कथाली/स्कूटरचोर मुलगी

विकिस्रोत कडून
स्कूटरचोर मुलगी

 'ममा, प्लीज लेट मी टेक माय ओन डिसिजन........एवढी का मी लहानेय? तुझी चिंगामाऊ आता अठरा वर्षांची सज्ञान...मेजर मुलगी झालीय...समजा चुकलेच तर आहेस ना तू?' ईशा तिच्या ममाला, नीताला रुसव्याच्या आवाजात म्हणाली.
 'नीता, जरा बावीस-पंचवीस वर्षे मागे जाऊन आठव... कशाला छेडतेस तिला.' रजनीने लेकीला तिच्या तरुणपणाची आठवण करून दिली.
 "कम्माल आहे आई तुझी... अग एरोनॉटिक इंजिनिअरिंगला जायचं म्हणतेय. खर्चाचं जाऊ दे गं, पण केवढं रिस्की आहे. शिवाय त्यासाठी बंगलोर नायतर चेन्नई किंवा कुठेतरी लांब राजस्थानात पिलानीसारख्या ठिकाणी पाच वर्षे राहायचं..." नीताने आईच्या... रजनीच्या बोलण्याला लटका विरोध केला, तरीही रजनीने तिला काहीशा कडक शब्दांत बजावले.
 "नीता, तूही पंचवीस वर्षांपूर्वी एअरहोस्टेस व्हायचं म्हणून हटून बसली होतीस. आठवतं?... पण त्यावेळी माझ्यापेक्षा तुझे बाबाच तयार नव्हते. आणि आता तर तो १९८२/८३ च्या बाहेर पडायलाच तयार नाही. आणि आता माझे तात्या मात्र खणखणीत शब्दांत मलाच बजावताहेत... रजू काळ बदलतोय. त्याच्याबरोबर बदलायला शिक. 'मृत्योर्मा अमृतं गमय' असं आपण म्हणतो ते काय उगाच? नील आर्मस्ट्राँग मरत नसतो. घेऊदे तिला रिस्क. गेल्या वर्षीच तात्या ८५चे झालेत आणि मलाच बजावताहेत 'लेट हर डिसाइड हर ओन फ्युचर..'
 'पाहा, म्हणजे मीच गतानुगतिक चालीची? पण अगं ईशाशिवाय कोण आहे माझं? अजयच्या परदेशवाऱ्या. दारात त्याचे पाऊल सटी-सामानाशी पडणार...ईशाचं सतत दूर राहणं. अनबेअरेबल हं.... ' नीताने लाडक्या लेकीच्या दूर राहण्याची हूरहूर अस्वस्थपणे व्यक्त केली.
 "नीते, तुझे सगळे हट्ट अजूने पुरवले. तुलाच नवेनवे देश पाहण्याची हौस. तुझ्या आग्रहाने त्याने हा जॉब स्वीकारला, पण तुझी नाळ इथेच पुरलेली. काही वर्षात तर कंटाळलीस मुलीला मराठीतूनच शिक्षण देण्याचं निमित्त पुढे करून इथे स्थिर झालीस... मी नेहमी म्हणत असे, एकाच्या जोडीला दुसरं मूल हवं. एकटं असलं की पुरवा त्याचे लाड. भोवती भोवती नाचा. तेही बिचारं एकटं एकटं होतं. शेअरिंग करायला...आपले अनुभव, मन वाटून घ्यायला भावंडं हवंच. आम्ही मुलगाच हवा म्हणत नव्हतो! अजयलाही ईशासाठी जोडीला भावंडं हवे होतं. पण तुझ्या हट्टाखातर अजयने करून घेतलं ना ऑपरेशन.'...बघा ठरवा दोघी असं म्हणून रजनी आत गेली.
 "आज्जू, किती छान आहेस गं....." असे लाडाने बडबडत, नीताची चिंगामाऊ, आज्जूची ईशुली आजीमागे आत गेली.
