Jump to content

अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha)/उद्योजकाच्या वाटे:खाचखळगे, काटेकुटे

विकिस्रोत कडून


उद्योजकाच्या वाटे :खाचखळगे, काटेकुटे


 र्थिक सुधारांचा बोलबाला सुरू झाल्यानंतर शेतीकडे अनेकांचे डोळे वळले आहेत. शेती म्हणजे गबाळ आणि गावठी काम ही मार्क्सची भूमिका सर्वसाधारणपणे सगळ्यांच्याच मनात ठसलेली. उद्योगधंदा काढायचा किंवा व्यवसाय करायचा म्हणजे व्यापार करावा, निर्यात करावी, एखादा कारखानदारीचा प्रकल्प उभा करावा... या सगळ्यांसाठी पाहिजे तर बँकांचे कर्ज मिळवावे: सबसिडी तर अवश्य मिळवावी. उद्योजकता म्हणजे शहरी व्यवसाय अशी सर्वसाधारण समजूत स्वातंत्र्यकाळानंतर लोकांच्या मनात पक्की रुजविली होती.
 शेतीला प्रतिष्ठा
 गेल्या ४-५ वर्षांत परिस्थिती थोडी बदलू पाहत आहे. द्राक्ष बागायतदारांनी 'लंडनपार' घोडे नेले. ताजे गुलाब किंवा शुष्क पुष्पे परदेशी बाजारपेठेत जाऊ लागली, तेव्हा शेतीचीही थोडी प्रतिष्ठा वाढली. इतके दिवस बिगरशेतकरी माणसास शेती घेण्यासही मज्जाव होता. शिकलेले संपन्न शेतीच्या क्षेत्रात आले, तर ते जणू सगळ्या गोरगरीब शेतकऱ्यांचा चट्टामट्टा करून टाकतील असा कांगावा केला जाई. त्याऐवजी आता महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्यांकरितासद्धा शेतीची कवाडे उघडू लागली आहेत. कंपनीच्या शेतीकरिता कमाल जमीनधारणेचा कायदा लागू नाही, कूळकायदा त्यांच्याकरिता बाजूला ठेवला जाईल, शेती-बिगरशेती ही भानगड त्यांना लागू राहणार नाही अशा गोष्टी बोलल्यातरी जाऊ लागल्या. अजून काही कोणी बहुराष्ट्रीय कंपनी शेतीच्या क्षेत्रात मोठी कामगिरी करून गेली आहे असे उदाहरण नाही. याउलट, शेतीमालावर प्रक्रिया करण्याच्या क्षेत्रात अनेक देशी-विदेशी कारखानदार उतरत आहेत. त्यामुळे अगदी साध्या किराणा मालाच्या दुकानात उभे राहिले, तरी चणे-शेंगदाणे, चिवडा-चकल्या, चिप्सचिजलिंग असे शेकडो पदार्थ दुकानात दिमाखाने बसलेले दिसतात. चटण्या, पापड, लोणची, खाकरे यासारखे देशी टिकाऊ पदार्थ; इडली, डोसे असे पदार्थ झटकन घरच्याघरी तयार करता यावेत यासाठी लागणारी पिठे; ढोकळे, वडे असे तयार पदार्थ यांची मोठी गर्दी उसळली आहे. जॅम, सॉस ही विलायती तोंडवळ्याची टिकाऊ मंडळी, केक-पुडींग करण्याकरता लागणारे साहित्य आणि पिझ्झा, आईस्क्रीम यासारखे खाद्यपदार्थ त्यांच्याबरोबर मोठ्या दिमाखाने कोणत्याही ठिकाणी उभे दिसतात.
 शहरी गृहिणींची खाद्यप्रक्रिया
 माजघर शेतीचा कार्यक्रम संघटनेने जाहीर केला त्यामुळे काही ठिकाणी शेतकरी स्त्रियांनी कुरडया, पापड्या, शेवयांपासून थालीपीठ, चकल्या यांना लागणाऱ्या भाजण्या वगैरे वस्तू बाजारात आणल्या; पण या क्षेत्रातही शहरी महिलांनी जास्त आघाडी मारली. पदार्थ खरेदी करणारा ग्राहकवर्ग प्रामुख्याने शहरी; त्याच्या चव, रुची, गंध, स्वाद यांबद्दलच्या आवडी-निवडी शहरातील महिलांना अधिक चांगल्या माहीत. गावात ठेवणीचे पदार्थ करायचे म्हटले तरी उरलासुरला, पडका माल वापरला जातो. बाजारात जे बटाटे पाठवता येत नाहीत त्यांचा आम्ही कीस करतो. ती गोष्ट कैऱ्यांना लागू, लिंबांनाही व सर्वच भाज्या-फळांना. मुद्दाम चांगले पदार्थ घ्यावेत, ते केवळ टिकावे एवढ्याचकरिता नव्हेत, तर खमंग, स्वादिष्ट असावेत व आकर्षक दिसावेत याकरिता शहरी गृहिणी अखंड प्रयत्नात असतात. तयार खाद्यवस्तूंची बाजारपेठ शेतकरी महिलेपेक्षा शहरातील गृहिणीने ताब्यात घेतली हे याचे एक कारण.
