देव अजब गारोडी - धरत्रीच्या कुशीमधीं बीय...

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

धरत्रीच्या कुशीमधीं

बीयबियानं निजलीं

वर्‍हे पसरली माटी

जशी शाल पांघरली

बीय टरारे भुईत

सर्वे कोंब आले वर्‍हे

गह्यरलं शेत जसं

आंगावरतीं शहारे

ऊन वार्‍याशीं खेयतां

एका एका कोंबांतून

पर्गटले दोन पानं

जसे हात जोडीसन

टाया वाजवती पानं

दंग देवाच्या भजनीं

जसे करती कारोन्या

होऊं दे रे आबादानी

दिसामासा व्हये वाढ

रोप झाली आतां मोठी

आला पिकाले बहार

झाली शेतामधी दाटी

कसे वार्‍यानं डोलती

दाने आले गाडी गाडी

दैव गेलं रे उघडी

देव अजब गारोडी !


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.