कथाली/त्या तिघी
...भानुमतीला आश्रमातले वादविवाद आठवत होते. कणाद आणि ईशान वाद घालण्यात निपुण. अर्थात दोघेही आपापल्या ज्ञानभूमिकेवर ठाम. ईशानला 'सो ऽ हम्' ची भूमिका आत्मा परमात्म्याचे सायुष्यत्व... एकरूपत्व, ईश्वराचे अनाकलनीय अदृष्यमान अस्तित्व सत्य वाटत असे. वेदांची भूमिका हीच अंतिम सत्याची दिशा या मतावर तो ठोस होता. तर कणाद मात्र चार्वाकमताचा स्थिर अनुयायी.
असे साधार सिद्ध करणारा. आणि म्हणून 'ऋणम् कृत्वा घृतं पिबेत्'...एकवेळ ऋण काढा पण देहांच्या... मनाच्या इच्छांची तृप्ती करा. तिच्या मनात आले, देह आणि मन यांचे वेगवेगळे अस्तित्व असते का? की एकात्म वगैरे? आत्मा-परमात्म्याचे एकरूपत्व आणि आत्म्याचे अमरत्व, विविध पद्धती, उदाहरणे यांतून सिद्ध करताना ईशानच्या मुखमंडलाभोवती तेजोवलय लहरत असल्याचा भास होई.
देहपंचमहाभूतांच्या कणांतून आकारतो. आत्मा मात्र देहावेगळा असतो. मृत्यूनंतर देहातील पंचधातूचे भाग आप... तेज... वायू... मृद... अवकाश आपापल्या मूलस्थानी जातात.
आत्मा मात्र दूर... दूर भरारतो. मग देहाच्या इच्छा, आकांक्षा, वासना...वेगळ्या का? त्यांचे अनुबंध देहाशी की आत्म्याशी की मनाशी? मन हे देह आणि आत्म्याशी कोणत्या नात्याने बांधलेले?...?
शेषाचा बलदंड झळझळीत पितांबरी नग्न देह समोर उभा होता. त्याच्या डोळ्यांतून वासना ओसंडून ओघळत होती. काही उमगाय समजायच्या आत भानुमतीचा रसरशीत गौर देह शेषाचे क्रीडास्थान बनला.
चुरगळलेल्या पारिजात कुसुमाप्रमाणे कोमेजून गेलेला भानुमतीचा देह आणि चुरगळून गेलेले उद्ध्वस्त मन. अनेक काटेरी प्रश्नांचे खंजीर तिच्या मनावर खुपसले जात होते.
आत्मा एकच नां. स्त्री आणि पुरुषाचा? बळाचा वापर करून स्त्रीच्या देहावर आघात करणारा पुरुषाचा देह त्यातला आत्मा आणि आघात असहायपणे सोसणाऱ्या स्त्रीचा आत्मा. दोन्ही एकरूप की वेगळे? देहावर होणारे आघात निरंग होऊन सोसणारा देह 'स्त्री'चाच का? पुरुषाच्या वासना शमविण्यासाठीच तिचा देह? स्त्री-देह एक वस्तू? पुरुषाची क्रीडा-वास्तू?
एकदा पौर्णिमेच्या रात्री ओले केस उदवत असतांना तिची प्रियतम सखी दासी मेघना सांगत होती, महाबली दुर्योधन पांचालीस एकटीला गाठून विचारीत असे...आज पाळी कोणाची? पांचाली खजील होऊन खाली मान घालून तटस्थ उभी राही. पण एक दिवस तिने शांतपणे उत्तर दिले होते, 'शेषाची नाही'. त्यावेळी द्रौपदीच्या उद्धटपणा ऐकून ती संतापली होती. संताप कोणाजवळ व्यक्त करणार या विचाराने आतल्या आत खदखदली होती. पण या क्षणी शेषाने उद्ध्वस्त केलेल्या तनामनाला द्रौपदीचा हात घट्ट धरून ठेवावासा वाटतो आणि म्हणावेसे वाटते, तुझे पाच माझे दोन पण तुझ्यामाझ्या तिच्या माझ्यात 'देहा'ची भूमिका एकच?
