अन्वयार्थ - १/कर्तबगारांना अपंग बनविणारा समाजवाद

विकिस्रोत कडून


कर्तबगारांना अपंग बनविणारा समाजवाद


 का वेगळ्या प्रकारच्या उपचार केंद्राला भेट देण्याची नुकतीच संधी मिळाली. जन्मतः विकलांग किंवा अपंग असलेल्या मुलांना थोडेफार चालतेबोलते करण्यासाठी करायच्या उपचारांचा एक विभाग, दुसऱ्या विभागात अपघाताने जायबंदी झालेल्या माणसांना पुन्हा एकदा चालतेबोलते करून शक्य तितके स्वतःचे पोट भरण्यासाठी केंद्रावर नव्याने येतात. तेव्हा मनावर अपघाताने झालेला आघात आणि भविष्याविषयीची निराशा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. आता आपण जन्मभर अपंगच राहणार, मरेपर्यंत असेच रुटुखटू जमेल तसे जगण्याखेरीज गत्यंतर नाही. जगाच्या दयेवर दिवस कंठायचे आहेत या जाणिवेने पूरी उद्ध्वस्त झालेली माणसे उपचार केंद्रात दाखल होतात. हळूहळू एक एक हाताचा, एकेक पायाचा वापर क्षणाक्षणाने शिकत ती चालू लागतात. पहिली पावले स्वतंत्रपणे चालताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून जात असतो. पुन्हा एकदा आपण आपल्या पायावर उभे आहोत. काम करत आहोत याचा त्यांना प्रचंड अभिमान वाटत असतो.
 जन्मत:च विकलांग असलेल्या बाळांची स्थिती विशेष कठीण. चालण्याबोलण्याचा, हात वापरण्याचा त्यांना अनुभव नाही. एवढेच नव्हेतर आपण स्वतःच्या पायावर उभे राहावे अशी आकांक्षाही त्यांच्या मनात मुळी उपजलेलीच नसते. जन्मतःच दृष्टी नसलेल्याला सप्तरंगाची किमया समजून सांगण्यासारखा हा कठीण प्रकार. पक्षाघातासारख्या आजाराने हातपाय हलेनासे झालेल्या रोग्यांची परिस्थिती थोडी वेगळी. अपघातात जायबंदी झालेल्यांना अवयव नसतात; पण इच्छाशक्ती काम करत असते. पक्षाघाताच्या आजाऱ्यांच्या बाबतीत बुद्धी आणि अवयव यांच्यातील संपर्क तुटलेला असतो. विकलांग मुलांच्या बाबतीत बुद्धी आणि अवयव यांच्यातील संपर्क तुटलेला असतो. विकलांग मुलांच्या बाबतीत बुद्धी-अवयव कशातच पुरेसा ताळमेळ नसतो.
 माणसारखी माणसे; पण माणूस म्हणून करायच्या सहजसिद्ध क्रियासुद्धा करण्यास असमर्थ बनलेली पाहून कीव येते आणि अंगावर काटा उभा राहतो.
 धट्टेकट्टे अपंग
 गेल्या उन्हाळ्यात दिल्लीच्या भेटीत असाच वेगळा अनुभव आला. संध्याकाळच्या वेळी गजबजलेल्या जनपथावरून जात असताना एका दुकानात काही गौरकाय माणसे आलेली लक्षात आले. त्यांना जे काही पाहिजे होते ते भाषेच्या अडचणीने त्यांना सांगता येत नव्हते. पूर्व युरोपातील परवा परवापर्यंत समाजवादी अमलाखालील एका देशतील ही प्रवासी मंडळी, त्यांची मातृभाषा किंवा रशियन दुकानदाराला समजत नव्हते. दुकानदाराचे हिंदी, इंग्रजी त्यांना कळत नव्हते. त्यांच्यापैकी एकाला थोडे फ्रेंच येत होते. त्यामुळे थोडे दुभाषाचे काम करून, मी त्यांची अडचण सोडवली. माझे आभार मानताना त्यांतील एक वयस्क पुरुष म्हणाला, "हिंदुस्थानातील उद्यमशीलतेने आम्ही मोठे चकीत झालो आहोत. इथल्या प्रत्येक दुकानात सामानाची नुसती लयलूट आहे. साध्या या खेळण्यांच्या दुकानात पाहा. दुकानातील कपाटेच नाही तर छतसुद्धा टांगून ठेवलेल्या मालाने झाकून गेले आहे. कितीतरी माल, दरवाज्याच्या बाहेर ओसंडत आहे. या एवढ्या वस्तू तयार करतो तरी कोण? याचे कारखाने कोठे आहेत? खेळणी तयार करण्याचे काम कोणत्या मंत्रालयात होते?"
