आमची संस्कृती/संस्कृती म्हणजे काय?

विकिस्रोत कडून









आमची संस्कृती

१. संस्कृती म्हणजे काय?



 संस्कारपूर्ण, संस्कारमय जीवन जगण्याची देशकाल-विशिष्ट रीत म्हणजे संस्कृती, अशी सुरुवातीस व्याख्या केली तर ती कळणे कठीण जाईल; कारण परत 'संस्कार' शब्दाची फोड नीटपणे केली पाहिजे. सध्या सुरूवातीची व्याख्या म्हणून ही चालेल. ह्यातील 'संस्कार' कशाला म्हणायचे ते पाहू.

संस्कारांचे प्रकार
 पृथ्वीवरील सर्व वस्तूंवर संस्कार घडत असतात. सर्व वस्तू एकमेकांवर क्रिया-प्रतिक्रिया करीत असतात. पावसाने दगड झिजतो, माती भिजते, बीज अंकुरते. उन्हाने दगड फुटतात, बीज वाढीस लागते, पिकते व वाळते. दगडावर दगड आपटतो, फुटतो, नदीच्या प्रवाहाने वाहत जाऊन त्याचे गोटे होतात. पृथ्वीवर व पृथ्वीवरील वस्तूंवर प्रत्यही असे संस्कार होत असतात. पृथ्वीचे व पदार्थांचे रूप ह्या संस्कारांमुळे सारखे पालटत असते. पण आज ज्या संस्कारांचा आपणास विचार करावयाचा आहे ते हे नव्हेत. ही सदैव पालटणारी पृथ्वी मनुष्याच्या संस्कारित जीवनाची पार्श्वभूमी आहे.
 हजारो वर्षे चालूनचालून माणसांच्या पायाने मंदिराच्या पायऱ्या झिजतात. रस्त्यावर गाड्या जाऊन जाऊन रस्त्यांवर चाकोच्या पण पडतात; दगडावर व रस्त्यावर हे जे संस्कार घडतात ते त्यांच्या स्वत:च्या संस्कारित जीवनामुळे नव्हे. हे संस्कार मानवी जीवनाचे साक्षी आहेत. नांगरलेली शेते, पूल, बांधलेले प्रवाह, धरणाने अडवलेले जलाशय, हे पृथ्वीवर घडलेले संस्कार मामवांच्या संस्कारित जीवनाची प्रत्यक्ष प्रमाणे आहेत. जड वस्तूला स्वत:चे संस्कारमय जीवन नाही, पण प्राण्यांना तसे असते का?
 पक्षी थंडीवाऱ्यापासून पिलांचे संरक्षण करण्यास घरटी बांधतात पिलांना चारा भरवतात, त्यांना संगोपितात. त्यांना उडणे, शोधणं भक्ष्य वगैरे महत्त्वाचे शिक्षण थोड्याबहुत प्रमाणात देतात. कित्येक पक्षी दरवर्षी त्याच त्याच ठिकाणी येऊन घरटी बांधतात. काहींमध्ये नर-मादीचे जोडपे जन्माच्या गाठीने बांधलेले असते. घरटी मोठी सुबक असतात. पक्षी संघ करून राहतात. त्यांच्या समाजजीवनात उच्च-नीच भाव असतो, म्होरक्या व अनुयायी असतात. स्वत:च्या मालकीच्या जमिनीची जाणीव असते. निरनिराळ्या पशुजातींमध्येही हे गुण आढळतात.
 पक्षी व चतुष्पाद ह्यांच्यापेक्षा खालच्या पायरीवरचे म्हणून समजल्या जाणाऱ्या कीटकांमध्ये कित्येक कीटक-जातीचे समाजजीवन इतके विस्तारलेले व गुंतागुंतीचे असते की, त्याचे वर्णन करावयाचे झाल्यास मानवी समाजजीवनाच्या अनुषंगाने करावे लागते. ह्या कीटकाचा मोठमोठी शहरे असतात, राण्या असतात; त्यांच्यात काम करणार कामकरी असतात, लढणारे शिपाई असतात. आपण गुरे पाळून दूध काढतो त्याप्रमाणे काही कीटक दुसऱ्या क्षुद्र कीटकांचा सांभाळ त्यांच्या शरीरातून स्रवणाया मधुर रसाचा उपयोग करतात. एका करून राज्यातील कीटक दुसऱ्यांवर चढाई करून भीषण रणकंदन करतात.
 असल्या जीवनात माती, काटक्या वगैरे सृष्टीतील पदार्थाचा उपयोग करून. स्वत:च्या जीवनासाठी त्यांचे रूपांतर केलेले आढळते. व्यक्ती व्यक्तींची व गटागटांची वागणूक ठरलेल्या बांधीव मार्गाने होते. मग असले जीवन संस्कारमय नाही का?
 पण प्रस्तुत स्थळी ज्याला संस्कृती म्हटली आहे व ज्यांना संस्कार म्हटले आहेत, ते हे नव्हेत.  तो महत्त्वाचा फरक
 ह्या क्षुद्र जीवांच्या जीवनक्रमाकडे जरा दृष्टी टाकली तर त्यांच्या व मानवी संस्कारांच्या निर्मितीत मोठा फरक दिसून येईल. एका मधाच्या पोळ्यात मधमाशांच्या पिढ्यानपिढ्या जातात. पोळे वाढते किंवा कमी होते; पण प्रत्येक पिढीचा जीवनक्रम आखल्यासारखा असतो. हजारो पिढ्यांपूर्वीची मधमाशी, मुंगी, वाळवी व फुलपाखरे जो जीवनक्रम जगत होती, तोच जीवनक्रम आजही जगत आहेत. एक पिढी दुसरीस शिकवीत नाही- ज्ञानाचा साठा वाढत नाही, वस्तूंची निर्मितीही वाढत नाही. चिमणी, बाया, परत परत तसलेच घरटे बांधते, दर पिढी आपल्या पिलांना तेचतेच शिकवते, एका चाकोरीतून पिढ्यानपिढ्यांचा जीवनक्रम जात त्या बाहेर तो पडत नाही. कीटकांच्या व पशुपक्ष्यांच्या कृती ठरून गेल्यासारख्या आहेत. त्यांत बदल फारच थोड्या प्रमाणावर होतो.
