अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ व्यवस्थापन आणि नीतिमूल्ये
प्रथम आपण मूल्य किंवा व्हॅल्यूज यांचा विचार करू. आपल्या अनेक प्राथमिकता असतात. आपण त्यांची एक क्रमवारी आखलेली असते. ही क्रमवारी म्हणजेच आपले मूल्य होय. उदाहरणार्थ, एखाद्या आईसमोर दोन पर्याय आहेत. एक घरी थांबून मुलांचा अभ्यास घेणंं आणि दोन किटी पार्टीला जाऊन मजा करणंं. यापैकी कोणत्या पर्यायाला ती प्राधान्य देते यावर ‘आई' या संदर्भात तिचं मूल्य ठरेल.
ही क्रमवारी प्रत्येकाची स्वतंत्र असते. त्यांना सामाजिक संदर्भही असतो. सनातनी परंपरेनुसार पुरुषाने बाहेरची कामं पाहायची आणि कुटुंबासाठी अर्थार्जन करायचंं आणि स्त्रीनं घर सांभाळायचं अशी रीत आहे. महिला सुशिक्षित होऊ लागल्या, तशा पुरुषांच्या बरोबरीनंं बाहेरची कामं पाहू लागल्या. त्याबरोबर हा सामाजिक संदर्भही बदलला.
व्यवसाय किंवा उद्योग या प्रामुख्यानं आर्थिक घडामोडी आहेत. त्यामुळंं 'पैसा' हे त्याचं प्रमुख मूल्य आहे. ते पूर्णपणे भौतिक आहे. मात्र, या भौतिक मूल्याची सांगड आपण आपल्या आध्यात्मिक परंपरेशी घालण्याचा प्रयत्न केला तर गोंधळ निर्माण होतो. सनातनी प्रवृत्तीची माणसं पैशाच्या मागंं लागणं हे पाप आहे. आपल्या उच्च संस्कृतीच्या ते विरुध्द आहे किंवा ते पाश्चात्यांंचंं अंधानुकरण आहे अशा समजुतीत असतात आणि इतरांचीही तशीच समजूत करून देण्यात धन्यता मानतात. भारतीय वर्णव्यवस्थेनुसार वैश्य म्हणजे व्यापारी किंवा पैसे मिळविणारा याला तिसरं स्थान आहे. इथंच कशाला, ब्रिटनमध्ये आजही पाठीमागचं प्रवेशद्वार हे वैश्यांकरता असतंं. दोनशे वर्षांपर्वी घडलेल्या औद्योगिक क्रांतीनंतर अनेक सामाजिक संकल्पना बदलल्या, तशी पैसा व तो मिळविणाऱ्याकडंं पाहण्याची दृष्टीही बदलली. या क्रांतीनं दोन पारंपरिक संकल्पनांना सुरुंग लावला.
इतिहासकाळी अर्थव्यवस्था ही कृषिप्रधान होती. संपत्ती म्हणजे जमीन आणि सोनं अशी संकल्पना होती. या दोघांनाही मर्यादा असल्याने बळाचा वापर करून दुसऱ्याला लूटल्याशिवाय श्रीमंत होता येत नसे. मात्र औद्योगिक अर्थव्यवस्थेत इतरांना गरीब न बनविताही श्रीमंत बनता येतंं हे औद्योगिक क्रांतीनं सिध्द केलं.
त्याचप्रमाणे श्रीमंत व्यक्तीमुुळे समाजही श्रीमंत बनतो, हे औद्योगिक क्रांतीने दाखवून दिलं. औद्योगिक जगात श्रीमंत बनण्यासाठी समाजाचं शोषण करण्याची आवयकता नाही. तर पैशाच्या मोबदल्यात समाजाची दर्जेदार वस्तू आणि सेवांची आवश्यकता भागवून समाजाचा फायदा करून देता येतो. म्हणजेच हि 'विन टू विन' परिस्थिती असते. हे औद्योगिक अर्थव्यवस्थेतच शक्य असतं.
