आमची संस्कृती/हिंदूच्या सांस्कृतिक इतिहासाचे मर्म

विकिस्रोत कडून

२. हिंदूंच्या सांस्कृतिक इतिहासाचे मर्म


 परदेशी प्रवासी, इतिहासकार किंवा राज्यकर्ते यांनी हिंदुस्थानातील समाजव्यवस्थेबद्दल पुष्कळ लिहून ठेविले आहे. परंतु हिंदुस्थानात आढळून येणाऱ्या असंख्य जाती, पंथ, देव व वंश यांमुळे ते गोंधळून गेलेले दिसतात. हिंदूच्या समाजसंस्था या त्यांना एखाद्या अडगळीच्या खोलीत वाटेल तसे अस्ताव्यस्त टाकलेल्या सामानासारख्या वाटतात. या संस्था इतक्या बहुसंख्य आणि बहुविध आहेत की, त्यांचे वर्णन करता करता या मंडळींच्या लिखाणात एक प्रकारचा निराशेचा सूर उमटू लागतो. हिंदी संस्कृतीच्या इतिहासाचा महान प्रवाह ज्या अनेक लहान-लहान प्रवाहांनी बनलेला आहेत्यांचा सूक्ष्म अभ्यास केल्याशिवाय त्या मोठ्या प्रवाहाच्या यथार्थ स्वरूपाचे आकलन होणार नाही.
 या अनेकविध समाजसंस्थांच्या नुसत्या वर्णनाने समाजाची रचना कसकशी होत जाते याचे आकलन होणार नाही. त्यासाठी हिंदी संस्कृतीची ऐतिहासिक पार्श्वभूमी काळजीपूर्वक अभ्यासली पाहिजे, म्हणजे हिंदुस्थानातील समाजात दिसून येणाच्या विविध आणि कधीकधी परस्परविरोधी चालीरीतींचाही बोध होईल. एका खंडप्राय विस्तीर्ण देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेल्या आणि प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंतच्या गेल्या सुमारे पाच हजार वर्षात उत्क्रांत होत गेलेल्या बहुविध समाजसंस्थांचे अस्तित्व व त्यांची प्रदेशपरत्वे झालेली वाटणी यांच्या कारणांचा उमज पाडण्यास या ठळक विशेषांचे साहाय्य होणार आहे.
 हिंदूंच्या सांस्कृतिक इतिहासाची तीन प्रमुख वैशिष्ट्ये दिसून येतात. ती म्हणजे १. अखंड परंपरा, २. राजकीय व धार्मिक सत्तेच्या केंद्रीकरणाचा अभाव, ३. संस्कृतिसंघर्ष टाळून संस्कृतिसंगम करण्याची प्र्वॄत्ती.

