्यांच्यासह वेलणकर आदी इतर अनेकानेक विद्वानांच्या प्रबंधाचे खंडन आणि मॅक्‍्डोनेल व कीथ यांच्या विरोधी विंटरनिट्झ व ओल्डेनबर्गे यांचे निराळया आधारभूमीवर मंडन आहे. तकंतीर्थ जोशी यांना मुळीच मान्य नसणारा हा भाग आहे. डॉक्टर गाडगीळांचे दुसरे म्हणणे असे की, अवैदिक श्रद्धा व विधी यांची एक वाढ भक्तिमार्गात होते व दुसरी वाढ म्हणा, विकृती म्हणा, तंत्रमार्गात होते. हे विवेचन भक्तिमार्गावर लिखाण करणाऱ्या बहुतेकांच्या विरुद्ध जाते. तंत्रमार्गा- वरील लेखन नीडहॅम व देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांच्या दिशेने आणि बुड्राफ व इतर यांच्या विरोधी जाते. या विवेचनात फ्रेझर, ब्रीफॉ, थॉमसन्‌ हे गाडगीळांचे प्रमुख आधार आहेत. गाडगीळांचे तिसरे म्हणणे असे की, सामाजिक ऱ्हासाच्या या काळात भारतभरच्या सर्वसामान्य भकक्‍तिमार्गापेक्षा निराळी भूमिका घेणारा ज्ञानेश्‍वर हा सामाजिक उन्नयनाचा प्रतिनिधी आहे. गाडगीळांच्या प्रतिपादनातील प्रत्येक भूमिका महत्त्वाची आणि मूलभूत प्रश्‍नाशी जाऊन भिडणारी अशी तर आहेच; पण प्रत्येक भूमिका पुरेशी विवाद्यही आहे. मराठीपुरते वोलायचे तर डॉ. पेंडसे आणि डॉ. गाडगीळ हे दोघे परस्परविरोधी दोन भूमिकांचे प्रमुख नेते म्हणावयाला हवेत.
 ज्या क्षेत्रात गाडगीळ विवेचन करीत आहेत त्या क्षेत्रातील प्रत्येक भूमिका विवाद्य आहे; तेव्हा गाडगीळांचे विवेचन विवाद्य आहे हे उघडच आहे. डॉ. गाडगीळांच्या विवेचनातील प्रत्येकच मत व विधान मला मान्य नाही. पण स्थूलमानाने त्यांचे विवेचन बरोबर आहे व दिशा संपूर्णपणे बरोबर आहे असे मला वाटते. पण माझ्या मते गाडगीळांचे म्हणणे बरोबर की चूक या प्रश्नाइतकाच महत्त्वाचा प्रश्न हे विवेचन विवाद्य का असावे हा आहे. सत्य असे आहे की, समोर असणारा पुरावा अतिशय संमिश्र स्वरूपाचा आहे. कोणत्या पुराव्याला किती महत्त्व द्यायचे हा पुन्हा विवाद्य प्रश्न आहे. भारतीय वाङमयापैकी उपलब्ध असणारे सर्वांत जुने वाङमय म्हणजे ऋग्वेद. पण ऋग्वेदात जे जे आहे ते सर्व वैदिक आर्यपरंपरेचे आहे असे म्हणणे धोक्याचे आहे. अवैदिक परंपरा आणि आर्येतर परंपरांचे अवशेष ऋग्वेदातच आहेत. ऋग्वेदातही जुना-नवा भाग आहे. पण त्यापेक्षा अडचणीची बाब अशी आहे की, ऋग्वेदातील शब्दांच्या अर्थाबद्दल आपणास निघंटू व निरुक्त यांच्यासह सायण प्रमाण मानावा लागतो. वेगळ्या पद्धतीने सांगावयाचे तर, इ. स. पू. २००० चा ऋग्वेद आणि इ. स. पू. ८०० चा यास्क इ. स. १४०० च्या सुमारास असणाऱ्या सायणाचार्यांसह एकत्र करावा लागतो. आणि इ. स. ५०० ते १००० मधील वाङमय उत्तरकालीन भूमिका नोंदविणारे आहे असे म्हणावे लागते. इ. स. ८०० च्या सुमारास पद्मपुराण जे सांगते ते उत्तरकालीन. आणि आधार मात्र इ. स. १४०० मधील सायणाचार्यांचा. एकदा कालानुक्रमातच ही विवाद्यता ग्रथित असली म्हणजे विवेचन विवाद्य होणारच.
 काही उत्तरकालीन पुरावा अधिक प्रमाण ठरल्याविना सामाजिक, धार्मिक सांस्कृतिक अध्ययन व चिकित्सा अशक्य आहे. पण उत्तरकालीन पुरावा प्रमाण मानल्यावर परंपरावादालाही खूप वळ येते आणि मग विवाद्यता वाढते.
