Jump to content

कथाली/गेंदलासु गोद भराओ जी बन्ना

विकिस्रोत कडून
गेंदलासु गोद भराओ जी बन्ना

(फुलांनी भरा माझी ओटी)

माझ्यासमोर भैयांचे पत्र आहे.

"....................
 गेल्या गुरुवारी, तीन दिवसांपूर्वी छलकन् जिजी वारली. गेल्या सहा महिन्यांपासून ती आजारीच होती. बाबूजींचा उत्तराधिकारी मी. पुढचं सारं मीच केलं. तिच्या सासरी सियालडुंग्याला निरोप दिला होता. अर्थात अग्नी द्यायला कोणीही आले नाही. आणि येणार तरी कोण होत? आज दुपारी मात्र तिच्या धाकट्या चुलत दिराचा मुलगा येऊन गेला.
 छल्लोनी तिचं सारं सोनेनाणं तुला देण्याचे लिहून ठेवलेय. आणि राहते घर माझ्यासाठी. वकील काकाजीकडे जाऊन चार वर्षांपूर्वीचं तिनं मृत्युपत्र करून ठेवलं होतं. अर्थात हे सारं मला आज कळतंय. काकाजी सकाळी येऊन गेले.
 मंजू या क्षणी तू जवळ हवी होतीस. गेल्या पस्तीस वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांची जिवाभावाची साथीदार तूच! कमलाने सारे सोपस्कार पार पाडले. पण तिच्या ओठांवरची अदृश्य मुरड आणि कपाळावरची तिरपी आढी मला सतत जाणवत होती. गेली कित्येक वर्षे मनावर वागवीत आणलेले अपराधीपणाचे ओझे

आता नाहीसे झालेय. तरीही, ते नसल्यामुळे आलेले रिकामेपण मन कापीत जाते...
 गेली बत्तीस-पस्तीस वर्षे, हे असले विचित्र आणि आरपार छिन्न करणारे रिकामपण उरावर बांधून कशी जगली असेल छल्लो?...? बहरहाल, मै मुक्तिका अहसास दिलमें बसाने का प्रयास, कर तो रहा हूँ.
 चि. अशोकजी कैसे है? चिन्मय, मृण्मय की पढाई कैसे चल रही है? अुनको शुभाशिष. यह खत किसीको दिखाओगी नही...
 सोन्यानाण्याचा उपयोग तू योग्य रीतीने करशील असा विश्वास छल्लोने व्यक्त केलाय.
 शेष मंगल.

भवदीय,

मनहरभैया.