 अखंडित परंपरा
 युरोपातील इंग्लंडपासून हिंदुस्थानांतील कृष्णाकाठपर्यंतचा एक सलग देशविभाग लक्षात आणला तर त्यांत बोलल्या जणांच्या भाषांना इंडो कॅमनिक भाषा असे म्हणतात. या सर्व भाषांपैकी हिंदुस्थानातील भाषातच काय ते जुन्यांत जुने ग्रंथ केवळ तोंडपाठ करून व स्मृतीच्या साहाय्याने एका कानामात्रेचाही फरक होऊ न देता कायम ठेवण्याचा अट्टाहास हिंदुस्थानात झालेला दिसतो. चार हजार वर्षांपूर्वी प्रार्थना ज्या म्हटल्या जात त्या आजही जशाच्या तशा शब्द न शब्द म्हटल्या जातात जुन्या ग्रंथातील संवादकविता, वर्णने आजही कायम आहेत. पुढे प्रगत झालेल्या नाट्यकलेची बीजे त्यांत सापडतात. त्यांत वर्णिलेल्या देवतांचे देवातात्व आजही मानले जाते. त्या प्राचीन काळच्या कोणत्याही गोष्टी आज हिंदुस्थानात पूर्णतया नष्ट झालेल्या नाहीत. देशाच्या या ना त्या भागात त्या जशाच्या तशा आढळतात. पुराणवस्तुसंशोधकांना उत्खनन करताना ज्या प्रकारची प्राचीन मातीची भांडी सापडलेली आहेत त्या प्रकारची मातीची भांडी आज देशात कोठे ना कोठे प्रत्यक्ष वापरात आहेत. प्राचीन शिल्पांतून किंवा चित्रकलेतून ज्या प्रकारच्या पोषाखांच्या तऱ्हा चित्रित केलेल्या आढळतात तशा प्रकारचे पोषाख आजही कोठे ना कोठे वापरात असलेले आढळतात.
 सूर्य ही देवता प्राचीन काळापासून आज-तागायत भजली जात आहे, तर यज्ञसंस्थाही अशीच अखंडित चालत आलेली आहे. अथर्ववेदांत सांगितलेले जादूटोणा, तोडगा, औषधी इत्यादिकांचे ज्ञान आजही शेकडा ऐंशी लोकांच्या वापरात आहे.  अशी ही संस्कृतीची अखंडित परंपरा हिंदुस्थानाखेरीज फक्त चीन व जपान या पौर्वात्य देशांतच काय ती आढळते. युरोप, आफ्रिका वगैरे इतर भूविभागांत ही प्राचीन परंपरा खंडित झालेली आढळते. या देशांतून प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडत नाहीत असे नाही; युरोपातील जुने अवशेष आज आइसलँडसारख्या दूरच्या प्रदेशात आढळतात. आजच्या युरोपातील लोक केवळ जिज्ञासेने त्यांचे संशोधन करतात. तेथे उपलब्ध होणारी टयुटॉनिक गाणी ते उतरून घेतात. पण या सर्वात त्यांस आत्मीयता नसते. हे जे आहे ते 'आपले' आहे ही भावना त्यांच्या ठिकाणी आढळत नाही. रोम आणि ग्रीक पुराणातील कथा, देवता इत्यादींची माहिती उपलब्ध असली, तरी त्यांचे संस्कार ख्रिस्ती-धर्मीय आधुनिक युरोपच्या जीवनात दिसून येत नाहीत. या पुराणकालीन संस्कृतिचिन्हांविषयी त्यांस कुतूहल असले तरी आपलेपणा असलेला आढळून येत नाही.
 खंडित परंपरेचे दुसरे ठळक उदाहरण महंमदी धर्माच्या वर्चस्वाखालील आजच्या इजिप्तचे देता येईल. तेथे आढळणारे ते मोठमोठे पिरामिड म्हणजे फॅरोहासारख्या राजाची थडगी, त्यात हजारो वर्षे जतन करून ठेविलेल्या 'ममी', 'स्फिंक्स'चा अजस्र पुतळा ही प्राचीन इजिप्शियन संस्कृतीची चिन्हे आजही उपलब्ध आहेत. परंतु फॅरोहासारखे राजे, शेजा, क्लिओपाट्रासारख्या राण्या, त्यांच्या वेळच्या कथा, चित्रे भांडी यांचे प्रतिबिंब आजच्या महंमद-धर्मानुयायी इजिप्तमध्ये कितीसे आढळते? त्याविषयी त्यांस आत्मीयता वाटते काय? प्राचीन काळी हा देश फार पुढारलेला, सुसंस्कृत होता असे म्हणताना आधुनिक इजिप्शियन मनुष्याचे अंत:करण आपलेपणाच्या भावनेने उचंबळून येत नाही. हे सर्व आपल्यापासून दूर, वेगळे, जुने, दुसयाचे आहे, ही भावना आजच्या तेथील लोकांत आढळते.
 ख्रिस्ती व महंमदी धर्माचे वर्चस्व जेथे जेथे प्रस्थापित झाले तेथे तेथे अशा तऱ्हेची खंडित परंपरा आढळते. पूर्वजांच्या स्मृतिचिन्हांविषयी आजच्या लोकांस आपलेपणाचा अभिमान असलेला दिसून येत नाही.
 यांच्याबरोबर चीन-जपान किंवा हिंदुस्थान येथील संस्कृतीचा इतिहास ताडून पाहिला, तर येथील परंपरा आज पाच हजार वर्षे अखंडित चालत आलेली दिसते. पूर्वजांचे ग्रंथ, त्यांचे पोषाख, त्यांची दैवते, त्यांच्या चालिरीती, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांच्या नीतिकल्पना या सर्वांविषयी एक प्रकारचा आपुलकीचा अभिमान दिसून येतो आणि मुख्य म्हणजे या सर्व गोष्टी आजही कोठे ना कोठे प्रचलित असलेल्या आढळून येतात. अखंडित परंपरा हें हिंदूच्या सांस्कृतिक इतिहासाचे पहिले ठळक लक्षण म्हटले ते यासाठीच.