 डॉ. गाडगीळ यांनी वैदिक यज्ञाच्या स्पष्टीकरणात प्रामुख्याने ऋग्वेदातून आधार घेतलेले आहेत, पण असे आधार यजुर्वेद, अथर्ववेद यांतूनही विपुलपणे घेता येतात. शतपथ, ऐतरेय ब्राह्मणांतूनही घेता येतात. स्थूलपणे आपण असे म्हणू की, वैदिक यज्ञाचे स्वरूप काय याबाबत आधारभूत साधनसाहित्याचा काळ इ. स. पर्व २००० ते इ. स. पूर्व १००० असा आहे. आता या साहित्याकडे पाहणार कसे ? वैदिक यज्ञाचा विचार करावयाचा असेल तर तो पूर्वमीमांसेच्या आधारेच करावा लागणार. पूर्वमीमांसेचे म्हणणे काय याला आधार जरी तोंडाने आपण जैमिनीची सूत्र म्हणत असलो तरी खरा आधार शाबरभाष्य आणि कुमारिलभट्टांचे विवेचन हाच आहे. म्हणजे साधनसाहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्थूलमानाने इ. स. च्या सातव्या शतकातील घ्यावा लागतो. ह्यामुळे विवाद्यता वाढते हे तर खरेच आहे; पण जर ही सारी स्पष्टीकरणे व विवेचने आक्षेपार्ह ठरवावयाची तर मंडळींना पूर्वमीमांसा सोडून पुराणांचा व वेदान्ताचा आधार घ्यावा लागतो हेही खरे आहे. तर्कतीर्थ हे कबूल करणार नाहीत, पण गाडगीळांच्या विरोधी बाजू घेताना ते वेदऋचांचे स्पष्टीकरण पौराणिक पद्धतीने करीत आहेत.
 आपला श्रद्धापूर्ण अभिमान हे विवाद्यता वाढण्याचे दुसरे कारण आहे. जगभर आदिवासींच्या जीवनाचा अभ्यास करून गोळा करण्यात आलेला पुरावा आणि भारतभरच्या आदिवासींच्या चालीरीतींशी असणारे त्या पुराव्याचे आश्चर्यकारक साम्य मान्य करणे आणि भारतातील गणतंत्रे, मातृसत्ता व इतर मातृनिष्ठ परंपरा यांबाबत कोणतेही विवेचन करणे आमच्या अहंतेच्या विरोधी जाते. शिव हा मुळात लिंगदेव आहे हे तर खरेच आहे; पण विष्णू हाही 'शिपीविष्ठ ' असल्यामुळे व ब्रह्मदेव प्रजापती, विधाता असल्यामुळे मुळात लिंगदेवच आहेत हेही तितकेच खरे आहे. लिंगपूजेच्या अतिप्राचीन परंपरेच्या विकासातून आमची पूज्य त्रिमूर्ती क्रमाने उदय पावते, विकसित होते, हे मान्य करणे फार कठीण जाते. देवीपूजेच्या मुळाशी असणाऱ्या योनिपूजेच्या परंपराही अशा मानवत नाहीत. चिकित्सा अशा प्रकारे अहंतेच्या विरोधी जाऊ लागली म्हणजे अहंता व परंपरा यांच्या समर्थनासाठी जोरदार युक्तिवाद पुढे येऊ लागतात. चर्चा न करता फक्त गप्प बसून उपेक्षा करणे हा तर परंपरा-समर्थकांचा फारच मोठा उपाय आहे.
 धर्म, विचार, विधी, श्रद्धा यांचा समाजजीवनाशी असणारा सांधा स्पष्ट करणे हे आपणांस रुचतच नाही. गाडगीळ कर्मठ मार्क्सवादी नसले तरी संयमशील मार्क्सवादीच आहेत. त्यांच्या मानसिक प्रक्रियेमागे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मार्क्स उभा असतोच. ह्या साऱ्या कारणांमुळे गाडगीळांच्या विवेचनात विवाद्यता भरपूर आहे आणि म्हणूनच त्यांच्या विवेचनाचा तपशिलाने विचार करायला हवा असे मला वाटते.
 एका अतिशय महत्त्वाच्या पण लक्षात घेतल्या न जाणाऱ्या प्रश्नापासून हा विचार आपण करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला वेदमंत्रांनी युक्त असा अभिषेक गागाभट्टांकडून इ. स. १६७४ ला करून घेतला हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. आपण असे विचारू शकतो की, शेवटी शिवाजी वर्णाश्रमधर्माला शरण जाणारा व राजेशाहीचा पुरस्कर्ताच होता की नाही ? मग आजच्या पुरोगामी युगात फार तर शिवाजीला आपण प्रतिगामी धर्माचा उपासक पण दयाळू हुकुमशहा म्हणू. याहून अधिक मोठेपण या माणसाचे काय म्हणून मान्य करावे ? डाव्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या काही पंडितांनी 'धैर्याने ' हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. माझा प्रश्न असा आहे की, हा प्रश्न उपस्थित करणे शास्त्रीय आहे का ? मार्क्सवादाशी तरी हा प्रश्न सुसंगत आहे का ? आणि माझे उत्तर असे आहे की, प्रश्नच मूलतः चुकीचा आहे. भारतात नवे शिक्षण, रेल्वे, मुद्रणकला, यंत्रोद्योग या साऱ्या बाबींचा आरंभच क्रमाने १९ व्या शतकात होतो. पहिली गिरणी आणि रेल्वे या बाबी तर १९ व्या शतकाच्या मध्यावर येतात. सरंजामशाही कालबाह्य होण्याची वेळच भारतात या वेळी येते. या काळाच्या पूर्वी राजेशाही, सरंजामशाही यांखेरीज दुसरा पर्यायच जर उपलब्ध नव्हता तर ज्या काळात समाजात दुसरा पर्यायच उपलब्ध नाही त्या काळात जनतेला गुलाम करणारे आणि जनतेच्या स्वातंत्र्याचे प्रतिनिधी असणारे दोघांनाही राज्य निर्माण करण्याविना व राजे होण्याविना पर्यायच नसतो हे आपण समजून घेतले पाहिजे.
