चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न/चांदवड जाहिरनामा व शपथ

विकिस्रोत कडून

आठ


चांदवड - जाहीरनामा व शपथ



 आम्ही,
 दिनांक १० नोव्हेंबर १९८६ रोजी, अहिल्याबाई होळकरांचे चांदवड येथे एकत्र आलेल्या लाखावर स्त्रिया, काही शहरी, पण बहुसंख्य खेड्यापाड्यांतून आलेल्या, थोड्या शिकलेल्या पण बहुतेक पाटीसुद्धा न पाहिलेल्या, जवळजवळ सगळ्या शेतात किंवा इतरत्र राबणाऱ्या कष्टकरी बाया, लहानथोर, भिन्नभिन्न जातींच्या, वेगवेगळ्या धर्मांच्या. थोडक्यात भारतीय स्त्रीजीवनाच्या यथार्थ प्रतिनिधी.
 जाहीर करतो की,
 आम्ही माणसे आहोत, इतर कोणाच्याही बरोबरीने माणसे आहोत आणि आम्हाला माणूस म्हणूनच वागविले गेले पाहिजे,
 आमची गुणवत्ता लक्षात घेतली जावी; जन्माच्या अपघाताने ठरणारे विशेष-जात, वर्ण, धर्म, भाषा, संपत्ती नाही आणि लिंगभेद तर नाहीच नाही
 आणि शपथ घेतो की,
 आमचे माणूसपण हिरावणारी हजारो वर्षांची बंधने झुगारून देत आहोत,
 युगायुगांची दुःखे, अत्याचार, परवशता, अपमान आणि शोषण यातून आम्ही मुक्त होत आहोत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे, आमची वैरिणी आमच्याच मनातली भीती आम्ही गाडून टाकीत आहोत; त्याचबरोबर, पुरुषांचीही त्यांना मिरवाव्या लागणाऱ्या खोट्या पुरुषीपणाच्या मुखवट्याच्या जाचातून सुटका करण्याचा आमचा निश्चय आहे.
 पुरुषांना याची जाणीव असो वा नसो स्त्रियांच्या बेड्या या त्यांचेही दुर्दैव आहे.
 स्त्रीला तिच्या निसर्गसिद्ध भूमिकेतून ढळविले की पुरुषही स्व-भावाला पारखा होतो.
 स्त्रीची मूर्ती हीन-दीनतेची झाली की पुरुष रुपात विक्राळ विदुषकीपणा येणारच.
 स्त्री-मुक्ती आणि पुरुष-मुक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
 माणसासारखं जगण्यासाठी स्त्रिया हजारो वर्षे वाट पाहत आहेत. स्त्रियांनी शेतीचा शोध लावला. हुकमी पिकंमुळे सुबत्ता आणि शांती यांचा मार्ग खुला होईल आणि अन्नाच्या शोधाची वणवण आणि दुःखे संपतील ही आशा फोल ठरली.
 पहिल्या पिकांबरोबर लुटारूंच्या झुंडी आल्या आणि लुटालूट, कत्तली, बलात्कार, विद्ध्वंसाचे 'नवे जंगली युग'-लोक भले त्याला संस्कृती-युग म्हणोत चालू झाले. आपल्या कष्टांना आलेले हे फळ पाहून स्त्री हतबुद्धच झाली आणि वेगळी भूमिका तिला स्वीकारावी लागली. सर्व समाजाची बांधणीच आक्रमणांपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने होऊ लागली. आक्रमणे कधी जवळपासच्या प्रदेशातून येत तर कधी दूरच्या अज्ञात प्रदेशातून. लढाईत पुरुषांची सर्रास कत्तल होई त्यामुळे प्रत्यक्ष लढाईत पुरुषांचीच भूमिका प्रमुख राहिली. मातृत्वाच्या जबाबदारीमुळे येणाऱ्या अडचणींमुळे प्रत्यक्ष लढाईत भाग घेणे स्त्रीला दुरापास्त होई आणि त्यामुळे तिच्याकडे पिछाडी सांभाळायचे काम आले. धुमश्चक्री चालू असताना धनसंपत्तीबरोबर तिलाही बंदोबस्तात राहवे लागले. हरणाऱ्या आणि जिंकणाऱ्या दोन्ही समाजात पुरुषांचे प्रमाण खालावतच राहिले.