 राजकीय व धार्मिक सत्तेच्या केंद्रीकरणाचा अभाव-
 ब्रिटिश राजाच्या आधी हिंदुस्थानात सर्वांसाठी सारखा कायदा करून त्याची अंमलबजावणी करील अशी प्रबळ, केंद्रीय राज्यसत्ता कधीच नव्हती. 'साम्राज्ये' पुष्कळ झाली, परंतु एक तर त्यांचा विस्तार संबंध हिंदुस्थानभर कधीच झाला नाही आणि जेवढ्या भागात झाला तेवढ्या भागात त्या साम्राज्यसत्तेचा अंमल सबंध लोकांच्या दैनंदिन जीवनक्रमांबर क्वचितच होत असे. खेडेगावातील लोकांस राजसत्तेचे अस्तित्व क्वचितच, फार तर कर भरण्याच्या वेळी जाणवत असे. एरव्ही कोणती राजसत्ता तर आली नि कोणती गेली याचे पडसाद त्यांच्या जीवनाच्या अगदी गाभ्यापर्यंत पोचत नसत. बऱ्याच अंशी स्वयंपूर्ण अशा प्रादेशिक गटागटांमधून लोकांचे विशिष्ट प्रकारचे जीवन अबाधितपणे चालू राहत असे. कधी मित्रभावाने, तर बहुधा शत्रूभावाने एकमेकांशेजारी नांदणारी अनेक लहानलहान राज्ये, असेच या देशांतील राजसत्तेचे स्वरूप शतकानुशतके असलेले दिसून येते. हल्ली जशी काही संस्थाने अगदी लहान अशी दिसून येत असत, त्याप्रमाणे प्राचीन काळी पुष्कळ राज्ये अगदी लहान, एखादे शहर किंवा तालुका एवढ्याच विस्ताराची असत. प्राचीन घोषयात्रांची वर्णने हेच दर्शवितात. आपल्या राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन परत येण्यास कित्येक घोषांस दोन दिवससुद्धा पुरे होत असत आणि तेही पूर्वीच्या वाहतुकीच्या तुटपुंज्या साधनांच्या काळात! दिग्विजय करणारे मोठमोठे राजे घेतले तरी तेसुद्धा दुसऱ्या राजाने त्यांचा वरचढपणा मान्य केला की खूष असत. तांत्रिक स्वामित्व प्रस्थापित करून, थोडीबहुत खंडणी वसूल करून, ते पुढे जात. परंतु लोकांच्या सांस्कृतिक जीवनावर परिणाम व्हावा अशी प्रबळ केंद्रीय राजसत्ता कधी नव्हती. एक अशोकाचे राज्य मात्र भारतातील केंद्रीय सत्ता म्हणून दाखविण्याजोगे आहे. तीही नव्हती. म्हणून राजकीय व धार्मिक सत्तेच्या केंद्रीकरणाचा अभाव' हे हिंदी सांस्कृतिक इतिहासाचे दुसरे ठळक लक्षण मानावे लागते.