कोणत्याही उद्योगाचंं सर्वात प्रमुख ध्येय फायदा कमावणं हेच असतं. मात्र संपत्तीच्या या उत्पादनात सहा वाटेकरी असतात.
१. गुंतवणूकदार
२. ग्राहक
३. कर्मचारी
४. पुरवठादार
५. सरकार
६. समाज
उद्योगाच्या व्यवस्थापनाला या सहा वाटेकऱ्यांंबरोबर सामंजस्याचे संबंध ठेवावे लागतात. या संबंधालाच ‘उद्योगाची आचारसंहिता' किंवा 'बिझनेस एथिक्स' म्हणतात. या आचारसंहितेमुळंं हे संबंध समतोल, न्यायोचित व परस्परपूरक असे राहतात.
एथिक्स हा शब्द ग्रीक एथिकॉस या शब्दावरून आला आहे. याचा अर्थ ‘वागण्याची पद्धती' किंवा परंपरा असा आहे. प्रत्येक वेळी या पद्धतीचे तार्किक कारण सांगता येईल असं नाही. उदाहरणार्थ, आपण देवळात जाता, तेव्हा पादत्राणं काढून ठेवावी लागतात. चर्चमध्ये जाता, तेव्हा डोक्यावरची हॅट उतरवावी लागते. हे केलं नाही तर काय होईल हा प्रश्न गैरलागू आहे. ज्या ठिकाणी आपण जातो, त्या ठिकाणचा मर्यादाभंग होऊ नये म्हणून हे सर्व करावे लागते.
आचारसंहितेचंं स्वरूपही 'मुल्यां'प्रमाणं प्राथमिकतेवर ठरते. उद्योगक्षेत्रात परंपरेनुसार गुंतवणूकदार ही पहिली प्राथमिकता असते. संस्थेच्या फायद्यातील त्याचा वाटा सर्वप्रथम द्यावा लागतो. मात्र जसजशी संस्था ‘व्यावसायिक’ बनत जाते, तसा या स्थितीत बदल होतो. हा बदल घडवून आणणारे घटक असे. स्पर्धा :
यामुळंं सर्वाधिक महत्त्व ग्राहकांना प्राप्त होतं. साहजिकच ग्राहक ही पहिली प्राथमिकता बनते.
कामगार संघटना :
या संघटनांच्या दबावामुळे संस्थेला कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करणं भाग पडतं. विशेषत: सेवा उद्योगांमध्ये ग्राहकांचंं समाधान कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवरच अवलंबून असतंं. त्यामुळंं कर्मचाऱ्यांचंं हित सांभाळणंं ही कंपनीची प्राथमिकता बनते.
पुरवठादारांशी समन्वय :
उत्पादनांचा दर्जा राखण्यासाठी कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांशी समन्वय साधण्याचा प्रयोग प्रथम जपानमध्ये करण्यात आला. तो कमालीचा यशस्वी झाल्याने इतरत्रही त्यांच अनुकरण झालं. आता ही पध्दती व्यवसायाचा एक भागच बनली आहे.
सरकारशी संबंध :
सरकारच्या गरजा उद्योग व्यवसायांच्या दृष्टीने विकासाचं एक नवं दालन असतंं. संंरक्षण सामग्री, विविध यंत्र सामग्री व इतर उत्पादनांची सरकारला नेहमी गरज असते. ती भागविणारे अनेक मोठे उद्योग निर्माण झाले आहेत.
सामाजिक जबाबदारी :
उद्योग हा समाजाचाच एक भाग असतो. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीवर उद्योगांचा विकास अवलंबून असतो. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्या, साक्षरता, कुटुंब नियोजन, स्वच्छता मोहीम, इत्यादी सामाजिक उपक्रम सरकारपेक्षाही अधिक कार्यक्षमतेनं राबविताना आढळतात.
या सर्व संबंधांतून ही आचारसंहिता फूलते. उत्क्रांत होत जाते. या उत्क्रांतीसंबंधी पुढील लेखात जाणून घेऊ.