 जे शिवाजी महाराजांना लागू आहे तेच ज्ञानेश्वरांनाही लागू आहे. जातिव्यवस्थेवर आधारलेली समाजरचना ही नुसती सामाजिक रचना नाही. ती अर्थव्यवस्था आणि उत्पादनव्यवस्था यांच्याशी जोडलेली घटना आहे. उत्पादनव्यवस्थेचा नवा पर्याय उपलब्ध होईपावेतो जातिभेद मोडण्याच्या आंदोलनाला आरंभच होऊ शकत नव्हता. म्हणून ज्ञानेश्वरांनी जातिव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले नाही, हा आक्षेप घेणेच मुळी अनैतिहासिक आहे असे डॉ. गाडगीळांचे म्हणणे आहे. श्री. पां. वा. गाडगीळांनी या ग्रंथाचे परीक्षण करताना व श्री. तर्कतीर्थांनी प्रस्तावनेत, प्रा. गं. बा. सरदारांनी ग्रंथप्रकाशनाच्या वेळच्या भाषणात, हा मुद्दा वेगवेगळ्या पद्धतीने उपस्थित केलेला आहे.
 या प्रश्नाची चर्चा करताना मराठीचे अभ्यासक काहीशा दुहेरीपणाने वागतात की काय याची मला शंका आहे. नामदेव आणि तुकाराम यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध बंड केले नाही, व्यावहारिक जीवनात त्यांनी ती मान्य केली यावर ते आक्षेप घेत नाहीत. ज्ञानेश्वर-एकनाथांनी जातिव्यवस्थेविरुद्ध बंड केले नाही हा मात्र आक्षेप घेतला जातो. आता पर्याय अनेक आहेत. जातिव्यवस्था मान्य करणाऱ्या ज्ञानेश्वरांचे फाजील लाड-कौतुक नको, हा एक पर्याय ; सगळे वारकरी संत जातिव्यवथा मान्य करणारेच आहेत म्हणून कुणाचेच कौतुक नको हा दुसरा पर्याय ; असे दोनच पर्याय उपलब्ध नाहीत. पर्याय अनेक आहेत. त्यांपैकी एक ज्ञानेश्वरांनाच जातिव्यवस्थेविरुद्धचा बंडखोर ठरविण्याचा आहे. कुणाला तरी वेठीला धरून तो वर्णव्यवस्था व जातिव्यवस्था मोडणारा क्रांतिकारक ठरविण्याचा आहे.
 या सगळ्या चर्चेत विसरला जाणारा मुद्दा असा आहे :
 चर्चेत जी वर्णव्यवस्था म्हणून असते पण व्यवहारामध्ये जी जातिव्यवस्था म्हणून बळकटपणे उभी असते ती समाजरचना एक सुटी रचना आहे, की तिचा उत्पादनव्यवस्था व अर्थव्यवस्थेशी संबंध आहे ? जे कर्मठ मार्क्सवादी आहेत त्यांनी हे म्हणायला हवे की, उत्पादनव्यवस्थेने समाजरचनेचे रूप धारण केलेले आहे (हे त्यांनी म्हणायला हवे, म्हणतीलच असे नव्हे). संयमित मार्क्सवादी मंडळी असे म्हणणार की, जातिव्यवस्था टिकून राहणे, बळकट होणे आणि तिच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणावर बंड न होणे यांचे कारण उत्पादनव्यवस्था हे आहे, मात्र जातिव्यवस्था या उत्पादनव्यवस्थेने निर्माण केली असे म्हणता येणार नाही. ही व्यवस्था जातिव्यवस्थेच्या निर्मितीशी सहभागी राहिली. या दोन्ही गटांना समान असणारा मुद्दा म्हणजे उत्पादनव्यवस्थेत परिवर्तनाची शक्यता उपलब्ध झाल्याविना जातिव्यवस्था मोडता येणार नाही. समाजव्यवस्था आणि उत्पादनव्यवस्था यांचा परस्परांशी काहीच संबंध नसतो, असे प्रतिपादन करणाऱ्यांनाच फक्त जातिव्यवस्थेविरुद्ध बंड न केल्याबद्दल ज्ञानेश्वरांना दोषी ठरविता येते.