 "रजू, नीता अजून कॉलेजातच? तो अजय फार वेळा येतो हं तिला भेटायला. रजू ऐकतेसना?..." महेश अजूनही १९८२-८३तच अडकलाय. गेल्या वर्षी ६५ पार केलीय. गेल्या पाच वर्षांपूर्वी जो २०/२१ वर्षेमागे जाऊन बसलाय. जाम बाहेर यायला तयार नाही.
 "आजोबा, मी ईशा. तुमच्या नीताची मुलगी....मी बाहेर जाऊन येते. सांगा ममाला तुमच्या नीताला," असं सांगत ईशानं स्कूटर बाहेर काढली.
 स्कूटरचा आवाज ऐकून नीता बाहेर आली. ईशाकडे पाहणारे बाबा तिला विचारत होते. "नीता, कोण आहे ती मुलगी? आणि आपली स्कूटर घेऊन कुठे गडप झाली? अलीकडे स्त्रियासुद्धा चोरी....दरोडेखोरी करतात हं. ती फुलनदेवी एक बाई टोळीची नायक होती. बघ बघ पोलिसात फोन कर."
 "बाबा, ती कुणीतरी मुलगी नाही, माझी... तुमच्या लाडक्या नीताची मुलगी आहे. तुमची ईशुली... बाबा आत चला..." नीताने तिच्या बाबांना मंगेशला खोलीत नेले आणि त्याचे पुस्तकांचे कपाट उघडून दिले.
 आता सगळं कसं शांत होतं. रजनीने दीर्घ श्वास घेतला आणि ती पाण्याची बाटली काढायला फ्रीजकडे गेली. जून संपत आला तरी आकाश निरभ्रच आहे. १२ वी सायन्सचा निकाल परवाच लागलाय. ईशाला ९४ टक्के गुण मिळाले आहेत. अजय उद्या नेदरलँडहून परत येईल.
 "आई, तू खूप थकलीयस. मी छान गवती चहाची पानं घालून चहा करते आणि हे बघ तू उगाच टेन्शन घेतेस. तुझ्या लाडक्या लेकाचा नीरजचा परवाच फोन आला होता. तो तुला अरुणाचलला नेण्यासाठी येणारेय. बाबांनाही घेऊन ये असं बजावलंय. बाबांना सावरताना... सांभाळताना खूप थकतेस गं. तू थोडी विश्रांती घे. वाच, लिही, दोन महिने राहून ये नीरजकडे. बाबांकडे पाहू मी नि ईशा. अजू येईल उद्या. तोही थांबेल... स्थिरावेल महिनाभर इथे."
 नीताने चहा करून कपात ओतला आणि तिने बाबांना... मंगेशना हाक दिली. मंगेशना गवती चहा घातलेला चहा खूप आवडतो. गवती चहाच्या पानांचा जुडगा मुळासकट उपटून डोंगरकडेतल्या कुठल्याशा खेड्यातून आणला होता. चहाच्या पत्तीइतकेच या पानांना महत्त्व. त्याशिवाय चहा चालतच नाही. सगळ्यांनाच.
 "नीता, तू पोलिसात फोन केलास ना? कोण ती पोरगी. तुझी स्कूटर घेऊन गेलेली. मी पुन्हा तुला स्कूटर आणून देणार नाही हं, सांगून ठेवतो." असे म्हणत मंगेशने कप टेबलावर ठेवला आणि तो परत खोलीत गेला.
 रजनी खोलीत गेली. मंगेश त्यांनीच लिहिलेली मानसिक 'ताणतणावांचे मानसशास्त्रीय विश्लेषण', 'सुबोध मानसशास्त्र', 'परिसर आणि मानवी मन'...ही पुस्तके पुढ्यात घेऊन बसले होते. रजनीने सगळी पुस्तकं कपाटात ठेवली.