 मनहरभैयांचे पत्र वाचताना माझे मन थेट माणिकनगरला जाऊन पोचले...माझ्यासमोर होती निचेष्ट छलकन् जिजी. रामनामाच्या भगव्या चादरीने झाकलेली. दोन बाँकदार भिवयांच्या मधोमध रेखलेला चंदनाचा टिळा ती इतका रेखून लावी की, बघणाऱ्याला वाटे कुंकुम तिलकच रेखलाय. आणि तिचे लांबसडक पापण्यांची मोहोरेदार किनार असलेले जांभुळरंगी डोळे? ते आता मिटलेले आहेत. चेहऱ्यावर आठी कधी नसायचीच. पण आता मनावरच्या,चुण्याही नाहीशा झाल्या आहेत....
 तिचे ते रूप पाहता पाहता लक्षात आले की मी मणीनगरमध्ये नाही, तर औरंगाबादेत आहे.
 माझे बाबूजी मणीनगरचे वतनदार वकील. आता मणीनगर कुठे वसलेय हेही सांगायला हवे. बुंदेलखंडांचे नाव नक्कीच ऐकलं असेल तुम्ही. ऐकलेय ना? जबलपूरवरून थेट पूर्वेला जाणाऱ्या रस्त्यावरून चाळीस एक मैल गेलात की मणिपूर लागते. म्हणजे आधी एक भुईकोट किल्ला लागतो. ते मणीगढ आणि भोवताली वसलेय ते मणीनगर, गाव तसे लहानसेच. भोळ्याभाबड्या चेहऱ्यांचे. भोवतालच्या चाळीसपन्नास खेड्यावस्त्यांना या गावाचा आधार आहे. दर मंगळवारी बाजार भरतो. वर्षातून दोन वेळा जत्रा. एक शीतलामाईची, चैत्री सप्तमीला भरणारी दुसरी मार्गेसरीतली अंबामातेची. शिवाय गढावर... भाद्रपदी तिजेला जलवॉमाईचा मेळा भरतो. त्या दिवसांत घराघरांतल्या सुवासिनी, घरातला काशाचा लोटा घेऊन गढावर जाणारच. आणि तिथल्या सतीबावडीचे पाणी...डोक्यावरून वाजत गाजत घोळक्याने गावात आणणार. पाणी घरभर शिंपडून उरलेलं घरातल्या विहिरीत टाकणार. या मेळ्यात रहाटपाळणे, नवटंकी, सिनेमा येई. मेंढ्याचा बाजार भरे. राजस्थान लखनौपासून व्यापारी खरेदीसाठी येत आणि म्हणूनच बाबूजींनी थोडे प्रयत्न केले आणि मणिपूरला तहसील आली, कोर्ट आले. आणि आता ऐकतेय की सरगुजा जिल्ह्याचे दोन भाग होऊन मणीनगर जिल्हा होतोय.
 तर असे हे आमचे मणीनगर. मणीनगरच्या महाराजावंशजांची काही घरं सोडली तर, सुधारीत वतनदाराचे घर आमचेच. आमचे पडदादाजी. म्हणजे पणजोबा मूळचे राजस्थानचे. बस्सी तालुक्यातल्या लहान गावात त्यांचे घर होते. परंतु घरच्या हलाखीमुळे ते जयपूरच्या एका जवाहिऱ्याकडे राहिले. पुढे मुनीम म्हणून त्यांची बढती झाली. ते एकदा खड्यांच्या खरेदीसाठी मद्रासला गेले होते. मणीगढच्या महाराजांची आणि त्यांची पहिली भेट तिथेच झाली. महाराज इंग्रज साहेबाला भेटायला मद्रासला गेले होते. तिथे त्यांचा झाला अपमान. त्या घावाने ते आजारी पडले. तापाने तुफान फणफणले. बरोबरीची माणसं, म्हाताऱ्या महाराजांजवळचे पैसे जवाहीर घेऊन पळाली. रात्री पणजोबांना शेजारच्या खोलीतून कशाचा तरी आवाज ऐकू आला. आवाजाचा वेध घेऊन पाहिले तर एक वृद्ध गृहस्थ तापाने फणफणून कोपऱ्यात कण्हताहेत. पणजोबांनी वैद्य बोलावून औषधपाणी दिले. मणिगढावरच्या राजवाड्यात काळजीपूर्वक सोडले. तेव्हापासूनचा ऋणानुबंध. महाराजांनी पणजोबांना मणीनगरला आणलं. नर्मदेकाठची शंभर एकर जमीन, दोन वाडे आणि साहुकार ही पदवी दिली. आमचे मूळ आडनाव भार्गव: पण तेव्हापासून आम्ही 'साहुजी' झालो.
 माझे दादाजी मणीनगरचे दिवाण म्हणून काम पाहत. ते विद्येचे भोक्ते होते. इंग्रजी शिकवण्यासाठी एक इंग्रजी शिपाई त्यांनी मेहनताना देऊन वर्षभर ठेवून घेतला. संस्कृतचा दांडगा अभ्यास होता. माझ्या पणजोबांमुळे त्यांना संधी मिळाली. माझ्या बाबुजींना तर त्यांनी शिक्षणासाठी बनारसला ठेवले. तिथे बाबुजी काँग्रेसी मेळाव्यात पूर्णपणे सामील झाले. शिक्षण संपवून परतताना चरखा, खादी, साधी राहणी बरोबर घेऊन आले. आमच्या बाईचा... माताजींचा धुंगटही दूर झाला. अर्थात जबरदस्तीच करावी लागली असणार.
