Jump to content

आप्पा महाराज - नाम जपता जपता 'जे जे राम...

विकिस्रोत कडून

नाम जपता जपता
'जे जे रामकृस्न हरी'
आप्पा महाराज गेले
गेले आज देवाघरी

जसा पुत्रू 'रामदास'
आन सून 'सीतामाई'
तसा लोकावरी जीव
मनीं दुजाभाव नहीं

उभ्या गांवाचे कैवारी
खरे रामाचे पुजारी
आप्पा महाराज गेले
सोडीसनी देवाघरी

आंसू लोकाचे गयाले
जशा पावसाच्या सरी
आप्पा महाराज गेले
गेले आज देवाघरीं

आप्पाजींची दयामाया
किती पार नहीं त्याले
तुम्ही इचारा इचारा
'बावजीच्या समाधीले

तुकाराम, मुक्ता जना'
मरीसनी रे जगले
आतां कसं म्हनू तरी
आप्पा महाराज मेले?

किती भजन किर्तन
रामनामाची लहेर
केलं रामाचं मंदीर
संत लोकाचं माहेर

राम लक्षूमन सीता
बसवले रे मंदीरीं
त्याले सोन्याचा कयस
जागा संगमरवरी

दरसाल दहा दिसा
येतो उच्छावाले भर
वाहनावर्‍हे बशीसनी
येती दहा अवतार

दाही सरता वहनं
आली एकादशी मोठी
मंग सवारला रथ
झाली गांवामंधी दाटी

चार फोडले नारय
अरे, चार्‍ही चाकावरी
सर्व्या मयांतले फुलं
चढवले रथावरी

रस्त्यावर शीपडल्या
लाखो पान्याच्या घागरी
रथ चाले घडाघडा
लागे चाकाले मोगरी

सर्व्या बजाराचे केये
माझ्या रथाची वानगी
घरोघरीं ऐपतींत
मिये पैशाची कानगी

लोक आले दर्सनाले
लोक झुंड्यावर झुंड्या
रथापुढती चालल्या
किती भजनाच्या दिंड्या

ज्यांनीं केली कार्तीकीले
'जयगांवाची' पंढरी
आप्पा महाराज गेले
गेले म्हनूं कस तरी?


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.