 मंगेश चल बाहेर बसू या. लॉनमध्ये खुर्ध्या टाकायला सांगितल्यात. पत्ते खेळुया? असे म्हणत तिने नीताला सदूबरोबर पत्त्याचा डाव पाठवायला सांगितले....पत्ते मात्र आवडीने खेळतो मंगेश आणि तेही फक्त दहा सहाचा डाव. खरं तर त्याला रमीचा डाव खूप प्रिय. पण अशात फक्त दहा सहाच!
 फोनची रिंग वाजली. जवळच ठेवलेला फोन उचलून रजनीने 'हॅलो' आवाज दिला. "रजनी, मी सुधांशु बोलतोय. महिन्यापूर्वी इथे आलो. भारतात. आता इथेच राहणारेय. मंग्याबद्दल कळले. तिथे ट्रिटमेंट वगैरे आहे का ॲव्हेलेबल? पुणंच बरं होतं गं. एनी वे, मी तुला काय सांगणार? प्रत्यक्ष सामोरी जाते आहेस तू, सांग त्याला सुधा भारतात आलाय. आठवेल त्याला..."
 रजनीने फोन ठेवला आणि ती नव्या उमेदीने मंगेशजवळ गेली. "मंगेश, सुधांशू... सुधा आलाय. स्टेटसहून. तुला येणारेय भेटायला."
 "ये म्हणावं. त्याचा किती आग्रह. त्याच्या अनुपमशी नीताचा विवाह व्हावा म्हणून. पण ही मुलगी मुर्ख. त्या अजावर भाळलीय. अनुपम शेवटी निराश होऊन गेल्या महिन्यात गेला लंडनला... जाऊ दे. मुलांपुढे कायं चालणार आपलं? हं चला, हा माझा एक्का बदामाचा. हलकं पान टाक. नसलं तर मारू नको हं किलवर सत्त्याने. चौकट टाक." मंगेशने बदाम एक्का खाली टाकत बंजावले. खरं तर रजनीकडची बदामची पानं संपली आहेत. किलवर... या हुकुमाच्या दश्शाने मारायला हवं नि हात करायला हवा. पण मग मंग्या चिडतो. कधी कधी हाय होतो. संताप सहन होत नाही. ती मुकाट्यानं चौकटचा राजा टाकून मंगेशला हात देते...
 संध्याकाळ होत आलीय. पण रखरखणाऱ्या उन्हाचा पिसारा अजून मिटलेला नाही. मंगेश, झाडांना पाणी घाल. तू लावलेल्या आंब्याला यंदा किती मोहोर आला होता ना? सात आंबे पिकवून खाल्लेसुद्धा आपण. मोगरा, जुई छान फुलल्या आहेत. आणि तो माझा सायलीचा मंडप. कसा सुवासाने घमघमतोय. मी आत जाऊन येते. असं म्हणत रजनी आत गेली.
 मंगेश शहाण्या मुलासारखा झाडांना पाणी घालू लागला. रजनीला गेली पाच-सहा वर्षे हा प्रश्न अक्षरशः खातोय, कुरतडतोय. मंगेशसारख्या अत्यंत हुशार मानसशास्त्राच्या प्राध्यापकाला अल्झायमर... त्यातही, अल्झायमर डिमेन्शिया का व्हावा?... का व्हावा?
