कथाली/यती आणि सती

विकिस्रोत कडून
यती आणि सती

 "आजारी मानसाच्या डोक्याच्या मागं कसलं की मशिन बशिवतात. टीव्ही सारखं दिसनारं. त्यावरचं डोंगरदरीसारख्या दिसणाऱ्या रेषांचं भिरंभिरं, सारखं पुढे पळत असतं. मोठ्या मंगलाक्काच्या सासऱ्याला लातूरच्या दवाखान्यात पाहाया गेलो तवा बघितलं होतं ते मशिन. त्यावरचं नागमोडी भिरभिरं, पुढे पळायचं थांबलं नि बाजूच्या डागदरांनी इवायाच्या नाकातोंडातल्या नळ्या काढल्या.
 तसलंच मशिन माझ्याबी डोक्यामागं बशिवलंय असं मुकिंदाची धाकटी सांगत होती. मला तर काईच झालेलं नाही. मग कशापायी हवं हये? उगं छातीत कसनुसं झालं होतं परवा. तेवढंच! लगीलगी माझ्याजवळ राहणारी रमेशची आरती मुकिंदाच्या घरी पळाली. मुकिंदाच्या बायकूनं ऐकलंच न्हाई. अज्याच्या डागदर मित्राला फोन केला. नि हितं आणून घातलं. मुकिंदाबी उदगिराहून लवकर आला.
 डोळे लई थकल्याता. मिटूमिटू आल्याता" जिजीच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील चित्रे भिरभिरू लागली. जिजींचा डोळा लागला आहेसे पाहून सुशीला उठली. सासूच्या डोक्यावरून हळुवारपणे हात फिरवला. जिजींच्या कपाळावरचे ठसठशीत गोल कुंकू रेखताना तिची धांदल उडाली होती आज. कपाळावर मेणाचं बोट फिरवून मग त्यात लालचुटुक पिंजर भरायची. कुंकू कसे गोल गरगरीत नि कडेनी रेखीव हवे. जिजींच्या गोल गरगरीत चपातीसारखे देखणे. तिने जिजींसमोर आरसा धरला. सुरेखपणे रेखलेला मळवट पाहून जिजी सुखावल्या. आणि सुनेचा हात मायेने दाबीत म्हणाल्या होत्या,
 "झ्याक जमलं गं, पन कुंकवाचे धनी तीन दिवसांत फिरकले न्हाईत गं? कळविलं असंल की, डोंगरातल्या पाथरीच्या साळंत हायेत की रस्त्यावरल्या काळापुरीच्या साळंत?" बोलता बोलता त्यांनी तुळशीची माळ चाचपीत होत जोडले होते. हे सारे आठवून सुशीलाचे डोळे भरून आले.
 जिजी आता घोरायला लागल्या होत्या. त्या गाढ झोपेतही नागमोडी आठवणींचे भिरभिरे डोळ्यासमोर फिरतच होते.
 "लगीन झालं तवा जेमतेम बाराची असंल म्या. न्हाणबी आलं नव्हतं. घरात मोठ्या मायला मदत करायची. सागरगोटे, काचापाणी, ठिकरी खेळण्यात येळ उडून जाई. नाना, मायचे वडील लिंबाळ्याला वसुलीला गेलेवत्ते, नवा यानूला त्यांनी पाहिलं. पंढरपुरात शिकाया होत्ये, हे थोरले, मग भैणी आणि आणि पुन्हा दोन भाऊ. थोरले बप्पा, यांचे वडील, ते घरात मोठे. धाकटे दोन भाऊ. तीन भावांचं खटलं एकत्र राही. तिघा भावात एकलगट चारशे एकर जमीन, सात हिरी, दोन आमराया, गाई, म्हशी, बैलं, दोन घोडी असा गोतावळा. 'नानांना हे घर शंभर नंबरी वाटलं. ते त्यांच्या गावाकडे जाण्याअगोदर लेकीच्या घरी, थेट आमच्या धानुऱ्याला आले. जावयाच्या वडलांना, म्हणजे आमच्या बापूंना सांगून नातीचं, माझं लगन पक्क करून टाकलं. अन् तुळसीचं लगीन झाल्या झाल्या पहिल्या लगीन तिथीला धानुऱ्याच्या देशमुखांच्या गढीत वाढलेली चंद्रभागा घरच्यांची लाडकी जिजी लिंबाळ्याच्या जाधव पाटलांच्या घरातली थोरली सून म्हणून. पंढरपुरात शिकणाऱ्या विठूची बायको म्हणून, अंगभर गुलाबी वलगट पांघरून, सांजच्या येळी, जवारीचं माप वलांडून वाड्यात आली.'