 तर असं आमचं घर. ३५/४० वर्षांपूर्वी गावातील प्रत्येकजण एकमेकांना ओळखीत असे. गावाच्या उत्तरेला आदिवासींचे पाडे होते. गावात ठाकूर, जाट, राजपुतांची संख्या मोठी. चार दोन जैनांची, चार पाच वाण्याची..... मारवाड्याची घरं. दहाबारां ब्राह्मणांची. चमार आळी, नाई गल्ली वेगळी होती. शिवाय गावच्या शिवेलगत कुंभार, लोहार, सुताराची चारदोन घरं. शिवाय लखीरही असे. बहुतेक घराना पुढे अंगण, ओटा. मध्ये अंगण त्याच्या पल्याड राहण्यासाठी खोल्या. घराच्या आतलं जग कोणाला दिसू नये म्हणून जाड चवाळ्याचा पडदा....पोत्याच्या कापडाचा पडदा ओसरीतून आत जायच्या दरवाजाला टांगलेला असे! भल्या घरच्या सासुरवाशिणी वर्षातून जेमतेम दोनचार वेळा घराबाहेर पडणार. दिवाळीच्या 'रामराम'साठी नाही तर बड्डी तिजेच्या वेळी झोके खेळण्यासाठी. बाहेर पडायचे ते पूर्ण चेहरा झाकेल एवढा लांब घुगट घेऊन. तिजेच झोके खेळायला बैदनाथ ठाकुराच्या आमराईत शंभर दीडशे बाई जमा होई. ठाकुराच्या बड्या बिन्नीनी... मोठ्या बायकोने तिथे फरशीचे अंगण करून घेतले होते. पत्र्याची एक खोली बांधली होती. तिथे महिला चिरम्यांचा खेळ खेळीत. चिरम्या म्हणजे लाल गुंजा लालचुटूक गुंजा वाळूच्या ढिगाऱ्यात लपवून कौशल्याने त्याचे जेवढ्या महिला तेवढे भाग करीत. एकेकजण त्यातला भाग मागून घेई. त्यात लपविलेल्या गुंजा तिच्या मालकीच्या होत. सात सात, आठ आठ गट चिरम्या खेळायला बसत. परतताना बड्या घरची बहू कफल्लक होऊन घरी परत जाई. तर गरिबावरची बिन्नी गुंजांचा मोठा साठा पदरात बांधून घर गाठे. दिवसभर गावातल्या बाया या आमराईत झोके नि चिरम्या खेळताना भवरुनाईच्या दोघी म्हाताऱ्या, धन्नू शर्माची आई बडीनानी येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषमाणसाना हाकारून सांगत.
 "ईय्या मती आ रे ऽऽ. लुगाया हिंडोला झुलत हैss"
 आमचे घर, बडी कोठी गावाच्या सुरुवातीलाच आहे. बारा खोल्यांची दुमजली कोठी. तिथून मारवाडी गल्ली सुरू होते. शेजारी पाचसहा घरे चुलत्या मालत्यांची आहेत. त्यांच्या बापदादांना आमच्या पणजोबांनी मणीनगरला आणले. समोरची घरे आहेत हलवायांची. धन्नू शर्माचे मिठाईचे दुकान पंचक्रोशीत मशहूर आहे. गुलाबजामून, गरम जिलेबी, रसगुल्ला, काजूकतली आणि रतलामी शेव खावी धन्नू चाचाच्या हातची. घरातले चारही भाऊ दुकानात खपतात. त्यांच्या बायकाही मदत करतात. मंझली काकीच्या लग्नात दहेजसोबत नऊ वर्षांची छलकन् इथे आली. ती कायमचीच.
 'छल्लो जिजींचे खरे नाव तिलासुद्धा याद नव्हते. बहुधा छटाकी असावे. हो, छटाकीच. मंझली काकी खूप वैतागायची तेव्हा, "ए छलकन् छटाकी, कटनं मरी अेSS" असे ओरडत असे. छल्लोजिजी मंझल्याकाकीच्या मामाची पोर..काकीच्या आईने आपल्या मेलेल्या भावाच्या एकुलत्या एक पोरीला कापसाच्या बोळ्याने दूध पाजवून जगवले. जन्मायच्या आधी चार महिने तिचा बाप खर्चला. आठ दिवसांची असताना बाळंतपणाने माय मेली. आपल्या भावाची लेक खात्यापित्या घरात जावी या हेतूने काकीच्या आईने छलकन् चे लग्न सियालडुंग्याच्या लंगड्या मुलाशी करून दिले. ते अधू पोर दोन वर्षांत पार खर्चले आणि छलकन् वयाच्या आठव्या वर्षी रांड होऊन... विधवा होऊन भुवाजीच्या घरी परतली. मंझलीकाकी एकुलती एक. तिच्या लग्नाआधीच तिची आई, छल्लोची आत्याबाई कॉलऱ्याने मरून गेली आणि मंझली काकीच्या लग्नात दहेजसोबत नऊ वर्षाची छलकन् मणीनगरला आली.
 काकीच्या घरातली सारी कामे छल्लोजिजी करी. काकी घोडनवरी होती म्हणे. लग्नात पंधरा वर्षांची म्हणजे त्या वेळची घोडनवरीच. शिवाय काळी: किंचित दात पुढे आलेले. पण सोबत दागदागिने, वीस एकराचा जमिनीचा तुकडा घेऊन आलेली आणि कामात चंचल असलेली छल्लोही बरोबर.
