अन्वयार्थ - १/आता रशियन 'हिटलर?'

विकिस्रोत कडून


आता रशियन 'हिटलर?'


 स्टीफन झ्वाइंगची एक प्रसिद्ध कादंबरी कथानकाचा काळ- पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्यानंतरच्या पाच-दहा वर्षांतील व्हर्सायच्या तहाने जर्मनीतील सुबत्तेचे प्रांत दोस्त राष्ट्रांनी काढून घेतले होते. महायुद्धातील विध्वंसाबद्दल जर्मनीवर प्रचंड खंडणी लादलेली होती, जर्मनीतील उद्योगधंदे, शेती, व्यापार उदीम सगळेच थंडावले होते, सरकारने आपला खर्च चालवण्याकरिता नोटा छापण्याचा तडाखा लावला होता.
 महागाई आपल्याही अंगवळणी पडली आहे. चलनवाढीचा नको तितका अनुभव आहे. त्यापलीकडचा टप्पा काय म्हणावे? चलन व्यतिरेक म्हणून या. चलन व्यतिरेकाच्या महापुराने जर्मनी व्यापून टाकला होता. जानेवारी १९२२ मध्ये एक मार्क टाकून जी वस्तू मिळे तिलाच जून १९२३ मध्ये १ निखर्व (म्हणजे एकावर अकरा शून्य) पडू लागले. इवाइंगची कादंबरी महाचलनवाढीच्या समाज आणि व्यक्तिजीवनावर होणाऱ्या परिणामांचे बारकाईने चित्रण करते.
 चलन स्थिर तर नीतिमत्ता ठीक
 समाजातील नीतिमत्तेचा आधार काय? ईश्वरी धाक? विश्वाचा कोणी शास्ता आहे आणि त्याच्यापुढे एक दिवस हिशेब द्यायला उभे राहावे लागणार आहे. सगळे जग बदलले तरी हे सत्य शाश्वत आहे. सर्व धर्मांनी घालून दिलेल्या या धास्तीमुळे नीतिमत्तेचा आधार असो किवा नसो, नीतिमत्ता टिकण्याकरिता चलनाच्या विनिमयाचा दर स्थिर असणे आवश्यक आहे हे निश्चित. रुपयाची किमत स्थिर असली तर कष्ट, काटकसर, बचत, गुंतवणूक, दानधर्म, हे सगळे गुण ठरतात. चलनाची किमत घसरू लागली, की या सगळ्या सद्गुणांची राखरांगोळी क्षणार्धात होते.
 मानी राष्ट्रांची फरपट
 खिशात पैसे घेऊन जावे आणि पिशवीतून माल आणावा ही जुनी पद्धत. वायमार जर्मनीत सगळेच उफराटे झाले. पिशव्या भरून नोटा घेऊन दुकानात जावे आणि खिशातून माल आणावा! आज एक पिशवीभर नोटा द्याव्या लागल्या तर उद्या निदान दोन पिशवीभर लागतील अशी धास्ती. त्यामुळे मातीमोलाच्या नोटा टाकून, काय मिळेल ती वस्तु खरिदण्याकरिता लोक धावू लागले. झ्वाइंगच्या कादंबरीतील एका सरदार पात्राचा वडील मुलगा कष्टाळू आणि प्रामाणिक असतो, तर त्याचा धाकटा भाऊ उनाड आणि रंगेल! धाकट्याने पिऊन मोकळ्या केलेल्या रिकाम्या बीअरच्या बाटल्यांनी पुरे एक कोठार भरलेले! चलनाचा महापूर आला, कष्टाळू सरदारपुत्राने साठवलेल्या नोटा, कर्जरोखे, शेअर वगैरे सगळे कवडीमोलाचे झाले. याउलट उधळ्या सरदारपुत्र रिकाम्या झालेल्या बीअरच्या बाटल्या थोड्या थोड्या विकून आरामात राहू शकत होता. आणखी एक कथा, दोन बहिणी, एक शिक्षिका आणि दुसरी जरा चंट. शिक्षिकेला काय घडते आहे हे समजतसुद्धा नाही. दिवसेंदिवस उपवास काढण्यापलीकडे तिला काही गत्यंतर राहत नाही, तिची बहीण रस्त्यावर जाऊन राजरोस देहविक्रय करून मजेत राहू शकते. कादंबरीत शेवटी नाइलाजाने सोज्वळ शिक्षिकाही रस्त्यावर येऊन फेऱ्या घालू लागते.