 रजनी चाळीसगावसारख्या लहान पण व्यापाराने गजबजलेल्या गावात वाढली. वडील वकील होते. बारा एकर पाणभरतीच्या शेतात राबायला त्यांना जास्त आवडे. रजनीने समाजशास्त्र विषयाची पदवी घेतली. आणि ती मुंबईच्या... चेंबूर येथील टाटा समाजविज्ञान केंद्रात दाखल झाली. पदव्युत्तर...कृतिशील समाज विज्ञानाची पदवी-एम.एस.डब्ल्यू.-मिळविल्यावर पुण्याच्या मानसरोग रुग्णालयात तिला एक महिन्याची क्लॉकप्लेसमेंट... अनुभवासाठी एक महिना प्रशिक्षण... घेण्याची संधी मिळाली. तिथेच तिचा आणि मंगेशचा परिचय झाला. मंगेश मूळचा सांगलीचा. वडील तेथील विलिंग्डन महाविद्यालयात समाजशास्त्राचे प्राध्यापक होते. पण मंगेशला मात्र मानसशास्त्राची विशेष ओढ होती. त्याचे आजोबा गणितज्ज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ होते. दाते पंचांगाच्या कर्त्यांशी त्यांचा विशेष स्नेह होता. घरातील सणवार दाते पंचांगानुसार होत. मंगेशची आई वऱ्हाडातील अकोल्याची. ती आल्यापासून मात्र सर्वांच्या पंचांगासोबत तिने घर जोडून घेतले. सणवार, सुट्या सर्वसामान्य कॅलेंडरप्रमाणे साजरे करण्याचा प्रघात पडला...
 "रज्जू, तू. पोलिसात केला का फोन?" मंगेश बोलत असतानाच ईशा स्कूटरवरून फाटकातून आत आली. तिने स्कूटर बदाम वृक्षाच्या सावलीत लावली नि 'आज्जू अशी हाक देत आजोबांच्या खोलीत गेली.
 "ममाला दडपे पोहे करून ठेव म्हटलं होतं. केलेत तिनं?" ईशाने विचारले.
 "डोंबलं तुझी ममा करतेय. १६ जूनला कॉलेज सुरू होणार आहे. पुस्तकात डोकं घालून बसलीय. पण आज्जू आहे ना तुझी करून ठेवलेत फोडणी घालते. फक्त, दडपून ठेवलेत मघाच..."
 "आज्जू उठू नकोस. मी जरा ढळत्या हाताने तेल घालून फोडणी करते. तुझी थेंबभर तेलाची फोडणी, फोडणी कशी पोहे... कांदा... नारळाचा चव सर्वांना कवेत घेणारी हवी. चमचमीत !" आज्जूला खुर्चीत बसवत ईशा स्वयंपाकघरात गेली.
 मंगेश प्रत्येक झाडाला पाणी घालत होता. झाडाभोवतीचे आळे नीटनेटके करीत होता... ईशाने दोन खुर्ध्या बागेतल्या हिरव्यागार लॉनमध्ये मांडल्या.
 "ममा, दडपे पोहे खायला चल. पुस्तकातलं दडपलेलं डोकं नि मन जरा बाहेर काढ. गुलमोहोर बघ कसा इथूनतिथून रुमझुमलाय आणि फोडणी मी दिलीय. चल लवकर." असे ओरडत ईशा आत गेली नि डिशेस भरून बाहेर आली. पहिला घास चवीने खाताना चुटकी मारीत शेरा दिला.
 "क्ला ऽ ऽ स, अज्जू पोहे मस्ताड जमलेत."
 मंगेश त्या स्कूटरचोर पोरीकडे डोळे वटारून पोहे खात होता. पाहता पाहता सांज उतरून भुईवर लोळू लागली. स्वयंपाकाला येणाऱ्या मावशींना भाकरी नि पिठलं करायला सांगून रजनी मंगेशला घेऊन आत निघाली.
 "रंजन, त्या स्कूटरचोर पोरीला खुशाल खाऊ घालतेस. रजन, डोकं ठिकाणावर आहे ना तुझं?"
 मंगेशचा हट्ट ऐकून रजनी क्षणभर हळवी झाली. कित्येक दिवसांनी आज मंगेशनी रजन अशी पूर्वीसारखी साद घातलीय. तिचे डोळे भरून आले. दाटल्या आवाजात तिने समजावले, "अरे, तुझी नात ईशुली आहे ती!"
