Jump to content

अन्वयार्थ - १/भ्रष्टाचारी आम्हा सोयरे

विकिस्रोत कडून


भ्रष्टाचारी आम्हा सोयरे...


 माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांच्याबरोबर पाटणा आणि अलाहाबाद येथील दोन सभांना उपस्थित राहण्याचा मला अनुभव आला अन् १९८९-९० या काळात बोफोर्स प्रकरणातील भ्रष्टाचाराचा विषय सगळ्या देशात गाजत होता. हे सगळे प्रकरण व्ही. पी. सिंग यांनी प्रकाशात आणले एवढेच नव्हे, तर या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याकरिता त्यांना काँग्रेस पक्ष सोडावा लागला. त्यामुळे लोकांत त्यांच्याविषयी आकर्षण होते. हजारोंनी लोक त्यांच्या सभांना जमत आणि प्रत्येक सभेत विश्वनाथ प्रतापसिंग बोफोर्स प्रकरण, त्यातील भ्रष्टाचार आणि त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांचा या प्रकरणातील हात या विषयावर तपशीलवार बोलत.
 मंचावर बसलेला असल्यामुळे समोर बसलेल्या अफाट समुदायातील लोकांकडे पाहणे मला अपरिहार्यच होते. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांचे मी बारकाईने निरीक्षण करत होतो. एक मोठी चमत्कारिक गोष्ट माझ्या लक्षात आली. राजीव गांधीवर, देशाच्या पंतप्रधानांवर खुलेआम भ्रष्टाचाराचा आरोप जाहीर सभेत केला जात होता; पण त्या सगळ्या प्रतिसादात काही तरी कमी होते. तमाशातील एखाद्या चांगल्या संवादाला प्रेक्षकांनी दाद द्यावी तसा तो प्रतिसाद होता. देशाचा नेता भ्रष्टाचारात गुंतला आहे असे म्हटल्यावर जीवाचा संताप व्हावा, पोटतिडकीने जीवाचा आकांत करून उठावे अशी काही समोर बसलेल्या समुदायाची प्रतिक्रिया नव्हती, हा काय चमत्कार आहे?
 मग एकदम माझ्या लक्षात आले, की या लोकांच्या मनात भ्रष्टाचाराविषयी चीड तर नाहीच, असली तर थोडी आपुलकीच आहे.
 सभा प्रामुख्याने शहरवासियांची, म्हणजे उपस्थितात नोकरदार व्यापारी, विद्यार्थी इत्यादींचा भरणा यांच्यापैकी प्रत्येकाचे जगणे कुठेतरी भ्रष्टाचाराशी जोडलेले होते.
 नोकरदार अगदी चपराशी झाला, तरी रुपया-दोन रुपयांची चिरीमिरी हा त्यांच्या दररोजच्या आयुष्यक्रमाचा भाग होता. टेलिफोनवाले, टपालवाले, वनखातेवाले, एक्साईजवाले, आयकरवाले सगळ्यांचा भ्रष्टाचार हा जीवनाधार होता.
 व्यापाऱ्यांना कुठे ना कुठे 'दोन नंबर' केल्याखेरीज टिकणे संभवच नसते आणि ज्यांनी लाच घेण्याची फारशी शक्यता नाही त्यांना जागोजागी, क्षणोक्षणी लाच देण्याचा तरी सराव होताच!