 सर्व समाजात लढाऊ पुरुषांची सद्दी सुरू झाली. अधिकाधिक मुले व्हावीत, त्यात मुलगे अधिक जन्मावेत, त्यांनी बलशौर्याची जोपासना करावी हे नवे मानदंड ठरले, स्त्रियांनी अधिकाधिक संतती निर्माण करावी आणि आपल्या पुरुषांचे पौरुष वाढावे यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करावा. थोडक्यात, स्त्रीचा आदर्श वीरप्रसवा, वीरभगिनी, वीरमाता.
 परिणामतः, हरो कोणी, जिंको कोणी खऱ्या हरल्या दोन्ही बाजूच्या स्त्रिया. जेत्यांच्या स्त्रियांना लुटीची आभूषणे पेहरण्याचा सोहळा सोडल्यास स्त्री म्हणून त्यांची स्थिती पराजितांच्या स्त्रियांपेक्षा काहीच वेगळी नव्हती.
 सुरुवातीला आक्रमणाचे संकट टळले की, ही तात्पुरती व्यवस्थाही जाईल असे वाटले. पण लूटमारीइतके फायद्याचे काहीच नाही; त्यामुळे लूटमारच व्यवस्था बनली. कुटुंबातील नव्या भूमिका इतक्या रुजल्या की त्या नैसर्गिक आणि अनादि वाटू लागल्या. लूटमारीच्या पद्धतीतही सुधारणा झाली. लुटारूंच्या हाती राजसत्ता आली आणि नंतर प्रजासत्ताही.
 खुलेआम लुटीच्या जागी वेगवेगळ्या पद्धती आल्या. महसूल, गुलामगिरी, वेठबिगारी, सावकारी, जमीनदारी, जातिव्यवस्था, धर्मव्यवस्था, साम्राज्यवाद आणि शेवटी स्वातंत्र्यानंतरचा काळा वसाहतवाद.
 पण ही सुधारणा वरवरची. या सर्व पद्धती मूलतः क्रूर लुटीच्याच पद्धती. त्यामुळे समाज आजही संरक्षक तटबंदीतच आहे आणि स्त्रिया गुलामीत आणि जुलमात. नव्या जंगली युगातील या श्रमविभागणीमुळे स्त्री-पुरुषांच्या संतुलित व्यक्तिमत्वाचे विभाजन आणि ध्रुवीकरण होत गेले.
 स्त्रीचा आदर्श हा सर्व सौम्य आणि परवश गुणांनी बनलेला तर पुरुषार्थाच्या सर्व कल्पना कठोर आणि विक्राळतेवर आधारलेल्या. स्त्रीत्व विकृत झाले, बरोबरीने पुरुषार्थाचेही विडंबन झाले.
 आमच्या या देशातली स्थिती तर सर्वात भयानक. क्वचितच एखाद्या देशाला इतक्या लढायांना आणि आक्रमाणांना तोंड द्यावे लागले असेल.
 १९ व्या शतकातली भारतीय नारीइतकी हीन-दीन स्त्री दुसऱ्या कोणत्याही देशात कधीही झाली नसेल. सतीची चाल, केशवपन, शिक्षणबंदी यावरून स्त्रियांवरील अमानुष अन्यायांची काहीशी कल्पना येते.
 इंग्रजांबरोबर राजकीय स्थैर्य आले आणि त्यामुळे स्त्रियांच्या स्थितीत अनेक सुधारणाही झाल्या. कायद्यांची कागदी घोडदौड स्वातंत्र्यानंतरही चालू राहिली. आज कागदावरतरी स्त्रियांना संरक्षण देणारे कायदे भारताइतके इतर कोणत्याही देशात नसतील.