 अन्न-प्रक्रियेकडे ओढा
 यापलीकडे शेतीमालाच्या प्रक्रियेच्या व्यवसायात प्रवेश करू पाहणारा असा एक नवा समाज पुढे येत आहे. यातील बहुतेक मंडळी वयाने तरुण म्हणजे चाळिशीच्या आतील. गाठीशी फारसा पैसा नाही. प्रत्येकाच्या गाठीस एखादी पदविका किंवा पदवी. क्वचित प्रसंगी अभियांत्रिकी, रासायनिक किंवा अन्नप्रक्रियेच्या क्षेत्रातील. फार उच्च गुणांनी पदवी मिळवलेले या मंडळीत क्वचित आढळतात. बहुतेकांचा शेतीशी काही लागाबांधा आहे; पण शेतीचे दरवाजे त्यांना अनेक कारणांनी बंद झाले आहेत. शिकल्या-सवरल्यानंतर शहरातून गावी परत जाणे अनेक अर्थांनी कठीण असते. आहे त्या शेतीत जाऊन उदरनिर्वाहाची सोय कठीण, उलट आधीच असह्य भार झालेल्या जमिनीवर नवा अवघड भार वाढल्यासारखी स्थिती होते. नोकरीचे दरवाजे जवळजवळ बंद झालेले. म्हणजे स्पर्धा करून नोकरी मिळवण्याची फारशी कुवत नाही. चांगली बँकेतली, सरकारी नोकरी मिळत असती तर यातील काही मंडळी तरी उद्योजक होण्याच्या नादाला लागली नसती. शेतीचा व नोकरीचा धोपटमार्ग सोडून उद्योजकत्वाची वहिवाट नसलेली बिकट वाट त्यांनी धरली ती, पुष्कळशी, पर्याय नाही म्हणून.
 सल्लागारांचा भूलभुलय्या
 मारून मुटकून का होईना; पण उद्योजक व्हायचे ठरले. जागेची सोय आहे; थोडेफार ज्ञान आहे. पाचपन्नास हजार रुपये म्हटले तर उभे करता येतात; पण नेमके कोणत्या दिशेला जावे हे त्यांना समजत नाही. कशाचे उत्पादन करावे, त्यासाठी कच्चा माल कसा मिळवावा, तंत्रज्ञान कोणते वापरावे, बाजारपेठेसाठी तो माल आकर्षक कसा करावा आणि देशी-विदेशी बाजारपेठेत तो कसा खपवावा ? याची त्यांना फार थोडी कल्पना असते. याविषयी कोणी मार्गदर्शन करेल का? कोणी सल्ला देईल का ? याची ते मोठी डोळ्यात प्राण आणून वाटत पाहत असतात.