 संस्कृति-संगम करण्याकडे प्रवृत्ती
 हजारो वर्षांपासून बाहेरचे लोक हिंदुस्थानात प्रवेश करीत आलेले आहेत, परंतु भिन्नभिन्न संस्कृतींचा इतका दीर्घकालीन संपर्क होऊनही त्यांतून एका संस्कृतीला पूर्णपणे दडपून टाकून किंवा तिला नाहीशी करून दुसरी जिवंत राहावी इतका तीव्र संस्कृतिसंघर्ष कधीच निर्माण झालेला नाही. एका बाजूला जुने एतद्देशीय व दुसऱ्या बाजूला नवे परकीय यांत नेहमी सांस्कृतिक तडजोडच होत आली आहे. यामुळे जी परंपरा परिणत झाली तिच्यात सर्व संस्कृतीची मूलतत्त्वे जिवंत राहिली आहेत. तडजोड हा हिंदी संस्कृतीचा आत्मा आहे. आपल्या विशिष्ट संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी कुरुपांचालांनी कधी दौरे काढले नाहीत. ते जसजसे इतर प्रदेशात पसरले तसतसा त्यांचा दुसऱ्या लोकांशी संबंध येऊ लागला, आचारधर्मात फरक पडू लागला. या समावेशक वृत्तीच्या दृष्टीने हिंदुस्थानातील अनेक दैवतवाद विचार करण्यासारखा आहे. अनेक दैवते मानीत असल्यामुळे हिंदूंच्या दैवतांच्या संख्येत नेहमी भरच पडत आली आहे. 'शिव' या अवैदिक दैवताला वेदांतील सूर्यदेवाचेच दुसरे स्वरूप जे 'विष्णू' त्याच्या बरोबरीचे स्थान मिळालेले आहे. यक्ष, किन्नर, भुतेखेते, खोडसाळ आणि रोगराई उत्पन्न करणारी दैवते, नद्या, धबधबे, पर्वत यांची दैवते इत्यादी आदिमानवांची दैवते येथे अनादि कालापासून जीव धरून आहेत; शिवं व विष्णू यांच्या बरोबरीने खेडेगावांतून सर्व जातीचे लोक आजतागायत त्यांची पूजाअर्चा करून त्यांस भजत आले आहेत.
 या अनेकदैवतवादाचा पाया गणले जाणारे सर्वांभूती परमेश्वर मानण्याचे तत्त्वज्ञान हे फार सहिष्णू आहे. वैवाहिक किंवा अन्य कोणत्याही बाबतीतला वागणुकीचा एखादा प्रकार हा एकदा एखाद्या गटाची प्रस्थापित परंपरा म्हणून सिद्ध झालेला असला. म्हणजे त्याला मान्यता मिळत आली आहे. बहपतित्व आणि बहुपत्नित्व, पितृप्रधान व मातृप्रधान कुटुंबपद्धती, अनेक दैवतांची पूजा, देवस्की, चार्वाकमत ही सर्व देशाच्या विभागात अस्तित्वात असलेली आढळतात. कधीकधी तर एकाच विभागात प्रमाणात घोड्याला महत्त्व देऊन त्याचे मांस खाण्याची प्रथा ख्रिस्तपूर्व संस्कृतीत रूढ होती. परंतु प्रेषितांनी घोड्याचे मांस खाणे हे निषिद्ध ठरविले. पूर्वीच्या लग्नपद्धती, पूजा, खाणपिणे, कपडेलत्ते इत्यादी सर्व गोष्टींचा मोड करून नवीन पंथाचे एकत्व प्रस्थापित करण्याकडे यांचा रोख असे. त्यांच्याकडूनं अनेक दैवतांस थारा मिळणे अशक्यच होते.

 परंतु हिंदुस्थानात मात्र अनेकांच्या वैशिष्ट्यांस बाध न आणता एक प्रकारचे समावेशक एकत्व प्राप्त झालेले दिसते. अनेकत्वातून एकत्वाची प्रचिती हे हिंदी संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य येथील लोकांच्या रोमरोमांत भिनलेले दिसून येते. सर्वाभूती ज्याप्रमाणे अंतिम चित्तत्व जे ब्रह्म ते मीच आहे असे मानणाच्या ब्रह्मवाद्यालाही काही बाह्योपचार, दैवत-पूजा ही असेच!