 आपल्या परंपरेत अशा थोर विभूती आहेत की, ज्यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध बंड केले असा समज आहे. जे समाजाबाहेर निवृत्त जीवन जगू इच्छीत होते त्यांना आपल्या 'निवृत्तांच्या कुटुंबात' जातिभेद मानणार नाही असे म्हणता येत होते. परमार्थाच्या उपासनेत जातिभेद प्रमाण नाही असे म्हणणारा भक्तिमार्गीयांचा मेळावा होता. जातिभेद प्रमाण न मानणारे तंत्रवादी होते. या सर्वांची यादी पुरेशी मोठी आहे. यांपैकी कुणीही व्यावहारिक जीवनात जातिनिष्ठ समाजरचनेविरुद्ध बंड करणारा नव्हे असे गाडगीळांना म्हणावयाचे आहे. जातिव्यवस्थेविरुद्ध बंड भारतात १९ व्या शतकापूर्वी शक्यच नव्हते, म्हणून ते बंड अमुकाने केले हा खोटा आग्रह आपण सोडला पाहिजे व अमुकाने ते बंड केले नाही म्हणून तो दोषी, ही भूमिकाही आपण सोडली पाहिजे. आमच्या सगळ्या जाहीर सभांतील व्याख्यात्यांना हा मुद्दा अडचणीचा आहे, कटू वाटणारा आहे.
 जर समाजपरिवर्तन, जातिभेद मोडणे हे श्री ज्ञानेश्वरांचे वैशिष्टय नसेलच तर मग ज्ञानेश्वरांचे अपूर्व मोठेपण आणि अलौकिकत्व आहे तरी कोणत्या भूमिकेत ? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधताना गाडगीळ वैदिक यज्ञ, तंत्रमार्ग आणि भक्तिपरंपरा ह्यांकडे वळलेले आहेत.

 वैदिक यज्ञाचे स्वरूप काय ? असा हा प्रश्न आहे. यज्ञ केल्याने देव तृप्त होतात आणि तृप्त झालेले देव माणसाच्या इच्छा पूर्ण करतात म्हणून यज्ञ हे देवतांना प्रसन्न करण्याचे साधन आहे का ? यज्ञाचे हे भक्तिमार्गी स्पष्टीकरण आहे. फल देणारा, शिक्षा देणारा, इच्छा पूर्ण करणारा, देव. यज्ञाने देव तृप्त होतात, पण यज्ञापेक्षा भक्तीने देव अधिक प्रसन्न होतो व लौकर प्रसन्न होतो म्हणून भक्तिमार्ग श्रेयस्कर. या मांडणीत फलदाता ईश्वर आहे. जर यज्ञकल्पनेचे हे स्पष्टीकरण बरोबर असेल तर वैदिक यज्ञाचे पुढचे रूप पौराणिक यज्ञ व भक्तिमार्ग असे ठरेल. श्री ज्ञानेश्वरादी संत असोत की त्या आधीचे इतर कुणी संत असोत, वैदिक संस्कृतीचाच हा विकास आहे अशी तर्कतीर्थांची प्रसिद्ध भूमिका आहे. डॉ. शं. दा. पेंडसे आणि तर्कतीर्थ यांची भूमिका तपशिलात भिन्न आहे; पण मूलतः ती भूमिका एकच आहे. म्हणूनच यज्ञाचे स्वरूप काय, हा प्रश्न निर्माण होतो. यज्ञात फल देणारा कोण, हा प्रश्न निर्माण होतो.

 पूर्वमीमांसेच्या आचार्यांचे म्हणणे याबाबत स्पष्ट आहे. त्यांचे म्हणणे असे की, यज्ञ फल देतो. हे सामर्थ्य त्या विधीच्या क्रियेत आणि मंत्रात आहे. इथे देवांचा काही संबंध नाही. पूर्वमीमांसक वेद अनादि मानतात. त्यांचा कर्ता देव नव्हे. जग अनादि मानतात. त्याचा कर्ता देव नव्हे. आणि यज्ञाचे फल देणारे मंत्र व विधी आहेत, देव नव्हे. या चौकटीत देवांना स्थानच कोणते असणार? पूर्वमीमांसकांची भूमिका आहे ती ही आहे. पण तो वादाचा विषय नाही. कुमारिलभट्टांनी देवाला थोडेफार महत्त्व दिले. तरीही या दर्शनात देव फार गौण आहे. वादाचा प्रश्न हा आहे की, ऋग्वेद रचणाऱ्या ऋषींची भूमिका कोणती आहे ? त्यांच्या मागण्या पाहिल्या तर अन्न आणि पशुधन फार तर शत्रुनाश इथपर्यंत मर्यादित आहेत. ब्रह्म शब्दाचा प्राचीन निघंटूत नोंदविलेला अर्थ अन्न हाच आहे. देव यज्ञावर अवलंबून आहेत. यज्ञ नसेल तर देवांची फार उपासमार होते. देवांना सामर्थ्य यज्ञामुळे येते. या देवांना देवत्व किंबहुना माणसांनाही देवत्व यज्ञामुळे येते ही वेदकर्त्याची भूमिका आहे. यज्ञविधीचे हे महत्त्व ध्यानात घेऊनच मंत्रांना ' कामवर्षा' असे म्हणतात.
