कथाली/उगवते पिंपळपान

विकिस्रोत कडून
उगवते पिंपळपान

 "ए आज्जू, मला तुझी लईलईच आठवण येतीय. लई लई म्हणजे खूप खूप. आज्जू, आम्हाला रा. र. बोराडे या ग्रामीण लेखकांचा धडा मराठीच्या पुस्तकात आहे. आम्ही मैत्रिणींनी ठरवलंय की, अधूनमधून ग्रामीण भाषेतच बोलायचं. अग, बाई सांगत होत्या की, आपल्या देशातील सत्तर टक्के लोक खेड्यात राहतात. त्यांची भाषा आपल्याला यायलाच हवी ना? तू ये ना इथे दोन दिवस राहयला. फोनवरून मुनू बोलत होती.
 "उद्या शनिवार आहे. तू नि किट्टू या ना इथे. मी मॅगी आणून ठेवते. काय? धम्माल करुया."
 "आज्जू, उद्या फर्स्ट सॅटरडे आहे. मॉमला सुट्टी कुठे असते? त्यातून किट्टूची बालवाडी एकला सुटणार, मग त्याला दूध पाजवून झोपवायचं. हे कोण करणार? मीच ना? तू तुझ्या मुलाला निशीबाबाला खूप लाडवून ठेवलंयस हं. बघ ना, बाबा दौऱ्यावर गेला की, आठ आठ दिवस तिकडेच!"
 सविताला मुनूच्या बोलण्याचं खूप हसू येत होतं. मनाली आता सहावीत गेलीय. मुलं आपल्याला मिळालेल्या नव्या माहितीचा किती सहजपणे वापर करतात ना? खरं तर सविताला तिच्या एवढ्या मोठ्या ऐसपैस घरात खूप एकटं एकटं वाटतं. निशिकांत सिडकोत त्याने बांधलेल्या घरात राहायला गेल्यावर तिनं 'स्वगत'चा वरचा मजला बंद करून ठेवलाय. खालच्याही तीन खोल्या बंद करून ठेवल्यात. वरच्या मजल्यावर सुजीतची पुस्तकं नि संसार पॅक करून ठेवलाय. चार वर्षे उलटून गेली तरी भारतात परत येण्याचं त्याचं आश्वासन दूरच जातंय. अर्थात ते अपेक्षितच असतं.
 "ममा, मी नक्की इंडियात परत येणार तू उगाच काळजी करतेस. आय लव्ह माय कन्ट्री. बिलीव्ह मी. पैशाच्या मोहानं मी इथे सेटल होणार नाही गं." असं सांगणाऱ्या सुजीतनं लग्नही तिकडेच जमवलं.
 "ममा, ती बंगाली आहे. म्हणजे भारतीयच की. जसा तुझा जावई अय्यर, तशी एक सून बंगालीन. नंदिता आता मराठी शिकतेय. आम्ही सेटल होणार महाराष्ट्रातच. आणि निशीभैयाला ही न्यूज तूच दे. ऋजुताच्या वेळीही तूच त्याला सांगितलं होतंस ना? आणि"
 सविताच्या नजरेसमोरून गेली सहा-सात वर्षे झरकन सरकून गेली.
 "आज्जू बोल ना गंs" - तिकडून मुनू बोलत होती.
 "हे बघ मुनू, उद्याचा रात्रीचा मुक्काम आज्जूकडेच. परवा रविवार आहे ना? तू, किट्टू, आत्याचे देवा, दिगू सगळ्यांचा उद्या मुक्कामाला इथेच. रात्री 'तारे जमीपर'ची कॅसेट आणू या का? रविवारच्या रात्रीचे जेवण 'खैबर'मध्ये. उद्या रात्री मी मस्तपैकी खिचडी करते. रविवारी धम्माल करू. रात्री सुजीतकाकाला आपण कशी मज्जा केली ते फोन करून मिटक्या मारत सांगू. म्हणजे त्याला पण भारतात लवकर यांवंस वाटेल. काय? मी उद्या तुझ्या मामाला नि आत्याला करते फोन." असं आश्वासन देऊन सवितानं फोन खाली ठेवला.
 "आई, चाय करू? रातच्या दोन पोल्या हायेत. त्या बुरनोला होतील. तुमाले नाश्त्याले काय करू?" रोशने विचारले.