पांचालदेश नरेश द्रुपदाची अग्नीतून निर्माण झालेली कन्या द्रौपदी, हिच्या स्वयंवराची वार्ता देशोदेशीच्या नरेशांना, राजपुत्रांना कळविण्यात आली होती. चंद्रचांदण्याच्या आकृती रेखलेल्या मखमली कापडांनी सजवलेला विशाल मंडप देशोदेशीच्या नृपतींचे, राजपुत्रांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक होता. झुळझुळीत रेशमी वस्त्र परिधान केलेल्या सेविका, सेवक यांची धावपळ सुरू होती. मंत्रीगण, महामंत्री आदी मान्यवर, प्रमुख प्रवेशद्वाराजवळ सुगंधी फुलांचे हार, सुगंधी तेल, चंदनगंध, अक्षता घेऊन उभे होते. तिन्ही लोकीचे नरेश, राजपुत्र, धनिक आपल्या अनुभाविक... सेवकांसह मंडपात विराजमान होत होते. व्यासपीठासमोरच्या गर्द काळ्यानिळ्या संगमरवरी पाषाणाच्या वर्तुळाकृती सौधावर एक भलीमोठी कढई तेलाने भरून ठेवली होती. त्यात एक स्तंभ रोवून त्याच्या शेवटच्या टोकाला एक गतिमान चक्र बांधले होते. त्या चक्राच्या एका आरीला सोनसळी मासा बांधलेला होता. ते चक्र वेगाने फिरत होते. स्थिर तैलात मत्स्याचे प्रतिबिंब निरखून जो कोणी पुरुष बाणाने त्याचा वेध घेईल त्याला पांचाली वरमाला अर्पण करील, अशी घोषणा साक्षात द्रुपदाने केली. स्वयंवराची ती अभेद्य, अत्यंत अवघड अट ज्ञात होताच अनेकांचे प्राण आतल्याआत लुप्त झाले. अनेकांनी खांद्यावरचे धनुष्य काढलेच नाही. इतक्यात...
उगवत्या सूर्याच्या सळसळीत सोनेरी उन्हासारखी तेजस्वी कांती असलेला अंगराज कर्ण धनुष्य सावरीत व्यासपीठाकडे जाऊ लागला. क्षणभर का होईना त्याच्या आरपार छेदून जाणाऱ्या दृष्टीचा, तेजःपुंज देहाचा तिला मोह पडला होता. तो धनुष्याची प्रत्यंचा ओढणार इतक्यात पांचाली भानावर आली आणि काहीशा कर्कश स्वरात बोलली.
मी सूतपुत्राला वरमाला अर्पण करणार नाही. अंगददेशाचे राज्य मित्राच्या उपकारानेच प्राप्त झालेय ना? अखेर सूतपुत्रच!