 रजनी-मंगेश विवाहबद्ध झाले तेव्हा दोघेही पंचविशीच्या आतले होते. जावई अजय १०वी ते पदवी परीक्षेत सतत प्रथम येणारा हुशार विद्यार्थी. उंची भरपूर. कराटे चैंपियन, अर्थशास्त्राचा पदवीधर, एमबीएत प्रथम येताच कंपनीत चांगली नोकरी लागली. नीता महाविद्यालयात असल्यापासूनच त्याच्यात अडकली होती. त्याचा सावळा रंग मात्र मंगेशला बोचत होता. खरेतर सुधांशूचा अनुपम त्याला आवडला होता. अजयला दोन वर्षांसाठी प्रागला जाण्याची संधी मिळताच लग्न करूनच जा असा आग्रह रजनीने केला. दोन वर्षांनी रशियाहून परत येताना नीताच्या कडेवर ईशा होती. रजनीला पन्नाशी ओलांडायला अजून चार वर्षे अवकाश होता. मंगेशही पन्नाशीच्या अल्ल्याड एक वर्ष होता. नातीचं कौतुक करायला आजोबा आजीही तसे तरुणच होते. अजयच्या सततच्या बदलणाऱ्या अधिक पगाराच्या नोकऱ्या आणि परदेशवाऱ्यांमुळे रजनी मंगेशने त्यांना वेगळे घर करू दिले नाही. नीताने पुण्यात स्थिर झाल्यावर विद्यापीठातून इंग्रजी विषयाची एम.ए. पदवी प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन संपादन केली. त्याच वर्षी औरंगाबादच्या विद्यावर्धिनी महाविद्यालयात नोकरी मिळाली. अजयचा सततचा प्रवास सुरूच होता. औरंगाबादचे शैक्षणिक वातावरण चांगले होते. ईशा आठवीत गेल्यावर दोन वर्षेआधीच रजनीने स्वेच्छेने निवृत्ती घेतली. औरंगाबादमध्ये जालना रोडला विशाल कॉम्प्लेक्समध्ये बंगलाही घेतला होता. भोवताली बदाम, चिक्कू, पपई, डाळिंबाची दोन-दोन झाडे लावली होती. जमीन चांगली. मंगेश पुण्याला नीताजवळ राही. ईशाची १०वी होईपर्यंत मंगेशने पुण्यात राहायचे ठरवले होते. पण ईशा ९वीत असतानाच डिसेंबरच्या एका गारठलेल्या रात्री फोन खणाणला.
 "आई, काल बाबा झोपेतून उठले. अजूला पाहताच कडाडले, "नीतू, तुला कितीदा सांगितलंय की हा मुलगा मला पसंत नाही. काय करतोय हा इथं. हा सारखा तुला भेटतो म्हणून सुधाचा अनुपम नाराज होऊन लंडनला निघून गेला. पण तो येईलच. रजनीला तरी कळायला हवं होतं. बोलाव तिला... आई इथल्या मेडिकल कॉलेजमध्यल्या सायकिॲट्रिस्टना दाखवलं. त्यांचा डावा हात गेल्या वर्षापासून थरथरायचा. त्यातला जोर कमी झाला होता. तेव्हा तू त्यांना डॉक्टरना दाखवून आणले होतंस. पण कालपासून ते वर्तमानकाळात यायलाच तयार नाहीत. नशीब अजय इथे आहे. तो पुण्याला येईल. ईशाजवळ चार दिवस राहील. पण येण्यापूर्वी तू ईशाला १ जानेवारीपासून तिथल्या शाळेत घालण्याच्या दृष्टीने सरस्वती भुवनच्या मुख्याध्यापकांना फोन करून सांग. नीता फोनवरून सांगत होती. ऐकतानाही रजनीने मन मोठ्या मिनतवारीने स्थिर ठेवले.
 "डॉक्टर म्हणताहेत आठ दिवस वाट पाहू. ट्रीटमेंट सुरू आहे. बाकी सर्व नॉर्मल. जेवण व्यवस्थित. तुझी वाट पाहते. ईशाला काहीच सांगितलेले नाही." नीताने फोन ठेवला.