 बहुधा याच कारणाने अलीकडे जिकडेतिकडे शेती आणि प्रक्रिया उद्योग यांना सल्ला देणारे व मार्गदर्शक उदंड झाले आहेत. जिकडेतिकडे शेतीची प्रदर्शने भरतात. फळे, भाजीपाला, फले यांच्या उत्पादनासंबंधी रोज नवी-नवी पुस्तके येत आहेत. आधुनिकतम तंत्राने शेती कशी करावी व कापणी-मळणीनंतर प्रक्रिया इ. उद्योग कसे चालवावे यासंबंधी गावोगावी परिसंवाद, कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे चालू आहेत. उद्योगार्थी मोठ्या आशेने अशा ठिकाणी जमतात. मोठ्या तन्मयतेने व श्रद्धेने मार्गदर्शकांचे बोल टिपून घेतात. आपल्याकडे कोणी शास्त्रज्ञ, उद्योजक थोडाच भेटणार आहे. संबंधित विषयावरील दोनचार इंग्रजी पुस्तके पाहिलेला, काही प्रायोगिक शेतीचा वसा घेतलेला, एखाद्या उद्योजकाचा स्पर्श झालेला - तोही चुटपूट. काही मार्गदर्शक सल्ला देणाऱ्या संस्था चालवतात किंवा अशा संस्थांत नोकरी करतात. काही दुसरे यंत्रसामग्री इत्यादींचे कारखानदार किंवा वितरक असतात. बोलतानाचा त्यांचा थाट मात्र सर्वज्ञाचा ! "सर्व गोष्टींना सोडून मला शरण या, मी तुम्हाला तारून नेण्यास समर्थ आहे, ऐहिकच नव्हे तर पारमार्थिक यशाचा मार्ग मी तुम्हास दाखवतो,' अशी कृष्णार्जुनसंवादी भाषा ते वापरतात. हे परिसंवाद, कार्यशाळा पंचतारांकित विश्रामालयांच्या वातानुकूलित सभागृहात होवोत का आडोशापुरते उभारलल्या मांडवात होवोत. यांची वेशभूषा साहेबी. मराठी बोलण्यात आपल्याला खूपच त्रास पडतो असा एकूण आव; पण पाऊण तासाच्या एकूण बोलण्यात बिनचूक इंग्रजी वाक्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी. हे दृश्य पाहिले, की नव्याने उद्योजक होऊ पाहणाऱ्या या तरुण मंडळींच्या भवितव्याविषयी मोठी चिंता वाटू लागते. अशा मंडळींशी बोलण्याचा प्रसंग बऱ्याच वेळा येतो आणि एक मोठी भीती वाटते.
 उद्योजकतेचा अर्थ
 कारखानदारी करण्याच्या उत्साहाने आणि ऊर्मीने अनेक तरुण गेल्या पन्नास वर्षांत पुढे सरसावले आणि समाजवादी अर्थव्यवस्थेत त्यांचा फज्जा उडाला. लायसेन्स-परमिट व्यवस्थेत नावाचे कारखानदार प्रत्यक्ष सरकारी आधिपत्याखालील मॅनेजर आणि तेही वेगवेगळ्या इन्स्पेक्टरांच्या पलटणींसमोर झुकून झुकून सलाम घालणारे अशी त्यांची परिस्थिती झाली. या नवीन पिढीच्याहीबाबत असेच घडले, तर मग काय होईल? उद्योजकता म्हणजे नोकरी न करणे, उद्योजकत्व म्हणजे थाटमाट व अफाट उत्पन्न अशा कल्पना घेऊन ही मंडळी बाजारपेठेत उतरली, तर त्यांचा चट्टामट्टा करायला अनेक लांडगे तयार बसलेले आहेत.
 उद्योजकता म्हणजे काय ? याची व्याख्या आत्म्याच्या व्याख्येप्रमाणे 'नेति नेति' म्हणजे हे नाही ते नाही अशी द्यावी लागेल किंवा भगवत् गीतेतील स्थितप्रज्ञाच्या व्याख्येप्रमाणे ज्याला सख-दःख,शीत-उष्ण यांचे सोयरसतक नाही. जो आनंदाने मोहरून जात नाही व दुःखाने गांगरून जात नाही, जो सदासर्वकाळ सर्व चित्तवृत्ती जागृत ठेवतो, योग्य वेळी योग्य ते निर्णय घेतो; पण फलाच्या आकांक्षेविषयी निःस्पृह राहतो अशी काहीतरी द्यावी लागेल. एक गोष्ट नक्की, की उद्योजक बनण्याचा काही फॉर्म्युला किंवा मूस नाही. गणपती यायच्या आधी गावगल्लीतील ठराविक मुशीतून एकसारख्या आकाराच्या गणपतीच्या मूर्ती पाडणारे पेठा स्थापतात. उद्योजक कोणत्याही ठशातून तयार होत नाही. उद्योजक म्हणजे गणपतीचा मूळ ठसा बनविणाऱ्या शिल्पकारासारखा असतो. गणपतीची मूर्ती कशी असते याचा पक्का अभ्यास असतो; पण नव्याने जी मूर्ती घडवायची, त्यात सगळेच काही नवीन, ते त्याने आपल्या कलेच्या व आत्मविश्वासाच्या आधाराने घडवायचे असते.
