Jump to content

कथाली/कुकवाला आधार, फक्त मेणाचा!

विकिस्रोत कडून
कुकवाला आधार, फक्त मेणाचा!

 पाहता पाहता या शिवेपासून त्या शिवेपर्यंत बातमी पोचली. घरातला थोरला ल्योक, विलासदादा रातच्याला रानातच मुक्कामाला होता. तो अजून घरी यायचा होता. घरात त्याची माय भामाक्का, बायको नंदा अन् दोन लेकरंच होती. नंदाला उमजेना, आता कुणाला पाठवावं रानात हा सांगावा घेऊन? तिने तिच्या थोरल्याला, सुन्याला बोलावलं. त्याच्या कानाशी लागून, पलीकडच्या कडेला राहणाऱ्या भावकीतल्या चुलत दिराला निरोप दिला. सहदेवनाना धावत्या चालीनं दाराकडं आला. भामाक्काच्या समोर खाली मान घालून खिनभर बसला. काकीनं जडभरल्या आवाजात विनवलं.
 "सहदेवा, सुन्याची दुचाकी घिऊन धानूरकडच्या रानात जा. इलास तितेच मुकामाले गेलाय... मालकाचं, तुज्या काकाचं दानापानी संपलं बाबा.", आन् ती जमिनीवर डोकं हापटू लागली. सहदेव घाईनं उठला आणि साईकलवर टांग मारून रानाकडं निघाला.
 सुन्या इलासदादांचा थोरला नि एकुलता एक ल्योक. यंदा आठवीला गेलाय. त्याला साळंत जान्यासाठी दादांनी भारीची सायकल आणलीय. एरवी कुण्णाला हात लावू देत नाही सुन्या. आता आज काय म्हननार? सहदेव हातातली सायकल वेगात पळवत होता.
 पाहता पाहता दारासमोर माणसं जमा व्हायला लागली. शेजारची अंजाभाभी रानातल्या गायवाड्यातनं दुधाची चरवी आन् एका हातात शेणाचं टोपलं घेऊन येत होती. तिनं शेणाचं टोपलं अंगणात पालथं टाकलं नि दुधाची चरवी चुलीजवळ नेऊन ठेवली. हात धुवून डेचकीतलं तांब्याभर पाणी चेहऱ्यावर मारलं. घशात गटागटा ओतलं. सुनेला आवाज दिला नि घाईने भामाक्काच्या घरात शिरली. एव्हाना अर्ध गाव बाहेर जमा झालं होतं. तिचा अंदाज खराच होता. ती परत अंगणात आली आणि गोंधळकरी तात्याबाला हाक मारली. तो जवळ येताच तिने बारक्या आवाजात हुकूम सोडला. "तात्याबा, अजून दोघी पोरी, केजाची भैण, भामाक्काचे भाऊ आल्याबिगर काईच होनार नाय. इलासबी रानातून यायचाय. तुम्ही लोकानले दुपारून यायला सांगा. हितं नगा जमू म्हनावं. मी च्या करून आणते. तेवढं तरी पिऊ द्या भामाक्काला आणि घरच्यांना. भुकेनं जीव तडपेल म्हातारीचा. सांगा समद्यांना.” असे सांगून ती तिच्या घराकडे वळली. तिला आठवला तिच्यावर गुंदरलेला परसंग.
 ...तिच्याहून वीस-बावीस वर्षांनी थोरला असलेला नवरा खोकून खोकून पहाटेच केव्हा तरी खर्चला होता. घरात पहिलीचे दोन मुलगे आणि त्यांची पिलावळ, चार लेकी चार दिशांना चार चार कोसांवर परणून दिलेल्या. लगीलगी त्यांना सांगावा धाडला. रातच्याला म्हाताऱ्याची माती झाली. पण आंजीला चूळ भरायलासुद्धा कोणी पाणी दिलं नव्हतं. माती करून माणसं परत आल्यावर शेजारच्या भामाबाईनं भाकऱ्या नि कालवण धाडलं होतं. रातच्याला मढं शेतात नेल्यावर आंज्याला पाणी बी पाजलं होतं. ते अन्न पाहिलं नि वाटलं, बकाबका खाऊन भुकेचा डोंब शांत करावा पण जनाची लाज? जेमतेम चोतकर भाकर घशाखाली घातली होती हे समदं होऊन लई काळ गेलाया. आज भामाबाईवर बारी आलीया...