 छल्लो... कोवळ्या नारळाच्या खोबऱ्यासारखा दुधाळ रेशमी रंग. लाल ठिपका काढावा अशी लालचुटूक जिवणी. अपरं नाक बाँकदार भिवया. दाट पापण्यांची झालर असलेले जांभुळरंगी डोळे बाहुलीसारखा ठुसका बांधा. पायातले चाळ झुमकावीत इकडे तिकडे वावरणारी. दुकानात मिठाईचे पुडे झटपट बांधून देणारी. गोड हसणारी छलकन् कुणालाही आवडे.
 'आमचं घर सुधारकाचं. घरात इतरांच्या तुलनेने सोवळे ओवळे बेताचे होते. मोठमोठ्या राजकारण्यांची नेहमीच उठबस असे. घरात पुस्तकांच्या चवडी रचलेल्या असत. धन्नूचाचाच्या घरीही छलकन् ची तोलतोल होई. धन्नूचाचा आठवडी बाजाराला जाई किंवा खरेदीला जाई तेव्हा छल्लो गल्ल्यावर बिनधास्त बसत असे. हिशेबात हुशार झाली होती. मिठाई तयार करण्याची खास गुपितं तिने चाचाकडून हस्तगत केली होती. कालाजामून, मालपोवा, आलुचाट खावी तिच्याच हातची.
 मी तेरा-चवदाची असेन. मला बाबूजींनी जयपूरजवळच्या बनस्थळी महिला विद्यापीठात शिक्षणासाठी पाठवले. आठवीत गेले होते मी. पण तोपर्यंतच्या आणि नंतरही सुटीत मणिनगरला यायची तेव्हाच्या प्रत्येक आठवणीत छल्लोजीजी आहेच. ती मला गुडियाँ म्हणायची. मला नटवण्या सजवण्याचा केवढा शौक...नाद तिला! रंगीबेरंगी बुंदक्यांची महिरप माझ्या कपाळावर रेखून मधोमध सुरेख उभी कोयरी रेखण्याचा तिचा नेहमीचाच छंद. मला नवरी... बन्नी बनवून माझ्या चेहऱ्याकडे एकटक पाहत ती विवाहात गायची बन्नाबन्नीची, वारणा घेण्याची गाणी गुणगुणत राहील. तिच्या स्वच्छ आणि सुरेख कपाळावर मी, बिंदी... कुंकुम टिकली कधीच पाहिली नाही. एक प्रसंग मला छान आंठवतोय. माझ्या कपाळावर कुयरी रेखता रेखता तिने स्वतःच्या भाळावर उभा तिल्लक रेखला आणि धावत मंझजी काकीसमोर उभी राहून विचारू लागली.
 "ए बड्डी, देख तो ए! म्हानं तिल्लक ओपं कॉई?... मला हा तिलक शोभतो काग?"
 तिचा तो झगमगणारा लोभस चेहरा पाहून विजेचा झटका बसावा तशी मझलीकाकी पुढे आली आणि तो तिलक फरांटून काढला आणि स्वतःचे कपाळ बड़वीत रडू लागली.
 "अरी एऽऽ 'रांड! बडेराबुढा देख्या तो...? तुला नि मला दोघींना घराबाहेर काढतील. धून काढ ते थोबाड. पांढऱ्या पायाची रांड. माझ्या उरावर ओझं घालून सगळी मरून गेली. आता मलाबी खां."
 "अजून तर शहाणी व्हायचीय. द्येवानं रूप भरभरून ओतलंय, पण नशीब? परमेश्वरा ही वयात येण्याअगोदर मला तरी ने, नाही तर हिला तरी ने...!!"
 मंझली काकी छल्लोजिंजीला पोटाशी धरून रडत होती. तेव्हा मी असेन पाचसहाची तर छल्लो बारा-तेराची.
 आणि एक दिवस छल्लोजिजी आलीच नाही. मी न राहवून धन्नोचाचाकडे गेले. तेव्हा कळले की तिला शिवायचे नाही. "गुडियाँ थारी जिजी छिणाकी हुई है. बडी... सयानी हुई है. चार दिवसांनी येईल तुझ्याकडे ये. मी देऊका टिकीबिंदी लावून? ...आणि हे बघ, आता छल्लोजिजीकडून बिंदीटिकी लावत जाऊ नकोस. ऐकलस ना गुडियाँ." मंझलीकाकीने मला गोड बोलून बजावले होते.
 छल्लोजिजी तर मोठी झालीच, पण मीही खूप शहाणी झाल्यासारखे वाटले मला. मी घरी येऊन माताजींना सांगितले. त्यांनी मला खूपखूप जवळ ओढले. दीर्घ उसासा टाकला आणि त्या म्हणाल्या, "राधा, छलकन् बरोबर खेळणं....हुंदडणं बंद करा आता. घरात तुझे बाबूजी, मनहरभैया, येणारी जाणारी पुरुष माणसं सारखी वावरत असतात. तरण्याताठ्या आणि देखण्या विधवेनं उघड्या तोंडानं हिंडणं बरं नाही बाई. गुडिया, जग फार वाईट असत ग..."