 कीटकांच्या समाजरचना, सामाजिक भेद व कार्याची वाटणी ही त्यांच्या शरीररचनेवर अवलंबून असते. कामकरी मुंग्यांचे शरीर एक प्रकारचे असते, शिपाई मुंग्या नपुंसक व प्रजनन करण्यास असतात, तर राणी मुंगी म्हणजे अंडी साठवण्याचे, हालचाल करणे जवळजवळ अशक्य असलेले असे लडु पोते जणू असते. फुलपाखराचा मादी एका पानावर अंडी घालून मरून जाते. अंडी फुटून आळ्या बाहेर पडल्या म्हणजे त्या तेच पान खाऊ लागतात. खाऊन खाऊन लढू झाल्या, अंगातून सूत काढून स्वत:च्या अंगाभोवती कोश करतात. तो कोश तर आतून फुलपाखरू काही दिवसांनी बाहेर येते व आपल्या जोडीस शोधते; परत नव्याने अंड्यापासून सुरुवात होते. आयुष्यात ज्या क्रिया चालतात त्या शिक्षणाशिवाय, गुरुमुखाशिवाय चालतात.
 फलानुमेयाः प्रारंभाः संस्काराः प्राक्तना इव असे कालिदासाने रघुवंशातील राजाचे वर्णन केले आहे ह्या जीवजातींतील सर्व संस्कार प्राक्तन असतात. मागील जन्मावरून आलेले असतात; आणि सर्व प्रारंभ कशासाठी असतात हे कार्यमग्न व्यक्तीला माहीत नसते, पण ते फलानुमेय असतात. प्राक्तन संस्कार म्हणजे त्या त्या जातीला विशिष्ट अशी शरीररचना व त्या रचनेवर आधारलेली कार्यकुशलता. हिला 'प्राक्तन म्हटले; कारण ह्या दोन्ही गोष्टी बीजगुणांवर अवलंबून असतात. मुंगीचे बीजगुण मुंगीच्या अपत्यांत येतात व ते पूर्णतया ठरलेले असतात. तसेच फुलपाखराची मादी अमक्या पानावर अंडी का घालते हे सर्व जीवनक्रम पाहून मागून आपल्याला कळते. ती पाने त्या फुलपाखराच्या जातीचे खाद्य असते. आळ्या बाहेर आल्या की, लगेच खाद्य पुढे ठेवलेले असावे अशी योजना ह्यांत असते. पण ही योजना मादीने समजून केलेली नसते. अशा माद्यांच्या हजारो पिढ्यांनी हेच केलेले असते. तो बीजगुणच आहे. घातलेल्या अंड्यांपैकी शेकडा नव्वद नष्ट होतात व शेकडा दहा टिकतात. ह्या प्राण्यांचे सर्व प्रारंभ ठराविक व फल देणारे असतात. कोकिळा दरवर्षी कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते. कावळ्यांना अजून ह्या प्रतिष्ठित चोरापासून आपले घरटे व आपली अंडी कशी सांभाळावीत हे उमजले नाही व कोकिळा अजून स्वत:चे घरटे बांधण्यास शिकली नाही. एक कावळा जे करतो तेच इतर करतात; मुंग्या तसेच वारूळ परत परत बांधतात; मधमाशा आपले पारदर्शक षट्कोन हजारो वर्षे बांधीत आल्या आहेत. कोणी घराचा आकार, रंग व द्रव्य बदलीत नाहीत. ह्या एका ठशातील जीवनाला संस्कारमय जीवन' म्हणता यावयाचे नाही. ह्यांत नवनिर्मिती नाही, संचय नाही व शिक्षणाच्या रूपाने खालच्या पिढीला संक्रमणही नाही. जीवनक्रमाची रचना गुंतागुंतीची असली तरी अचल, ध्रुव आहे- कायम ठशाची आहे.

 सामाजिक जीवनाचे महत्त्व
 मनुष्याचा जीवनेतिहास गेल्या सहा लाख वर्षांचा माहीत आहे. सहा लाख वर्षांपूर्वीचा माणूस आजचे समाजजीवन जगेल हे कोणास शक्य वाटले असते का? आजचा मानवी समाज शंभर वर्षांनी कसा दिसेल हे कोणास तरी नक्की सांगता येईल का? खचित नाही. जीवनात जी नवनिर्मिती होत असते ती मानव स्वत: करतो, तिचा सांभाळ करतो, ती नव्या पिढीपर्यंत पोचवतो. अशाच जीवनाला संस्कारमय जीवन म्हणता येईल. ते जीवन कशामुळे निर्माण होईल ते पाहू या.
 मनुष्याचे असे कोणते गुणधर्म आहेत की ज्यामुळे संस्कृतीची निर्मिती शक्य होते?
 संस्कृती ही समाजाची निर्मिती आहे. एकट्या-दुकट्या व्यक्तीच्या जीवनक्रमात संस्कृतीची निर्मिती होणे अशक्य आहे. एकांतात राहिलेला रॉबिन्सन क्रुसो किंवा गिरीकंदरी वास करणारे ऋषिमुनी ह्यांचे जीवन संस्कृतिसंपन्न असते; पण ते समाजनिरपेक्ष नसते. मोठेपणी एकांतवासात राहिलेली ही माणसे लहानपणापासून सर्व सामाजिक संस्कार आत्मसात केलेली अशी असतात. अगदी लहानपणी रानावनात टाकलेली मुले एक तर मरून जातात किंवा जगलीच तर सर्वसाधारण मनुष्याचे व्यवहार करण्यास असमर्थ असतात.
 सामाजिक जीवन जरी संस्कृतीच्या निर्मितीला आवश्यक असले तरी पुरेसे नसते. नाहीतर कीटकांमध्येही संस्कृतीचा उगम झाला असता!
 आपल्याकडच्या पारमार्थिक वाङ्मयात व्यक्तीला परतपरत बजावून सांगतात की, 'तुझा मित्र-परिवार, हे कुटुंब, हे घर, हा मळा, हे द्रव्य व अलंकार सर्व येथेच सोडून तुला एक दिवस जावे लागेल! तू जन्मभर कष्ट करून ज्या ज्या गोष्टींचा संचय केला आहेस, त्या सर्व तुला येथेच टाकाव्या लागतील!' ह्या सर्व सांसारिक उपाधीतूनच संस्कृतीची निर्मिती होते. मनुष्य आपली सर्व भौतिक व मानसिक संपत्ती ठेवून जातो व ती पुढच्या पिढीला उपयोगी पडते. हेच संस्कृतीचे मुख्य बीज आहे. मानव इतर मानवापासून परंपरागत वस्तूंचा व मूल्यांचा वारसदार होऊ शकतो; म्हणून संस्कृती निर्माण होते; जतन होते व वाढीस लागते. फुलपाखराची आळी अगदी नव्याने आयुष्यास आरंभ करते; पण माणसाचे मूल संचयावर पोसते. त्याचा देह संचित द्रव्यावर पोसतो, तर त्याचे मन धर्म, रूढी, विज्ञान व मुख्य म्हणजे भाषा ह्या संचित मनोद्रव्यांवर पोसते.