 सतीचे वाण
 मी आपल्या पायावर उभा राहीन, स्वतंत्रपणे मानाने जगेन, दोन वेळा फाके पडले, तरी चालतील; पण पोटाची खळगी भरण्याकरिता काहीतरी पाट्या टाकण्याचे काम करणार नाही अशी बेदरकारपणाची मानसिकता उद्योजक होण्यासाठी आवश्यक आहे. कलाकारात असा कलंदरपणा आढळतो. आध्यात्मिकात अंगावरील कपड्याचे भान नसलेले अवधूत असतात. कलाकार व अवधूतांपेक्षाही उद्योजक ही वरची श्रेणी आहे. आजूबाजूच्या संपूर्ण परिस्थितीचे संपूर्ण ज्ञान, विज्ञान व त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान, दूरदृष्टी, हिशेबीपणा व सर्व असूनही सगळेच झुगारून देण्याची तयारी असे हे उद्योजकतेचे रसायन आहे. माकडापासून माणूस झाला, त्याच सुरावर माणसातून उद्योजक तयार झाला, असे म्हणावे इतके हे उद्योजकतेचे रसायन खास आहे.
 दुर्दैवाने भारतात उद्योजकत्वाला आजपर्यंत कधी फारशी प्रतिष्ठा मिळाली नाही. वर्णव्यवस्थेत उद्योजक हे सर्व वैद्य किंवा शूद्र मानले जात. मुसलमानी दरबारात कलावंतांना मान होता. बिदागी होती; पण दरबाराबाहेर नाही. इंग्रजांच्या काळात काही जमातींनी उद्योगधंदे उभारले, त्यांच्याविषयी प्रतिष्ठित समाजाची भावना उपेक्षेचीच नाही, तर तुच्छतेची होती. फायदा मिळवणारे ते सारे तुच्छ ही स्वातंत्र्योत्तर काळातील पंडित नेहरूंपासून खालपर्यंत सर्वांचीच भावना.
 उद्योजकतेचे रोपटे खुल्या हवेत चांगले वाढते, फुलते व फळते; समाजवादी किंवा हुकूमशाही वातावरणात ते कोमेजून जाते. रशियाच्या अवतीभवतीच्या सर्व देशांतील नागरिकांचा हा अनुभव आहे. कोणत्या तरी एका पाळीला नेमून दिलेल्या कामाच्या जागी जावे. ठराविक काम करावे. घरी परत यावे. दीड-दोन खोल्यांची जागा, जे सरकार देईल, त्यात समाधान मानावे. आठवड्याला दोनऐवजी तीन अंडी मिळू लागली, तर समाजवादाच्या अंतिम विश्वविजयाची ती द्वाही असल्याची डिंग मारावी...असे खुरटलेले आयुष्य काढलेल्यांना उद्योजक बनायचे कसे जमावे? पंख कापलेल्या पक्ष्यांसारखी त्यांची स्थिती. पिंजरा उघडून दिला तरी पंख पसरून भरारी घेणे त्यांना शक्य नाही.
 उद्योजकतेस मारक वातावरण
 भारताचा पन्नास वर्षांचा समाजवादी अनुभव इतका जालीम व जुलमी नव्हता हे खरे; पण उद्योजकांचे पंख छाटण्याचे काम झाले. शेतीत तर झालेच. शेतीसंबंधी उद्योग काढायचा म्हणजे पाचपन्नास शेतकऱ्यांना गोळा करून, थोडे भांडवल जमा करायचे. सरकार दरबारी लटपटी करून मान्यता व वित्तपुरवठा करायचा. त्यानंतर तंत्रज्ञान सरकारी, भांडवल, सामग्री सरकारी, सगळे व्यवस्थापन सरकारी अशा तऱ्हेच्या कारखानदारीचे कर्णधार सरकारमहर्षी, उद्योगमहर्षी म्हणून गाजले. या अशा परिस्थितीत या नवीन तरुणांचा निभाव कसा काय लागायचा?
 शेतीतील काम संपले, म्हणजे कापणी, मळणी झाली, की शेतकरी माल बाजारात घेऊन जातो. फारच थोडे शेतकरी माल साठवून बाजारातील किमती वधारण्याची वाट पाहू शकतात. माल टिकाऊ असो की नाशवंत असो, शेतकऱ्याला माल बाजारात नेण्याची मोठी घाई होते.
 बाजारात शेतीमालाला भाव मिळत नाही याची अनेक कारणे आहेत; पण त्यापैकी सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे शेतीमालाला भाव जाणीवपूर्वक पाडण्याचे सरकारी धोरण. जोपर्यंत सरकारच शेतकऱ्यांविरुद्ध आहे तोपर्यंत उद्योजकता दाखवूनही फारसा उपयोग नाही.