 पाच दिवसांनी छल्लोजिजी घरी आली. अंगभरून साडी. माथ्यावर पदर. डोक्यावरून न्हाली असावी. जणू चांदण्यांच्या रसात नाहून आली असावी. आली ती थेट रसोईघरापाशी. दरवाज्याबाहेरच कितीतरी वेळी पायाखालचं सारवण, अंगठ्याच्या नखाने कुरतडीत मुक्याने उभी होती... मला अगदी स्वच्छ आठवतेय ती दुपार. माजघराच्या शेजारच्या खोलीत मनहरभैया डोळ्यासमोर पुस्तक घेऊन एकटक तिच्याकडे पाहत होते. ते तिच्याकडे पाहताहेत याची जाणीव तिलाही नव्हती अन् भैयानापण नव्हती.. काही नवे, आगळे अचानक दृष्टीस पडावें अशी भैयांची चकित नजर. मला आजही सारेकाही हुबेहूब आठवतेय. माताजी.मात्र खूप धास्तावल्या असाव्यात. त्यांना सगळे वास.आधीच येत असत. खूपशा कोरड्या आणि कडक आवाजात त्यांनी छल्लोजिजीला बजावले होते.
 "लुगाईरी जात... त्यातून रांडमुंड बाई. आता खिदिखिदी हसणं, हुंदडणं बंद करा. तुझ्या बड्डीला जमिनीत तोंड खुपसावं लागेल असं वागू नका. घरातच राहावे. मदत करावी... जा बाई जा. उद्या माझी गुडियाही सयानी होईल. ...हा जन्म तर गेला फुकट. नीट वागली व्हायलीस तर पुढच्या जन्मी, सुहागन राहून मरण येईल. जा बेटा.."
 माताजींची नाराजी असली तरी मी छलकन् जिजीला बोलवीतच राहिले. आणि तीही येत राहिली. माझ्याकडून तिच्या गुडियाकडून ती लिहायावाचायला शिकली होती. मनहरभैयाकडून नवी पुस्तके घेऊन वाचण्याचा नाद.तिला लागला. मी सातवी उत्तीर्ण झाले. भैया मॅट्रिक झाले. ते पुढील शिक्षणासाठी बनारसला गेले तर माझी पाठवणी वनस्थळी विद्यापीठाच्या परिसरातील शाळेत झाली. मी सुट्टीत घरी आले की छल्लोजिजी धावतपळत भेटायला येई. माझ्या अवतीभवती असे.
 छल्लोजिजींचे रूप वरचेवर निरखत चालले होते. तिच्या बाकदार भिवयांचा बाँक आणखीनच झोकदार बनला. डोळ्यांचे काजळकाठ पाणीदार झाले. साध्या चालण्यातही लय आली. मी तिला छलकन् जिजी कधी म्हणायला लागले ते कळलेच नाही. तिचे निराळेपण तिला जाणवत असे. तिचे हसणे दिलखुलास आणि जरा जास्तच ठासून होऊ लागले. धन्नूचाचांचे दुकान वाढले. ते परगावी गेले की गल्ला छलकन् सांभाळे. तिल्लक, सगाई, ब्यावसावाच्या समारंभात रसोईवर देखरेख करायला छलकन् जिजीच लागे. लग्नकार्यातले सारे रीतीरिवाज तिला इत्थंभूत माहीत असत. कुण्या माहेरवाशिणीची सासरी पाठवणी करायची असेल, तर बुंदीचे लाडू बांधायला जिजीच लागे.
 "मंगलीकी बाई, थे पाच सवासण्या पेला लड्डू" जल्दी बांधो भला. बाकी मै सब निपटर लूँ... पाच सवाष्णींनी पाच लाडू बांधल्यावर बाकीचे सारे आवरीन मी. तुम्हाला इतर कामंही पाहता येतील." असे म्हणत भल्या मोठ्या पितळी परातीत बांधेसूद लाडवांची चळत ती रचून टाकी.
 बायका लग्नाची कामे मुक्याने करू लागल्या किंवा भाजी निवडू लागल्या की ही हटकून म्हणणार यान काई जी. बधावाके गीत तो गाओ. मुक्यानं लग्नाची कामं करतात काहो भाभी? ओठातून गाणी येतात तसे हातही भराभरा चालतात.."आणि मग ती स्वतःच गुणगुणायला लागणार!
 आमच्या चुलत्याच्या घरी लग्न होतं. रात्रीची जेवणीखाणी आटोपली की रोज नवरीला नटवून चौरंगावर बसवीत. नवरीच्या भावी जीवनाची, तिच्या होणाऱ्या पतीराजाच्या प्रेमाची, सासरच्या लोकांच्या खोड्या काढणारी गीतं बायका गात आणि शेवटी तिची नजर उतरवण्याची गाणी गायली जात. त्याला 'वारणा का गीत' म्हणतात. छलकन् जिजीला तऱ्हेतऱ्हेची गाणी येत. बुंदेलखंडी गाणी मोठी नखरेदार! तिच्या गाण्यातली नवेलीबहू माहेरी आल्यावर आपल्या सख्यांना सासरी केलेला पराक्रम सांगत असते. त्यात सासऱ्याच्या हातभर मिश्या कशा कापल्याच्या नाही तर भांडखोर जावेला पेटीत कोंबल्याच्या बाता असत पण छल्लोजिजीचे खास आवडते, अगदी लाडके गाणे वेगळेच होते.
 ...त्या गाण्यातली नाजूक बहुराणी आपल्या पतीराजांना लाडिकपणे सूचना देत असते... उन्हाळ्याच्या कहरात लगीन केलंत..निदान आता खसाचा पंखा मागवा आणि मगच रसदार बनीच्या सहवासाचा आनंद लुटा आणि हे पाहा, पावसाळ्यात माहेरी पोचवा नि उन्हाळ्यात आजोळी. थंडीत मात्र तुमच्याच जवळ... सासरी ठेवा हं !