 संस्कृतीची उत्पत्ती, जतन व संक्रमण भाषेच्याद्वारे होते. भाषा हे संस्कृतीचे एक प्रभावी अंग आहे. भाषेशिवाय संस्कृतीची निर्मितीही होणार नाही व संक्रमण तर सर्वस्वी अशक्य आहे.
 मूल अगदी लहान असल्यापासून त्याच्या कानांवर शब्द पडत असतात. त्या शब्दांचे उच्चार शिकण्याआधीच त्याला त्यांचा अर्थ कळ लागतो. ते जसजसे वाढू लागते तसतसे शब्दांच्या उच्चाराबरोबर शब्दार्थांचे ज्ञान होऊ लागते व प्रत्यक्ष अनुभवलेल्या सृष्टीपेक्षा कितीतरी मोठी सृष्टी शब्दांच्याद्वारे हस्तगत होते. ध्वनी व शब्द बोलभाषेला आहेत, तर लिहिलेल्या भाषेत अक्षरे येतात. ध्वनी व शब्द नाश पावतात, पण अक्षर न झरणारे, अक्षय असते अशी आपल्या पूर्वजांची कल्पना होती. पण अक्षर व ध्वनी ह्यांचा संबंध मात्र लिहिणारे व बोलणारे आहेत तोपर्यंत राहतो, एरवी नाही. आणि अक्षरे, ध्वनी व त्यांचा अर्थ हे त्रिकूट एका दृष्टीने कायम, तर एका दृष्टीने सदैव पालटणारे असे संस्कृतीचे एक प्रभावी साधन आहे.

 दृश्य व बुद्धिगम्य स्वरूपे
 संस्कृतीचे एक अंग दृश्य व हस्तग्राह्य असते. घरे, कपडेलते, खाण्या-पिण्याचे पदार्थ हे डोळ्यांनी दिसतात, हातांत धरता येतात किंवा चाचपून पाहता येतात जी व्यक्ती ह्या सर्वांचा उपभोग घेते ती क्वचितच त्यांची निर्माती असते. काही भाग मागील पिढ्यांनी निर्माण करून, वारसा हक्काने येतो- म्हणजे बापाकडून मुलाकडे जातो त्याप्रमाणे व्यक्तिगत वारशाने नव्हे- तर सामाजिक वारशाने येतो; तर काही इतर व्यक्तींच्या श्रमाने निर्माण होऊन देवघेवीच्या द्वारे आपणास मिळतो. व्यक्तीला स्वत:च्या शक्तीने जेवढे निर्माण करता आले असते त्याच्या कितीतरी पट जास्त वस्तूंचा उपयोग संस्कृतीच्या वारशाने त्याला मिळतो. हा मोठा फरक माणसांत व इतर सर्व प्राण्यांत असतो. इतर सर्व प्राणी स्वत:च्या श्रमाने मिळेल तेवढेच खातात, तेवढेच बांधतात माणूस पिढ्यानपिढ्यांच्या श्रमाचे खातो व उपभोगतो. मनुष्य भोवतालच्या सृष्टीतून आपल्या उपयोगाचे पदार्थ निर्माण करतो, ती कला इतरांना शिकवतो, ते पदार्थ इतरांना उपभोगास ठेवून जातो. मनुष्ये एकमेकांकडून नव्या कला शिकू शकतात. इतर प्राणी-जातीत प्रत्येक प्राणी तीच तीच कार्यं करीत असतो. माणसे मात्र विविध कार्यात गुंतलेली व असतात आपापल्या कृतींची देवघेव करून जीवनात विविधता व संपन्नता आणतात.
 संस्कृतीचे दुसरे अंग असे ज्ञानेंद्रियांच्या द्वारा दाखवण्यासारखे व पाहण्यासारखे नाही; ते बुद्धिगम्य आहे. हे अंग म्हणजे मनुष्याने सामाजिक जीवन जगण्याची बांधून दिलेली रीत होय. एकमेकांशी वागावे कसे, संघटित जीवन (कुटुंब म्हणून, जात म्हणून, राष्ट्र म्हणून) जगावे कसे, ह्याचे ठराविक साचे असतात. त्याचप्रमाणे धर्म, नीतिमत्ता ह्यांबद्दलही ठराविक कल्पना असतात. ह्या सर्व साचेबंद कल्पना व्यक्तीच्या जीवनाला वळण लावतात व ह्या सर्व परंपरागत् आलेल्या असतात. आई-मूल, नवरा-बायको, भाऊ-भाऊ वगैरे असंख्य कौटुंबिक नाती, सेव्य-सेवक, नायक-अनुयायी, राजा-प्रजा, शिक्षक-शिष्य वगैरे विविध व्यावहारिक नाती व त्यामध्ये परस्परांशी वागणूक ही व्यक्तींची निर्मिती नसते. ही नाती व त्यापरत्वे करावयाची वागणूक जन्माला आल्या दिवसापासून व्यक्ती शिकत असतो. योग्य-अयोग्य, न्याय्य-अन्याय्य, धार्मिक-अधार्मिक, पाप-पुण्य, देव-राक्षस, ईश्वर व सृष्टी ह्या सर्व कल्पना परंपरेने आलेल्या आहेत व व्यक्ती त्या थोड्याबहुत प्रमाणात आत्मसात करते. त्या इतक्या आत्मसात होतात की, त्या स्वत:च्याच असे व्यक्तीला वाटू लागते व देहांधतेने जीव जसा मायाजाळात गुरफटून जातो, त्याप्रमाणे संस्कृतीच्या पसाऱ्यात गुरफटून हे माझे, 'हे माझे,'हे उत्तम', 'हे उत्तम' अशा संभ्रमात व्यक्ती पडते.
