अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha)/बँकांची व्यंकटी सांडो

विकिस्रोत कडून


बँकांची व्यंकटी सांडो


 क संप अधिकाऱ्यांचा
 ५ मे रोजी राष्ट्रीयीकृत बँकांचा अधिकारीवर्ग एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर गेला. त्यांच्या मागण्या काय होत्या हे फारसे स्पष्ट झाले नाही. राष्ट्रीयीकृत बँकांमधील उधळमाधळ थांबवावी. तोटा कमी करावा, घाट्यातील शाखा बंद कराव्यात, असे आदेश शासनाकडून निघाले आहेत. याच धर्तीचे आणखी काही आदेश निघण्याची शक्यता आहे. बँकांना शेअर बाजारात ४९ टक्क्यांपर्यंत भांडवल गोळा करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे संचालक मंडळावर व्यावसायिक दृष्टीचे लोक येतील आणि बँक कर्मचाऱ्यांना काम करायला सांगतील अशीही भीती कर्मचाऱ्यांना वाटत असावी. खासगी क्षेत्रात नवीन बँका उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे आणि काही परदेशी बँका हिंदुस्थानात प्रवेश करू लागल्या आहेत. त्यांच्या स्पर्धेचाही धोका बँक कर्मचाऱ्यांना वाटत असावा. राष्ट्रीयीकृत बँकांची मक्तेदारी तोडण्याच्या प्रयत्नांना विरोध करणे हा संपाचा प्रमुख हेतू. त्याबरोबर तोंडी लावणे म्हणून काही पगारवाढीच्या वगैरे मागण्या असाव्यात.
 ५ तारखेला संप झाला. देशभरच्या सगळ्या बँकांचे कामकाज ठप्प झाले. संप यशस्वी होणार यात कोणाला काहीच शंका नव्हती. संप बँकअधिकाऱ्यांचा होता; पण अधिकाऱ्यांची सही घेतल्याखेरीज कर्जाचे व्यवहार तर सोडाच; पण खात्यात पैसे जमा करून घेण्याचे किंवा खात्यातून रक्कम काढण्याचे व्यवहार कसे काय होऊ शकणार? अधिकारी अधिकृतरीत्या संपावर राहिले आणि कर्मचारी कामावर आले. काम नसल्यामुळे चकाट्या पिटण्याला, चहा पिण्याला आणि इकडे तिकडे फिरण्याला एरवीपेक्षा जास्त वेळ मिळाला एवढेच.
 एक संप कर्मचाऱ्यांचा
 ११ मे रोजी पुन्हा एक दिवसाचा लाक्षणिक संप झाला. या वेळी अधिकारी कामावर होते; पण कर्मचारी कामावर नव्हते. ११ तारखेची निवड संपासाठी मोठ्या हुशारीने करण्यात आली होती. १२ ला शिवजयंतीची सुटी, १३ अक्षय्य तृतीयेचा एक कामाचा दिवस की नंतर १४ आणि १५ ला शनिवार आणि रविवार अशी मोठी नामी युक्ती कर्मचाऱ्यांच्या युनियनने आखली होती. त्यानंतर २४ मे आणि २-३ जून या दिवसांच्या संपाचेही कार्यक्रम जाहीर झाले होते. यंदा लाक्षणिक संपांच्या दिवसांची एकूण संख्या सात.
 एक बँकीय अनुभव
 रोख पैशाची विशेष गरज पडल्यामुळे मी स्वतःच पैसे काढण्याकरिता बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेलो. काउंटरपाशी एकही कर्मचारी बसलेला नव्हता. काऊंटरमागील टेबलांवर मात्र अर्धा डझन अधिकारी आपली थकीत कामे उरकत असल्याचे दिसत होते किंवा भासवत होते.