 लगीन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जिजीच्या काळ्याभोर घनदाट केसाचा अंबाडा आत्याबाईंनी. सासूबाईंनी बांधून दिला.

'लांब केसांची मालन, ऐन आषाढीचा चांद.
वर केवड्याचा फणा; माळते आत्याई.'

 अशी कौतुकाने ओवी गात आंबाड्यावर सूर्यचंद्राच्या पिना बशिवल्या. आत्याबाई सुनेच्या डोक्यावरून मायेने हात फिरवीत म्हणाल्या, "तुमी या वाड्यातल्या थोरल्या वैनीसाब आहात. आदबीनं राहायचं. कंदीकबार वाड्याभाईर जायाची येळ आली तर अंगभर वलगट ओढून जायचं. पुरुस मानसांसमोर ढाळजात जायचं न्हाई. तीन भावांचा बारदाना एकात आहे. चुलत मालत मानायचं नाही."
 "थकलासा आता. दोन दिवसांनी येत्या जात्या झालात की, चा करायचं गुत्त सांबाळायचं. जमतोना चा कराया? माजघरात जाऊन बसा. तुमाले बघाया गावातून बाया येतील. धाकट्या काकी सोबतीला हाईत तुमच्या. त्या सांगतीला त्यांच्या पाया पडा. आनि कपाळ दिसनार न्हाई असा पदर फुडं ओढून घ्यावा."
 जिजींनी आत्याबाईचा. सासूबाईंचा चेहरा आठवण्यासाठी मनाला खूप ताण दिला. हळूहळू चेहेरा समोर येऊ लागला. बिनकाष्ट्याचं नऊवारी लुगडं, रुंदबंद काठांचं. डोक्यावरून पदर. कपाळभरून शोभणारा कुंकवासा ठसठशीत टिळा. नाकात मोत्याची नथ. तिच्या खालचा मोती बोलताना ओठांवर झुले. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात एक मजेशीर हेल येत असे. त्यातही अपार माया, ओलावा होता. त्या म्हणत,
 "जिजा, च्यात थोडं अद्रक घाल गं. गवतीच्या नि दोन तुळसीची पानं बी घाल ग. तव्यावर तूप सोडून भाज पोळी. आन् पुरन बी वाईच जादा भर."
 आत्याबाईचे केस जेमतेम वीतभर. पण न्हाऊ घालायला जिजाच लागे. शिकेकाईत नागरमोथा घालून, ती चांगली उकळून घ्याची. आणि खसाखसा केस, पाठ चोळून कडक पाण्याने न्हाऊ घालायचे. जिजा हे सारे आपुलकीने करी. ती घरातली लाडकी सून. तीन लेकरं होईस्तो चुलीसमोर बसायची वेळच आली नाही. आत्याबाई आणि मधल्या काकी चुलीची उस्तवारी करीत. धाकट्या काकीकडे दह्यादुधाची उस्तवारी होती. शुक्राची चांदणी लकाकू लागली की, जात्याची घरघर सुरू होई. उजाडायच्या आत तीस-चाळीस भाकरी टोपलीत पडत. आठ गड्यांचा नाश्ता नि जेवणाच्या भाकऱ्या घेऊन जायला शेतावरचा गडी येई. जरा उशीर झाला तर मोठे बाप्पा. जिजाचे सासरे घरादाराला शिव्यांची लाखोली वाहत. सकाळी वासुदेव घरात चिपळ्या वाजवीत येई तेव्हा जिजाची पहिली चहाची किटली तयार असे. पहिला कप वासुदेवासमोर ठेवायचा नि मग दोन पितळ्या भरून चहा आत्याबाई नि काकीसमोर ठेवायचा. तेव्हा कुठे जात्याला विश्रांती मिळे. तीन लेकरं होईपर्यंत चहाचा उठाठेवा जिजाकडेच होता. पोरं ही काही कळायसवरायच्या आत रूपटुपू झाली.
