आमची संस्कृती/साहेब आणि आमची संस्कृती

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

३. साहेब आणि आमची संस्कृती
 इंग्रज हिंदुस्थानात प्रादेशिक आक्रमण करू लागले त्या सुमारास भारत दुसऱ्या एका आक्रमणातून मुक्त होण्याच्या मार्गावर होता. सहा-सात शतके हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागांवर राज्य करणारी मुसलमानी सत्ता हिंदूंनी खिळखिळी करून टाकली होती. इंग्रज आले नसते तर काय झाले असते ह्याबद्दल तर्कट करण्याचे आपल्याला काही कारण नाही. पण मुसलमानांच्या जवळजवळ एका सहस्रकाच्या संघर्षानंतरचा हिंदुस्थान व दीड शतकाच्या इंग्रजी आमदानीनंतरचा हिंदुस्थान ह्यांची थोडक्यात तुलना करणे आवश्यक आहे.
 महंमदी धर्माचा प्रसार इतक्या झपाट्याने झाला की, महंमदाच्या मरणानंतर पांच-सहा शतकांतच मुसलमानांनी अटलांटिकच्या किनाऱ्यापासून तो पिवळ्या समुद्रापर्यंत आपले पाय पसरले. खुद्द युरोपातून त्यांना माघार घ्यावी लागली. चीनमध्ये त्यांच्या धर्माचा म्हणावा तसा प्रभाव पडला नाही, पण भूमध्यसमुद्रापासून तो चीनच्या सरहद्दीपर्यंतचा प्रदेश बहुतेक सर्वस्वी महंमदी बनला. हा पट्टी बहुतेक अर्धसंस्कृत भटक्या टोळ्यांचे वसतिस्थान होते. खुद्द टायग्रिस युफ्रेटिसच्या दुआबात कित्येक वर्षशतांच्या संस्कृतीचे, काही शहरांतून काही ग्रीक व रोमन लोकांच्या वसतीचे अवशेष तेवढे शिल्लक राहिले. इराणही पोषाखाचे स्थान प्राप्त झाले. मोगलांचे षोक श्रीमंत हिंदूंनी उचलले; मोगल शिल्पकला हिंदूंनी उचलली; असे कितीतरी परिणाम हिंदू जीवनावर मुसलमानी अंमलामुळे झाले. पण हिंदू समाजजीवन मूलत: जसे होते तसेच राहिले. अनेकदैवतवाद, ब्राह्मणांचे पूज्यत्व, काही जातींची अस्पृश्यता, गाईंचे पावित्र्य, गणित व ज्योतिष, न्याय, तर्क, शरीरशास्त्र, तत्त्वज्ञान, काव्य, नाट्य ही सर्व होती तशीच राहिली. उलट जे मुसलमान समाज पंजाब-दिल्लीपासून दूर होते ते उत्तरोत्तर आचारविचारांत हिंदूमध्ये विलीन होतील की काय अशी भीती मुसलमान पुढाऱ्यांना वाटू लागली. इंग्रजी राजवटीत इंग्रजी भाषा व अधिकाराच्या जागा, तसेच राष्ट्रीय पुढारीपण, हिंदूंच्या हाती आले. संबंध मुसलमान समाज हिंदूंच्या मानाने मागासलेला राहिला. मुसलमान सत्ता आली आणि गेली. पण हिंदू समाज पूर्वी होता तेथेच राहिला.
 इंग्रजांचे आक्रमण, त्यांची ही शतकाचीच पण सर्व हिंदुस्थानभर एकछत्री सत्ता व तितक्याच अल्पावधीत त्यांचे तडकाफडकी प्रयाण ह्या तीन घटनांतून संक्रान्त झालेला हिंदू समाज पाहिला तर काय दिसून येईल? इंग्रजांचे सांस्कृतिक ऋण काय? इंग्रज आले व गेले, आम्ही मात्र होतो तसेच राहिलो, असे म्हणता येईल का?