 रजनी नूतन मराठी महाविद्यालयाच्या ईशाच्या मुख्याध्यापकांना भेटून आली. तिच्या कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधले सहकारी मदतीला आले. अजयजवळ ईशाला ठेवून ती औरंगाबादला आली. नंतर ईशा नीताबरोबर आली...
 ...एका वेगळ्या वळणावरून जाणारा हा एकाकी रस्ता. फक्त रजनीसाठीचा.
 "बरं झालं रजनी आलीस. नीताचं अजय पुराण अजून संपलेलं नाही." मंगेशने रजनी आल्यावर सुस्कारा सोडला. वर्तमानाचं भान गेल्यापासून मंगेश बाहेरच्या व्हरांड्यातल्या झोक्यावर नुसता बसून राहतो. झुलत राहतो. जेव म्हटलं की जेवणार. समोर चहा-खाणे ठेवले तर खाणार. अमुक खायला कर अशी मागणी नाही. अजय येताना मंगेशची पुस्तकं घेऊन आला. पुस्तकं चाळण्याचा नवा चाळा सुरू झाला. इतकंच.
 "...नीता मॅडम, हा अल्झायमर डिमोन्शिया आहे. हा एक प्रकारे मानसिक तणाव आहे. त्यातून ती व्यक्ती बाहेर येण्याची शक्यता जवळजवळ नसतेच. नसतेच म्हणा ना. एका विशिष्ट काळात मन अडकून बसते. वर्तमानाची दखल त्या व्यक्तीच्या मनाला नसते. मंगेश यातून बाहेर येतील ही शक्यता...आशा फेकून देऊन निरामय होऊन ममतेने त्यांची काळजी घ्या. ते संतापणार नाहीत, अस्वस्थ होणार नाहीत, याची दक्षता घ्या आणि हे तुमच्या आई,... रजनीताईच करू शकतील. कधीही मदत लागली तर निःसंकोचपणे मला फोन करा." डॉ. दिनेश देशमुखांनी नीता अजयना नीट समजावून सांगितले होते. ईशाला मात्र तिचा लाडका बाबाजोब्बा तिला ओळखत नाहीत हे जाणवून खूप वाईट वाटले होते. पण नीताने तिला नीट समजावून सांगितले. पण सतत बाबाजोब्बाच्या अवतीभवती असणारी ईशां आज्जूकडे जास्त झुकली.

* * *


 वसंती वारे वाहू लागले की नीता स्वयंपाकघरात लावलेली दिनदर्शिका खाली काढून पाही. गणगौर आली की ईशू पिलानीहून दहा बारा दिवसं इथे राहून जाई. आली की आज्जू नि बाबाजोब्बांसाठी कालाजामून, मालपोवा, मिठाई आणि दालचावलचा बेत होईच. येताना फेण्यांचे डबे येत आणि परत जाताना पुरणपोळीचा मोठ्ठा पॅक नि लसूण कांद्याचा खमंग चिवडा तिच्या मैत्रिणींसाठी घेऊन जाई. अर्थात ही गोड धांदल आज्जू आणि ममा खुशीने स्वीकारीत.

* * *


 "ममा, तुला वाटेल की यावर्षी ईशू डिग्रीवंत होईल, होय, मी बी.ई. एरोनॉटिक्स होतेय. पण ममा, मला विमानही चालवता आलं पाहिजे. जे विमान...जी अंतराळयानं आम्ही त्यातील तांत्रिक ज्ञानाच्या आधारे बनवतो ती आम्हाला चालवता आली पाहिजेत. खरे ना? आणि आमच्यासाठी तो कोर्स दोन वर्षांचा असतो. तर... प्लीज... आणि हे बघ मला आज तरी लग्नात इंटरेस्ट नाही. ममा, तू १९व्या वर्षी बाबाच्या प्रेमात पडलीस. अडकलीस मग लग्न आलंच! आज्जूपण बाबाजोब्बांच्या प्यार व्यार में फस गयी. तुमचं तेव्हाचं जग वेगळं होतं. तू आज्जूच्या खांद्यावर उभीये. नि मी तुझ्या माझं क्षितिज खूप रुंदावलंय. मला करिअर करायचंय. मी लग्न करणारच नाही असं नाही. पण तो माझ्या जगण्यातला फक्त महत्त्वाचा आणि अखेरचा टप्पा नसेल लग्न करावसं वाटलं तर नक्कीच तुम्हाला सांगेन. कोणी भेटला तरीही पारखून निरखून घ्यायला तुमचीच मदत घेईन. तर थांबते...." नीताने पत्र अजयपुढे टाकले होते. अजयने हसून 'गुड' अशी प्रतिक्रिया नोंदवली होती.
