'भारता'साठी/पुतळ्यांचे माणसांवर राज्य

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search


पुतळ्यांचे माणसांवर राज्य


 मुंबईच्या एका उपनगरातील बहुसंख्य दलित वस्तीत उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या गळ्यात चपलांचा हार घातला गेलेला जुलैच्या अकरा तारखेस पहाटे काही इलित कार्यकर्त्यांच्या नजरेस आला या कृत्यास जाबदार कोण हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्नही केला नाही; सरळ जवळच्या पोलीस चौकीवर हल्ला केला. येणाऱ्या जाणाऱ्या बाहनांवर तुफान दगडफेक केली, आगी लावल्या. पोलिसांनी केलेल्या गाळीबारात दहाजण ठार झाले. मृतांपैकी काही निव्वळ बघे होते, किंवा केवळ योगायोगाने त्या गर्दीत सापडले होते. मग मुंबई बंद करण्यात आली. महाराष्ट्रातील मोठी शहरे बंद झाली. मग 'महाराष्ट्र बंद' ही झाला. आता हे लोण गुजराथमध्येही पोहोचले आहे. जागोजागी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवर डांब, शेण आतणे असे प्रकार घडत आहेत. अनेक ठिकाणी दंगली उसळल्या आहेत.
 अशा दंगली ही काही नवी गोष्ट नाही. महाराष्ट्राला त्यांची. सवय आहे आणि देशातही हे भीषण नाटक अनेकवेळा घडलेले आहे. १४ ऑगस्ट १९९५ रोजी मराठवाड्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा एक प्रकार घडला आणि दंगलही भडकली. तेव्हापासून महाराष्ट्रात पुतळ्यांनी घडवलेल्या दंगलीचा हा दहावा प्रकार आहे. रस्त्यात कोणी गाय कापून टाकलेली सापडली, मशिदीजवळ डुक्कर टाकलेले आढळले किंवा एका धर्मियांची मिरवणूक वाजत गाजत दुसऱ्या धर्मियांच्या मोहल्ल्यातून जाऊ लागली की, लोक लाठ्या घेऊन सरसावतात, सुरामारी होते. बंदुकाही वापरल्या जातात; टोळ्याटोळ्यांनी लोक फिरतात, घरांवर हल्ले करतात, माणसे बाहेर ओढून मारली जातात, बायकांवर अत्याचार होतात, असे हजारो वेळा घडते.
 या वेळच्या दंगलीत वेगळेपणा दोन प्रकारचा. दंगलीचे निमित्त गायीसारखा पवित्र किंवा डुकरासारखा निषिद्ध प्राणी हे नाही; कारण यावेळी ती हिंदुमुसलमानातील नाही. दलित समाजातील एका मोठ्या वर्गाला परमेश्वरासमान असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यामुळे दंगल सुरू झाली, हा एक फरक, दुसरा फरक म्हणजे, दंगलीचे स्वरूप दोन जमातीतील युद्धाचे नाही; दलित कार्यकर्ते पोलिस आणि शासन यांच्याविरुद्ध उठले आहेत. संताप व्यक्त करण्यासाठी रस्ता बंद, रेल्वे बंद, शहर बंद असले उपद्व्याप करीत आहेत.
 पुतळ्यांची विटंबना कोणी केली? महाराष्ट्राचे गृहमंत्री गोपीनाथ मुंडे म्हणतात, "आमच्या हाती निश्चित पुरावा आला आहे; लवकरच अपराध्यांना अटक होईल." हारातील चपलांवर असलेली धूळ आणि घाम यांची प्रयोगशाळांत तपासणी होत आहे व त्या आधारे गुन्हेगारांचा ठावठिकाणा लावण्याचे प्रयत्न होत असल्याचीही बातमी आहे. दलित असला पाहिजे; बाहेरून कोणी येईल आणि उंच पुतळ्याच्या बाजूला चढून पुतळ्याच्या गळ्यात चपलांचा हार घालण्याचा प्रयत्न करेल आणि ते कोणाच्याच लक्षात येणार नाही असा संभाव फार कमी आहे.