 पूर्वी कोणत्याही राज्यकर्त्यांचे नव्हते असे एकछत्री मध्यवर्ती राज्य भारतावर इंग्रजांनी केले. कोट्यवधी परकीयांवर थोड्या वेळांत परिणामकारक रीतीने त्यांना सत्ता प्रस्थापित करावयाची होती. त्यांना या परकीयांच्या विलक्षण धर्मात फारशी ढवळाढवळ करण्याची इच्छा नव्हती. संबंध युरोप खंडाएवढा देश व त्यांतील निरनिराळ्या भाषा यांच्या संस्कृतीची जोपासना करावयाची नव्हती. म्हणून त्यांनी स्वत:च्या भाषेच्या शाळा काढल्या व त्यांना हवा असलेला हलकासलका अधिकारीवर्ग तयार केला. होता होईतो त्या प्रांतांचे अधिकारी त्या प्रांतातच न नेमण्याची ते खबरदारी घेत. हिंदुस्थानातील कोठल्याही प्रांतातील मनुष्याला वाटेल तितक्या लांबच्या प्रांतात नोकरी करण्याची शक्यता उत्पन्न झाली; व निरनिराळ्या प्रांतांतून भरती झालेला पण नेमणुका व बदल्या या निमित्ताने सर्व हिंदुस्थानातील मोठमोठ्या शहरी जाऊन-येऊन राहणारा असा एक आंतरप्रांतीय नवीनच वर्ग तयार झाला. डोंगरांच्या रांगांनी विभागलेला व जुनी संस्कृती स्मृतिशेष राहिलेल्या देशांपैकी होता, व ह्या पुढारलेल्या केंद्रांतूनही मुसलमानी धर्म पूर्णतया स्वीकारला गेला. चीनमध्ये फार काळ मुसलमानी राजांचा अंमल बसला नाही. थोडेबहुत लोक महंमदाचे अनुयायी झाले, पण मोठ्या जोराने धर्माचा प्रसार झाला नाही. ह्याउलट हिंदुस्थानात मुसलमानांची राज्ये व उपराज्ये १४ व्या- १५ व्या शतकापर्यंत चांगलीच दृढमूल झाली. धर्मांतरही फार प्रमाणात झाले; इतके की आज सर्व जगातील मुसलमानांची लोकसंख्या घेतली तर हिंदुस्थानातील मुसलमानांची सर्वांत अधिक भरते. असे असूनही देश मुसलमानांचा झाला नाही; व मुसलमानही बहुसंख्य लोकांपासून अलिप्त राहिले. ज्या लोकांनी धर्मांतर केले त्यांतील राजधानीजवळचे लोक सोडले तर इतरांनी आपली पूर्वीची भाषा, पोशाख, वगैरे जसेच्या तसेच ठेवले. पूर्व बंगालमधील मुसलमान हिंदूपेक्षा निराळे पडत नाहीत. केरळात तर मुसलमानांनी पूर्वीची मातृसत्ताक कुटुंबपद्धती हिंदूंपेक्षाही जास्त आस्थेने टिकविली आहे. इतकी सांस्कृतिक एकरूपता होत होती की, हिंदूंची जातिसंस्था हिंदी मुसलमानांत सर्वत्र कायम राहिली; राठोड मुसलमान पिढ्यानपिढ्या मुसलमान झाल्यावरही आपण राठोडवंशीय रजपूत होतो हे विसरत नाही. तो हिंदू महाराच्या हातचे पाणी पीत नाही. जरी मुसलमानी लोकसंख्येच्या दृष्टीने हिंदी मुसलमान बहुसंख्य असले तरी पूर्व-पश्चिम सीमेखेरीज इतर सर्वत्र त्यांची संख्या खुद्द हिंदुस्थानात थोडीच राहिली. इतकी सांस्कृतिक एकरूपता असूनही केवळ एकदैवतवादामुळे मुसलमान परकेच राहिले. धर्मयुद्धाच्या वेडाला ते कधी बळी पडतील याचा नेम नसे. जेथे-जेथे त्यांचे राज्य होते तेथे-तेथे इतर धर्मीयांविरुद्ध कायदे असल्यामुळे इतरांची धर्मभावना जागृत