चिमुकली इसापनीती/मुलगा आणि वाघ

विकिस्रोत कडून

एक मुलगा एका कुरणात मेंढरे चारीत असे. जवळ शेतात शेतकरी आपले काम करीत असत. या कामकरी लोकांना फसवावयासाठी तो लबाड मुलगा दररोज उगीच ओरडत असे की, वाघ आला रे वाघ! मुलाची अशी आरोळी ऐकून बिचारे शेतकरी धावून येत व वाघबीघ काही नाही, असे पाहून परत जात. शेतकरी असे फसले की, तो मुलगा हसत सुटे. दोन चार वेळा शेतकरी असे फसले; पण पुढे मुलाची आरोळी ऐकून ते येईनातसे झाले. अखेर एकदा खरोखरीच वाघ आला. वाघाला पाहून तो मुलगा फारच घाबरला व ओरडू लागला की, वाघ आला रे वाघ! पण लोकांना वाटले की, तो लबाड मुलगा नेहमीसारखाच फसवीत असेल. अशा समजुतीने कोणीही मदतीसाठी धावून आले नाही व इकडे वाघाने मुलाची सारी मेंढरे मारून टाकली. पहा, एक वेळ खोटे बोलले की, पुढे लोक आपणावर भरवसा ठेवीत नाहीत.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.