 मनुष्यनिर्मित पदार्थमय जग व कल्पनामय जग म्हणजे संस्कृती. इतर प्राण्यांप्रमाणे मनुष्यही पोटाच्या विवंचनेत काळ घालवतो व त्या पोटाच्या विवंचनेतूनच ह्या संस्कृतिमय जीवनाची निर्मिती झाली आहे. प्राचीन काळी पृथ्वीवर मनुष्यवस्ती विरळ, आपल्या पायांखेरीज दळणवळणाचे साधन नाही, अशा वेळी एकमेकांपासून लांब राहणारे मनुष्यसमाज बरेचसे स्वतंत्र असे समाजजीवन जगत असत. ह्या आदिकालात निरनिराळ्या युक्त्या मानवाने हस्तगत केल्या व त्यांच्यात निरनिराळ्या वेळी निरनिराळी भर घातली. मानवाची निर्मिती बीजगुणविशिष्ट व जातीविशिष्ट नसल्यामुळे नित्योपयोगी वस्तुंपासून तो अतिशय कठीण आध्यात्मिक विचारापर्यंत प्रत्येक समाजाची कृती इतर समाजांपेक्षा थोडीथोडी निराळी होऊ लागली व देशकालपरत्वे मानवी संस्कृतीचे निरनिराळे प्रवाह वाहू लागले.
 एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला संस्कृतीची देणगी दिली जात असता तिच्यात प्रत्यही फरक पडत असतो. कोणतीही संस्कृती स्थिर व अचल नसते. काही कालखंडात मोठे फरक पडतात तर एरवी हळूहळू संस्कृती बदलत असते.  कर्ता-करविता कोण?
 व्यक्ती व संस्कृती ह्यांचे परस्पर संबंध काय?
 आपण आताच पाहिले की, व्यक्तीला उपभोग्य वस्तू व व्यावहारिक विधिनियम, वैचारिक विश्व ही समाजाकडून वारशाने मिळतात. स्वत:च्या दोन क्षुद्र हातांनी त्याच्या भोवतालच्या उपभोग्य वस्तूंची निर्मिती झालेली नसते. ताटे, वाट्या, अन्न शिजवायची भांडी, लुगडी-धोतरे, अंथरुणेपांघरुणे, राहते घर, गावातील रस्ते, विजेचे दिवे, भाज्या, धान्य, फळे, साखर-गूळ इत्यादी पदार्थ, पुस्तके, मंदिरे, ह्यांपैकी किती बरे आपण आपल्या हातांनी बनवलेले असते? हे पदार्थ बनवायला लागणारी कला व ज्ञान हे काय एका व्यक्तीने व एका पिढीने निर्माण केलेले असते? तसेच स्वराज्य, सुराज्य, कुटुंब, गावगाडा, पूर्वजन्म, पापपुण्य ह्या समाजसंस्था व मूल्ये काय व्यक्तीने बनविलेली असतात? व्यक्ती ज्या समाजात जन्मते, त्या समाजातील संस्कार उचलते.
 आपल्याभोवतीच्या समाजातील काही लोक हिंदू आहेत, काही ख्रिश्चन तर काही मुसलमान आहेत; पण त्यांपैकी प्रत्येकाला आपापल्या धर्माचा जाज्वल्य अभिमान आहे. पण आपण कधीतरी असा विचार केला आहे का, की ज्या धर्माचे आपण अनुयायी आहोत तो धर्म आपण स्वीकारण्याची कारणे काय बरे? चांगल्या-वाईटाचे तारतम्य येण्याआधीच आपण त्या त्या धर्माचे अनुयायी झालेले आहोत. आपण धर्म स्वीकारला नाही, धर्माने आपणास स्वीकारले आहे, आत्मसात केले आहे.
 संस्कृती सगळ्या इंद्रियांना-कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये व बुद्धी ह्यांना वळण लावते. व्यक्ती ज्या समाजात जन्माला येते, त्या समाजाचे सांस्कृतिक वळण ती उचलते. मराठी आईबाप असल्यामुळे व मराठी कुटुंबात वाढल्यामुळे मी मराठी भाषा बोलते. सर्व भाषांत सुंदर म्हणून जाणूनबुजून निवड करून काही मी मराठी भाषा बोलावयास शिकले नाही. पुण्यात राहणे झाल्यामुळे माझ्या जिभेला बाजरी आवडते व पोटाला ती सोसते. परवाच आगगाडीत एक गृहस्थ भेटले. ते चाकणचे वर्णन करीत होते. बाकी सर्व ठीक आहे; पण ती बाजरी तोंडात घालवत नाही. कधी एकदा सातारचा शाळू खाईनसं झालं आहे!' धान्यनियंत्रणाच्या दिवसात बिचाऱ्या भातखाऊ बंगाली व मद्रासी लोकांचे कसे हाल झाले हे सर्वांना माहीत आहे. व्यक्ती ज्या संस्कृतीत वाढली ती संस्कृती ती उचलते. संस्कृती हीच व्यक्तीच्या, देह व बुद्धीच्या धर्माचा कर्ताकरविता परमेश्वर आहे, असे म्हणणे बरोबर होईल का? संस्कृती हा एक प्रचंड ओघ आहे व व्यक्ती हा त्या ओघांतील एक प्रवाहपतित जीव आहे. अशा तऱ्हेने व्यक्तीच्या व संस्कृतीच्या अन्योन्य संबंधाचे वर्णन करता येईल का?

 संस्कृतीचा निर्माता कोण?
 हे वर्णन एका बाजूने बरोबर असले तरी दुसऱ्या दृष्टीने खरे नाही. संस्कृतीचा निर्माता कोण? संस्कृती साकारते कशात? संस्कृतीत बदल कोण घडवून आणते? अश्म युगातील ओबडधोबड हत्यारे कोणातरी व्यक्तींनीच घडवली असणार; प्रत्येक निर्मिती व्यक्तीकरवीच झाली असणार. पोषाख, खाणे-पिणे, आचार-विचार ह्यांत बदल व्यक्तीच करीत असते. समाज म्हणजे मोठे थोरले हात-पाय व डोके असलेला व सांस्कृतिक क्रिया करणारा कोणी विराट पुरुष नव्हे. कोणत्याही समाजाची संस्कृती काय आहे हे ठरवायचे झाल्यास त्यातील व्यक्तींच्या जीवनक्रमाचे सूक्ष्म परीक्षण करावे लागते व बऱ्याच व्यक्तींना साधारण असे आचारविचारांचे रूप करून त्याला संस्कृती हे नाव द्यावे लागते. दुसऱ्या दृष्टीने व्यक्तीच्या जीवनात संस्कृती ही दैवासारखी म्हणावी लागते. दुसऱ्या दृष्टीने संस्कृतीचा कर्ता, संस्कृती धारण करणारा, तिला थोडथोडी बदलणारा एक-एक माणूस किंवा व्यक्तीच असते हे विसरून चालणार नाही. व्यक्ती ज्या संस्कृतीत जन्माला येईल त्याप्रमाणे तिचा जीवनक्रम ठरेल, हे बऱ्याच अंशी खरे असले तरी व्यक्तीला स्वत:चा जीवनक्रम घडविण्याचीही स्वतंत्रता आहे व तसे करीत असताना सामाजिक संस्कृती बदलण्याचीही शक्ती थोडीफार आहे.