 जिजींच्या डोळ्यासमोर मालकांची नि त्यांची झालेली पहिली भेट आली.
 "तवा मालक पुन्याला शिकाया होते. मॅट्रिक की काय त्या वर्षात. दिवाळीच्या सुट्टीत गावी आले तवा पैली भेट झाली. लगीन झाल्यावर दोन महिन्याला शानी झाले. आत्याबाई लई मायेच्या. बाकी बाया म्हणायच्या की पोरीची वटी भरा. पन आत्याबाई म्हनंत "पोर लहानगी आहे. जाऊंदेत चार सहा महिने. मंग हाईच जलमभरचा उटारेटा". त्या दिवाळीला येताना मालकांनी खोलीत लावायं अ आ ई चा तक्ता आनला. एक दोन आकड्यांची बुकं आनली. पयल्या भेटीतच त्यांनी जत्तावून सांगितलं होत की, मी शिकायाच हवं. मला बी लिहाय वाचाय आवडायचं. साने गुरुजीचं श्यामची आई पुस्तक तर तोंडपाठ होतं त्यांचं..मी बी करमलं न्हाई की त्येच हाती घेऊन बसे. पुस्तकं वाचायचा नाद लागला. त्यांत पोरं बी झाली लवकर. चार पाच वरिसं, लई छान गेली. शेवटची परीक्षा जवळ आलेली. चार दिस सुट्टी घेऊन ते गावी आले. आणि दुसऱ्याच दिशी मोठ्या बाप्पांना. शेतातून घराकडे येताना पान लागलं. धा चा आकडा डोकीवर असलेला नागोबा. घरी आनेस्तो तर काहीच उरलं नव्हतं. मग कुठलं पुणं नि काय. पुन्ना पुन्याला ते गेलेच न्हाईत. मी तिसऱ्यांदा मुकिंदाच्या वेळी गरवार होते.
 आत्याबाईच्या कपाळावरचा कुंकवाचा ठसठशीत टिळा पुसला गेला. डोळे नि चेहेरा कोरड्या हिरीसारखा फक्क उदास. जिजा ग, अशी सादही बंद झाली. न्हाणी लगतच्या अंधाऱ्या खोलीत त्यांनी बस्तान टेकवलं ते कायमचंच!"
 जिजींच्या मिटल्या डोळ्यांसमोर आत्याबाईंचा बिना कुंकवाचा भेसूर चेहेरा आला. त्याचं अंग घामाने डवरून गेले. अंगावर सरसून काटा आला.
 जिजींचे घोरणे वाढतंच चालले होते. त्यांचे कपाळ घामाने ओले झाले. नि आकडा यावा तसे अंग थरथरून ताठरले. शेजारी बसलेली सुशीला दचकली. तिने घाबरून समोरच्या मॉनिटरवर नजर टाकली. त्यावरच्या रेषांची नागमोडी चाल सुरू झाली. तिने क्षणभर निःश्वास टाकला आणि ती सिस्टरना विनवू लागली. "सिर, डॉक्टरना बोलवा ना. जिजींचं घोरणं काही वेगळंच वाटतंय आणि आता खूप थरथरल्या. घामपण पाहाना केवढा आलाय." डॉक्टर आले. त्यांनी तपासले.
 "वहिनी, आजचा दिवस अवघड आहे. मुकुंददादा इथेच आहेत ना? आणि अण्णा कसे आले नाहीत अजून? त्यांना निरोप गेला असेल ना? अजितला कळवलंत ना? तो नाराज होईल नाहीतर माझ्यावर. वहिनी, थोडी घाईच करा." डॉक्टरांनी सांगितले. दवाखान्यातले सगळे डॉक्टर्स, नर्सेस घरातल्यागत जवळचे आहेत. भवतालच्या परिसरात अण्णांबद्दल अपार आदर आहे. 'दलित सेवक', 'जिल्हा भूषण' असे अनेक पुरस्कार अण्णांना मिळाले आहेत. खादीचे धोतर, खादीचा कोट, पायात गावातल्या चांभाराने शिवलेल्या जाडजूड चपला, गळ्यात तुळशीची माळ नि कपाळाला गंधाचा टिळा. अण्णा अद्याप आले नाहीत हे पाहून सुशीला अस्वस्थ होत होती. जिजींकडे पाहताच तिचे मन नितांत मायेने भरून आले.
