कथाली/हे ईश्वरा

विकिस्रोत कडून
हे ईश्वरा

 रंजना फोनवर लेकीशी बोलत होती. बोलता बोलता तिचे लक्ष दाराकडे गेले आणि फोन तसाच टाकून ती धावली आणि माधवला सावरले. वैतागाची निष्पर्ण लहर अंगभर थरथरून गेली. तिने माधवचा जड देह तोलून, त्याला कॉटवर नेऊन बसवले.
 "माधव अरे हाक मारायचीस. तुला कॉफी हवीय का? की भूक लागलीय? राजा, नको रे धडपडूस. बरं तर बरं, माझं लक्ष गेलं, नाहीतर काय केलं असतं रे मी?" असं गोडीने समजावीत नॅपकीनने त्याचा चेहरा पुसला.
 म...म... माधव वाकड्या मानेने काहीतरी सांगायचा प्रयत्न करीत होता.
 "हो रे राजा कॅलगरीहून मोनिकाचाच फोन होता. ती आणि आनंद सुखरूपपणे कॅनडाला जाऊन पोचलेत. थांब तुझ्या कॉटचा डोक्याकडचा भाग थोडा उंच करून देते आणि लिंबू मध पाणी आणते. सातच वाजताहेत तू काही खाणार आहेस का? की मारीची बिस्किटं आणू?"
 रंजना धावत्या चालीने स्वयंपाकघरात गेली. टूथब्रशवर पेस्ट घालून, गरम पाण्याची छोटी बादली घेऊन आली. कॉटचा डोक्याकडचा भाग जरा वर करून माधवला बसते केले. त्याच्यासमोर प्लास्टिकचे गोलाकार टोपले ठेवले.
 "आणि हे बघ उजवा हात थोडा स्थिर ठेवून ब्रशने दात घासायचा प्रयत्न कर. नाहीतर मी आहेच. कालचा प्रयत्न छान जमला होता." असे म्हणत तिने माधवच्या हातात ब्रश दिला. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. त्याच्या गळ्यात लहान नॅपकीनला लाळेऱ्याला बांधतात तसे बंद बांधले आहेत. ते बंद गळ्यामागे अलगद बांधले.
 माधव हळव्या नजरेने तिच्याकडे पाहत राहिला. मन घट्ट बांधून ब्रशवरची पकड घट्ट करीत दातांवर फिरविण्याचा प्रयत्न करू लागला. वेल डन, वा छान असे म्हणत रंजना चहाची किटली व कप ठेवलेला ट्रे घेऊन बाहेर आली टीपॉय समोर ओढून त्यावर ट्रे ठेवला आणि कपात चहा ओतू लागली. वाफांसोबत आद्रक नि अंगणातील गवती चहाचा फक्त गंध माधवलाही जाणवला. त्याने रंजनाकड़े तृप्त नजरेने पाहिले.
 माणसाला कसलाही शारीरिक आजार झाला; तरी मन कसे क्षणोक्षणी लवलवत असते. आयुष्याचे तऱ्हेतऱ्हेचे गडद, फिकट, झाकोळलेले, फुललेले हजारो प्रसंग, क्षण मनात फिरत राहतात आणि म्हणूनच बरे आहे. आजार सहन करण्याची ताकद नकळत येते. रंजूने दिलेल्या चमचा चमचा चहाची चव मनभर. अंगभर पसरतांना त्याचे मन भरून आले. उजव्या थरथरत्या हाताने त्याने रंजनाचा हात घट्ट धरण्याचा प्रयत्न केला.. नकळत रंजनाचे डोळे भरून आले. तिने नॅपकिनने माधवचे तोंड पुसले. त्याला आवडणाऱ्या बडीशेप जेष्ठमधाची चिमूट त्याच्या जिभेवर ठेवली.