 तरीसुद्धा व्यक्ती संस्कृती निर्माण करते ह्याचा अर्थ काय? एकच उदाहरण घेऊ. ख्रिस्त शकाच्या आठव्या ते दहाव्या शतकात मराठीचा प्रसार झाला. 'महाराष्ट्री' ह्या प्राकृत भाषेपासून मराठी कोणी बनविली? भाषा प्रगल्भ झाली म्हणजे तिच्यावर व्याकरण लिहून तिच्यातील शब्दोच्चारांचे- महाराष्ट्रीतून मराठीत येताना होणाऱ्या फरकांचे नियम बांधता येतात; पण भाषा बनते तेव्हा बोलणा-या व्यक्तींना नव्या होणा-या भाषेचे नियम माहीत नसतात. कित्येक व्यक्तीच्या बोलण्याच्या लकबींनी भाषा बनवली; पण कित्येक वैयक्तिक लकबी लोकमान्यता न मिळाल्यामुळे नष्ट झाल्या असणार. ही नवी भाषा संतकवींमुळे एक साधारण रूप पावून एका मोठ्या प्रांताची अधिकृत भाषा बनली. ह्या सांस्कृतिक क्रियेत व्यक्तीचा वाटा कोणता? समाजाचा कोणता? व्यक्तीच्या क्रियेला ज्या वेळी सामाजिक संमतीचे शिक्कामोर्तब होते, तेव्हा ती संस्कृतीच्या ओघात मिळते व मिळता-मिळता त्या ओघाला वळण लावते. ह्या संस्कृतीच्या असंख्य निर्मात्यांची नावनिशी क्वचितच असते. ते सर्वच उपेक्षिलेले असतात. संस्कृतीतील चांगल्या गोष्टींबद्दल कोणी त्यांचे अभिनंदन करू शकणार नाही किंवा वाईट गोष्टींबद्दल त्यांचा निषेधही करणे शक्य नाही. एकएका व्यक्तीचा भाग क्षुद्र असतो, पण बहुतेक वेळा सांस्कृतिक निर्मिती अभावितपणे होत असते व बहुतेक प्रसंगी व्यक्तीच संस्कृतीच्या आहारी गेलेली असते.

 कर्तृत्व ईश्वराकडे का?
 सर्व जगभर संस्कृती निर्मितीच्या कथा पसरलेल्या आहेत. अमक्या मूळ पुरुषाने अमकी खाद्य वस्तू शोधून काढली, अमक्याने शेतीची सुरुवात केली अशा तऱ्हेच्या त्या कथा असतात. त्यांच्यात ऐतिहासिक सत्य फार थोडे असते. गुंतागुंतीचे सामाजिक व्यवहार व नियम हे भाषेप्रमाणेच एका व्यक्तीने निर्माण केलेले कधीही नसतात. बाबिलोनियाचा राजा हामुराबी याने पहिले कायदे केले असे म्हणत. आता शोधाअंती असे आढळून आले आहे की, तसले कायदे त्याच्या आधी जवळच्या प्रदेशात लागू होते. लहान लहान राज्ये जिंकून मोठ्या प्रदेशाचा राजा झाल्यावर हामराबीने सर्व कायदे एकत्र करून त्यांची सर्व राज्याला लागू पडेल अशी एक जंत्री ऊर्फ संग्रह तयार केला व तो सूर्यदेवाने दिला अशी द्वाही फिरविली. सूर्यदेवाने कायद्यांचा कागद हामुराबीच्या हातात ठेवला अशा तऱ्हेचे कोरलेले चित्र व खाली कोरलेले कायदे असे स्तंभ सापडले आहेत.
 प्रत्येक राजा आपले शासन ईश्वरप्रणीत आहे हे सांगण्याचा अट्टाहास करतो! मनुष्य विचारशील आहे; त्याला माहीत असलेल्या रीतिभातींसंबंधी विचार करून त्यावर कथा रचावयाच्या व त्या चालिरीतींचे कर्तृत्व देवदेवता, मोठमोठे जुने राजे व ऋषि ह्यांच्या माथी मारून द्यावयाचे, हा एक त्यांचा आवडता उद्योग आहे. असे केले म्हणजे त्या चालिरीतींचा दबदबा वाढतो व मनुष्य त्याला मान तुकवितो. पहिल्याने भाषा की पहिल्याने व्याकरण? ह्या प्रश्नाला सर्व उत्तर देतील की, पहिल्याने भाषा म्हणून. तसेच आचारविचार हे पहिल्याने ढ होतात, मग कोणीतरी त्यांचे संकलन करतो व मग त्यांचे कायद्यांत रूपांतर होते व त्यांचे कर्तृत्व देव, ऋषि, मुनी किंवा राजे ह्यांकडे जाते. खरोखरी राजे किंवा ऋषिमुनी कायदे व विधिनिषेध निर्माण करीत नाहीत, समाजसंस्थाही निर्माण करीत नाहीत, समाजसंस्था निर्माण होत असतात; त्यांच्या निर्मितीला अनेक पिढ्यांतील अनेक व्यक्तींचे थोडेथोडे कर्तृत्व उपयोगी पडते; पण त्या व्यक्ती ही निर्मिती, जतन किंवा वाढ जाणूनबुजून करीत नाहीत. ती व्यक्तीच्या कृतीने होत असते. आपल्याला वाटते, आपण जाणूनबुजून कृती करीत असतो; पण पुष्कळदा कृती अजाणतेपणी होते व मग तिचे समर्थन करावयास बुद्धी कारणे पुढे करते. बुद्धी पुष्कळदा कृतीची कर्ती नसून कुशल टीकाकाराचे काम करते, कृतीला संपादून घेते. ह्या क्रियेमुळे प्रत्येक गोष्टीचे मूळ शोधण्यात बुद्धी खर्च होते व मग कथा, पुराणे व इतिहास निर्माण होऊ लागतात.
