अन्वयार्थ - १/नैतिकता जपण्याची जबाबदारी समाजाची

विकिस्रोत कडून


नैतिकता जपण्याची जबाबदारी समाजाची


 दिल्लीला माझे वडीलभाऊ राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे गेलो. घरात मुलगा, सून आणि अठरा महिन्यांची मुलगी. दोन्ही नातवंडे मोठी गोड आणि खेळकर. आम्ही मोठी माणसे बाहेर हिरवळीवर खुर्च्या टाकून गप्पा मारत बसलो होतो आणि बाजूला शेजारपाजारच्या दोन-चार मुलामुलींसकट ही नातवंडे खेळत होती. वहिनी चहा-फराळाचे आणण्याकरिता म्हणून उठल्या; आमचे बोलणे थोडावेळ थांबले आणि मुलांचे आवाज ऐकू येऊ लागले. मोठा भाऊ 'ये लडकी है क्या' हे हिंदी सिनेमातील गाजलेले गाणे मोठ्या ठेक्यात म्हणत होता आणि दीड वर्षाची चिमुरडी नात 'बाब्बा' असे म्हणून त्याला साथ देत होती. खेळाबरोबर सहजच त्यांचे हे गायन चाललेले होते.
 वहिनी परत आल्या. त्यांच्याही कानावर त्यांच्या नातवंडांचे जुगलगीतगायन आले. त्या अगदी शरमून गेल्या आणि अवघडल्या शब्दांत म्हणाल्या, "आता काय करावे हेच समजत नाही, ही छोटी छोटी मुलंसुद्धा 'सरकाय लो खटियाँ, 'चोली के पीछे' असली गाणी म्हणत असतात. आम्ही घरात त्यांच्या कानावरसुद्धा छायागीत पडू देत नाही; पण बाहेर सगळीकडे त्यांच्या कानावर हीच गाणी पडतात." मी बोललो, "काहीच नाही; पण आमच्या याच भावाचे नुकतेच लग्न झाले होते, त्या काळची आठवण झाली. भगवानचा 'अलबेला', 'झमेला' असले चित्रपट आणि त्यांतील 'नखरे बडे मोटे', 'शाम ढले खिडकी तले' ही गाणी सगळीकडे वाजत असत. माझ्यासारख्या सनातन्यांची असल्या गाण्याबद्दल नाराजी असे, आम्ही त्यावेळीही जुन्या झालेल्या सैगल आणि पंकज मलिक यांचे भक्त. 'या नवीन गाण्यांत वाईट काही नाही; हे संगीत खास आहे.' असा आग्रह आमचे वडीलबंधू त्यावेळी धरत आणि मानले पाहिजे, इतिहासाने त्यांचे म्हणणे खरे ठरवले आहे. तीस वर्षांपूर्वी अभद्र वाटणारी ती गाणी आज मोठ्या आवडीने अभिजात संगीत असल्यासारखी दिवाणखान्यात ऐकली जातात."
 नातवंडांचे गायन चालूच होते, अगदी निरागसपणे. त्यांना गाण्यातील शब्दांच्या अर्थाची जाण असण्याचा काही प्रश्नच नव्हता. दोन पिढ्यांपूर्वी आम्ही 'रामरक्षा' पाठ करताना ती जितक्या निर्विकारपणे म्हणत असू तितक्याच निर्विकारपणे ही मुले 'बाब्बा' म्हणत होती.
 ढोंग संपले एवढेच
 घरात वडील माणसांसमोर, आपल्याला माहीत असली नाटकातली किंवा सिनेमातली गाणी म्हणण्यात काही चुकीचे आणि वाईट आहे, अशी लहानपणी आमची मनोमन कोठेतरी समजूत झाली होती. त्यामुळे आसपास कोणी वडील मंडळी नाहीत असे पाहिल्यावर म्हणायचे पाठांतर आणि वडीलधाऱ्यांच्या समोर म्हणायचे पाठांतर ही दोन वेगवेगळी खाती होती. आता नवीन पिढीला असला दुहेरी आणि दुटप्पीपणा करण्याची आवश्यकता वाटत नाही. आई-वडील, विशेषतः ही घाबरायची गोष्ट आहे ही कल्पनाच आमच्या पिढीबरोबर संपली.
 'चोली' आणि 'खटिया' गाणी घरात आल्याने चांगले घडले का वाईट हा प्रश्न अलाहिदा; पण नवीन काही घडते आहे असे नाही. ढोंग संपले आहे, एरवी जुन्याच नाटकाचा नवा प्रयोग चालू आहे.