 "पोळ्यांचा कुसकरून चिवडा कर. आपल्या दोघींना होईल आणि संध्याकाळी बाजारात जाऊन ये. उद्या घर भरून जाईल." रोशला सांगतानाही सविताचा आवाज फुलून आला आणि ती तिच्या अभ्यासाच्या खोलीत गेली.
 अरुणने ही खोली खूप छान लावून दिलीय. तो नेहमी म्हणे, सावी, शिक्षकाचं धन म्हणजे त्याची पुस्तकं! डाव्या बाजूच्या आडव्या भिंतीत संदर्भग्रंथांचं कपाट केलं होतं. त्यात संस्कृत, उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोष, संस्कृतिकोष आणि अनेक संदर्भ ग्रंथ नेटकेपणाने लावलेले होते. त्याला ही पुस्तके वाचण्याचा नाद होता. कथा, कादंबऱ्या, काव्य, ललितनिबंध यांचं कपाट वेगळं. सावीची राज्यशास्त्र, इतिहास, मानवंशशास्त्राची पुस्तकं उजव्या बाजूच्या कप्यात. मध्ये लिखाणासाठी टेबल. त्यावर प्रकाश येईल असा दिवा. टेकावंस वाटलं तर एक आराम खुर्ची, या सगळ्या सोयी करून देणारा आता कुठे उरला होता?
 सवितानं देविप्रशाद चटोपाध्यायांचं 'लोकायत' संदर्भग्रंथातून घेतलं. स. रा. गाडगीळांचं मराठी भाषेतलं लोकायत, अ. ना. साळुंकेच 'चार्वाक' ही पुस्तकंही टेबलावर ठेवली. विद्यापीठात चार्वाक दर्शनावर दोन पिरिअडस् घ्यायचं कबूल केलयं. निवृत्त होऊनही साडेचार वर्षे होऊन गेलीत. तिच्या मनात आलं, मनातल्या या कप्प्यावरची धूळ झटकायला हवी.
 "आई, आदी पोलीचा चिवडा खाऊन घ्या. चा बी टाकते. आंगूळ करून मगच बसा अभ्यासाले." सविता संध्याकाळीही आंघोळ करते. अभ्यास वा वाचायचं असेल तर नक्कीच करते. रोशला सगळं माहीत झालंय.
 रोशनं भरपूर आलं घातलेल्या चहाचा गंध नाकाला स्पर्शेून गेला. चहाची चव घोट घेण्याआधीच जिभेवर दरवळली. प्रत्येक घोटासोबत तिचं मन भूतकाळात रेंगाळू लागलं.
 फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील ते फुलपंखी. भरजरी दिवस, प्रत्येक दिवस जणू नवा. अकरावीपर्यंतचं शिक्षण तळोद्यासारख्या सातपुड्याच्या बारक्या गावात झालं. पण पुण्यातील प्रत्येक संध्याकाळ गजबजलेली. मोगरा नाहीतर जुईच्या गजऱ्यांसारखी झुलती असायची. फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोड सदैव बहरलेला. डेक्कनकडे जाणारे तरुणांचे घोळके एकमेकांना मारलेले टोमणे. कधीमधी गोड धक्के भवताली स्वप्नांची झाडं होती. त्या सुंदर आंठवणींनी सविताचे डोळे पाणावले.
 तिनं देविप्रसादांचे लोकायत,उघडलं. ती त्यात पूर्णपणे बुडून गेली. संध्याकाळ दाटून आली होती. कुकरच्या शिट्टीनं ती लोकायतमधून बाहेर आली. आंबेमोहोर तांदुळाच्या वासानं भूकही जागी झाली. तिनं उठून कांद्याचं पिठलं केलं. रोशनं गरम भाकरी पानात टाकली. तिनं जेवायला सुरुवात केली.
 "रोश, आज मला रात्री दूध नको देऊस. मी जरा नोटस् काढते. तुझं झालं की, ब्रुनोला दूधभाकरी घाल नि कंपाउंडच्या दाराला कुलूप लावून त्याला मोकळं सोड. दारं नीट लावून घे. अडसर घालून झोप." रोशला सांगून सविता बेडरुममध्ये गेली. नोटस् काढता काढता कधी डोळा लागला ते कळलं नाही.

* * *


 "आई उठता ना? लई दाट झोप लागली व्हती. म्या रातच्याला तुमाला उठवून झोपाया लावलं. आठवतं का? चूळ भरून पयला चा घ्या बरं!" रोशने चहा टीपॉयवर ठेवला.