 भाषा कोणी उत्पन्न केली, हा प्रश्न हास्यास्पद वाटतो. पण संस्कृतीच्या इतर अंगांची निर्मिती कोणी एकाने केली असेल असे वाटणेही हास्यास्पद आहे. विवाहसंस्था कोणी निर्माण केली? नीतिनियम कोणी घातले? भारतात असंख्य जाती कोणी बनविल्या? हेही प्रश्न असेच हास्यास्पद आहेत. विवाहसंस्था निर्माण होऊन कित्येक पिढ्या लोटल्यावर श्वेतकेतूची गोष्ट सांगण्यात आली. यज्ञसंस्था घट्ट मूळ धरून राहिल्यावर अर्थवाद निर्माण झाला. भारतात असंख्य जाती पिढ्यानपिढ्या राहिल्या, त्यांचे परस्पर व्यवहारांचे संबंध रूढीने दृढ झाले व मग कधीतरी मनूने हामुराबीप्रमाणे सर्व व्यवहार एकत्र आणून त्यांची जंत्री केली.

 ह्याची जबाबदारी कुणावर?
 समाजातील चांगल्या गोष्टीची जी अवस्था, तीच वाईट गोष्टींची. की, व्यक्ती विशिष्ट संस्कृतीत जन्मते, त्या वातावरणात वाढते व बुद्धीची वाढ व्हावयाच्या आतच त्या संस्कृतीची मूल्ये आत्मसात करते. ह्या मूल्यांविरुद्ध बऱ्याच व्यक्ती जेव्हा बंड पुकारतात तेव्हा ती बदलतात. पण बंड पुकारणाऱ्या व्यक्तींना काही वेळा यश मिळते; काही वेळा मिळत नाही.
 संस्कृतीत बदल व्हावयास त्या संस्कृतीत जन्मलेल्या व्यक्तींचे गुण व वर्तन जसे कारणीभूत होते, तसेच इतर संस्कृतींशी संबंध आला म्हणजेही परिवर्तनास मदत होते. मानवांच्या समतेबद्दल भारतात बुद्धापासून वैष्णवांपर्यंत निरनिराळ्या व्यक्तींनी व पंथांनी चळवळ केली; पण त्या चळवळीचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही. मानवी समतेची बुद्धाची कल्पना व वैष्णवांची कल्पना मोक्षमार्गाबद्दल होती - सामाजिक व्यवहार, विशेषत: बेटीव्यवहाराबद्दल नव्हती. पाश्चिमात्यांचे एकछत्री राज्य, मिशनऱ्यांची धर्मपरिवर्तनाची चळवळ, स्वातंत्र्ययुद्धाच्या लढाईत पुढा-यांना एकोप्याच्या आवश्यकतेची झालेली जाणीव, 'समता ही एकोपा साधण्याची गुरुकिल्ली होय' ह्या तत्त्वाचे ज्ञान व पाश्चिमात्यांच्या लोकसत्तेच्या कल्पना, ह्यामुळे जातिभेद व अस्पृश्यता ह्या प्रश्नांना चालना मिळाली. ह्या बाबतींतही व्यक्ती प्रभावी की संस्कृती प्रभावी हा प्रश्न विचारल्यास संस्कृती-संस्कृतींच्या संगमाचा प्रभाव जास्त, असेच म्हणावे लागेल. मोठमोठ्या व्यक्तींनी ह्या प्रश्नाला हात घातला, जागृती केली हे खरे; पण त्या व्यक्ती कालकर्त्या होत्या की कालप्रातिनिधिक होत्या, हा प्रश्न परत उरतोच.

 बदल चालू राहणारच!
 संस्कृतीच्या अंगोपांगांची निर्मिती व्यक्तीद्वारे होत असते; पण व्यक्तीला त्याचे कर्तृत्व देता यावयाचे नाही. तरीपण व्यक्ती व वर्ग संस्कृतीच्या निरनिराळ्या अंगांचा भरपूर फायदा घेऊ शकतात व घेतात. ब्राह्मण व वरच्या वर्गाने जातिसंस्थेचा फायदा घेतला हे नि:संशय; पुरुषवर्गाने पितृप्रधान कुटुंबपद्धतीचा फायदा घेतला हेही तितकेच खरे. ज्या समाजव्यवस्थेत एखाद्या वर्गाचा किंवा व्यक्तींचा फायदा होत असतो. तिच्यात बदल करण्यास तो वर्ग व ती व्यक्ती तयार नसते; आणि मानवी बालविवाह, सती, विधवा-वपन, अस्पृश्यता ह्या गोष्टींची निर्मिती एक किंवा काही व्यक्ती मिळून झालेली नाही. व्यक्ती कितीही पाताळयंत्री, आपमतलबी व बुद्धिसागर असली तरी जातिव्यवस्था निर्माण करणे तिला शक्य नाही. केंद्रित राज्यसत्तेचा अभाव, निरनिराळ्या टोळ्यांचे आगमन, अव्याहत चाललेला झगडा व त्यात काही जमातींना मिळालेला विजय, बहुदैवतवाद, यज्ञीय कर्मकांड व त्या अनुषंगाने निर्माण झालेला सोवळ्या-ओवळ्याचा विचार व कर्मठपणा, श्रमविभाग, कारागीर जातींचे संघ वगैरे हजार गोष्टी एकत्र येऊन हळूहळू जातिसंस्थेला सध्याचे रूप आले.
 संस्कृतीच्या अंगोपांगांचा असा एक नियम आहे की, ती एकमेकांना बळकटी आणतात. वाङ्य, धर्म, तत्त्वज्ञान ही सर्व संस्कृतीची अंगे असतात असे नव्हे, तर तिला ती उचलून धरीत असतात. जाती व त्यांतील उच्चनीच भाव दृढ झाल्यावर कधीतरी पुरुषसूक्त रचले गेले. देवाचे वर्णन मनुष्य तरी आपल्यावरूनच करणार. प्रचलित समाजव्यवस्था व त्यांतील मूल्ये अध्याहृत धरूनच सामान्य मनुष्य उपमा व उत्प्रेक्षा देतो. विराट पुरुषाचे वर्णन समाजरूपी पुरुषासारखे झाले ह्याचा अर्थ त्यावेळी समाजव्यवस्था तशी होती व तिची तरफदारी करण्याचा प्रयत्न कवीकडून नकळत झाला. त्याचप्रमाणे प्रचलित समाजव्यवस्थेतील अन्याय्य भेदांची मीमांसा त्यावरून करून त्यांची तरफदारी करण्याचा मात्र प्रयत्न झाला. पूर्वीच्या जन्मांतील पापामुळे ह्या जन्मी हीन जातीत जन्म येतो, असे म्हणून प्रचलित अन्यायाची तरफदारी झाली व जातिसंस्थेला बळकटी आणण्याचे प्रयत्न झाले. स्त्रियांच्या बाबतीत समाजाचा जो अनुदार दृष्टिकोन होता व आहे, त्याबद्दलही अशीच मखलाशी होते; पण स्त्रियांच्याबद्दलचे कायदे कोणी एका व्यक्तीने जाणूनबुजून केले असे म्हणणे सर्वथैव चूक होईल.