 डॉ. गाडगीळांचे म्हणणे असे आहे की, यज्ञ हा वैदिक आर्यांचा प्राचीन यातुविधी आहे. हीच भूमिका पूर्वमीमांसेत गृहीत आहे. हे सूत्र जर आपण मान्य केले तर त्याचा अर्थ हा आहे की, वैदिक यज्ञातून भक्तिमार्गाचा उदय होऊ शकत नाही. मला स्वतःला गाडगीळांची ही भूमिका बरोबर वाटते.

 पण अडचणींचा यामुळे परिहार होत नाही. हा अडचणींचा प्रारंभ आहे. कारण वैदिक वाङमयातच भिन्न भिन्न नावांनी ओळखला जाणारा देव एकच आहे, ही कल्पना येते. वरुणाकडून पापनाशाची अपेक्षा नोंदविली जाते. या कल्पना ऋग्वेदाच्या पहिल्या अगर दहाव्या मंडलातील आहेत हे जरी मान्य केले तरी त्या आहेत मात्र वेदांतीलच. देवतांना शरण जाण्याची कल्पना, इंद्राला स्तुती करून प्रसन्न करून घेण्याची कल्पना, पुन्हा वेदांतच येते. ‘मंत्रब्राह्मणयोर्वेदान' अशी ऐसपैस व्याख्या मान्य केली तर मोक्ष, ब्रह्म, देवाचे सामर्थ्य, देवाने जग निर्माण करणे, या साऱ्या कल्पना वैदिक वाङमयातून काढून दाखविता येतात. श्री. वेलणकर, श्री. पेंडसे, श्री. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि पाश्चिमात्यांपैकी मॅकडोनेल आदींचा भर या वचनांच्यावर असतो. गाडगीळांप्रमाणे वैदिक यज्ञ म्हणजे प्राचीन आर्यांचा यातुविधी असे स्पष्टीकरण न करता वैदिकांच्या भूमिकेचे दोन टप्पे मानणे अधिक योग्य आहे, असे मला वाटते. वैदिकांचा आद्यकाल पाऊस, अन्न, पशू , शत्रुनाश यांसाठी यातुविधीचा आहे. त्याचाच उत्तरकाल अवैदिकांच्या प्रभावाखाली एकेश्वरवादाकडे जाण्याचा आहे. भक्तिमार्गाचा सांधा, असल्यास या उत्तर वैदिक काळाशी असू शकतो. वैदिक काळानंतर शेकडो वर्षांनी प्रभावी झालेल्या भक्तिमार्गाचा मूळ वैदिक यातुविधीशी संबंध जोडता येत नाही.

 वैदिक आर्यांच्या शेजारी अवैदिक आर्येतरांचे मानवसमूह आहेत. त्यांचेही जीवन यातुप्रधानच आहे. यज्ञप्रधान आर्यांच्यापेक्षा या आर्येतरांचे विधी निराळे त्यांच्या कल्पना निराळ्या पण त्यांच्यातही लौकर व सहज लय न पावणाऱ्या श्रद्धा आणि विधी आहेतच. या आर्येतरांच्यासमोरही अन्न, पाऊस, संतती, पशुधन इत्यादी प्रश्न आहेतच. त्यांच्या प्राप्तीसाठी त्यांचेही यातुविधी आहेतच. हे व अशा प्रकारचे विधी जगभरच्या आदिम मानवसमूहात आहेत. यज्ञामुळे पाऊस पडतो ही आर्यांची श्रद्धा, तर पावसाशी निगडित पर्जननृत्य केले म्हणजे पाऊस पडतो ही आर्येतरांची श्रद्धा. या आर्येतरांच्या यातुकल्पनेत स्त्रीला फार मोठे महत्त्व आहे. सर्व निर्मिती स्त्री करते; समूहातील सर्व स्त्रीपुरुषांनी मुक्त उपभोग शेतात जाऊन घ्यावा, त्यामुळे जमिनीत बीजशक्ती वाढते, उत्पादन वाढते, अन्न वाढते; अशा आर्येतरांच्या श्रद्धा आहेत. हा मुद्दा समोर ठेवून आर्येतरांचे अनेक विधी व सण आहेत. त्यांच्या मातृदेवता आहेत. या आर्येतरांच्यापैकी अनेक समूह मातृसत्ताक आहेत. जे मातृसत्ताक समूह नाहीत तिथेही मातृपरंपरा खूप प्रभावी आहेत. आर्येतरांच्या या यातुविधीत व श्रद्धांच्यामध्ये तंत्राचा उगम आहे, असे गाडगीळांचे म्हणणे आहे. अधिक नेमकेपणाने त्यांचे म्हणणे असे की, समाज एक अवस्था ओलांडून पुढे गेला. नंतर या श्रद्धा व विधींना सामाजिक अस्तित्व 'टिकविण्याचा व जगविण्याचा' अर्थ उरला नाही, पण याहीनंतर हे विधी मात्र टिकून राहिले. धर्माच्या नावाखाली या विधींना आत्मसात करून टिकविण्याचे काम तंत्रमार्गाने केले.