 "रजनी, हा अजा कुठे घेऊन चाललाय आपल्याला? माझी लाडली नीतू त्याच्याशी लघळपणे का बोलतेय? तिचं लग्न तर जमवायला हवं ना? हे बघ एखाद्या विवाह-योग किंवा सुमंगलसारख्या मंडळात नाव दाखल करू या. मुलगा कोणताही चालेल ब्राह्मण...मराठा. पण दुसरा नको हं...." मंगेशने रजनीजवळ मन मोकळे केले.
 "बरं बरं. आटोप. घालू हं नाव. पण आपण असे म्हातारे. मदत तर अजयचीच घ्यावी लागेल नाही" असे हसून उत्तर देत रजनीने मंगेशला सँट्रोमध्ये बसवले. मनमाडला ठरल्यानुसार सुधांशूही जॉईन झाला.
 "रजनी, गेट रिलॅक्स्ड. आता मी सांभाळतो माझ्या मित्राला....." सुधाने रजनीच्या खांद्यावर आश्वासक, अलगद थोपटून दिलासा दिला. गेल्या डिसेंबरमध्ये रजनीचे बाबा नव्वदी पार करून कायमचे विसावले होते. ते असते तर येण्यासाठी नक्की हटून बसले असते, रजनीच्या मनात आले. तिचे डोळे नकळत पाणावले.

* * *


 ईशा विमानचालकाच्या वेशात विलक्षण सतेज दिसत होती. झळझळीत गहू रंग आज्जूसारखे पाणीदार मोठे मोठे डोळे. अजयचा उंच सडसडीत बांधा आणि नीतासारखे धारदार पण किंचित अपरे नाक. विमानाकडे जाताना तिने हसून सर्वांना डोळे झुकवून प्रणाम केला नि ती विशिष्ट लयीत विमानाकडे गेली. काही काळाच्या आत सातही विमाने अवकाशात तऱ्हेतऱ्हेच्या कसरती करू लागली. छातीचा ठोका क्षणभर चुकावा अशा तऱ्हेतऱ्हेच्या भराऱ्या.
 "रजनी, विमानाचे खेळ पाहायला घेऊन आलीस मला? कधी पाहिले नाही का मी विमान? वेस्ट ऑफ एनर्जी आणि वेस्ट ऑफ टाइम." मंगेशची बडबड सुरू होती. विमानांनी यशस्वीपणे चाके जमिनीवर टेकवली. रजनी मंगेशला घेऊन घाईघाईने पुढे गेली. अजय-नीता तर धावतच पुढे गेले. ईशाचा चेहरा आनंदाने भरून आला होता. ती आज्जूला, ममाला कडाडून भेटली. बाबाला तर कळतच नव्हते लेकीला उचलून त्याने आनंद व्यक्त केला. बाबाजोब्बाला नमस्कार करण्यासाठी ती वाकली तो काही कळायच्या आत त्याच्या रजनीने त्याला जवळ ओढत सांगितले, "मंगेश, ती स्कूटरचोर मुलगी आता विमानचोर झालीय. तिला जवळ घे. तुझ्या लाडक्या नीतूची, तुझी ईशुली आहे ती!...