चुल्हा पेटता पेटेना ! - घरीं दाटला धुक्कय कसा हा...

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

घरीं दाटला धुक्कय
कसा हाटतां हाटेना
माझे डोये झाले लाल
चुल्हा पेटतां पेटेना

चुल्हा किती फुका फुका
लागल्या रे घरामंधी
अवघ्याले भुका भुका

आतां सांपडेना हातीं
कुठे फूकनी बी मेली
कुठे पट्टवकरीन-
'नूरी, पयीसन गेली.

आतां गेल्या सरीसनी
पेटीमंधल्या आक्काड्या
सर्व्या गेल्या बयीसनी
घरामधल्या संकाड्या

पेट पेट धुक्कयेला,
किती घेसी माझा जीव
आरे इस्तवाच्या धन्या !
कसं आलं तुले हींव !

तशी खांबाशी फूकनी
सांपडली सांपडली
फुकी-फुकीसनी आग
पाखडली पाखडली !

आरे फूकनी फूकतां
इस्तो वाजे तडतड
तव्हां धगला धगला
चुल्हा कसा धडधड

मंग टाकला उसासा
थोडा घेतला इसावा
एकदांचा आदयला
झट चुल्ह्यावर तावा

आतां रांधते भाकर
चुल्ह्यावर ताजी ताजी
मांघे शिजे वजेवजे
मांगचुल्हीवर भाजी

खूप रांधल्या भाकरी
दुल्ळी गेली भरीसनी
मंग हात धोईसनी
इस्त्यावर पडे पानी

इस्त्यावर पडे पानी
आली वाफ हात लासे
तव्हां उचलता तावा
कसा खदखदा हांसे !


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg