केल्याने होत आहे रे/दूर दृष्टीनेसंकटावर मात

विकिस्रोत कडून
 
दूर दृष्टीने संकटावर मात  


 नाव - शांताराम हरी घारे
 रहाणार - शिवापूर, ता. हवेली, जि. पुणे.
 शिक्षण - आय. टी. आय.
 व्यवसाय -मेकॅनिकल वर्कशॉप
 व्यवसायाचे नाव -घारे इंजिनियरिंग.
 गावातून शहराकडे -

 कऱ्हाड इथल्या घारेवाडीतून १० वी पास होऊन तिथेच आय. टी. आय. चा कोर्स केलेला हा लहान मुलगा शिवापूरला आला. तो आपला स्वत:चा उद्योग सुरू करायचा हे स्वप्न मनात बाळगून. अशिक्षित शेतकऱ्याच्या घरातून आलेले घारे ७०-७१ साली शिकाऊ उमेदवार म्हणून कामाला लागले. ५५ रुपये पगारावर नोकरीचा ओनामा परिचय प्रबोधिनीचे संचालक आप्पा, कार्यवाह अण्णा यांच्याशी झाला. त्यांच्या सहवासातून विश्वास, प्रेम, आत्मविश्वास आणि कामाचा आवाका वाढला. विविध पैलूंवर चर्चा घडल्या. यातून घारे यांचा उद्योगाशी संपर्क वाढला.

उद्योगाचा सर्वांगीण अनुभव -

 कोटीभास्कर उद्योगात त्यांनी शिकाऊ उमेदवारापासून व्यवस्थापकांपर्यंत सर्व पदे एकानंतर एक सांभाळली. त्यामधे जबाबदारीचा विभाग होता - संशोधन आणि विस्तार. नवीन जॉबवर संशोधन करून तो आपल्या इथे तयार करायचं आव्हानात्मक काम त्यांनी केलं. या प्रकारचा पहिला जॉब होता किर्लोस्कर वॉटर पंप्स. त्या जॉबचं डिझाइन घारे यांनी केले. या शिवाय पैशाचे व्यवहार, हिशोब हा विभागही सांभाळला. उद्योगाचं सर्वांगीण प्रशिक्षणच जणू इथे अनुभवता आलं आणि अर्थातच त्याचा उपयोग त्यांना स्वत:च्या उद्योगात झाला..

नोकरी करतानाच उद्योगासाठी तयारी -

 नोकरी करत असतानाच घारे मामा (याच नावानी मामांना सारे परिसरात ओळखतात.) आपला उद्योग चालू करायचाच हे ध्येय बाळगून होते. लहानपणी नात्यातली लोकं नोकरीसाठी मुंबईला जाऊन झोपडपट्टीत राहताना पाहिली होती. त्यामुळे अशी लाजिरवाणी नोकरी आणि असं जगणं त्यांनी केव्हाच अमान्य केलं होतं. त्यातूनच स्वत:चा व्यवसाय उभा करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिल.

 ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी घारे कुटुंब काटकसर करून जाणीवपूर्वक बचत करत होते. साधं जीवन जगायचं आणि पै पै करत भांडवल उभं करायचं असं धोरण बरेच वर्ष चालू होतं. वीस वर्षांची नोकरी आणि बचत यातून घारे यातून कुटुंबीयांनी एवढं भांडवल उभं केलं की ९२-९३ साली स्वत:च्या जिवावर उद्योग चालू करता आला.

उद्योग संकटांची मालिका आणि त्यावर मात -

 स्वत:च्या भांडवलातून घारेमामांनी मशिन घेतलं, शेडही उभी केली. कामगार तयार केले. त्यांना शिकवलं. उद्योग चालू झाला. पण ह्या उद्योगाला बाळसं चढेना कारण अनेक संकट कोसळू लागली. घारे मामांच्या पायावर मशिन पडलं आणि अधूपणा आला. कामं कमी झाली. बँकेत शिल्लक शून्य झाली. आर्थिक आणि मनुष्यबळाच्या अभावी उद्योग कमी कमी व्हायला लागला.