 या घरात येऊन पंधरा वर्षे होऊन गेली आहेत. अण्णा आणि जिजींना अलग बसून बोलताना तिने कधीच पाहिलेले नाही. अण्णा मुक्कामाला कायम डोंगरातल्या पाथरीच्या शाळेत असतात. धाकट्या काकी सांगतात की, चाळीस वर्षात अण्णा मुक्कामाला कधीच लिंबाळ्यात आलेले नाहीत. अशात तालुक्याच्या खेपा वाढल्या आहेत. जिजीही गेल्या पंचवीस सव्वीस वर्षांपासून तालुक्याला अहमदपुरात राहतात. मुलामुलींच्या शिक्षणासाठी घर केले आहे. भाकरी घालायला जिजी. इथले शिक्षण खूप चांगले आहे. जिजींच्या दोन्ही लेकी, धाकट्या ज्ञानोबा काकांच्या लेकी सगळ्याजणी खूप शिकल्या. नोकरी करू लागल्या. डॉक्टर होऊन दवाखाना थाटला. साऱ्याजणी आपापल्या घरी सुखात आहेत. शिक्षणासाठी घरातल्या मुलामुलींना शहरात खोली करून ठेवावे, असे मद्रासला असणाऱ्या मधल्या काकाजींनी सुचवले. "आई माय! खोली करून पोरींनी अभ्यास बी करायचा नि भाकरी बी थापायच्या. मन कसं लागल सिकण्यात. मी हाईन लेकरांजवळ. मालक बाहीरच्यांसाठी साळा काढतात. म्या माजी नातुंड, लेकरं शानी करीतन." तेव्हा जिजींनी ठणकावून उत्तर दिले होते, असे धाकट्या काकी सांगतात.
 "गडी मानसांची बात येगळी. बंदा रुपया असतात त्ये. शिकण्यासाठी कुठबी ऱ्हाईले तरी घरच्यांच्या जिवाला घोर नसतो. पण पोरीची बात येगळी. काचेचा जीव. जरा धका लागला तर तडा जानार. आमच्या येळची बात न्यारी. शिकलेल्या मालकाला बिन शिकलेली मालकीण चालायची. आता शिकलेल्या पोरांना शिकलेली बायको लागती. "पोरींनी शिकायाचं हवं" जिजींचे उधारीचे नव्हे तर रोखीचे बोलणे, माहेरवाशिणी आंब्याच्या दिवसात गावाकडे एकत्र जमत तेव्हा जिजी काहीशा अभिमानाने हसत हसत सांगत.
 "तुमचे अण्णा डोंगरातली, गावच्या शिवे बाहीरची, गरिबाघरची लेकरं शिकावीत म्हणून झटतात. त्या पायी घरदार समदं सोडलं. मी बी घरच्या लेकी शिकाव्या म्हणून गावची शीव वलांडली. आन शिकल्याबी माज्या चिमण्या व्हयं ग?" ते आठवून सुशीलाला हसू आले. तिने घड्याळाकडे नजर टाकली तेवढ्यात बाहेर ओळखीचा आवाज आला. डोक्यावरचा पदर नीट घेत ती दारात आली. थोरली नणंद मंगलाक्का, डॉ. अजित, त्याची पत्नी डॉ. अनिता आणि जावईबुवा घाईघाईने येत होते. मंगलाक्कांच्या डोळ्यात पाणी आणि प्रश्नचिन्ह. डॉ. अजितने आईचा हात धरून न बोलण्याची खूण केली. आजीची. जिजींची नाडी बघितली. "मामी, कधी ॲडमिट केलं? सकाळी डॉ. प्रशांतचा फोन होता. लागलीच निघालो. प्रशांत बघतोय जणू जिजीकडे. पल्स ठीक आहे." असे विचारीत अजित आपल्या लाडक्या आजीला हलवून जागे करू लागला.