 इतक्यात फोन खणाणला.रंजनाने धावत जाऊन तो उचलला. "अैय्यु मी नीरू बोलतोय. इथे न्यूयॉर्कला पोचलोय खरा, पण सतत तुमची आठवण येते. मन अस्वस्थ होतं. दिवस ऑफिसमध्ये कसा जातो ते कळत नाही. पण इथे घरी आलो की खूप उदास होतो मी. चंदा मग म्हणतेच, कशाला दर दोन वर्षांनी जातोस रे? मोना इथून जवळच आहे. आईबाबांनी यावं की इथेच. मग तिच्या ममा पपांचं उदाहरण. अैय्यु कराना विचार. प्लीज." निरू पलिकडून नेहमीसारखा अजीजीने आग्रह करतोय.
 'बेटा तू आमची काळजी नको करूस, जगू, सदा रोज येतात रे. आणि हे बघ गावाची आणि देशाची सीमा ओलांडताना इथली नाती, बंध, काळज्यांचं गाठोडं, पिंपळावर बांधूनच पुढे जायचं असतं. बाबा बरे आहेत आणि हे बघ तू पाहातोस ना? बाबांची परिस्थिती कुठे नेण्यासारखी आहे का? आम्हाला तिकडे नेण्याचे स्वप्न प्लीज पाहू नकोस. चंदासारखी देखणी बायको मिळाली आहे. आता आम्ही आज्जू म्हणणाऱ्या नातवंडाची वाट पाहतोय. कुणी सांगावं? कदाचित पिल्लाची हाक ऐकून माधवचा हा पार्किन्सन कमीही होईल. ठेवू बेटा. नीट राहा. काळजी घ्या. चंदाला माझे हॅलो सांग."
 फोन ठेवून ती परत माधवच्या खोलीत डोकावली. त्याचा डोळा लागला होता. त्याचा फिजिओ थेरेपिस्ट अंगाला मालिश करीत होता. त्याची ट्रिटमेंट संपण्याची वाट पाहत त्याला चांगली पुस्तके वाचून दाखवणारी वल्लरी थांबली होती. रंजनाने मालूला चहा करायला सांगून सर्वांना द्यायला सांगितले आणि ती नव्याने हाती आलेले 'प्रकाश वाटा' हे पुस्तक उघडून बसली. माझ्या जीवनातला प्रकाश आता हरवला का? पण नेहमीच जीवनात प्रकाश झिरपत राहील, अशी अपेक्षा का करावी मी? तिला स्वतःचे शिकवतानाचे भरगच्च तास आठवले. वीर सावरकरांची कविता शिकवतांना अक्षरश: शब्दांत त्याचे संदर्भाचे धागे उकलण्यात ती बुडून जाई. मग कवी गोविंदांचा संदर्भ येई.

'मृत्यू म्हणजे वसंत माझा
मजवरती फुलणार हो
सुंदर मी होणार आता,
सुंदर मी होणार!'

 मग पुन्हा पु.लं.चे दु:खाचे देखणेपण उलगडून दाखवणारे नाटक. मृत्यु समोर आला, तरी त्याचे सहजपणे स्वागत करण्याची किमया ती विविध तऱ्हेने मुलांसमोर मांडत असे. आणि आज?
 रंजनाच्या अंगावर सरसरून काटा आला. तिने माधवकडे पाहिले तो अगदी हलक्या आवाजात घोरत होता.
 "ताई कधींचा चा ठेवलाय. गार झाला असंल, म्हणून गरम करून आणलाय. लगी लगी घ्यावा! काकांसाठी पातळ गरगटी खिचडी करू! त्यात मेथी, बटाटा, कोथिंबीर, बारीक चिरून टाकते." गंगाने समोर केलेला कप तिने हातात घेतला. "माझ्यासाठी ज्वारीची भाकरी नि मिरचीचा खर्डा करायचा," असे सांगून ती चहाचे घोट घेऊ लागली.
 "काय करताहात रंजाजिजी?" असे म्हणत शेजारच्या बंगल्यातली रमाभाभी आली. "म्या बी घेईन चा. तुमचा तुलसी, आद्रक घातलेला चा लई छान लागतो. माय मला बी आन चा." असे म्हणत तिने समोरच्या खुर्चीवर दनकन ठाण मांडले. ही खुर्ची तशी ऐसपैस आहे.

