Jump to content

अन्वयार्थ - १/भारतीय अर्थव्यवस्थेचे भरकटलेले गाडे

विकिस्रोत कडून


भारतीय अर्थव्यवस्थेचे भरकटलेले गाडे


 रोमन साम्राज्यातील एक जगप्रसिद्ध कथा आहे. ज्युलिअस सीझरचा खून झाला. हत्येच्या कटाचा प्रमुख सीझरचाच एक सरदार मित्र ब्रुटस. ज्युलिअर लोकशाही संपवून स्वतः सर्वाधिकारी बनू इच्छितो अशा संशयाने तो ज्युलिअस सीझरच्या दफनविधीच्या वेळी भाषण करायला उभा राहिला. ब्रुटसच्या विरुद्ध बोलणे कठीण काम होते; पण सीझरविषयीचे प्रेम आणि आदर अँटनीला स्वस्थ बसू देत नव्हते. अँटनीने भाषण चालू केले,
 "मी सीझरच्या दफनविधीसाठी आलो आहे. त्याची स्तुती करण्याकरिता नाही." सीझरने रोमन साम्राज्याकरिता केलेल्या एकेका कामगिरीचे वर्णन करायचे त्याच्या व्यक्तिगत गुणांची, दिलदारपणाची, लोकांवरील प्रेमाची आठवण सांगायची आणि प्रत्येक आठवणीनंतर तरीही ब्रुटस म्हणतो, की "सीझर हुकूमशहा होता आणि ब्रुटस मोठी आदरणीय व्यक्ती आहे." असा प्रत्येक आठवणीचा शेवट करायचा. अँटनीच्या या भाषणामुळे रोमन नागरिकांचे डोळे उघडले आणि त्यांनी ब्रुटस आणि त्याची टोळी यांच्याविरुद्ध उठाव केला, अशी कहाणी आहे.
 लिखाणाची सांकेतिक पद्धत
 "तीन वेळा रोमन नागरिकांनी सीझरला राजमुगूट देऊ केला. तीन वेळा त्याने तो नाकारला, तरीही ब्रुटस म्हणतो, "सीझरला सम्राट व्हायचे होते आणि ब्रुटस मोठी आदरणीय व्यक्ती आहे." या शैलीचा काहीसा गमतीदार उपयोग आम्ही लहानपणी करत असू. पत्र लिहिताना जे काही खरे लिहायचे असेल ते दर ओळीआड लिहायचे आणि मधली ओळ अशी लिहायची, की त्यामुळे वाचणाऱ्यांचा गोंधळ व्हावा. एक ओळ सोडून एक ओळ वाचत गेले तर मजकूर स्पष्ट आहे. सगळे पत्र अखंड वाचले तर मात्र काहीच बोध होत नाही. असा हा सांकेतिक लिखाणाचा प्रकार.
 भगवती श्रीनिवासन अहवाल
 मार्क अँटनीच्या भाषणाची आणि आमच्या लहानपणच्या खेळाची आज आठवण होण्याला निमित्त झाला, 'भारतातील आर्थिक सुधार' या विषयावर सरकारने प्रसिद्ध केलेला एक अहवाल. अहवालाचे लेखक आहेत प्रा. जगदीश भगवती आणि प्रा. श्रीनिवासन. दोघे अर्थशास्त्रज्ञ जगभर मान्यता मिळालेले, हुिदस्थानच्या आर्थिक विकासाच्या प्रश्नासंबंधी सूक्ष्म अभ्यास केलेले. आंतरराष्ट्रीय नाणे निधी, GATT यांसारख्या संस्थांच्या प्रमुखांचे व्यक्तिगत सल्लागार म्हणून काम केलेले आणि अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाच्या संभाव्य मानकऱ्यांच्या यादीत नावे असलेले. अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी भगवती आणि श्रीनिवासन यांना गेल्या दोन वर्षांत आर्थिक सुधाराचे राबवलेले कार्यक्रम आणि पुढील दिशा यासंबंधी शिफारशी देण्यास सांगितले. ही काही सरकारी समिती नाही. वित्तमंत्र्यांना दिलेला सल्ला पुस्तिकेच्या रूपाने प्रसिद्ध करण्यात आला हे, एवढेच.
 सगळ्या देशाचे वाटोळे केले
 हा अहवाल वाचताना जसाच्या तसा सगळा वाचला तर त्यात परस्परविरोधी विधाने आहेत असे वाटते. मधली काही वाक्ये किंवा परिच्छेद सोडून वाचले तर अर्थ स्पष्ट होतो.
 उदाहरण पहा :
