अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/नीतिमूल्ये आणि आचारसंहिता
औद्योगिक क्रांतीच्या प्रारंभीच्या काळात गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाई. त्यानंतर इतर घटकांचा विचार होई. मात्र तीव्र स्पर्धेमुळे ग्राहकांना
आधिक महत्त्व प्राप्त झालं.
कंपनी किंवा संस्थांच्या अंतर्गत रचनेतही गेल्या काही दशकांत क्रांतिकारक बदल झाले आहेत. पूर्वी पुष्कळसे उद्योग कुटुंबांच्या मालकीचे असत. त्यामुळे मालक कुटुंब ठरेल त्या धोरणाचं पालन व्यवस्थापकांना करावं लागे. ‘व्यावसायिक व्यवस्थापना'पेक्षा 'मालकी हक्क’ ही संकल्पना अधिक प्रचलित होती. मात्र, सध्याच्या काळात एखादे कुटुंब किंवा एक-दोन व्यक्ती यांच्या हातातील उद्योगांपेक्षा असंख्य छोट्या समभाग धारकांची बनलेल्या व तज्ज्ञ व्यवस्थापकांनी चालविलेल्या संस्थांची संख्या वाढत आहे.
यामुळं उद्योगांची नीतिमूल्ये आणि आचारसंहिता यांचा विकास निराळ्या पध्दतीनं होत आहे. या बदलांचा स्वीकार टाटा, गोदरेज इत्यादी कुटुंब नियंत्रित संस्थांनाही करावा लागत आहे. कंपन्या दूरदृष्टी, ध्येयवाद व तत्त्वज्ञान यांची भाषा बोलू लागल्या आहेत. तथापि, भारतीय कंपन्यांच्या आचारसंहितेमध्ये हे बदल अजूनही धिम्या गतीनंच होत आहेत.
बहुराष्ट्रीय कंपन्यांचा परिणाम :
गेल्या काही वर्षांत आर्थिक सुधारणांची गती वाढल्यानं व अर्थव्यवस्था निर्बंधमुक्त झाल्याने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी देशात बस्तान बसविलं आहे. या कंपन्यांची मूळ कंपनी अमेरिका किंवा युरोपियन देशांत असते. तिच्या तेथील आचारसंहितेचा परिणाम भारतातील शाखेवरही होत असतो. बहुराष्ट्रीय कंपन्या संस्था चालकांच्या किंवा मालकांच्या लहरीपेक्षा संस्थेच्या हिताला व संस्थेच्या उद्दिष्टांना अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे कर्मचाऱ्याची प्रत्येक कृती व चूक याकडे बारकाईनं लक्ष ठेवलं जातं. तिची नोंद घेतली जाते. त्यावर चर्चा होते. ‘व्यक्ती’ महत्त्वाची न मानता कामगिरी महत्त्वाची मानली जाते. साहजिकच अशा कंपन्यांचा ग्राहकांवर विशेष प्रभाव पडतो.
बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या या रेट्यामुळं भारतीय कंपन्यांनाही आपल्या नीतिमूल्यांमध्ये बदल करावे लागत आहे. परिणामी त्यांच्या आचारसंहितेला गेल्या काही वर्षांत निराळं वळण लागलं आहे. हे बदल केल्याशिवाय व आधुनिक श्रमसंस्कृतीचा स्वीकार केल्याशिवाय आपण तग धरू शकणार नाही, ही जाणीव देशी कंपन्यांनाही प्रकर्षानं होत आहे.
बाजार अर्थव्यवस्थेचा परिणाम :
असं म्हटलं जातं की, कोणत्याही औषधाचे सुपरिणाम असतात तसे दुष्परिणामही असात. ज्या औषधाचे दुष्परिणाम नसतात, त्याचे सुपरिणामही होत नाहीत. सर्व प्रकारच्या अर्थव्यवस्थेबाबतही हे खरे आहे. सध्या जगात सर्वत्र आर्थिक सुधारणांचे वारं वाहत आहे. त्यामुळे ग्राहकांची बाजारपेठ, बाजाराधित अर्थव्यवस्था इत्यादी संकल्पना स्वीकारल्या जात आहेत. त्याचा परिणाम उद्योगांच्या नीतिमूल्यांवर होणं साहजिकच आहे.
या संकल्पनांचा सुपरिणाम म्हणजे उद्योगक्षेत्र अधिक स्पर्धात्मक झाले. उत्पादनांचा दर्जा सुधारला. निर्बंधांच्या भिंती ढासळल्यामुळे आयातनिर्यात सुलभ झाली. नव्या तंत्रज्ञानाच्या विकासाला अधिक चालना मिळाली. ग्राहक अधिक चोखंदळ व जागरूक बनले.
तथापि, त्याचबरोबर नोकरीतील अस्थिरता वाढण्याचा दुष्परिणामही होऊ लागला. 'लाईफ लाँग’ नोकरी ही संकल्पना मागे पडली. याचाही परिणाम उद्योगांच्या नीतिमूल्यांवर झाला आहे.
याखेरीज अनेक प्रकल्पांना होणारा पर्यावरणवाद्यांचा विरोध हा देखील गेल्या काही दशकांत समोर आलेला बदल आहे. पन्नास पंचाहत्तर वर्षांपूर्वी विकास या एकाच ध्येयाने समाज झपाटलेला असल्याने पर्यावरणाचा फारसा विचार न करता जोमाने महाप्रकल्प उभे राहिले. मोठमोठी धरणं, वीजनिर्मिती केंद्रं, रस्तेबांधणी, नागरी वस्त्यांची वाढ यामुळं होणाऱ्या निसर्गाच्या हानीची कल्पना त्यावेळी आली नाही, पण ही हानी अंतिमत: माणसाच्याच मुळावर उठणार आहे याची जाणीव झाल्यानंतर निसर्गप्रेमी आणि पर्यावरणवाद्यांनीही आपल्या संघटना बळकट करून दबावगट तयार केले. त्यापैकी काहींनी टोकाची भूमिका घेतल्याने काही खरेखुरे आवश्यक प्रकल्पही रखडलं गेले आहेत. सांप्रत काळातील व्यवस्थापनाला उद्योगांचं स्वरूप व नीतिमूल्यं ठरविताना या घटकाचा विचार करणंही आवश्यक बनलं आहे.
खडकाळ मार्ग असला तरी पाणी जसं त्यातून वाट काढतं, तसं वरील सर्व परिवर्तनातून नव्या व्यवस्थापनाला आपला मार्ग शोधला पाहिजे. बदल होणं हा न बदलणारा निर्णय आहे. पण त्यांच्याबरोबर स्वतःला जुळवून घेणं आणि आपलं इप्सित साध्य करणं यात व्यवस्थापकाचं कौशल्य आहे.
१५०० वर्षांपूर्वी चिनी तत्त्ववेत्ता कन्फ्युशियसने म्हटलं होतं, ‘जगात बरोबर किंवा चूक म्हणजे नेमकं काय हे निश्चित सांगता येणार नाही. मात्र, कोणतीही टोकाची भूमिका नेहमीच चुकीची असते. समतोल राखणं नेहमीच बरोबर ठरतंं.'
उद्योगांची नीतिमूल्ये व आचारसंहिता ठरविताना हे तत्व आचारणात आलं पाहिजे.तर उद्योगांची गुणवत्ता सुधारेल. नव्या काळाची आव्हानं यशस्वीपणे स्वीकारण्यास ते सक्षम ठरतील.