'ऋत गर्मी में ब्याव रचायो।
खस का पंखा ल्याओ जी बन्ना।
खस का पंखा रसरी बिनणी।।
गेंदलासु गोद भराओ जी बन्ना ।

* * *

'...सियालामे सासरों, चौमासामें बायरो,
उनालामें नानेरों, पुगाओ जी बन्ना।'

 छलकन् जिजी गाणे म्हणत असे तर भंवरुनाईची मोठी बायको ढोलक वाजवी. ते वाजवता वाजवता जमलेल्या बायका अभिनय करीत. एक बने नवरा, तर दुसरी नवरी. मग छलकन् जिजी नटखट 'बन्नी' बनून जाई. शेवटी हसता हसता जिजीचे डोळे भरुन येत. अवघे रसदार गाणे छल्लोजिजीच्या डोळ्यांतून वाहू लागे.
 "जिजी उन्हाळ्यात आजोळी, पावसाळ्यात वडिलांच्या घरी पोचवा आणि थंडीच्या कडाक्यात मात्र सासरी राहू द्या, असे का ग म्हणते ग ती बन्नी?" मी प्रश्न विचारला होता. माझ्या गालावर चापट मारीत जिजीने सांगितले होते. "उन्हाळ्यात आंबे खायला आजोळी जायचे तर पावसाळ्यात सणांसाठी माहेर हवे. तिथे मनसोक्त हुंदडता येतं. मेंदी रचता येते आणि थंडीचा काटा घालवायचे तर सासरच हवं. खूपखूप काम केलं की थंडी पळून जाते गुडिया" असे म्हणताना डोळे मिचकावीत ती हसली होती. पण तरीही डोळे भरून आले होते.
 तसे पाहिजे तर छलकन् जिजी आमच्या गावची माहेरवाशीणच की. पुरुषांच्यात वावरायला तिला अटकाव नसे. छल्लोच्या कामसूपणामुळे आणि हाताच्या चवीमुळे धन्नूचाचाचे दुकान वाढले. सियालडुंग्यालाही एक दुकान टाकले. तिथले दुकान तो नि त्याचा मुलगा पाही. छलकन् जिजीमुळे लग्नकार्याची कामे मिळत. पैसा कुणाला नको असतो. तिचे गल्ल्यावर बसणे, सर्वांशी हसून बोलणे चाचाला चालत असे. मंझलीकाकी सुरुवातीला धुसफूस करी, पण तिच्याकडे लक्ष कोण देणार?
 अलीकडे मीही जग निरखायला शिकले होते. माझ्या लक्षात आले होते की जिजी तिच्या दोन बाकदार भिवईच्या मधोमध रक्तचंदनाचा टिका रेखते आणि खाली भस्माची पांढरी रेघ. मी सुट्टीत घरी आली की जिजी घरी येई. माताजींना तिचे येणे मुळीच रुचत नसे. ती घरी गेली की तिच्या माघारी कूरकूर करीत. उठवळ झालीय. तरणे पुरुष असोत की म्हातारे ही वचावचा बोलते. आजकाल तर काहीही घडायला लागलेय. तिची गाऱ्हाणी त्या मला सांगत.
 "गुडिया, तुझ्या बाबूजींनी माझा घुंगट काढून टाकला तर केवढी रडले मी. माहेरी भावजयांनी... तुझ्या मामीजींना कमी का टोमणे मारले? घुंगट असताना चार घरी जाता येई. घुंगट निघाला आणि उघड्या तोंडाने रस्त्याने कशी जाऊ या लाजेनं बाहेर जाणंही सोडलं मी..."
 तुझ्या वयाची होते तेव्हा मनहर झाला होता मला.
 ...तुमच्या बाबूजीचे लाड उद्या भोवणारेत मला. त्या विधवेच्या नादी नको लागूस बाई इत्यादी अनेक... आमचे बाबूजी छलकनशी फारसे बोलत नसले, तरी त्यांच्या मनात तिच्याविषयी सहानुभूती नक्की असावी. माताजी अशी टकटक करू लागल्या की ते हसत आणि म्हणत, "तुझी माँ निव्वळ भोळी आहे. तिला धास्ती वाटते त्या पोरीची. बिचारी नकळत्या वयातच विधवा झाली. आज हसाया बागडायचं वय आहे तिचं. विधवा झाली त्यात तिचा काय दोष? आपल्या राधाशी... गुडियाशी चार शब्द बोलल्याने तिला आनंद मिळत असेल तर मिळू द्यावा तो आनंद..."
 छलकन् माझ्याकडे आली की मनहरभैया मात्र आमच्या आसपासच कुठेतरी असे. देवदास, नौका डुबी, कफन, गोदान, श्रीकांत असली पुस्तकं नेमकी तिला दिसतील अशी ठेवी. अर्थात ती नेमकी पुस्तकं छल्लोजिजी वाचायला हमखास घेऊन जाई. भैया 'लॉ'च्या पहिल्या वर्षाला होता तेव्हाची गोष्ट आदल्या दिवशी तिने शरदबाबूंची श्रीकांत कादंबरी वाचायला नेली होती. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपार विलक्षण तापलेली असायची. अशाच एका तापलेल्या दुपारी बाहेर गलका ऐकू आला. मधली काकी रडतभेकत घरात आली आणि सांगू लागली, "छल्लोनं बावडीत उडी घेतलीय. बाहेर येत नाही म्हणतेय, सगळा मोहल्ला जमा झालाय..."
 मी आणि मनहरभैया धावतच विहिरीकडे गेलो. खोल विहिरीत गळाभर पाण्यात छलकन् उभी होती. धन्नोकाकाने गळ खाली सोडला होता. तिला तो गळाला पकडून वर ये म्हणून विनवीत होता. पण ठेचलेल्या अंगाने पाण्यात उभी असलेली छल्लों त्याच्याकडे लक्ष न देता शांतपणे उभी होती. मी गेले आणि छल्लोला हाक मारली. तशी तिने ओरडून सांगितले.