कर्णाने धनुष्य खांद्यावर अडकवले आणि तो वेगाने गर्रकन मागे वळून प्रवेशद्वाराच्या दिशेने निघाला. मात्र, त्याचा हृदयस्थ मित्र दुर्योधनाने मात्र विषगर्भ तीरासारखी नजर पांचालीकडे टाकली आणि आपली गदा घट्ट आवळीत स्वयंवर मंडपाबाहेर ताडताड पावले टाकीत तो निघून गेला. क्षणभर नीरव स्तब्धता...क्षणार्धात एक भरदार बाहूंचा गहूवर्णी युवक त्या मत्स्यचक्राकडे गेला आणि काही कळायच्या आत त्याने मत्स्यभेद केला. त्या ब्राह्मण युवकाला पाहून पांचालीच्या मनात आले. साक्षात् अग्नीने निर्मिलेल्या द्रुपदकन्येच्या प्राक्तनात क्षत्रीय राजपुरुष नांहीच का? सखी मृणालिनीने तिचा हात धरून तिला विवाह वेदिकेकडे नेले. द्रौपदीने त्या ब्रह्मकुमाराच्या गळ्यात वरमाला घातली आणि मंडपात कोलाहल माजला.... द्रुपदराजाचा धिक्कार असो. द्रुपदकन्येचा विवाह क्षत्रीय नृपतीबरोबर अथवा राजपुत्राशीच झाला पाहिजे. अन्यथा युद्धास तयार व्हा. अशा आरोळ्यांनी सभामंडप हादरून गेला. वासुदेवपुत्र श्रीकृष्ण तात्काळ व्यासपीठावर चढला आणि त्याने उंच आवाजात जणू आदेशच दिला. 'हे नृपती आणि राजपुत्रांनो, ज्ञाती जन्माने प्राप्त होत नाहीत तर कर्माने प्राप्त होतात ही पूर्वापार परंपरा, आर्यधर्माचे पालन क्रमशः करावे ही पूर्वजांची शिकवण विसरलात?
श्रीकृष्ण, बलराम त्या ब्राह्मण कुमारास कडकडून भेटले आणि त्याच्यासमवेत नगराबाहेरच्या पर्णकुटीकडे आले. अर्जुनाने हर्षाने मातेला साद घातली.
"माते, आज मी अपूर्व भिक्षा आणली आहे, ती पाहा..."
"जी काही भिक्षा असेल ती पाचही जणं वाटून घ्या" असे म्हणत माता कुंती काष्ठगृहाच्या बाहेर आली तर समोर विलक्षण तेजस्वी रूपवान राजकन्या, तिला आपण दिलेल्या आज्ञेचा पश्चात्ताप झाला. परंतु मातृआज्ञा स्वप्नातही अव्हेरू नये या परंपरेनुसार पाचही जणांनी पांचालीशी विवाह केला. हस्तिनापुरातील राजगृहात जाण्यापूर्वी नारदमुनींची भेट झाली. वासुदेवाच्या विनंतीनुसार पांडुपुत्रात कलह माजू नये या उद्देशाने नारदमुनींनी प्रत्येक पांडवाने वर्षातून प्रत्येकी दोन महिने बारा दिवस पांचालीच्या सहवासात राहावे. जो ही खूण भंग करील त्याने एक वर्ष वनवास पत्करावा असा नियम घालून दिला... पांचालीला ते क्षण अनेक वर्षांनंतरही काल घडल्यागत आठवताहेत.
पाचजणांचे वेगवेगळे स्वभाव, त्यांच्या विविध प्रकारच्या सवयी, आवडीनिवडी. प्रत्येकाच्या पांचालीकडून तऱ्हेतऱ्हेच्या अपेक्षा. देहरंजनाच्या आणि देहबोलीच्या भिन्न भिन्न तऱ्हा. या सर्वांना सहन करताना तिची होणारी ओढाताण... त्या आठवणींनी द्रौपदी अस्वस्थ झाली. पाचही जणांचे द्यूत खेळण्याचे असोशी वेड... नेहमी होणारी हार, भोगावा लागलेला सततचा वनवास. जयद्रथ, दुःशासन, दुर्योधन, किचक यांची देह सोलून काढणारी हावरी नजर, अश्वत्थाम्याने केलेला तिच्या मुलांचा संहार लक्ष लक्ष, अगणित प्रहार. सखा श्रीकृष्णच मनातल्या व्यथा जाणणारा, सखी कृष्णेला धीर देऊन प्रत्येक वडवानळातून सुखरूप सोडविणारा. तो होता म्हणूनच...! पाच पतींसह सर्वच पांचालीच्या देहात अडकले. कुणी अधिकाराने उपभोग घेतला. काहींच्या डोळ्यात फक्त लालसा होती. त्या देहात असलेले उत्फुल्ल मानवी मन कुणालाच जाणवलं नाही. त्या मनावर होणारे आघात कोणी जाणले? अपवाद फक्त भीमाचा. किचकाने सैरंध्रीचा विनयभंग केला तेव्हा त्यानेच तिच्या अपमानाची परतफेड केली. आज तिच्या मनाला खूप शरम वाटते, तिने दुर्योधनाला दिलेल्या त्या उत्तराची. 'आज शेषाची नाही' हे सांगताना कळतनकळत मी भानुमतीचा अपमान केला होता. भानुमतीच्या काय किंवा माझ्या काय देहातच पतींसह सारे पुरुष गुंतले. आमच्यातल्या मनाचा थांग शोधण्याचा प्रयत्न कोणीच का केला नाही?... अपवाद श्रीकृष्णाचा. मी त्याची सखी होते...