राहण्यास मदत झाली. देवळे फोडून वा भ्रष्ट करून मशिदी बनविण्याच्या प्रयत्नामुळे बहुजनसमाजाची त्यांच्याविषयीची परकीयत्वाची भावना जिवंत राहिली, व शेवटी औरंगजेबासारख्या कडव्या मुसलमानामुळे हिंदूंच्या धर्माभिमानाची ज्योत प्रखर होऊन यांतच मोगली सत्ता खाक झाली. मुसलमानी धर्मप्रसारकांमुळे पुष्कळ हिंद मुसलमान झाले; राज्यशासनविषयक वाङमयात उर्दू व फारशी शब्दांचा भरणा झाला; मोगली पोशाखाला काही प्रसंगी सामान्य  एकछत्री अंमलामुळे उत्पन्न झालेल्या एकभारतीय जाणिवेला त्यामुळे जोर मिळाला. ह्या नव्या बुद्धिजीवी वर्गाच्या महत्त्वाकांक्षेची पूर्ती व्हावयास सबंध भारताचे क्षेत्र आवश्यक होते. ह्यांच्याच जोडीला एका नव्या अखिल भारतीय व्यापारी वर्गाचाही प्रादुर्भाव त्या अंमलाखाली झाला. पूर्वीच्या प्रांतिक राज्यांतून बाहेरच्या व्यापाऱ्यांना व कसबी लोकांना आणून शहरांतून त्यांची वस्ती करण्याचा प्रघात होता. पण अशी मंडळी लवकरच त्या त्या प्रांतांत स्थायिक होत, तेथील भाषा शिकत, त्या त्या समाजात लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करीत. इंग्रजांच्या अंमलाखाली ही परिस्थिती बदलली. इंग्रजी पोलीस सर्व प्रांतांतून सारखेच संरक्षण देत व ते संरक्षण पोषक समाजाच्या चांगुलपणावर, व्यापारी व जनता याच्या परस्परसंबंधांवर अवलंबून नव्हते. आपली मायभूमी सोडावी, परप्रांतांतून अलोट संपत्ती आणावी किंवा परप्रांती नोकरी करून द्रव्यसंचय करावा व आणलेल्या पैशातून स्वकीयांची व स्वकुटुंबाची भर करावी असा प्रघात सुरू झाला. परप्रांताबद्दल कधी आत्मीयता उत्पन्न झाली नाही-कधी त्या प्रांतातील लोकांच्या आकांक्षांबद्दल सहानुभूती वाटली नाही- पोटासाठी तसल्या सहानुभूतीचा वरवर देखावा करणेही आवश्यक राहिले नाही. प्रांताभिमानाच्या सीमेपलीकडे जाऊन अखिल भारताच्या प्रेमाचे दिग्दर्शन करणाऱ्यांत ह्या दोन तऱ्हेच्या लोकांचा विशेष भरणा दिसतो. ते आपली मायभाषा, प्रांत व जात कधी विसरत नाहीत. त्यांचा बेटीव्यवहार फक्त स्वप्रांतीयांतच होतो. इतर प्रांतांत ते आपापल्या प्रांतीयांचे भिन्न गट निर्माण करून कोठे महाराष्ट्रीय समाज, तर कोठे मारवाडी समाज, आंध्रसभा, तामीळसमिती, आदिकरून स्थापून इतरांपासूनचे आपल भिन्नत्व कायम ठेवतात. त्यांचा कटाक्ष एवढाच असतो की, नोकरीपुरता किंवा व्यापारधंदा करून पैसा मिळविण्यापुरता भारत एक आहे व तो मर्दाना तसा मोकळा राहावा. इंग्रजांचे स्वत:चे परकीयत्व, सर्व प्रांताबद्दल त्यांची समष्टी, कोठेही बदल्या केल्या तरी चालेल अशा तऱ्हेचा नोकरवर्ग निर्माण करण्याची आवश्यकता व सर्वत्र सारखेच संरक्षण ह्यामुळे ह्या नव्या वर्गाची उत्पत्ती व भरभराट झाली. आज ह्या दोन्ही वर्गाचा प्रभाव भारताच्या राजकारणावर पडलेला दिसतच आहे.
