Jump to content

अन्वयार्थ - १/बडा हिंदूराव आणि बादशहा

विकिस्रोत कडून


बडा हिंदूराव आणि बादशहा


 दिल्लीला गेलेले महाराष्ट्राचे नेते तेथे फिके पडतात, असा मोठा लांब इतिहास आहे. सगळी दख्खन हलवून सोडणारा महादजी शिंदे, पहिल्या बाजीरावावर ढेकूळ फेकून मारणारा आणि त्याला अर्वाच्य शिव्या घालणारा; पण दिल्लीला गेल्यावर मनसदीची वस्त्रे घेऊन फक्त बडा हिंदूराव बनला. अलीकडच्या इतिहासात लोकमान्य टिळक, यशवंतराव चव्हाण इत्यादी महाराष्ट्रातील नरपुंगवांचा अनुभव काही फारसा वेगळा नाही, श्री. शरद पवार दिल्लीला धडकून परत आले. त्यांनी यापुढे काही वेगळा इतिहास घडवला नाही तर मराठ्यांना दिल्लीचे हवापाणी रुचत नाही आणि पचत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होईल.
 पराभवाचे खापर
 हे असे का होते? कारणे अनेक असतील; पण नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगातून त्यातील एक किरकोळ का होईना, कारण लक्षात आले. १९९३च्या अखेरीस उत्तरेतील सहा राज्यांत निवडणुका झाल्या. त्यांपैकी उत्तर प्रदेशातील निवडणुकीत काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. हा पराभव का, कसा झाला, या पराभवाला जबाबदार कोण याचे सत्यशोधन आणि विश्लेषण करण्यासाठी काँग्रेस पक्षाने एक समिती नेमली. या समितीच्या अध्यक्षपदी केरळचे मुख्यमंत्री के. करुणाकरन तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. अब्दुल रहमान अंतुले, महाराष्ट्र प्रदेशच्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील आणि जगन्नाथ मिश्रा इत्यादी सदस्य होते. समितीच्या अहवालात उत्तर प्रदेशाच्या काँग्रेस आयच्या पराभवास कारण झालेल्या अनेक घटकांची मीमांसा करण्यात आली आहे. विशेषतः पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक प्रचाराच्या काळात केलेल्या विधानांमुळे काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला, अशी नोंद समितीने केली आहे. हे नेते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. शरद पवार आणि केंद्रीय कल्याणमंत्री श्री. सीताराम केसरी. हा अहवाल अतिगोपनीय समजला जातो; पण या दोन नेत्यांच्या संदर्भातील माहिती फुटली, तिचा बोभाटा झाला. 'हिंदू' या वर्तमान पत्रात यासंबंधीच्या बातम्या झळकल्या, ही माहिती काँग्रेसच्या उच्चपदस्थ गोटांतून जाणीवपूर्वक फोडण्यात आली असावी.
 कुत्र्याला बदनाम करा
 श्री. शरद पवारांवरचा आरोप थोडक्यात असा : उत्तर प्रदेशाबाहेरील श्री. शरद पवार आदींनी केलेल्या विधानांमुळे काँग्रेसने लढाईपूर्वीच रणभूमीवरून पळ काढला असा गैरसमज लोकांमध्ये निर्माण झाला. श्री. शरद पवार यांनी निवडणुकांपूर्वी, 'उत्तर प्रदेशांत काँग्रेस आय ने निवडणूक लढवू नये,' असे म्हटल्याचे प्रसिद्ध झाले होते, श्री. शरद पवार यांनी, 'आपण तसे म्हटले नसल्याचे' व उत्तर प्रदेशांत काँग्रेस आय पक्षाने धर्मनिरपेक्ष शक्ती मजबूत करण्याच्या दृष्टीने भूमिका घ्यावी, असे म्हटले असल्याचा खुलासा केला होता. उत्तर प्रदेशातील हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे असे, की या वक्तव्यांमुळे आम जनतेत असा समज पसरला, की