 अंज्यानं गवरीवर रॉकेल ओतून चुलवण पेटवलं. एक मोठं लाकूड आत सरकवून वर च्या चं भगोणं चढवलं. चहाची भरलेली क्याटली घेऊन डोकीवरचा पदर पुढे ओढून आंज्या भामक्काच्या घरात शिरली; ढाळजात विलास गुडघ्यात मान खुपसून बसलावता पुरुष माणसं जमा झाली होती. ढाळज गच्च भरून गेलं होतं. आंज्याने आत जाऊन स्टीलचा मोठा पेला घेतला. त्यात चहा ओतला आणि पदराने तो गरम पेला भामाक्काच्या पुढे ठेवला. "पिऊन घ्या आक्का, जे व्हायचं ते होतंच असतं. समद्या किल्ल्या त्याच्या हातात. त्यानंच कुलूप घातलं, आता उघडणार कोन? अजून पोरी यायच्या आहेत. तुझ्या भावाला बी सांगावा धाडला आहे. उलीसाचा चा पिऊन घे. पी माय. समदं होईस्तो जीव तं रहाया होवा.” असं म्हणत अंज्यानं भामाक्काच्या पदरात पेला पकडून तिच्या हातात दिला. "सुनबाई, तू बी घे कोपभर नि सासूजवळ बस." असे सांगून महादेवाला हाक मारली. च्याची क्याटली आणि दोन कप बाहेरच्यासाठी पाठवले.
 "नंदा, मी पोरांना घेऊन जाते, तिथंच जेवतील त्यांना नको घरात, माझ्या नात्रूंडांसोबत खेळतील बी." अंज्या सुन्या आणि संगीताला घेऊन घरी गेली.
 बाहेर येगळीच चर्चा रंगली होती. "इलासा, हे बघ, आंब्याला बी सांगावा धाडावा लागेल. तुझी मोठी माय कुठल्यातरी संवस्थेत सैपाक करती नि तिथंच राहती म्हणं. कालीजातल्या पोरींसाठी जेवण तयार करती. तिला बी सांगावा धाडावा लागंल जणू? व्हय संकर बाप्पा." व्यंकप्पाच्या मोठ्या चुलत्यानं संकर बामणाला विचारलं. "व्हय व्हय लवकर धाडा. दुपार पासवर इथं पोचाया हवी. नाऱ्या गायक्याला मगाच निरोप देऊन मांडवा नि धानोऱ्याला पाठवलं हाय. समिंदरा, मंगला दोन्ही जावई दुपारपासवर इथं पोचतील. धानोर लई लांब नाई पण मांडवा डोंगरात हाय. व्यंकप्पाच्या बहिणीला जनाबाईला धानोऱ्याहून केजास फोन करून कळवाया सांगितलंय. दुपारपासवर समदी जणं येतील. तंवर ती बाई बी याया हवी." संकर बाप्पांनी सल्ला दिला आणि कानावरचं बालपेन काढून कागदावर सामानाची यादी लिहाया लागले.
 एवढ्यात एकानं शंका काढली. "अरं, ती बाई ज्या संवस्थेत काम करते ती संवस्था नवऱ्यानं हाकलून दिलेल्या बायांसाठी काम करते म्हणं. लई मागं यंकप्पाकडं परळीचे पोलिस कागद घेऊन आले होते. पण यंकप्पानेच सांगितलं पोलिसांना. यंकाण्णा गाव सोडून मुमईला गेलाय कायमचा. आणि त्यांनी बी ईसवास ठेवला. तवापासून नाही आलं कुणी."
 "अरं व्यंकप्पापासी होतं काय द्यायला त्या बाईला? दोन एकराचा तुकडा. त्योबी कोरडवाहू. या भामाक्काचा इलास जमिनीत कस्ट कराया लागला तवापासून बरं चाललंया. सूनबी अंगणवाडीत काम करती." दुसऱ्यानं री ओढली. "बघा बाबा. त्या बाईला आनायचं तर परळी गाठाया होवं. दोन तास कसे बी लागणारच. न्हाईतरी त्या बाईला कंदी आनलं हितं? शानीहून चार साल झालं तरी पोटूशी ऱ्हाईली न्हाई. तवा आमच्या बाप्पानीच तिला म्हायेरी नेऊन घातलं. नि भामाक्काशी लगीन लावलं..." मोठा चुलतभाऊ सांगू लागला, "पण न आणून कसं भागेल? त्याच्या जीवाले शांती कशी व्हावी? तिचं डोरलं आन् बांगड्या हव्यातच. व्हय संकर बाप्पा?" व्यंकप्पाच्या धाकल्या चुलतभावानं शंका काढली.