 तंत्राचा उगम व तंत्राचे मूळ आर्येतरांचे यातुविधी व श्रद्धा यांमध्ये आहे हे गाडगीळ यांचे मत मला पटते. पण तंत्रसाधनेचे इतकेच स्पष्टीकरण करणे अपुरे आहे, असे मला वाटते. आपण जर स्थूलमानाने इ. स. पू. २००० ह्या ठिकाणी रेघ मारली तर त्या आधीच्या काळात आर्यांचा वैदिक यातुविधी यज्ञ आहे. आर्येतरांचा स्वतंत्र यातुविधींचा पसारा आहे. दोन्ही समूहांच्या समोर अन्न हा प्रमुख प्रश्न आहे. या काळाच्या आपण कितीतरी पुढे येतो. इसवीसनाच्या आरंभाजवळ येतो. आणि तंत्रसाधनेच्या खाणाखुणा दिसू लागतात. तंत्र धर्मजीवनात प्रभावी ठरू लागते. भारताच्या सर्वांगीण जीवनऱ्हासाचा व तंत्राच्या वैभवाचा काळ स्थूलमानाने इ. स. च्या आठव्या-नवव्या शतकापासून सुरू होतो. सर्व समाजभर पसरलेले यातुविधी सार्वत्रिक असूनही फक्त जीवन टिकविणारे, समाजाचा आधार म्हणून राहतात, हा एक काळ आहे इ. स. दोन हजार पूर्वीचा, आणि तेच आचार समाजाच्या सर्वांगीण ऱ्हासात सहभागी होतात हा दुसरा काळ आहे इ. स. ८०० नंतरचा. या दोन कालखंडांच्या मध्ये दोन हजारांहून अधिक वर्षे जातात, इतकेच सत्य नाही, तर भारताच्या सर्वांगीण वैभवाचा सुवर्णकाळही येऊन जातो. ज्या चालीरीती आणि विधी हजारो वर्षे सार्वत्रिक व सर्व समाजाच्या म्हणून चालत आल्या, त्याच चालीरीती सार्वत्रिक न राहता काही धर्मगटांच्या, वरिष्ठ वर्गाच्या म्हणून तंत्रमार्गात येतात. तांत्रिकांच्या व्यवहाराकडे सामाजिक ऱ्हासाचा पुरावा म्हणून पाहणे निराळे आणि सामाजिक ऱ्हासाचे कारण म्हणून पाहणे निराळे. डॉ. गाडगीळ तंत्रमार्गाला -हासाचे कारण मानतात. हे त्यांचे म्हणणे मान्य करण्यासाठी या विधीचे उगम आर्येतरांच्या यातुविधीत आहेत ही नोंद पुरेशी नाही.
 भारतीय समाजजीवनाच्या सर्वांगीण ऱ्हासाला इ. सनाच्या आठव्या शतकापासून आरंभ होतो आणि हा ऱ्हास वाढतच जातो, ही घटना का घडते या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर अजून मिळत नाही. डॉ. गाडगीळ जे नोंदवितात ते सारे सत्य मान्य करूनही मिळत नाही. जोपर्यंत तंत्रसाधना हे ऱ्हासाचे स्वरूप आहे या भूमिकेवरून आपण, ते ऱ्हासाचे कारण आहे या भूमिकेपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत तंत्रविरोध हा सामाजिक उन्नयनाचा प्रयास आहे हे मत निर्विवाद ठरत नाही. '
 जगभरच्या सर्व आदिम जातींच्यामध्ये यातू आहे, यातुश्रद्धा आहेत, विधी आहेत. आपल्या भारतात वैदिक आर्यांचा यातुविधी यज्ञ आहे; तर आर्येतरांचा यातुविधी तंत्र आहे हे मला मान्य आहे. पण सामाजिक वास्तवाचा अजूनही काही भाग आहे. डॉ. गाडगीळांनी हा भाग पुरेसा रेखीवपणे मांडलेला नाही अशी माझी तक्रार आहे. आर्यांचे आगमन ही काही एका दिवशी, एका काळी अगर वर्ष-दोन वर्षांत घडलेली घटना नाही. या आर्यांच्या टोळ्या भारतात निदान सतत पाच शतके येत होत्या. या सर्व टोळयांचे यातुविधी सारखे असले तरी एकच नव्हते. आर्यांच्या भिन्न भिन्न समूहांत थोडे थोडे फरक होते आणि ज्या भारतात ह्या आर्य टोळया येत होत्या तेथील आर्येतरांचेही विविध प्रदेशांत वसलेले समूह होते. या आर्येतरांच्याही यातुविधींत थोडे थोडे फरक होते. आर्यांच्या टोळ्या असोत वा आर्येतरांच्या टोळया असोत, स्थूलमानाने त्यांच्यात कितीही साम्य असो तपशिलातील फरक प्रत्येक ठिकाणी असतो. या फरकाचे प्रमाण किती हा अनुमानाचा भाग आहे.
