Jump to content

कथाली/स्फोट

विकिस्रोत कडून
स्फोट

 बेबीनं धनंजय जेवळीकरला हलक्या हातानं थोपटलं. ते दृश्य पाहता पाहता द्वारकाबाईचे डोळे भरून आले. त्यांच्या मनात आलं, या दोघांचं अजून लगीन झालेलं नाही. कदाचित होणारही नाही. कुणास ठावूक हे पोरगं वाचलं की......पुढच्या कल्पनेनं त्यांचा जीव जागच्याजागी चोळामोळा झाला. कपाळावरचा घाम पुशीत, मनातल्या मनात त्यांनी पांडुरंगाला साकडं घातलं.
 देवा, पांडुरंगा, या पोरीकडे बघ नि या पोराला औक्ष घाल. माझ्या लेकराचा जीव असा कुस्कारू नकोस रे बाबा!
 दोन्ही हातांनी दहा नि दहा बोटांचा रेटा देऊन दांडगा दगूड उचलावा, तसे धनंजय जेवळीकरांनी जडावलेल्या पापण्या उचलीत डोळे उघडले. दगडाखाली जिता झरा लागावा तशी त्याची नितळ, शीतल नजर. बेबीनं त्याच्या कपाळावरून मायेने, हाता फिरवला. त्याची नजर तिच्या नजरेतून मिसळून गेली. द्वारकाबाईच्या मनात आलं, ही पोरं लगीन न होता बी एकमेकासाठी किती जीव उसवतात. एकमेकांपायी किती झुंजतात नि माझं लगीन होऊन ईस वरिसं उलटून ग्येली. पन अशी मायेची नजर कधी माझ्या नजरेला पडली नाही की जिवाला शांतवा देईल असा स्पर्श अंगाला झाला नाही. म्हनायला जोडीचं राज्य पन उभं आयुष्य आढ्याला टांगलेल्या शिंक्यासारखे ओझी घेऊन लोंबकळणारं.
 द्वारकाबाईंच्या मनात बेबीविषयी अपार माया दाटून आली. त्या उठून बेबीजवळ गेल्या आणि त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला. तोच हात धनंजयाच्या किंचित तापलेल्या दुःखाच्या कपाळावरून फिरवला.
 त्या अशक्त गार कापऱ्या बोटांचा. ओलसर अनपेक्षित स्पर्श....बेबी विस्फारलेल्या नजरेनं आईकडे पाहू लागली. त्या लंगड्या पत्रकारालाही ते दृश्य अनपेक्षीत होतं आणि त्याचक्षणी माधवरावांनी खोलीत प्रवेश केला. द्वारकाबाई जागच्या हलल्या नाहीत. धनंजयच्या जवळच्या खुर्चीवर त्या बसून राहिल्या. माथ्यावरचा पदर सवयीनं पुढे ओढून नेटका करीत त्यांनी स्थिर नजरेनं नवऱ्याकडे पाहिलं.
 गेल्या कित्येक दिवसांत द्वारकाबाईंनी आपल्या नवऱ्याला असं अंगभरून पाहिलंच नव्हतं. माधवरावांचा जाडजूड उंचापुरा देह, पाहणाऱ्याच्या मनात धाक निर्माण करी. अस्सल खानदानी रग दाखविणाऱ्या हात हात मिश्या, भेदक लालसर डोळे, कपाळाच्या डाव्या अंगाची उभी हिरवी शीर, ते रागावले की शीर फुगून यायची. साखर कारखान्याचा व्याप वाढत गेला तसे त्याचे केस पातळ होत गेले. टक्कलही पडू लागलं. ती हिरवीशीर थेट डोक्यापर्यंत टचटचून जायची. द्वारकाबाईंना भय वाटत असे की ही फुटून तर जाणार नाही ना!