 त्यातील सर्वांत जवळच्या एकाचे लक्ष मी वेधून घेतले आणि मला पैसे काढायचे असल्याचे सांगितले. हा अधिकारी माझ्यासारख्या कोणा प्रश्न विचारणाऱ्याची उत्सुकतेने वाट पाहत असावा असे दिसले. मोठ्या विजयी सुहास्य मुद्रेने 'आज बँकेत कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे सर्व व्यवहार बंद असल्याचे' त्यांनी सांगितले.
 बँकेत काही कर्मचाऱ्यांचा संप असणे ही बँकेची अंतर्गत बाब आहे. त्यात मला काही स्वारस्य नाही. मला माझे पैसे, बँकेकडे जमेसाठी ठेवलेले परत हवे आहेत, बँकेची ती कायदेशीर जबाबदारी आहे, असे काहीसे ऐकवल्यानंतर तो अधिकारी म्हणू लागला, "मी या शाखेतील अधिकारी नाहीच - मी लेखा परीक्षेकरिता येथे आलो आहे." आवाज ऐकून शाखाप्रमुख बाहेर आले. नमस्कार- चमत्कार केला. आत येऊन खोलीत बसा अशी आदरातिथ्याची विनवणी झाली; पण मी काउंटरसमोर राहून पैसे काढणार आहे असे सांगितल्यावर सगळे आदरातिथ्य बाजूला झाले आणि 'कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे काही व्यवहार होणार नाहीत,' असे त्यांनी विनम्रतेने; पण खंबीरपणे सांगितले. मी युक्तिवाद घातला- 'आज बँकेची सुटी नाही, माझ्या खात्यात पैसे आहेत, ते देण्यास बँकेने नकार दिला तर कायद्याप्रमाणे हा गुन्हा होतो, बँकेने दिवाळे काढले आहे असा त्याचा अर्थ होतो;' पण शाखाप्रमुखांची भूमिका पक्की. 'आता तुम्हाला आम्ही काय सांगणार? पण आज पैशाचा व्यवहार होणे शक्य नाही. कारण कॅशियर सगळे संपावर गेले आहेत.'
 वरती विचारून सांगतो
 माझ्या चेकवर तो स्वीकारता येत नाही. असे शाखाप्रमखांनी सहीशिक्क्यानिशी लिहून द्यावे असा मी आग्रह धरला. अद्यापपर्यंत इतक्या संपात अशी विनंती साहेबांना कोणी केलेली नसावी. दुसरा कोणी ग्राहक असता तर त्याला त्यांनी सरळ आणि सहज उडवून लावले असावे. काउंटरपाशी उभे राहून, मी हुज्जत घालत असताना दर मिनिटा, दोन मिनिटाला कोणी ना कोणी ग्राहक बँकेच्या दरवाजातून आत येत होता. काउंटरवरची सामसूम आणि सुनसुनाट पाहिल्यावर 'आज पुन्हा बँकेत संप आहे वाटते!' असे म्हणून तोंड वाकडे करून निघून जात होता, अधिकाऱ्यांकडे कोणतीही तक्रार न करता अटीतटीला पडलेला मी एकटाच होतो.
 चेक वटवता येत नाही हे लिहून द्या, ही मागणी ऐकून शाखाप्रमुख अडचणीत पडले. 'वरच्या ऑफिसरला फोन करून विचारतो,' म्हणाले, 'चाकणमध्ये फोन व्यवस्था आहे. नव्याने S.T.D व्यवस्थाही चालू झाली आहे. गावात फोन नसता किंवा बँकेचा फोन बंद असता, तर साहेबांनी काय केले असते कोण जाणे! साहेबांनी पुण्याच्या प्रमुख कार्यालयास फोन लावला. मध्यंतरी मी काउंटरपाशी उभाच. लोक सतत येत होते. काम बंद पाहून परत निघून जात होते. साहेबांचा ट्रंककॉल काही लागेना.