 भक्तिमार्गाचा उदय जग निर्माण करणारा ईश्वर, शासन करणारा व कृपा करणारा ईश्वर या सर्व कल्पनांच्यासह होतो. गाडगीळांचे म्हणणे असे की, या कल्पना अवैदिक आहेत. 'मीच ' देव निर्माण करते, देवांना शक्ती देते, जग निर्माण करते, जगाचे पोषण करते असे म्हणणारी देवता अंभृणी ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात येते. जे ऋग्वेदात येते, जे वैदिकांना मान्य आहे तेही अवैदिकांचे आहे, असे डॉ. गाडगीळांचे म्हणणे आहे. अवैदिकाच्या यातुविधीशीही विश्वनिर्मात्या देवाची कल्पना विसंगतच आहे. ती वैदिकांच्या यज्ञनामक यातुविधीशीही विसंगत आहे. पण आर्येतरांच्या टोळयांत यातुश्रद्धेशी विसंगत विचार जन्माला येतात तसे आर्यांच्या टोळ्यांत जन्माला यावयाला काय हरकत आहे ? वैदिकांची मध्यवर्ती कल्पना यज्ञ. तिच्यातून भक्तिमार्गाचा उदय अशक्य हे जितके खरे तितकेच आर्येतरांच्या यातुविधीतूनही भक्तिमार्गाचा उदय अशक्य आहे हे खरे नाही का ? वैदिक आर्य असोत की समकालीन आर्येतर असोत, त्यांच्या मध्यवर्ती विचारधारा, त्यांचे मध्यवर्ती प्रधानविधी व आचार भक्ती या कल्पनेशी विसंगत आहेत. मग भक्तिमार्गाचा उगम अवैदिकच म्हणण्याचे कारण काय ?
 याची कारणे दोन आहेत. एकतर भक्तिमार्गात ज्या देवतांना महत्त्व आले त्या, वैदिकांच्या गौण देवता आहेत. त्यांतील विष्णू आणि शिवलिंग देव आहेत आणि पुढे पुराणात सतत या देवांशी स्पर्धा करून इंद्र पराभूत झाल्याची वर्णने आहेत. भक्तिमार्गातील प्रमुख देवता ह्या वैदिकांच्या प्रमुख देवतांच्या विरोधक, त्यांना पराभूत करणाऱ्या आणि वैदिकांनी लौकर मान्य न केलेल्या आहेत. दुसरे म्हणजे भक्तिमार्ग हा नेहमीच यज्ञप्रधान कर्मकांडाविरुद्ध, सामान्य जनतेचा उठाव या स्वरूपात वावरला, विकसित झाला. या दोन कारणांच्यामुळे अवैदिक परिघात जन्माला येऊन, नंतर वैदिकांच्या समूहात घुसलेली व शेवटी वैदिकांच्या मूळ भूमिकेवर मात करणारी कल्पना म्हणूनच भक्तिमार्गाकडे पाहिले पाहिजे.
 या संदर्भात गाडगीळांनी जे विवेचन केले आहे त्यावर माझे दोन आक्षेप आहेत. प्रथम म्हणजे या कल्पना अवैदिक आहेत ही नोंद पुरेशी नाही. क्रमाने संस्कृतिसमन्वयाच्या प्रक्रियेत या कल्पना वैदिक वाङमयातच प्रभावी होत जातात व यज्ञाचे सामाजिक महत्त्व समाप्त करतात, यांचाही आढावा हवा. डॉ. गाडगीळांच्या विवेचनात दुसरा भाग प्रभावी होत नाही. पण दुसरा याहूनही महत्त्वाचा आक्षेप म्हणजे प्राचीन मानवी समूहांच्यासमोर असणारे मुख्य प्रश्न दोन. अन्न आणि रक्षण या दोन गरजांच्या भोवती वैदिकांचे व आर्येतरांचे यातुविधी निर्माण होतात. या समूहांना जग निर्माण करणारा, कृपा करणारा देव का लागतो; यातुविधीबाहेर का जावे लागते; समाजजीवनाच्या कोणत्या अवस्थेतून, कोणत्या गरजेतून विश्वपालक व नियंता जन्माला येतो; याचा फारसा तपशिलाने विचार करण्याची गरज डॉ. स. रा. गाडगीळांना वाटलेली नाही. पितृसत्ताक समूहात शेतीचा पुरेसा विकास झाल्यानंतरच ह्या सर्वसाक्षी देवाचा उदय होतो, अशी माझी समजूत आहे.

 वैदिक यज्ञ, अवैदिक तंत्र आणि भक्तिमार्ग यांचा आपापसात सतत संघर्ष चालू असलेला दिसतो. बौद्ध आणि जैन हे वैदिक यज्ञाविरोधी बंड करणारे प्रमुख गट असे आपण मानतो. पण पूर्वमीमांसेखेरीज असणाऱ्या वैदिक दर्शनांच्या परंपरा व चार्वाक आणि इतर तंत्रसाधक संप्रदाय, भक्तिमार्गी हेही यज्ञविरोधी राहिले. मुळचा यज्ञच क्रमाने बदलत नामजपयज्ञ या कल्पनेपर्यंत बदलला.

