अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापन पध्दतींतील बदल

विकिस्रोत कडून
णताही उद्योग किंवा संस्था अखेरीस माणूसच चालवत असतो. पैसा, यंत्रसामुग्री, साधनं व मालमत्ता यांचं महत्त्व नाकारता येत नसलं तरी या निर्जीव वस्तूंवर माणसांचीच सत्ता चालते. त्यामुळे संस्था आणि उद्योगांचं व्यवस्थापन म्हणजे त्यातील 'माणूस' नावाच्या शक्तीचं व्यवस्थापन होय. पण माणूस हा स्वयंप्रज्ञ असल्याने त्याचं व्यवस्थापन यांत्रिक पध्दतीने व केवळ नियमांवर बोट ठेवून करणं यशदायी ठरत नाही. विशेषत: २१व्या शतकात या सत्याची जाणीव प्रकर्षाने होते.

 मानव व्यवस्थापन ही संकल्पना फारशी नवी नसली तरी गेल्या तीस वर्षांत तिला अनेक नवे आयाम प्राप्त झाले आहेत. मानवाचे व्यावसायीकीकरण जसं वाढू लागलं,

तसं मानव व्यवस्थापनाचं महत्त्व व या व्यवस्थापनांच्या पद्धतीत होणारे बदल स्वीकारणं हे अनिवार्य ठरत आहे.
 उदाहरणार्थ, ‘घर’ ही संस्था पाहा. घरातील मुलांना वाढविणं या संकल्पनेत गेल्या तीस वर्षांत किती बदल होत गेला आहे. मुलंं ही वयाने लहान असल्याने घरात त्यांचंं स्थान मोठ्या माणसांपेक्षा दुय्यम कित्येकदा नगण्य मानलंं जात असे. आज्ञाधारकपणा हा महत्त्वाचा गुण मानण्यात येई. घरातील घडामोडींबाबत मुलांनी मत व्यक्त करणंं किंवा त्यांचंं मत विचारणं कमीपणाचं वाटत असे.
'तू मध्ये तोंड घालू नको, तुला काय समजतं?’ हा प्रश्न आज मध्यम वयाच्या असणाऱ्या प्रत्येकाने लहानपणी कित्येकदा ऐकलेला असतोच. याचाच अर्थ शहाणपण हा वयावर अवलंबून आहे असं समजण्याचा तो काळ होता. चूक की बरोबर हे ठरविण्याचा मुख्य निकष ‘वय’ हाच होता. पण गेल्या दहा-पंधरा वर्षांत ही संकल्पना बरीच मागे पडली आहे.
 मुलांच्या संगोपनासाठी नव्या तंत्राचा वापर बहुतेक सुशिक्षित घरांमध्ये होतो. वयाने थोडीशी जाणती झालेली मुलं आई-वडिलांसमोर आपली मतं मांडण्यास कचरत नाहीत आणि आई-वडिलही त्यांना हटवत नाहीत. मुलांना धाकात ठेवणं म्हणजेच शिस्त हा समज मागे पडून मुलांना ठराविक मर्यादेपर्यंत निर्णय स्वातंत्र्य देणं व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्वतंत्रपणे विकास होईल, असं वातावरण घरात राखण्याचा प्रयत्न आधुनिक आईवडिलांकडून जाणीवपूर्वक केला जातो. मुलांच्या चुका मार, बडव किंवा शिक्षा करून सुधारण्यापेक्षा समजावून सांगून सामोपचाराच्या मार्गाने त्याची जाणीव मुलांना करून देण्याची पालकांची हल्ली धडपड चालू असते.
 उद्योग क्षेत्रातही याच कालावधीत नेमके हेच बदल होत आहेत. कर्मचारी हा वेठबिगार मजूर नसून संस्थेचं एक महत्त्वपूर्ण अंग आहे. त्याला त्याच्या भावभावना, रागलोभ, समस्या असून त्यांचा त्याच्या कार्यशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे व्यवस्थापनाने त्याचा मान राखून काम करून घेणं व केवळ शिस्तीच्या चौकटीत त्याला कोंबण्यापेक्षा त्याला निर्णय स्वातंत्र्य देऊन त्याचा आत्मविश्वास वाढविण्याकडे लक्ष देणं अगत्याचं समजलं जातं.
 व्यवस्थापन पध्दतीत झालेल्या बदलांचे काही पैलू पुढीलप्रमाणे आहेत-