 प्रत्येक पिढीत वडीलधारी मंडळी नवीन पिढीच्या अगोचर वागण्याने धक्का खातात. शतकाच्या सुरुवातीला खानदानी बैठकीच्या गाण्याऐवजी 'अँखिया मिला के' गाण्याने असाच धक्का दिला. त्यापुढच्या पिढीला 'गोरे, गोरे, ओ बाँके छोरे'चा फटका बसला. त्यानंतरच्या पिढीला 'चावी खो जाये'ने हैराण केले आणि आता 'सरकाय लो खटिया' तोच सनातन, प्रत्येक पिढीत उभा राहणारा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने उभा करीत आहे.
 चांगले की वाईट?
 आठ-दहा वर्षांपर्यंत मुलांची पाठांतरक्षमता प्रचंड असते. पाठ केलेले परवचे, स्तोत्रे, कविता इत्यादी इतकी पक्की मनात ठसतात, की ती प्रक्षिप्तक्रियेचा भाग होऊन जातात. आम्ही बाळबोध घरातली मराठी शाळेत शिकलेली मुले बावन्न गुणिले सत्तावीस असली आकडेमोड सहज करतो. माँटेसरी आणि कॉन्व्हेंटमध्ये युनिफार्म आणि सफेद बूट घालून गेलेल्या मुलांना 'नऊ साते'सुद्धा सांगण्याकरिता बोटे मोडावी लागतात, याची आम्ही चेष्टा करतो. पाठांतराच्या वयात पाठांतर होणारच. कारण या अवस्थेत बुद्धीला शब्दांची आसुसलेली तहान असते. ही तहान शब्दसंपत्ती आणि अंककुशलता वाढविण्याकरिता वापरता येईल किंवा 'चीज बडी है मस्त मस्त' असल्या पाठांतरलाही वापरता येईल. आता घरात 'परवचे', 'शुभंकरोती' नियमाने क्वचितच होतात. पाठांतराची तहान आपली लहान मुले दुसऱ्या साधनांनी भागवतात. पुढे या मुलांची आकडेमोडी अडचण होईल काय? विविध प्रकारच्या शब्दांचे उच्चार करताना कसरतीअभावी त्यांची जीभ जड होऊन अडखळेल काय? स्त्रोतांचे पठण करताना नकळत होणारी नैतिकतेची अनामिक जाणीव या पिढीला होणारच नाही काय? आणि अभिजात कवितांच्या पाठांतरात वाटणारे नादमाधुर्य, कल्पनाविलास यांच्या अनुभवाने स्मिमित होण्याच्या अनुभवाला ही पिढी कायमची वंचितच राहणार काय?
 माझी नात सात वर्षांची होण्याआधी गणकयंत्राशी खेळते. येत्या वर्षा-दोन वर्षांत खिशात मावणारे गणकयंत्र घेऊन वाटेत, ती आकडेमोड आणि महाप्रचंड शब्दभांडारातून निवड ती केवळ दोन-चार कळी बोटाने दाबून मिळवू शकेल. परवचे आणि पाठांतर यांची तिला आवश्यकता वाटणार नाही. गणकयंत्र पिढीतील मुलांचे पाठांतर वेगळे असावे हे साहजिक आहे. थोडक्यात, 'अधोऽधो गंगेयम्' म्हणण्याऐवजी 'सेक्सी, सेक्सी' म्हटल्याने जो काही फरक पडतो, तो बरावाईट कसा आहे, याचा विचार इतिहासावर सोडावा हे बरे!
 जशी मागणी तसा पुरवठा
 जमाना बिघडला आहे, लोकांच्या चवी बिघडल्या आहेत. त्यामुळे चटकदार ठेक्याखेरीज काहीच नसलेली ही गाणी लोकप्रिय होतात, हा युक्तिवादही काही फारसा खरा नाही. जुन्या सिनेमातील वेचक गाण्यांचा कार्यक्रम असला म्हणजे अगदी तरुण मुले-मुलीही आग्रहाने समोर बसतात आणि 'मस्त मस्त चीज'पेक्षा 'एक लडकी को देखा' आजही जास्त लोकप्रिय होते. तेव्हा नवीन पिढीची रुची बिघडली आहे असे म्हणणे निरर्थक आहे. बाजारात मागणी ज्या मालाची आहे तो माल तयार होतो. घरात दूरदर्शन आल्यानंतरही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी गर्दी करणाऱ्यांत शहरात नोकरीच्या निमित्ताने आलेली, पारंपरिक कुटुंबाच्या वातावरणाला आचवलेली, शहरातील नोकरीमुळे दोन पैसे हाती खेळू लागले, की मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा नव्याने अनुभव घेणारी ही तरुण मंडळी सगळ्यांत अधिक. त्यांच्या मागणीप्रमाणे हा माल तयार होतो. देशाची आर्थिक विकासाची मार्गक्रमणा अधिक नैसर्गिक आणि शास्त्रशुद्ध असती तर गुंड, तस्कर, भ्रष्टाचारी नेते तयार झाले नसते, बकाल शहर वस्त्याही झाल्या नसत्या आणि 'खटिया' गीतेही सगळीकडे वाजली नसती. हा सगळा अर्थशास्त्राचा दूरवरचा विचार आज करण्याचे कारण नाही. नवीन अर्थव्यवस्था कधी येईल, ती येवो; पण तोपर्यंत ही 'खटिया गीते' सुसंस्कृततेचे सारे अवशेष संपविणार काय? यावर काही तातडीची उपाययोजना नाही?