 दक्षिण दिशा ही वाईट, राक्षसांची; तेव्हा दुष्ट राक्षस जो रावण तो दक्षिणेकडचा असावा हे ठीक आहे. पण त्यालाही आपल्यात समाविष्ट करून घेण्याची तडजोडीची वृत्ती त्याला ब्राह्मण मानण्यांत दिसून येते. तुम्हीही राहा, आम्हीही राहू ही सहिष्णु वृत्ती सर्वत्र दिसते. मध्यंतरी बुद्ध किंवा महावीर यांच्या पंथाचा प्रसार होऊ लागला तेव्हा या वृत्तीला बाध येण्याची वेळ आलेली होती. कारण बुद्धाच्या निर्वाणकल्पनेत दैववादाला जागा नाही. वासनात्याग करून आत्मक्लेश, चिंतन यांच्या साहाय्याने शेवटी ज्ञान प्राप्त करून घेणे, या कल्पनेला दैवतांची कल्पना कशी मानवणार? परंतु मौज अशी की, बौद्ध पंथाचा प्रसार हिंदुस्थानात पुष्कळ झाला, अशोकासारख्या सम्राटाचे, त्याच्या प्रबळ आणि विस्तीर्ण राज्यसत्तेचे पाठबळ त्याला मिळाले, तरी शेवटी बुद्ध स्वत:च एक दैवत होऊन बसला! 'तारा'सारख्या यक्षिणीची दैवत म्हणून पूजा त्यांच्या पंथातही राहिली आणि आमच्या लोकांनी तर बुद्धाला विष्णूचा नववी अवतार बनवून साफ पचवून टाकला! चीन जपानमध्येही तो दैवतच झाला.

 जिनाच्या पंथांत दैवतवादाला थारा नाही. परंतु तेथेही त्याचे चोवीस तीर्थंकर हेच दैवते बनून त्यांची व इतर काही क्षुद्र दैवतांचीही पूजा शिल्लक राहिली. विंध्यवासिनीदेवी हे मोठेच दैवत त्या पंथात मानले गेले.

 सर्वसंग्राहक अनेकदैवतवादाला बहुतेक समाजशास्त्रवेत्ते रानटी मानतात. तसे का मानावे कळत नाही. अनेक दैवतांची लाज वाटावी असे आसेतुहिमाचल अशी ब्रिटिश राज्याप्रमाणे प्रस्थापित होऊ शकली नाही व टिकूही शकली नाही.