हे ईश्वरा/६९

 "सरचा काय हाय? दोनीबी लेकरं मैनामैना राहून परत यू.एस.ए.ला ग्येली की हो. यासाठी तरी चार लेकरं हवीत. भावाला भाऊ भैनीला भैन". इतक्यात पुन्हा फोनची रिंग वाजली आणि रंजाची सुटका झाली.
 सगळ्या भाज्या घातलेली गरगटी खिचडी खाऊन माधव डोळे मिटून पडलाय. कॉटच्या अलीकडच्या बाजूला तिने गादीखालून लोड लावला नि शिवाय खुर्चीही ठेवली. रंजनाच्या मनातलं भिरभिरं पुन्हा गरगरू लागलं. तिला निरजचा आग्रह आठवला. म्हणायला यूएसए पण रिकाम्या माणसासाठी माशामारी. मोनिकाच्या पहिल्या बाळंतपणासाठी ती हौशीने गेली होती. चक्क आजारपणाची रजा घेऊन कॅनडात गेली होती. माधव नुकताच निवृत्त झाला होता. त्याने ओरडा केला होताच! "घे की बिन पगारी रजा. काय करणार आहेस पैसे साठवून? मुलांचे शिक्षण केलं ती कमावती झाली. लेकीसाठीच चालली आहेस ना? तिकीटही तिनेच पाठवलंय." पण तिने त्याचा ओरडा कानाबाजूला टाकला होता. मोनाचं बाळ एक महिन्याचं झालं नि मोना लगेच कामावर जाऊ लागली. सौम्य दोन महिन्यांचा होताच सुदेशने त्याच नांव नोंदवलेल्या चाइल्ड केअर सेंटरच्या बाई सकाळी सात वाजता कार घेऊन येत सौम्यला घेऊन जात. तिकडे शेजार ना पाजार. मोना सुदेश येताना सौम्यला घेऊन येत. रंजनाने रात्री जेवताना सौम्यला घेऊन येत. रंजनाने रात्री जेवताना जाहीर करून टाकले की, लवकरात लवकर भारतात जाणार आणि ती परतलीही.
 कॅनडात भारतीयांची संख्या बऱ्यापैकी आहे. मराठी कुटुंबेही अनेक आहेत. महिन्यातून तिसऱ्या रविवारी एका भल्यामोठ्या मंदिर कॉम्प्लेक्समध्ये सर्वजण जमतात. मंदिर मस्जिद, गुरुद्वारा, जैन, बौद्ध सर्व मंदिरे एकेका भागात. भोवती प्रार्थनेसाठी शेड आणि मागच्या बाजूला मोठा हॉल. त्यात स्वयंपाकघर, धुण्याची मशिन्स, जिम्, सगळे सगळे. एका रविवारी तीही तिथे गेली होते. अनेक वृद्ध भारतीय महिला आता वृद्धावस्थेत मुलांसह एकाकी जीवन जगणाऱ्या किंवा जगणारे. सगळ्यांची नाळ भारतात पुरलेली. कुणीही नवा भारतीय आला की, त्याच्या भोवती सगळे गोळा होत. गाव, नाते, कॉलेज यांच्या माध्यमातून पदराला पदर जुळे नि मग त्यांच्या मनातली वेदना बोलती होई. तेव्हाच तिने मनोमन ठरवून टाकले होते की मुलं तिकडे सेटल झाली. स्थायिक झाली, तरी माधव व तिने कायमचे तिकडे जायचे नाही. अगदी मनात गोंदवून ठेवले होते. दोन वर्षांपासून सतत लिहिणारा, वेगवेगळ्या कॉन्फरन्समधून समाजविज्ञानावरची टिपणे अभ्यासपूर्वक सादर करण्यासाठी देश विदेशात भ्रमंती करणारा माधव पार्किन्सनने घरात पडून आहे. त्याच्यासाठी. केवळ त्याच्या इच्छेखातर तिने परदेशात जाण्याची तडजोडही केली असती. पण माधवच ठाम होता. त्याच्याजवळ तिने अक्षरांचे तक्ते दिले होते. तो त्यावर थरथरणाऱ्या हाताची बोटे ठेवून बोले. दे...ह... दा... न... ही अक्षरे गेल्या महिन्यात येऊन, पंधरा दिवस राहिलेल्या निरंजनला सतत दाखवत असे. निघताना निरूची पावलेही जडावली होती. डोळे भरून आले होते.