 हे कृत्य कोणी केले याला तसे फारसे महत्त्व नाही. राजा ढाले म्हणतात तसे हे कृत्य दलिताचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो दलित समजबूज राखणारा असेल, कोणी अर्धवट पागलही असू शकेल, कोणी हे कृत्य दारूच्या कैफातही केले असेल. कदाचित तो दलित नसेल, सवर्ण नसेल, हिंदूही नसेल.
 आपण आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करताना पकडले गेलो तर आपले हाल कुत्रा खाणार नाही. एवढीही समज ज्याला नाही असा पागल पुतळ्यावर चढेल आणि त्याला चपलांचा हार घालेल ही शक्यता जवळपास शून्य आहे. एखाद्या अर्धवट वेड्याला हाताशी धरून काही शहाण्यासुरत्या, धोरणी, मतलबी, जाणकार माणसांनी हे घडवून आणले असणे शक्य आहे. मराठवाड्यात झालेल्या दंगलीत शिवाजीच्या पुतळ्याला विटंबणारा, एका ठिकाणीतरी ठार राजकारणी पुढारी असण्याची शक्यता जबरदस्त मोठी आहे.
 हिंदु मुसलमानांच्या दंग्याबाबत झालेल्या चौकशीत असा निष्कर्ष अनेक वेळा निघाला आहे. हिंदु आणि मुसलमानांत संघर्ष निर्माण करण्यात दोन्ही जमातीतील जातीवादी पुढाऱ्यांना स्वारस्य असते. बाबरी मशीदीच्या कांडानंतर मुंबईल दंगे उसळले, बाँबस्फोट झाले, वातावरण असुरक्षिततेचे झाले. दंगलीच्या काळात आपले आईबाप केवळ कोण्या एका धर्माचे होते म्हणून आपल्या पोटात सुरा भोसकला जाऊ शकतो किंवा रॉकेल टाकून आपल्याला जाळले जाऊ शकते ही जाणीव झाली की, माणुसकी संपते. मी हिंदु, हा मुसलमान; हे आपले, ते त्यांचे अशी भाषा चालू होते. मुडदे हिंदुचे किती, मुसलमानांचे किती अशी शिरगणती चालू होते. लहान बालकांवर अत्याचार झाले किंवा स्त्रियांवर बलात्कार झाले म्हणजे शहाणेसरते लोकसद्धा हळहळण्याऐवजी ही मुले आणि महिला आपल्या होत्या का त्यांच्या होत्या असा प्रश्न विचारतात. इच्छा असो नसो, अपरिहार्यपणे सारे मुसलमान मुल्लांच्या भोवती जमतात आणि सारे हिंदु शिवाजीच्या आणि भवानीच्या जयजयकाराचे नारे देऊ लागतात. महाराष्ट्रात युतीचे शासन आले याचे सर्वात प्रमुख कारण बाबरी कांडानंतर उसळलेल्या दंगली आणि त्यामुळे पोसलेल्या जमाती अस्मिता, हे आहे.
 जमातीजमातीतील धर्मलंडांना आणि जातीचे राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांना जातीय दंगली झाल्या म्हणजे मोठा आनंद वाटतो. आपल्या जमातीतील किती का मरेनात, किती का बेघर होईनात, किती का मायबहिणींची अब्रू लुटली जाईना, आता काही काही तरी दंगलीतील घटनांनी डोक्यात रक्त चढलेले जमातीतील लोक आपल्याला बिलगणार याचा त्यांना हर्षोल्हास वाटत असतो. असे काही भयानक घडली म्हणजे धर्मवीरांना मोठा आनंद होतो. त्यासाठी, वेळीवेळी दंगली घडवून आणणे त्यांच्या दृष्टीने आवश्यक बनते. मुलसमान मुल्ला आणि हिंदुवीर यांच्यात हा समान हितसंबंध आहे. त्यामुळे, मधूनमधून गाय कापले जाते, डुकरे फेकली जातात. जमशेदपूरच्या दंगलीत तर असे दिसून आले की दोन जमातीच्या नेत्यांनी एकत्र बसून दंगलीची आग कशी भडकवायची याची तपशीलवार योजना बनवली होती!