 "आजी, ऊठ, मी अज्या आलोय तुझा. तुझा अज्ज्या, डागदर"
 धक्के मारमारून घट्ट बसलेल्या बंद दरवाजाचे पट करकर करीत उघडावेत तसे जिजींनी कष्टाने डोळे उघडले. नातवाचा मोठ्या पहिल्या वहिल्या नातवाचा हात तिने गच्च धरून ठेवला. खोल गेलेल्या आवाजात विचारले,
 "कंदी आलाव?" नातवामागे लेक, नातसून आणि जावई उभे होते. त्यांना पाहताच जिजींचा हात डोकीवरच्या पदराकडे गेला. पण हाताला सुई टोचून बाटली लावलेली. त्यांनी नजरेने सुशीलाला इशारा केला. तिने त्यांच्या अंगावरची चादर नेटकी केली. डोक्यावरचा पदर नीट केला. जावयांना बसण्यासाठी खुर्ची पुढे केली.
 "लेकीशी मनमोकळं बोला. मी बसतो बाहेर" असे म्हणत जावई बाहेर गेले.
 "सुशा, दोन दिवस झाले ॲडमिट करून जिजीला! साधा निरोप नाही देऊ?" मंगलाक्का काहीशा नाराजीने आणि अजीजीने बोलल्या.
 "मामी, फोन करायचा. इथल्या दवाखान्यात ठेवण्यापरिस लातुरात सोय आहे. घरचे डॉक्टर्स, घरचे हॉस्पिटल." अजितच्या बोलण्यातली नाराजी आणि तळमळ सुशाच्या लक्षात येत होती. पण ती तरी काय करणार? घरात ती एकटीच. मुकुंददादा राजकारण गुंतलेले. कधी इथे तर कधी तिथे. नशीब म्हणून त्या दिवशी गावातच गवसले. एरवी दिल्ली मुंबईच्या फेऱ्यात अडकलेले.
 गेल्या दोन वर्षांत जाधव पाटलांच्या घरातली चलबिचल बाहेरच्यांच्या लक्षात आली नसली तरी घरातील प्रत्येकजण अस्वस्थ असे. तीन भावांची एकलगट जमीन. मोठ्याने पंधरा वर्षे बारदाना सांभाळला. वडलांच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे धाकट्याचे शिक्षण, बहिणींची लग्न. ही जबाबदारी सांभाळली. मधला भाऊ नोकरी निमित्ताने थेट दक्षिणेत, मद्रासला असतो. धाकटा भाऊ शेतीत रस घेऊ लागल्यावर, अण्णांनी त्यांच्या डोक्यात साने गुरुजींनी पेरलेली कल्पना साकारण्यासाठी शेतीची जबाबदारी सोडली. धाकट्या मालकांनी थोरल्या भावाच्या मुलांचे शिक्षण, मुलींच्या लग्नाची जबाबदारी सहजपणे पार पाडली. मुली शिकू लागल्या. मग धाकट्या मालकिणीने गावातला बारदाना सांभाळला तर, जिजींनी तालुक्याच्या गावी घर करून पोराबाळांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळली. जिजी, अण्णांचा मोठा लेकं रमेश. बी.ए.ची पदवी घेतल्यावर, धाकट्या मालकांची होणारी धांदल पाहून, पुढच्या शिक्षणाची. वकील होण्याची स्वप्ने बासनात बांधून गावी येऊन शेती पाहू लागला. त्यात स्थिरावला. त्यालाही अठरावीस वर्षे होऊन गेली आहेत. धाकट्या मालकांचा मोठा वकील होऊन औरंगाबादेत हायकोर्टात वकिली करू लागला आहे. अण्णांचा मधला पहिल्यापासून राजकारणात घुसला आहे. धाकट्या मालकांचा धाकटा नितीन शेतीशास्त्रातील पदवी घेऊन चार वर्षांपूर्वी गावात आलाय. नवे ज्ञान, नवे प्रयोग, नवी स्वप्ने, नवे विचार डोक्यात. रमेश आणि धाकट्या मालकांची शेती करण्याची रीत आणि नितीनची नवी पद्धत यांचा मेळ बसेना. रमेशची पत्नी अनुराधा खेड्यातली. दहावीपर्यंत शिकलेली. धाकट्या काकींच्या हाताखाली शेताभाताची देखभाल करण्यात, दूधदुभत्याची उठाठेव करण्यात रमून गेली. चुलत मालत असा भेदभाव या घराला कधी नव्हताच, मद्रासच्या