 माधवरावांकडे पाहता पाहता गेल्या सत्तावीस वर्षांच्या संसारातील चित्रं, पत्त्याच्या डावाचा पंखा हाती धरावा तशी द्वारकाबाईच्या डोक्यासमोर आली. द्वारका वांझरखेड्याच्यां कदमांच्या घरची थोरली लेक. तात्याराव कदमाची बायको लवकर वारली. द्वारका घरात आईविना वाढली. जावाभावांच्या संसारात तिची भाजणूक व्हायला नको, म्हणून तात्यारावांनी द्वारकीचं लगीन मोहनराव साबळ्यांच्या थोरल्या लेकाबरोबर, माधवरावाबरोबर ती लहान असतानाच लावून दिलं. लगीन झालं तेव्हा द्वारकी जेमतेम दोनदाच बाजूची झाली होती. लेकीचं झाल्यावर तात्यारावांनी स्वतःचं लगीनही उरकून घेतलं होतं. माहेरच्या घरात वावरणारी, बरोबरीच्या वयाची सावत्र आई. तिच्यासंग बापाचं लागट वागणं, द्वारकाला माहेरची ओढ कधी वाटलीच नाही.
 साबळ्यांच्या घरात द्वारका मुक्यानं वावरली. माधवराव पहिल्यापासूनच आडदांड स्वभावाचे. बोलणंही ठोकरं. तिला नेहमीच माधवरावांची भीती वाटे. ते खोलीत आले की तिचा जीव, आतल्या आत चिंब होऊन जाई. ते गोडीत आले तरी, ती खारीसारखं अंग चोरून, खालच्या मानेनं हो ला हो देई. आपलं माहेर भक्कम नाही, आपला बाप असूनही आपण एकाकी, अनाथ आहोत असं तिला नेहमीच वाटे. तिच्या या भित्र्या चाचरत्या स्वभावामुळे माधवरावांचे मन आपल्या बायकोत कधी रमलं नाही. गुंतलं नाही की खोल मुरलं नाही. रीत म्हणून नवराबायकोचं नातं. पण कधी ऐशीनं गप्पा केल्या नाहीत की बाहेरगावाहून येताना नवीजुनी चीज बायकोसाठी म्हणून आणावीशी वाटली नाही. दरवर्षी दिवाळीतल्या पाडव्याला मात्र न चुकता सोन्याचा पिवळा डाग घरात येई. पण तिथेही माधवरावांची हौस नाही तर पसंती नसायची. रिवाज म्हणून पाडव्याला ओवाळणीत ताम्हनात दागिना पडे.
 लग्नानंतर पाच वर्षांनी बेबीचा जन्म झाला. आधीच नाजूक बांध्याच्या द्वारकीला हे बाळंतपण फार जड़ गेलं. नऊ महिने सासरच्या घरात, कामाधामात जीव जुंपलेला होता. मूल आडवं आलं म्हणून वरून काढलं. त्यात, ऑपरेशननंतर टाक्यात पाणी शिरलं. या बाळंतपणानं द्वारकाबाईचा जीव हल्लक बनून गेला. याच काळात माधवराव वरचेवर राजकारणात गुंतू लागले. त्यांचं लक्ष घरातून पार उडून गेलं.
 द्वारकाबाई आपल्या मनातली सारी ममता, जिव्हाळा बेबीवर ओतीत. बेबी, जणू त्यांच्या काळजाचा कोमल तुकडा. बेबीनंतर घरात पाळणा हाललाच नाही. माधवरावांच्या मुंबईच्या फेऱ्या साखर कारखान्यामुळे तर वाढल्याच. पण त्याहीपूर्वी ते राजकारणात पडल्यापासून मुंबईला वरचेवर जात. तिथेच ते कुणांत तरी गुंतत आहेत, असा बोलवा सगळीकडे होता. एक बारीक खरं की सगळे सगेसोयरे वंशाच्या दिव्यासाठी दुसरं लगीन करा असं सांगत असतानाही माधवरावांनी दुसरा विवाह केला नव्हता. बेबीत त्यांचं मन सगळ्या बाजूंनी गुंतलं होतं. तिने खूप शिकावं असे त्यांना वाटे. एखाद्या गरीब घरचा हुशार मुलगा घरजावई करावा आणि त्याच्या आधाराने म्हातारपण घालवावं असा त्यांचा साधा हिशेब असे. पण साखरकारखाना झाला आणि त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण लागले. पाहता पाहता माधवराव लांब लांब ढांग टाकीत पुढे गेले. दूर दूर गेले. द्वारकाबाई मात्र होत्या तिथेच होत्या. आल्या गेल्याची उस्तवार, चहापाणी, जेवणीखाणी, देणीघेणी निस्तरण्यात दिवस जात होते. बेबीला लहानपणापासूनच पुण्याच्या हुजूरपागेत शिकायला ठेवले होते. वाचनाची आवड, बोलण्यातली धिटाई, डोंगरातून वाहणाऱ्या पाण्याच्या धारेसारखा स्वच्छ, स्पष्ट आवाज आणि चेहऱ्यावर वयाचा गोडवा. बेबी लहानपणापासून घरापासून दूर राहिल्यामुळे काहीशा स्वतंत्र वृत्तीची बनली होती. एकुलती एक म्हणून थोडी हट्टीही होती.