 "गुडियाँ, भवरुनाईचा लेक मला छिनाल म्हणाला. आज तो, उद्या आणखी कोणी, परवा तिसरा कोणी, मला माय नाही, बाप नाही, नवरा नाही. नकळत्या वयात सगळेजण मरून गेले. धन्नूकाका आणि बडी, मी चार पैसे कमावते म्हणून तोंडानं बोलत नाहीत. पण त्यांनाही वाटतं की ही रांड छिनाल आहे. मी कुणासाठी जगू? मी इथेच मरणार आहे. मला कोणी बोलवू नका. मरू द्या एकटीला. पुढच्या जन्मी असेच मरण मागणार आहे मी देवाला."
 मनहरभैयाला राहवलं नाही. तो पुढे येऊन विहिरीत वाकत ओरडला. "छल्लो बाहेर ये. तू एकटी नाहीस." त्याचे शब्द तोडीत छल्लो आतून ओरडली. "बाबूजीने बुलार लाओ भाईसाब. नाही तो म्हनं मरवा देओ..."
 हा सगळा गोंधळ कचेरीत बाबूजींपर्यंत गेला होता. ते काम अर्ध टाकून विहिरीपाशी काठाशी उभे राहून त्यांनी हाक मारली. "छल्लो... बिटियाँ बाहेर ये. कोण म्हणतं तुला भाऊ, बाप नाही? या सगळ्यांना साक्षी ठेवून मी तुला सांगतो की तू माझी बिटियाँ आहेस. गावातली कुणीही व्यक्ती तुला वाकडा बोल लावणार नाही. माझं... तुझ्या बापाचं ऐक. तू बाहेर ये."
 ओल्यागच्च कपड्यात कुडकुडणारी छलकन्. अंगभर खरचटून रक्ताळलेले. ती वर आली आणि बाबूजींच्या छातीवर डोकं ठेवून ऊर फोडून रडली. रडता रडता अचानक थांबली आणि घरात निघून गेली. घरी जाऊन माताजींना सगळी हकीगत सांगतो आहोत तोच कोरडी साडी नेसून छलकन् आली. तिच्या हातात राखी होती. पुढे होत तिने ती राखी मन्नू भैयाच्या हातावर बांधली.
 "बाबूजींनी बेटी मानलंय मला. मनहरभैया गुडियाॅंसारखीच माझ्यावरही तुमच्या मायेची चुंदडी पसरून टाका."
 बोलता बोलता तिचा गळा दाटून आला. कधी नव्हे ते माताजींनी छलकन् ला अगदी जवळ ओढून घेतले. तिच्या डोक्यावरून हात फिरवीत, डोळ्यातले पाणी पुशीत माताजींनी भैयाला बजावले,
 "मन्नाबेटा, गुडियाँला दूर कर एकवेळ, पण या धर्मबहिणीला कधीही अंतर देऊ नकोस."
 त्यानंतर छल्लो हक्कानं येत राहिली. माताजींनाही आधार मिळाला. घरातल्या प्रत्येक जबाबदारीचे ओझे तिने आपणहून अंगावर घेतले. माझ्या लग्नात बन्नाबन्नी गाण्याची तिची हौस मात्र अपुरीच राहिली.
 बाबूजींना राजकारणात रस होताच. ते नेहमीच निवडणुका लढवीत राहिले. जिंकतही गेले. मी बनस्थलीतून पदवी घेतली. त्याचवर्षी त्यांना खासदारकीचं तिकीट मिळालं. मीही बनस्थलीच्या महिलामय वातावरणाला कंटाळले होते. बाबूजी दिल्लीला जाताच त्यांनी मलाही बोलावून घेतले. नेहरू विद्यापीठात अर्थशास्त्राची उच्च पदवी घेण्यासाठी मला संधी मिळाली. दिल्लीतच अशोकही भेटला. पत्रकारितेची उच्च पदवी घेण्यासाठी तोही वडिलांकडे आला होता. माझे सासरेही खासदार होते. आमच्या लग्नाला तसा विरोध झाला नाही. दादा माईंचं मराठी घर खूपच दिलखुलास आणि मनमोकळं होतं. ते मला अशोक इतकंच भावलं. माताजींना हा विवाह पसंत नसावा. पण त्यांनी ते कधी बोलून दाखवलं नाही. माझं लग्न झाल्यावर मनहरलाही लग्न थांबवून ठेवण्यास सबब मिळेना. त्याने लग्नाचे सर्व हक्क माताजींना देऊन टाकले. बाबूजींनीही माताजींना मनाप्रमाणे सोपस्कार करू दिले. माझ्या लग्नात अपुऱ्या राहिलेल्या हौशी त्यांनी मनहरच्या लग्नात पुरवून घेतल्या. छल्लोजिजी भरीला होतीच. दोघींनी अख्खं गाव गोळा केलं.
 आमच्याकडे लग्नात स्त्रिया वरातीबरोबर जात नाहीत. वरात माघारी आली. मनहरभैया देखण्या कमलाला घेऊन घरी आले. मी नावापुरती करवली होते. बाकी धावपळ छल्लोचीच, नवी भाभी घरात येण्यापूर्वी तिने वाटेत ताटल्या, थाळे पसरून ठेवले. त्या पराती अगदी अल्लादपणे, आवाज न करता कमलानं गोळा केल्या आणि माताजींच्या कानात छल्लोजिजी पुटपुटली.
 "बाई, देख बिनणी किती शांत आहे, जरासुद्धा आवाज झाला नाही थाळ्यांचा, तुझ्याशी मुळीच भांडणार नाही."
 बाबूजींच्या शिकवणुकीमुळे आम्ही मुलं आईला माताजीच म्हणत असू, पण छल्लो मात्र लाडाने परंपरागत पद्धतीचं 'बाई' असंच म्हणे. आणि त्यांनाही ते फार आवडे.
 कमला घरात आली. देवकाच्या खोलीत रुखवत मांडले होते. तिथेच छल्लोनं माझ्याकडून पलंग सजवून घेतला. सूचना तिच्या, हात फक्त माझे. कमलाच्या हातावर मेंदी चढविन्याचा रुसूम... विधी करून ती तिला भैयाकडे सोडून परत आली.
 रिवाजानुसार सगळ्याजणी तुळशी वृंदावनाजवळच्या चौकात बधाईची गाणी, बन्नाबन्नी गीतं मध्यरात्र उलटून जाईपर्यंत गात होत्या. छल्लोजिजी तिचं आवडतं गाण गात होती. पण भवरुनाईच्या बायकोची ढोलकीची साथ नव्हती. तिचा हात थांबला होता.