मधल्या भावाच्या उत्पन्नाचे पैसे त्याच्या खात्यावर नेमाने जमा होत. तर, शेतीच्या खर्चासाठी लागणारा पैसा बँकेतून उचलता यावा म्हणून मधल्याच्या सह्यांचे कोरे चेकबुक धाकट्या मालकाच्या कपाटात कायम असे. पंचक्रोशीतल्या लोकांना कौतुकाची वाटणारी बाबत नव्या तरुण पिढीला रुचेना. धाकट्या काकीला वाटे की, नितीनच्या बायकोने घरात थोडीफार मदत करावी. राधाकडून शिकून घ्यावे. टीव्ही, फ्रीज, मिक्सर या सारख्या नव्या वस्तू घरात होत्या. राधा त्याचा उपयोग करून घरात लक्ष घालते. तसेच नितीनच्या चित्राने करावे. चित्रा शिकलेली म्हणून गावातल्या शाळेत अण्णांनी तिला घेतले. पण शहरात वाढलेल्या चित्राला घरासाठी वेळ देणे जमेना, शाळा, टीव्ही, वाचन यात तिचा वेळ जाई. धाकट्या काकी आणि जिजी ताटाला ताट लावून जेवल्या. पोरांच्या शिक्षणासाठी जिजी अहमदपुरास गेल्या तरी लिंबाळ्याहनू सुटणाऱ्या पहिल्या एसटी बसने दूधताकाच्या बरण्या, खवा, तुपाचे डबे, पुरण अहमदपुराला रवाना होई. आपल्या पोरी जिजींमुळे शिकल्या, चार पैसे कमावतात, संसारात सुखी आहेत, याची मनोमन जाणीव धाकट्या काकीला होती. गेल्या साली नितीनच्या हट्टापायी वाड्यात दोन चुली पेटू लागल्या होत्या. प्रत्येकाच्या नावाने शेती वेगवेगळी लावून टाकावी, लेकीना पैसा आडका दागिने देऊन बोळवणं करून मोकळे व्हावे असे अलीकडे धाकट्या मालकांना वाटे. भावजयी जवळ. जिजींजवळ तसे त्यांनी बोलून दाखवले होते.
 "माज्या लेकरांना दोन हात जमीन कमी येऊ द्या. पन माज्या धाकलीच्या लेकरांच्या मनाचा संतोष करा. तुमी लई केलंत माज्या लेकरांसाठी. मालकांनी कायम साळंचा संसार बघितला. तुमी तुमच्या भाबीवरची माया कंदी कमी केली न्हाई. जिजी असे नेहमी म्हणत. दोन चुली मांडल्यापासून जिजी खूप दुखावल्या होत्या. गावी जाऊन धाकटी जवळ राहावे असे सारखे वाटे. पण रमेशची मुले आरती नि अनिल, धाकट्या लेकीची अकरावीतील लेक सुखदा यांना घेऊन राहणाऱ्या जिजींना मनातली इच्छा मनातच ठेवावी लागली. मुकुंद, सुशा गावातच वेगळे राहतात. त्यांनी जबाबदारी घ्यावी असे वाटे. पण मुकुंदाला कोण सांगणार?
 "मंगू लई उशीर केलास ग यायला." डाव्या हाताला सुई टोचलेली. जडावलेल्या उजव्या हाताने लेकीचा हात चाचपीत जिजी बोलल्या. "तू, पावणे, आज्या आलाव. पण तुजे अण्णा अजून आले न्हाईत ग. उगा सोंग केलंय माझं. मी चांगली हाय. तू आलीस. मला लिंबाळ्याला घेऊन चल माय." एवढ्यात धाकट्या काकी धापा टाकीत खोलीत आल्या. जिजीच्या जवळ बसल्या. वाहणारे डोळे. तोंडातून शब्दही फुटत नव्हता. "सुधा दोन दिवसांपासून मोठ्या बाई दवाखान्यात हाईत. साधा निरोप नाही देऊ? मुकिंदा तरी होते का इथं?" धाकट्या काकीला सुशा तरी काय उत्तर देणार? तिचे बिऱ्हाड वेगळे. त्या दिवशी रमेशची आरती शाळेतून घरी आली. जिजींची छाती दुखत होती. चेहेरा घामाने थबथबलेला होता. आरतीला पाहताच त्या आमटी गरम करायला उठल्या. पण तशाच खाली बसल्या. आरती लगेच सुशा काकीकडे धावली. सुशाने डॉक्टरांना फोन केला. जिजींना सरकारी दवाखान्यात दाखल केले. रात्र उलटून गेल्यावर मुकुंदा घरी आला.