 माधवराव सतत मुंबईपुण्याकडे तरी असत किंवा कारखान्यात तरी असत. ते असले नसले तरी घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असेच.
 घरी येणाऱ्या समद्यास्नी चांगलं ढळत्या हातानं मीठ मसाला घालून चांगले जेवूखाऊ घालत जा. ग्रामीण भागातलं राजकारण जेवणाखाणावर आन् चहापानावर चालत असतंया. तिथं अंगचोरपणा कामाचा न्हाई.खेड्यातली मानसं आजूक मिठाला जागत्यात. असे ते द्वारकाबाईंना नेहमी बजावत असत. त्यांचे राजकारणी हिशेब द्वारकाबाईंना कधीच उमजले नाहीत. उलटपक्षी ते जवळून पाहताना, अनुभवताना त्या आणखीनच कोमेजून जात.
 आताही त्यांच्या मनासमोर तो भयानक प्रसंग जसाच्यातसा उभा राहिला आणि... आणि त्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटला. छातीचा ठोका क्षणभर हुकला. त्यांनी भेदरलेल्या नजरेने आपल्या लेकीकडे पाहिले. बेबी धनंजयच्या कपाळावर हात ठेवून ठामपणे निश्चल गंभीर नजरेने खिडकीकडे पाहत त्यांच्या शेजारी बसली होती. दुसऱ्याच क्षणी त्यांची नजर आपल्या नवऱ्याकडे माधवरावांकडे गेली. माधवरावांच्या डोळ्यांतून विलक्षण तुच्छता आणि जळजळीत विश्वास ऊतू चालला होता. त्यांच्या जाड भिवया वाकड्या झाल्या होत्या. वरच्या ओठाची डावी कड संतापाने त्यांनी दाताखाली आवळली होती. त्यांचा उजवा हात काठीच्या मुठीवर घट्ट आवळल्याचे द्वारकाबाईंच्या लक्षात आलं. ती काठी पाहताच विजेचा झटका बसावा, तसं त्यांचं मन थरारलं. ही खास रेखीव घोटीव काठी आज फार दिवसांनी कपाटातून बाहेर आली होती. तिच्या मुठीवरचा सिंहाचा क्रूर जबडा. त्यांच्या डोळ्यांच्या जागी बसविलेले लाल खडे. द्वारकाबाईच्या डोळ्यासमोर दहा वर्षांपूर्वीची ती रात्र भुतासारखी नाचू लागली.
 श्रावणातले दिवस होते. पावसाची झड दोन दिवसांपासून दिवसरात्र लागून राहिली होती. त्या उदास संध्याकाळी ते संतापानं फुत्कारत घरी आले. ते नेहमीच बेरात्री घरी येत. ते संध्याकाळी आलेले पाहताच द्वारकाबाईंच्यार छातीत धस्स झालं. घरी आल्या आल्या त्यांनी बायकोला त्यांच्या खोलीत बोलावून घेतलं आणि करड्या... कोरड्या आवाजात हुकूम सोडला.
 चार-आठ दिवस गावाकडं जायचया तुमाला. तयारीनं निघा. बेबीला हितंच ठेवा जनाबाईकडं... आन् सावित्राला घ्या बरुबर. द्वारकाबाईच्या काहीच लक्षात येईना, त्यांनी चाचरत बाचरत बोलण्याचा प्रयत्न केला.
 अहो पण सावितराताईसाहेबांना लागायचं न्हाईये. त्यांना कसं नेता येईल. समद्यांनी येकाच जीपमंदी बसायचं म्हंजी इटाळ न्हाईका व्हायचा. शिवाय पुढच्या पंधरवड्यात पोळा हाई तवा जायचंच...
 तुमाला सांगितलं तेवढे करा. जीभ लांबवाईची न्हाई लई. झाडा म्हनलं की झाडायचं. का नि कोन येनार हाय? असले सवाल न्हाई पुसायचे. आम्हाला फुजूल बोलणं आवडत न्हाई. लगीलगी तयारी करा. माधवराव वाकड्या शब्दांत गरजले.