 बँकेच्या शेजारच्या इमारतीतील सामानाच्या वखारीचे मालक बँकेत डोकावून गेले. मला नमस्कार करून हालहवाल विचारते झाले. मी सत्याग्रह करून बसलो आहे, याचे त्यांना काही आश्चर्य वाटण्याचे कारण नव्हते, चाकणभर मला ओळखतात. वखार मालकांनी बँकेच्या साहेबांपुढे एक प्रस्ताव मांडला. साहेबांना का खोळंबवता? तुमचा ट्रंककॉल कधी लागायचा? माझ्या वखारीत या, माझ्या खर्चाने S.T.D कॉल लावा. साहेब प्रस्ताव मान्य करतील असे मला वाटले नव्हते. S.T.D कॉलचे पैसे अर्थात द्यावे लागणार नव्हते; पण आगाऊ ग्रहकाला परस्पर अद्दल घडवण्यासाठी टेलिफोन बांधवांची दिरंगाई साहेबांना तशी सोयीस्कर होती. त्यांनी वखारीत जाऊन फोन करण्याचे मान्य केले. साहेब गेले, मग बाकीच्या अधिकाऱ्यांना माझ्याकडे लक्ष देण्याचे काही कारण नव्हते. मिनिटामागून मिनिटे गेली. अर्धा तास होऊन गेला. पुण्याचा फोन लागला; पण पुण्याच्या कार्यालयातील उच्च अधिकारी जागेवर नव्हते, पुन्हा एकदा फोन वाजला; पण निर्णय काही मिळाला नाही. कदाचित् पुण्याच्या अधिकाऱ्यांना मुंबईच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करण्याची आवश्यकता भासली असावी. पुण्यात मोफत S.T.D फोन करू देणारा वखारवाला दुर्मिळच. त्यामुळे मुंबईहून आदेश मिळायला वेळ लागत असावा.
  'बँक कर्मचारी बाहेर हाती लागला, तर...'
 शेवटी, चांगल्या ताससव्वातासाने शाखाप्रमुख वखारीतून आले. आपल्या केबिनमध्ये गेले. लघुलिपिकाला बोलावून घेतले आणि नंतर बाहेर येऊन माझ्या हाती एक पत्र दिले. या पत्राची छायालिपी मोठी बघण्यासारखी आहे. 'कर्मचाऱ्यांच्या एका संघटनेचे सभासद आज संपात सामील झाले आहेत. त्यामुळे आज आम्ही कॅश व्यवहार सुरू करू शकलेलो नाही. आम्ही आपल्या सदर चेकचे पेमेंट करू शकत नाही. इ.इ.
 कामगारांनी आपापल्या मागण्यांकरिता संप करावा हे समजण्यासारखे आहे. बँककर्मचाऱ्यांचे पगार, त्यांचे भत्ते, त्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती, घरबांधणीची कर्जे हे सर्वांना ठाऊक आहे. घाईगर्दीत असलेले ग्राहक काउंटरच्या पलीकडे बसलेले. घड्याळ्याच्या काट्यांवर नजर लावून चुळबूळ करीत आहेत. बँककर्मचारी गप्पा मारत रमतगमत आपली कामे चालवत आहेत. काउंटरवरील ग्रहकाचे काम चटकन् संपवण्याऐवजी काउंटर बंद झाल्यानंतर करावयाची कामे हिशेबठिशेब बिनधास्तपणे आधीच उरकून घेत आहेत, हे पाहिल्यामुळे ज्याचा संताप झाला नाही असा कोणी ग्राहक नसेल. बँकेकडून कर्ज वगैरे हवे असेल तर कर्मचारी आणि अधिकारी मंडळी कर्जदाराला कशी लुटतात हे प्रख्यात आहे. यातील एखादा कर्मचारी कधी बँकेच्या बाहेर सापडला, तर त्याचे काय करता येईल याची दिवास्वप्ने पाहत बँकेचे ग्राहक ताटकळत प्रतीक्षा करीत तासन्तास उभे राहतात. हे सगळे खरे. बँक कर्मचाऱ्यांनी संप करावा हे योग्य नसेल, दुष्टपणाचे असेल, गुन्हेगारीचे असेल; पण समजण्यासारखे आहे.