'ऋत गर्मी में ब्याव रचायो।
खस का पंखाल्याओ जी बन्ना।
खस का पंखा रसरी बिनणी।
गेंदलासु गोद भराओ जी बन्ना।'

 मनहरभैयासाठी खसाच्या अत्तरासारखी सुगंधी... देखणी रसभरी 'बिन्नी' मिळाली होती. तिची ओटी... गोद फुलाफळांनी फुलून जाणार होती. पण छल्लोजिजीची! जिजीची ओटी मात्र रिकामीच राहिली होती. छल्लोचा आवाज किती करुण वाटला त्या दिवशी. खरंच करुण बनला होता की माझ्याच मनाची कल्पना.
 आणि वर्षावर वर्षे निघून गेली. ती कुठे कुणासाठी थांबतात? मनोहरला दोनही मुलीच. आणि मला दोनही मुलगे. माझ्या मुलांना खेळवतानाही माताजी अतृप्तच राहिल्या. आणि एक दिवस ती उदासी बरोबर घेऊन निघून गेल्या. बाबूजी मात्र नेहमीच खूश होते. ते असतानाच मनहरभैया आमदार झाले होते. अशोकही जिल्हाधिकारी झाला होता. बाबूजी ही एक दिवस गेले. आणि आता छल्लोजिजीही गेली.
 मनहरभैयाच्या पत्राला उत्तर काय लिहू मी? छल्लोजिजीचं मरण मला आणि मनहरभैय्याला किती सोलून गेलं हे अशोकला तरी कळणार आहे का? की पत्रच नको लिहू? शेवटी मी हातात पेन घेते आणि लिहून टाकते.
 "छल्लोजिजीच्या दुःखद निधनाची बातमी कळली. तुम्हा सर्वांच्या आणि तिच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
 ईश्वर मृतात्म्यास शांती देवो..."