 आमच्या कुटुंबसंस्थेत इंग्रजांनी प्रत्यक्ष ढवळाढवळ फार थोडी केली पण त्यांच्या राजवटीत जुन्या कुटुंबव्यवस्थेत जे फेरफार झाले तेवढे गेल्या हजार वर्षांत झाले नाहीत. काही फेरफार यंत्रयुगाच्या बदललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे झाले, व बरेचसे इंग्रजी समाजजीवनाच्या अनुकरणाच्या इच्छेने आमच्याच लोकांनी केले. इंग्रजांना अगणित कारकून, पट्टेवाले, मास्तर व सैन्यांतील शिपाई लागत असल्यामुळे तरुण पुरुषांना वाडवडिलांचे घर सोडून स्वतंत्र कमाईची शक्यता उत्पन्न झाली. उद्योगधंदे व गिरण्यांमुळे गरीब शेतमजुरांना स्वत:च्या खेड्याबाहेर पोटाचा उद्योग मिळाला, आणि केवळ शेतीवर आधारलेली एकत्र कुटुंबपद्धती हळूहळू नष्ट होऊ लागली. ज्याला कोणत्या तरी जमिनीच्या तुकड्यात मालकी नाही असे माणूस इंग्रजांच्या राजवटीआधी भिकाच्याखेरीज नव्हते. जसजसे लोक पोटाकरिता बाहेरगावी राह लागले. तसतसा त्यांचा मूळ घराशी संबंध कमी होऊन सामायिक कुटुंबातील जमिनीच्या तुकड्याच्या मालकीबरोबर येणाऱ्या सामायिक कुटुंबाच्या कधीही न भागणाच्या गरजा पुरवणे जड वाटू लागले, व हळूहळू अशा सामायिक कुटुंबाशी संबंध तोडण्याकडे प्रवृत्ती वाढत गेली. केवळ नोकरीधंद्यावर पोट भरणाच्या लोकांचा वर्ग निर्माण झाला. आईबाप व मुले, क्वचित एखाददुसरे वडील माणूस, अशी सुटसुटीत कुटुंबे दिसू लागली. ही कुटुंबे शिक्षण घेऊन झपाट्याने पुढे आली. इंग्रजी वाड्यातील कौटुंबिक जीवन हा या समाजाचा आदर्श होता. हिंदुस्थानात झालेले बरेचसे सामाजिक कायदे ह्या समाजाच्या प्रेरणेने झाले; बहुसंख्य लोकांना या सुधारणांची गरज वाटली म्हणून नव्हे. त्या सुधारणांना अतिशय तीव्र विरोधही झाला नाही व त्यांचा प्रसारही झाला नाही. बरेचसे कायदे दफ्तरीच राहिले. बरेच कायदे व्याप्तीच्या दृष्टीने अगदी मर्यादित स्वरूपाचे होते, व बरेच मूलगामी स्वरूपाचे असूनही व्यवहारात निरुपयोगी ठरले. त्यांतील बरेच कायदे विभक्त कुटुंबाच्या गरजेमुळे झाले. स्त्रियांना विभक्त कटुंबात जे महत्त्वाचे व मानाचे स्थान मिळते ते मोठ्या एकत्र कुटुंबात मिळत नाही, व त्यांची स्थिती सुधारण्यासाठीही पुष्कळ कायदे झाले. विलायतेतील स्त्रियांना हक्क मिळविण्यासाठी फार कष्ट पडले, येथील स्त्रियांना ते विनासायास व ते टिकविण्याची पात्रता अंगी येण्याच्या आतच मिळाले. नव्या राजवटीत या बाबतीत पाऊल मागे पडले असे वाटत नाही. स्त्रीशिक्षण, बेताची मुले असलेली सुटसुटीत नागरी कुटुंबे व स्त्रियांना मिळणारा थोडाबहुत रिकामपणा यांमुळे स्त्रिया सार्वजनिक आयुष्यात पुष्कळच वाटा मिळवू लागल्या, आपली खरी व काल्पनिक दु:खे वेशीवर टांगू लागल्या व नवर्‍याच्या बाहेरील नोकरीमुळे मुलांवर सत्ता गाजवू लागल्या. भारतातील स्त्रियांनी तरी एखादा वार्षिक उपास वा सण करून या क्रांतीची आठवण ठेवावी