अन्वयार्थ - १/'बॉम्बे क्लब'चे सपाट मैदान आणि वाकडे अंगण

विकिस्रोत कडून


'बॉम्बे क्लब'चे सपाट मैदान आणि वाकडे अंगण


 हानपणच्या शालेय पाठ्यपुस्तकातून राघू-मैनेची एक गोष्ट होती. मराठी दुसरी-तिसरीच्या वयात, 'पुरुष जात तेवढी निमकहराम' असा निष्कर्ष काढणारा धडा देण्यात संपादकांचा आणि शाळा खात्याचा काय हेतू असेल तो आजदेखील उमजत नाही. त्यावेळीदेखील हा धडा काही इतर वेच्यांपेक्षा वेगळा आहे, विचित्र आहे याची कुठेतरी अंधुकशी जाणीव भासत होती.
 राघू-मैनेच्या गोष्टीचा थोडक्यात सारांश असाः संध्याकाळी राघू घरट्यात परत येतो आणि त्याला मिळालेले खाद्य लपवून ठेवून, मैनेला विचारतो, 'आतले पाहिजे की बाहेरच?' मैना बिचारी भोळी. ती मागते आतले. राघू दडवलेली खारीक काढतो, वरचा गोड गर खाऊन टाकतो आणि मैनेच्या अंगावर आतले बी फेकून देतो. मैना बिचारी उपाशीपोटी त्या खारकेच्या बीशी झेलझेल खेळत राहते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राघू पुन्हा तोच प्रश्न विचारतो, 'आतले की बाहेरचे?' आदल्या दिवसाच्या अनुभवाने शहाणी झालेली मैना या वेळी बाहेरचे मागते. राघू हसत-हसत बदाम काढतो, तो फोडून बाहेरचे कवच मैनेकडे देतो आणि आतले बदाम बी खाऊन टाकतो. तिसऱ्या दिवशीही हीच कथा. आतले मागितले तरी आपण फसतो, बाहेरचे मागितले तरी तीच स्थिती, या अनुभवाने शहाणी झालेली मैना उत्तर देते, 'आतले नको आणि बाहेरचे नको; मला मधले द्या.' राघू दडवलेला जरदाळू काढतो वरचा गर काढून स्वतःकडे ठेवतो, मधले बी फोडून कवच तेवढे मैनेकडे फेकतो आणि गर्भातला गर पुन्हा स्वतःच मटकावतो.
 स्त्री-मुक्तीवाल्यांचा संदेश पोचविण्यासाठी या गोष्टीचा खरे म्हटले तर फारसा उपयोग नाही. शहरी मध्यमवर्गीय महिलांप्रमाणे पक्षिणी नवऱ्याने आणलेल्या मिळकतीवर जगत नाहीत. तेव्हा मैनेची स्थिती राघूने फसवले म्हणून उपाशीपोटी राहण्याची होत नाही. गोष्टीतील राघूही मोठा विचित्र. त्याच्या मनात सगळी कमाई स्वतःच मटकावण्याचे होते, तर दररोज 'आतले की बाहेरचे?' अशी पसंती विचारण्याची त्याला काही आवश्यकता नव्हती. सगळे मिळालेले खाद्य फस्त करून तो घरी आला नसता तरी मैने धुंडून आणलेल्या खाद्याचा थोडा तरी वाटा त्याला हडप करता आलाच असता. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. तीनही दिवसांच्या खेळात मैना हरली असा योगायोग अपघाताने ठारसा संभवत नाही. खारीक, बदाम, जरदाळू असा तीनही प्रकारचा सुका मेवा राघूजवळ असला पाहिजे आणि मैनेच्या उत्तराच्या अनुरोधाने स्वतःला सोयीस्कर अशी चीज तो बाहेर काढत असला पाहिजे.
 'बॉम्बे क्लब'चा राघू
 स्त्रियांच्या अवस्थेचे रूपक म्हणून ही कथा निरर्थक आहे. मग या गोष्टीचा अर्थ तरी काय? फारसे स्पष्ट होत नव्हते; पण महिन्यापूर्वी डोक्यात लखकन प्रकाश पडला आणि राघू-मैनेच्या कथेचा काहीसा खोल आणि व्यापक अर्थ लागू लागला.
