केल्याने होत आहे रे/आगळीवेगळी कलात्मकवाट

विकिस्रोत कडून

 आगळीवेगळी कलात्मक वाट   
 नाव - तानाजी नागू आरुडे .
 राहणार - नसरापूर, ता. भोर, जि. पुणे.
 शिक्षण - १२वी (वाणिज्य)
 व्यवसाय - बांबूच्या वस्तू
 उद्योगाचे नाव : आकार बांबू हस्तकला उद्योग
 शिबिर आयोजन आणि इतर मदत
 बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचं एक शिबिर ज्ञान प्रबोधिनीतर्फे वेल्ह्यात आयोजित करण्यात आलं होतं. शिबिरात तानाजी या बांबूच्या वस्तू बनवायला शिकले. बांबूच्या वस्तू म्हणजे सुपं, टोपल्या हे माहीत होतं. पण त्यापेक्षा वेगळ्या सुंदर व शोभिवंत वस्तू बांबूपासून बनवता येतात त्यातून चांगलं उत्पन्नही, मिळतं आणि हे बुरुडाच्या कामापेक्षा वेगळं असतं याची कल्पना नव्हती. अशा अनेक वस्तू प्रशिक्षणात योजलेल्या. तीच या कामाची सुरुवात म्हणता येईल. प्रबोधिनीकडून २,०००/- रुपये भांडवल घेऊन त्याने काम सुरू केले. याशिवाय नवीन वस्तूंच्या कल्पना, त्यासाठी नवी डिझाइन यासाठीही संस्थेतून मार्गदर्शन मिळालं. काही कामांची ऑर्डरही दिली. काही मालासाठी नवीन ओळखी संस्थेमुळे झाल्या. तर ग्रिटिंगसारख्या वस्तूंची विक्री योजनाही संस्थेने उपलब्ध करून दिली. या पाठबळामुळे आरुडेंचा जो मुळात छंद होता त्याचं उद्योगात रूपांतर होऊ शकलं.
 वस्तूंचं वैविध्य -
 या पार्श्वभूमीवर तानाजीनी अनेक वस्तू तयार केल्या. बाबूंची ग्रिटिंग कार्ड, दिव्यासाठी शेड, कप ठेवण्यासाठी कोस्टर, कप होल्डर, अॅॅश ट्रे, घड्याळाची केस, पेन ठेवण्यासाठी स्टँँड. नवीन वस्तू म्हणून बांबूचं कॅलेंडरही तयार केलं, आणि आता वस्तूच्या मागणीप्रमाणे स्वत: डिझाइन बसवून वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात.
 प्रक्रिया करताना -  बांबूच्या बहुतेक वस्तू या मूळच्या नैसर्गिक रंगातच केल्या जातात. पण तानाजीनी त्यावरची प्रक्रिया

करण्याची पद्धत आणि तीही नैंसर्गिक, स्वत: विकसित केली. त्याप्रमाणे आता बांबूच्या छटा, काळ्या व पिवळ्या रंगाच्या मिश्रणात वस्तू तयार केल्या जातात. त्यामुळेही यांच्या वस्तूंचा वेगळेपणा उठून दिसतो व त्याला मागणी राहाते. या विषयाशी संबंधित काही पुस्तक वाचून, पाहून, प्रदर्शनांना भेटी देवून, बांबूवर प्रक्रिया करणाऱ्या संस्थेला भेट देऊन आरुडे यांनी आपला व्यावसायिक जम बसवला आहे. या संदर्भात अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांनी आय.आय.टी. पवई येथेही डिझायनिंग विभागाला भेट दिली.

 बाजारपेठेपर्यंत -

 हा तयार झालेला माल बाजारपेठेत पाहोचवण्यासाठी काहीतरी व्यवस्था पाहिजेच. पुणे-बंगलोर अशा शहरांच्या ठिकाणी प्रदर्शन आयोजित करण्यातून त्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे तानाजी माल तयार करून देतो. मालाची ने-आण, विक्री व्यवस्था ही इतरांकडून केली जाते. त्यामुळे स्वत: बाजारपेठेपर्यंत जाण्यापेक्षा तसं काम करणाऱ्या अनुभवी व्यक्तींना माल पुरवणं हा मार्ग तानाजीनी स्वीकारला आहे. त्यांनी मालाचा दर्जा उत्तम असल्यामुळे संस्थेच्या वतीने त्याची विदेशातही विक्री होऊ लागली आहे.

 वाढता उद्योग - मदतनीसांची गरज -

 अशाप्रकारे ऑर्डर वाढत्या प्रमाणात मिळत आहेत. कामाचं प्रमाण वाढतं आहे त्यामुळे मदतीला माणसं पाहिजेत. पण त्याप्रमाणात कौशल्य असणारे मदतनीस मिळत नाहीत किंवा मिळाले तर ते हा उद्योग तात्पुरता करतात. त्यांची चिकाटी कमी पडते. पण तानाजींच्या मते हा व्यवसाय एक दर्जा, एक कौशल्य राखून सातत्यानं केल्यास त्यात यश नक्की आहे.

 या उद्योगाची प्रगती पाहून आता ते नवीन जागा बांधत आहेत. तिथे खरेदी केलेला बांबू ठेवायला जास्त जागा आहे. बांबूपासून तयार केलेल्या वस्तू हाताळायला थोड्या नाजूक असतात, त्याही सुरक्षित राहू शकतील व जास्त लोक एकावेळी काम करू शकतील अशी योजना आहे. त्यासाठी नवीन मदतनीसांच्या ते शोधात आहेत.

 बांबूपासून काय बनवायचं? तर नुसती सुपं, टोपल्या या पारंपरिक उत्तराला छेद देणारी उत्तरे आता वेल्ह्यातील अनेकजण देऊ लागली आहेत. तानाजीनं या उद्योगाला सुरुवात केली. आता बांबूचं काम म्हणजे परंपरागत 'बुरुड', ' कैकाड्याची कामं' असं न रहाता - जाणत्यांनी केलेली कौशल्यापूर्ण कलाकृती असं झालं आहे.

***