 सावित्रा माधवरावांची धाकटी बहीण. धाकटी म्हणून जरा लाडाकोडात वाढलेली. गावात सातवीपतर शाळा होती. सावित्रा सातवी पास होऊन घरीच बसली होती. म्हणजे घरी बसवली होती. द्वारकाबाईसुद्धा सातवी पास होत्या. बाईला लिहिण्यावाचण्यापुरतं शिक्षण मिळालं की पुरे होतं. असं सर्वांना वाटे. तिची अक्क्ल चालून चालून कुठवर चालणार? फार तर चुलीपुढे.
 कारखाना झाला. माधवराव चेअरमन झाले. गावाकडून कारखान्याच्या बंगल्यात राहायला आले. द्वारकाबाईसुद्धा सोबत म्हणून सावित्राही त्यांच्याबरोबर इथे राहायला आली. सावित्राची आई... द्वारकाबाईंची सासू-सावित्रा पाचवीत असतानाच खर्चली होती. माधवरावांच्या वडिलांनी, आपला ल्योक, साखर कारखान्याचा चेअरमन झाल्यानंतर थोड्याच दिवसात समाधानानं डोळे मिटले होते. माधवरावांचा धाकटा भाऊ दिगंबर साताऱ्याला त्याच्या सासुरवाडीच्या गावाकडं डॉक्टरकी करत होता. त्याची बायको बिन भावाबहिणीची एकुलती एक होती.
 सावित्रा मुळातून हुशार. भरतकाम, विणकामाचा तिला भलता नाद होता. स्वेटर तर छान विणायची! माधवरावांचा स्वेटर तिने चार दिवसांत हातावेगळा केला. बैठकीच्या खोलीत बटणांची बदकजोडी, टिकल्यांचा बाळकृष्ण, काचकमलाचं तोरण अशा कितीतरी वस्तू मांडलेल्या होत्या. जे जे पाहिलं ते ते करण्याचा तिला नाद होता. या नादापायी तिचं बाहेर... शेजारीपाजारी जाणयेणंही बरंच होतं. द्वारकाबाईंनी कधी तशी हौस दाखवली नाही.
 बँकेतल्या शिरसाठसाहेबांची बायको सोलापूरची होती. म्पॅट्रिकपास तर शिकलेली होती. ती या असल्या गोष्टीत भलती तरबेज होती. ती दरवेळी विणकामाचे नवेनवे नमुने माहेराहून शिकून येई. तिचं घर सिंधी टाक्याच्या चादरी नि उशीच्या खोळा, पडदे, भिंतीवर टांगायची तऱ्हेतऱ्हेची चित्रे यांनी भरलेलं होतं. सावित्राची नि तिची गेल्या चारसहा महिन्यांत भलती गट्टी जमली होती. उठसूठ ती शीरिरसाठवैनीकडे जाऊन बसत असे. कधी कधी द्वारकाबाई न राहवून म्हणत ही असत,
 "ताई साहेब, असं तासं तास लोकावांच्या घरी रोजन् रोज जानं बरं न्हाई. पोरीच्या जातीनं झाकून पाकून व्हावं. फार तर त्या वैनीला आपल्या घरी बोलवावं, तुमचे दादा लई कडक स्वभावाचे हाईत. त्यानला आवडायचं न्हाई ह्ये."
 सावित्रा भावजयीचं म्हणणं कानाआड करी. कधीतरी तिने उलट उत्तरही दिले होते. "दादांना तर समद्या बायाबी भित्यांत. इथं घरी यायला कोनीपन नग म्हणतं. हळदीकुकवाला तरी कितीतरी येत्यात?"
 एक दिवस धुण्याभांड्याला येणारी भामा द्वारकाबाईजवळ हळूच कुजबुजली. "वैनीसाहेब ताईसाहेबांकडे जरा लक्ष द्या. त्या बँकवाल्या शिरसाठबाईंकडे रोज जातात न्हवं? तिथे एक तरणादादा नेहमी येतो म्हनं. या दोघांच्या लई हसूनखेळून गप्पा चालतात तिथं. ती शिरसाठबाईबी यांच्याच वयाची. तिचा नवरा सदा बँकेत. चहापाणी चालीतया. त्यो काही तुमच्या जातीपातीचा नव्हं. वंजाऱ्याचा हाई. शिरसाठवैनीच्या शेजारणीचा भाऊ हाई. वकिलाची परीक्षा देतोया म्हनं औरंगाबादेत. म्हईना झाला हितं आलाय हवापालटाया भैनीकडं. आजारी होता म्हनं काविळीनं."
