अन्वयार्थ - १/उद्योगी टोळ आणि आळशी मुंगी

विकिस्रोत कडून


उद्योगी टोळ आणि आळशी मुंगी


 कार्ट्यांनो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसते हुंदडत असता, काही अभ्यास वगैरे कराल की नाही? पुढे काय भिका मागायच्या आहेत काय? खेळून काय पोट भरणार आहे?"
 माझ्या पिढीतल्या अनेकांच्या बालपणातील सगळ्या आठवणी आईबापांच्या असल्या वाक्ताडनाने झाकळलेल्या आहेत.
 "चांगली मुले अभ्यास करतात, परीक्षेत पास होतात, नाव कमावतात, पैसा कमावतात, घराण्याचे नाव उज्ज्वल करतात; उंडगी मुले हुंदडण्यात वेळ घालवतात, परीक्षेत नापास होतात, आयुष्याची धुळधाण करून घेतात."
 अशा बोधवाक्यांबरोबर 'मुंगी आणि टोळ' ही जगातील सगळ्या देशांत सगळ्या भाषांत सांगितली गेलेली 'उद्योगप्रशंसा' आणि 'उताडनिंदा' करणारी कथा वारंवार ऐकावी लागे. मुंगीने वर्षभर कष्ट करून धान्याची बेगमी केली, टोळ मात्र वर्षभर टोळभैरवी करत राहिला; पावसाळा आल्यावर त्याला मुंगीकडे मदत मागण्यासाठी जावे लागले आणि मुंगीने त्याची याचना झिडकारून त्याला हाकून लावले, टोळ भुकेने, थंडीने मरून गेला, अशी ही थोडक्यात कथा.
 वडीलधाऱ्यांच्या या सतत बोलण्याने चार धूर्तीशी गाठ पडलेल्या ब्राह्मणासारखी मुलांची स्थिती व्हायची.खांद्यावरील कोकरू कुत्रेच असले पाहिजे असे चौघांच्या सतत सांगण्यावरून पटलेला ब्राह्मण कोकरू टाकून देतो, त्याप्रमाणे आम्ही खेळ टाकून अभ्यासाच्या मागे लागलो.
 स्वादु हितंच दुर्लभम्
 खेळताना आनंद वाटतो; अभ्यास करताना कष्टदायी वाटते, नको नकोसे वाटते. त्याअर्थी खेळ हा विनाशकारी असला पाहिजे अणि अभ्यास अंततोगत्वा हितकारी असला पाहिजे असा वडीलधाऱ्या मंडळींचा निष्कर्ष असे. औषध कधी गोड असत नाही; जे कठोर क्लेशदायक तेच अंती फायद्याचे अशी आत्मक्लेशवादी नीतिमत्ता घरी आईबाप, शाळेत गुरुजन आणि पुस्तकात सानेगुरुजीपासून सर्व थोरथोर मंडळी निक्षून सांगत असत.
 मुंगीच्या उद्योगप्रियतेचा मला मनापासून तिटकारा येई. या एका मुंगीमुळे खेळण्याबागडण्याचा सगळा आनंदच कोमेजून जातो. ही मुंगीसुद्धा जर टोळाप्रमाणे गंमत करत फिरली असती तर तिचे उदाहरण देऊन वडीलधाऱ्या मंडळींना आपल्याला बोलताच आले नसते, असे वाटे.
 आत्मक्लेशाचे तत्त्वज्ञान
 खेळण्याऐवजी घरात येऊन वाचायला बसले तरी 'आत्मपीडा म्हणजेच कल्याण' या बोधतत्त्वाचा ससेमिरा चुकत नसे. काय वाचतो आहे याकडे मोठ्या मंडळींचे बारकाईने लक्ष असे. गणित, पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल असले काही नीरस पुस्तक समोर घेऊन बसलेला मुलगा गुणी, शहाणा आणि आदर्श. इतिहासाचे पुस्तक काढले याचा अर्थ त्यातले त्यात 'कथा रम्या' वाचून करमणूक करण्याचा प्रयत्न चालला आहे असा गंभीर आरोप येई. मराठीचे धडे वाचणे म्हणजे तर अभ्यासाच्या नावाने निव्वळ फसवणूक. 'किती माझा कोंबडा हो शहाणा' अशी कविता म्हटली म्हणजे तो उनाडपणा. त्याबरोबर 'कोंबडा म्हणजे पक्षिविशेष' असे निरर्थक आणि न समजणारे पाठांतर केले म्हणजे 'पोरगे अगदीच काही कामातून गेलेले नाही', अशी थोड्याफार संतोषाची छटा आईबापांच्या चेहऱ्यावर उठे. इंग्रजीच्या अभ्यासाला मोठा मान होता. इंग्रजी वाचतो म्हणजे 'पोरगा नाव काढणार' अशी प्रशस्ती होई. त्यामुळे गोड गोष्टी वाचणारा मुलगा उनाड अशी निर्भर्त्सना आणि इंग्रजीतील परीकथा वाचणारा मुलगा अभ्यासू अशी वाखाणणी होत असे.