 तीन पिढ्यांपूर्वी आज्यापणज्या नवीन थेरांविषयी नापसंती व्यक्त करीत होत्या. घरातल्या मुलांच्या तोंडी अभद्र गाण्याची ओळ ऐकली तर त्याला उपाशी ठेवत होत्या. आजच्या पिढीतली अगदी मुक्त मुक्त झाल्या म्हणणाऱ्या स्त्रियाही त्यांच्या आज्यापणज्यांसारख्याच वागत आहेत. घरात मुले-नातवंडे मान तुकविण्याची शक्यता नाही. तेव्हा त्या समाजावर आणि सरकारवर तुटून पडतात. 'सेन्सॉर बोर्ड' काय झोपले आहे काय? ही असली अश्लील गाणी पास होतातच कशी? अशी आरडाओरड करत आहेत.
 सरकारच्या हाती नवे कोलीत!
 सरकारने असल्या गाण्यावर बंदी घालावी, सेन्सॉर बोर्डाने अधिक कसोशीने काम करावे, अशी मागणी सगळीकडून होत आहे आणि नैतिकतेचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारच्या हाती सोपवायला भलेभले तयार होऊन बसले आहेत. सरकार जितके नादान अशी मान्यता मिळत असणाऱ्या काळात नीतिमत्ता मात्र सरकार चांगल्या तऱ्हेने सांभाळू शकेल अशी भाबडी निराधार आशा लोक बाळगतात.
 गलीच्छ गाण्यांवर नियंत्रण यावे यासाठीदेखील सरकारच्या हाती सत्ता सोपवण्याला मी तयार नाही. नैतिकतेचे रक्षण करणे हे काम सरकारचे नाही. प्राणांचे, मालमत्तेचे रक्षण करणे एवढे सरकारचे काम आहे. अर्थव्यवस्थेत लुडबूड करणे हे सरकारचे काम नव्हे, तसेच नैतिकतेचे रक्षण ही जबाबदारी सरकारची नाही. बाजारपेठेने अर्थकारण ठरवावे आणि नैतिकतेचे रक्षण कुटुंब व्यवस्थेने आणि धार्मिक संस्थांनी केले पाहिजे. नैतिकत्ता हे धर्माचे क्षेत्र आहे. राजकारणाचे नाही.
 नीतिमत्ता-क्षेत्र कुटुंबाचे
 घराबाहेर पडले, की मुलांवर बाहेरच्या संगतीचे आणि समाजाचे वाईट परिणाम होणारच. सर्व समाज शुद्ध, स्वच्छ, सुसंस्कृत असेल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे होईल. एका नासक्या आंब्यानेही सारी अढी सडू शकते. कुसंगतीचे परिणाम टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती मुळात तयार करणे हे काम कुटुंब-व्यवस्था करत असे. आता कुटुंब-व्यवस्थेने फक्त मुलांची पोषण, लालनपालन करण्याची जबाबदारी तेवढी मानली आहे. कुटुंब हे संस्कार केंद्र राहिलेले नाही. ख्रिस्ती धर्माच्या देशात कुटुंबाबरोबरच चर्च आणी पाद्री संस्कारावर देखरेख ठेवण्याचे काम करीत. आपल्याकडे गाव पंचायत, जातिपंचायत यांच्याकडे ही जबाबदारी होती; पण त्याही संस्था मोडून गेल्या आणि सारी काहीच सत्ता सरकारच्या तेवढी हाती आली.
 'खटिया गाणी' सांस्कृतिक नैतिक अधःपाताचे लक्षण आहेत किंवा नाहीत याबद्दल वेगवेगळी मते असू शकतील; पण काही उपायोजना करायची असेल तर ती कुटुंबात झाली पाहिजे. सामाजिक संस्थांमार्फत झाली पाहिजे. या कारणानेदेखील बुडत्या सरकारला अवसान सापडता कामा नये. म्हातारीच्या मरणाच्या दुःखापेक्षा काळ सोकावण्याचा धोका जास्त मोठा आहे.

(१९ ऑगस्ट १९९४)
■ ■