 पंतप्रधानांनी साठ कोटी घेतले, हे ऐकल्यावर त्यांची काय प्रतिक्रिया? अबकारी खात्याचा एखादा इन्स्पेक्टर महिन्याला लाख दोन लाख रुपयांची त्याची वरकड मिळकत सहज असते-तो विचार करतो, "मी छोटा माणूस इतपत कमाई करतो, तर देशाच्या पंतप्रधानाने साठ कोटी घ्यावे यात काय चूक आहे? उलट, पंतप्रधान हा भ्रष्ट असला तर आपल्या भ्रष्टाचाराला एकप्रकारे संरक्षण आहे, तेव्हा आहे ते ठीक आहे, फार काटेकोर स्वच्छ राज्य आले तर पंचाईत होईल." अशीच भावना बहुतेकांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
 पोटे सांडियेली चवी
 शहरे भ्रष्टाचाराची आगरे आहेत. भ्रष्टाचाराविषयी ममत्वाची आणि आपुलकीची भावना. मग खेडेगावातली काय स्थिती? खेडेगावात भ्रष्टाचाराचा फायदा मिळणारी माणसे फार थोडी. सरकारी अधिकारी, पुढारी, सोसायट्यांचे चेअरमन आणि डायरेक्टर इ. मंडळींची संख्या टक्केवारीने तशी कमीच. उलट बहुतेक शेतकऱ्यांचा जीव हरघडी हरहमेश लाच देता देता नकोसा होतो. तलाठ्याकडून सातबाराचा उतारा घ्यायचा आहे पाच रुपये द्या, कारखान्याकडून परवाना आणायचा आहे- पैसे द्या, गावात चोरीमारी झाली, जळीत झाले पोलिसांचे तोंड बंद करा, पोराला नोकरी पाहिजे- पैसे द्या. एक ना अनेक. शेतकरी तर या भ्रष्टाचाराचा विषय निघाल्यानंतर तीव्र संतापाची प्रतिक्रिया उमटावी की नाही?
 पण विचित्र गोष्ट अशी, की असे होत नाही. शेतकरी मंडळी एकूणच भ्रष्टाचाराविषयी मोठ्या दार्शनिकाच्या उदासीनतेने बोलतात. पोलिस सबइन्स्पेक्टर म्हणून पोराची भरती व्हायची असेल तर किती हजार द्यावे लागतील याचा भाव दरवर्षी फुटतो आणि त्या भावाविषयी शेतकरी अगदी तटस्थतेने बोलतात, इतके पैसे देण्याची आपली ताकद नाही म्हणून आपलं पोरगं नांगरावरच राहणार आणि दुसरी पोरं थाट गाजवणार याबद्दलचा मनातला रागसुद्धा फार बेताबेताने व्यक्त होतो. पंचायत समिती, जिल्हापरिषदेच्या अमक्या अमक्याने अमाप पैसा केला आहे, हे ते मोठ्या उदासीनतेने एकमेकांना सांगतात. अमका आमदार निवडणुकीच्या आधी बिडीला महाग होता; पण त्याचे आता दोनचार दारूचे गुत्ते झाले, शहरातील बंगला झाला हे सांगतानासुद्धा कुठे आक्रोश किंवा क्रोध दिसत नाही. राज्य पातळीवरचा एखादा नेता आठशे हजार कोटी रुपये बाळगून आहे असा उल्लेख झाला म्हणजे त्या नेत्याबद्दल काहीशी आदराचीच भावना तयार होते.
 नीचापुढे ते नाचवी
 इतिहासाचार्य वि. का. राजवाडेंनी म्हटले आहे, की गेली हजारो वर्षे शेतकऱ्यांची अशी निश्चित भावना झाली आहे, की जे जे म्हणून सरकार असते ते ते शेतकऱ्यांना लुटण्याकरिताच असते, तेव्हा प्रत्येक सरकारी हुद्देदार आपल्याला लुटतो त्यात आश्चर्य ते काय? अशी त्यांची भावना असते. अमका चेअरमन अमाप पैसा कमावून आहे, भरमसाठ पितो आणि मनाला येईल त्या आयाबहिणीवर हात टाकतो असे ऐकले तरी चालायचेच की हो! राजाने असे करायचे असते, अशी शेतकऱ्यांची सर्वमान्य प्रतिक्रिया असते.