 आमच्या काळी चिंतामणी द्वारकानाथ देशमुख (आय.सी.एस.) रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (निवृत्तीनंतर भारताचे अर्थमंत्री) यांचे मोठे कौतुक होते. मॅट्रिक च्या परीक्षेत त्यांनी ९०% मार्क मिळवून उच्चांक स्थापला होता. तो आमच्या काळापर्यंत तरी कोणी मोडला नव्हता. मॅट्रिकच्या परीक्षेतील त्यांच्या देदीप्यमान यशावर खुद्द गोविंदाग्रजांनी एक लांबलचक कविता लिहिली होती. सी. डी. देशमुख म्हणजे कुलभूषण; 'पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा' मुंगीप्रमाणेच देशमुखांच्या उदाहरणाने आमचे लहानपण खूपच खराब केले. या बाळाने कधीकाळी म्हटले म्हणे, "आवडणारी गोष्ट कोणीही करेल न आवडणारी गोष्ट करून दाखवण्यातच मोठेपणा आहे."
आजकाल मुलाची आवडनिवड काय आहे, त्याचा कल कोणीकडे आहे ते पाहून त्याने कोणता अभ्यासक्रम घ्यावा ते ठरवावे, त्यासाठी त्याच्या सुप्त आवडीनिवडी शोधून काढून सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ मंडळी असतात. आमच्या काळी व्यावसायिक मार्गदर्शकाची भूमिका आईबापेच करीत; पण आवडीनिवडी पाहण्याऐवजी ते पोराला सगळ्यांत न आवडणारा विषय कोणता आहे हे बरोबर शोधून काढीत. या अभ्यासक्रमात पोराला सर्वांत अधिक क्लेश होतील असे चोख आडाखे बांधून पोराला तिकडे ढकलीत. मनाचा सहज कल वाईट गोष्टींकडे असतो, मन मारणे यासारखा पुरुषार्थ नाही हा आमच्या बालपणीचा सगळ्यांत मोठा कित्ता होता.
 मार्क ट्वेनकृत मुंगीचे मूर्तिभंजन
 हाती सहज लागलेले मार्क ट्वेनच्या गोष्टींचे पुस्तक एकदा वाचले. इंग्रजी असल्यामुळे वाचण्यास मनाई नव्हती. मार्क ट्वेनचाही मुंग्यांवर मोठा राग. तो म्हणतो, मुंग्या मुळात कष्टाळु आणि उद्योगप्रिय असतात हीच एक प्रचंड थाप आहे. मुंग्याही उनाड असतात. उद्योगी असल्याची बतावणी करण्यात त्या मोठ्या हुशार असतात, एवढेच. विशेषतः आपल्या हालचाली कोणीतरी बारकाईने पाहतो आहे. पाहणारा तोंडावरून कवी वगैरे असण्याची शक्यता आहे असे लक्षात आले, की त्या आपण मोठे कामात असल्याचे नाटक करतात. गवताची एखादी काडी, नाकतोड्याचा तुटून पडलेला पाय अशी एखादी निरुपयोगी वस्तू उचलून घराकडे नेण्याच्या धडपडीत आहोत असे ढोंग करतात. मुंग्यांच्या आकारमानाच्या तुलनेने पाहिले तर माणसाने खांद्यावरून हत्ती नेण्याचा प्रयत्न करावा अशातला हा प्रकार. थोडावेळ कष्टाचे नाटक केल्यावर मुंगी मदतीकरिता मैत्रीण शोधून आणते. दोघी मिळून काही वेळा विरुद्ध बाजूंना ओढण्याचा खटाटोप करतात. निरीक्षक कवीला काही कंटाळा येत नाही असे लक्षात आल्यावर काही वेळाने नाकतोड्याची तंगडी मुळात जिथे पडली होती त्याच्या आसपासच सोडून दोघी चालत्या होतात...
 मार्क ट्वेनने केलेले हे मुंगीचे मूर्तिभंजन वाचताच खांद्यावरचे मणामणाचे ओझे दूर झाल्याचा आनंद झाला; पण कोणा वडीलधाऱ्यांना मुंगीच्या ढोंगीपणाची कहाणी सांगण्याचा प्रयत्न करणेही धोक्याचे झाले असते. मुलगा अगदीच वाया गेला अशी टीका टिप्पणी ऐकावी लागली असती.
 टोळांची भरभराट
 आता परिस्थिती अगदीच उलटी झाली आहे. क्रिकेट, टेनिस अशा खेळांमध्ये जागतिक प्रावीण्य मिळवणारे खेळाडू एका एका स्पर्धेत कोटी कोटी रुपये मिळवतात असे ऐकले किंवा वाचले, की मीही हबकून जातो. खेळण्याबद्दल आपली पोटापुरती भाजीभाकरी मिळावी इतपत ठीक आहे; पण वर्षानुवर्षे कष्ट करून विद्याभ्यास करणाऱ्या हुशार कष्टाळू विद्यार्थ्यांपेक्षा खेळाडूंना शेकडोपट उत्पन्न मिळावे, त्यांचे नाव व्हावे आणि सन्मानही व्हावा हे अद्भुत वाटते.