 ह्या विवेचनाचा अर्थ असा नव्हे की, समाजव्यवस्थेत दोषास्पद असे काही नाही. ह्याचा अर्थ एवढाच की, समाजव्यवस्थेत किंवा एखाद्या संस्कृतीत चांगले वाईट जे आढळते तिला विशिष्ट व्यक्ती किंवा वर्ग हे फारसे जबाबदार नसतात. संस्कृती बनत असते- अप्रत्यक्षपणे प्रत्येकजण ती घडवीत असतो व त्या प्रमाणात प्रत्येकाचा त्यांत हात असतो. पण इतिहासातील कोठल्याही कालखंडाचा विचार केला तर असे आढळेल बुद्धीच्या नेहमीच्या पद्धतीनुसार असा बदल करणे कसे वाईट आहे, जुन्या समाजसंस्था ईश्वरप्रणीत आहेत, त्या धर्म व नीतीला धरून आहेत वगैरे दाखविण्याचा प्रयत्न केला जातो.
 निरनिराळ्या परिस्थितीत मानवाला जीवनासाठी जो झगडा करावा लागतो त्यांतून सामाजिक जीवनामुळे व भाषेच्या साहाय्याने मानवी संस्कृती निर्माण होत असते व निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या काळी संस्कृती भिन्नभिन्न असते. प्रत्येक माणूस शिक्षणाच्या द्वारे संस्कृती दुसऱ्यास देत असतो व स्वत: ग्रहण करीत असतो. ह्या संक्रमण-ग्रहण क्रियेमुळे संस्कृतीत अव्याहत फरक पडत असतो. जितक्या व्यक्ती तितक्या संस्कृतींच्या प्रकृती असतात, ही गोष्ट भाषेच्या उदाहरणाने स्पष्ट होईल. एका घरची मुले त्याच मातापित्यांकडून भाषा शिकतात; पण प्रत्येकाचा उच्चार निरनिराळा असतो. काही वेळा काही प्रसंगाने काही शब्दांचे विशेष रूप होते व ते त्या कुटुंबात दृढ होते. लहान मूल वहिनीला नन्नी म्हणाले तर तेच नाव पुढे कायम होते. पण हे फरक व्यक्तिगत किंवा कौटुंबिक राहतात व काही सर्वमान्यही होतात. भाषा व्याकरणाने बांधली गेली तरी जोपर्यंत ती बोलभाषा राहते तोपर्यंत व्याकरणात न सांगितलेले कित्येक प्रयोग रोज होत असतात व हळूहळू भाषा इतकी बदलते की, दर शंभर वर्षांनी भाषेचे व्याकरण व शब्दकोश बदलत जातो.
 जी परिस्थिती भाषेची तीच संस्कृतीच्या इतर अंगांची असते, हे अगदी पक्के लक्षात ठेवले पाहिजे. भारतीय संस्कृतीच्या नावाने प्रचार जेव्हा जेव्हा होतो, तेव्हा तेव्हा विचारवंताने मनाशी विचार करावयास पाहिजे की, भारतीय संस्कृती काय बरे आहे? प्रचारकाला संस्कृतीच्या कोणत्या अंगाबद्दल बोलावयाचे आहे? कोणत्या संस्कृतीला उद्देशून प्रचार चालला आहे? की संस्कृती ह्या गोड शब्दाच्या बुरख्याखाली राजकीय सत्तेसाठी प्रचार चालला आहे? केवळ अमकी गोष्ट जुनी म्हणून उत्तमही ठरत नाही वा टाकाऊही ठरत नाही. भारतीय संस्कृती भारतीयांच्या गरजेप्रमाणे बदलणार व तशी बदलल्यामुळे तिचे भारतीयत्व नष्ट होणार नाही.
 गोवधंबदीचाच प्रचार उदाहरणादाखल घेऊ या. वेदकाली मोठे तपस्वी ब्राह्मण व ऋषिमुनी गायीच्या कोवळ्या वासरांचे मांस खात असत. बुद्धाच्या प्रेरणेने हे कमी झाले म्हणावे तर ब्रह्मदेश, चीन व जपान ह्या देशांतून शेकडो बौद्धधर्मानुयायी गायीचे मांस खातात. जैन धर्माच्या प्रेरणेने म्हणावे तर जैनांना सर्वच प्राण्यांचे मांस वर्ज्य आहे. एका काळी गायीला हिंदू पूज्य मानीत; पण तेव्हासुद्धा मृत जनावर खाणाऱ्या काही जाती हिंदू समाजात होत्याच. म्हणजे मांस खाण्यासाठी गाय किंवा बैल किंवा वासरू मारू नये- ती मेलेली असल्यास खाण्यास प्रत्यवाय नाही, असे दिसते. गायीचे दुभते म्हशीपेक्षा चांगले असते व बैल शेतीच्या अत्यंत उपयोगी आहे, ह्या दृष्टीने पाहिले तर, ज्या देशात गोमांस खातात तेथे गायीच्या दुभत्याची काळजी भारतापेक्षा जास्त घेतली जाते व तेथे बैलांची निपजही चांगली होते. गोमांस खाल्ल्याने ह्या दोन्ही गोष्टींना बाधा येण्याचे कारण नाही. एकच कारण राहते; ते म्हणजे सध्या काही लोकांना गाय इतकी पूज्य वाटते की, तिचे मांस खाण्याची कल्पनाही त्यांना सहन होत नाही! काही लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत, तर त्यांच्या आवडीनिवडीला समाजाने कितपत मान तुकवावी असा प्रश्न उरतो. काही लोकांना मशिदीवरून वाद्ये वाजत गेलेली आवडत नाहीत; इतर देशांतून ती वाजवलेली चालतात. अशा वेळी एका वेळच्या जेतेपणाच्या रगीमुळे बसवलेला हा नियम समाजातील इतर लोकांनी पाळावा का? म्हणजे हे प्रश्न संस्कृतीचे नसून रोजच्या व्यावहारिक देवघेवीचे आहेत. इच्छा असली तर दोन्हींतूनही सर्वांना रुचेल अशी वाट काढणे शक्य आहे. पण सत्तेसाठी राजकीय प्रचारच करावयाचा असल्यास अर्थात तडजोड होणे शक्य नाही. मात्र ह्या सर्व भानगडीत बिचाऱ्या भारतीय संस्कृतीचा काडीमात्र संबंध नाही, हे विचारशील माणसाला पटण्यासारखे आहे.