  'वायमार' रशिया
 स्टीफन झ्वाइंगच्या या कादंबरीची आठवण होण्यासारखीच परिस्थिती आजच्या रशियात आहे. एके काळची महासत्ता समाजवाद्यांच्या बेहिशेबी अर्थकारणाने पोखरून टाकलेली. सोवियत युनियनचे विसर्जन झाले आणि आज रशियातील परिस्थिती १९२० सालच्या जर्मनीसारखी झाली आहे. एके काळी दहा डॉलरला आठ रुबल असा अधिकृत विनियमाचा दर होता, आज शेवटच्या माहितीप्रमाणे एक डॉलर, मिळायला ६०० रुबलसुद्धा पुरे पडणार नाहीत. अर्थव्यवस्था पुरी ठप्प झाली आहे. नोटांचा इतका महापूर झाला, की जुन्या नोटा रद्द करून नव्या नोटा प्रचारात आणण्याचा सरकारने प्रयत्न केला, तोही फसला.
 लोक मोठे हवालदिल झाले. आठ दशके त्यांची पढवून पढवून खात्री पटवण्यात आली होती, की मायबाप सरकार सगळ्या काही चिंता वाहते. या समाजवाद रूपी स्वर्गात सामान्य जनांना चिंता करण्याची काही चिंता आवश्यकताच नाही. त्यांनी नेमून दिलेले काम कसोशीने मन लावून करावे, त्याबद्दल जो काही रोज मिळेल तो आनंदाने घ्यावा. समाजवादी स्वर्गाचे गुणगान करावे म्हणजे झाले! आपल्या कारखान्यात काय तयार होते? महाग का? हा विचार करण्यासाठी कारखान्यातील कम्युनिस्ट पार्टीचा सेक्रेटरी आहे, क्रेमलिनमध्ये कामगारांचे तारणहार बसले आहेत. ते करतात ते सगळे योग्यच असते. त्यांच्यापेक्षा चांगला निर्णय घेणे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना शक्यच नाही. असली शिकवण सर्वांच्या मनात इतकी भिनलेली होती, की हरेक माणूस निव्वळ ठोंब्या-बाहुले बनलेला होता.
 समाजवादी व्यवस्था असतानाही रशियन नागरिकाचे आयुष्य काही मोठे संपन्न होते असे नाही. दीड खोलीच्या खुराडेवजा घरात सगळे कुटुंब राहायचे. जेवणात वापरात येणाऱ्या सगळ्याच वस्तू कमी प्रतीच्या; पण डोक्याला निर्णय घेण्याचा ताण न देता हे सगळे मिळते आहे ना! बस आनंद आहे. "कॉम्रेड...झिंदाबाद, कामगारांचा तारणहार झिंदाबाद" आणि त्याहीपेक्षा "व्होडका झिंदाबाद!"
 प्रयोगशाळेत संशोधनासाठी छोटे पांढरे उंदीर वापरले जातात. उंदीर हा मुळात मोठा चपळ, कोठूनही कोठे येऊ-जाऊ शकणारा सर्वगामी प्राणी. म्हणून तर तो विद्या देवतेचे वाहन! पण पिढ्यान्पिढ्या प्रयोगशाळेतील खोक्यात वीण झाल्यामुळे हे पांढरे उंदीर आता दोन इंच उंचीच्या पुठ्याच्या खोक्याच्या कडेवरूनही उडी मारू शकत नाहीत. रशियन नागरकिांची अवस्था ८० वर्षांच्या समाजवादी व्यवस्थेनंतर या पांढऱ्या उंदरासारखीच झाली होती.
 फरपट चालूच
 भूक सहन करणे हिंदुस्थानसारख्या उष्ण प्रदेशातही कठीण आहेच; पण त्यापेक्षा शतपटींनी रशियासारख्या मरणाची थंडी असलेल्या प्रदेशात रिकाम्या पोटाने राहणे दुष्कर आहे. कडाक्याच्या थंडीत एखाद्या पावासाठी, एकदोन अंड्यांसाठी, रशियन लोकांना थंडीत कुडकुडत रांगा धरून उभे राहावे लागते. दुसऱ्या महायुद्धात महापराक्रम गाजवलेल्या एका सेनापतीस दोन दिवसाची भूक भागावी म्हणून आपला भरजरी गणवेश हँगरवर लावून विकण्यासाठी फूटपाथवर यावे लागले. आज परिस्थिती इतकी बिकट आहे, की झ्वाइंगच्या वर्णनाचा पुरा विदारक प्रत्यय यावा.
