Jump to content

केल्याने होत आहे रे/चोखपणा महत्त्वाचा

विकिस्रोत कडून
चोखपणा महत्त्वाचा . . १

 नाव - लक्ष्मणराव वसंतराव कोंडे
 राहणार - शिवापूर, ता. हवेली, जि. पुणे.
 शिक्षण - कृषि तांत्रिक वर्ग
 व्यवसाय - लेथ मशिन - वर्क शॉप
 व्यवसायाचे नाव - गुरुप्रसाद इंजिनियरिंग. पुणे.
 सातारा हायवे वर वेळूगावाजवळ डावीकडे तीन दुकानांची एक बैठी जागा दिसते ...... त्या तीनपैकी मधला गाळा आहे लक्ष्मणराव कोंडे यांच्या 'गुरुप्रसाद इंजिनियरिंगचा.' बाजूची दोन्ही दुकानं कोंडे यांचीच. या तीनही भावांनी ठरवून उद्योग सुरू केले. एकानंतर एक योजनाबद्धतेने तिघांनी वेगवेगळ्या उद्योगांना सुरुवात केली.स्वत:च बांधकाम केलं आणि आज तीन उद्योग उभे राहिले आहेत.
 १९८८-८९ मध्ये शिवापूर इथल्या ज्ञान प्रबोधिनीने चालवलेल्या कृषि तांत्रिक शाळेत लेथ मशिन ऑपरेटरच्या वर्गात प्रशिक्षण घेतलं आणि कोटिभास्कर उद्योगात तिथेच कामगार म्हणून सुरुवात केली. शाळेच्या सरांचं प्रोत्साहन आणि मार्गदर्शन यामुळे उभारी मिळाली. १९९५-९६ पर्यंत तिथे कामाचा अनुभव घेतला आणि त्यानंतर स्वत:च्या उद्योगाला हात घातला.
 योजनाबद्ध आखणी -
९६ पर्यंत लक्ष्मणराव नोकरीत असले तरी नंतर तीनही भावांनी व्यवसाय काढायचे हे आधीच निश्चित केलं होतं. त्याप्रमाणे हायवेसारख्या अगदी मोक्याच्या स्वत:च्या जागेत बांधकाम करून दुकानाचे तीन गाळे बांधून ठेवले होते. मग एकानंतर एक भाऊ आपापल्या उद्योगाची घडी बसवायला लागला. त्याचवेळी घरची शेती सगळे मिळून पाहात होतेच. अजूनही बघतात.
 दोन ते अडीच लाखाचं लेथ मशिन हप्त्यावर घेतलं. त्यासाठी बँकेतून आवश्यक ते कर्ज घेतलं. काही रक्कम आधीपासून जमवली होती. जागा आणि लेथ मशिन या भांडवलावर सुरुवात झाली. आसपासची ४ जणं हाताखाली शिकवून तयार केली. त्यांच्या मदतीने स्वत: मशिनवर उभं रहात उद्योग उभा राहिला लागला. आज चार वर्षांनंतर पूर्ण कर्ज फेडून उद्योग स्वयंपूर्ण झालाय.


 प्रबोधिनीच्या कोटिभास्कर उद्योगातील संपर्कमुळे आजूबाजूची कामे अजून मिळतात. त्यापेक्षा फारसं इतरत्र कामं शोधत जावं लागत नाही. लक्ष्मणरावांचे कोटिभास्कर उद्योग समूहाशी असलेले संबंध केवळ मालक- नोकर असे नव्हते. म्हणूनच विश्वासाच्या बळावर उद्योग चालतो. हा विश्वास विद्यार्थी, मग कामगार आणि आता प्रबोधिनीचा सहव्यावसायी या नात्यानी सतत टिकून आहे.


व्यावसायिक हिशोब - खतावणी -

 व्यक्साय यशस्वी होण्यासाठी जमा-खर्चाची योग्य नोंद आणि त्या योगे पैशाच्या उलाढालीवर निर्बंध असणं. गरजेचं असतं ही नस कोंड्यानी बरोबर पकडली आहे. खरंतर कॉलेजात जाऊन त्यांनी जमा-खर्च ठेवण्याचं शास्त्र अभ्यासलं नाही. पण स्वत:च्या अनुभवाच्या बळावर त्यांनी स्वतःची हिशोब मांडण्याची एक पद्धत शोधली आहे. त्यानुसार अतिशय शास्त्रीय पद्धतीनं ते आपली खातेवही ठेवतात. त्यांची हिशोबाची पद्धत आणि वही निश्चिततच आवर्जून पाहायला हवी अशी आहे.

***