 आज पहिला शनिवार. संध्याकाळी नातवंडं आज्जूला भेटायला नाचत येणार रात्री मुलंही येतील. आज बाजारात रोशला पाठवायला हवं. तीन तऱ्हेचा चिवडा करायला हवा. ती पटकन उठली नि चूळ भरायला बेसिनकडे वळली.
 "रोश, पाठकोरा कागद घेऊन ये", असं म्हणत सविता आत झोपायच्या खोलीत गेली. समोर अरुणचा हसरा चेहरा. फोटो निर्जीव. पण हसणं अगदी जिवंत. फोटो पाहून सविताचा जीव आतून कासावीस झाला. पाहता पाहता त्याला जाऊन साडेसोळा महिने झालेत.
 तो दिवस...
 "सावी, मला कसंतरीच होतंय. उठ." असं म्हणत अरुणनं सविताला उठावलं होतं. सविता ऋजुताला फोन करू लागली तर त्यानं अडवलं.
 "घाबरेल माझी लेक. उद्या सकाळी." असं म्हणेस्ता तो खाली कोसळला. ऋजू, अश्विन आले ते त्यांची अँब्युलन्स घेऊन. तात्काळ त्यांच्या एन फोर मधल्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं. पहिल्यांदाच आलेला हार्ट ॲटॅक. पण सिव्हिअर. काही समजायउमजायच्या आत होत्याचं नव्हतं झालं. दुपारी वाचा गेली. खुणांनी घरी न्या असं तो सांगे. खरंतर ऋजुता-आश्विनचा दवाखाना. हॉस्पिटल खाली नि वर घर, पण ते लेकीचं. आपलं घर ते आपलं. शेवटी घरी आणलं. निशिकांत आणि संगीता मुलांना संगीताच्या आईकडे ठेवून झोपायला आले. रात्री अरुणला शांत झोप लागली. सकाळचा चहा घेऊन सावी गेली, तर ती झोप अखेरची ठरली होती.
 त्याच्या मृत्युपत्रातील इच्छेनुसार त्याचा देह मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी दान केला. त्याचा देह ठेवलेली ट्रॉली शवागरात नेऊन दरवाजा बंद केला तेव्हा सवितानं अत्यंत आक्रमक निष्ठूरपणे चेहरा स्थिर ठेवला. अश्रू माघारी परतवले पण ओक्साबोक्सी रडणान्या धाकट्या नणंदेचा, अनिताचा हात घट्ट धरून ठेवला. इतका की तिच्या हातावर वळ उमटले.
 सवितानं चंद्रकोरीची टिकली लावणं सोडलं नाही. गळ्यातलं मंगळसूत्र काढलं नाही. अरुण गेल्यावर नातलगांची, ओळखीच्यांची अखंड रीघ. सविताच्या राहणीकडे पाहून प्रश्नांकित नजरा. पण ती क्षणभरही विचलित झाली नाही. येणाऱ्यांची जायफळवेलची पूड घातलेली कॉफी देऊनच पाठवणी होई. अरुणला अशी डार्क कॉफी खूप प्रिय होती.
 "आई तू अगदी आहे तश्शीच आहेस. आय ॲम प्राऊड ऑफ यू. पण कधी कधी वाटतं, बाबा माझ्या नव्या घराच्या बांधकामात पूर्णपणे बुडून गेले होते. सतत उभे. प्रॉडक्शन इंजिनिअर अंगात पूर्ण भिनलेला. इतकं सुंदर, जॅपनीज स्टाईलचं देखणं घर. कधी कधी वाटतं त्याचाच तर ताण नसेल ना पडला? मला ही बोच डाचते."
 निशचं बोलणे अर्ध्यात तोडून "नाही रे बेटा. ऋणानुबंध संपला एवढंच असं नको मनात आणूस.' असं ती म्हणे. संगीताचे ऑफिस नव्या घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर होतं. निशू, संगीता नव्या घरी राहायला येण्याचा खूप आग्रह करतात. पण ज्या 'स्वगत'मध्ये अरुण सोबत बत्तीस वर्षे घालवली ते घर तिला धरून ठेवी. दिवस मुलांकडे घालवला तरी रात्री ती घरी येई.