 मुंबई 'बॉम्बे क्लब' हे नाव अलीकडे गाजत आहे. क्लब म्हटले, की त्याचा संबंध खेळाशी आला. मग तो खेळ कोणताही असो, साध्या पत्त्यांचा ब्रिज, रमी इत्यादी पैसे लावून होणारा जुगारी पत्त्यांचा खेळ, बुद्धिबळ इत्यादी बैठ्या खेळांपासून पोहणे, क्रिकेट, मुष्टियुद्ध अशा अनेक खेळांच्या सोयीसुविधा क्लब नावाच्या संस्था आपल्या सदस्यांना उपलब्ध करून देतात. खरे म्हटले तर 'बॉम्बे क्लब' हा काही अशा खेळांशी संबंधित असलेल्या क्लबपैकी नाही, या क्लबचे सदस्य देशभरातील प्रख्यात विख्यात कारखानदार, व्यापारी आदी मंडळी आहेत. कधीकाळी त्यांचा खेळांशी संबंध आला असेल तर त्याची लक्षणे बहुतेकांच्या शरीरावर आज तरी दिसत नाहीत. तरीही या मंडळीचा 'बॉम्बे क्लब' म्हणजे खेळाची जागा आहे, असा एक सार्वत्रिक गैरसमज पसरला. त्याचे कारण असे, की क्लबच्या स्थापनेच्या दिवशीच सदस्यांनी एकमताने 'सपाट मैदानाची' मागणी केली. 'आम्ही स्पर्धात्मक खेळांसाठी तैयार' आहेत. जगातील कोणाही खेळाडूपेक्षा आम्ही कमी नाही; पण मैदान सपाट मिळाले पाहिजे," अशी त्यांनी मागणी केली.
 मैदान दाखवा, खेळ नंतर ठरवू
 'बॉम्बे क्लब'ला कोणत्या खेळाच्या स्पर्धेत उतरायचे आहे ते काही स्पष्ट झाले नाही. हॉकी, फुटबॉल यांना चांगले सपाट मैदान लागते. भारतीय खेळातील हुतूतू, खो-खो, आट्यापाट्या इत्यादींनाही सपाट मैदान लागते; पण, बहुतेक खेळात मैदानातील अंगण पाळीपाळीने बदलून घेण्याची व्यवस्था असल्याने मैदान सपाट नसल्याबद्दलची ठारशी तक्रार कधी ऐक येत नाही. मैदानातील एक भाग सरस असला आणि ते अंगण नाणेफेकीच्या निर्णयामुळे एका संघास मिळाले तर त्यांचे नशीब भले असे मानण्याचा खिलाडूपणा बहुतेक संघ दाखवितात.
 धावण्याच्या छोट्या अंतराच्या शर्यतीत मैदान सपाट असते; पण मॅरेथॉनसारख्या लांब अंतराच्या स्पर्धेत शर्यतीचा मार्ग थोडाफार वरखाली असला तरी त्यामुळे विजेत्यांना शर्यत पुरी करण्यास लागणाऱ्या वेळात फरक पडतो. स्पर्धेतील विजेता ठरण्यास त्यामुळे काही फारसा ठरक पडत नाही.
 काही खेळ सपाट मैदानावर खेळले जाऊच शकत नाहीत. सायकलच्या शर्यतींचा आधुनिक मार्ग कलताच असतो आणि हिवाळ्याच्या दिवसांत थंड प्रदेशातील बर्फावरून घसरत जायच्या अनेकविध स्पर्धांसाठी उतार लागतो. एवढेच नव्हे तर जितका उतार जास्त तितके उच्चांक वरचढ होतात.
 हिंदुस्थानातील कारखानदारांच्या 'बॉम्बे क्लब'ला सपाट मैदान हवे आहे; पण ते नेमके कोणत्या खेळासाठी? याचे स्पष्ट उत्तर मिळाले नाही तर मैनेसारखी फसगत होईल. "बरं, चला तुम्हाला सपाट मैदान दिले," असे आपण कबूल केले, अशा कल्पनेने, की 'बॉम्बे क्लब'ला बहुतेक हॉकी, फुटबॉलसारखा खेळ खेळायचा असेल, तर एक धोका आहे. सपाट मैदान मिळाल्यावर 'बॉम्बे क्लब'च्या खेळाडूंनी स्कीइंग करण्याचा आग्रह धरला आणि बर्फावरून तुफान वेगाने कड्यांवरून शरीर फेकीत जाण्याची जिवघेणी स्पर्धा सपाट मैदानावर खेळण्याचा आग्रह धरला तर कोणी खेळाडू त्यांना खेळात काय म्हणून सामील करून घेईल?