 "आता भैनीकडं राहायचं सोडून शेजाऱ्याकडं मुक्काम असतोया त्याचा. ताईसाहेब आल्या की हा टपकलाच समजा तिथं. समद्यांच्या लक्षात आलंया त्ये. परवाच्याला ताईसाब शिरसाठवैनीसंग शहराला शिनेमा पायला ग्येल्या व्हत्या न्हवं का दुपारी? तिथे ह्यो बी बरूबर हुता. सुभामाळणीच्या रम्यानी पाहिलं. ती सांगत व्हती मला..."
 भामा सांगत होती तसं... तसं. द्वारकाबाईचं काळीज भीतीनं गारठून जात होतं. पण त्यांच्या तरी हातात काय होतं? सावित्रा त्यांची धाकली नणंद. तिला जवळ घ्यायचा त्यांनी मोप प्रयत्न केला होता पण ते कधीच जमलं नाही.
 माधवरावांनी कधी बायकोला दोन गोड शब्द दिले नाहीत, तिथे त्यांची बहीण तरी कशी देणार? सावित्राला भावजयीबद्दल कधीच ओढ वाटली नाही. आपली भावजय मरतुकडी. सदा आजारी. ना तिला कलाकुसर येत ना विणकामाची आवड. सदा आपली पोर नि घर यांत लडबडलेली असे तिला वाटे.
 माधवराव नेहमीच उशिराने घरी येत द्वारकाबाईनी कधी नणदेला सोबतीला बोलाविले तर सावित्रा नाक मुरडू उत्तर देई, "छी मला न्हाई तिथे झोपायला आवडत. तुम्हीच या इकडं."
 भामाबाईंनी सावित्राबद्दलची ही कुणकुण सांगितली, त्यानंतर चारच दिवसांनी माधवरावांनी सावित्रासह गावाकडे चालण्याचा तिला हुकूम दिला होता.
 त्याच दिवशीची काळोखी रात्र. गावाकडे आल्या आल्या माधवरावांनी घरातले सर्वगडी शेतावर पाठविले होते. वाड्याची देखभाल करणाऱ्या शंकर यादव आणि त्याच्या बायकोची सकाळीच तुळजापूरला नवस फेडायला रवानगी केली होती. वाड्यात फक्त तीन माणसं. द्वारकाबाई, माधवराव आणि सावित्रा. दादा नका हो मला मारू. अवढ्याबारीला माफी द्या. मी कंदीसुद्धा त्या नामदेवाशी बोलनार न्हाई. शिरसाठवैनींकडं जानार न्हाई. वैनी गऽऽ मला वाचीव. मला भीती वाटते गऽऽ दादा मला नका हो मारू. खोलीत घुमणारा सावित्राचा आवाज दरवाज्याबाहेर ऐकू येत होता.
 हरामखोर साली, वेसवा. घराण्याची अब्रू वेसीवर टांगलीस? माझं नाक तोडतीस? त्या हरामखोर ज्ञानोबानं चारचौघांत मला टोमणा मारला. म्हनला, काय चेअरमनसाहेब, हलक्या जातीशी सोयरपण करून मतांची संख्या पक्की करायचा इचार हाय काय? आन् समदे फिदी फिदी हसले. तुझ्या वैनीला घरात बसून नणदेकडे लक्ष द्याया आलं न्हाई. लई मोकाट सुटली तू. माज्या भविष्याच्या मुळावर येतीस? कुळाचं नाव बुडवतीस? मर, तुला हीच शिक्षा हवी. तुझ्या नावाची अशी चबढब झाल्यावर कोन पतकरनार हाय तुला? बोललीस तर याद राख. हलकट साली...
 आतून बंद असलेल्या दरवाज्याबाहेर द्वारकाबाई थरथरत उभ्या होत्या. सावित्राचा काकावळा आवाज आकान्त करीत होता.
 भोवऱ्यात सापडलेलं लेकरू डोळ्यादेखतां पाण्यात गडप व्हावं नि काठावरची माय जागच्याजागी खिळून राहावी तशी गत.