 यातूनही घारेमामांनी मार्ग शोधला. शून्यातून पुन्हा एकदा सुरुवात केली. काही काळ मध्यस्थाप्रमाणे काम केलं. जॉब दुसऱ्याकडून करवून घेतले. आर्थिक बाजू सावरती केली. पुन्हा एकदा कामगार जमवले आणि आज त्यांच्याकडे २५ यंत्रे आहेत आणि ३०-३५ कामगार. भारत फोर्ज, बजाज स्कूटर, यासारख्या उद्योगांसाठी सुटे भाग तयार करतात.  गेल्या काही वर्षापासून मंदीच्या लाटेमुळे आजूबाजूचे छोटे मोठे उद्योग कामाअभावी पटापट बंद पडू लागले. अशा परिस्थितीत घारेमामांचा उद्योग मात्र नीट चालू आहे. त्याचं श्रेय आहे घारे मामांच्या व्यावसायिक दूरदृष्टिला आणि भूमिकेला.

 व्यवसायाची तत्त्व -

 घारे मामा सांगतात उद्योग करताना काही तत्त्व सांभाळावी लागतात. शब्द देणं आणि दिलेला शब्द पाळणं हे रक्तात भिनावं लागतं आणि व्यवहारात ते वर्तनातून दिसावंही लागतं. याशिवाय आपलं काम चतु:सूत्रीवर चालतं - योग्य दर्जा, योग्य किंमत, योग्य वेळेत काम पूर्ण करणं आणि पूर्ण संख्येत माल देणं.

 ही चतु:सूत्री कसोशीने पाळणं हा उद्योगाचा पहिला महत्त्वाचा पाठ आहे. यामुळेच ग्राहकाचा विश्वास राखता येतो आणि इतरांपेक्षा आपला वेगळेपणा उठून दिसतो. कष्ट, मेहनत, चांगूलपणा यांच्याबरोबरीनं चतु:सूत्री पाळायला हवी.

 उद्योगाचा वेगळेपणा आणि आधुनिकता -

 लेथ मशिनवर जॉब करण्याचा अनेक जण करत असलेलाच व्यवसाय घारेमामा करत आहेत पण तरीही त्यांच्या उद्योगाचं स्वरूप इतरांपेक्षा वेगळं दिसतं. कारण घारेमामांनी आपली वेगळी क्षमता जाणीवपूर्वक सिद्ध केली आहे. उद्योग वाढवायचा आणि वाढता राखायचा असेल तरं उद्योगाचं स्वत:चं वेगळं वैशिष्ट्य आणि इतरांपेक्षा वेगळी क्षमता सिद्ध व्हायला पाहिजे हे घारेमामा ओळखतात.<

 त्यादृष्टीनी त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे. अभियांत्रिकीची अनेक पुस्तकं, मासिकं ते आवर्जून वाचतात. तांत्रिक भागाचा अभ्यास करतात. या व्यवसायातले बदलते प्रवाह, नवी आव्हाने समजून घेतात. त्यासाठी पुण्या-मुंबईच्या प्रदर्शनांना भेटी देतात. यामुळे त्यांच्या उद्योगाला वेगळं परिमाण मिळालं आहे.

 अभियांत्रिकीची कुठलीही पदवी किंवा उच्च शिक्षण घेतलेले नसतानाही मामांनी अनुभवानं आपली तांत्रिक तज्ज्ञता स्वत: विकसित केली आहे. या अभ्यासातून त्यांनी उद्योगाची वेगळी शाखा चालू केली. त्यानुसार वर्कशॉपमधे ते नवीन डिझाइनसाठीची यंत्रे विकसित करतात. हे काम संख्यात्मक नसून गुणात्मक आहे म्हणूनच बाजारात त्याला सतत मागणी रहाणार हे गणित निश्चित आहे.

***