 शेवटी भावकीतल्या, अंब्याच्या कालिजात जाणाऱ्या सचिन्याला त्याच्या फटफटीवर परळीला धाडायचं ठरलं. सचिन्याचा बाप पोराला सांगू लागला.
 "आन् ह्ये बग सचिन्या, त्या बाईला म्हनावं यंकाप्पा लई शिरीयस हाय, आन् त्याला लई पच्चाताप व्हाया लागलाय, म्हणावं. तुमाले सोडून दिलं, पण तुमाला बगायचा ध्यास घेतलया म्हाताऱ्यानं." नाकात नसेचा बार भरून तो पुन्हा सांगाया लागला, "आन् रिक्षा ठरीव. पाच पन्नास लागले तर घे. त्या काकीलाच पैशे द्यायला सांग. न्हाई दिले तर खिशातलं काढ."
 "बाया लई भोळ्या असत्यात. ती लगोलग येईल. जरा जास्त करून, मालमसाला लावून सांग. शिकल्याली पोरं तुमी. समदं समजतं तुमाले. अस्सा जा नि अस्सा ये." असं म्हणून सचिनच्या बापानं व्यकप्पाच्या भावकीतल्या भावानं, पोराला पिटाळलं.
 एवढ्यात समिंदरा नवऱ्यासंगट आली. भोकाड काढून मायच्या गळ्यात पडली. जनाबाई केजाला ऱ्हाते. नवरा दुकानदारी करतो. ती नवऱ्यासंग फटफटीवर आली. थंडगार मढ्यावर पडून रडू लागली.
 "बाप्पा असं कसं व झालं? माज्या भाबीला येकलं येकलं सोडून कसे गेला वो? आमी समदे पोरके जालो वो ऽऽ" नंतर उठून भामाक्काच्या गळ्यात पडून रडू लागली.
 बाहेर बांधाबांध सुरू झाली. सगळं सामान फुलचंद मारवाड्याच्या दुकानातून आणायला सहदेव गेला.
 आयाबायाही घरचं आवरून भामाक्काजवळ बसून रडू लागल्या. म्हाताऱ्या बाया तिच्या डोईवरून हात फिरवू लागल्या. भामाक्काने कपाळावरचा पदर डोळे झाकील असा ओढला नि ती खाली मान घालून मुसमुसू लागली.

* * *


 दुपारचे १२ वाजले असतील. एक मोटारसायकल फाटकाबाहेर थांबली. बारकाबाईची चौकशी तो तरुण करीत होता. मीराने खुणेने त्याला आत सोडायला सांगितले. गुरख्याच्या ऑफिसात नोंदणी करून तो तरुण आत आला.
 "मी सचिन खंडागळे पाटील. इथे बारकाबाई खंडागळे पाटील राहतात का? मी त्यांच्या मालकाच्या गावाहून आलोय." चौकशी करू लागला.
 "आमच्याकडं बारकूमावशी आहेत, पण त्यांचे आडनाव जाधव आहे. नयना, मेसमधल्या बारकूमावशींना बोलाव गं. बसा तुम्ही. येतीलच." मीराताईंनी नयनाला सांगितले. बारकामावशीला मोरणीची भलतीच हौस. गेल्या महिन्यात ही सोन्याची मोरणी नयनाने त्यांना आणून दिली होती. मीराताईंनी चेष्टाही केली होती.
 "मावशी, पोरी 'बुढी घोडी लाल लगाम' असं चिडवतील हं. तुम्हाला खूप आवडते का हो मोरणी?"
 "व्हयं ताई, लगीन झालं तवा मायनं दिलीवती. लई आवडायची मला. तीस वरिसांच्यावर झाली की. आता लईच वाढवाया लागलीय. म्हटलं दुसरी करावी."
 "सारखी तुटते का? एवढीशी तर आहे." नयना म्हणाली.
 "तुटली म्हणू नका ताई. काकंणं, काळी पोत, मोरणी वाढवते. मालकाच्या मढ्यासोबत जाते तवा तुटते... कुठं का असनां बिचारा. नीट ऱ्हावा."
 "मावशी इथं येऊन अठ्ठावीस वर्ष झाली. पण, काही बदल नाही तुमच्यात. वडाची पूजा, उपास... सगळं करता, कसं हो?" मीराताई हसून म्हणाल्या होत्या.