 दलित चळवळीची सध्याची परिस्थिती मोठी दयनीय आहे. बाबासाहेब निघून गेल्यानंतर ज्यांच्या हाती या चळवळीचे नेतृत्व आले त्यांच्या पोटात दलितांविषयी करुणा नाही, आपल्या बांधवाच्या परिस्थितीचा अभ्यास नाही, त्यांना माणसासारखे जगता यावे यासाठी काही योजना नाही. बाबासाहेबांचे नाव घ्यावे, वर्षातून एकदा नागपूरला आणि एकदा मुंबईला अथांग भक्तीपोटी जमणाऱ्या दलित बांधवांसमोर मिरवावे, बाकी सर्व वेळ दलितांवर होणाऱ्या अन्यायाच्या भांडवलाने आपल्या पदरी काही पाडून घेता येते काय हे बघावे असा या दलित नेतृत्वाचा खाक्या. अभ्यास नाही, कष्ट करण्याची तयारी नाही, चारित्र्य नाही, सवर्णांना शिव्या घालाव्यात, बेबंद वागावे आणि टक्केवारीच्या हिशेबाने आधिकाराची आणि लाभाची पदे भोगावीत असे दलित चळवळीचे विचित्र रूप झाले आहे.
 महाराष्ट्रात तर जितके नेते तितके रिपब्लिकन पक्ष! अखिल भारतीय पातळीवर जबगजीवनरामांचा वारसा सांगणारे पास्वान आणि मिळेल त्या पक्षाशी चुंबाचुंबी करणारे काशीराम यांचे नेतृत्व. या परिस्थितीचा आता दलितांनाही मोठा संताप येऊ लागला आहे. अशाही परिस्थितीत दलित आणि दलितेतर याच्यात संघर्ष माजला तर दलित समाज, गत्यंतर नसल्याने आपल्यामागे येईल अशा हिशेबाने राजकारणी आराखेडे बांधून हेतुपुरस्सर बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना घडवून आणून प्रक्षोभ तयार केला गेला असण्याची शक्यता मोठी आहे. पुतळ्याच्या विटंबनेचा प्रकार घडला त्याच्या आधी तीनच दिवस एका दलित कार्यकर्त्याने दलित नेत्यांना एकत्र येण्याचा निर्वाणीचा इशारा दिला होता. अन्यथा गंभीर परिणाम भोगण्याची तयारी ठेवावी अशी धमकीही दिली होती. आणखीही एक शक्यता आहे. काँग्रेसच्या झेंड्याखाली खानदानी क्षत्रिय व दलित एकत्र होताहेत आणि युतीच्या झेंड्याखाली सवर्ण व इतर मागासवर्गीय (OBC) यांचा एकोपा घडत आहे. या मोर्चेबांधणीतून पुतळ्याच्या विटंबनेचा प्रकार उद्भवला असण्याचीही शक्यता आहे. पुतळ्याच्या अवमानाने क्षुब्ध झालेले दलित पोलिस चौकीककडे वळले, शासनाविरुद्ध उठले आणि युतीचे शासन बरखास्त झाले पाहिजे अशा मागण्या करू लागले आणि त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या राहत्या घरांवर शिवसेनेच्या मान्यवर नेत्यांच्या नेतृत्वाखाली हल्ले झाले या घटना मोठ्या बोलक्या आहेत.
 दलित समाज युती शासनाच्या विरुद्ध खवळून उठला तर हिंदुत्वाच्या 'तुम्ही आम्ही सकल हिंदु, बंधु बंधु' या आकृतिबंधालाच तडा जातो. रामाचा अश्वमेधाचा घोडा जातो. रामाचा अश्वमेधाचा घोडा अडवण्याचे सामर्थ्य शंबुकाच्या हौतात्म्यात आहे हे सूत्र ओळखून जाणीवपूर्वक ही दंगल घडवून आणली गेली असू शकते. महाराष्ट्रातील मान्यवर दलित नेत्यांना या सगळ्या काळात दलित समाजाने धुत्कारले आणि एकदोन पुढाऱ्यांना तर लोकांच्या हातापायांचा दणका खावा लागला. याचा अर्थ, दलित समाजाच्या भावनांना हात घालून त्यांना युती शासनाच्या विरुद्ध उभे करायचे खरे; पण नेतृत्व रिपब्लिकन पठडीतील मुखंडांकडे जाऊ नये याचीही काळजी घेतली जात असावी.
 बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर सारा दलित समाज पोरका झाला आहे. दलित समाजातील एका समाजापुरती बाबासाहेबांचे नेतृत्व राहिले. त्या समाजातही पोटजातीच्या आधाराने चळवहीचे तुकडे तुकडे झाले. इतर दलित जाती आंदोलनात स्वतःचे हक्काचे स्थान मिळविण्याकरिता धडपडू लागल्या. आंबेडकरी चळळीच्या वारसदारांनी चळवळ त्यांना बराच काळ तगवून गेली. मराठवाडा निद्यापीठाचे नाव बदलल्यावर पुण्याच्या विद्यापीठाला असेच कोणा बहुजन समाजातील राजर्षीचे नाव देण्याची टूम निघाली. त्याबरोबरच, गावागावातील दलित वस्तीत आणि शहरातील हरेक दलित मोहल्ल्यात बाबासाहेबांचे पुतळे उभे करण्याचा कार्यक्रम दलित नेत्यांनी जाणीवपूर्वक आणि योजनापूर्वक राबवला.
 मोठ्या शहरात बाबासाहेबांचे सुबक, भारदस्त पुतळे उभे राहू शकले; गावागावात इतके खर्चीले पुतळे थोडेच उभे राहू शकणार? कोणा स्थानिक कारागीराने सिमेंटच्या मुशीत ओतून तयार केलेले निळ्या रंगातले पुतळे जागोजाग उभे राहिले. दगडावर शेंदूर ओतून स्थापलेल्या मारुतीचे भीमकाय महारुद्र हनुमंताशी काय साम्य? तितकेच साम्य या निळ्या मूर्तीत आणि युगपुरुष बाबासाहेबात रामदासांनी गावोगाव दगडांचे मारुती स्थापले कारण, त्यापरत्या सुबक मूर्ति मसुलमानी अंमलात एकसंध टिकून राहण्याची शक्यताच नव्हती. गावोगाव स्थापन झालेल्या पुतळ्यांनी एक असेच मोठे काम केले.
 मुसलमान या देशात आल्यापासून दलितांनी वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी जागोजागी इस्लामचा स्वीकार केला. त्यामुळे दलितांची दु:खे संपली असे झाले नाही. उलट, मुसलमान समाजाच्या पोटात पूर्वदलित मुसलमानांची एक अवमानित जमातच तयार झाली; पण इतर समाजाशी टक्कर घेण्याचा प्रसंग आला की धर्मांतर स्वीकारलेले मुसलमान अगदी तुर्कस्थानातून आलेल्या शुद्ध बीजाच्या मुसलमानाइतकेच ताठ्याने वागू शकतात. पाटलाच्या वाड्याच्या दारासमोरील पायरीखाली उघड्या पायांनीसुद्धा येऊ न शकणारा कालचा दलित मुसलमान झाल्यावर बूट खडाखडा वाजवीत तिथे थाटाने प्रवेश करू लागला. इस्लाम स्वीकारल्याने दलिंदर संपले नाही; पण निदान ताठ मान ठेवण्याची शक्यता मिळाली.
 बौद्ध धर्म स्वीकारल्याने दलितांच दैन्यही संपले नाही आणि अस्मिताही मिळाली नाही. ब्राह्मणी पूजाअर्चाऐवजी पीतवस्त्रधारी भीक्खूनी केलेल्या पूजाअर्चाचे स्तोम माजले. गावोगावी उभ्या झालेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यांनी दलित समाजाला एक मोठी विचित्र अस्मिता बहाल केली आहे. पुतळा उभा करायचा म्हणजे जागा ठरावी लागते. गावातील सार्वजनिक सभासमारंभांच्या स्थळी पुतळा उभारला गेला तर काही अर्थ आहे या भावनेने अनेक गावात पुतळ्यांवरून आणि पुतळ्यांच्या जागांवरून तेढ माजते आहे. गावठाणातील लोकांना कोणाचा पुतळा उभारण्याची फारशी इच्छा नाही आणि ऐपतही नाही. उलट, अनेक गावांत बाबासाहेबांचेच नव्हे तर त्याबरोबर जोतिबा फुले आणि गौतम बुद्ध यांचे निळे, तांबडे-निळे आणि पिवळे पुतळे उभे आहेत. शहरातील अशा मूर्तींनी तर झोपडपट्टीच्या वस्तीतही जमिनीचे वाद उभे केलेले आहेत. रामाच्या मंदिराच्या निमित्ताने सारा देश उभा चिरण्याचे काम हिंदुत्वावाद्यांनी केले, त्याच प्रकाराने सत्ता हस्तगत करण्याचा काही हिशेब आणि मोर्चेबांधणी दलित नेत्यांनी केलेली दिसते.