 धार्मिक बाबतीत केंद्रीय सत्ता तर हिंदुस्थानात कधीच नव्हती. एखाद्या विशिष्ट धर्मतत्त्वाचा आग्रह धरून त्याचा प्रसार व अंमल कडवेपणाने सर्व देशभर करील अशी प्रबळ केंद्रीय धर्मसत्ता व धर्माधिकारी नव्हते. ख्रिस्ती चर्चची जशी एक सुसंघटित केंद्रीय सत्ता होती व ती जशी राजसत्तेच्या बरोबरीने राज्याधिकाच्याप्रमाणेच धर्माधिकाच्याकरवी लोकांवर अंमल चालवी, किंबहुना राज्यसत्तेला अंकित करून धर्मसत्तेचे प्राबल्य दिसून येई, तसे हिंदुस्थानात झालेले आढळून येत नाही. ईश्वर एकच आहे आणि ख्रिस्त किंवा महंमद हा त्याचा एकमेव प्रेषित आहे; त्याला मानणारे, भजणारेच तेवढे काय ते स्वर्गाचे अधिकारी, इतर पाखंडी लोकांस तो अधिकार नाही; महंमदास प्रेषित न मानणारे ते सारे काफीर; त्यांना जरूर तर तलवारीच्या बळावरही आपल्यासारखे बनवावे, नव्हे तसे त्यांना बनविणे हे एक श्रेष्ठ धार्मिक कर्तव्य आहे; ख्रिस्ताला न मानतील ती सारी बापुडी वाट चुकलेली कोकरे आहेत; त्यांना हाताला धरून ख्रिस्ती पंथाच्या वाटेला लावणे हे परम पवित्र कर्तव्य होय; अशा तऱ्हेचा आग्रह व तदनुसार धर्मप्रसाराची जोरदार फळी उभी केलेली हिंदुस्थानात दिसून येत नाही. अनेक राज्यसत्तांप्रमाणेच अनेक धर्मपंथही येथे एकमेकांशेजारी सुखाने नांदू शकत. देव एकच म्हटला तर एकही आहे. आणि त्याची रूपे भिन्नभिन्न मानली तरी हरकत नाही. प्रत्येक देवाचे पुजारी निराळे. प्रत्येक जातीला किंबहुना प्रत्येक कुटुंबाला दुसऱ्या दैवताला कोणत्याही प्रकारे कमीपणा न आणता स्वत:साठी खास असे कोणतेही दैवत पसंत करता येत असे. सांस्कृतिक संक्रमणाचे स्वरूप यांमुळे एकजिनसी किंवा केंद्रीकृत झालेले नव्हते. लोकांनी परंपरागत ज्ञान विशिष्ट जिल्हाधिकाऱ्यांकडून विशिष्ट ठिकाणी विशिष्ट पद्धतीने घेतले पाहिजे अशी सक्ती नव्हती. काही लोक ते पुस्तकांद्वारा मिळवीत. तर बहुसंख्य लोक ते धंदेवाईक, कथेकरी, नट, गायक, भाट, चारण यांच्याकडून प्राप्त करून घेत. ब्राह्मण लोक देशभर संचार करून लोकांस धर्मतत्त्वे शिकवीत. पण या सर्व धर्मप्रसारकांस एका दावणीत बांधणारी प्रबल केंद्रीय धर्मसत्ता किंवा च्या दैनंदिन जीवनावर परिणाम करील अशी प्रबळ केंद्रीय राज्यसत्ता एकमेकांच्या अगदी सान्निध्यातही ती अस्तित्वात असतात.