 भारतीयांच्या उद्यमशीलतेची प्रशंसा?
 त्यांच्या प्रश्नांची भडिमार ऐकून मी चकित झालो, चक्रावलो आणि थोडा सुखावलोही. माझ्या देशवासीयांच्या उद्यमशीलतेचा उल्लेख मी प्रथमच ऐकला. येथील लोक तेवढे सारे आळशी, गदळ असे ऐकण्याची कानांना सवय. प्रत्यक्षातला अनुभवही बहुतांशी त्याचीच पुष्टी करणारा. परदेशी प्रवाशाच्या या बोलण्याने माझ्याच देशाचे एक फारसा बोलबाला नसलेले अंग डोळ्यासमोर आले.
 मोठमोठ्या कारखान्यांत ते सरकारी असोत की खासगी, काम कसे आरामाने, थाटात चाललेले असते. बाहेर प्रशस्त हिरवळी आणि फुलांच्या ताटव्यांनी बहरलेल्या बागा, प्रशस्त हवेशीर उजेडाच्या इमारती, त्यांत मंदगतीने चालणारा कर्मचारी वर्ग. हे दृश्य खास हिंदुस्थानी खरे; पण त्याबरोबर दुसरेही एक दृश्य तितकेच एत्द्देशीय आहे.
 लहानमोठ्या शहरांच्या गल्लीबोळात आणि झोपडपट्ट्यात पत्र्यांच्या छपराखाली चेंडू बाहुल्यापासून प्लॅस्टिकच्या विविध वस्तू, मोठमोठ्या कारखान्यांना लागणारे किरकोळ सामान तयार करणाऱ्या कौटुंबिक कारखान्याचे चित्रही तितकेच भारतीय आहे. परदेशी प्रवाशांना दिपवून गेलेली भारतीयांची उद्यमशीलता ही मोठ्या कारखान्यांची नाही, या छोट्या छोट्या उद्योजकांची आहे. मोठे कारखाने स्थापन झाले सरकारमुळे, घाट्यात गेले सरकारी थाटामुळे आणि चालू राहिले ते परदेशी स्पर्धेपासून मिळालेल्या सरकारी संरक्षणामुळे. कोणतेच सरंक्षण कोणतीही मदत नसताना अगदी आकर्षक माल लहान लहान झोपड्यात आणि शेडमध्ये तयार करणाऱ्या या बहाद्दर कारखानदारांनी देश समाजवादी अमलाच्या काळातही जिवंत ठेवला.
 परदेशी प्रवासी पुढे सांगत होता, "आम्हाला हे सारे अद्भुत वाटते. कोणतीही वस्तू तयार व्हायची तर त्यासाठी सरकारी योजना पाहिजे. कारखाना उभा राहिला पाहिजे. सामान्य नागरिकांचे काम म्हणजे दिलेल्या वेळात तेथे जाऊन ठरवून दिलेले काम यांत्रिकपणे पार पाडणे. त्यातल्या त्यात चांगला हुशार कामगार अधिक उत्पादन करायचा प्रयत्न सुरुवाती सुरुवातीला करतो आणि काही काळाने आजूबाजूचे उदाहरण आणि वातावरण पाहून, तो नाद सोडून देतो. काय उत्पादन करावे? बाजारपेठेची मागणी काय आहे? लोकांची आवडनिवड काय आहे? ती वस्तू तयार करण्याचे तंत्रज्ञान काय. आपल्याला कोणते तंत्रज्ञान फायदेशीर ठरेल. कच्चा माल कोठे मिळेल? कुशल कारागीर कोठे मिळतील? थोडीफार पतपुरवठ्याची सोय कशी होईल? सगळी यातायात करून बाजारात माल खपेल काय? उत्पादनखर्च भागेल काय? आज स्पर्धेत टिकून राहिलो; पण उद्यादेखील टिकून राहण्यासाठी आजच काय तयारी करायला पाहिजे? हे असले प्रश्न, असल्या चिंता, अनिश्चितता यांच्या कल्पनेनेही आम्ही भांबावून जातो. असले प्रश्न हाताळण्याचीच काय, विचार करण्याचीसुद्धा आमची सवय पार संपून गेली आहे."
