Jump to content

चिमुकली इसापनीती/कासव आणि ससा

विकिस्रोत कडून

एक कासव हळू हळू घरी चालले होते. कासवाला लौकर चालता येत नाही; यामुळे थोडेसे चालावयासही फार वेळ लागे. हे एका सशाने पाहिले. ससा फारच जलद धावतो. तो हसून कासवाला बोलला, काय रे, तू किती सावकाश चालतोस? अशा रीतीने तू घरी कधी पोहोचणार? कासव शहाणे होते. ते बोलले, बाबा रे, तू एवढी ऐट मारू नकोस! मी सावकाश चालतो आणि तू जलद पळणारा आहेस. बरे, तर आपण एक पैज मारू. ती समोर टेकडी दिसते ना? तेथे आधी कोण पोहोचते ते पाहू बरे. हे ऐकून सशाने हसत हसत कासवाला सांगितले, चल, मला ही पैज कबूल आहे. नंतर दोघेही वाट चालू लागले. सशाने एक धाव मारून कासवाला मागे टाकले. कासव सावकाश चाललेच होते. सशाने मागे वळून पाहिले तो कासव फारच दूर! हे पाहून सशाने विचार केला की, हे कासव तर फारच मागे आहे; मग इतकी घाई कशाला हवी? आता या गार झुडपात थोडीशी झोप काढावी. कासव जरा जवळ आले की, एक उडी मारून टेकडी गाठावी. असा विचार करून ससा एका झुडपाखाली पडला व लौकरच गाढ झोपी गेला. इकडे बिचारे कासव हळू हळू चालत होते. पण ते वाटेत कोठेही थांबले नाही; सारखे चालतच होते. अशा रीतीने लौकरच ते टेकडीवर जाऊन पोहोचले. काही वेळाने ससा जागा झाला आणि पाहतो तो कासव टेकडीवर बसलेले! बिचारा ससा हे पाहून फारच वरमला. नंतर कासव बोलले, बाबा रे, कधीही ऐट मारू नये; आणि आपले काम नेहमी वेळेवर करावे. तू जलद चालणारा ससा, पण आळसाने फसलास!


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.