 संस्कृतिपरिवर्तनाचा मंत्र
 संस्कृती बदलत जाते. म्हणजे बदल झाला की, संस्कृती बिघडली असे नव्हे. काही बदल चांगल्यासाठी होतात, काही वाईटासाठी होतात. म्हणून केवळ बदल झाला यासाठी ओरड करणे जसे योग्य होणार नाही, तसेच बदल झालाच पाहिजे यासाठी अट्टाहास करणेही योग्य होणार नाही. समाजसुधारक व राजकारणी पुरुष जाणूनबुजून समाजाला वळण लावण्याचा व सांस्कृतिक प्रवाह बदलण्याचा प्रयत्न करीत असतात. पण अशा लोकांना फक्त एकाच तर्‍हेचा, म्हणजे आपल्याला हवा असलेला बदल तेवढाच इष्ट असतो. त्यांच्या मनातूनही नाफेरवाल्यांप्रमाणे एकाच प्रकारची समाजरचना हवी असते. अशा सुधारकांना सर्वांनी अमुक एका प्रकारेच वागावे असे वाटते व कायदे, वर्तमानपत्रे व रेडिओ ह्यांच्याद्वारा ते आपल्या एकछाप 'सुधारणांचा प्रसार व प्रचार करीत असतात. अशा वेळी व्यक्तीला संस्कृतीच्या कायम ठशातून थोडेसे का होईना, पण बाहेर पडण्याची जी स्वतंत्रता असते ती नष्ट होते. सुधारणांच्या नावाखाली व्यक्तीचे आचारविचारांचे स्वातंत्र्य नष्ट झाल्यास संस्कृतीचे जीवन संपुष्टात येईल. संस्कृतीला खळखळत ठेवणाच्या व्यक्तिरूपी झऱ्याची स्वल्प का होईना, पण नवनवी जीवनाची देणगी नष्ट होऊन संस्कृती म्हणजे साचलेल्या पाण्याचे डबके होईल. म्हणून सुधारकांनी सुधारणेच्या नावाखाली पिंडा-पिंडांत असलेली भिन्न मती दडपून टाकून व्यक्तीला टांकसाळीतल्या नाण्यासारखा एक छाप देण्याचा प्रयत्न करू नये.
 संस्कृती ही समाजातील सर्व व्यक्तींनी बनवलेली असते, हे आपण पाहिले; म्हणून फक्त एका अंगाची सुधारणा करून टाकण्याचा हव्यास चुकीचा आहे. अस्पृश्यता नष्ट करावयाची तर, कायद्याने अस्पृश्यांना समता देऊन भागणार नाही. अस्पृश्यांचे सांपत्तिक व मानसिक दैन्य दूर करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत; पण त्याचबरोबर स्पृश्यांचे मनही शिक्षणाने नवसंस्कारित केले पाहिजे; त्यात मानवतेचे बीज रुजविले पाहिजे. सत्ताधाऱ्यांना वाटते की, कायद्याच्या जोरावर अल्पावधीतच काय हवे ते घडविता येईल. पण संस्कृती म्हणजे देह, इंद्रिये व बुद्धी ह्यांना लावलेले वळण- शिक्षण आहे हे लक्षात घेतले म्हणजे कळून येईल की, समाजसंस्था तर बदलल्या पाहिजेतच; पण त्याबरोबर शिक्षणाचीही तरतूद केली पाहिजे. शिक्षणाशिवाय नवी समाजरचना अल्पायुषी ठरेल. शिक्षणाचा परिणाम ताबडतोब दिसून येणार नाही; पण जेव्हा होईल तेव्हा दरगामी व टिकणारा असा होईल. जुन्या पिढीतील प्रागतिक पक्षाचे अग्रणी सांगत त्याप्रमाणे- 'Education, more education and yet more education.'- हा संस्कृति-परिवर्तनाचा एकमेव मंत्रं आहे. आणि तो एकमेव आहे. याचे कारण शिक्षणाने व्यक्तीचे आचार च विचारस्वातंत्र्य आकुंचित न होता वाढतच जाते.  एखाद्या सामाजातील चांगल्या-वाईटाचे वाटेकरी सर्वच असतात व बदल करताना सर्वांनाच बदलावे लागते. वेश्यांचा प्रश्न हाती घेतला म्हणजे फक्त वेश्यांचीच सोडवणूक करून चालत नाही, तर त्यांच्यावर पोसणाऱ्या व त्याचा उपयोग करणाऱ्या सर्वांचीच सोडवणूक करण्याच्या मार्गाला लागले पाहिजे. अमका अपराधी व अमका बळी असा पंक्तिप्रपंच करून चालणार नाही. एका दृष्टीने सर्वच अपराधी असतात व सर्वच बळी असतात. संस्कृतीबाबतच्या कोणत्याही प्रश्नाचा विचार समष्टीने करावयास पाहिजे.
 संस्कृतीमधील वाईट गोष्टींचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न करीत असताना व्यक्ती किंवा वर्ग ह्यांबद्दल द्वेष किंवा सूडभावना ठेवता कामा नये. वाईट समूळ नाश करावे, वाईटाचे पोषण करणाऱ्या वर्गाची तसे करण्याची शक्ती नाहीशी करावी; पण लक्षात ठेवावे की, सर्वच एका संस्कृतीचे बळी आहेत. समाजसुधारकांची वृत्ती न्यायनिष्ठर पण निर्वेर पाहिजे; नाहीतर सुधारणा न होता नवी वैरे, नवी शल्ये व नवे रोग मात्र निर्माण होतील! ज्ञानदेवांच्या अमृतवाणीने सांगायचे तर --

 अज्ञान प्रमादादिकीं । कां प्राक्तनीही सदोखी ।
 निंद्यत्वाच्या सर्वविखीं । खिळिले जे ।।
 तया आंगीक आपुले । देउनिया भले ।
 विसरविजती सबै । सलतीं तियें ।।
 अशी समाजसुधारकाची व समाजसेवकाची वृत्ती पाहिजे.


- १९५५