एवढे मोठे इंग्रजी राजसत्तेचे ऋण त्यांच्या डोक्यावर आहे. जी बाब स्त्रियांची तीच खालच्या समजल्या जाणा-या जातींची, विशेषत: अस्पृश्यांची. इंग्रजांनी शाळा, आगगाडी, आगबोट, रस्ते वगैरे सार्वजनिक ठिकाणी शक्य तोवर सर्व जातींना सारखे लेखले. अस्पृश्यांना स्वत:ची, व स्पृश्यांना अस्पृश्यांच्या मानवतेची जाणीव इंग्रजांनी पहिल्याने दिली यांत मुळीच संदेह नाही. राजसत्तेच्या दृष्टीने व धर्मप्रसारकांच्या दृष्टीने ब्राह्मणांचे वर्चस्व कमी करणे इंग्रजांना इष्ट होते; व जरी इंग्रजी शिक्षणाच्याद्वारे ब्राह्मणांची आर्थिक स्थिती सुधारली, तरी भूदेव म्हणून त्यांचे समाजातील वर्चस्व कायम नाहीसे झाले. जन्मजात श्रेष्ठकनिष्ठपणा जाऊन ज्याच्याजवळ पैसा तो श्रेष्ठ ही यंत्रयुगीन विचारसरणी हळूहळू हिंदी लोकांत रुजू लागली आहे. जात्यधिष्ठित समाजधारणा अजून गेली नाही, पण तिचा पाया डळमळला एवढे खरे. कोणी म्हणतील की ही सर्व स्थित्यंतरे यंत्रयुगाची निदर्शक आहेत. इंग्रज नसते तरी जे व्हायचे ते झालेच असते, इंग्रज हे नुसते निमित्त होते. खरे कारण यंत्रयुगच होते. पण यंत्रयुगाशी आमची ओळख इंग्रजांमुळेच झाली व आमची आजची सामाजिक परिस्थिती हा इंग्रजी यंत्रयुगीन संस्कृती व भारतीय संस्कृती यांच्या संघर्षामुळे झालेला यंत्रयुगाचा विशिष्ट आविष्कार आहे हे विसरून कसे चालेल? परकी सत्ताधाऱ्यांनी इंग्रजी भाषेचे शिक्षण दिले तेव्हा भारतीयांना एका नवीनच संस्कृतीचे दर्शन झाले. या संस्कृतीची तुरीचशी अंगे भारतीयांना पटणारी नव्हती, पण मुख्यत: वाङ्मय व शास्त्र यांचे दर्शन दिपवून टाकणारे होते. इंग्रजांचा अखंड स्वातंत्र्याचा हजार वर्षांचा इतिहास, प्रत्येक शतकांमधील त्यांची उज्ज्वल वाङ्मयनिर्मिती, भूगोलावरील त्यांचे आक्रमण व अर्वाचीन शास्त्रांतील त्यांची आश्चर्यकारक कामगिरी यांनी भारतीयांना भारून टाकले. इंग्रजांचे ललित वाङ्मय जसे हृद्य तसेच शास्त्रीय वाङ्यही मूलग्राही, सुलभ व अतिशय वाचनीय असे आहे. इंग्रज जसे स्वतंत्र वाङमयाचे निर्माते आहेत, तसेच परकीयांच्या वाङमयाचे संकलक व भाषांतरकारही आहेत. इंग्रजी भाषेतून सबंध जगाच्या वाङमयाची ओळख करून घेता येते. भारतीय, मधला काही कालखंड वगळला तर, मुख्यत्वे बुद्धिप्रधान असल्यामुळे या नवीन ज्ञानामृतावर आधाशासारखे तुटून पडणार हे ठरलेलेच होते. यासारखे आपण काहीतरी करावे असे त्यांना वाटू लागले, व पाश्चिमात्यांच्या धर्तीवर शिक्षणक्रम येथे सुरू झाले. या नवशिक्षित पिढींतून नवे शास्त्रज्ञ, नवे कलाकार व नवे वाङ्मयनिर्माते पुढे आले. अगदी बोटावर मोजण्यासारखे असामान्य लोक वगळल्यास, ह्या क्षेत्रातील अपिली बहुतेक कामगिरी केवळ अनुकरणात्मक आहे. आम्ही नुसते परपुष्टच नव्हे, तर परागतिक' आहोत; इंग्रजांच्या समाजजीवनात वैचारिक लाटा उसळून जे राजकीय पंथ, शास्त्रीय दृष्टिकोन