 माणसांचे उंदीर करणारी व्यवस्था
 पूर्वी कधीकाळी प्रयोगशाळेत पाहिलेल्या साध्या पुठ्याच्या खोक्यात ठेवलेल्या पांढऱ्या उंदरांची आठवण झाली. उंदीर जात मुळात सर्वगामी; म्हणून बुद्धिदेवतेचे वाहन ठरली. कोठेही सरसर चढून जावे, कोणत्याही लहान भोकातूनही पलीकडे जावे. लीलया कोणताही अडथळा पार करावा. हा ज्यांचा स्वभावधर्म त्या उंदरांचे वंशज तीन इंच उंचीची खोक्याची कड उल्लंघून पार होऊ शकत नाहीत. कारण पिढ्यान्पिढ्या प्रयोगशाळेत वाढवल्याने त्यांची सर्व चपळता संपून गेली.
 उपचार केंद्रातील रोगी, प्रयोगशाळेतील उंदीर आणि पूर्व युरोपातील नागरिक यांच्यातील समानता स्पष्ट झाली. मी त्या प्रवाशाला म्हटले, "बाबा, तू म्हणतो आहेस ते खरेही आणि आणि खोटेही. भारतात झोपडपट्ट्यात, शेतात अजून काही उद्योजक शिल्लक आहेत; पण ज्या समाजवादाने तुम्हाला अपंग बनवले, त्याने या देशातही काही थोडा धुमाकूळ घातला नाही. सरकारी संरक्षण नसेल तर आम्ही जगावे कसे, अशी तक्रार येथील बडेबडे उद्योजक करतात. आमचे उत्पादन कितीही कमी असो, आम्हाला पगार आणि बोनसवाढ मिळालीच पाहिजे अशी येथील कामगार घोषणा देतात. पाळण्यापासून ते चितेपर्यंत जागोजागी सरकारने मदत करावी अशा अपेक्षेने लोक स्वस्थ बसून राहतात. तुमच्या रोगाची लागण आमच्याकडेही झाली आहे. समाजवाद हा माणसांना पंगू करण्याचा कारखाना आहे. उत्पादन आणि उपभोग यांच्यातील संबंध तुटला म्हणजे ऐतखाऊंच्या फौजा तयार होतात. आमच्याकडेही या फौजांनी थैमान घातले आहे. समाजवादाचे विष मोठ्या जहाल प्रमाणात तुम्हाला प्यावे लागले, अनेक वर्षे प्यावे लागले. म्हणून तुमच्या देशातील कर्तबगार उद्योजक अपंग बाहुली बनले. आमचे भाग्य एवढेच, की समाजवादाचे जहर आमच्याकडे भेसळ रुपात आले."
 त्याचा अंमल दोनतीन दशकेच चालला. सरकारी क्षेत्राचा स्पर्श जेथे जेथे झाला, ज्यांना ज्यांना झाला ते अपंग झाले. सुदैवाने सरकाचा संपर्क सर्वांगांना झाला नाही किंवा चुटपुटताच झाला म्हणून आमचे अवयव थोडेफार शाबूत आहेत. माणूस चैतन्यमय आहे, धडपड्या आहे, त्याची अपंग नोकरदार बाहुली बनवणारी समाजवादी व्यवस्था मानवतेविरुद्धचा अपराध आहे. त्यातून तुम्ही सुटलात, आम्ही सुटलो; पण हातपाय पुन्हा वापरता यावेत यासाठी मोठ्या उपचारांची गरज आहे आणि निश्चयाचीही.

(२६ ऑगस्ट १९९४)
■ ■