 "(आर्थिक सुधार) आवश्यक आहेत हे बऱ्याच काळापासून स्पष्ट झाले होते; परंतु सुधार सुरू करण्याची आणि दमाने पुढे रेटण्याची राजकीय इच्छाशक्ती अलीकडेपर्यंत नव्हती."
 "अकार्यक्षमापासून कार्यक्षम अर्थव्यवस्थेकडे जायचे असेल... परदेशी मदतीवरील अवघड परावलंबित्वातून सुटायचे असेल तर..."
 "थोडक्यात आमची सर्व धोरणाची चौकट अकार्यक्षम होती, खरे सांगायचे म्हणजे भयानक अकार्यक्षम होती."
 "राजकारणी आणि नोकरदार यांच्या हाती महत्त्वाचे निर्णय एकवटले होते."
 "दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील अनुभव दाखवतो, की सरकारे विकास प्रक्रियेला मदत करत नाहीत, तिची हानी करतात."
 "सरकारे कारभार बिघडवतात आणि त्यापासून सरकारला दूर ठेवले पाहिजे."
 हा सगळा बोध अलीकडचा आहे काय? नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात सगळे काही ठाकठीक होते, विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर यांच्या काळात हा सगळा गोंधळ झाला आणि राव सरकारने मोठ्या बहादुरीने विरोधी पक्षांनी केलेला गोंधळ सावरण्यासाठी आर्थिक सुधार सुरू केले, असा जो युक्तिवाद केला जातो त्याबद्दल भगवती-श्रीनिवासन म्हणतात,
 "...(विदेशी मुद्रेचे) संकट आपल्यावर कोसळले नसते तर सुधारांची सुरुवात पुढे ढकलली गेली असती...वित्तसंस्थांनी लादलेल्या अटीमुळे सुधार सुरू करण्याची आमची इच्छाशक्ती मजबूत झाली हेही खरे."
 "आपल्या देशाच्या धोरणात असे सुधार १९६० सालापासूनच सुचवले जात होते. आपल्याच अर्थशास्त्रज्ञांनी सुचविलेले विचार त्या काळी शासकांनी आणि अनेक अर्थशास्त्रज्ञांनीही अव्हेरले. तेच विचार आता जगन्मान्य होऊन आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत परत येत आहेत."
 "... सुधारांचा अर्थ पंतप्रधान नेहरूंच्या काळापासून आपण जे जे केले ते फसले अशी समजूत होते. सुधारांचा कार्यक्रम ज्या महत्त्वाच्या क्षेत्रात आज राबवावे लागत आहेत त्या क्षेत्रात ते बहुतांशी खरे आहेत."
 "निर्यात करण्याच्या शक्तीविषयी आमचा निराशावाद १९६० सालानंतर अनावश्यक होता."
 "सार्वजनिक क्षेत्रावर भर देण्याचे धोरण असेच अवास्तव असल्याचे साठीच्या दशकाच्या शेवटापर्यंत स्पष्ट झाले होते."
 "सार्वजनिक क्षेत्रातील अकार्यक्षमतेमुळे सरकारी उत्पन्नात भर पडली नाही, एवढेच नव्हे तर परिणामतः सर्व अर्थव्यवस्थाच अकार्यक्षम झाली."
 उदाहरणे वानगीदाखल अजून कितीएक देता येतील. स्वातंत्र्योत्तर काळातील सर्व आर्थिक धोरणांची इतकी प्रभावी वासलात दुसऱ्या कोणी लावल्याचे माझ्या पाहण्यात नाही.
 पण नेहरू मोठे आदरणीय
 पण हे सगळे स्पष्टपणे लिहिताना मधूनमधून; "पण ब्रुटस मोठी आदरणीय व्यक्ती आहे." असे म्हणण्याचे कसब मार्क अँटनीइतकेच जगदीश-भगवतींनीही साधले आहे.
 उदाहरणे :
 "पंडित नेहरूंचे सामर्थ्यशाली व स्वतंत्र भारताचे स्वप्न आर्थिक सुधार सातत्याने आणि प्रभावीपणे राबवल्यानेच साकार होईल."
 "पंतप्रधान नेहरूंच्या घोषणा... वरून स्पष्ट होते, की त्या काळाही गरिबी हटाव कार्यक्रम आर्थिक विकासाइतकाच महत्त्वाचा मानला जात होता."