 तोंडी आलेला घास
 पाच वर्षांपूर्वी काँग्रेस शासनाने खुल्या व्यवस्थेकडे जाण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या मनात आशा पल्लवित झाली. सरकारचा बाजारपेठेतील हस्तक्षेप संपला तर शेतीमालाला भाव मिळेल. हातात दोन पैसे राहतील, त्यातून शेतीची सुधारणा करता येईल. अधिक पीक घेता येईल. त्यातून अधिक पैसा मिळेल. त्यातून काही व्यापार, कारखानदारी उभी करता येईल आणि अशा तऱ्हेने हजारो वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मागे लागलेले दैन्य फिटेल अशी सुखद स्वप्ने शेतकरी पाहू लागतात न लागतात, तोच त्यांच्या लक्षात आले की नेता-तस्कर, गुंडअफसर, डावे, उजवे, मध्यममार्गी, मंडल-मंदिरवाले सरेच सरकारशाहीच्या बाजूने व बळिराज्याच्या विरुद्ध दंड थोपटून उभे आहेत. समाजवाद संपला; पण समाजवादाच्या निमित्ताने उभी झालेली नोकरशाही, नियम व कायेकानूनची यंत्रणा शाबूत आहे. ती टिकवून ठेवण्याकरिता देशातील सर्व ऐतखाऊ दंड थोपटून सज्ज झाले आहेत. आज तरी त्यांचीच सरशी होत आहे असे दिसत आहे. तेव्हा शेतीमालाच्या संबंधाने उद्योगधंदे करू इच्छिणाऱ्यांना पहिली धोक्याची सूचना-सरकार कधी नेहरूव्यवस्थेकडे जाईल हे सांगता येत नाही. यंदा विनाकारणी गव्हाची आयात करण्याचे सरकारने ठरवलेच आहे. हे असे वारंवार घडू लागले, तर शेतीसंबंधित उद्योग इतका धोकादायक होईल, की सरकार दरबारी सज्जड वशिला असल्याखेरीज तो करणे अशक्य होईल.
 शेतीच उद्योग व्हावा
 शेतीउद्योगाचे थोडक्यात स्वरूप काय? माल पिकतो तिथे विकत नाही आणि जेव्हा पिकतो तेव्हा खपत नाही, ही दोन साधीसुधी तत्त्वे आहेत. शेतीउद्योजकाचे काम म्हणजे माल जिथे पिकत नाही त्या जागी नेणे किंवा जेव्हा माल पिकत नाही त्या वेळी तो उपलब्ध करून देणे.
 आपल्याकडे पिकणारा माल उत्तरेत पिकत नाही. दक्षिणेत तयार होत नाही, मग तो तेथील बाजारपेठेत नेणे हा अगदी प्राथमिक शेतीउद्योग. दुसरीकडे माल न पाठवता आपल्याकडे तो साठवून ठेवणे आणि टिकून राहावा यासाठी आवश्यक तर त्यावर काही प्रक्रिया करणे, ही अशीच प्राथमिक उद्योजकता. माल देशाच्या

                       'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ५८ हद्दीच्या बाहेर निर्यात करणे हे त्यामानाने बरेच कठीण आणि नाजूक काम आहे. परदेशात नाशवंत मालाची निर्यात होऊ शकते तशीच टिकाऊ मालाचीही निर्यात होऊ शकते. स्थानिक बाजारपेठ, दूरच्या बाजारपेठा आणि परदेशी बाजारपेठा यांना नाशवंत, टिकाऊ किंवा प्रक्रिया केलेला माल पोहोचविणे हे शेतीउद्योगाचे मूळ स्वरूप.

 माल एका जागेहून दुसऱ्या जागी हलविला तर त्याची किंमत वाढते. एका काळातून दुसऱ्या सुयोग्य काळी उपलब्ध केला तरी किमतीत वाढ होते आणि निसर्गदत्त स्वरूपापेक्षा अधिक उपयुक्त स्वरूपात माल बाजारपेठेत नेला, तर त्यासाठी ग्राहक अधिक पैसे मोजायला तयार होतात. सुयोग्य जागी सुयोग्य वेळी माल उपलब्ध करणे यासाठी सगळ्या बाजारपेठेचा चांगला बारकाईचा अभ्यास असला पाहिजे. वाहतूक केल्याने वा साठवणूक केल्याने हातात काय अधिक पडेल व त्यासाठी येणारा खर्च लक्षात घेतला तर हातात काय पडेल याचा कसोशीने हिशेब करावा लागतो व पार पाडावा लागतो.