व वाङमयीन पद्धती उत्पन्न होतात किंवा इतर राष्ट्रांत उसळलेल्या लाटांचे जे वर्णन इंग्रजीच्याद्वारे आम्हांला कळते त्याची पुसट, फिक्या रंगांतील किंवा विकृत भडक रंगांतील प्रतिकृती आम्ही आमच्या सांस्कृतिक जीवनात उठवण्याचा प्रयत्न करतो. कोठल्याही सांस्कृतिक निर्मितीचा पाया स्वानुभूती हा आहे. शास्त्रीय कोडे स्वत:ला पडले पाहिजे, त्याची तळमळ स्वत: अनुभवली पाहिजे, तरच कलेची निर्मिती होऊ शकते. व्यक्ती व समाज यांच्या संबंधांची गुंतागुंत स्वत:च्या जीवनात प्रतीत झाली तर वाङमयनिर्मिती होते, नाहीतर स्वानुभूतीच्या पायाशिवाय 'कर्णिकार सुमनांचे' भरताड काय करायचे? आमची बहुतेक निर्मिती सहानुभूतीतून निघालेली आहे. इंग्रजांनी स्वातंत्र्ययुद्धाबद्दल लिहिले, आम्ही लिहितो; त्यांनी लघुकथा लिहिल्या, आम्ही अनुकरण करतो. त्यांनी कामकरी वर्गाची गाऱ्हाणी गायिली, आम्ही गातो;- त्यांत आत्मप्रत्यय व स्वानुभूती नसल्यामुळे हे। सर्व वाङमय, शास्त्र व बरीचशी कला कशी निर्जीव वाटते.
 सत्ताधाऱ्यांबद्दल द्वेष, मत्सर वाटला तरी त्यांचे अनुकरण जितांकडून प्रत्यही होत असते. स्वत:च्या अज्ञानाची, रीतीभातींची, आचारांची व धर्माची लाज वाटणे व शक्य ते करून बोलण्याचालण्यात व पोशाखात आपण त्यांपासून भिन्न नाही हे भासविण्याचा प्रयत्न होणे हे पराजित मनोवृत्तीचे निदर्शन आहे, व असले निदर्शन भारतातील सर्व प्रांतांतून सुशिक्षित व पुढारलेल्या लोकांनी केले. मायभाषेपेक्षा उर्दूच भाषा जास्त चांगली येते, ही प्रौढी जसे मुसलमानी राज्यकर्त्यांच्या सहवासातील कित्येक लोक मारीत, तशीच प्रौढी आम्हांला स्वभाषेपेक्षा इंग्रजीच छान बोलता येते' म्हणून नवशिक्षित मारू लागले. स्वत:चा पोशाख व रीतीरिवाज टाकून मुसलमानांचे अनुकरण झाले तसेच अनुकरण इंग्रजी पोशाख रीतीरिवाज यांच्या बाबतीत झाले. स्वत:च्या धर्माची, पोशाखाची, तसेच दैवतस्वरूपाची चेष्टा हे सुधारकत्वाचे पुढारलेपणाचे लक्षण झाले. कोठच्याही देशाचे रितिरिवाज, धार्मिक समजुती व पोशाख ही तर्काच्या कसोटीला कधीही उतरणे शक्य नाही हे तत्त्व न उमजल्यामुळे आगरकरांसारखे लोक आपल्या रीतिरिवाजांवर हास्यास्पद टीका करीत, व त्या टीकेचे निराकरण, तितक्याच हास्यास्पद रितीने सनातनी करीत. ही प्रथमारंभीची आत्मनिंदा व दैन्य लवकरच उदयास आलेल्या राष्ट्रीय भावनेने नाहीसे झाले, पण आत्मगौरव व इंग्रजनिंदेचे एक नवीन तंत्र सुरू झाले. स्वत:च्या लघुत्वाच्या जाणिवेचा आविष्कार मनुष्य दोन तऱ्हांनी करतो- एक आत्यंतिक दैन्य दाखवून व दुसरे आत्यंतिक प्रौढी मारून. राष्ट्रीय लढ्याच्या युगातील दैन्यदर्शन हे या दुसऱ्या प्रकारचे होते. मात्र आमचे वाङमय किती उच्च दर्जाचे होते हे दाखविताना कालिदासाच्या शाकुंतलाबद्दल गटे काय म्हणाला हे सांगावयास या नव्या पिढीतील विद्वान कधीही विसरत नसत!