 आधुनिक घरात आमच्या लहानपणच्या घरच्यापेक्षा अगदी वेगळ्या प्रकारचे नाटक घडत असले पाहिजे. मुलगा खोलीत वाचत बसला आहे, बाप घरी येतो आणि मुलाला म्हणतो, "अरे, तू घरात वाचत काय बसला आहेस? बाहेर जा टेनिस खेळ. अरे, त्या सांप्रासचे काही आदर्श समोर ठेव, निदान विजय अमृतराजचा. तो बघ कांबळी, काय नाव कमावतो आहे! तुला लेका आम्ही सर्व काही संधी आणि पाहिजे ती साधने द्यायला तयार आहोत, तू खेळत का नाहीस. अभ्यास करून तुला काय मिळणार आहे." आणि मुलगा म्हणतो "बाबा भूमितीचे एवढे प्रमेय सोडवतो आणि मग पाहिजे तर खेळायला जातो."
 नव्या युगातील टोळ
 तुमच्या वर्षभराच्या, कसेबसे उभे राहू लागलेल्या, मुलाने नाव रोशन करावे असे वाटत असेल तर आतापासून त्याच्या हाती क्रिकेटची बॅट द्या, टेनिसची रॅकेट द्या. तो जलतरणपटू व्हावे असे वाटत असेल तर त्याला बिनधास्त पाण्यात सोडून द्या.
 खेळ ही करिअर! आनंदही आणि पैसाही! त्यावर आणखी प्रसिद्धीचा झोत आणि कीर्तीचा लखलखाट! आमचे उंडगणे आणि आजच्या शिखरावरील खेळाडूंची खेळात कुशलता साधण्याकरिता केलेली तपस्या यात जमीन-अस्मानचा फरक आहे, हे चांगले समजते आणि उमजते. पंचपंच उष:काली उठून थंड पाण्याने स्नान करून योगाभ्यासाला लागणाऱ्या महामुनीपेक्षा शरीरसौष्ठव आणि बांधेसूदपणा टिकविण्यासाठी चित्रपटातील आधुनिक चटकचांदणीचे प्रयास अधिक खडतर आहेत हे समजूनही जुन्या नैतिकतेत घडलेल्या मनाला काहीतरी चुकते आहे असे वाटते.
 जागतिक पातळीवर पटुता मिळवण्याकरिता लागणारे कष्ट कितीही कठोर असोत, शेवटी खेळ तो खेळ आणि अभ्यास तो अभ्यास असे वाटत राहते.
 जया अंगी टोळपण
 मग एकदम एक घटना घडली. स्टेफी ग्राफ सर्वोच्च मानांकित टेनिस खेळाडू या पदावर चढावी यासाठी तिच्या एका भक्ताने अग्रणी खेळाडू मोनिका सेलेस हिच्यावर भर क्रीडांगणावर टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोर चाकूहल्ला केला. मोनिका अजूनही हल्ल्याच्या जखमेतून सावरलेली नाही, स्टेफी ग्राफ सर्वोच्च खेळाडू बनली आहे. मोनिकाचे नाव जवळजवळ ऐकू येत नाही.
 लिलहॅमर येथे बर्फावरील खेळांच्या आलिंपिक स्पर्धा चालू आहेत. अमेरिकन संघाच्या निवडीच्या वेळी बर्फावरील नृत्यातील अमेरिकन निष्णात नर्तिका नॅन्सी करीगन हिच्यावर हल्ला झाला. अमेरिकेतील तिची स्पर्धक नर्तिका टोनिया हार्डिंग आणि तिच्या मित्रांनी अमेरिकेच्या ऑलिंपिक संघात स्थान मिळावे म्हणून हा हल्ला ठरवून केला असा कबुलीजबाब टोनियाच्या घटस्फोटीत नवऱ्याने दिला.
 तया यातना कठीण
 खेळ म्हणजे नुसती गंमत नाही. खेळ म्हणजे प्रचंड प्रयास, कष्ट, व्यायाम. खेळातील खेळपण नष्ट व्हावे इतका देहदंड. स्पर्धेत बक्षिसापोटी सोन्याच्या राशी असतील; पण स्पर्धा इतकी जिवघेणी की शिखरावर वर्ष-सहा महिनेदेखील टिकून राहणे कठीण. व्यावसायिक आंतरराष्ट्रीय खेळ आणि आमचे लहानपणचे उंडगणे यातला फरक या दोन हल्ल्याच्या घटनांनी चटकन मनावर बिंबला आणि पटले, की खेळाडूंना मिळणारी प्रसिद्धी आणि धनराशी यातील कण अन् कण घाम, रक्त आणि अश्रू यांच्या थेंबाथेंबांनी कमावलेला आहे.
 मुंग्यांचे उदरभरण सुलभ झाले आहे, टोळांचे बागडणे असे थाटाचे झाले आहे की त्यासाठी त्यांना मोठे सायास करावे लागतात.

(१८ मार्च १९९४)
■ ■