 मारक संतुष्टता
 अलीकडे फळे आणि फुले परदेशांत निर्यात करण्याचा प्रयत्न अनेकजण करीत आहेत. काही जणांनी त्यात मोठे यश मिळवलेले आहे. आता आपल्याला या निर्यात व्यापाराच्या यशाची गुरूकिल्ली समजली, तोच अनेकांच्या बाबतीत त्यांनी उभा केलेला सगळा प्रपंच कोसळून पडत आहे. महाराष्ट्रातील द्राक्षांची बाजारपेठ कसोशीने स्पर्धा करून दुसरे देश बळकावू पाहत आहेत. अपयश का आले हे तपासणे महत्त्वाचे असतेच; पण त्याहीपेक्षा अकस्मात यश का मिळाले याचे कठोर विश्लेषण करणे महत्त्वाचे असते. हिंदुस्थानातील शेतीमालाला बाहेरच्या विकसित देशांत चांगली बाजारपेठ आहे. चांगल्या गुणवत्तेचा माल सातत्याने पुरवत राहिले तर हाती लक्ष्मीच आली असा फाजील विश्वास तयार होतो. देशांतर्गत बाजारपेठा मजबूत करणे यशस्वी निर्यातीसाठी आवश्यक आहे. दुर्दैवाने निर्यात क्षेत्रास 'आधी कळस मग पाया रे' असे प्रयत्न झाले आणि आता कोसळलेल्या कळसाखाली चेंगरलेल्यांचा आक्रोश ऐकू येत आहे.
  'सुपर मार्केट'चे महत्त्व
 देशभर बाजारपेठांचे जाळे विणण्याकरिता 'सुपर मार्केटचे जाळे अत्यंत मोलाचे ठरते. पाश्चिमात्य विकसित देशांच्या आश्चर्यजनक प्रगतीचे एक महत्त्वाचे साधन म्हणजे तेथील किरकोळ विक्री केंद्रांची अशी जाळी. महाराष्ट्रातील द्राक्षे मोठ्या प्रमाणावर खरीदणारी 'मार्क्स आणि स्पेन्सर' ही अशीच एक व्यवस्था. "गरिबांसाठी मार्क्स आणि एंजल्स या समाजवादाच्या अध्वयूँनी काहीच केले नाही इतकी कामगिरी 'मार्क्स आणि स्पेन्सर' दुकानांनी केली, "अशी टिप्पणी प्रख्यात व्यंगकार जॉर्ज मिकत्से यांनी केली. दुकानांची जाळी विणायची अजून येथे सुरवात झाली नाही, तोपर्यंत आपला निर्यातीचा खटाटोप कधी उभा राहणार, कधी कोसळणार असाच असणार. कच्च्या मालावर प्रक्रिया करून, त्यातून काही ग्राहकोपयोगी वस्तू तयार करणे हा शेतीउद्योगातला सर्वांत महत्त्वाचा विभाग. बहुतेक नवे तरुण उद्योजक या क्षेत्रात जाण्याची धडपड करत आहेत.
 गुणवत्ता महत्त्वाची
 'खाता येईल तितके खावे, नाही त्याचा मोरंबा घालावा' चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी प्रक्रिया व्यवसायांचे स्वरूप असे होते. बाजारात न खपण्याइतके पिकले तर माल प्रक्रिया करून साठवून ठेवावा. 'Eat what you can and can what you can't' असे या व्यवसायाचे स्वरूप फार झपाट्याने बदलले. ऊस उरतो म्हणून साखरेचे कारखाने निघाले, पण लवकरच साखर कारखान्यांना पुरवठा पडावा म्हणून उसाच्या खास बियाण्यांची लागवड, कसोशीने मशागत, शास्त्रीय व्यवस्थापन, वाढता पाणीपुरवठा आणि पसरती लागवड असा मोठा पसरता कार्यक्रम हाती घ्यावा लागतो. लागवड आणि मशागत यांच्यावर ताबा ठेवल्याखेरीज चांगली गुणवत्ता सातत्याने टिकवणे शक्य होणार नाही. जॉर्ज फर्नाडिस व त्यांच्यासारख्या अनेकांना बटाट्यांच्या काचऱ्या (वेफर्स) तयार करणे म्हणजे पोरखेळ वाटतो. काचऱ्या करणे म्हणजे बाजारात मिळतील ते बटाटे घेऊन चकत्या करून मिळेल त्या तळणातून काढणे नव्हे ! तर, त्यासाठी विशिष्ट जातीच्या बटाट्यांची लागवड करावी लागते. बटाटे शेतात असताना उष्णतामान ठराविक मर्यादेत राहील यासाठी जीवाचा आकांत करावा लागतो. तर तळण्याचे उष्णतामान १८७° से. की १८७.५° से. असावे, तळणीत काचऱ्या किती सेकंद राहाव्यात, त्यात त्या किती वेगाने फिराव्यात व त्यातून त्या बाहेर पडल्यानंतर व त्यांतील स्निग्ध पदार्थ ओढून किंवा फुकून टाकावा हा एक सगळा मोठा खटाटोप आहे.