 एकमेकांमधले धागे खूप कच्चे झाले आहेत, हे सर्वांच्याच लक्षात आले आहे. साधीसुधी घटना, प्रसंग. पण त्याकडे बघताना प्रत्येकाच्या डोळ्यांवर चष्मा. त्यातून निघणारे अर्थ तऱ्हेतऱ्हेचे. प्रत्येक जण एकमेकांपासून दूर पळणारा आणि स्वतःतच गुरफटणारा. "मां जिजीला विश्रांती घेऊ द्या. आता जरा बाहेरच बोलत बसा तुम्ही. आणि अण्णा?" अजितने सगळ्यांनाच बाहेर नेले.
 त्याची लाडकी आजी, जिजी. तिच्या कपाळावरचा गोल गरगरीत कुंकवाचा टिळा. नेहमी हसणारे डोळे. तिचा प्रसन्न चेहेरा पाहून अजितच्या पोटात ढवळून आले. डॉ. प्रशांतशी बोलायला जाण्यासाठी तो बाहेर आला. इतक्यात त्याला फाटकातून आत शिरणारे अण्णा दिसले. अण्णाही खूप थकलेत आता. खादीचे मळके धोतर. करड्या रंगाचा खादीचा कोट. टोपी. कपाळाला टिळा. गळ्यात तुळशीची माळ. हातात खादीची जाडजूड पिशवी. अण्णांना पाहून अजित पुढे झाला. आजोबांच्या हातातली पिशवी काढून घेतली. अजितला पाहून अण्णांना आश्चर्य वाटले.
 "नातवाला पाहूनच आजीला उतार पडला असेल!" अण्णांनी विचारले.
 "अण्णा लवकर चला. जिजी वाट पाहातेय. फार उशीर केलात." नातवाच्या उत्तराने अण्णा चमकले.
 अण्णा खोलीत येताच जिजींच्या उशाशी बसलेली सुशा डोक्यावरचा पदर आदबीने सावरीत उठली आणि बाहेर गेली. मुकुंदा आत आला. त्याने जिजींच्या कानाशी जाऊन सांगितले की अण्णा आले आहेत.
 जिजींनी डोळे उघडले. समोर मालक उभे. थकलेले. डोळे पाण्याने डबडबलेले. जवळच्या खुर्चीवर अण्णा बसले. त्यांनी जिजींच्या कपाळावरून हात फिरवला. नकळत इकडे तिकडे पाहिले.
 "चंद्रभागा, थंकलीस लई. लई कष्ट काढलेस.” असं म्हणताना अण्णांच्या डोळ्यांतले अश्रू जिजींच्या हातावर पडले.
 जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षांनी अनुभवलेला पतीचा स्पर्श. जिजींना आठवले तीस पस्तीस वर्षांपूर्वीचे प्रसंग.
 धाकट्या दोन भावांचे शिक्षण, बहिणींची लग्नं, वाट्याला आलेल्या जमिनीची मशागत करता करता पंधरा सतरा वर्षे निघून गेली. सगळ्यात धाकटे बंधू ज्ञानोबा. धाकटे मालक अण्णांहून तेरा वर्षांनी धाकटे. त्यांना शिकण्यात रस नव्हता. तरीही पंढरपुरात ठेवून मॅट्रिक काढली. शेतीत मात्र खूप लक्ष. ते शेती पाहू लागले. एक दिवस अण्णांनी धाकट्या मालकांना विनंती केली.