 "ताई, जे माईनं दुदातनं पाजलं त्ये मरेस्तो कसं जानार वो? पन आपल्या पोरीचं पटतं मला: नैनाताईंच बगा की, दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या हापिसर नवऱ्याला सोडून लेकीला घेऊन येकटी ऱ्हाते. त्यवढी धिटाई कुठून यावी आमच्यात. आमाले सिक्सन न्हाई. मायनं भाकऱ्या भाजाया नि नेटकं, चवदार कालवण कराया शिकविलं. त्यावर जीव जगवीत होते. पन चार बुकं शिकल्याला चुलत भैनीन हितं आनलं नि माजं सोनं झालं. माजी मातीबी तुमच्याच दारात व्हायची. तुमचा नसेल इसवास, पन ताई येक इनती हाय. माजी हाडं बरीक गंगाखेडच्या गंगेत टाका बरं का..." असं म्हणत मावशी डोळ्यात पाणी येईस्तो हसत सुटल्या होत्या...
 "कशापाई बोलवंल नैनाताई..." बारकामावशीच्या प्रश्नानं नयना भानावर आली.
 "मावशी, तुमच्या मालकाच्या गावाहून एक मुलगा आलाय, बोला त्याला, चला ऑफिसात."
 'मालकाच्या' या शब्दावर जोर देत किंचित हसत नयनाने सांगितले.
 बारकामावशीने पाहिलं. समोर अनोळखी पोरगा होता. सचिन या नव्या वयस्क काकीकडे पाहू लागला. झटकन पुढे होऊन पायावर डोकं ठेवलं.
 "काकी, मोठे काका लई सिरियस हाईत. लई वरिसांखाली तुमाला घराबाहीर काढलं. त्याचा पस्तावा व्हाया लागलाय. तुमच्या नावाचा ध्यास घेतलाय...येकदा बोलायचं... पाहायचं म्हणतात. तवा लवकीर चला. मी मोटारसाईकल घेऊन आलोया. रिक्सा करावी लागेल. नेकनुरा अल्याडच्या उजवीकडं गेलेल्या रस्त्यानं सात किलोमीटरवर देवगाव आहे. मी आहेच बरुबर. रिक्षा घेऊन येतो. लवकर आवरा." तो पोरगा सांगत होता.
 बारकामावशीला क्षणभर काहीच सुचेना. भान हरपल्यागत झालं. नवऱ्याचा चेहरा पण आठवेना. पण आतून... अगदी आतून न सांगता येणाऱ्या सुखाची लाट क्षणभरच अंगावरून गेल्यासारखं वाटलं. जावं की नाही असाही प्रश्न पडला. पण पुन्हा मनात आलं... त्याचं वय पन लई चढलेल असंल. आन् लई सिरियस हाय म्हनतात, तवा गेलेलंच बरं!
 "ताई यावं का जाऊन?" बारकामावशीनं मीराताईला विचारलं आन् त्या आत गेल्या. गेल्यासाली नैनाताईंच्या पारजक्तानं पुन्याहून सुंदर बॅग आणली होती बारकू आज्जीसाठी. त्यात दोन साड्या कोंबून कपाळावरचं मेणावर लावलेलं कुंकू पदराच्या टोकांन, आरशात बघून नीट केलं. आणि त्या रिक्षात बसल्या. रिक्षासोबत मनही मागे मागे धावत होतं. खड्डे आले की ठेचकाळंत. खड्डेच लई.