 "आई, कंदीची कागद घिऊन हुनी हाय मी. करा ना यादी." असं म्हणत रोशननं कागद दिला. सवितानं मॅगीचा फॅमिली पॅक, टोमॅटो सूप, पालक सूपचे पॅकेट, अनारशाच्या पिठाची, चकली पिठाची दोन दोन पाकिटे, पावभाजी, पाणीपुरी मसाला अशी भली मोठी यादी केली. रोशनं सामान आणून भरून ठेवलं. जेवण करून ती रोशला चिवड्याच्या तयारीला मदत करू लागली. मुलं येणार म्हणजे चिवड्या-अनारशाचा खुराक येता जाता हवाच! त्यातही दिगंत. दिगूला नाशिक मसाल्याचा. भाजक्या पोह्यांचा, तर मुनूला आजोबांसारखा फक्त चुरमुऱ्याचा डाळं. शेंगदाण्यांचा भरपूर मारा केलेला मस्सालेदार चिवडा हवा. आता पुढच्या महिन्यात सुजीत येईल त्याची बंगालीन घेऊन. तिच्या मुलांना कसा आवडेल? की ती मासे खाऊ म्हणून सुके मासे तळून घातलेला चिवडा? आपल्या भरकटलेल्या मनाची धावधाव जाणवून सविताला हसू आलं. तिनं फोन उचलला.
 ऋजुता दिगंतशी गुटुरगुम भाषेत बोलत होती. फोन आश्विननं घेतला. "ममा, मी आश्विन बोलतोय. दिगंतला स्नान न करताच आज्जूकडे जायचंय. त्याला समजावतोय."
 "अरे, मग पाठवून दे ना आणि रात्री इथेच या जेवायला. मी मस्तपैकी मस्सालेदार खिचडी करते. तुला आवडणारी वरून फोडणी. आठपर्यंत या. सोमवारी सकाळी इथूनच जातील मुलं शाळेत. मुनू, महीन, निशी, संगीता पण येताहेत." आश्विनचं बोलणं थांबवीत सवितानं निरोप दिला. दुसरा फोन नंबर फिरवला.
 "संगीता, मुनू-महीनना आंघोळीला इथचं पाठव. रात्री तुम्हीही पोरांना सोडायला इथं या. मुलं परवा इथूनच शाळेत जातील. ऋजू, आश्विन येताहेत रात्री." असं म्हणत तिनं फोन ठेवला.
 "रोश, चिवडे करून ठेव. अनारशाचे पीठ भिजव. चांगला घट्टगोळा. केळं नि खसखस काढून ठेव. खिचडीची तयारी कर. मी जरा पडते. चहा झाला की हाक दे." असं सांगून सविता बेडरुममध्ये झोपायला गेली. पलंग अजूनही जोडलेलेच. तिने पंखा एकवर ठेवला नि आडवी होऊन डोळे मिटून घेतले.
 "आज्जू उठ. आम्ही आलो."
 ती उठली. घर भरून गेलं होतं.
 "आज्जू, मी कांदा चिरू? नाहीतर असं करू या का,.मी छोटे छोटे कांदे निवडून सोलून ठेवते. सबंध कांदे घालूनच खिचडी करू." मुनूला बारावं लागलंय. तिला महीन, दिगू, देवा ही पोरं खूप लहान वाटतात. ती आज्जूच्या मागे मागे होती. अरुण गेल्यावर सवितानं नातवंडांचा अभ्यास, आवडी यात मन गुंतवलं. निशिकांत तबला सुरेख वाजवी. पुढे बापाप्रमाणेच प्रॉडक्शन इंजिनिअरिंगची डिग्री. नंतर एम. एस.साठी यू.एस.ए. मग एम. बी.ए. यात तबला वाहून गेला. पण महिनला मात्र ५ व्या वर्षी पं. देगलूरकरांकडे त्यांच्या गुरुकुलात घातलं आहे. सोमवारी, मंगळवारी, बुधवारी किट्टू क्लासला आला की आज्जूकडूनच त्याच्या न्यू व्हिजन शाळेत जातो. एक दिवस किट्टूचा प्रश्न. "आजू, आबूजा आभाळात गेलेत ना? मग त्यांच्या नावाची नवी चांदणी चमकू लागली असेल."
 "हो हो! पावसाळा संपला की, आकाश निरभ्र होतं. निळं निळं होतं. मग आपण गच्चीवर बसून नक्षत्र पाहू."
 "आमच्या शाळेत बलूनमध्ये बसवून आकाशातली नक्षत्रं, तारे दाखवले होते ना! मी आणलंय ते पुस्तक." मुनूने लगेच उत्तर दिलं.