 "... आपण काही सर्वच आघाड्यांवर अपयशी झालो असे नाही. आपली महत्त्वाची कामगिरी म्हणजे लोकशाही चालू ठेवण्यातील आपले यश..."
 "आर्थिक क्षेत्रातही काही यशकथा आहेत. उदाहरण : शेती." हे यश, गव्हाचे उत्पादन वाढवण्यासंबंधी आहे. इतर सर्व बाबतीत केनिया, पाकिस्तान, इंडोनेशियासारखे देशही आपल्या पुढे गेले आहेत हे अहवालात तळटीप देऊन स्पष्ट केले आहे.
 बाजार व्यवस्थेचा बाजार
 मधूनमधून उधळलेल्या स्तुतिसुमनांमुळे टीकेची धार बोथट होते, की अधिक बोचक होते हे वाचकांनी ठरवावे.
 वस्तुतः हे 'मार्क अँटनी' शैलीचे भाषण करण्याची जबाबदारी अर्थशास्त्रज्ञांची नाही, पंतप्रधानांची आहे किंवा फार तर वित्तमंत्र्यांची आहे. जगदीश भगवतींनी ही जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली याचे अर्थ दोनच निघू शकतात. एक, मसुदा तयार करण्यात सरकारी हात असला पाहिजे किंवा दोन जगदीश- भगवती आपले नवीन वित्तमंत्री होणार आहेत.
 या दुसऱ्या संशयाला पुष्टी मिळण्यासारखा आणखी एक मोठा गमतीदार प्रकार अहवालात पाहायला मिळतो. आर्थिक सुधारांना कोणाकोणाकडून विरोध होईल, विरोधकांकडून काय युक्तिवाद केले जातील आणि त्याला उत्तरे कशी द्यावीत याचे मोठे तपशीलवार विवेचन सोडून, खुल्या व्यवस्थेकडे जातो आहो काय? आपण गरिबी हटाव सोडून, आर्थिक विकासाकडे जातो आहो काय? आपण परदेशी दबावाला शरण जातो आहो काय? आपण आतापर्यंत जे जे केले ते सगळे सोडून देत आहो काय? या असल्या आक्षेपांना द्यायच्या मुत्सद्दी उत्तरांचे नमुने अहवालात देण्यात आले आहेत. त्याबरोबरच, आर्थिक सुधारांचा प्रभावी प्रचार यशासाठी महत्त्वाचा आहे. ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी भगवती म्हणतात -
 "...पंतप्रधान राजीव गांधींच्या अमदानीत आर्थिक सुधार मंदावले आणि सोडून देण्यात आले, याचे कारण प्रचाराचे अपयश, कार्यक्षमता वाढवण्याकरिता केलेल्या सुधारणा म्हणजे 'यप्पी' फॅशन वाटू लागल्या. हिंदुस्थानातील 'यप्पी' म्हणजे ज्यांना आपण 'डून स्कूल' म्हणतो ते लोक! '१० जनपथ' ची यावर काय प्रतिक्रिया होते ते पाहणे मनोरंजक ठरेल.
 शिकवणी, मुत्सद्दीपणाची
 भगवती, श्रीनिवासन् यांनी अर्थशास्त्री म्हणून सत्य सांगितले, परखडपणे सांगितले. ते सांगताना मधूनमधून नेहरूंची भलावण करणे त्यांना आवश्यक वाटले असावे. अन्यथा, आपला अहवाल फारच कढत होईल आणि त्याला कोणी हात लावणार नाही अशी त्यांना चिंता पडली असावी; पण राजकीय दृष्टिकोनातून सुधार भारतीय जनतेला कसा खपवावा याचे धडे भगवतींनी पी. व्ही. नरसिंह रावांना द्यावे हे मोठे अजब आहे. पंतप्रधानांच्या कामगिरीबद्दल पुष्कळ मतभेद आहेत; पण "म्हातारा राजकारणात मोठा बेरकी आहे, काही न बोलता भल्याभल्यांना नामोहरम करतो." अशी त्यांची ख्याती झाली आहे. मुत्सद्दीपणाच्या एका गुणावर पंतप्रधानपदी टिकलेल्या नरसिंह रावांना जगदीश भगवतींनी राजकीय सल्ला द्यावा म्हणजे 'न्यू कॅसलला कोळसा' नेण्याचाच प्रकार!

(०८ सप्टेंबर १९९३)
■ ■