 रंजनाला अलीकडे वाटे, मी तरी किती मन दगड करू? पण ते जमायलाच हवं, असं ती पुन्हाः पुन्हा मनाला बजावी. मोनिकाच्या आग्रहामुळे या वेळी ती डायग्नोस्टिक सेंटरला. सर्वात्मक आरोग्य तपासणी केंद्रात जाऊन आली होती. आणि तिला शुगर आणि लो ब्लड प्रेशर असल्याचे लक्षात आले. निघताना लेकीने तीनतीनदा बजावले होते. पर्समध्ये कायम मारी बिस्किटांचा पुडा ठेव, चार चार तासांनी काही तरी खा. रोज तिकडच्या संध्याकाळी म्हणजे आपल्या सकाळी तू फोन करायचा आणि तिकडच्या रात्री मी करीन. आणि रोज सकाळी आठ नऊच्या सुमारास तिचा फोन येई नि रंजना न चुकता रात्री दहा वाजता तिला फोन करून झोपत असे.
 मुलगा नि मुलगी दोघेही सारखेच प्रेम करतात. पण 'स्त्रीला असलेलं मातृहृदय लेकीला उपजत असतं. त्यासाठी मातृत्वाच्या कळाच सोसायला हव्यात असे नाही. उगाच का तुकोबांनी म्हटलंय. कन्या सासुरासी जाये मागे परतोनी पाहे. पण नव्या आजारांनी तिच्या अंतर्मनाचा टवका उडालाय. तो सतत अस्वस्थ करतो. समजा माझं काही झालं तर माधवचं कसे होणार?
 तिला ती निरंजनकडे यूएसएला गेली तेव्हाचा प्रसंग आठवला. अनाथांच्या तिथल्या वृद्धाश्रमाला भेट देतानाचा. त्या दिवशी नव्यानेच एका अतिवृद्ध बाईला त्या दिलासाघरात आणले होते. ते वृद्धांचे दिलासाघर एक स्वयंसेवी संस्था चालवते. ही मंडळी रोज अशा वृद्धांचा आत्मीयतेने शोध घेतात. ती वृद्धा एका सार्वजनिक बागेत भुकेने व्याकूळ होऊन एका बाकावर अर्धग्लानीत पेंगुळली होती. तिच्या मुलांनी बहुदा तिला या बागेत आणून सोडले असावे. अशी न सांभाळता येणारी अतिवृद्ध माणसे. हो माणसेच की, किंवा वेडी बागडी माणसं अशी बागेत वा कुठेही सोडण्याचा प्रघात अलीकडेच सुरू झालाय. असे त्या दिलासाघराचे गृहस्थ सांगत होते. त्या आठवणीने रंजनाचे मन; शरीर थरथरले. ती अंथरुणात उठून बसली. घड्याळात सवयीने पाहिले. पहाटेचे चार वाजून गेले होते. माधव गाढ झोपला होता. ती बाहेर व्हरांड्यात आली. आकाशाकडे पाहत हात जोडले. कधीही न आठवलेल्या ईश्वराला विनवले. "बाबा रे तू आहेस की नाहीस हे तूच जाणे आणि असशील तर एक प्रार्थना. माझ्या आधी माझ्या माधवला ने. तो आघात सोसण्याचं बळ मी निश्चयाने गोळा केलंय."