 समाजाचे जीवन सुसूत्र होण्यास सर्व समाज साधारणपणे मान देतो अशी परस्परसंबंधांची बांधणी पाहिजे. समाजव्यवहाराशी विधिनिषेधाचे नियमन पाहिजे. विधीसाठी चोदना व निषेध व्यवहारात उतरविण्यासाठी निबंधात्मक सत्ता पाहिजे, व ही चोदना आणि निर्बंध केवळ पिनल कोडावर अवलंबून न राहता दृढमूल झालेल्या सामाजिक मूल्यांवर अधिष्ठित पाहिजे. समाजाचे ध्येय, समाजातील नैतिक मूल्ये, धर्म व तत्त्वज्ञान या संस्कृतीवरच राष्ट्र उभे राहणे व भरभराटणे शक्य आहे. आज आमचे जीवन केवळ अनुकरणात्मक आहे. व्यक्तींनी काय करावे ते सुचत नसल्यामुळे निरनिराळ्या अर्वाचीन ऋषींचे आश्रम रामेश्वरापासून हिमालयापर्यंत या अगतिक जीवांनी भरलेले आहेत. सामाजिक ध्येये आखली नसल्यामुळे इंग्रजांच्याकडून घेतलेल्या शब्दांच्या पोकळ चौकटीत निरनिराळ्या राजकीय व सामाजिक चळवळींच्या कसरती चाललेल्या आहेत. dynamic and the static (गतिमान, स्थितिमान) forward progressive, backward, stagnant (पुरोगामी- बुसरलेले, सनातनी) democracy-dictatorship (लोकशाही, हुकूमशाही), creative, destructive (विधायक-विनाशक), अशी ही केवढी तरी लांबलचक शब्दांची मालिका देता येईल. या शब्दांच्या खुराकावर आपण जगणे शक्य नाही. हिंदी संस्कृतीच्या नावाखाली भारत नाट्य व नृत्य, जुनी शिल्पकला, जुन्या तऱ्हेची दागदागिन्यांची घडण, जुने विणकर व कारागीर यांना थोडाबहुत पैसा आज मिळत आहे; पण हा मान म्हणजे क्षणभंगुर फॅशनची लहर वाटते. नाट्य, नृत्य, शिल्प ही सर्व एकेकाळी चैतन्याने स्फुरणऱ्या पण पुष्कळ वर्षांपासून मरू घातलेल्या एका उज्ज्वल संस्कृतीचे अश्मीभूत अवशेष आहेत. जोपर्यंत ती परंपरागत संस्कृती परत नव्या जोमाने, नव्या शरीराने उठणार नाही, तोपर्यंत संस्कृतीची बाह्य चिन्हे केवळ सांगाडेच राहणार. ही सौंदर्याची प्रतीके बहुजनांच्या हृदयांत खेळत असलेल्या संस्कृतीचे मूर्तिमंत शरीर न राहता, श्रीमंतांची खेळणी राहतील. आमची सांस्कृतिक मूल्ये कोठच्याच बाबतीत ठरलेली नाहीत. आमच्या परंपरागत संस्कृतीच्या प्रत्येक अंगाचा आम्ही धिक्कार करतो. तथापि ती संस्कृती तीन हजार वर्षे सारखी बदलती पण अखंड राहिली आहे, तिला नव्या स्वरूपात आणता येईल. पूर्वीची मूल्ये परत नव्याने पारखून घेतो येतील, हे आम्ही विसरलो आहो. इंग्रज गेल्यानंतर अजून आम्ही स्वतंत्र संसार करू लागलो नाही. जर सांस्कृतिक मूल्ये ठरवली नाहीत तर नावाने स्वतंत्र राहून कोठल्या तरी पाश्चिमात्य राष्ट्राचे उपग्रह म्हणून आपल्याला कायम राहावे लागेल.