 सविताच्या मनात शाळेतल्या शिक्षणाचा मुलांच्या मनात गोंदलेला प्रवास अधोरेखित झाला. तिनं लगेच उत्साहाने पुस्ती जोडली.
 "मी आबुज्जांची दुर्बीण उद्या काढून ठेवते. मग मीही येईन गच्चीवर." हे सारं आठवून सविता सुखावली.
 मुनूनं छोटे कांदे सोलून ठेवले होते. रोशने मिक्सीतून मसाला काढून ठेवला होता. सवितानं खिचडी फोडणीला टाकली. गप्पा मारता मारता जेवणं कधी आटोपली, नातवंडं कधी झोपली ते लक्षातच आलं नाही. रविवारीही निशी-संगीता, ऋजू-आश्विन दिवसभर आले होते. दिवस कसा संपला कळलं नाही.
 "ममा, तू थकली आहेस. मुलांना आम्ही घेऊन जातो. किट्टूला तयार करून सकाळी पाठवतो. तू झोप आता." असं बजावून निशी, ऋजू आपापल्या घरी परतले.
 सविताने दिवा मालवला. आडवी होऊन डोळे मिटून घेतले. मग स्वप्नांची मैफिल. सरकत्या. फिरत्या चित्रांची.
 एक खोल खोल कृष्णविवर. त्या विवरावर गलेलठ्ठ जडबंबाळ घट्ट झाकण. जोर लावून तिनं ते उघडलं नि काय. त्यातून तऱ्हेतऱ्हेचे पक्षी बाहेर उडू लागले. पक्ष्यांचे चेहरे बायकांचे. पण कान, नाक, डोळे नसलेल्या बायांचे. मग अचानक त्यांच्या चेहऱ्यावर डोळे उगवले. रडणारे, नाहीतर वेदनांनी गच्च मिटलेले. तिनं निखून पाहिलं. त्यातला एक चेहरा आजोबांना घाबरून त्यांच्यासमोर येताना थरथरणाऱ्या मोठ्या आईचा होता आणि दुसरा चेहरा तिच्या आईचा, बाईचा. सावीचे बाबा कोर्टातून घरी येण्याआधी त्यांना अम्मा घरीच लागे. एकदाच पाच मिनिटे उशीर झाला, तर बाबांनी सगळ्यांच्या देखतं तिला दरडावलं होतं. तिच्या आईवडिलांचा उद्धार केला होता. अरुण ब्राह्मणच; पण कऱ्हाडे नि सावी देशस्थ. त्यांचा ओळखीतून विवाह. पण घरातून निघून जाऊन लग्न करावं लागलं होतं.
 इतक्यात एक बिनचेहेऱ्यांचा जमाव दाणदाण पावले टाकत त्या पक्ष्यांवर दगड फेकत पुढे येऊ लागला. काही पक्षी खाली कोसळले. अनेकांचे पंख गळून पडले. काही मेले. पण काही रक्तबंबाळ पक्षी मात्र पुढे पुढेच जात होते आणि अचानक त्या विवरातून एक टवटवीत पिंपळान उगवले. त्यावर सूर्यप्रकाशाची कोवळी किरणे ते क्षितिजापर्यंत पोचलेले पक्षी नाचू लागले होते. सविता ते पिंपळपान घेण्यासाठी पुढे झाली नि. तिला जाग आली.
 बेसिनपाशी जाऊन तिनं चेहऱ्यावर सपासप पाण्याचे फटकारे मारले. पदराने चेहरा पुसत चंद्रकोर नेटकी केली.
 येणाऱ्या जानेवारीत मी पासष्ठी पार करीन. अरुण लवकर गेला म्हणून मीही लवकर जाईन हे कशावरून? माझ्या माहेरी तर सगळे ऐंशीचा पहाड पार करून पुढे गेलेले. इतके जगायचे तर तसं नियोजन हवं. मुनू, महीन, देवा, दिगंत पाहत पाहता मोठे होतील. आपापले अवकाश शोधतील. सवितानं मनाशी काहीतरी ठाम निश्चय केला. अरुणाचलमच्या विवेकानंद केंद्रातल्या जॉर्जुम एत्तेचा फोन नंबर शोधून काढला.
 "रोश, संध्याकाळसाठी घोटेडी खिचडी टाक," असं सांगत सावी मोबाईलची बटणे दाबू लागली.