 राम काय, बाबासाहेब आंबेडकर काय, त्यांचे चारित्र्य काय, ऐतिहासिक कार्य काय याच्याशी त्यांच्या अनुयायांचे काही देणेघेणे नाही. या उदारचरितांचा व्यापार राजकारणाची दुकाने थाटून बसलेल्या मंडळीनी मांडला आहे. महापुरुषांच्या नावाने आणि प्रतिकांच्या आधाराने आपापल्या समाजाला बांधून घेण्याच्या हव्यासापोटी देश फुटतो आहे याचे त्यांना सोयरसुतक नाही. या प्रकारच्या राजकारणातून देशाची एक फाळणी झाली. देशाच्या दुसऱ्या फाळणीची सुरुवात मुंबईच्या पंतनगरमधील रमाबाई वस्तीतील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेने आपल्या डोळ्यादेखत झाली असेल!
 आपल्या देशात जातीवादी व्यवस्था हजारो वर्षे चालली. कमी समजल्या जाणाऱ्या जमातींना जनावरांपेक्षा अधिक वाईट वागणूक मिळाली. साधे माणूस म्हणूनसुद्धा त्यांच्याकडे बघितले गेले नाही. पोटाला खायला नाही, नेसायला वस्त्र नाही, आसऱ्याला छप्पर नाही, भोवताली नुसता गलिच्छ नकर, विद्या नाही, भोवताली नुसता गलिच्छ नरक, विद्या नाही, माणूस म्हणून वर येण्याची काही आशा स्थितीत बहुसंख्य जमातींना जगावे लागले. या अमानुष व्यवस्थेचे समर्थन एखादा शंकराचार्य सोडल्यास आज कोणीही करू पाहत नाही: हा अन्याय संपवण्याचा मार्ग कोणता एवढाच काय तो प्रश्न आहे.
 घटनेने जाती संपवल्या, सर्वांना समान हक्क दिले. अगदी ॲट्रासिटी ॲक्टसुद्धा झाला; पण कागदाच्या कपट्यांनी जातीवाद संपला नाही आणि दलितांच्या दुःखाचे कड शांत झाले नाहीत.
 जातीच्या आधारे जातीजातीत संघर्ष तयार करून दलितातील म्होरक्यांना अधिकारपदे देऊन हा प्रश्न सुटणार आहे. असा मंडलवाद मांडणाऱ्यांची आज चलती आहे. ब्राह्मणी नीतिमत्ता, तत्त्वज्ञान आणि पांडित्य नाकारण्याऐवजी नैतिकता, अभ्यास आणि परिश्रम यांचीच हेटाळणी करणारे दलितांचे म्होरके बनले आहेत. बाबासाहेबांचा अभ्यास, तपस्या, व्यासंग, सुसंस्कृतता, नीतिमत्ता यांचा लवलेशही ज्यांच्यापाशी नाही अशी मंडळी बाबासाहेबांचे नाव घेत देश फोडायला निघाली आहेत.
 जातीयतेचा रोग जातीजातीमधील भिंती अधिक उंच करून हटणारा नाही. सर्वच समाजाला पुरुषार्थाचे मूल्य जडले तर त्या प्रयत्नात जातीजातींचा कचरा कुठेच्या कुठे वाहून जाईल; पण असा पुरुषार्थ सांगणारे पुढे कोणी येईल तरच काही आशेला जागा दिसते.
 यापुढे दलित चळवळीचे नेतृत्व करणाऱ्यांनी स्वतःच्या मनाला एक परखड प्रश्न विचारून बघावा, "मला स्वतंत्र सार्वभौभ दलितस्थान हवे आहे काय?" आणि आपल्या अंत:करणातील बाबासाहेबांच्या मूर्तीला स्परून जे उत्तर मिळेल त्या निष्ठेने मोर्चेबांधणी करावी.

(२१ जुलै १९९७)

♦♦