 स्त्रियांच्या वेगवेगळ्या समस्यांची पाहणी करून अभ्यास करणाऱ्यांचा एक अनुभव आहे. बाया शहरातल्या असोत, खेडेगावातल्या असोत, प्रश्नावलीतून त्यांना एखादा प्रश्न विचारला, तर त्या आधी उत्तरे द्यायला तयार नसतात. त्यातली एखादी थोडी धाडसी बाई बोलायला तयार झालीच तर ती मोठ्या सावधपणे बोलते. आपण दिलेले उत्तर चारचौघांत बरे दिसेल ना? सासूबाईच्या, मालकांच्या कानावर गेले तर ते नाराज होणार नाहीत ना? आणि दिलेल्या उत्तरराकारणे उद्या आपल्या पाठीवर वळ तर उठणार नाही ना? असा हिशेब मांडीत मोठ्या हुशारीने पाहणी करणाऱ्यांच्या प्रश्नांना त्या उत्तरे देतात.
 घरात परिस्थिती बायांची, तीच समाजात शेतकऱ्यांची. तलाठ्याविरुद्ध राग व्यक्त करून उद्या त्याच्याच समोर जायची वेळ येणारच आहे, मग जमेल? आमदाराने नंगा नाच घातला तर घालो, आपण त्याच्याविरुद्ध ब्र काढला आणि त्याच्या कानावर गेले तर उद्याचे काय? सगळीकडेच भ्रष्टाचार माजला आहे, त्याच्यात आपल्या जातीचा, आडनावाचा एखादा जिल्हा गाजवतो आहे, भ्रष्टाचारात का होईना 'ऑल इंडियात' पहिला आहे. याच्या खेरीज अभिमान बाळगण्यासारखे त्यांच्या आयुष्यात असतेच काय?
 थोडक्यात, भ्रष्टाचाराविषयी शहरात आपुलकी आणि खेडेगावात उदासीनता अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भ्रष्टाचारी सगळीकडे खुलेआम फिरतात, डौलाने फिरतात. भ्रष्टाचार पूर्वीही होता, आताही आहे. भ्रष्टाचार करणाऱ्याला आता प्रतिष्ठा आली आहे. भल्या मोठ्या थाटांच्या सभेत या ना त्या वाममार्गाने अफाट पैसे मिळणारे लोक उजळ माथ्याने वावरतात. स्वार्थ त्यागाच्या गोष्टी बोलतात राष्ट्रहिताच्या बाता करतात. तुकाराम, ज्ञानदेवांचे नाव घेतात आणि सारी जनता हताशपणे पाहत राहाते. काय करणार? एका एका माणसाचे कुलंगडे बाहेर काढायचे, साक्षीपुरावा गोळा करायचा, कोर्टात न्यायचा, सगळा भ्रष्टाचार सिद्ध करायचा हे कष्टाचे आहेच; पण प्रचंड खर्चाचे आहे आणि पुढाऱ्याने डूख धरला तर कदाचित जीवाशी गाठ आहे. कोण हा उपद्व्याप करणार? पोलिसच भ्रष्टाचाराचे आगार झाले. न्यायालये तशीच, एखादा दुसरा पत्रकार सोडला, तर सारी वर्तमानपत्रे भ्रष्टाचाऱ्यांच्याच मालकीची. कोण याविरुद्ध दंड थोपटून उभा राहणार?
 साठ कोटी रुपयांच्या बोफोर्सने जनात उद्रेक घडला नाही. हजारो कोटी रुपयांच्या शेअर बाजार प्रकरणी तर गुन्हेगारांचा जयजयकार होतो आहे. मंडल आयोगानेमात्र देश पेटला. कारण उघड आहे, तुकामाच्या भाषेत नीचापुढे नाचायची आमची तयारी आहेच, त्याचा विरोध कोण करेल. सरकारी नोकरी म्हणजे भ्रष्टाचाराची गंगा! त्यात हात धुवून घेण्यासाठी चढाओढ आहे. मंडल आयोगाने वणवा पेटला याचे खरे कारण, "भ्रष्टाचारी आम्हा सोयरे..."

■ ■