 आमच्या भ्रमिष्ट परिस्थितीचे दर्शन मिळण्यास लांब जाणे नको. समाज व राष्ट्र यांच्या जीवनास आवश्यक असलेल्या कितीतरी लहानमोठ्या प्रश्नांवर आज एक तर आम्ही मुग्धता तरी स्वीकारतो किंवा आज बोललेले उद्या विसरतो हे पुढील उदाहरणांवरून दिसून येईल. आमचे राष्ट्रगीत काय असावे? आमची राष्ट्रभाषा काय असावी? राष्ट्रातील प्रांत भाषावार असावेत की नसावेत? शिक्षण कोणत्या धर्तीवर असावे? भांडवलवाल्यांवर निर्बध घालावेत की नाहीत? हिंदुस्थानात लोकसंख्येचे नियोजन असावे की नाही? सर्वांना धान्य पुरेल इतके पिकत नाही; अशा परिस्थितीत धान्यवाटप व नियोजन असावे की नाही? न्याय व पोलिसखाते यांची फारकत व्हावी की नाही? एकीकडून सर्वस्वी केंद्रित सत्तेबद्दल बोलून लगेच सर्वस्वी स्वयंपूर्ण खेड्यांची गोष्ट कशी काढता येईल? Secular state म्हणजे काय? राष्ट्रांतील अधिकाऱ्यांनी जाग-जागी गांधीजींचे केलेले रक्षाविसर्जन, गव्हर्नर जनरलांनी बिर्ला मंदिरात (लक्ष्मीनारायण मंदिर) केलेली प्रार्थना ही Secular state शी सुसंगत आहेत का? हिंदू म्हणून घेतल्याने राज्यकारभारात कोणता फरक पडेल?
 अशा परिस्थितीत इंग्रजांनी गेल्या शंभर वर्षांत आम्हांला काय दिले हा प्रश्न नसून, आमच्या समाजाची धारण करण्यापुरते काही ठेवले आहे का? सांस्कृतिकदृष्ट्या आम्ही परत स्वतंत्र होण्याची काही आशा आहे का? हे अगदी निकडीचे प्रश्न आपणांपुढे आहेत. इंग्रजांच्या शंभर वर्षांच्या अमदानीत आमची जुनी समाजव्यवस्था पार नाहीशी झाली नाही. जुन्या समाजव्यवस्थेचे बाह्य स्वरूप, बऱ्याच बाबतीत टिकून आहे, पण ती जीव नसलेला पोकळ कोबा आहे. आम्हांला जे हवे ते नवे अर्थशास्त्र, नवं राज्यतंत्र, नवे विज्ञान हे नसून नवे समाजशास्त्र हवे आहे. ते आले व जीवनाची मूल्ये काय, हे ठरले म्हणजे बाकीची सामाजिक जीवनाची क्षेत्र आपोआपच निश्चित रूप घेतील. नवे समाजशास्त्र होईल ते आपल्या सांस्कृतिक परंपरेचे स्मरण ठेवून होईल की केवळ पाश्चात्याच्या अनुकरणाने होईल, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तीन हजार वर्षांच्या अखंडित संस्कृतीचे आम्ही वारस आहोत. ती संस्कृती लवचिक, प्रगमनशील व काळाप्रमाणे बदलणारी आहे. तिच्यात साचलेल्या घाणीबरोबर अविनाशी मूल्ये आहेत. घाण टाकून, ती मूल्ये पाखडून घेतली तर समाजधारणा होईल. त्यांत आपल्या संस्कृतीचे स्वतंत्र रूपएका मानवतेचे दिक्कालांतर्गत झालेले विशिष्ट दर्शन- कायम राहून तो नव्याने फोफावेल, व व्यक्तीच्या व राष्ट्राच्या जीवनातील अगतिकता जान आपण परत सर्व दिशांनी संपन्न होऊ; नाहीतर कोणत्या ना कोणत्या तरी पाश्चिमात्य राष्ट्राचा उपग्रह म्हणून भ्रमण आपल्या नशिबा येईल.

- १९४८