 सासूच्या लाथा नि नवऱ्याचा दारू पिऊन मार. यात चार वरीस गेली. लगीन झालं नि वरिसानी न्हाणं आलं. तीन वरीस झाली तरी लेकरू होईना. त्ये काय माज्या हातात व्हतं? सासऱ्यानं माहेरात आणून घातली नि बापाला निक्सून सांगितलं. आमाला तुमची मुलगी सून म्हणून नगं. मंग धा वरीस बापाच्या दारात. माय तर लहानपणीच खर्चली होती. सावतार मायच्या हाताखाली काम तर करावं लागायचंच आनि खायची पन वानवा असायची. शिळे तुकडे पाण्यात भिजवून खायची पाळी. बापाच्या दारात येऊन बी लई वरीस झाली. शेतात खुरपाया जा. घरात काम करा. कडोसरीला दिडकी नाही. जीव चिंबून जायचा. शेजारच्या काकीची भाची हमेशा गावाकडं यायची. ती परळीच्या साळंत सात बुकं सिकलीवती. गरज लागली तर ये सांगून पत्ताबी देऊन गेली होती. तिला माजी लई माया यायची. जाताना चार दोन रुपये हाती देऊन जायची. त्या रातला मायनं लईच मारलं व्हतं. रातभर बाहेर ठेवलं होतं. बाप दारूत धूत. बापाच्या दारातून रातच्यापारी, डोंगरातल्या वडगावातून ती दगडगोटे तुडवीत चालू लागली. पहाट होईतो डोंगर पहाट होईस्तो पार झालावता. एक बरा रस्ता आला. ती चालत हाईली. एस्ट्या जातयेत होत्या. एका दादाप्याला तिनं भीत भीत ईचारलं. ती परळीच्या रस्त्यानं जात होती. विरुद्ध दिशेने जाणारा रस्ता परभणीकडं जाणारा होता. ते ऐकून तिला धीर आला. ती झपाझपा चालू लागली.
 आता त्याला बी दोन इसावर चार वरिसं झालीत. विमला पन खर्चली. तिची याद कशी बुझणार? तिनंच... मीराताईच्या सावितरी संवस्थेत आनलं. हितं येऊन पन लई लईच वरिसं झाली.
 बारकूमावशी स्वतःच्या वयाचा हिशेब मांडू लागल्या पण तो जमेना. इतक्यात गचकन हादरा बसून रिक्षा थांबली.
 समोर भलीमोठी गर्दी जमा झाली होती. सचिन्याची मोटारसायकल आधीच पोचली होती. रिक्षा थांबताच चार सहा विधवा बाया रडत भेकत तिच्याजवळ आल्या. तिला ओढत घरात नेलं. भामाक्काच्या शेजारी बसवलं. समोर नवन्याचं मढं. तो खंगलेला चेहरा तर कधीच न पाहिल्यासारखा. एका म्हाताऱ्या रांडव बाईनं तिच्या कपाळावरचं कुंकू फरफाटून टाकलं. हात जमिनीवर हापटून बांगड्यांचे तुकडे केले. एकीनं गळ्याला हात घातला. तशी बारकामावशी ओरडल्या.
 "ए, हात नगं लावू माज्या डोरल्याला. म्या हौशीनं कस्ट करून सोन्याचे मणी त्यात वोवले हाईत. त्या दादाप्याच्या... मालकाच्या मढ्यावर घालाया काढून देते चार काळं मनी. आपल्यात रांडव बाई नाकात चमकी घालती. तिला बी हात लावायचा न्हाई." असे म्हणत बारकामावशीने डोरल्यातले चार काळे मणी त्या म्हाताऱ्या बाईच्या हातावर ठेवले. नि कमरेची झीप लावून कमरेला चंची अडकवली. नि त्या खाली मान घालून बसल्या.
 पंधराव्या दिवशी बारकूमावशी रिक्षातनं उतरल्या नि मीराताईंच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. मोकळं कपाळ. गोंदल्याची हिरवी रेघ आणि खालचा ठिपका ठसठशीत दिसत होता. हातात काचेच्या दोन दोन जांभळ्या बांगड्या. अंगावर जुनकट लुगडं.
 "ताई, कुंकवाला जसा मेणाचा आधार, तसा तो जिता हाय असं समजून कुकू ल्येत होते. इतके दिस माजी कुनाले आठवण झाली नाय. पन त्यो म्येल्यावर मातर सोधत इथवर आले. का, तर माजं कुकू पुसून, गळ्यातले काळे मनी आन् बांगड्या त्याच्या मढ्याबरुबर दिल्याबिगर त्याला सांती मिळायची न्हाय म्हणून."
 "आंदीच म्येला व्हता तो. खोटं सांगून मला हितून न्येलं... बरं झालं. मी मोकळी जाले. ताई, माझ्या मागं हाय कोन? मी म्येले की सावतर भावाभैनीचा सोध घेऊ नका. माझं जे हाय ते या होस्टेलातील पोरींसाठी. माज्याकडून लिहून घ्यावा. मातर माझा द्येवावर इस्वास हाय. मला डाग नैना देईल. तुमीच म्हताना, की आज काल पोरी बी डाग देतात. आन् माझी हाडं मातर गंगाखेडला जाऊन गंगेत टाका म्हणावं..." असं म्हणत बारकूमावशी स्वयंपाक घराकडे वळल्या.