 या परिवर्तनक्रमात आपण तेराव्या शतकात म्हणजे, ज्ञानेश्वरांच्या काळी येतो. या कालखंडात भोवतालचे वातावरण कसे आहे ? प्रथम म्हणजे वैदिकांचे यज्ञप्रधान कर्मकांड आहे. बौद्ध परंपरा आधीच लुप्त झालेल्या होत्या. जैनही फारसे प्रभावी राहिलेले नव्हते. पण शैव, वैष्णव, शाक्त इत्यादींच्या तंत्रसाधना व त्यांचे वामाचार, अभिचार आहेत. ते समाजात खूपच प्रभावी आहेत. परमार्थसाधना म्हणूनच चालणारे व्यभिचारांचे अड्डे आहेत. आणि तिसरे म्हणजे भक्तिमार्ग व त्याचे नव्याने वैभवात आलेले देऊळ व पूजाप्रधान कर्मकांड हेही आहे. या तीन प्रमुख गटांच्यामध्ये एकमेकांचे विचारही खूप मिसळलेले आहेत. वैष्णवांची मधुराभक्ती म्हणजे आशयतः तंत्रमार्ग, पण तो भक्तीच्या मखरात बसविलेला दिसतो. देऊळप्रधान पूजेचे कर्मकांड म्हणजे पुन्हा वरिष्ठ वर्गाने मनोरंजनासह सर्व सोयी भक्तीच्या नावे संग्रहित केलेल्या. अशी विविध मिश्रणे आहेत. त्यांचा पुरेसा परामर्ष गाडगीळांनी घेतलेला आहे.
 भक्तिमार्गात सारे महत्त्व परमेश्वराला. भक्ताचे काम त्याचे गुणवर्णन करणे व सेवादास्य करणे, ईश्वराच्या कृपेची वाट पाहत बसणे. तंत्राच्या आहारी जाऊन समाजाचा -हास होतो हे जितके खरे आहे तितकेच देव व देऊळ यांवर होणारे प्रचंड खर्च, तिथे फुकट जगणारे लोक व ईश्वरावर भार टाकून कर्तव्य सोडून बसणारे लाखो भाविक हा अपव्ययच असतो. समाजाचा त्यातील कर्तृत्वशक्तीचा ऱ्हासच असतो, हेही खरे आहे. म्हणून संत ज्ञानेश्वरांचे मोठेपण केवळ भक्तिमार्गी असण्यात नाही; तर एकीकडे यज्ञ-तंत्र-देऊळप्रधान सेवादास्य यांच्याविरुद्ध जीवनाचे शुद्धीकरण प्रतिपादन करणारी जनतेची आंदोलने निर्माण करण्यात आहे आणि दुसरीकडे भक्तियोग ही कल्पनाच नव्याने मांडण्यात आहे. ज्ञानेश्वरांच्या भक्तियोगात जीवनाचे शुद्धीकरण आहे. कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडाचा विरोध आहे. त्याचप्रमाणे लोकसंग्रहार्थ कर्तव्यकर्माची जबाबदारीही आहे. ज्ञानेश्वरप्रणीत भक्तिमार्ग हा इतर सर्व भक्तिमार्गापेक्षा निराळा आहे.

 डॉ. गाडगीळांच्या या विवेचनाला मी फक्त एक पुरवणी जोड इच्छितो. ज्ञानेश्वरांना काय हवे होते, त्यांच्या समकालीन वारकरी संतांनी कोणते कार्य केले हे सारे गाडगीळांचे विवेचन मला मान्य आहे. पण पहिली दोन-तीन शतके गेल्यानंतर शिल्लक काय राहिले ? सर्व भारतभर विशिष्टाद्वैती, शुद्धाद्वैती, द्वैती व भेदाभेदवादी भक्तिमार्ग जसेच्या तसे राहिले. ज्ञानेश्वर आणि कबीर त्यांच्यावर मात करू शकले नाहीत आणि महाराष्ट्रात ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी अतिपूज्य असली तरी व्यवहारात ईश्वरसेवा हाच भक्तीचा आदर्श राहिला. ज्ञानेश्वर फारसा रुजला नाही, फक्त पूज्य ठरला एवढाच ह्याचा अर्थ आहे.

 डॉ. स. रा. गाडगीळ यांचा ग्रंथ किती प्रश्नांना स्पर्श करणारा: व किती महत्त्वपूर्ण विवेचन सादर करणारा आहे याचा हा केवळ धावता आढावा आहे. एवढे महत्त्वपूर्ण विवेचन, अध्ययनाचे फल म्हणून समोर ठेवणाऱ्या अभ्यासकाचे ऋण सर्वचजण मान्य करतील

(वैदिक यज्ञ, तंत्रसाधना आणि ज्ञानेश्वरप्रणीत भक्तियोग-ले. डॉ. स. रा. गाडगीळ. प्रका. : दास्ताने आणि कं. पुणे.)