 अश्लील वाङ्मयाचे गठ्ठे मॉस्कोत येऊन पडत आहेत. या पुस्तकांची रशियन रूपांतरे करण्याकरिता भाषांतरकर्त्यांना मोठी मागणी आहे. एके काळी जग बदलण्याची आणि 'होगे कामयाब'च्या घोषणा देणारे तरुण 'व्होडका'च्या पेल्यात दुःख आणि भूक बुडवीत आहेत. पोटाची खळगी भरण्याकरिता १०-१२ वर्षांच्या मुलींपासून मोठ्या बायांपर्यंत अनेकांना रस्त्यावर फेऱ्या घालाव्या लागत आहेत.
 लोकांना शिक्षा नको
 समाजवादी प्रयोगाच्या भीषण घोडचुकीची रशियन लोकांना पुरी खात्री पटली आहे. नव्या नेतृत्वालाही त्याबद्दल मनात काही शंका नाही; पण ज्या लोकांना ८० वर्षे उद्योजकता म्हणजे काय? याच्या वासापासूनसुद्धा दूर ठेवण्यात आले, त्यांनी उद्योगधंदे चालू करावे कसे? हिंदुस्थान हा तसा दरिद्री देश; पण जुन्या सोव्हियत युनियनचा प्रवासी नागरिक दिल्लीतील जनपथवरील दुकाने आणि फुटपाथ ओसंडून जाणारा माल पाहून चकित होतो आणि भारतीयांच्या उत्पादकतेची वाहवा करतो. रशियन लोकांनी दिशा बदलली आहे. चुकीची वाट सोडून त्यांना नेमके उलट्या दिशेने वाटचाल करायची आहे. ८० वर्षांच्या समाजवादी प्रयोगाची किमत त्यांना मोठ्या कठोरपणे चुकवायची आहे. समाजवादावर, कॉमेड्सवर, मार्क्स, स्टॅलिन, लेनिनवर... माणसांना बाहुली करणारे 'महाराक्षस' म्हणून कितीही राग आला, तरी तो राग रशियन नागरिकांवर काढणे महाचूक होईल.
 जगातील संपन्न राष्ट्रे रशियाला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत; पण काहीसे हात राखून कंजुषपणे. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीचे नाक मातीत घासण्याचा प्रयत्न झाला नाही, कारण दोस्त राष्ट्रे व्हर्सायच्या तहाच्या भयानक परिणामांचा धडा शिकलेली होती. जित राष्ट्रांना ज्येत्यांनी इतके दिलदारपणे वागवले आणि इतक्या मोकळ्या हाताने मदत केली, की त्या मदतीच्या 'मार्शल' योजनेचे वर्णन विन्स्टन चर्चिलनी "The most unsordid act in human history" या शब्दांत केले. जगाला आज पुन्हा एकदा जुन्या सोव्हियत युनियनच्या नागरिकांबद्दल असाच दिलदारपणा दाखवण्याची गरज आहे. समाजवादी साम्राज्य संपले. लोक भणंग झाले. धर्माधर्मात प्रचंड कत्तली सुरू झाल्या. "बरी या कम्युनिस्टांची खाशी जिरली!" असे म्हटले तर काय होईल?
 आता रशियन हिटलर?
 जर्मनीच्या भीषण अपमानातून हिटलरचा उदय झाला. प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ लनायोनेल रॉबिन्स यांनी हिटलरला 'चलनवाढीचा दत्तक पुत्र' म्हटले आहे. हुकूमशहाच्या उदयाला वायमार जर्मनीइतकीच रशियन भूमी सुपीक आहे.
 महासत्ता म्हणून पाच दशके मिरवलेल्या राष्ट्राला आजची अपमानास्पद अवस्था सहन होण्यासारखी नाही. असले जिणे जगण्यापेक्षा एखाद्या नव्या हिटलरच्या मागे ते आनंदाने जातील. गुडघ्यापर्यंत पोचणाऱ्या खिळेरी टाचांच्या बुटांचे आवाज पुन्हा निनादू लागतील, कॉम्रेड स्टालिनच्या क्रूरकर्माना निदान समाजवादाच्या अर्थकारणाची आणि तत्त्वज्ञानाची थोडीतरी रुपेरी कडा होती. रशियात नवा नाझी राष्ट्रवादी हिटलर उदयाला आला तर? कल्पनाच थरकाप भरवणारी आहे. नाझीवादाचा भस्मासुर रशियात उभा राहिला तर त्याच्या हाती सुरुवातीपासून जगाचा तिसरा हिस्सा प्रदेश असेल, अमाप खनिज संपत्ती असेल आणि त्याहीपेक्षा भयानक सगळ्या पृथ्वीचा ५० वेळा विनाश करण्याइतकी अणुशक्ती असेल!

(२ सप्टेंबर १९९३)
■ ■