 लोकबीजेही (Folk-elements) हिंदुस्थानात स्थानभ्रष्ट झालेली दिसून येत नाहीत. जंगलात राहणाऱ्या टोळ्या अजूनही बऱ्याच अंशी आपापली जंगले राखून आहे तसे दिसते. मोठमोठ्या नद्यांच्या खोऱ्यांत शेती करून राहणारे लोक भटक्या टोळ्यांच्या आक्रमणापुढे पळून गेलेले आढळतात. परंतु हल्लेखोरांचा जोर ओसरला म्हणजे ते पुन्हा आपल्या पूर्वजांच्या वास्तूत परत आलेले आहेत. पुष्कळदा असेही दिसून येते की, आधीचे जेते असलेले हे भटके आक्रमक लोक आज काहीशा हीन व खालच्या पायरीवर आहेत; आणि त्यांच्या आधीच्या थरांतील कुशल कृषिवलांनी टाकून दिलेल्या पडीक व नापीक प्रदेशांत ते वस्ती करून राहिले आहेत. दिल्लीच्या आसपास आढळणारे गुजर लोक या प्रकारचे होत. एका वेळी मोठे आक्रमण करून स्वत:चे वर्चस्व स्थापित करणारे हे गुजर शेवटी अशा अवस्थेला पोचले की, एका दंतकथेत त्यांना उजाडगावात राहणाऱ्यांपेक्षाही हीन समजले गेले आहे. दिल्लीच्या एका बादशहाला असा शाप कोणी दिल्याची दंतकथा आहे की, तुझी राजधानी उध्वस्त होईल. 'या रहे उजर, या रहे गुजर.'
 हिंदुस्थानातील अनेक दैवतवादाशी इतरत्र फोफावलेल्या ख्रिस्ती व महंमदी एकेश्वरवादाची तुलना करून पाहण्याजोगी आहे. ईश्वर एकच आहे आणि अमुक अमुक हा त्याचा एकमेव प्रेषित आहे असे प्रतिपादणाच्या या पंथांचे जे प्रचारक असत, ते पूर्वीच्या संस्कृतीच्या खाणाखुणाही राहू न देता तिला समूळ नाहीशी करण्याची पराकाष्ठा करीत असत. आपल्या पंथाची प्रस्थापना होण्यासाठी पूर्वीच्या पंथाचा उच्छेद होणेच त्यांस आवश्यक वाटत असे. तडजोड किंवा जमवून घेणे यांस तेथे वावच नव्हता; एक तर तुम्ही तरी राहा नाही तर आम्ही तरी राहू, असा उकेरीवरचा प्रकार असे. अर्थातच अशा एकेरीपणाच्या पंथप्रसारासाठी कित्येकदा शस्त्रबळाचा, बळजोरीचा आश्रय केला तर त्यांत आश्चर्य काय! पूर्वीच्या संस्कृतीचा लवलेशही शिल्लक राहू नये यासाठी हे नवीन पंथाचे प्रसारक किती दक्ष असत याचे एक उदाहरण पाहण्याजोगे आहे. आपल्याकडे ज्याप्रमाणे अश्वमेध करून मग त्यानंतर या यज्ञीय अश्वाचे मांस प्रसाद म्हणून भक्षण करण्याची चाल होती, त्याप्रमाणेच कमीअधिक वाईट त्यात काय आहे? परंतु इंग्रजी अमदानीचा अंमल सुरू झाला तेव्हा त्यांच्या संस्कृतीचा परिणाम येथील काही लोकांच्या मनावर होऊन त्यांना आपला अधिक दैवतांचा प्रकार त्याज्य वाटू लागला. यांतूनच ब्राह्मो किंवा आर्यसमाज यांसारख्या पंथांचा उदय झाला. परंतु एक गोष्ट पाहण्यासारखी आहे की, या पंथांचा उदय व प्रसार उत्तरेकडेच विशेष झाला. दक्षिणेकडे त्यांचा प्रभाव विशेष पडला नाही. विंध्य, सातपुडा ओलांडून दक्षिणेकडे आलेले लोक इकडील लोकांच्या रूढी उचलून, त्यांच्यात मिसळून समरस झाले ते उत्तरेकडील लोकांपेक्षा थोडे निराळेच राहिले.
 संस्कृतींचा संघर्ष होऊन एकीचा पाडाव व दुसरीचा विजय असे दृश्य हिंदुस्थानात न दिसता त्यांचा संगम होऊन दोहोंचाही काही अंशी विजय व काही अंशी पाडाव होऊन शेवटी त्यांचा तह झालेला दिसतो. यामुळे गेल्या पाच हजार वर्षात चालीरितींचा व रूढींचा मोठाच साठा जमत आलेला आहे आणि तो देशाच्या सर्व भागांत प्रसृत झालेला आहे दंतकथा व इतिहास, मोठमोठ्या राजघराण्यांच्या कथा, तत्वज्ञानाची प्रमेये नीतिविषयक कल्पना. देवांच्या आणि वीरांच्या कथा. पंचतंत्र आणि बृहत्कथा यांत वर्णिलेल्या लोककथा हे सर्व आता हिंदुस्थानच्या सर्व प्रांतांचे व जमातींचे समायिक धन झालेले आहे.
 सांस्कृतिक संक्रमणाचे स्वरूप एकजिनसी किंवा केंद्रीकृत नसल्यामुळे प्रत्येक प्रादेशिक विभाग आपल्या विशिष्ट स्थानिक संस्कृतीला जुळतील असे या परंपरागत ज्ञानाचे उभे-आडवे धागे विणीत असे व न जुळणारे भाग काढून टाकून त्यांऐवजी सुसंगत, रुचतील असे नवीन कथाभाग किंवा कल्पना त्यांत घालीत असे.
 ही घडामोड सर्व बाबतींत नेहमीच चालू असे. हिंदूच्या आपल्या देवांविषयीच्या दृष्टिकोनाचे या घडामोडीस बरेच साहाय्य झालेले आहे. देव, मोठमोठे वीरमाणसे या सर्वांची उत्पत्ती एकाच तत्त्वापासून आहे आणि सर्वांभूती परमेश्वर असल्यामुळे हे सर्व शेवटी एकाच चित्तत्त्वात विलीन व्हावयाचे आहेत. यामुळे कायमचा नरकवासही नाही, आपल्या आज्ञा बरोबर पाळल्या जातात की नाही याबद्दल दक्ष असणारा कडक देवही नाही किंवा वैयक्तिक मोक्ष हा केवळ त्याच्या कृपेवर अवलंबून राहील असा तो सर्वसत्ताधीशही नाही. हिंडूची आपल्या देवाशी वागणूक कधी आदरयुक्त, कधी प्रेममय, कधी व्याजोक्तीपूर्ण तर कधी अरेरावीचीही असते!