 १. तरुण पिढीची बदलती मनोवृत्ती, २. स्त्री व पुरुष यांनी एकत्र काम करणे.
 तरुण पिढीच्या बदलत्या मनोवृत्तीचा संबंध ‘जनरेशन गॅप ' किंवा दोन पिढ्यांतील वैचारिक फरक याच्याशी आहे. तसे पाहता प्रत्येक दोन पिढ्यांमध्ये हा फरक असतोच, पण गेल्या पंचवीस वर्षांत तो इतका वाढला आहे की, त्याच्याशी जमवून घेणंं कित्येकदा अवघड जातं. मी लहान होतो तेव्हा सर्व शहाणपण आपल्या वडिलांकडेच आहे अशी माझी समजूत होती. वडिलांना जे माहीत नाही ते कुणालाच माहीत नसणार याची खात्रीच होती. आज माझ्या छोट्या मुलाने मला एखादा प्रश्न विचारला आणि मी त्याच बरोबर उत्तर दिले की, बाबांनासुध्दा हे माहिती आहे की, असे उद्गार मुलं काढतात. मी मुलांची परीक्षा घेण्याऐवजी मुलचं माझी परीक्षा घेतात.
 मी इंजिनिअर झाल्यानंतर पहिला ‘जॉब’ स्वीकारला तेव्हा माझ्या पन्नाशीतल्या व्यवस्थापकाकडे पाहून मला वाटलं, या माणसाने इथे ३० वर्षे तरी नोकरी केली असेल. तेव्हा त्याला माझ्यापेक्षा खूपच जास्त माहिती असणार. मला त्याच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही असेल, पण आज जेव्हा २२-२४ वर्षांचा इंजिनिअर कामाच्या ठिकाणी प्रवेश करतो, तेव्हा त्याला वाटतं, हा अर्ध्या वयाचा म्हातारा येथे काय करतोय? त्याने आपलं शिक्षण ३० वर्षांपूर्वी घेतलं असणार! त्यामुळे त्याचं ज्ञान निरुपयोगी आहे, अशा तऱ्हेने गेल्या दोन पिढ्यांच्या कालावधीत अनुभव या संकल्पनेचं वजन कमी होत गेलेलं दिसून येतं.
 व्यवस्थापन शैलीलाही या बदलांचा स्वीकार करावा लागत आहे. आज कित्येक कंपन्यांमध्ये आपण पाहतो की, ४०-५० वर्षांच्या जुन्या पिढीला मागे सारून तरणेबांड, नवशिके पदवीधर तरुण वरच्या जागा मिळवत आहेत. ‘जुनं ते सोनं’ या म्हणीची जागा ‘नवं ते गोमटं’ या नव्या म्हणीने घेतली आहे.
 स्त्री व पुरुष यांनी एकत्र काम करण्याबाबतही परिस्थितीत बराच बदल घडला आहे. सुरक्षा क्षेत्राचं उदाहरण पाहिल्यास असं दिसून येईल की, पूर्वी पोलीस आणि लष्कर हे विभाग पुरुषांसाठी राखीव होते. आता महिलांनी या क्षेत्रावर धाड घालून धडाधड घुसखोरी केली. काही वर्षांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या एखाद्या बैठकीत पुरुषांपेक्षा महिला अधिक असल्याचं पाहावयास मिळालं तरी आश्चर्य वाटावयास नको. (महिला या नैसर्गिकरीत्याच जास्त संशयी असल्याने लष्कर व पोलिसांत अधिक चांगली कामगिरी करू शकतील हा भाग सोडून देऊ.)
 करिअरच्या क्षेत्रांमध्ये महिलांच्या वाढत्या संख्येची दखलही आधुनिक व्यवस्थापनाला घ्यावी लागत आहे. महिला व पुरुष यांच्या स्वभावात फरक असल्याने त्यांच्या कार्यपध्दतीतही भिन्नता असते. महिलांची शारीरिक शक्ती पुरुषांपेक्षा कमी असली तरी एकाग्रता अधिक चांगली असते. त्यामळे तशा पध्दतीच्या कामांमध्ये महिला पुरुषांवर बाजी मारतात. शिवाय महिला पुरुषांपेक्षा जास्त भावूक व संवेदनशील असतात. या त्यांच्या गुणांचा वापरही करून घेतला जाणं आवश्यक आहे. त्यामुळे व्यवस्थापनाने महिला व पुरुष यांच्यात कामाचं वाटप करताना त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीचा विचार केला तर अधिक फायदा होऊ शकतो.