 हे कसले नादान व्यवस्थापन ?
 माझी तक्रार संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल नाही, कामावर असलेल्या अधिकाऱ्यांबद्दल आहे; बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख कार्यालयातील सर्वोच्च अधिकाऱ्यांबद्दल आहे.
 या सर्व अधिकाऱ्यांनी संपकाऱ्यांशी संगनमत केले आहे. अमुक एक तारखेला संप होणार असे कळल्यानंतर जनतेची गैरसोय कमीत कमी कशी होईल आणि बँकेचे व्यवहार जास्तीत जास्त सुरळीतपणे कसे चालतील याची व्यवस्था बँकेच्या प्रशासनाने आणि अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे होती. संपाच्या आदल्या दिवशी संपकाळात आवश्यक इतकी रक्कम शाखा प्रमुखांनी आपल्या हाती घेऊन, निदान तातडीची गरज असलेल्या ग्रहकांच्या गरजा पुऱ्या करण्याची व्यवस्था सहज करता आली असती. कर्मचारी संपावर गेले, तरी उपस्थित अधिकाऱ्यांना जितकी सेवा देणे शक्य होते तितकी देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक होते. अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने असा काही काडीमात्रही प्रयत्न केला नाही. उलट, संपकऱ्यांची लढाई म्हणजे आपली लढाई आणि संपकऱ्यांचा विजय आपलाच विजय अशा थाटात ते वावरत होते.
 टपाल खात्यातील संपात, अधिकारीवर्ग आठ आठ दिवस अक्षरशः 'अहर्निशम् सेवामहे' या खात्याच्या ब्रीदवाक्यास जागताना मी पाहिला आहे. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांनी संप केल्यावर डॉक्टरमंडळी साफसफाईच्या कामात गढलेली मी पाहिलेली आहेत. लोकांचे पैसे लोकांना देण्याची टाळाटाळ संपाच्या निमित्ताने करणारे बँकव्यवस्थापक त्यांच्या पदावर बसण्यास आणि बँकर म्हणवून घेण्यास पात्र नाहीत.
 संपानंतर माझे मत अधिक ठाम झाले. खासगी बँका येऊ देत, परदेशी बँका येऊ देत, अगदी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बँका येऊ देत; पण राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्मचाऱ्यांची नांगी ठेचणे आवश्यक आहे.
 आमच्या नशिबी अशी बँक सेवा कधी येईल?
 स्टार टेलिव्हिजनवर एका बँकेची जाहिरात येते. बँकेकडून कर्ज कसे मिळवावे याची चौकशी करण्याकरिता एक नवखे ग्राहक बँकेस फोन करते. देशी बँकांच्या सवयीप्रमाणे अर्ज कोणत्या फॉर्मात करावा लागेल, सोबत कागदपत्र काय जोडावे लागतील, कोणाचे दाखले घ्यावे लागतील, गहाण काय ठेवावे लागले इ. प्रश्न तो मोठ्या काकुळतीने बँकअधिकारी बाईस विचारतो. ती प्रत्येक प्रश्नाला हास्यमद्रेने उत्तर देते, 'त्याची काहीच गरज नाही.' हे संभाषण दोनतीन मिनिटे चालते आणि शेवटी बँककर्मचारी बाई ग्राहकाला म्हणते, 'पण, तुमचे कर्ज मंजूर झाले आहे.'
 राष्ट्रीयीकृत बँकांची सद्दी संपो, दुरितांचे तिमिर जावो आणि ग्रहकांवर अरेरावी करणाऱ्या देशी मग्रूर बँकसाहेबांचा निःपात होवो, जिद्दीने स्पर्धा करून ग्राहकांना अधिकाधिक सेवा देणाऱ्यांचा सूर्य लवकर उगवो, अशी प्रार्थना करण्यापलीकडे आपल्या हाती काय आहे?

(६ जून १९९४)

◆◆