 हे विशेष पवित्र व हे सामान्य, हे सूक्त व हे असूक्त, हे विहित आणि हे निषिद्ध असे ठरविणारा काही स्वतंत्र, स्वयंसिद्ध मानदंड नसल्यामुळे सर्व प्रकारचे आचार निरनिराळ्या जमातीत किंवा एकाच व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातही एकमेकांच्या आड न येता सुखाने नांदू शकतात, आईबाप व मुले यांच्यात एक हजार वर्षांचाही सांस्कृतिक फरक असू शकतो!

 अशा रीतीने नेहमी जुळते घेण्याच्या प्रवृत्तीत गेली पाच हजार वर्षे हिंदी संस्कृती वाढली आहे आणि या दीर्घ कालखंडात वाढूय, धार्मिक समजुती, तत्त्वज्ञान, नीतिकल्पना या आणि अशा इतर हजारो विषयांच्या बाबतीत असे काही सांस्कृतिक ऐक्य साधले गेले आहे की, त्यामुळे हिंदू हा इतर सर्व हिंदूसारखा आणि हिंदूतरांपेक्षा वेगळा असा चटकन उमगून येतो. ख्रिस्ती धर्माने युरोपवर लादलेल्या ऐक्यापेक्षा हिंदुस्थानातील हळूहळू उत्क्रांत होत आलेले हे सांस्कृतिक ऐक्यं कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे

 परंतु या समावेशक व सर्वसंग्राहक वृत्तीच्याच पोटी आपापले भिन्नत्व कायम टिकविण्याची वृत्ती उत्पन्न होते. तुझे तुझ्यापाशी व माझे माझ्यापाशी, या वृत्तीमुळे एक प्रकारची अलिप्तता उत्पन्न झाली- कुंपणे पडली. केंद्रीय प्रबळ सत्तेच्या अभावी आणि मानवी गरजांपैकी प्रमुख जी सुरक्षिततेची गरज तिच्यामुळे कुटुंब हेच केंद्र बनले. निरनिराळे धंदे करणारी कुटुंबे आपापली वैशिष्ट्ये कायम ठेवून स्वत:भोवती तट उभारून बसली. जातिसंस्था हिंदुस्थानात कोणी आणली हे आज निश्चित सांगता येत नाही. पण तिचा उगम या अलिप्ततेच आहे. आपापल्या धंद्यांचे वैशिट्य टिकविण्याच्या प्रयत्नामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे स्पष्ट भेद पडले. पहिल्या दोघांची एक प्रकारची एकी असे. पैसा उत्पन्न करण्याच्या कामी तिसऱ्याचीही गरज भासे आणि पूर्वीच्या प्रजेचा अंतर्भाव चवथ्यात होई.

 केंद्रीय संरक्षणव्यवस्थेच्या अभावी एक प्रकारचा विस्कळितपणा आला. व्यवहारात परस्परांबाबत अविश्वास, मत्सर, असहिष्णुता . वा अलिप्तता आली. 'स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः' यामुळेही ही अलिप्तता वाढली. जातिसंस्था दृढमूल झाल्या.
वरील गोष्टींचा योग्य बोध होण्यासाठी हिंदुस्थानात कुटुंबसंस्थेचा विकास कसा झाला; कुल, जाती, ग्रामसंस्था कशा वाढल्या; त्यांच्यात प्रादेशिक भिन्नत्व काय आहे याचा शोध करून त्यांचे नकाशे काढून टिपण केल्यास भारताच्या इतिहासावर पुष्कळच प्रकाश पडेल. -

१९४९