मी अग्नीकन्या होतेच. भळभळती जखम शोधणाऱ्या अश्वत्थाम्याच्या जखमेवर ती भरून यावी, यातना सहन व्हावी म्हणून अतीव मायेने मी तेल ओतले तेव्हा व्यासांनी मला भाविणी म्हणून साद घातली. दुःशासनाने माझ्या वस्त्राला हात घातला त्यावेळी मी भर सभेत पितामह भीष्माचार्यांना निर्भीडपणे प्रश्न विचारले. तेव्हा माझा त्यांनी 'मनस्विनी' म्हणून गौरव केला. महर्षी व्यासांना माझे घवघवते... चेतस मन जाणले. इतरांनी का नाही? का नाही?...? की देहस्विनीचा घाट पार केल्यानंतरच मी भाविणी, मनस्विनी झाले. प्रत्येक स्त्रीच्या जीवनात ही तीन वळणे येतच असतील का?
पायातल्या लाकडी खडावांचा कट्कट् असा ध्वनी त्या निबिड गहन वनात येत होता. काटे... वाळलेली पाने तुडवीत ती उत्तरेच्या दिशेने चालत होती. इतक्यात शुक असा ध्वनी कानावर आला तिने चमकून भोवताली नजर फिरवली. एक अगदी इवलेसे पिल्लू पानांच्या दाट शय्येवर वरून पडले होते. तिथल्या तिथे ते थरथरत होते. ते तिने अलगद उचलले आणि सभोवार निरखू लागली. ज्या वृक्षाखाली ते पडले तो शालवृक्ष थेट आभाळाला भिडला होता. बहुधा शिशिर ऋतूच्या अखेरचे सुगंधी वारे वाहू लागले होते. आकाशमोगरीच्या अखेरच्या फुलोऱ्याच्या मोहक सुगंध लहरी वाऱ्याचा हात धरून नर्तन करीत होत्या. तिला प्रश्न पडला कुठे ठेवावा हा चिमुकला जीव?...कुठेच सुरक्षित जागा दिसेना. तिने तिच्या उत्तरियाचे डावे टोक हळुवारपणे कटीच्या मखलेत खोवले. आणि त्या रेशमी झुल्यात तो बालजीव हळुवारपणे ठेवला आणि ती पुढे चालू लागली. थोडी पुढे गेली तोच तिला पंखांच्या उडण्याचा ध्वनी पाठलाग करीत असल्याचे जाणवले. वर्षाऋतूच्या आगमनाची वार्ता देणाऱ्या नीलपक्ष्याची ती मादी होती. ती माधवीच्या उजव्या स्कंधावर बसली आणि निळ्या डोळ्यांनी तिच्या उत्तरियात ठेवलेल्या चिमण्या जिवाकडे निरखून पाहू लागली. माधवी वटवृक्षाच्या धरणीला टेकलेल्या शाखेवर विसावली आणि तिने नीलमादीला जवळ घेतले.
...तुझ्या पिल्लाला मी पर्णशय्येवर ठेवते. तू ते अलगद घेऊन जा घरट्यात. त्याला उडायला शिकव. दाणापाणी दे. मग ते उडू लागेल. आणि भुर्र भरारून अवकाशात दिसेनासे होईल. मग तू पुन्हा एकटीच.
तिने दीर्घ निःश्वास सोडून तो बाळजीव पानावर हळुवार हातांनी ठेवला. क्षणार्धात ती पक्षिणी चोचीत तो रेशमी गोळा घेऊन उंच उडाली. जणू आकाशाला टेकलेली पक्षिणी. थोड्याच काळात ती पक्षिणी परत येऊन माधवीच्या स्कंधावर थांबली. आनंदाचे सीत्कार काढले. कृतज्ञता व्यक्त करून परत अवकाशात भरारली.
त्या रेशमी झुल्यावरचा पिल्लाचा होणारा हुळहुळता स्पर्श. माधवीच्या मनात घट्ट कोंडलेल्या स्मृतींचे गाठोडे उकलून गेला. ब्रह्मषींनी दिलेल्या वरानुसार तीन राज्यांच्या राजेंद्रांना, त्यांच्या वंशाला दिलेला तीन औरस पुत्रांची आठवण झाली...
पिताश्री ययाती महाराज आणि भार्या देवयानी यांची ती स्वरूपसुंदर कन्या. अवघ्या चौदा वर्षांची असेल, तरुणाईच्या ऐलतीरावरती. देहावरची कमळं नुकतीच उमलू लागलेली होती. कंचुकी गाठ बांधताना, अंगावरचे उत्तरीय सावरताना तिची होणारी धांदल पाहून ज्येष्ठ परिचारिका मंजिरीला खूप हसू येई.
...त्या दिवशी माधवी नुकतीच स्नान करून आली होती. मंजिरीने सुगंधी अंगराग, मुखरागाचे लेपन देऊन माधवीला ययाती महाराजाकडे आणले. इतक्यात ब्रह्मर्षी आल्याची वार्ता सेवकाने दिली. आपल्या कन्येला त्यांचे आशीर्वाद मिळावेत, या हेतूने महाराजांनी माधवीला जलपात्र घेऊन अतिथिगृहात जाण्याची आज्ञा दिली. अचानक एकाएकी वादळी वारे वाहू लागले. अतिथिगृहाची दारे बंद झाली. मृत्तिकापात्रातून ती जल देण्यासाठी ती ब्रह्मर्षांसमोर गेली. ब्रह्मषींनी डोळे उघडले. समोर, उत्फुल्ल होणारी अनाघ्रात कलिका...
पापणी लवायच्या आत त्यांनी तिला जवळ ओढले. कटीची मेखला, उत्तरीय कंचुकी सारी वस्त्रे दूर करून तिच्या देहाशी तो पुरुष क्रीडा करीत होता. त्याची तृप्ती झाल्यावर त्याची नजर भूमीवर पडली. ती रक्तांकित झाली होती. त्याने तिला उठवून बसविले आणि तिच्या माथ्यावर हात ठेवून सांगितले. हे पूर्ण स्त्रीये तू निरंतर अनाघ्रात कुमारिकाच राहशील.
स्त्रियः पवित्रंमतुलंम्।
नैनं दुष्यन्ति कहिंचित्।।
मासि मासि रजोयसाम्।
दुष्कृतान्यपि कर्षति ॥१॥
हे स्त्रिये स्त्रीत साठलेले मल... रज दर महिन्याला निघून जाते. तुझी संमोहिनी कधीच नष्ट होणार नाही. तू कुमारिकाच राहशील असे वरदान देऊन तो झपझप पावले टाकीत उत्तरेकडे निघून गेला. जाण्यापूर्वी पिताश्री ययाती महाराजांना हे सत्य सांगून गेला.
त्या दिवशी संध्यासमयीची लालिमा भवताल व्यापीत होती. राजकन्या माधवी मल्लिका कुंजात हार गुंफित असताना एक मुनीमहोदाय राजप्रासादात प्रवेश करताना दिसले. आणि काही काळात माधवीला पिताश्रींनी बोलाविल्याचा संदेश घेऊन दासी मधुरिका आली.
ते मुनी निवेदन करीत होते. 'महाराज, आपले परम मित्र पक्षीराज गरुड यांचा मी मित्र, मुनी गालव. मी एका महासंकटात आहे. आपण मला मुक्त करू शकाल असे आश्वासन नव्हे, तर ग्वाही मित्र गरुडाने दिली आहे. माझे गुरू विश्वामित्र यांनी माझ्याकडे अष्टशत उमदे अश्व, ज्यांचा डावा कर्ण श्यामल वर्णाचा असेल, गुरुदक्षिणा म्हणून मागितले आहेत.' ती मागणी ऐकून राजा ययाती महाराज विचारात पडले, असे अश्व त्यांच्याकडे नव्हते. शतअश्व घ्यायचे तर एक अब्ज गोधन शुल्क म्हणून लागते तेही नव्हते. तो दिग्मूढ झाला. त्याला ब्रह्मर्षीनी माधवीला दिलेल्या वराची आठवण आली. समोर नतमस्तक होऊन उभ्या असलेल्या माधवीच्या वराची कहाणी सांगत त्यांनी माधवीचा हात मुनी गालवाच्या हाती दिला. या कन्येच्या माध्यमातून अश्व मिळावा अशी विनंती केली.
... त्यानंतरचा प्रवास माधवीला समोर दिसत होता... ईक्ष्वाकु वंशाचा राजा हर्षस्व यांच्याकडे गालव मुनींनी वंशदीप देण्यासाठी माधवीला पाठवले. तिला पुत्र होताच प्रसूतिकेने तो बाळजीव राणी मेघावतीकडे पाठवला. त्याचे मुखदर्शनही तिला झाले नाही आणि चार दिवसांनी डावा कर्ण श्यामरंगी असलेले द्विशत अश्व देऊन तिची पाठवणी गालवाच्या आश्रमात केली. मेघावती राणीने त्याचे वसुमनस ठेवल्याचे तिला दासीकडून कळले.
माधवीला दिवोदास राजाला दिलेल्या प्रतर्दनाचे गौरकांतीमुख आठवले. विलक्षण गोंडस स्पर्श. विभूतिका दाईने तो बाळजीव तिच्या कुशीत दिला तेव्हा तो भुकेला जीव बाळमुठी तोंडात घालून चूक... चुक् असा चोखीत होता. विभूतिका दासीने तिची कंचुकी सैल करून बाळाच्या मुखात तिच्या स्तनाचे लालचुटूक अग्र बळेच दिले. आणि ते चुरूचुरू दूध पिऊ लागले. कधीही न घेतलेला तो अनुभव अंगावर मधुर शहारा उमटवून गेला. तृप्तीची लाट मन भरवून गेली. चार मास होताच एक दिवस ज्येष्ठ राणी वेदिका तिच्या पर्णकुटीत आली. हातपाय उडवून नाचणाऱ्या... खुदूखुदू हसणाऱ्या प्रतर्दनाला बाळलेणी चढवून घेऊन गेली. येताना माधवीसाठी नूतन वस्त्रे अलंकार आणले.
'हे ययाती कन्ये, तू आमच्या राज्याला वारस दिलास. स्वामी दिवोदास, मी महाराणी वेदिका आणि समस्त प्रजा तुझे ऋणी आहोत. तू वस्त्राभूषणांचा स्वीकार कर. महामंत्री तुला मुनी गालवांच्या आश्रमात उमद्या अश्वांसह पोचवतील...
या साऱ्या प्रहारांचे घाव सोसून माधवीचे मन बधिरले होते. भोजनगरीच्या राजा कुशीनराला दिलेल्या पुत्राकडे... शिचीकडे पाहण्याचे धाडस ती करू शकली नव्हती.