 कारखानदारांच्या क्रीडा
 कारखानदारांच्या या क्लबला नेमका कोणता खेळ खेळायचे आहे? स्वातंत्र्यानंतरच्या काळात कारखानदारांना काही वेगळेच खेळ खेळण्याच्या सवयी लागल्या आहेत. समोरच्या खेळाडूंनी एक पाय बांधून, एक हात पाठीशी ठेवून किंवा डोळ्यांवर काळी पट्टी बांधून घेऊन मैदानात उतरावे, म्हणजे हे बहाद्दर मैदानात उभे तरी राहतील अशा अटी घालून खेळायची त्यांना सवय. सर्व जगात सर्वांत जास्त संरक्षण असलेले कारखानदार म्हणजे हिंदुस्थानचे. 'सपाट मैदाना'च्या भाषेत बोलायचे झाले तर 'बॉम्बे क्लब'च्या फुटबॉल संघाची सगळ्यात महत्त्वाची अट अशी, की मैदान तिरपेच असावे. 'बॉम्बे क्लब'चा संघ अंगण न बदलता कायम तिरप्या मैदानाच्या चढत्या भागातच खेळावा. 'बॉम्बे क्लब'च्या अंगणात येण्याची विरोधी खेळाडूंना मुभाच असणार नाही. याउलट क्लबच्या खेळाडूंना विरोधी पक्षाच्या गोलसमोर उभे राहून 'फ्री किक' मारण्याची परवानगी दर पाच दहा मिनिटांनी मिळाली पाहिजे. आता 'बॉम्बे क्लब'बरोबर असला खेळ खेळण्यास कोणी तयार नाही. उलट, साध्या सोप्या मैदानावर खेळण्याची 'बॉम्बे क्लब'ची तयारी नाही. ते मागतात 'सपाट मैदान; पण त्यांना हवे आहे त्यांच्या खेळाडूंना मदत करणारे 'तिरपे मैदान...'
 "नाचता येईना..."
 एवढ्याकरिता त्यांचा आकांत चालू आहे. भांडवली फायद्यावरील कराचे प्रमाण परदेशी आणि देशी गुंतवणुकीवर सारखेच असावे. समभागांची प्रमाणपत्रे गहाण ठेवून भांडवल उभारण्याची व्यवस्था अधिक सोयीस्कर पाहिजे, कंपन्यांवरील कर समान असावा. या त्यांच्या मागण्यांत पुष्कळ तथ्य आहे. देशात विजेचा पुरवठा अपुरा आणि अनियोजित आहे. कच्च्या मालाची गुणवत्ता कमी आहे. सरकारी 'इन्स्पेक्टर राज' आणि 'भ्रष्टाचार उत्पादकतेत बाधा आणतात. नोकरदारांच्या राजकीय ताकदीमुळे त्यांच्या मागण्या अवास्तव होत आहेत, या त्यांच्या तक्रारीत पुष्कळ अर्थ आहे; पण या सगळ्या अडचणी परदेशी भांडवलदारांना 'बॉम्बे क्लब'च्या सदस्यांपेक्षा अधिक जाचक आणि त्रासदायक होणार आहेत, कारण असल्या अजागळ व्यवस्थेत काम करण्याची परदेशी गुंतवणूकदारांना अजिबात सवय नाही. परदेशी गुंतवणूकदारांपेक्षा 'बॉम्बे क्लब'च्या खेळाडूंना अधिक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे हे काही खरे नाही.
 'राघू मैने'च्या कथेतील राघूप्रमाणे 'बॉम्बे क्लब'च्या सदस्यांचा खेळ लबाडीचा आहे आणि आपल्या लबाडीच्या खेळाला सपाट मैदान हवे असा ते कांगावा करीत आहेत; पण त्यांच्या मनात कोणता खेळ खेळायचा आहे ते सांगत नाहीत. नाचता येत नसले, की 'अंगण वाकडे' म्हणावयाचे, अशी जुनी म्हण आहे, 'बॉम्बे क्लब'ची सपाट मैदानाची मागणी आणि 'अंगण वाकडे' असल्याची तक्रार या दोघांची जातकुळी एकच.

(४ मार्च १९९४)
■ ■