 निसर्ग देतो, अव्यापार नेतो
 आपली शेती दरिद्री आहे व मागासलेली आहे, म्हणजे येथे भांडवलाचा तुटवडा व त्याबरोबर तंत्रज्ञानाचा जुनाटपणा आहे. तरीही, निसर्गाची मेहरबानी अशी, की भांडवलसंपन्न देशातील फळांची, गुणवत्तेत बरोबरी करणारी फळे आम्ही पिकवू शकतो. फरक एवढाच, की भांडवलसिद्ध शेतीत ८० % च्या वर अत्युच्च गुणवत्तेचा माल निघेल, तर आमच्या दरिद्री शेतीत हे प्रमाण २० % चे असेल. सर्वोत्तम गुणवत्तेची फळे १/५, त्याखालच्या गटातील १/५, मध्यम १/ ५, बऱ्यापैकी १/५ व कनिष्ठ दर्जाची १/५ अशी आपणाकडील फळांची वर्गवारी निसर्गाच्या प्रभावानेच होते. यांतील २० % आम्ही करू शकू; पण उरलेली ८० % देशात खपवायची सोय झाली तरच हा धंदा किफायतशीर होईल.
 ग्राहक हाच राजा
 परदेशी खरेदीदार आपल्या गिऱ्हाइकांचे कल्याण बघतात. त्यांना माल खपविण्यासाठी वेगवेगळ्या देशांतील शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. त्यांना एकमेकांविरुद्ध खेळवून जास्तीच जास्त चांगला माल कमीत कमी किमतीत संपादन करणे हे त्यांचे कामच आहे. हिंदुस्थानातही मोठे कारखानदार सुटे भाग पुरवणाऱ्या कारखानदारांत एकमेकांत लढत लावून फायदा मिळवतात, त्यातलाच हा प्रकार
 उसने तंत्रज्ञान, अपयशाचे कारण
 आपल्याला डावलून दुसऱ्या देशाचा माल परदेशी खरेदीदार भरू लागले, तर त्यातील मोठा भाग तरी देशातील बाजारपेठेत रिचवण्याची शक्यता तयार केली पाहिजे.
 भारतात प्रक्रिया करणारे कारखानदार क्वचितच लागवडीवर ताबा ठेवतात. ते बहुधा बाजारात जो काही कच्चा माल मिळेल, तो खरेदी करतात. अशा प्रक्रिया कारखानदारीतून नामवंत माल तयार होण्याची काही शक्यता नाही. उत्पादन करायच्या मालाचे स्वरूप काय असावे? आपल्या परंपरेत स्वादिष्ट, रुचकर आणि दिसायला आकर्षक असे पदार्थ नाहीत असे नाही; पण विजेत्यांच्या परंपरांनाच काय खाद्यपदार्थांनाही प्रतिष्ठा येते व जितांचे सर्व काही कुचेष्टेचा विषय होतो. या नियमानुसार बिस्किटे महद्पदाला चढली, चिरोटी गावंढळ ठरली: केकचा बडेजाव वाढला, अनारशांना कोणी विचारेनासे झाले. प्रक्रिया उद्योजकांमध्ये, काही किरकोळ अपवाद सोडल्यास, विलायती तोंडवळ्याचे पदार्थ करण्याचीच विशेष घाई दिसते. त्यासाठी लागणारी माहिती, तंत्रज्ञान सारे काही तयार विकण्यासाठी मोठ्या नामवंत कंपन्याही उभ्या ठाकल्या आहेत. आजपर्यंतचा उद्योजकांचा अनुभव असा आहे, की त्यांच्या सल्ल्याने चालले तर कारखाना कदाचित चालेल ना चालेल, फायदा कदाचित मिळेल ना मिळेल; पण शेवटी तंत्रज्ञान व यंत्रसामग्री पुरवणारांचेच उखळ पांढरे होते. कारखानदार तसेच कोरडे राहून जातात. दुसरा कोणी येईल, आपला कारखाना बांधून देईल व अशाने आपण कारखानदार बनू शकू, ही भाबडी कल्पना नव्या उद्योजकांनी मनातून समूळ काढून टाकली पाहिजे. उद्योजक बनायचे म्हणजे पैशाचा प्रश्न आलाच. भांडवल कोठून व कसे उभे करायचे, याकरिता चारी दिशांचा वेध घेणाऱ्या उद्योजक उमेदवारांना सरकारी सबसिडीच्या योजना कळतात आणि त्यांना मोठा मोह पडतो. तेलाची गिरणी घाला म्हणजे इतकी सबसिडी, ग्रामोद्योग स्वीकारा म्हणजे ५० % सबसिडी असल्या भुलभुलय्यात उद्योजक सहज सापडतात. एखादा औद्योगिक प्रकल्प सरकारी योजनेनुसार सबसिडी मिळावी इतका रुळलेला असला तर बाजारपेठेत तो मोठा यशस्वी होण्याची शक्यता अगदी नगण्य आहे.