तिच्या माध्यमातून गालवाकडे षड्शत उमदे असे अश्व जमा झाले. तेही डावा कर्ण श्यामवर्णी असलेले. त्रिभुवनातील सर्वच त्या प्रकारचे अश्व संपुष्टात आले होते. गालव माधवीला घेऊन विश्वामित्रांकडे गेले व हात जोडून विनंती केली. अश्वांऐवजी तुम्ही हिला ठेवा. त्रिभुवनातले अशा प्रकारचे सर्व अश्व संपुष्टात आले आहेत. मुनी गालव तात्काळ निघून गेले. विश्वामित्र तिचे अलौकिक मुग्ध सौंदर्य पाहून विचलित झाले. दहा मेनका या त्रिभुवनसुंदरीपुढे मान खाली घालतील...! तात्काळ त्यांनी माधवीला जवळ ओढले. तिचा पूर्णत्वाने उपभोग घेऊन कौमार्यभंगाच्या पापाचे क्षालन करण्यासाठी हिमालयात तपश्चर्येला निघून गेले. जाण्यापूर्वी माधवीला मुनी गालवाकडे आश्रमात सोडले. त्या क्षणापर्यंत मुनी गालवांनी तिच्याकडे विशिष्ट अश्व मिळविण्याचे साधन म्हणून पाहिले होते. पण हा क्षण त्या पलिकडचा होता. तिच्या देहाचा मोह आपणच का टाळावा असा पोक्त विचार करून गालवानेही तिचा उपभोग घेतला व नंतर त्यांनी माधवीला राजा ययातीकडे आणून स्वाधीन केले.
ययाती महाराजांना आपल्या कन्येची करुणा आली, दया आली. पण तिला राज़गृहांत ठेवण्याचे भय वाटले. तात्काळ राज्यमंत्र्यांना बोलावून तिचे स्वयंवर मांडण्याची तयारी करण्याचा आदेश दिला आणि त्याच रात्री माधवीने तिची ज्येष्ठ सेविका अंबारिकेस बोलावून घेतले. एक श्यामल उमदा अश्व तयार ठेवण्याची हृदयस्थ विनंती केली. मध्यरात्री अंबारिकेसह तिने उत्तरेकडे अरण्यात प्रयाण केले. निबिड अरण्यात आल्यावर अंबारिके सोबत अश्व परत पाठवून लाकडी खडाव घालून काटेकुटे तुडविती माधवी चालू लागली.
त्या तीनही बालकांचे स्पर्श, चेहरे मागे पडले होते. विश्वमित्राच्या स्पर्शाचा विष्ठेसारखा घृणास्पद् अनुभव मात्र मनातून धुतला जात नव्हता. विश्वामित्रापासून झालेल्या अश्वकाला तिने क्षणभरही छातीला लावले नव्हते. ती चालतच होती...माधवीला शुभ्रांकित हिमप्रकाश दिसू लागला. वखवखले सर्व स्पर्श गळून पडले होते. बाळमुखाचे स्पर्श दूर गेले होते. त्या सर्वांपासून ती मुक्त होती. पण स्वतःच्या अस्तित्वाचा शोध मात्र घेण्याची नवी दिशा समोर आव्हान देत होती...
माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय? फलित काय? जगण्याचा अन्वय कोणता? माझे स्त्रीत्व? त्याचे मर्म देहात? माझा आत्मा पुरुष देहातील आत्म्यापेक्षा वेगळा? हीन? मी केवळ 'पुत्र' देण्यासाठी वापरली जाणारी वस्तू? वस्तू? दासीपुत्र विदूर महाराज पांडवांपेक्षाही बुद्धिमान होते तरीही त्यांना राज्याभिषेक नाही. मी राजकन्या म्हणून मी दिलेले पुत्र औरस? देहलालसा माझ्या मनात नव्हतीच का? हर्षश्वानंतरच्या दिवोदासाचा सहवास हवासा वाटला होता. पर त्याच्यासाठी मी औरस पुत्र देणारे एक साधन...!
माझ्या अस्तित्वाचा अन्वयार्थ...?