खुद्द काँग्रेस नेत्यांनाच जिंकून येण्याची काही आशा नाही. भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर येऊ न देण्याचा निर्धार बहुसंख्य मुसलमान आणि मागासवर्गीयांनी केला होता, भाजपविरोधी सर्वांत सशक्त पक्षाला मते देण्याचा त्यांचा विचार ठरला होता. पवार आदी नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सर्वांत प्रबल विरोधी मुलायम- कांशीराम युतीच ठरेल असे वातावरण तयार झाले आणि त्याचा फायदा युतीस मिळाला, काँग्रेसचे पानिपत झाले.
 दिल्ली दरबारातील कट कारस्थाने
 उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या पराभवाची मीमांसा करणे हा प्रस्तुतचा विषय नाही. दिल्लीतील आधुनिक 'बडा हिंदूराव' निष्प्रभ कसा होईल, यासाठी दिल्लीश्वरांनी वापरलेली तंत्रे अधिक कुतूहलाचा विषय आहे. पराभवाची मीमांसा करण्यासाठी समिती नेमली. समितीचे सदस्य कोण? अध्यक्ष करुणाकरन- पंतप्रधानांचे खास जानी दोस्त; केंद्रातील काँग्रेस सरकार डुगडुगत होते तेव्हा करुणाकरन माहिनो न् महिने दिल्लीत डेरा ठोकून होते. बॅ. अंतुले आणि प्रतिभाताई पाटील यांचे नाते शरद पवारांशी साप-मुंगूस आणि विळा-भोपळा यांच्यातील दोस्तीप्रमाणेच. महाराष्ट्रातील नेमकी हीच मंडळी समितीवर नेमली जावी हा निव्वळ अपघात असेल तर तो मोठा चमत्कार म्हणावा लागेल. समितीच्या सदस्यांची यादी पाहिल्यावर निष्कर्ष श्री. शरद पवारांच्या विरुद्ध निघाला यात आश्चर्य ते कोणते? उत्तर प्रदेशातील पंतप्रधानांच्या सभांना पाच-पन्नास माणसेही जमत नव्हती, त्यांची सगळी वक्तव्ये कार्यकर्त्यांचा असलेला उत्साह गोठवणारी होती, याचा उल्लेख करुणाकरन समिती थोडीच करणार होती? दिल्लीश्वरांना सोयीस्कर समिती नेमली गेली, तिने दिल्लीश्वरांना सोयीस्कर निष्कर्ष काढले, दिल्लीश्वरांच्या निकटवर्ती गोटांनी याची बित्तम् बातमी वृत्तपत्रांना पुरवली. पवारांच्या अपराधाची चर्चा येत्या पंधरा दिवसांत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत होणार आहे. त्यांच्याविरुद्ध कोणतीही कडक उपाययोजना केली जाणार नाही. महाराष्ट्रातील संभाजीचा संताप अनावर झाला तर काहीही हौतात्म्य स्वीकारतात, याची दिल्लीश्वरांना खबर आहे. शरद पवार काही संभाजीच्या प्रकृतीचे नाहीत; त्यांची जास्तीत-जास्त जयसिंगाबरोबर तुलना होईल, हे पुरा दिल्ली दरबार जाणतो. पवारांना संपविले तर सलतनीची हालत दख्खनमध्ये मुश्कील होईल हे दिल्लीश्वर चांगले जाणतात; पण पवारांना वाढू दिले तर उद्या आपलाही 'वसंतदादा पाटील' झाल्याखेरीज राहणार नाही. यांची त्यांनाही धास्ती आहे. दिल्लीशैलीची खास चाल अशी, की माणसे पदरी बाळगावी व त्यांचा तेजोभंग करून, काटछाट करून बाळगावी. हातात भूखंड प्रकरणातील सज्जड पुरावे मुंबईच्या मलबार हिलवरील 'अंगारिका' सोसायटीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल, बाळासाहेब विखे पाटील प्रकरणी उच्च न्यायालयाने झाडलेले ताशेरे, लखनौहून सरकारी विमानातून खुनी गुंडांना बरोबर प्रवासात आणल्याचे प्रकरण, इस्त्रालयमधील शस्त्र खरेदीचे प्रकरण, दाऊद इब्राहिम व इतर ख्यातनाम गुंडांबरोबरचे घनिष्ठ संबंध, पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकूर अशा बदनामांना पक्षाची तिकीटे दिल्याचे प्रकरण, अशा अनेक बेड्यांनी महाराष्ट्राचा आधुनिक संभाजी आधीच जेरबंद झाला आहे. मनोमिलनाच्या आधी विरोधकांत राहिल्यामुळे इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आदींविरुद्ध केलेल्या अफाट वक्तव्यांमुळे पवारांची स्वामिनिष्ठा आधीच संशयास्पद होती, चंद्रशेखरांबरोबर मुलायम- कांशीराम युतीस समजता न समजता फायदेशीर ठरतील अशी वक्तव्ये पवारांनी केली, हे प्रकरण त्यांना आणखी कडीबेडीत घालणारे आहे. त्यांना कोणी संपविणार नाही, अधिकाधिक जखडून टाकतील. दिल्लीश्वरांचे हे असले राजकारण मराठ्यांना जमत नाही, म्हणून मराठा गडी दिल्लीत तरी अपयशाचा धनी ठरतो.
 मराठ्यांना हे का जमू नये?
 दिल्लीश्वरांची ही तंत्रे शरद पवारांनी वापरायला काय हरकत होती? भूखंड प्रकरणाचा शोध घेण्यासाठी एक चांगली समिती नेमायची; त्यावर नेमायचे निष्ठावान बिल्डर किंवा जिल्ह्या-जिल्ह्यांत, भूखंड विषयाचा भरपूर अनुभव असलेले, 'निवास' स्पेशलिस्ट, त्यांच्याकडून निर्णय आणायचा, की सर्व भूखंड प्रकरणात शरदरावांचा काहीच दोष नाही. यापलीकडे जाऊन भूखंड प्रकरणातील खरे दोषी आपले विरोधकच आहेत, असे कागदोपत्री दाखविण्याचे कौशल्य पवारांकडे नसावे. त्यांनी ही तरकीब वापरली नाही असे नाही. मृणाल गोरेंना छोटासा फटका देण्याकरिता वापरली; पण निष्ठावान समितीच्या शिफारसींच्या आधाराने अंतुले, प्रतिभाताई पाटील यांनासुद्धा जेरबंद करण्याचे प्रयत्न ऐकिवात नाहीत. भूखंडाचा फायदा मिळवलेल्यांची नावे आपण जाहीर करतो असे या मराठेश्रेष्ठांनी म्हटले तर देशांतील आणि दिल्लीतील अनेकांच्या अंगाला कापरे सुटल्याखेरीज राहणार नाही.
 लखनौहून मुंबईला त्यांनी दोन गुंडांबरोबर प्रवास केला. मुंबईत आल्यानंतर जे.जे हॉस्पिटलमधील हत्याकांडात रक्तपात घडविला. या प्रकरणी शरद पवारांनी एक समिती नेमली असती, त्यात हितेंद्र ठाकर, पप्पू कलानी असे निवडक तज्ज्ञ घेतले असते. तर त्या विमानात आपण त्या गुंडांना शंकरराव चव्हाणांच्या शिफारसीवरून घेतले असा निष्कर्ष सहज काढता आला असता.
 मदनलाल बाफना यांच्या मंत्रालयातील फोनवरून दुबईत सतत संपर्क साधला जात होता. पवार आणि दाऊद इब्राहिम यांचे घनिष्ठ संबंध आहेत. याची सर्वदूर खात्री आहे; पण हे प्रकरण आपल्या अंगावर शेकू नये यासाठी पवारांना सोयीस्कर समिती नेमता आली असती आणि बॅ. गाडगीळ यांच्यामार्फत पंतप्रधानांनी पाठविलेल्या निरोपामुळे असे झाले असे सांगता आले असते. मुंबईच्या स्फोटातील चौकशीत मुरली देवरांपासून ते देशांतील सर्वोच्च पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेकांचे हात गुंतले आहेत, असे आपल्या पुठ्यातील एखाद्या समितीकडून वदवून घेता आले असते. गेला बाजार हर्षद मेहताने मुंबईत ती प्रख्यात सुटकेस खरेदी केली याचा प्रत्यक्ष साक्षीदार पुढे करता आला असता.
 ...पण मराठ्यांना हे जमत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात साध्य साधनांचा विधिनिषेध नसलेले दिग्गज दिल्लीत पोहोचले, की डावपेचांच्या खेळांत कमी पडतात आणि मराठ्यांना दिल्ली कायमची दूर राहते.

(२५ मार्च १९९४)
■ ■