 सरकारी हात, करी उद्योगाचा घात
 राष्ट्रीयीकृत बँकाही त्यांच्या बाबू लोकांमार्फत वित्त पुरवठा करण्याचे आश्वासन देतात. एखादा प्रकल्प बाबू लोकांना समजण्याइतका जनमान्य झाला, की त्यात नवलाई काही उरत नाही. बाजारपेठेत साऱ्या स्पर्धेला तोंड देऊन असले उद्योग टिकतील, ही शक्यता खोटीच.
 शेतीप्रक्रियेच्या उद्योगात प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुणांना आणखी एक धोक्याचा कंदील दाखवणे आवश्यक आहे. सहकारासंबंधी आमच्याकडे मोठे काव्य ऐकवले जाते. 'विना सहकार नही उद्धार,' अशा काव्यपंक्ती ऐकल्या, की शेतकरी समाजातील तरुणांचेही चित्त थाऱ्यावर राहत नाही. शेतकऱ्यांनी सहकारी संस्था काढायच्या आणि बिगर शेतकऱ्यांनी कंपन्या काढायच्या असे हे द्वैत आहे. सहकाराविषयी टीकाटिप्पणी करण्याचे येथे काही प्रयोजन नाही; पण अगदी थोडक्यात सांगायचे म्हणजे सहकार नावाची चीज काही या देशात नाही. सहकाराच्या नावाखाली राज्यकर्त्या पक्षाच्या पुढारी मंडळींना सरकारी देखरेखीखाली पोसण्याची एक यंत्रणा आहे. या मंडळीत आपलाही प्रवेश होईल व एक दिवस आपणही सहकारमहर्षी किंवा उद्योजक होऊ, काही नाही तर निदान सहकारी क्षेत्रात मिळणाऱ्या सबसिडीचा एक लहानसा हिस्सा आपल्या हाती आला, तरी आपली अडचण भागून जाईल अशा आशेने भलेभले कर्तबगार या सहकाराच्या गुहेत गेले. त्यांची जातानाची पावले दिसली, येतानाची पावले कोणी पाहिलीच नाहीत.
 शेतकरी तरुण फार वर्षांनी उद्योजक बनू पाहत आहेत. त्यांच्या वाटेत अनेक खाचखळगे, काटेकुटे आहेत. बाजूला मोह दाखवणारी अनेक मायावी रूपे आहेत आणि अक्राळविक्राळ जबडा पसरून बसलेले महाराक्षसही आहेत. परदेशी आराखड्याचा माल, परदेशी तंत्रज्ञान, ती पुरवणारे घाऊक मध्यस्थ, सरकारी सबसिड्या व सरकारी बँकांचा वित्तपुरवठा या मार्गाने गेल्या ५० वर्षांत अनेक होतकरू छोट्या उद्योजकांचे वाटोळे झाले. छोट्या उद्योजकांचा विनाश करणारी तीच मंडळी शेतीउद्योजकाकडे हपापलेल्या नजरेने पाहत आहेत. या उद्योजकांच्या उपक्रमात यश येण्याची चिन्हे आज तरी काही मोठी आशादायक वाटत नाहीत.

(६ जानेवारी १९९७)

◆◆