 "ज्ञानबा, तुमी आता शेतीत चांगले रूळला आहात. आपलं घर खाऊन पिऊन टंच हाय. आपल्या बप्पांना शिक्षणाची किंमत म्हणून त्यांनी आपणाला पंढरपूर, पुण्याला पाठवून शिक्षण दिलं. पण या डोंगरातली कुणब्याची; बलुतेदारांची, वेशीबाहीर रहाणाऱ्यांची लेकरं जाऊ शकतात का शाळंत? शाळा तालुक्याला. तिथला खर्चा लई. कसा परवडावा? देवाने त्यानला बुद्धी दिली तरी ती सर्वांसमोर कशी यावी? त्यांना कोन संधी देनार? मी आजवर या दिवसाची वाट पाहत होतो. पंढरपुरात साने गुरुजींना ऐकलं तवाच ठरवलं की शिक्षण खेड्यात न्यायचं. तुमी आता घराचे मालक. डोंगरातल्या पाथरीच्या देशमुखानं शाळेसाठी वाडा द्यायचा कबूल केलंय. येत्या जूनपासून शाळा सुरू होईल...
 "तुमाला आमी हात जोडून." अण्णांचे वाक्य तोडीत आणि हात धरीत धाकट्यांना हुकूम देतात. तुमी शाळंचं बघा. आमी घर, शेत समदं सांभाळू. फक्त तुमचा मायेचा हात पाठीवर ठेवा."

* * *

 "चंद्रभागा" मालकांचे शब्द जिजीच्या कानावर पडले, जणू युगायुगाने इतकी आर्द्र हाक ऐकू येत होती. त्या शब्दातली माया, ओलावा, जवळीक, जीवाभावाची सखी असल्याचा विश्वास. जिजीला पुस्तके वाचण्याचा नाद होता. पण घरकाम, मुलाची उठाठेव करताना वेळ कसा मिळावा? अण्णांना संस्कृतची खूप आवड. कालिदास नावाच्या कवीने बायको कशी असते, याबद्दल लिहिलेला श्लोक त्यांनी सांगितला होता. जोवर अण्णा गावी राहत तोवर हरेक गोष्ट ते जिजीला सांगत. तिचे मत विचारीत.
 "मी बाई मानूस. मला काय इचारता? मला काय कळतं? चुली म्होरचं कळनार आमाले." असे त्या म्हणत. तेव्हा हा श्लोक त्यांनी समजावून सांगितला होता. बायको जिवाभावाची सखी तर असतेच पण ती सल्ला पण देते. घरचा कारभार तीच पाहते. ते आठवून जिजींच्या फिक्कट ओठांवर हसू उमलले आणि डोळ्यासमोर ती रात्र आली.
 साने गुरुजींचे 'यती की पती' हे पुस्तक वाचताना जिजी खूप विचारात पडल्या होत्या. थोडा वेळ मिळाला तरी त्या ते पुस्तक उघडीत. नवराबायकोमधले एक नवे नाते उमगल्यागत त्यांना वाटले होते.
 त्या रातच्याला मालकांनी सांगितलं की, ते आता लिंबाळ्यात राहणार न्हाईत. पाथरीच्या शाळेत मुक्काम हलविणारेत. धाकटी भागिरथी आणि न्यानोबा यांची भावजय नाही तर माय होऊन मी ऱ्हायचं. म्हणाले, "चंद्रभागा, तू चार पोरांचीच माय न्हाईस तर न्यानोबाची लेकरं बी तुझीच आहेत. घरातल्या पोरी भाकरी भाजाया, गवऱ्या थापाया नि कालवण कराया कवा बी शिकतील. पन शाळेतलं शिक्षण वेळीच व्हाया हवं. तेच उपयोगी येतं. कामाचा बोजा तुमी उचला. तुमच्या मागं धाकटीपण तसंच वागील. तर देणार नव्हं आम्हाला शब्द? त्या रातच्याला मी शब्द दिला. तो आजवर पाळला.
 अण्णांच्या लक्षात आले की चंद्रभागाने धरलेल्या हाताची पकड सैल झाली आहे.
 "चंद्रभागाऽऽ चंद्रभागाऽऽ” अण्णांनी घाबरून आकांताने हाक मारली. बाहेरची मंडळी घाईने आत आली. जिजीच्या प्रसन्न शांत चेहेऱ्यावरच्या कुंकवाच्या ठसठशीत टिळ्यावर अण्णांच्या डोळ्यातले अश्रू पडत होते. डोक्यामागच्या मॉनिटरवरची नागमोडी नक्षी आता सरळ रेषेत पळत होती.