 मोठ्या खानदानातील काही भाग्यवतींची स्थिती त्यांच्याच समाजातील पुरुषांपेक्षाही उजवी आहे. हा किरकोळ अपवाद सोडल्यास देशातील सर्वसाधारण स्त्रीइतका त्रास, जुलूम, शोषण आणि मारपीट कोणालाही सहन करावी लागत नसेल. स्त्रियांना जाळून वा बुडवून मारण्याचे प्रकार हरहमेशा होत असतात. याचे कारण एकच, स्वातंत्र्यानंतरच्या काळात युगानुयुगे चाललेली लूटमारीची पद्धत कायम झाली. 'भारता'ची लूट 'इंडिया'कडून होऊ लागली आणि ग्रामीण भागात सहकारी संस्था फस्त करणाऱ्या गुंडांनी, तर शहरात वाढणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या आधाराने गुन्हेगारीची साम्राज्ये चालविणारे दादा यांनी जुन्या लुटारूंची जागा घेतली. एवढाच काय तो फरक. अर्थव्यवस्था लूटमारीची राहिली आणि म्हणून स्त्रीची स्थिती गुलामगिरीची.
 नवी पहाट
 इतिहासात माहीत असलेल्या कोणत्याही पद्धतीने स्त्रियांच्या प्रश्नाचे आदिकारण-शेतीच्या बचतीची क्रूर लूट-दूर केली नाही. या पद्धतीला आज पहिल्यांदा आव्हान देऊन यशस्वीरीत्या विरोध होत आहे.
 नव्या शेतकरी आंदोलनाचा खरा अर्थच हा आहे. त्याशिवाय गेल्या चाळीस वर्षांत निदान जागतिक महायुद्ध तरी घडलेले नाही आणि शेवटी शक्तीबळाला महत्त्व न देणारे नवे तंत्रज्ञान उदयाला येत आहे. स्त्रियांच्या पुनरुत्थानांचा काळ आल्याची ही सर्व शुभचिन्हे आहेत.
 परंतु स्त्रियांनी जागृत होऊन आणि संघटितपणे या अनुकूल परिस्थितीच्या संगमाचा फायदा घेऊन प्रचलित व्यवस्थेला निर्णायक धक्का दिला नाही तर ही अनुकूल संधीही वाया दवडल्यासारखे होईल. स्त्रियांना संघटितपणे कष्टकऱ्यांचे हक्क मिळवावे लागतील. तसेच स्त्रीपणाच्या हक्कासाठी झुंझावे लागेल. त्याहीपेक्षा महत्त्वाची आणखी गोष्ट, पीछेहाट होणारे लुटारू जाती, धर्म, भाषा आदी क्षुद्रवादांचे झेंडे उभारून पुन्हा एकदा हिंसाचाराचा डोंब भडकवण्याचा प्रयत्न करतील. याबद्दल स्त्रियांनी विशेष जागरूक राहणे आवश्यक आहे.
 स्त्रियांची सध्याची दुरवस्था फार जुनी आहे, या स्थितीला पर्याय नाही असे स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही शिक्षणाने, उदाहरणाने, संस्कृतीने आणि राजकारणाने पटवून देण्यात आले आहे.
 आपण माणसे आहोत आणि माणसाप्रमाणेच सन्मानाने व स्वतंत्रपणे जगू शकतो हे स्त्रियांना सांगावे लागेल आणि पटवून द्यावे लागेल. या दिशेने पहिले पाऊल म्हणून-
 आम्ही प्रतिज्ञा घेतो की,
 आम्ही यापुढे स्त्रियांना कधीही कनिष्ठ समजणार नाही. विशेषतः गर्भ स्त्री-बालकाचा आहे यास्तव त्याला जन्माचा हक्क नाकारणार नाही;
 मुलगी आहे म्हणून लालनपालन, वात्सल्य, शुश्रूषा आणि शिक्षण यात कमी करणार नाही;
 स्त्रियांना मालमत्तेमधील त्यांची वाटणी, गुणविकासाला वाव आणि स्वातंत्र्य मिळण्याआड येणार नाही;
 तसेच मुलींचे शिक्षण आणि विवाह यांबद्दलच्या कायद्यांचे पूर्णपणे परिपालन करू;
 सासुरवाशिणींना घरच्या लेकींप्रमाणे वागवू आणि माहेरवाशिणींना आमचा आधार कायम वाटेल अशा वागू. विधवा, घटस्फोटिता व परित्यक्ता आणि विशेषतः अत्याचारांना बळी पडलेल्या स्त्रियांना कमी लेखणार नाही;
 स्त्रियांचे शृंगार-ललित रूपच प्रकाशात आणून त्यांची नटवी, उपभोग्य वस्तूची हिडीस प्रतिमा मांडणार नाही आणि मांडू देणार नाही.

■ ■