 सावित्राचा आवाज विझून गेला तशी घामानं लथपथलेले माधवराव बाहेर आले. तुमची धाकटी नणंद पटकी उलटीनं मेलीया. मोठ्यांदा रडा. समदं गाव गोळा करा... रडा म्हनतो ना? हाला इथून!
 या कानांचं त्या कानाला कळलं तर तुमची बी हीच गत हुईल, ध्यानात ठिवा. सापाने मंत्र फुकलेल्या बेडकीसारख्या त्या एक जागी खिळून नवऱ्याचे बोलणे ऐकत राहिल्या.
 सावित्राच्या अचेतन देहाला नाहू माखू घालतांना त्यांना रडू आवरेना. सावित्राची पाठवणी केली आणि त्यांना भडभडून उलटी झाली. पोटातलं सारं पाणी पडून गेलं. निपचित पडल्या पडल्या त्यांना वाटलं होतं. मरण वाईट खरंच. पण मरत मरत जगण्यापरीस सावित्रा सुटली... मोकळी झाली.
 आज दहा वर्षांनंतर सावित्राच्या कोवळ्या कुंवार आवाजातला आकांत त्यांना पुन्हा ऐकू येऊ लागला. वैनी मला वाचीव गऽऽ, मला जगायचंय, मला मरायचं न्हाई. मला भीती वाटते. मी चुकलेऽऽऽ. पाहता पाहता त्या किंकाळ्यांची जागा बेबीच्या निग्रही, स्थिर आवाजानं घेतली.
 आबा, मी निर्णय घेतलाय. धनंजय स्वतःच्या कर्तृत्वावर जगणारा स्वाभिमानी तरुण आहे. आम्ही दोघे इंजिनिअर आहोत. मी त्याची जात पाहिली नाही. पण त्याच्या घरातलं सहजसुंदर खेळीमेळीचं वातावरण, त्याची आई, बहीण आणि त्याचे बाबा यांच्या दिलखुलास चर्चा, वादावादी. मी धनूपेक्षा त्या घरात जास्त गुंतले. तरीही आबासाहेबांनी त्यांच्यावर मारेकरी घातले. तो मला सन्मानाने मागणी घालायला आला असताना माझा निर्णय मी बोलणार नाही. आयुष्यभर माझ्या गरीबड्या आईला मुक्या अणूंच्या डोहात सडवलीत. सावूआत्या कशानी म्येली हे साऱ्यांना माहिताय. मला मारण्याची हिंमत असेल तर तेही करा. सगळ्यांना मारून कुणासाठी जगणार आहात आबा? कुणासाठी जगणार आहात?
 वर्षानुवर्ष असलेली खिडकी झंझावाताने उघडी व्हावी नि मोकळ्या हवेचा; निरभ्र प्रकाशाचा झोत लक्कन आत यावा, तशा त्या मनातल्या मनात भानावर आल्यासारख्या ओरडल्या, "न्हाई, हा बळी मी घिऊ द्याची न्हाई" हा तिसरा बळी मी घेऊन देणार नाही.
 माधवरावांनी गुप्तीवरची पकड घट्ट केली. क्षणाचाही विलंब न लावता गुप्तीचे धारदार पाते उचकून बाहेर काढले आणि धनंजयाच्या दिशेने ते झेपावले. त्याचा वार धनंजयाच्या अंगावर पडण्यापूर्वीच बेबीने आपले अंग त्यांच्यावर ढालीसारखे झोकून दिले. आणि तिच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार करून दै.सत्यवार्ताचा तो लंगडा वार्ताहर इथवर आला होता, त्याने नजरेचे पाते लवण्यापूर्वीच आपले दोन्ही हात बेबीच्या पाठीवर ढालीसारखे पसरले.
 माधवरावांची गुप्ती त्या वार्ताहराच्या उजव्या हातात घुसून रक्ताची चिळकांडी उडाली. द्वारकाबाईच्या कपाळावर त्याचे शिंतोडे आले. पेटलेल्या नजरेनी त्यांनी आपल्या नवऱ्याकडे तुच्छतेने पाहिले. कुणालाबी काही कळायच्या आत ती गुप्ती त्यांनी सपकन् ओढून काढली आणि बाहेर जाण्यासाठी वळलेल्या आपल्या नवऱ्याच्या पाठीवर सपासप वार करू लागल्या...